सांबार मसाला.

Submitted by आरती on 26 August, 2015 - 06:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ टिस्पून हरभराडाळ
२ टिस्पून उडीदडाळ
२ टिस्पून जिरे
४ टिस्पून धणे
१.५ टिस्पून मेथीदाणे
३ टिस्पून खोबऱ्याचा कीस
२ सुकलेल्या लाल मिरच्या
२०-२५ कडीलींबाची पाने
२ टिस्पून तेल

क्रमवार पाककृती: 

सगळे घटक पदार्थ कढईत घेऊन नीट एकत्र करून घ्यावेत आणि मंद आचेवर दहा ते पंधरा मिनिट परतावे. चांगले खुटखुटीत परतले गेले की ताटलीत पसरून गार करायला ठेवावे. गार झाल्यावर मिक्सर / ग्राईंडर वर बारीक भुकटी करावी.
.
SambarMasala 2.jpg
.
Sambar Masala.jpg

वाढणी/प्रमाण: 
चार माणसांच्या सांबारला पुरतो.
अधिक टिपा: 

या मसाल्याला 'हॉटेलच्या' सांबारची टिपिकल चव नाही. पण मस्त खमंग चव आहे. अगदी दक्षिण भारतीयांसहित अनेकांना आवडला आहे Happy

मिरची कमी आहे त्यामुळे लाल चुटूक रंग येत नाही पण तिखट कमी खाणाऱ्याना चालतो आणि जास्तीचे तिखट फोडणीत घालण्याचा पर्याय तर असतोच.

माहितीचा स्रोत: 
मुळ कृती आईची त्यात फक्त ह.डाळ जास्तीची घातली.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जियो आरती जियो. हो माझ्याकडे पण भरपूर कडीपत्ता आहे. मोठी जुडी आणली आहे. मस्त वापरता येईल. धन्यवाद मसाल्याकरता.

वा! आज अगदी मस्त मस्त कृती लिहिते आहे. मी तुझे लेखन वाचलेच नाही पुर्वी कधी.

तुला पुल्लोगरेचा मसाला येतो का? तोही लिही.

मला मी धणे पावडर सारखी दिसते आहे. मी नेहमी शक्ती, प्रिया, एम. टी. आर असे ब्रान्ड विकत घेतो आणि त्याचा मसाला लाल असतो.

मी अन्नपुर्णामधल्या रेसेपीने करते सांबार मसाला. प्रमाण बहूदा असंच आहे, फक्त हरबरा डाळ नाहीये आणि मिरच्या जास्त आहेत बहूतेक त्या प्रमाणात. (आमच्या घरी तिखट कमी खाणारे बरेच मेंबर असल्याने मी कमीच करते मिरच्या) पुस्तकात बघावं लागेल नक्की काय प्रमाण आहे ते.
आता या प्रमाणाने करून बघेन. सगळे पदार्थ भाजून कुटल्यावर इतका मस्त वास सुटतो ना घरात. ताज्या मसाल्याचं सांबार मस्त लागतं. Happy
रेसेपीसाठी धन्यवाद.

सगळे पदार्थ भाजून कुटल्यावर इतका मस्त वास सुटतो ना घरात. ताज्या मसाल्याचं सांबार मस्त लागतं>> +१. मी वनिताच्या रेसिपीनं करते सांबार मसाला. माझी रेसिपी: (मला वाटीभर मसाला साधारण पंधरा दिवस पुरतो. तो संपल्यानंतर)

घरातून बाहेर पडणे. उजवीकडे वळून दोन घरं जाऊन वनिताच्या घरात जाणे. तिच्याशी तासभर इकडतिकडच्या गप्पा मारणे किंवा दोघी एकत्र बसून एखादा पिक्चर पाहणे.. सोबत फिल्टर कापी आणि इतर स्नॅक्स. घरी परत येताना तिला "सांबार मसाला संपलाय" असं स्पष्टपणे सांगणे. सांबार मसाल्याची वाटी घेऊन घरी येणे.

सगळे पदार्थ भाजून कुटल्यावर इतका मस्त वास सुटतो ना घरात. ताज्या मसाल्याचं सांबार मस्त लागतं>> +१.
मला पण खूप आवडतो हा वास. दोनदा पुरेल इतकाच करते मी एकावेळी. मग परत ताजा.

नंदिनी, तुझी रेसिपी भारीये. आता वनिताची पण सांग की Happy

देवकी, कडिलींब नक्की घालुन बघ, मस्त चव येते.

अरे वा आरती..........सेम माझी रेसेपी. मी फक्त कढिलिंबाची पानं नाही घालत मसाल्यात. ती डायरेक्ट सांबारात.
आणखी एक अ‍ॅडिशन म्हणजे एक चमचा मिरे भाजून यात वाटताना अ‍ॅड करणे. आरती हे करून बघ.
याला खरंच ती टिपिकल चव नाही. पण एक वेगळी खमंग चव येते.
एकदा हा मसाला करायला लागलात की रेडिमेड कधीच आणणार नाही तुम्ही.

नुसतं वाचूनच सुगंध दरवळल्यासारखं वाटलं आणि चव रेंगाळली जीभेवर. कढीलिंब मजा आणत असेल.
मी विकतचाच वापरत आलेय, आता करून बघते Happy

एकदा हा मसाला करायला लागलात की रेडिमेड कधीच आणणार नाही तुम्ही.>>
मानुषी, अगदी आमच्याकडे असेच होते. दुसरा कुठलाही मसाला वापरला तर "चांगल झालं आहे पण ...." असे उत्तर असते. Happy
मिरे मी एकदा घालुन बघितले. लेकीला थोडे तिखट झाले म्हणुन मग परत बंद केले.

सायो, नक्की सांग बघुन.

सईबाई नक्की करुन बघा. Happy

मस्त रेसिपी. ताज्या सांबार मसाल्याच्या सांबारची चव अद्भुत असते. मसाला घटक भाजून मिक्सरवर भुकटी करताना येणारा दरवळ अशक्य खमंग असतो. माझ्या आवडत्या सुवासांमधला एक सुवास आहे हा! Happy

हमरा भी ये ही रेस्पी है
एकदा घरी>> चांगल झाल आहे पण >>>>+११

मी थोड़ा जास्त करून फ्रीज मध्ये ठेवत पण अति जास्त करत नाही २ ते ४ वेळा सांबार होईल एव्हढाच.

मस्त
अशीच करतो फक्त हिंग घालतो वाटून काढताना.
कढीलिंबाचा स्वाद खूप छान लागतो.
नेहमीचे सांबार छान होतेच पण फक्त मला आवडणारे एक कार्ल्याचे सांबारही सुपर्ब होते ही पावडर वापरून.

https://m.youtube.com/watch?v=0FDCDVL4fcM

वत्सला ही रेसिपी पहा वरची

मी फक्त कारल्यासोबत कांदा आणि टोमॅटोही तेलावर परतून घेतो आणि उकडलेले हरभरे पहिल्यांदा घातले होते पण नंतरच्या वेळी आवश्यक वाटले नाहीत.

अमेय, काय पण आठवण काढलीस कारल्याच्या सांबाराची! माझी आई हे कारल्याचं सांबार अन कारलं घालून केलेलं फोडणीचं वरण/ आमटी अप्रतीम करते. Happy

अमेय, तुम्ही कारल्याच्या सांबाराची आणि योकु, तू कारलं-आमटीची रेसिपी वेगळ्या धाग्यावर लिहा बघू.

सांबार ची रेसीपी पण लिहा.>>
माझी पद्धत : उभा चिरलेला कांदा तेलावर परतुन घ्यायचा. मग त्यात हळाद्,हिंग, तिखट, सांबार मसाला घालायचा. बारीक चिरलेला टोमॅटो घालुन मंद आचेवर शिजवुन त्याचा लगदा करायचा. थोडे मिठ घालुन बाकी भाज्या घालायच्या. सगळे मिश्रण एकत्र करुन झाकण घालुन एक वाफ आणायची. सारखे केलेले वरण, आवश्यक असल्यास पाणी, चिंचेचा कोळ आणि चवीप्रमणे मिठ घालुन एक उकळी आणायची. आवडत असल्यास नखा एवढा गुळाचा खडाही चालतो.

अमेय,
हिंग घालतो वाटून काढताना. >> आधी हिंग घलण्याचे काही खास कारण का ?