उरलेल्या अन्नाचा सदूपयोग - २ (पोळ्या/चपात्या)

Submitted by प्राप्ती on 25 August, 2015 - 12:50

संदर्भ :-

पानात वाढलंय तेवढं पूर्ण संपवायचं नाहीतर देवबाप्पा रागवेल' असं म्हणून आजोबा नेहेमी दम भरायचे आणि आम्हीही मग निमूट पानातलं सगळं नेमानं संपवायचं. एकतर चौरस आहार मिळावा म्हणून सगळे पदार्थ पोटात जाणे आवश्यक आणि दुसरे अन्न वाया जाऊ देऊ नये हा उद्देश. आपल्याकडे बालपणापासून देण्यात आलेले असे संस्कार त्यात आता तर दाल-आटे का भाव पण एवढे वाढलेत कि अन्न टाकून देणे न खिशाला परवडणारे ना मनाला पटणारे. पण घरात जरा मोठा परिवार असला कि अन्न उरण्याची समस्या मोठी असते. बरेचदा पाहुणे येऊन गेले कि, एखादा समारंभ आटोपल्यावर , लहान-मोठा कार्यक्रम झाल्यास किंवा एखाद्या दिवशी नेमकी दोन माणसं बाहेरून जेवून येतात आणि अन्न उरतं. अश्या उरलेल्या अन्नाचा वाया न जाऊ देता योग्य नायनाट लावणे किंवा सदूपयोग करून घेणे कौशल्याचे काम आहे. एवीतेवी हे प्रत्येक गृहिणीला अनुभवाने छान येत असतं. म्हणूनच आपण आपल्या उरलेल्या अन्नाच्या रेसिपीज एकमेकींशी शेअर करूया. मला माहिती असलेल्या आणि नेहेमी करत असलेल्या रेसिपी खालील प्रमाणे,

आज पोळ्या उरल्यात कि त्याचे काय काय पदार्थ बनवता येऊ शकतात ते बघूया. तुमच्याकडे असणाऱ्या रेसिपीज पण कृपया शेअर कराव्यात.

२) उरलेल्या पोळ्या / फुलके

* पोळीचे कूटके :- फोडणीच्या भातासारखेच पोळ्यांचे तुकडे/ कुटके करून फोडणी घालणे हा सगळ्यांना माहिती असणारा प्रकार.
दुसरे पोळ्या मिक्सर मधून रवाळ बारीक करून फोडणी घालायचे हा पोळ्यांचा मोकळा उपमा तयार.

* पोळ्यांचा पास्ता :- कांदा परतून चिंचेचा कोळ किंवा टोमाटो घालून परतवून आवडेल तसे सगळे मसाले (तिखट, मीठ, हळद सांबर मसाला, गरम मसाला, गुळ) घालून गोड-आंबट किंवा आवडेल त्या चवीच्या फोडणीत पाणी घालून उकळू द्यायचे. दोनेक मिनिट चांगले उकळले कि त्यात पोळ्यांचे (जरा मोठ्या आकारात केलेले) तुकडे घालायचे. एक उकळी घेऊन लगेच बंद करायचे. कोथिंबीर पेरून तसेच गरम गरम खायला घ्यायचे.

हा पास्ता चाइनिज सॉसेस (सोया सॉस, चिली सॉस, विनेगर, शेजवान सॉस) आणि भाज्या (पातीचा कांदा, कोबी, सिमला मिरची, गाजर, फ्रेंचबिन्स, लसूण, आलं किसलेलं) वापरूनही करता येईल..... किंवा पास्ता करतात त्या पद्धतीने फक्त पोळ्यांचे तुकडे पाण्यात फार उकडू द्यायचे नाहीत तेवढी काळजी घ्यायची.

* वड्या (नेमके नाव माहिती नाही) :- कमीत कमी ४-५ उरलेल्या किंवा ताज्या पोळ्या हव्यात. दीड वाटी बेसन, दोन छोटे चमचे चिंचेचा कोळ, थोडा ओवा, अर्धा चमचा आल-लसूण पेस्ट, तिखट, मीठ, हळद, जिरे-धने पूड, साखर आवडीनुसार. कसुरी मेथी किंवा कोथिंबीर. पोळ्या सोडून इतर सगळे जिन्नस एकत्र करून अगदी थोडं थोडं पाणी घालून भज्यांसाठी भिजवतात तेवढे सैलसर बेसन भिजवून घ्यायचे. आता एक पोळी खाली ठेवून त्यावर मिश्रण पसरवावे (यावर हवे तर पनीर, चीज किंवा बारीक किसलेल्या भाज्या वरून पेरू शकता) त्यावर दुसरी पोळी ठेवून पुन्हा त्यावर मिश्रण पसरवावे त्यावर पुन्हा पोळी ठेवून मिश्रण असे ४-५ पोळ्यांची लेयर तयार करायची. आता सगळं एकत्र नीट पकडून रोल करायचा आणि तो अलगद ओल्या केलेल्या (धुतलेल्या) धाग्याने बांधायचे. हा रोल कुकरमध्ये डब्यात ठेवून वाफ्वायचा. कुकर मधून काढला कि त्याचे छान गोल गोल काप करायचे आणि ब्रावून रंग येईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायचे. धोप्याच्या/अळूच्या पानांची वडी आठवली असेल. अगदी तसेच करायचे आहे. सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यासाठी हमखास आवडेल असा पदार्थ तयार.

* चकल्या :- उरलेल्या सगळ्या पोळ्या मिक्सर मधून नीट बारीक करून घ्यायचे हे पीठ परातीत घेऊन यात पाऊन वाटी तांदळाचे पीठ, आल-लसूण पेस्ट, तिखट, मीठ,हळद ओवा-तीळ आणि दोन चमचे दही घालायचे. एरवी चकल्या करतांना घालतात त्याहून कमी मोहन (कडकडीत गरम केलेले) या पिठात घालायचे आणि थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यायचे. चकल्या वळून खरपूस तळून घ्यायच्या. या चकल्या भजनी पिठाच्या नाहीयेत हे सांगितले नाहीतर ओळखायला येत नाही. छान जमल्या तर अत्यंत चविष्ट लागतात. सणवार नसतांना इच्छा झाल्यास गरम गरम करता येणारा झटपट खाता येणारा प्रकार.

* चुरमा :- पोळ्या मिक्सर मधून रवाळ पीठ होईपर्यंत बारीक करायचे. कढाईत थोडे तूप घालून जरा भाजून थोडे थंड झाले कि साखर मिसळायची.

* लाडू :- पोळ्यांचे बारीक तुकडे करून त्यात मुक्तहस्ते तूप घालावे आणि चवीनुसार किसलेला गुळ सगळं एकजीव करून लाडू बांधावा. मधल्या वेळेत मुलांना द्यायला चटकन तयार होणारा पौष्टिक पदार्थ तयार.
हाच लाडू पोळी मिक्सर मधून बारीक करून तुपावर भाजून भाजतांनाच गुळ घालून करता येतो.

* कुरकुरीत पापड :- अगदीच दोनेक पोळ्या उरल्या असतील तर संध्याकाळची भाजी फोडणी घालण्याआधी कढाईत घेतलेल्या तेलात पोळ्या चार सहा तुकड्यात मोडून पापडासारखे कुरकुरीत तळून घ्यावे. वरून चाट मसाला शिंपडून मुलांना खायला द्या किंवा चहाबरोबर खायला घ्या.

खाकरा :- उरलेली पोळी गरम तव्यावर ठेवून कापडाने दाबत फिरवत कडक होईपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घ्यायची. हा तयार खाकरा चहाबरोबर किंवा मधल्या वेळेत तूप लावून लसुन चटणी बरोबर खायला घ्यायचा.

उरलेल्या पोळ्यांचे सगळ्यांना आवडेल असे चविष्ट पदार्थ करून बघाच एकदा.

पुढल्या पोस्टीत उरलेल्या उसळी, वरण किंवा भाज्यांपासून तयार होणारे नवीन पदार्थ बघूया.

या आधीच्या धाग्यावर उरलेल्या भातातून बनवता येणारे (मला माहिती असलेले) काही पदार्थ पाहिलेत. त्याची लिंक खाली दिलीय.

http://www.maayboli.com/node/५५२६५

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीर्घ उ सायलेंट असेल म्हणजे लिहीताना सदूपयोग लिहायचं पण वाचताना सदुपयोग वाचायचे. अनेक शब्द जसे शुल्ड असेच असतात. Wink Happy

चांगली माहिती. फोडणीची पोळी आवडते.

हेच नाही अनेक चुका दिसतील बेफिजी. एकतर माबोवर लिहायला अजून जमत नाहीये व्यवस्थित अजुन शिकतेच आहे मग उकार इकार साठी लहान मोठी जी दिसेल ती कि दाबून लिहून घेतेय.परत घाईत लिहून धागा प्रकाशित करते आणि नंतर जमेल तसे, चुका दिसतील तसा तो वेळ घेऊन संपादित करतेय. तेव्हा चुभूदेघे

खाकरा :- उरलेली पोळी गरम तव्यावर ठेवून कापडाने दाबत फिरवत कडक होईपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घ्यायची. हा तयार खाकरा चहाबरोबर किंवा मधल्या वेळेत तूप लावून लसुन चटणी बरोबर खायला घ्यायचा.

>>>>

हे माझे बालपणीचे फेव्हरेट ... पण हल्ली बरेच महिने वर्षे आईने केले नाहीये.. का नाही कल्पना नाही.. अर्थाते तेव्हाही शिळे खाणे माझ्या वाट्याला येऊ नये याकडेच आईचा कल असायचा.

या धाग्याला धन्यवाद, आजच रिमाईंडर टाकतो आईला.
तसेच वरचेही ईतर पदार्थ, बरेचसे तिला आधीही माहीत असतीलच, तरीही सुचवतो Happy

जर बरेच खाकरे राहिले तर त्याचा चुरा करुन त्याचा चिवडा पण करु शकतो. काही वेळा घरी ताज्या चपात्याचा पण खाकरे करुन चिवडा केला जातो.

रेडीमेड खाकर्‍याचे छोटे छोटे तुकडे करून ते कुरमुरे (की चुरमुरे?) मध्ये टाकून बनवलेला चिवडा सुद्ध छान लागतो. साधा सिंपल. हवे तर थोडी बारीक पिवळी शेव टाका.
खाकर्‍यावर कांदा टोमेटो शेव कोथिंबीर काकडी भुरभुरून मसाला पापड म्हणून सही लागतो.

मी फोडणीची पोळी नुसता कांदा घालून न करता त्याबरोबर फ्लॉवर किंवा कोबी, मटार असतील तर ते, गाजर हेपण घालते बरोबर. आमच्याकडे आवडते अशी फोडणीची पोळी.

केवढे दिले आहेत पदार्थ . सगळेच छान आहेत.

फोडणीची पोळी आणि पोळीचा लाडू हेच फक्त करते मी तेही फार क्वचितच. शिळयावर आणखी मेहनत घ्यायच जिवावर येतं माझ्या.

माझी काकू उरलेल्या पोळीचे शंकरपाळे करते. कात्रीने पोळीच्या उभ्या पट्ट्या कापून घ्यायच्या. तेलात या पट्ट्या खरपूस भाजून किंवा तळून घ्यायच्या. तिखट, मीठ, ओवा, तीळ, किंचित पीठिसाखर वरून त्या गरम असतानाच भुरभुरायची. सायंकाळच्या वेळी कुडूम कुडूम खायला स्नॅक म्हणून छान लागते.

माझ्याकडे नेहमी एक तरी पोळी मी उरवतेच. सकाळी उठल्या-उठल्या भुक लागते आणि रोज रोज फळे उपलब्ध नसतात. अशा वेळी पोळीचा कडक खाकरा करुन तो तसाच किंवा अगदी थोडा चवीपुरता जॅम लावुन खायला मला भारी आवडते. ब-यापैकी कडक पोळीवर तव्यावरच तुप आणि मऊ गुळ घालुन तो विरघळवुन खायलाही खुप आवडते.

पोळीचा लाडूही मला आवडतो. लेकीला उपमा आवडतो.

माबोवर लिहिताना माझ्याही व्याकरणाच्या खुप चुका होतात. मोबाईलवरुन टायपत असताना कर्सर असा उलटासुलटा फिरत राहतो की झालेली चुक खोडायला गेले तर दुसरेच खोडले जाते पण हजार प्रयत्न करुनही चुक काही खोडली जात नाही. त्यामुळे चुकांकडे दुर्लक्ष करुन पुढे जावे लागते. घरी कॉम्पवर क्रोम असल्यामुळे होणारे हाल वेगळेच आहेत. ही सगळी व्यवधाने सांभाळून टायपताना व्याकरण बघत बसणे खुपच गैरसोयीचे होते. ऑफिसमधुन टायपताना मोठ्या पोस्टी आणि व्याकरण दोन्ही शक्य होते, पण हे रोज रोज शक्य होत नाही Happy

माझ्याकडे नेहमी एक तरी पोळी मी उरवतेच. सकाळी उठल्या-उठल्या भुक लागते
>>>
कितपत तथ्य आहे माहीत नाही पण माझ्या ऑफिसात एक जण सांगत होती की अशी पोळी हायबिपी वाल्यांसाठी चांगली असते. हाय बिपी वाल्यांनी मुद्दाम रात्रीची पोळी सकाळे एखावी. किती खर किती खोटं माहीत नाही

पदार्थ सगळे चटकदार आहेत. लहानपणी कळत नसल्याने (आता कळतेय थोडेफार असे वाटतेय Happy ) पोळीचा लाडू, कुस्कुरा (फोपो) एवडेच काय एक हौशी काकूंनी केलेली शिळ्या पोळीच्या अळूवड्या ( सारण अळूऐवजी पोळीला लावून) आवडीने खाल्यात. पण आता नाही.... कणकेचा गोळा फ्रिजमधे ठेवून मी सकाळी बेबीच्या डब्याच्या पोळ्या करते तेव्हा एक ताजीच मटकावते - तूप मीठ लावून Happy मधे एकदा शेजारणीशी बोलताना तिला मी शीतकपाटातली कणीक वापरते असे कळले तर प्रचंड इइ झाले तिला.. जैन आहेत ना शेजारी . ते तर कठोळ सुध्दा रात्रभर भिजत घालू शकत नाहीत म्हणे.. सक्काळीच भिजवतात ३-४ तासानंतर करतात म्हणे.. हे आपल्याला फारच वाटते .. एकेकाच्या पध्दती.. Happy

टीपः आज अमदावाद मधे अनेक ठिकाणी - (विशेषतः आमच्या भातात रात्री बरेच काही झाले) कर्फू असल्याने बराच वेळ रिकामा आहे.. घरीच हाय मी. Happy हे उगीचच.. Happy

कितपत तथ्य आहे माहीत नाही पण माझ्या ऑफिसात एक जण सांगत होती की अशी पोळी हायबिपी वाल्यांसाठी चांगली असते. हाय बिपी वाल्यांनी मुद्दाम रात्रीची पोळी सकाळे एखावी. किती खर किती खोटं माहीत नाही

>>> खरं आहे एकदम. सकाळी उठल्या उठल्या भूक लागल्यावर आता पोळी करायची कधी, खायची कधी अशा विचारानं टेन्शन येऊन बिपी वाढतं. म्हणून रात्रीच एक्स्ट्रा पोळी करून ठेवायची आणि सकाळी ती आयती पो़ळी खायची.

व्वा, खुप मस्त माहिती दिली आहे.
मुळात विषयच जिव्हाळ्याचा असल्याने वाचताना खुप मजा वाटली.
नवीन रेसीपीज समजल्या.
उलट आता मुद्दाम पोळ्या उरवून ह्या रेसीपीज करुन बघाव्यात का ? असे वाटतेय.
मला माहित असलेला थोडा वेगळा प्रकार म्हणजे, शिळ्या पोळ्या कुस्करुन त्यात आलं मिरचीचं वाटण, ओवा घालावे व त्यातच किसलेले चिझ ( भरपूर) घालावे. ते घट्ट दाबून त्याचे लहान आकाराचे वडे थापावे. व थोड्याशा तेलात खरपुस भाजावे.
चिझ घातल्याने एकदम शाही स्वाद लागतो या शिळ्या पोळीच्या वड्यांचा.

विशेषतः आमच्या भातात रात्री बरेच काही झाले)

हा पोळ्यांचा बीबी आहे हो, भाताचा वेगळा आहे, तिकडे रात्रीचे किस्से टाका Wink Wink

जैन आहेत ना शेजारी . ते तर कठोळ सुध्दा रात्रभर भिजत घालू शकत नाहीत म्हणे.. सक्काळीच भिजवतात ३-४ तासानंतर करतात म्हणे

रात्रभर पाण्यात जिवाणु वाढुन ते सकाळी शिजवताना नाश पाहुन हिंसा होते म्हणुन की काय????? आणि चालताना हवेत चालतात काय? Light 1

Pages