निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १०- मदतकार्यातील सहभागाचा शेवटचा दिवस (अंतिम)

Submitted by मार्गी on 27 August, 2015 - 02:16

सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन. धन्यवाद.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: २- गोरीगंगेच्या काठावरती...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ३- आपत्तीचे आकलन होताना...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ४- काली गंगेच्या काठावरती...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ५- तवाघाट जवळील तांडव आणि आरोग्य शिबिर...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ६- खेलामार्गे धारचुला...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ७- स्टोअरची तयारी
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ८- महापूरामागच्या कारणांची मालिका
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ९- मदतकार्याचे विविध पैलू व जमिनीवरील वास्तव
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १०- मदतकार्यातील सहभागाचा शेवटचा दिवस (अंतिम)


वितरणासाठी जात असलेलं सामान

... ८ ऑगस्ट. मैत्री आणि अर्पण संस्थांच्या ह्या टीमच्या कामाचा हा शेवटचा दिवस. मदत कार्य पुढेही सुरू राहील. ही टीम परत जाईल. पुढची योजना सुरू आहे. महिला डॉक्टरांची टीम बोलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढे अनेक वेगळ्या घटकांना समोर ठेवून काम करायचं आहे. आता आपत्ती व्यवस्थापनाचा प्रारंभिक चरण संपून दीर्घकालीन कार्यावर अधिक लक्ष दिलं जाईल. शिवाय अन्य काही ठिकाणी असेसमेंटही केलं जाऊ शकतं.

आज कामाचा शेवटचा दिवस तर आहेच, पण सर्वांत महत्त्वाचा दिवसही आहे. आज सर्वांवर कामाचं थोडं प्रेशर दिसत आहे. इतकं मोठं सामान गावांमध्ये नेऊन वाटप करणं सोपं तर नाहीच. आणि रस्ता हाही एक काळजीचा विषय आहे. आजच्या दिवसासाठी सगळे कार्यकर्ते इथे एकत्र आले आहेत. अर्पणचे सर्व सदस्य आले आहेत. इतरही काही जण मदतीला आहेत. सामान उचलण्यासाठी- ठेवण्यासाठी काही लोकांना बोलवलं आहे. त्यामुळे फार जास्त अडचण येऊ नये. अर्थात् काही ग्रामस्थ उत्तेजित होतात; थोडा वाद- विवाद करतात. पण त्यांना संभाळायला टीमचे सदस्य सज्ज आहेत.

सकाळी अगदी लवकर निघालो. स्टोअरवर सर्व तयारी आहेच. अशा वेळी नेहमी होतं ते इथेही होतं आहे. काही लोक जास्त काळजी करतात; काही मागे राहतात. सगळ्यांवरच थोडा ताण आहे. अचानक मोठा पाऊस सुरू झाला. रस्त्यावर धुकंही आलं. तरी आता थांबायचं नाही. पण जौलजिबी पूलावर थोडा वेळ थांबावं लागलं. कारण पुढे रस्ता बंद आहे, असं कळलं. रात्री मोठा पाऊस झाला. नक्कीच डोंगरातून कोसळणा-या पाण्याचे प्रवाह वाढले असणार. त्यामुळेच रस्त्यांवरून पाण्याचे प्रपात वाहत असणार. थोडा वेळ थांबून पुढे निघालो.

रस्ता अगदी ओळखीचा झाला आहे. नदीमध्ये जास्त पाणी दिसत आहे. वरच्या बाजूच्या पर्वतांमध्ये मोठा पाऊस झालेला दिसतोय. मध्ये मध्ये थांबावं लागत आहे. बरमच्या आधी एका जागी पाण्याचा धबधबाच रस्त्यावर आहे. इतका शक्तिशाली आहे की, टेंपो त्यामध्ये सामान घेऊन जाऊ शकणार नाही. जीप कशीबशी त्यातून पार झाली. अर्थात् आम्हांला बाजूलाच असलेल्या एका छोट्या पुलियावरून पायी पायी जावं लागलं. जीप पार होताना बघूनही भिती वाटली. नंतर तिथल्या अधिका-यांनी काही वेळ वाहनांना थांबवलं. जे.सी.बी. रस्त्यातल्या दगडांना सरकवून पाण्याचा मार्ग मोकळा करत आहे. तरीही खूप वेळ लागला. एका साहसी बाईकस्वाराने त्या जलधारेमध्ये मोटरसायकल नेण्याची हिंमत केली. अर्धं अंतर जाऊन त्याला परत यावं लागलं. पाण्याच्या प्रवाहामध्ये मोठा फोर्स आहे. मोठ्या मोठ्या दगडांना पाणी उचलून फेकून देतंय! जे.सी.बी. चालवणा-याच्या हिंमतीला दाद द्यायला हवी. बराच वेळ हे काम सुरू राहिलं. पाण्याचा प्रवाह कमी होताना दिसत नाहीय. पण जे.सी.बी. चालवणा-याने त्या प्रवाहातले दगड दूर करून त्याला रुंद केलं. त्यामुळे त्याचा फोर्स पसरला व मंदावला. आता कदाचित ते पाणी वाहनांना फेकू शकणार नाही. मग हळु हळु वाहन सुरू झाले. आमचा टेंपो आणि मिनि ट्रकसुद्धा पार झाले...

आत्तापर्यंत कालिका पूलाजवळ हुड़की, घरूड़ी व मनकोट गावातले लोक आलेले आहेत. लोकांचा जमाव झाला की तो नेहमी अनियंत्रित होतो. तिथे पोहचल्यावर एका जागी टेंपो व ट्रक थांबवून टेबल लावला. लोकांचे कूपन बघायला सुरुवात केली. तोपर्यंत टेंपो व ट्रकमध्ये प्रत्येक कुटुंबासाठी पॅकेटस रेडी करायला सुरुवात झाली. लवकरच सिस्टीम लागून गेली. एकामागोमाग एक कुटुंब यायला लागले. सुरुवातील थोडा गोंधळ झाला; नंतर वाटप व्यवस्थित सुरू झालं. एक काळजी ही आहे की, आणखी काही सामान घेऊन येणारा एक टेंपो अजून मागेच आहे. आणि रस्त्यात अडथळा वाढला तर त्याला थांबावं लागेल. अर्थात् आत्ता पुरेसं सामान आहे; त्यामुळे इथे अडचण येणार नाही. वितरण सुरू झाल्यावर प्रत्येक सदस्याने एक एक काम घेतलं. कोणी ट्रकमधून पॅकेटस खाली देतं आहे; कोणी टेबलावर कूपन्स बघून लोकांना पुढे पाठवतं आहे; कोणी लोक एकदाच सामान नेत आहेत ना, ह्यावर लक्ष ठेवून आहे तर कोणी जमावाला नियंत्रित करत आहेत. हळु हळु सामान घेऊन जाणारे लोक परत जायला लागले. हळु हळु ते पुलावरून नदी ओलांडून पुढे पोहचले. आता ह्या वितरणातला सर्वांत अवघड टप्पा असेल- दुर्गम वाटेने त्यांना पस्तीस किलोचं पॅकेट घरापर्यंत न्यायचं आहे. आणि त्यामध्ये लोक यशस्वी होत आहेत. अडचण होऊनही ते सामान नेत आहेत. महिलासुद्धा त्यात मागे नाहीत. लोक एकमेकांच्या मदतीने सामान नेत आहेत...


वितरणाच्या जागी जमलेले ग्रामस्थ

ह्या प्रकारे वितरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. काही लोकांनी गोंधळ केला थोडा, पण त्यांना समजवण्यात आलं. सूचीमध्ये नाव नसलेल्या पण खरोखरच गावात राहणा-या ग्रामस्थांनाही सामान दिलं गेलं. प्रत्येक कुटूंबाला तांदुळ, सूजी, साखर, तेल इ. निर्धारित सामान दिलं गेलं. त्याआधी गावांमध्ये अर्पणच्या दिदींच्या निगराणीमध्ये महिलांना सॅनिटरी नॅपकिन्ससुद्धा दिले गेले होते.

हे सर्व होईपर्यंत दुपार झाली. गावातले सर्व कुटुंब झाल्यावर तिथून लुमतीला जाण्यासाठी निघालो. रस्त्यात चामीजवळ गर्दी झालेली आहे. त्यांना थोडं सांगून पुढे जाण्यासाठी निघालो. लुमतीच्या थोडं आधी एका जागी रस्ता परत बंद आहे. तिथे थोडा वेळ थांबून ठरवलं की, वितरण इथेच करावं लागेल. लोकांना निरोप पाठवला आणि ते थोड्याच वेळात आले. इथेसुद्धा बी.आर.ओ.चं बरंच काम सुरू आहे. आधीच्या वितरणाप्रमाणे इथेही लवकरच व्यवस्था लागली. मागून येणा-या सामानाला अजूनही वेळ लागतोय. लुमती गावातल्या लोकांनाही दूरवरून चालत इथे यावं लागलं. आणि आता त्यांना सामान घेऊन जायचंसुद्धा आहे. त्यासाठी त्यांनी एक युक्ती केली. काही लोक दोरखंड घेऊन आले आहेत. ते आता पॅकेट कंबरेला किंवा पाठीला बांधून नेतील. अपेक्षेप्रमाणे काम सुरू राहिलं. लोकही मदत करत आहेत.

आता फक्त एक गांव बाकी आहे. तिथे वितरण पूर्ण झाल्यावर ह्या टप्प्याचं काम पूर्ण होईल. लुमतीचं काम संपवून चामीला आलो. वाट बघून कंटाळलेले लोक थोडे अस्वस्थ आहेत. पण सर आणि अर्पणच्या सदस्यांनी त्यांना समजावलं. टेंपो आणि ट्रक गावाच्या एका बाजूला ठेवले. काही गोष्टी संपल्या आहेत. त्यामुळे येणा-या टेंपोसाठी थांबावं लागत आहे. तोपर्यंत चामीच्या स्टोअरसाठीची खोली बघून फायनल करण्यात आली. आता जर काही सामान उरलं तर इथे ठेवता येईल. मागे राहिलेला टेंपो आल्यानंतर परत टेबल लावले आणि एकामागोमाग एक कुटूंबाला सामान देणं सुरू झालं. काही युवकही मदतीला पुढे आले. काम पूर्ण होत आलं तसं सगळ्यांच्या चेह-यावर असलेला तणाव कमी होत गेला.

टीममध्ये काम करताना प्रत्येक जण अनेक प्रकारे मदत करतो. कोणी सामान बांधण्यास मदत करत आहेत; कोणी सामान मोजत आहेत; सामान संपलं तर नाही ना हे बघत आहेत. ह्या सगळ्या वाटपामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक तर कुटुंबांची योग्य सूची बनवणे आणि सूचीमध्ये ज्यांचं नाव नाहीय; पण जे गावातले रहिवासी आहेत अशा लोकांना नीट बघून त्यांना कूपन देणे. दुसरी गोष्ट म्हणजे गर्दीला शांत करणे. हे स्वाभाविकरित्या होत गेलं. त्यामध्ये सोबत आलेले टेंपो व ट्रकचे चालक; सामान उचलण्यासाठी बोलावलेले लोक ह्यांनीही चांगलं सहकार्य केलं. ह्यावेळी पोलिसांनाही बोलावलं होतं. त्यांनीही मदत केली...

परत जातानासुद्धा रस्त्यात थांबावं लागलं. बरम गावाजवळ रस्त्यावर पाण्याचा प्रवाह व त्याचा जोर कमी झाला आहे. मनामध्ये अनेक विचार आहेत. जे काही बघितलं आहे, ते खूप अस्वस्थ करणारं आहे. ह्या टप्प्याचं काम पूर्ण होत आहे, पण पुढेही बरंच काम बाकी आहे. सरांनी म्हंटलंच आहे ना, लोकांना सामानाचं वाटप करणे; आरोग्य शिबिर घेणे; औषधं देणे हे प्राथमिक काम आहे. आवश्यक आहे; पण पहिल्या टप्प्याचं काम आहे. त्यानंतर सरकारी पातळीवर सुरक्षित स्थानांविषयी अडव्होकसी; जल प्रवाहाविषयी संशोधन आणि पर्यायी उपजीविका अशा अनेक मुद्द्यांवर काम करायचं आहे. किंबहुना सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण निसर्गाने दिलेल्या ह्या धोक्याच्या इशारापासून बोध घ्यायला पाहिजे. जीवनशैली व विकासाच्या परिभाषेविषयी खोलवर विचार केला पाहिजे. कारण निसर्गाला धोका पोहचवण्यामध्ये आपणच तर कारणीभूत आहोत. जगात घडणा-या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात. त्यामुळे एका स्थानीसुद्धा जर पर्यावरणामध्ये इतका मोठा ताण असेल तर त्याचा अर्थ आहे की संपूर्ण पर्यावरणच मोठ्या प्रमाणात बदलत आहे.

... शेवटची‌ संध्याकाळ! हेल्पियाला पोहचल्यानंतर सरांनी सगळ्यांचं कौतुक करून उत्साह वाढवला. अर्पण व मैत्री- सर्वांसाठी उत्साहाने 'थ्री चिअर्स' केलं. मतभेद दूर ठेवून सकारात्मक दृष्टीकोणातून हे काम पूर्ण झालं. सर आणि एक मित्र काही दिवस थांबणार आहेत. बाकी परत जायला निघतील.

खरोखर जीवनात असे काही दिवस येतात ज्याबद्दल नंतर आपल्याला प्रश्न पडतो की ते खरोखर प्रत्यक्षात घडले; आपण स्वप्न तर बघितलं नाही? हे दिवसही असेच होते. इतक्या थोड्या दिवसांमध्ये खूप काही बघायला मिळालं. जे काम केलं ते साधारणच आहे. त्यात विशेष काही नाही. पण अनेकदा रुग्णाला औषधांबरोबरच सोबतीचीही गरज असते. उत्साह वाढवण्यासाठी प्रेरणा देण्याची गरज असते. आणि कोणी काहीही म्हणो, प्रत्यक्षात दुर्बल किंवा असहाय कोणीच नसतो आणि कोणीच दुस-याला मदत करू शकेल इतका समर्थ किंवा शक्तीशालीसुद्धा नसतो. इथे प्रत्येक जण एक सामान्य पथिक आहे. फक्त एक गोष्ट होऊ शकते- काही वेळ एकमेकांना सोबत दिली जाऊ शकते. बाकी काहीही नाही...

२८ जुलै ते ८ ऑगस्ट ह्या दिवसांच्या आधीही मैत्रीने बरंच काम केलं होतं. ह्या टीमनंतरही अनेक टीम येत जात राहिल्या. कित्येक गावांमध्ये शेकडो कुटुंबांना मोठी मदत दिली गेली. नंतर पुढच्या टप्प्याचं काम सुरू झालं. त्यामधून एक आव्हान सातत्याने पुढे आलं. ते आव्हान म्हणजे निसर्गाला हानी न पोहचवता मानवी दिनक्रम कसे सुरू ठेवावे- राहणीमान व उपजीविका कशी ठेवावी. त्याविषयी अधिक पर्याय शोधले पाहिजेत आणि पर्यायी विकासाबद्दलही गंभीर प्रकारे विचार केला पाहिजे. आणि हे प्रश्न फक्त पर्वतीय भागांचे नसून शहरी भागांचेही‌ आहेत. डोंगरावर अतिक्रमण केल्यामुळे माळीणसारख्या दुर्घटना घडत आहेत. दर वर्षी मुंबईला २६ जुलैची भिती आहे. ह्या लेखमालिकेचा इंग्रजी सारांश इथे वाचता येईल.

त्या दिवसांच्या आठवणी मनात ताज्या आहेत. पण इथे थांबणं ठीक. इत्यलम्| सर्व वाचकांना पुनश्च मन:पूर्वक धन्यवाद!

 मैत्री संस्था नेपाळच्या भूकंपानंतर तिथे अजूनही कार्यरत आहे. त्याशिवाय संस्था मेळघाटात व विविध विषयांवर मोठं काम करते. संस्थेबद्दल अधिक माहिती व संपर्कासाठी- www.maitripune.net maitri1997@gmail.com.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या उत्कृष्ट लेखमालेबद्दल धन्यवाद
मदतकार्यातील सर्व सहभागी लोकांना सलाम _/\_

पुढील लिखाणाच्या प्रतीक्षेत

गुंतवून ठेवणारी, खुप परिणामकारक लेखमाला झाली ही. प्रत्यक्षातली परिस्थिती खुप विदारक असूनही तुम्ही ते सुसह्य शैलीत लिहित गेलात. त्यात शब्दबंबाळपणा नव्हता. त्याबद्दल आणि नियमीत टाकलेल्या भागांबद्दल तुमचे मनःपुर्वक आभार.

जाता जाता, तुमच्या लेखनात एक विनम्रता आणि सकारात्मकता आहे, जी आजकाल अतिशय दुर्मिळ आहे. अन्यथा अशा प्रकारच्या लेखनात एक स्वाभाविक दंभ उमटलेला जाणवतो, कधी कळत, कधी नकळत. तुमच्या लद्दाख सायकलवारीच्या लेखमालेतही हे वैशिष्ट्य जाणवलं होतं, म्हणुन आज मुद्दाम उल्लेख केला.

तुम्हाला आणि कोणत्याही आपत्कालीन मदतकार्यात सहभागी होणा-या सर्वच ज्ञात-अज्ञात स्वयंसेवकांना शतशः प्रणाम.

We are proud of you. It's true that we can not take mother nature for granted any more. Wish you all the best.

ही लेखमाला देखील छान झाली..तुम्ही आणि तुमच्या टीमने इतक्या प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या कामाबद्दल खरंच सलाम!
ज्या प्रकारे आपण निसर्गाला ओरबाडतो आहोत त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागणार हे निश्तिच Sad

आत्तापर्यन्त टीवी किंवा न्यूजपेपर हे च दोन सोर्स होते अश्या बातम्यांकरता..आणी दृष्टीआड सृष्टी या कायद्या
प्रमाणे ऐकून्,वाचून झाल्या कि मना आड जात होत्या..
पण या मालिकेमुळे उत्तराखंड समजलाय, तेथील दारूण परिस्थिती मुळे निर्माण होणार्‍या समस्यांशी जवळून ओळख झाली.
पीडितांची आणी मदत समितीची शारीरिक आणी मानसिक अवस्था , खोलवर परिणाम करत आहे.
तुमच्या कार्याला मनापासून ___/\___