निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ७- स्टोअरची तयारी

Submitted by मार्गी on 23 August, 2015 - 21:39

सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन. धन्यवाद.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: २- गोरीगंगेच्या काठावरती...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ३- आपत्तीचे आकलन होताना...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ४- काली गंगेच्या काठावरती...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ५- तवाघाट जवळील तांडव आणि आरोग्य शिबिर...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ६- खेलामार्गे धारचुला...
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ७- स्टोअरची तयारी

... २ ऑगस्टच्या रात्री हेल्पियाला आल्यानंतर थोडा आराम मिळाला. आता तांत्रिक बाबींवर लक्ष द्यायचं आहे. धारचुलामध्ये थांबलेले दोघे जण औषधं घेऊन सकाळी तिथून निघतील. जीप बदलून ते अवघड वाटेने तवा घाट व तिथून पुढे खेलाला जातील. त्यांच्यासोबत सामानही आहे. डॉक्टरांची टीम आज खेलापासून पुढे जाईल आणि एन.एच.पी.सी. गेस्ट हाऊस वर मुक्काम व आराम करेल. इतक्या हानीनंतरही ते गेस्ट हाऊस सुरू‌ आहे. हेल्पियाला पोहचल्यानंतर थोडी सर्दी‌ व खोकला होतोय. पण सरांनी सांगितलं की, त्याचं कारण थंडी नसून उष्णता आहे. ह्या दिवसांमध्ये इथे सतत पाऊस होते आहे आणि दिवसासुद्धा आर्द्रता खूप जास्त आहे.

दुस-या दिवशी पहिले अस्कोटला गेलो. इथे बँक अकाउंट उघडलं आहे पण चेकबूक अजून मिळालं नाही. चेकबूक मिळाल्यावर सामान खरेदी, स्टोअरचं भाडं अशा कामांसाठी चेकनेसुद्धा पैसे देता येतील. पण चेक बूक मिळायलाच अजून आठ दिवस लागतील, असं कळालं व त्यामुळे दुसरा उपाय करावा लागला. सरांनी सरळ एस.बी.आय.च्या वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क केला आणि मग लगेच चेकबूक मिळालं. तोपर्यंत अजून एक गोष्ट निश्चित झाली की, सामान घेऊन येणारा ट्रक रूद्रपूरवरून सरळ अस्कोटलाच येईल. त्यासाठी तिथे कोणाला जावं लागणार नाही. आता फक्त स्टोअर तयार करून ठेवायचं आहे.

अस्कोट- जौलजिबी रस्त्यावर ब्याडा गावामध्ये एका हॉटेलजवळ एक रिकामी खोली त्यासाठी घेतलेली आहे. इथे काही मदतीचं सामानही ठेवलं आहे. ते नीट करावं लागेल. खोलीत पाणी येऊ नये म्हणून टर्पोलिन टाकावं लागेल. हॉटेलमध्ये आणखी एक खोलीसुद्धा मिळाली. तिथे आधी आलेले कपडे ठीक लावून ठेवायचे आहेत. ह्या कामासाठी दोन जणसुद्धा दिवसभरासाठी घेतलेले आहेत. आधीच्या खोलीतल्या कपड्यांच्या थैल्या नीट पॅक करून दुस-या खोलीत ठेवायच्या आहेत. रेशन, भाज्या, औषधे ह्यांबद्दलही सतत बोलणं सुरू आहे.

अर्पण संस्थेमध्ये मुख्यत: दिदीच आहेत आणि काही दादा आहेत. आता सर्वांशी चांगली मैत्री झाली आहे. अर्पण संस्था मुख्यत: महिला सशक्तीकरणावर काम करते. पंचायत राज, महिला अधिकार, महिला आत्मनिर्भरता अशा विषयांवर संस्था १२ वर्षांपासून काही गावांमध्ये काम करते. इथे काही प्रमाणात ह्युमन ट्रॅफिकिंग होतं. लग्नामध्ये महिलांना फसवलं जातं; अत्याचार होतो. ह्या मुद्द्यांवर संस्था काम करते. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये अशा ग्रास रूटवर काम करणा-या संस्था बघितल्या होत्या पण त्यांच्या तुलनेत ही संस्था जास्त चांगली वाटली. त्याच्या कार्यालयापासून सदस्यांच्या विचार करण्यामध्ये हा फरक जाणवतो. संस्थेतील सदस्यांना बाह्य जगाबद्दल चांगली माहिती आहे. सखोल काम करताना काय करावं हेही त्यांना छान जमतं. अर्थात् त्यांनी कधी आपत्ती व्यवस्थापनावर काम केलेलं नाही, त्यामुळे काही त्रुटीसुद्धा आहेत. पण ते स्वाभाविक आहे.

खरं तर ह्या पूर्ण मदत कार्यामध्ये मेथोडॉलॉजीच्या दृष्टीने काही त्रुटी आहेत. गावांचे सर्व्हे पूर्ण झालेले नाहीत, कुटुंबांची संख्या व त्यातील आपत्तीग्रस्त कुटुंबांची संख्या अशी माहिती वैज्ञानिक पद्धतीने घेण्यात आलेली नाही. पण आपत्तीनंतर हे नेहमीच्या पद्धतीने करताही येत नाही. काही गोष्टी कॉमन सेंस आणि मूलभूत आकलनाच्या आधारे कराव्या लागतात. आणि आपत्तीमधील कामाचा मैत्रीचा अनुभव खूप मोठा आहे त्यामुळे त्या आधारे ह्या गोष्टी केल्या जात आहेत.

एका सरदारजींविषयी कळालं ज्यांनी जौलजिबीजवळ रस्त्यावर ट्रकमधून मदत सामुग्री आणली आणि ती रस्त्यावरच वाटली. तिथे जे लोक त्या वेळी होते, त्यांनी ती‌ घेतली. आणि अर्थातच जे रस्त्यापर्यंत येऊ शकत होते, त्यांनाच ती मिळाली. मैत्री- अर्पणची पद्धत ह्याहून निश्चित वेगळी आहे. जास्तीत जास्त आत जाऊन लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला जातोय. जिथे काहीच मदत पोहचत नाहीय, तिथे पोहचण्याचा प्रयत्न आहे. आधीच्या टप्प्यामध्ये मैत्रीची टीम कंज्योतीसारख्या रस्त्यापासून दूर असलेल्या गावांमध्ये जात राहिली आहे. मदत सामुग्री व रेशन इ. विषयीसुद्धा खूप प्रयत्न केला जातोय की, योग्य भावाने ते मिळेल ज्यामुळे ते जास्तीत जास्त लोकांना देता येईल. हे सामान शक्य तितक्या प्रमाणात पीडित लोकांच्या अगदी जवळ जाऊन त्यांना द्यायचं आहे. चांगला रस्ता ज्यांना आहे अशा लोकांना ते देण्यात अर्थ नाही.

एक गोष्ट स्पष्ट आहे की, ज्या गावांमध्ये मैत्री- अर्पणचा संपर्क झाला आहे, त्याहून खूप जास्त गावं प्रभावित आहेत. मुन्सियारीच्या थोडं पुढे आल्यावर मुन्सियारी- जौलजिबी रस्ता पूर्ण प्रभावित आहे. तिथले गावांचा संपर्क तुटलेला आहे. आता तिथे कसं पोहचणार? अशा प्रश्नांची मालिका मोठी आहे. कळत नकळत सर्व जण पावसाळा संपण्याची वाट बघत आहेत. तेव्हा खरी स्थिरता मिळेल. गावामध्ये येणं- जाणं होईल. त्याआधी अर्थात सप्टेंबरच्या पूर्वी सर्व काम अनिश्चित आहे. कारण नवे बनवलेले रस्ते व त्यांचे पॅचेससुद्धा धोकादायक रेषेत आहेत. पावसाळा पूर्ण संपल्यावरच लोक निश्चिंत होतील. तेव्हा पाणीही कमी झालं असेल. लोक काही काळासाठी तरी आपल्या शेतामध्ये व घरांमध्ये जाऊ शकतील.

... दिवसभरात स्टोअर सेट करण्याचं काम सुरू राहिलं. ट्रक रुद्रपूरवरून लवकरच निघेल. उद्या इथे पोहचण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत बाकीचे साथीदार खेलाला पोहचले असतील. त्यांच्याशी संपर्क करण्याचं माध्यम सॅटेलाईट फोन हेच आहे. तेच मधून मधून संपर्क करतील. एक गोष्ट चांगली झाली की, आज डॉक्टर व त्यांच्यासोबतच्या साथीदारांना थोडा आराम मिळाला. ते सतत शिबिर घेत आले आहेत. त्यांच्या बघण्यात अनेक गोष्टी आलेल्या आहेत. आरोग्य सेवांचा पाया कच्चा असल्यामुळे अनेक गोष्टी होतात. रुग्णालयात/ आरोग्य केंद्रात प्रसुती करण्याच्या ऐवजी घरीच केली जाते. आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. इथे काही प्रमाणात अंधश्रद्धासुद्धा आहेत. डोंगरातल्या गावांमध्ये जास्त करून आदिवस्सी राहतात. त्यांच्यात काही मेंढपाळ व जडीबुटी बनवणारेसुद्धा आहेत. त्यांच्यापर्यंत आरोग्य यंत्रणा फार पोहचलेली नाही. शिवाय खेलाच्या शिबिरात बघितलं होतंच की, सरकारी डॉक्टरही इथे सेवा द्यायला फार उत्सुक नाहीत. आपत्तीग्रस्त आणि दुर्गम भागामध्ये हे स्वाभाविक आहे...

ब्याडामध्ये स्टोअर उभं करता करता रात्र झाली. परत जाताना रस्त्यातच एका ग्रामीण दुकानदाराला भेटलो. हा माणूस अष्टपैलू आहे. ट्रक चालवतो, दुकान चालवतो, भाज्या विकतो, छोटं- मोठं सामानही विकतो. तो ट्रकने जौलजिबीला जात होता. रस्त्यातच भेटायचं ठरलं. सरांचं त्याच्याशी सामान खरेदीविषयी बोलणं सुरू आहे. ट्रकमधून तो बोलण्यासाठी आमच्या जीपमध्ये आला. सरांनी त्याच्याशी जी‌ चर्चा केली, ती अविस्मरणीय आहे!

भाजी, रेशन- गव्हाचं पीठ, तांदूळ, साखर, डाळी, सोयाबीन, तेल अशा सगळ्यांचे भाव सरांनी त्याला विचारले. आणि अनेक टन ठोक घेतल्यानंतरचा भाव विचारला. तो उत्तरं देत राहिला. आधी अनेकदा बघितलं होतं की, आपत्तीच्या काळात भाव वाढलेले आहेत आणि सामान्य व्यापारी लोक तरीही भाव कमी करू इच्छित नाहीत; उलट ह्या परिस्थितीचा स्वत:च्या स्वार्थासाठी वापरच करू इच्छितात. हा कापडी नावाचा युवकसुद्धा असंच सांगत होता. हळु हळु सरांनी त्याला समजावलं की, मैत्री- अर्पण कोण आहेत; काय करतात; काय करू इच्छितात; गावांमध्ये परिस्थिती कशी आहे; लोक कसे आपला वेळ देत आहेत; कशी दूरवरून मदत एकत्र केली जात आहे; वेगवेगळ्या जागी ठोकमध्ये काय भाव आहे; त्याला किती रेटवर नफा होईल इ. इ. प्रत्येक बाजू सरांनी त्याच्यासमोर ठेवली. सरांकडे माहिती प्रचंड जोरदार आहे. त्याला कुठेच ती खोडता आली नाही. त्याच्याही नकळत सरांनी त्याचा डिफेन्स भेदला. बघता बघता सरांनी सांगितलेल्या भावासाठी तो तयार झाला. आणि हेच नाही, सामानाची डिलिव्हरी ब्याडाच्या स्टोअरमध्ये करण्यासाठीही तो तयार झाला! ही चर्चा विलक्षण वाटली.

...ह्या प्रकारे कामाच्या नव्या पैलूंना समोर आणत ३ ऑगस्टची रात्र झाली. आता उद्या पिथौरागढ़ला जायचं आहे. अर्पण संस्थेच्या सचिवांना भेटायचं आहे. सरांच्या सोबत असल्यामुळे असे कित्येक तांत्रिक पैलू आता बघायला मिळतील.


ह्या हॉटेलजवळच स्टोअर आहे

 मैत्री संस्था नेपाळच्या भूकंपानंतर तिथे अजूनही कार्यरत आहे. त्याशिवाय संस्था मेळघाटात व विविध विषयांवर मोठं काम करते. संस्थेबद्दल अधिक माहिती व संपर्कासाठी- www.maitripune.net maitri1997@gmail.com.

पुढील भाग: निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ८- महापूरामागच्या कारणांची मालिका

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज सगळे भाग एकत्रच वाचून काढले. फार सुंदर लिहिताय तुम्ही. इतक्या आतल्या गोष्टी म्हणजे गावांची परिस्थिती आमच्यापर्यंत पोचवलीत त्याबद्दल तुमचे आभार.

मैत्री आणि अर्पण संस्थेबद्दल खूपच आदर वाटला. जगात अजूनही नि:स्वार्थी लोकं आहेत हे बघून फारच बरं वाटलं.

मैत्री संस्थेला कोणाची मदत मिळते वगैरेबद्दल सांगू शकाल कां? तसंच तिथे वॉलेंटियर म्हणून काम करण्यासाठी काय काय असावं लागतं?

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

@आउटडोअर्स- प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मैत्री सर्वसामान्यांच्या देणग्यांवर चालते. तुमची सहभाग घेण्याची इच्छा हीच मोठी गोष्ट आहे. तुम्हांला जो प्रकार आवडेल त्यानुसार विविध प्रकारे सहभाग घेऊ शकता. मैत्रीला संपर्क करून अधिक माहिती घेऊन पुढे ठरवू शकता. त्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! Happy

मार्गी - सगळे भाग वाचले. मस्तच लिहिले आहे. आता पुढचा भाग कधी ?

आडो, ही मैत्री तिच संस्था आहे जी मेळघाटात काम करते. आपत्ती व्यवस्थापनात कुशल असे मैत्रीचे स्वयंसेवक नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस जिथे गरज पडेल तेव्हा नेहेमीच अशी मदत करायला जातात. वर वर्णन केलेल्या आपत्तीच्या वेळेला आम्ही पुण्यातून कपडे गोळा केले होते आणि त्यांचे पॅकिंग करण्याच्या कामी थोडासा हात्भार लावला होता.

अधिक माहिती साठी पहा
http://www.maitripune.net