एक कुल्फी गारगार -(काल्पनिक MOVIE REVIEW - HIGHWAY एक सेल्फी आरपार)

Submitted by आशूडी on 21 August, 2015 - 05:50

झालंय असं, की काल लिहायला घेतलेला 'हायवे कथा ओळखा' चा तुकडा कथा कमी आणि परीक्षणच जास्त वाटतोय. त्यामुळे आता सादर आहे सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या काल्पनिक कथेचं काल्पनिक परीक्षण. हा सिनेमा २८ अॉगस्टला रिलीज होतोय व ऐकीव माहितीनुसार तो विनोदी नाहीये. तेव्हा कृपया हे परीक्षण गंमत म्हणून वाचा व खर्या सिनेमाशी त्याचा संबंध जोडू नका ही विनंती.
***

मे महिन्याच्या निवांत सुटीचे दिवस असावेत, बायकापोरं घेऊन कुठेतरी पिकनिकला निघावं. हे नको ते नको करता करता डेस्टिनेशन अगदी कोपर्यावरचं लोणावळा ठरतं. ही जागा आपण अनेक वयांत, अनेक वेळा पाहिलेली असते. तरीही प्रत्येक वेळी तुम्हाला तिथे खेचून आणणारं काहीतरी गूढ सामर्थ्य तिच्यात नक्की असतं. आपल्या आयुष्यात अशी फेवरेट 'ठिकाणं' बरीच असतात. मग तो कॉलेजचा कट्टा असेल, गल्लीचा नाका असेल किंवा अॉफिसबाहेरची टपरी. या जागा लक्षात राहातात पण तिथे घेऊन जाणारा रस्ता मात्र नेहमी उपेक्षितच राहतो. वंचित राहतो. अशीच एक वंचितांचा विकास धर्तीवरची कथा आढळते उमेश कुलकर्णी दिग्दर्शित 'हायवे एक सेल्फि आरपार' चित्रपटात. नावावरूनच कळतं की वंचित रस्त्याचा विकास होऊन हायवे झाला तरच एका शहरात उभं राहून दुसर्या शहरात मोबाईल धरून सेल्फि स्टिकने फोटो काढता येईल.

ही कथा आहे सहा जोडप्यांची. पोस्टरमधे पाहिलंत तर ही सहा जोडपी तुम्हाला सहजच दिसतील. यातल्या प्रत्येक पुरूषाच्या नजरेत एक स्त्री भरलेली आहे. तीच त्याची वास्तवातली (सिनेमाच्या) जोडीदारीण आहे की स्वप्नातली हे जाणून घ्यायला तुम्हाला सिनेमाच पाहावा लागेल. तर गंमत अशी आहे, की जशी पुरूषांची नजर स्त्री वर आहे त्यामानाने स्त्रिया स्वत:च्याच नादात आहेत. कुणी भांडतंय,.कुणी हसतंय,.कुणी चिडलंय तर कुणी 'आके सीधी लगी दिल पे तिरछी नजरिया' मोड मधे.

एक शहर आणि एक वुड बी शहर आणि त्यांना जोडणारा रस्ता इथे ही कथा घडते. उदा. पुणे आणि लोणावळा व त्यांना जोडणारा एक्सप्रेस हायवे. वीकेंड आणि मान्सूनचा मुहूर्त साधून हे सगळे लोक पुण्याहून लोणावळ्याला कूच करतात. पैकी जान्हवी (मुक्ता बर्वे) ही बगनलाल चिक्की समूहाची सीएफओ आहे. अतिशय गोड हसत ती संपूर्ण चित्रपट आपले डोळे चिक्कीसारखे स्क्रिनवर चिकटवून ठेवते. मेघना(रेणुका शहाणे) ही अखिल सदाशिव पेठ हास्यक्लब चालवते. तिचा रोज सकाळचा एक तास लोकांचे मख्ख चेहरे किंचित स्मितहास्याकडे झुकवण्यात जातो. अमोल(गिरीश कुलकर्णी) हा एनाराय असून सध्या तो परतोनी पाहे ची पारायणे करतो आहे. त्याला आपली पत्नी मेघनाच्या सतत हसतमुख हसण्याने एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो. सुनील (बर्वे) आणि किशोर (कदम) हे कॉलेजपासूनचे जानी दोस्त. इतके की हसल्यावर त्यांचे दिसणारे दात आणि चिडल्यावर कपाळावरच्या आठ्या कुणी मोजून पाहील तर एकच आकडा मिळेल. तर हे सगळे लोणावळ्याला भुशी डेमवर जातात आणि त्यांना कोणता विषण्ण करणारा अनुभव येतो हे पडद्यावरच पाहणे इष्ट ठरेल. या अनुभवाचा वेग, थरार इतका विलक्षण आहे की प्रेक्षकाला आपण थिएटरमधे आहोत की कात्रजच्या बोगद्यात हेच पटकन ध्यानी येत नाही. किशोरला तिथे अचानक कवित्व प्राप्त होऊन तो उभं राहून हायवेवरच बोलायला लागतो - ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं... तितक्यात सुनीलला गतजन्मीची खूण पटावी तसं काहीसं वाटून तो गाडीतून उतरतो आणि हायवेवरच शारूखच्या कल हो ना हो स्टाईल हात पसरतो. (एक्सप्रेस वे वर गाड्या थांबवता येत नाहीत हे क्षणभर विसरूया) थएसटीतून हे प्रकार पाहणारी जान्हवी (मुक्ता) जोरात "काहीही हां नी!" असं किंचाळते. सुनील चपापतो. भानावर येतो. तो कपाळावर पावणेदोन आठ्या घालून जान्हवीला 'बर्वे?' विचारतो. ती बाष्पगगदगद होऊन मान आत दुमडते.आणि जानी- सुनीच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात. पंचवीस वर्षांपूर्वी त्यांच्या आई वडलांना आलेल्या अशाच विषण्ण करणार्या अनुभवात या भावा बहिणीची ताटातूट झालेली असते. यांचं एकदाचं 'तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा' असं बर्वेपुराण संपल्यावर गाडी पुढे सरकते.

हाच विषण्ण करणारा अनुभव घेण्यासाठी आतूर झालेल्या टिस्का चोप्रा आणि हुमा कुरेशी तिकडून मुंबईवरून सुटलेल्या असतात. यांना पाहाताना उगाचच डेड इष्किया ची आठवण होते. अर्थात, इथेही किशोर आणि सुनीलचे अनुक्रमे नसीर आणि अर्शद वारसी होतील हे नाक न पुसता येणार्या मुलालाही कळेल. (पण, ते तुम्ही पडद्यावरच पहा). किशोरला टिस्कासमोर सौमित्र म्हणायचा मोह आवरत नाही. टिस्का व हुमा च्या एंट्रीला (वरचं सीमंतिनी ने लिहीलेलं गाणं) घातलेलं गाणं अतिशय श्रवणीय आहे. या एका गाण्याने सिनेमाचा मूडच एकदम आध्यात्मिक होऊन जातो. हिंदी सिनेमांसारखंच दोघीही काटा मुली या सिनेमातही आपली छाप पाडून जातात.

रेणुका शहाणे म्हटलं की आजही 'सब का पूरा ध्यान धरे वो शाम ढले तक काम करे' अशी हम आपके ची भाभीच डोळ्यासमोर येते. तिला गाडीत नुसतं बसलेलं बघून तिळपापड होणार्या पुरूषी मनोवृत्तीच्या अमोलचा आपल्याला मनस्वी राग येतो. गिरीशनं यात बाजी मारली आहे. (हायवे वरून) जाता जाता स्त्री मुक्तीवर भाष्य करण्याची युक्ती वापरल्याबद्दल क्रिएटिव्ह टीमचं कौतुक करावं तेवढे कमीच आहे.

डेस्टिनेशनपेक्षा प्रवास हा नेहमीच रंजक असतो. तो आणखी इंटरेस्टिंग करता आला असता जर उमेशनं गाड्या "दत्त" ला थांबवलेल्या दाखवल्या असत्या. चाळीस रूपयांची साबुदाणा खिचडी वाचून डोळे विस्फारत टाळीबाज आ वासायचा अभिनय करायची मुक्ताची संधी त्यामुळे हुकली. तगडी स्टारकास्ट असल्यामुळे होतं काय की प्रेक्षकांना हे बघू की ते असं वाटतं आणि न्याय्य कौतुक कुणाचंच होत नाही. (मर्यादित शब्दसंख्येमुळे आमच्या परीक्षणात ते नेहमीच होतं म्हणा) तरीही एका वाक्यात सांगायचं तर, सर्वच कलाकारांची कामे उत्तम झाली आहेत. हायवे असल्यामुळे फुकट हवा, उजेड, आभाळ, डोंगर यांचं विलोभनीय विस्तृत दर्शन सतत होत राहातं. टोलनाक्यांवरच्या लंब्या रांगा दाखवून सिनेमा जास्तीत जास्त वास्तववादी करण्याचा प्रयत्न चांगला आहे. पण तिथल्या सुट्टया पैशांऐवजी चॉकलेटं वाटण्याच्या भांडणात नाना हवा होता असं तीव्रतेनं वाटलं.

हायवेप्रमाणेच सिनेमाला वेग जबरदस्त आहे. त्यामुळे लहान मुलांना नेताना एक्स्ट्रा बेल्ट सोबत न्यावेत व थिएटरच्या खुर्च्यांना सीटबेल्टप्रमाणे बांधावेत ही आगाऊ सूचना! सिनेमात नसला तरी थिएटरमध्ये पोलीस पकडू शकतो. हवालदाराच्या भूमिकेत अतुल परचुरे इतका 'फिट' आहे की त्याला कधी प्रमोशन मिळूच नये असं वाटतं.

अजिबात डोक्याला ताप नाही, मस्त एसी गाडीतून गुळगुळीत रस्त्याने झूम्मकन पुढे जावं तशी सरळसोट कहाणी आहे. कटकट्या पुण्यातून निवांत लोणावळ्यात जाताना कशी ही सहा जोडपी एकमेकांशी रिलेट होतात आणि मग आपल्याला हवी तीच व्यक्ती कशी त्यांना कायमची सहप्रवासी म्हणून लाभते हे पडद्यावर पाहाणं एखाद्या गारेगार कुल्फीसारखं आनंद, दिलासा देणारं ठरेल.

- रेटिंग - ***** पुढे अर्धा असं लिहायची पध्दत आहे.
(सगळ्यात वरचे * हे माझे मलाच मी दिले आहेत. ते सिनेमासाठी नाहीत.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Lol

Mukta chya aa vasun abhinaya varil tipanni mast! Agdi dolas nirikshana tun aaleli distey....

एक शहर आणि एक वुड बी शहर > Lol

बाष्पगगदगद होऊन > Proud एक ग जास्त झाला बहुधा ...

भन्नाट लिहिलंय! पिक्चर बघायला पाहिजे!

इतके की हसल्यावर त्यांचे दिसणारे दात आणि चिडल्यावर कपाळावरच्या आठ्या कुणी मोजून पाहील तर एकच आकडा मिळेल.
<<
सत्रा!

*

पुण्याहून लोणावळ्याला जाताना दत्त कसं काय लागेल मधेच? :कन्फ्यूज्ड भावला:

धन्यवाद सर्वांना. अरे हा नुसता टीपी आहे. सिरेसली घेऊ नका.
दीड मायबोलीकर, आता सिनेमा म्हटला की रस्ता चुकणार, वळण हुकणार, वादळपाऊस होणार,.दूर कुठेतरी डाकबंगला विथ रेडी रामूकाका असणार.

अग्गबाई, आली का परत गाण्याची सिच्युएशन! आलेच ना मी!! Wink Happy

संचारले अंगी तुझ्या,
जवळ येताच माझ्या,
कधी परखतो दळण
कधी हुलग्याचे कळण,
बुद्रुककरिया, बुंद्या त्या
कच्च्या कळ्या त्या सोड,
तुझ्या बा ने बोलले ते
जरा ऐकूनच सोड...

अंबरसरिया ऐकले नाही काय आधी ??!!

असं डाक बंगल्यात शेकोटी पेटवलेली मग तसलंच गिटारवाले रोम्यांटीक पण अनाकलनीय गाणे नको का???

ओह मी पहिल्या ४ ओळींना प्यार का तोहफा तेरा ची चाल लावली Proud

शेकोटी कॅटेगरी वेगळी ना? Wink
देखा तेरी मस्त निगाहो मे मध्ये गिटार सापडेल ... अश्या गाण्यात नॉर्मली सॅक्सोफोन वगैरे असतो Happy

मराठी सिनेमा आहे. तोहफासाठी बजेट नसतं. Wink

तसली भन्नाट शेकोटी नाही. ही सामुदायिक डाकबंगल्यातली कँपफायर टाईप शेकोटी... जीने के इशारे मिल गए मध्ये असते तसली Happy (सोमण आडनाव नसेल तर मराठी हिरो शर्टलेस नाही बघवणार शँकी भाऊ Wink तशी गाणी नको.)

सीमंतिनी, शँकी Lol
फरहान अख्तरमुळे कवीहीरोंचाही ट्रेंड आलाय, विसरलीस का रमड? किशोर कदम पण असू शकतो. Proud

Pages