उरलेल्या अन्नाचा सदूपयोग - २ (पोळ्या/चपात्या)

Submitted by प्राप्ती on 25 August, 2015 - 12:50

संदर्भ :-

पानात वाढलंय तेवढं पूर्ण संपवायचं नाहीतर देवबाप्पा रागवेल' असं म्हणून आजोबा नेहेमी दम भरायचे आणि आम्हीही मग निमूट पानातलं सगळं नेमानं संपवायचं. एकतर चौरस आहार मिळावा म्हणून सगळे पदार्थ पोटात जाणे आवश्यक आणि दुसरे अन्न वाया जाऊ देऊ नये हा उद्देश. आपल्याकडे बालपणापासून देण्यात आलेले असे संस्कार त्यात आता तर दाल-आटे का भाव पण एवढे वाढलेत कि अन्न टाकून देणे न खिशाला परवडणारे ना मनाला पटणारे. पण घरात जरा मोठा परिवार असला कि अन्न उरण्याची समस्या मोठी असते. बरेचदा पाहुणे येऊन गेले कि, एखादा समारंभ आटोपल्यावर , लहान-मोठा कार्यक्रम झाल्यास किंवा एखाद्या दिवशी नेमकी दोन माणसं बाहेरून जेवून येतात आणि अन्न उरतं. अश्या उरलेल्या अन्नाचा वाया न जाऊ देता योग्य नायनाट लावणे किंवा सदूपयोग करून घेणे कौशल्याचे काम आहे. एवीतेवी हे प्रत्येक गृहिणीला अनुभवाने छान येत असतं. म्हणूनच आपण आपल्या उरलेल्या अन्नाच्या रेसिपीज एकमेकींशी शेअर करूया. मला माहिती असलेल्या आणि नेहेमी करत असलेल्या रेसिपी खालील प्रमाणे,

आज पोळ्या उरल्यात कि त्याचे काय काय पदार्थ बनवता येऊ शकतात ते बघूया. तुमच्याकडे असणाऱ्या रेसिपीज पण कृपया शेअर कराव्यात.

२) उरलेल्या पोळ्या / फुलके

* पोळीचे कूटके :- फोडणीच्या भातासारखेच पोळ्यांचे तुकडे/ कुटके करून फोडणी घालणे हा सगळ्यांना माहिती असणारा प्रकार.
दुसरे पोळ्या मिक्सर मधून रवाळ बारीक करून फोडणी घालायचे हा पोळ्यांचा मोकळा उपमा तयार.

* पोळ्यांचा पास्ता :- कांदा परतून चिंचेचा कोळ किंवा टोमाटो घालून परतवून आवडेल तसे सगळे मसाले (तिखट, मीठ, हळद सांबर मसाला, गरम मसाला, गुळ) घालून गोड-आंबट किंवा आवडेल त्या चवीच्या फोडणीत पाणी घालून उकळू द्यायचे. दोनेक मिनिट चांगले उकळले कि त्यात पोळ्यांचे (जरा मोठ्या आकारात केलेले) तुकडे घालायचे. एक उकळी घेऊन लगेच बंद करायचे. कोथिंबीर पेरून तसेच गरम गरम खायला घ्यायचे.

हा पास्ता चाइनिज सॉसेस (सोया सॉस, चिली सॉस, विनेगर, शेजवान सॉस) आणि भाज्या (पातीचा कांदा, कोबी, सिमला मिरची, गाजर, फ्रेंचबिन्स, लसूण, आलं किसलेलं) वापरूनही करता येईल..... किंवा पास्ता करतात त्या पद्धतीने फक्त पोळ्यांचे तुकडे पाण्यात फार उकडू द्यायचे नाहीत तेवढी काळजी घ्यायची.

* वड्या (नेमके नाव माहिती नाही) :- कमीत कमी ४-५ उरलेल्या किंवा ताज्या पोळ्या हव्यात. दीड वाटी बेसन, दोन छोटे चमचे चिंचेचा कोळ, थोडा ओवा, अर्धा चमचा आल-लसूण पेस्ट, तिखट, मीठ, हळद, जिरे-धने पूड, साखर आवडीनुसार. कसुरी मेथी किंवा कोथिंबीर. पोळ्या सोडून इतर सगळे जिन्नस एकत्र करून अगदी थोडं थोडं पाणी घालून भज्यांसाठी भिजवतात तेवढे सैलसर बेसन भिजवून घ्यायचे. आता एक पोळी खाली ठेवून त्यावर मिश्रण पसरवावे (यावर हवे तर पनीर, चीज किंवा बारीक किसलेल्या भाज्या वरून पेरू शकता) त्यावर दुसरी पोळी ठेवून पुन्हा त्यावर मिश्रण पसरवावे त्यावर पुन्हा पोळी ठेवून मिश्रण असे ४-५ पोळ्यांची लेयर तयार करायची. आता सगळं एकत्र नीट पकडून रोल करायचा आणि तो अलगद ओल्या केलेल्या (धुतलेल्या) धाग्याने बांधायचे. हा रोल कुकरमध्ये डब्यात ठेवून वाफ्वायचा. कुकर मधून काढला कि त्याचे छान गोल गोल काप करायचे आणि ब्रावून रंग येईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायचे. धोप्याच्या/अळूच्या पानांची वडी आठवली असेल. अगदी तसेच करायचे आहे. सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यासाठी हमखास आवडेल असा पदार्थ तयार.

* चकल्या :- उरलेल्या सगळ्या पोळ्या मिक्सर मधून नीट बारीक करून घ्यायचे हे पीठ परातीत घेऊन यात पाऊन वाटी तांदळाचे पीठ, आल-लसूण पेस्ट, तिखट, मीठ,हळद ओवा-तीळ आणि दोन चमचे दही घालायचे. एरवी चकल्या करतांना घालतात त्याहून कमी मोहन (कडकडीत गरम केलेले) या पिठात घालायचे आणि थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यायचे. चकल्या वळून खरपूस तळून घ्यायच्या. या चकल्या भजनी पिठाच्या नाहीयेत हे सांगितले नाहीतर ओळखायला येत नाही. छान जमल्या तर अत्यंत चविष्ट लागतात. सणवार नसतांना इच्छा झाल्यास गरम गरम करता येणारा झटपट खाता येणारा प्रकार.

* चुरमा :- पोळ्या मिक्सर मधून रवाळ पीठ होईपर्यंत बारीक करायचे. कढाईत थोडे तूप घालून जरा भाजून थोडे थंड झाले कि साखर मिसळायची.

* लाडू :- पोळ्यांचे बारीक तुकडे करून त्यात मुक्तहस्ते तूप घालावे आणि चवीनुसार किसलेला गुळ सगळं एकजीव करून लाडू बांधावा. मधल्या वेळेत मुलांना द्यायला चटकन तयार होणारा पौष्टिक पदार्थ तयार.
हाच लाडू पोळी मिक्सर मधून बारीक करून तुपावर भाजून भाजतांनाच गुळ घालून करता येतो.

* कुरकुरीत पापड :- अगदीच दोनेक पोळ्या उरल्या असतील तर संध्याकाळची भाजी फोडणी घालण्याआधी कढाईत घेतलेल्या तेलात पोळ्या चार सहा तुकड्यात मोडून पापडासारखे कुरकुरीत तळून घ्यावे. वरून चाट मसाला शिंपडून मुलांना खायला द्या किंवा चहाबरोबर खायला घ्या.

खाकरा :- उरलेली पोळी गरम तव्यावर ठेवून कापडाने दाबत फिरवत कडक होईपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घ्यायची. हा तयार खाकरा चहाबरोबर किंवा मधल्या वेळेत तूप लावून लसुन चटणी बरोबर खायला घ्यायचा.

उरलेल्या पोळ्यांचे सगळ्यांना आवडेल असे चविष्ट पदार्थ करून बघाच एकदा.

पुढल्या पोस्टीत उरलेल्या उसळी, वरण किंवा भाज्यांपासून तयार होणारे नवीन पदार्थ बघूया.

या आधीच्या धाग्यावर उरलेल्या भातातून बनवता येणारे (मला माहिती असलेले) काही पदार्थ पाहिलेत. त्याची लिंक खाली दिलीय.

http://www.maayboli.com/node/५५२६५

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा.! ह्या रेसिपी पण छान आहेत..

अनघा,आमच्या भागात.. असे म्हणायचे आहे का? कारण अहमदाबाद मध्ये संचारबंदी आहे. तुमच्या कडे आज सर्व ठीक आहे ना..

मामी सुटलिय जणु
>>
+!
Lol

मामी इन फॉर्म अगैन.
धाग्याची एंट्री मामीच्या धाग्यात झालीच पाहिजे
(वेगळा विदर्भ झालाच पाहिजे च्या तालावर वाचा Wink )

मला त्या कुरकुरीत तळलेल्या पोळ्या वरतुन तिखट मीठ आणि पेलाभर चहा. अहाहा सुख सुख म्हणजे हेच.
फोडणीची पोळी आणि चुर्मा लाडू होतातच.
त्या वड्या आणि चकल्या करुन बघणेत येतील नक्कीच.

आमच्या कडे दोन वेगळ्या जेनेटिक कंपोझिशनचे फॅमिली मेंबर आहेत. ते खातात शिळी पोळी. भांडतात पण त्यासाठी.

रात्रीच्या २ पोळ्या असल्या तरी दोघांचा नाश्ता होतो. बेसन घेऊन भज्याच्या पीठा प्रमाणे सर्व साहित्य घालून पेस्ट तयार करावी . त्यात पालक, मेथी, कांद्याची पात किंवा भरपूर कोथिंबीर घालावी.आता पोळी फ्रायप्यान वर टाका त्याला भाजी मिश्रीत बेसन लावा (दोस्याप्रमाने) व उलटवा नंतर दुसऱ्या बाजूनेही ते पीठ पसरवा. व झाकण ठेवा .चूर~~ आवाज आला की पलटवा . खरपुस भाजुन घ्या.सॉस बरोबर किंवा दह्यासोबत . पोटभर नाश्ता होतो.

छान, करून पाहीन वेळ मिळाला की. धन्यवाद.
मामी Proud
अकु, मुगडाळ पीठ नकोय काही लगेच करायला. मुगडाळ वापरायला बिलकुल घाबरू नकोस. Proud Wink

अय्यो, अमा!
बहुतेकांच्या घरात किमान दोन वेगवेगळ्या जेनेटिक कंपोजिशनचे फॅमे असतातच.
फक्त प्रत्येकाकडच्या मेंबरांना शेपटी असेलच असे नाही.
Wink

प्रभाच्या रेसिपीवरून - पोळीचे तुकडे अंड्याच्या तिखट्/गोड मिश्रणात बुडवून शॅलो फ्राय करून इंडियन टोस्ट करता येतील फ्रेंच टोस्ट सारखे!

Pages