निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ९- मदतकार्याचे विविध पैलू व जमिनीवरील वास्तव

Submitted by मार्गी on 25 August, 2015 - 22:25

सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन. धन्यवाद.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: २- गोरीगंगेच्या काठावरती...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ३- आपत्तीचे आकलन होताना...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ४- काली गंगेच्या काठावरती...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ५- तवाघाट जवळील तांडव आणि आरोग्य शिबिर...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ६- खेलामार्गे धारचुला...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ७- स्टोअरची तयारी
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ८- महापूरामागच्या कारणांची मालिका
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ९- मदतकार्याचे विविध पैलू व जमिनीवरील वास्तव

... ६ ऑगस्टची सकाळ. आता ह्या टीमच्या कामाचे शेवटचे तीन दिवस बाकी आहेत. आणि काम सुरू करून जेमतेम आठ दिवस झाले आहेत. पण तसं वाटतच नाहीय इतकी सगळ्यांसोबत भट्टी जमली आहे. खूप गोष्टी कळत आहेत. सर वेळोवेळी सांगत आहेत की, इथे केलेलं काम तुम्हांला नेहमी लक्षात राहील. सरांनी एकदा असंही सांगितलं की, उत्तराखंडमध्ये रस्त्यांच्या समस्या व रस्त्यांना धोके असले तरी चार धाम यात्रा परत सुरू करायला हवी. कारण यात्रेमुळे लोकांना रोजगार तरी मिळत राहील. ह्या सगळ्या विषयाबद्दल पूर्वी किती अज्ञानात होतो, हे सतत जाणवत आहे...

ह्या टीमने केलेल्या कामाचा एक रिपोर्ट आज बनवायचा आहे. त्यामध्ये नंतर डॉक्टर त्यांची निरीक्षणे जोडतील. संस्थेमध्ये आजवरच्या कामाचं रिपोर्टिंग द्यायचं‌ आहे. पुढची मदत मिळवण्यासाठीसुद्धा त्याची मदत होईल. रोजच्या कामाविषयी मोबाईलमध्ये नोटस काढलेल्या आहेत. आणि जे बघितलं होतं, ते इतकं जीवंत होतं की रिपोर्ट बनवण्यात काहीच अडचण आली नाही. सर आज ब्याडा स्टोअरकडे गेले आहेत. परवा गावांमध्ये सामानाचं वितरण करायचं आहे. त्याची तयारी सुरू आहे. संध्याकाळी त्यावर सविस्तर मीटिंग होऊन योजना ठरेल. दोघे डॉक्टर व अन्य साथीदारसुद्धा धारचुलापर्यंत आले आहेत. संध्याकाळी तेही भेटतील.

रिपोर्टसोबतच गावातल्या कुटुंबांच्या याद्या बनवायच्या आहेत. हे काम समजावून सांगत असतानाच सरांना टीममधल्या प्रत्येक सदस्याच्या क्षमतेचं कसं आकलन आहे, हेही बघायला मिळालं. अर्पणच्या सदस्यांच्या क्षमता बघून ते प्रत्येकाला काम सुचवत आहेत. गावातल्या वितरणाचं नियोजनही त्यांनी अर्पणच्या दिदींकडे सोपवलं आहे. कामाचा मुख्य टप्पा जवळ येत असल्यामुळे सगळे जण दिलेलं काम करतील. खरं तर गावांची माहिती इतकी पूर्ण नाहीय. पण प्रत्येक गावामधला संपर्क क्रमांक आहे. अंगणवाडी आणि एएनएमकडून घेतलेली माहितीसुद्धा आहे. त्यानुसार प्रत्येक गावातल्या आवश्यक कुटुंबांची व व्यक्तींची सूची बनवली जात आहे.

संध्याकाळी सर आल्यानंतर मोठी बैठक झाली. प्रत्येक गोष्टीची तयारी बघितली गेली. त्यानुसार परवा ज्या गावांमध्ये सामान वाटप आहे, तिथे आधी जाऊन सूचना द्यावी लागेल. त्यासाठी वेगळ्या टीम्स बनवल्या गेल्या. हे होईपर्यंत डॉक्टर आणि अन्य मित्र पोहचले. सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे आहेत. अनेक दिवसांचा थकवा आणि कष्ट स्पष्ट दिसत आहेत. थकले असले तरी जोषात आहेत! थोड्या वेळात तेसुद्धा मीटिंगला आले. उद्या हेल्पियाजवळ एक आरोग्य शिबिर घ्यायचं ठरलं. इथे वनराजी आदिवासींची एक वस्ती आहे. तिथेही आरोग्य सुविधांचा अभाव आहे आणि शिबिराची गरज आहे. उद्या डॉक्टर तिथे एक शिबिर घेतील. अर्पणमध्ये वनराजी समाजाचे सदस्य आहेत; ते त्यांना तिथे घेऊन जातील. अर्पणमध्ये वनराजीसह तिबेटला लागून असलेल्या पर्वतीय भागांमधले मेंढपाळांसारख्या समुदायांमधलेही सदस्य आहेत. त्यांना भुतिया म्हणतात. प्रसिद्ध खेळाडू बावचुंग भुतिया ह्याच समाजातला. हा समाज तिबेटजवळ पशुपालन करतो. पूर्वी ते तिबेटला जाऊन मीठ विकत असायचे. असो.

संध्याकाळी मित्रांनी त्यांच्या कामाचे अनुभव सांगितले. खेलापुढच्या गावांमधले त्यांचे अनुभव वेगळेच आहेत. त्यांनी अनेक गोष्टी‌ बघितल्या. पांगला, पांगू अशा गावांमध्ये अनेक लोक जडीबुटींचा व्यवसाय करतात व त्यातून लाखो रूपये कमवतात. परंतु हा व्यवसाय काही प्रमाणात अवैध आहे. कारण अनेक जडीबुटी अफू, चरस, गांजा अशा मादक पदार्थांच्याही असतात. आपत्तीमध्ये अशा ग्रामस्थांचंही मोठं नुकसान झा्लेलं त्यांना दिसलं. त्यांच्या पूर्ण प्रवासात रस्ता अत्यंत खराब होता. कठिण पायवाटा तर सतत होत्या. नारायण आश्रमाकडे जाताना मात्र रस्ता चालण्यासारखा होता व त्यांना जीपसुद्धा मिळाली. पण जीपच्या चालकाने लिफ्टसाठी प्रत्येकाकडून हजार रूपये मागितले. समजावून सांगितलं तरी त्याने ऐकलं नाही आणि त्यांना दोन हजार रूपये त्याला द्यावे लागले. काही गावांमध्येही प्रतिकूल अनुभव आले. काही लोक नेहमी जास्त बोलणारे असतात आणि नकळत काही बोलून जातात. त्यांना त्याचं वाईट वाटलं पण काम थांबलं नाही. ठरवल्याप्रमाणे त्यांनी सर्व गाव पूर्ण केले. एक दिवस ते नारायण आश्रमातही राहिले. तिथे त्यांना बर्फ दिसला. वाटेत आर्मीच्या लोकांसोबतसुद्धा काही वेळ राहता आलं. बी.आर.ओ.च्या लोकांनाही भेटले. तिथे त्यांना कळालं की, बी.आर.ओ.ला दिलं जाणारं इंधन निम्न गुणवत्तेचं असतं आणि म्हणून ते त्यांचं इंधन स्थानिक ड्रायव्हरांना विकतात! ही गोष्ट खूप अस्वस्थ करणारी वाटली. देशाच्या ख-या सेवकांच्या कामामध्ये कोण आणि का हस्तक्षेप करत असेल...

मित्र हे सांगत होते तेव्हा एका प्रसंगी त्यांना हसू आवरलं नाही. जेव्हा सगळे जण एका गावात गेले तेव्हा उन्हामुळे व सन बर्निंगमुळे एकाचा चेहरा अगदी काळा झाला होता. ग्रामस्थांनी विचारलं की, तुम्ही सर्व तर महाराष्ट्रातले आहात पण हा केरळचा आहे का? Happy ...आता आम्हांला लवकरच परत निघायचं आहे ही, गोष्ट अस्वस्थ करते आहे. कोणालाच जाणीवही नाही की, हेल्पियाला येऊन फक्त आठ- नऊ दिवस झाले आहेत आणि लवकरच निघायचं आहे. आम्ही तर इथलेच आहोत, असं वाटतंय. त्या रात्रीही उशीरापर्यंत मीटिंग चालली.

******

७ ऑगस्ट. ह्या टीमच्या कामाचा नववा दिवस. आज काही जण आरोग्य शिबिरात जातील आणि तीन टीम्स गावांमध्ये जातील आणि उद्याच्या सामान वितरणाची माहिती देतील. काही जण आज हुड़की, घरूड़ी व मनकोटलाही जातील. तोच भितीदायक रस्ता! इथे कोणत्या टीमने जावं, हे ठरवायची वेळ आली तेव्हा सरांनी टीमच्या सगळ्यात अष्टपैलू आणि दणकट मित्राला निवडलं. खरोखर असे अष्टपैलू व लढाऊ लोक कोणत्याही टीमला बळकटी देतात; तिच्या कामाचा दर्जा वाढवतात. त्याच्यासोबत अर्पणचा एक कार्यकर्ताही जाईल. ग्रामस्थांशी आता चांगला परिचय झाला आहे. अन्य दोन टीम चामी आणि लुमती गावांमध्ये जातील. तिथल्या कुटुंबांची संख्या व नावांची सूची अपडेट करतील आणि उद्याच्या वितरणाविषयी लोकांना माहिती देतील. कोणतीही अडचण न येता प्रत्येक कुटूंबाला योग्य प्रकारे आवश्यक ते सामान मिळावं, ह्यासाठी कूपनसुद्धा बनवलं आहे. हे कूपन गावातल्या प्रत्येक कुटुंबाला द्यायचं आहे. उद्या जेव्हा वितरण केलं जाईल, तेव्हा कुटुंबाचे सदस्य हे कूपन दाखवून सामान नेतील. त्यामुळे गर्दी आणि अडचण होणार नाही, असं नियोजन आहे.

हेल्पियावरून निघालो आणि जौलजिबीपासून पुढे आलो. रस्ता अजूनही तसाच आहे. अनेक जागी रस्ता अडलेला आहे. थांबत थांबत जावं लागत आहे. उद्या ह्याच रस्त्याने सामान न्यायचं आहे- छोटा ट्रक आणि टेंपो जाऊ शकेल ना? कालिकाच्या लोखंडी ब्रिजपर्यंत सगळे जण एकत्र गेलो. तिथे घरूड़ी- मनकोटची टीम वेगळी झाली. चामीमध्ये आमची टीमसुद्धा उतरली. प्रत्येक गावात दोन- तीन जण जातील. मैत्रीसोबत अर्पणचे कार्यकर्ते अशी टीम्स आहेत.

चामीमध्ये सरपंच नाही मिळाले; पण दूस-या पंचांनी सगळ्या कुटुंबांची नावं दिली आणि त्यांना कूपन दिले. माहिती थोडी अपुरी असल्यामुळे काही जणांची नावं पूर्ण नव्हती. गावात एकाच नावाचे अनेक जण असतात. त्यामुळे थोडी अडचण नक्की आली. आणि उद्याही वाटप करताना अशा अडचणी येतीलच. पण ते अपेक्षितच आहे. गावामध्ये सरकारी अधिकारीही भेटले. काही लोक स्वत: पुढाकार घेऊन सामग्रीच्या वाटपात मदत करत आहेत. इथेही फिरताना गोरी गंगेची गर्जना जवळच आहे. दुपारी लुमतीमध्ये जाऊन आलेली टीमसुद्धा मिळाली. चामीमध्ये एका भागात खूप गर्दी झाली आहे. इथे मोठं नुकसान झालं आहे आणि बरीच सामग्री वाटलीही आहे. पण लोक तरीही उत्तेजित आहेत. स्वाभाविक आहे. प्रत्येक जण येऊन विचारतो आहे. तिथल्या लोकांचीही नावं घेतली आणि ज्या कुटुंबांचं यादीत नाव होतं, त्यांना कूपन दिलं. इथे एक खोली स्टोअरसाठी चांगली आहे. इथेही ब्याडासारखं एक स्टोअर सुरू करायचं आहे. एका पंचाच्या घरी गेलो. नदीला अगदी लागून त्यांचं घर आहे आणि तिथेही नुकसान झालं आहे. इथे ग्रीफमध्ये (General Reserve Engineering Force) काम करणारे एक जण जखमीसुद्धा झाले आहेत. त्यांना ग्रीफने मदत केली नाही, असं सांगत होते. हे सरांना आणि अर्पण संस्थेच्या लोकांना कळवायला हवं.


तांडवानंतर शांत झालेली नदी

परत जाईपर्यंत संध्याकाळ होत आली. घरूड़ी आणि मनकोटला गेलेले मित्र कुठे असतील? ते आत्ता अर्ध्या रस्त्यात आहेत. त्यांना अजून मोठी वाट ओलांडायची आहे! त्यांची वाट बघत थांबलो. खूप वेळाने जवळजवळ अंधारात ते कालिकाजवळचा लोखंडी पूल ओलांडून जीपकडे आले. एक धक्कादायक गोष्ट कळाली- तिथे गेलेला मित्र- प्रसाद- त्याचा पाय अगदी नदीच्या वर असलेल्या पायवाटेवर घसरला होता. तो जखमीही झाला. त्याने कशीबशी झाडाची फांदी पकडली होती. तिला धरून तो कसाबसा पुढे गेला. त्याचे पाय खूप दुखत आहेत. हे झालं तरी त्याने नंतर गावातल्या लोकांशी खूप चर्चा केली. आणि आता तो आरामात जीपमध्ये बसतोय! इतका थकवा आणि इतका त्रास होऊनही त्याचा उत्साह वाढलेलाच आहे! परत येताना जीपमध्ये गाण्यांची मैफल झाली आणि त्याच मित्राने सुंदर गाणीही म्हंटली! असे सोबती‌ असताना कोणताही प्रवास सुखदच होणार.

... संध्याकाळी परतल्यावर चर्चा झाली आणि उद्याची अंतिम योजना ठरली. उद्याचा दिवस ह्या टीमचा शेवटचा दिवस! अर्थात् सर आणि अजून एक मित्र मागे थांबणार आहेत. सर प्रत्येकाला काही दिवस थांबण्याविषयी विचारत आहेत. ह्या कामात आणखी सहभाग घ्यायचा आहे. पण त्यासाठी बरीच तयारी करावी लागेल. शारीरिक स्तरावर फिटनेस खूप जास्त वाढवायला हवा. आणि जे आजवर बघितलं, ते लोकांपर्यंत पोहचवायचं आहे. बाहेरून ह्या गोष्टी अजिबात कळत नाहीत. त्यामुळे इथे अजून थांबण्याऐवजी फिटनेस वाढवून आणि जे बघितलं, ते लोकांना सांगून नंतर यावं असं वाटतंय. बघूया कसं होतं.


आपण त्यांना नक्की कशाचा वारसा आणि कोणतं भविष्य देत आहोत?

 मैत्री संस्था नेपाळच्या भूकंपानंतर तिथे अजूनही कार्यरत आहे. त्याशिवाय संस्था मेळघाटात व विविध विषयांवर मोठं काम करते. संस्थेबद्दल अधिक माहिती व संपर्कासाठी- www.maitripune.net maitri1997@gmail.com.

पुढील भाग: निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १०- मदतकार्यातील सहभागाचा शेवटचा दिवस (अंतिम)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान माहिती मिळाली याही भागात.

ह्या कामात आणखी सहभाग घ्यायचा आहे. पण त्यासाठी बरीच तयारी करावी लागेल. शारीरिक स्तरावर फिटनेस खूप जास्त वाढवायला हवा. आणि जे आजवर बघितलं, ते लोकांपर्यंत पोहचवायचं आहे

मदत कार्यात भाग घ्यावा असे सगळ्यांना मनोमन वाट्त असले आणि जरी ते प्रत्यक्षात उतरत नसले तरी जेव्हा केव्हा ते उतरेल तेव्हा हा मुद्दा सग़ळ्यात महत्वाचा ठरेल असे वाटतेय. मागच्या एका भागातही तुम्ही मदत करण्याऐवजी तुमच्या तब्येतीमुळे तुम्हाला तिथल्या लोकांची मदत घ्यावी लागली असे लिहिलेय.

तुम्ही आल्यानंतर फिटनेससाठी काहीतरी केले असेलच. तेही पुढे वेगळ्या लेखात येऊ द्या.