ढेकूण होस्टेल अन पुणे.

Submitted by दीड मायबोलीकर on 3 August, 2015 - 15:01

सोमन | 3 August, 2015 - 20:34

hostel chya room madhe dhekhna jhali ahet
barch upay karun thaklo
kahi jhalim upay ahe ka

<<

हे या लेखाचे स्फूर्तीस्थान. (इथला प्रतिसाद)

तिथे प्रतिसाद लिहायला सुरुवात केली :
>>
अगगं!

सोमन, पुण्यात आहात काय?
<<

मग प्रोफाइल चेक केलं, अन येस्स! पुणेच.

अन मग ढेकूणपुराण साक्षात समोर उभे ठाकले!

पुणे अन ढेकूण हे फाऽर जुने नाते आहे.

"विस्मृतीत गेलेल्या वस्तू" असं एक सदर सकाळ किंवा लोकसत्तेत वाचल्याचं आठवतंय. त्यात पाटा-वरवंटा, उखळ-मुसळ इ. सोबत, एक "ढेकण्या" नावाची पेशवाईकालीन वस्तू होती.

ढेकणी म्हणजे अनेक छोटी, आरपार नसलेली भोके पाडलेली लाकडी पट्टी. या ढेकण्या रात्री अंथरुणाच्या आजूबाजूला ठेवत असत. व सकाळी उन्हं वर आल्यावर, तापल्या जमीनीवर ढेकण्या आपटून त्यात लपलेले ढेकूण बाहेर काढून मारत असत.

समहाऊ, ढेकूण चिरडून मारायचा नाही अशी (अंध)श्रद्धा होती. मारला, तर एकतर घाण वास येतो. अन दुसरं, त्याच्या रक्तातून अनेक ढेकूण येतात अशी ती अंश्र. म्हणून मग ढेकूण दिसला, की चिमटीत पकडून जवळच्या अमृतांजनाच्या बाटलीत भरलेल्या रॉकेलमधे टाकून द्यायचा. अश्या बाटल्या पूर्वी घरोघरी असत. अन दुसरा तो 'फ्लिट'चा पंप. त्यात भरायच्या बेगॉनपेक्षा अनेकदा रॉकेलच भरले जाई.

ताई पुण्याला युनिवर्सिटीत शिकायला होती. ती घरी आली की आधी तिचे सगळे कपडे गरम पाण्यात टाकले जात, अन बॅगेचे डीटेल इन्स्पेक्शन होई. ढेकणांसाठी. पुढे मी पुण्यात शिकायला गेलो, तेव्हा तोच प्रोटोकॉल फॉलॉ झाला.

तात्पर्यः टाईम्स चेंज, पुणे डझण्ट Wink

तर पुणे अन ढेकूण, एकूणात जुनं नातं.

आमच्या ससूनच्या होस्टेलला, अन 'सासनात' प्र च ण्ड ढेकूण. तेव्हा ऑबव्हिय्सली ढेकूण काँबॅट टेक्नॉलॉजी फारच अ‍ॅडव्हान्स्ड स्टेजेसला पोहोचली होती.

ढेकूण आमच्या दिनचर्येस एकाद्या सिनेमाच्या बॅकग्राउंड म्युझिकप्रमाणे व्यापून असत.

कॉलेजात खुर्चीत/बाकावर बसलो, की मधल्या फटीतून येऊन चावत. बुडाला खाज येणे, म्हणजे ढेकूण चावणे हे सिंपल इक्वेशन होते. त्या बाकांच्या फटींत कागद, चिकटपट्ट्या भरणे हा एक इलाज.

पीजी करताना ओपीडीत जाताच आपल्या खुर्चीच्या भेगांवर स्पिरिट ओतणे, हा इलाज आम्ही करत असू. स्पिरिट = अल्कोहोल Wink यामुळे, तिथले ढेकूण चिंग होऊन बाहेर येत अन लाश होऊन पडत. मग त्यांना गोळा करून कागदात बांधून 'मामा'जवळ देणे. (वॉर्डबॉय = मामा) हे पहिले आन्हिक असे.

पेशंट बसणार त्या स्टुलावर मात्र अजिब्बात स्पिर्ट ओतायचे नाही असा शोध लवकरच लागत असे, ज्यामुळे शिकाऊ डॉक्टरचे अनुभवी डॉक्टरात रूपांतर होत असे. कारण पेशंट कंफर्टेबली बसला, की २ आड एक अजोबा निवांत ३ पिढ्यांचा इतिहास सांगत डोके खाणार हे नक्की असे. तेव्हा ढेकूण हा प्राणी रॅपिड पेशंट टर्नोव्हरसाठी महत्वाचा मदतनीस होत असे.

त्या काळी ढेकणांचा दिनचर्येवरचा प्रभाव इतका जास्त होता, की आजकाल वर-खाली डुबक्या मारणार्‍या अवल यांच्या मसूरीच्या उसळीच्या धाग्यावर ज्याची रेस्पी मी दिलिये, त्याप्रमाणे डब्यातही 'आज ढेकणाची उसळ आहे' अशी बातमी आम्ही एकमेकांना देत असू.

तर, होस्टेलचे ढेकूण.

यांचा शोध होस्टेलवासी झाल्यानंतर ४-५ महिन्यांनी लागतो. घरी यांची अजिबात सवय नसते. सकाळी उठून कडेकडेने अंग खाजणे. थोडे पुरळ आल्यासारखे वाटणे इ. बाबी होतात. डास चावला असे वाटून आपण गप बसतो.

अचानक एक दिवस एकादा मुरमुर्‍याएवढा रक्तभरला टम्म फुगलेला ढेकूण दिसतो अन मग कळतं की आजकाल असं विक विक का वाटतंय? आमचा एक मित्र चक्क अ‍ॅनिमिक झाला होता ढेकून चावल्याने. मग हळूहळू ढेकणांबद्दलचा अभ्यास वाढत जातो.

खोलीत ढेकूण असल्याचे पहिले चिन्ह म्हणजे, भिंतींतल्या भेगांच्या बाजूला दिसणारे बारीक काळे ठिपके. ही ढेकणांची शी असते, अन ढेकूण असल्याचे पहिले लक्षण. तेव्हा या भेगा बुजवणे, हा पहिला इलाज. आम्ही प्लास्टरॉफ पॅरिस ऑर्थो वॉर्डातून आणत असु. तुम्हाला रंगवाल्याच्या दुकानात मिळेल. थोडे थोडे पाण्यात कालवा, अन आधी त्या भेगा बुजवा. भिंत कशी दिसते त्याची काळजी नंतर करा. आम्ही भिंतभरून रेखाच्या फोटोंचं कोलाज केलं होतं त्यावर Wink (त्या कागदांखालीही यथावकाश ढेकूण झाले अन मग त्या भिंतीलाच एक दिवस काडी लावली ती वेगळी स्टोरी)

लोखंडी पट्ट्यांचे पलंग हे यांचे माहेरघर.

कॉर्नर्सना काळ्या ठिपक्यांसोबत छोटुकली पांढरी अंडी अन ढेकणांची पारदर्शक छोटी पिल्लं अन काही मोठे पिकलेले तपकिरी-काळे ढेकूणही तिथे दिसतील. आजकाल एमसील आहे, त्या गॅप्स बुजवता येतील. आम्ही मेणबत्तीचे मेण त्यावर टपकवत असू. नॉट सो स्ट्राँग इलाज.

आमच्या काळी, आम्ही त्यावर उकळते पाणी टाकणे, पलंग गच्चीवर उन्हात घालणे असे इलाज करीत असू.

मालधक्क्याजवळ चोरबाजार भरतो, तिथून एक 'स्टो रिपेर'वाल्यांचा ब्लोटॉर्च सारखा स्टो आणला होता काही मित्रांनी. त्याच्याने लोखंड लाल होईपर्यंत तापवणे असा एक इलाज होता. एका रुममधल्या बहाद्दरांनी पलंगाच्या दोन पायांना दोन वायर्स लावून त्या सॉकेटमधे घालून पलंगला शॉक देण्याचा इलाजही केला होता. ढम्म! सा आवाज होऊन ब्लॉकचे लाईट गेलेले, पण ढेकूण टपटप खाली पडले होते म्हणे.

नव्या रुम मधे शिफ्ट होण्याआधी ती रुम धुवून, बेगॉन स्प्रे करून, भेगा बुजवून वगैरे कितीही केले, तरी नवे ढेकूण एप्रनच्या खिशात बसून येतच असत. अन मग दिसला ढेकूण की त्याला टाचणीवर सुळी दे. पाठीला फेविकॉलचा थेंब लावून भिंतीला चिकटव. सिगारेट लायटरची ज्योत मॅक्सिममवर करून त्याला भाजून त्याचा मुरमुरा कर, अक्षरश: मुरमुर्‍याएवढे मोठे होतात अन फट्कन फुटतात Wink किंवा हीलेक्स सीलण्ट स्प्रे मारून आहे त्या जागी चिकटवून टाकणे, फार संताप असेल तर भिंगाखाली घेऊन ब्लेडने फक्त माऊथपार्ट कापून टाकणे असेही अनेकानेक इलाज केले जात.

शेवटचा अल्टिमेट नाईटमेअरिश इलाज सांगून मी थांबणारे. बाकी लोकांनाही इलाज सुचवू देत Wink

तर आमच्या एका मित्राने पीजी होस्टेलला नवी सिंगलसीटर रूम मिळवली. तिथले ढेकूण मारण्यासाठी ओटीतून एक ईथरची बाटली, अन मामांना सोबत घेऊन रुमात पोहोचले. पलंगाचे कोपरे, टेबल खुर्चीच्या फटी, भिंतीतल्या भेगा इथे इथर ओतून ढेकूण बाहेर आले. बाटली अशी बाजूला ठेवलेली. अन मामासाहेबांनी खिशातून आगपेटी काढून बिन्धास्त पलंगाला काडि लावली!

इथर कसे पेटते, हे इथे कुणी पाहिले आहे ते ठाऊक नाही, पण एक भक्क्क! आवाज. प्रचण्ड मोठा फ्लॅश ऑफ लाईट, पलिकडच्या खिडकीत चढून ओरडणारा मामा. दाराबाहेर ओरडणारा मित्र. धावून येणारं पब्लिक.

तेवढ्यात तिकडून आलेल्या अ‍ॅनास्थेशिआच्या चीफ रजिस्ट्रारने इथरच्या बाटलीचा स्फोट होईल म्हणून मच्छरदाणीचा गज वापरून ती बाटली फोडली!

पुढचे पुराण बरेच झाले. कुणालाच शारिरीक इजा झाली नाही या बेसिसवर त्या प्रकरणावर पडदा पडला. टेबल खुर्ची अन भिंतींवर त्या अग्नीकांडाच्या खुणा मात्र वर्षानुवर्षे होत्या....

सो लोक्स,
ढेकणांचे तुमचे अनुभव कोणते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवांतर-
झुरळ, ढेकुण आणि मच्छर ह्या तिन उपद्रवी जमांतीना अमरत्व लाभलेलं आहे. कोणतही विष ह्यांना नष्ट करुन शकत नाही.

मुळात ढेकूनच निसर्गात कमी झाल्याने ...... >>> रॉबीनहूड - तुम्हांला खरेच असे वाटते ?
तुमचे प्रतिसाद वाचुन, आम्च्याकडे अजुनही ढेकुन असल्याचा न्यूनगंड यायला लागला आहे. Sad

>>> मुळात ढेकूनच निसर्गात कमी झाल्याने ...... <<<
हूडा, याला शास्त्रीय शासकिय गणनेच्या आकडेवारीचा काय आधार देशील?
निसर्गातून (निव्वळ पुण्यातून नव्हे Proud ) ढेकुण कमी झाले या विधानास काय पुरावा आहे तुझ्याकडे?
ढेकणांची गणना कुणी, कधी कुठे कुणामार्फत (म्हण्जे झेड्पीचे शिक्षक हो... त्यांना काय? पशुपक्षी, अगदि गाढवेही मोजायला लावतात..) केली गेली? त्याचे नि:ष्कर्श कोणत्या साईटवर प्रसिद्ध झालेत?
कृपया तपशील पुरवावा.

चला चला ह्या धाग्यावर १०० ढेकणे हे आपले १०० प्रतिसाद पुर्ण करणे ह्या महानकार्यास पूर्णत्वाकडे नेऊया

अरे कसली चर्चा चालवली आहे.... अंग खाजायला लागलं नुसतं वाचूनच..... असं मलाच वाटतंय का आणखी कुणी आहेत समदु:खी? Happy

Rofl

भारी लिहिलय.
प्रतिसाद तर कहरच आहेत.

वाचुन ढेकुणरातीच्या आठवणी येउन शहारलो.
Lol

आम्ही चक्क्क्क्क्क्क्क्क्क्क ढेकुण निर्दालन होत नव्हते ६ महिने प्रयत्न करुन म्हणुन रुम चेन्ज केली होती.

तेव्हा ठिक होतं.
भाड्याने रहायचो. बॅचलर होतो.
दोन बॅगात संसार होता.

पण संसारी गृहस्थ झाल्यावर, नवाकोरा फ्लॅट विकत घेतलेला, त्यातही वर्षभराने ढेकुण. Sad
अरे देवा. हे कुठल्या पाहुण्याने आणले ( नवीन घर बघायला आठवड्याला कोण ना कोण यायच की) ह्याच्यावर बराच विचारविनिमय झाला. उत्तर कळेना.
रात्रीची झोप उडाली.
मग पेस्ट कन्ट्रोल करुन आठ दिवस घर बंद ठेवुन गावालाच गेलो.
मेले असतील औषधाने अथवा उपासमारीने माहित नाही.
आल्यावर डेड बॉड्या फेकुन दिल्या आणि पुढचे आठवडाभर साशंक मनाने सगळ्या भिंती चेक करत होतो.
आता ठिक आहे.

अनुभव लिहिताना हसु येतय पण तेव्हाचा तो वैताग, चिडचिड, अपुरी झोप अराराच होत>

Lol
बी जे लेडीज होस्टेलला मैत्रीणीच्या रुमवर हां भयंकर अनुभव घेतला आहे.
मध्यंतरी घराजवळ ट्रेकिंग ला गेले होते तेव्हा दोन जळवांनी अस्मादिकांच्या करियुक्त रक्ताची मेजवानी घेतली होती....तेव्हा ढेकणांची आठवण झाली. लहानपणी घरीएकदाच ढेकण झाल्याच् आठवतय. आमच्या सहा घरेअसलेल्या बिल्डिंग मध्ये ठरवून एकाच शनिवारी रात्री औषध फवारणी करायचो. साधारणपणे दीड दोन वर्षातून एकदा त्यामुळे पाळीव किटकांचे त्रास कधी अनुभवले नाहीत फारसे!
आजोळी नन्दुरबारला जाऊंन आलो की आमची आणि सामानाची रवानगी आधी गच्चीत व्हायची हे ही या निमित्ताने आठवले!

अनेक वर्षांपूर्वी घरात ढेकणांचा सुळसुळाट झाला होता. रॉकेलचा मारा करुन त्यांचा नायनाट करावा लागला.

माझा एक मित्र अतिशहाना होता,सतत स्वत:ची अक्कल पाजळायची त्याला सवय होती.माझ्या फार डोक्यात जायचा तो.त्याला अद्दल घडवण्यासाठी एक दिवस आमच्या घरातले चार पाच गबरु जवान ढेकणं एका प्लास्टीकच्या पिशवीत भरुन मी तडक त्याच्याकडे गेलो.नेमके त्यावेळी त्याचे आईबाप बाहेर् हॉलम्ध्ये बसले होते.साले,तिथून ऊठायलाहू तयार न्हवते.मित्र तयार होऊन येईपर्यंत मि जैविक हल्ला करण्याचा प्रयत्न केला ,परंतु यश आले नाही.
नंतर घरी आल्यावर पिशवी काढुन बघितली तर सैनिक आपल्याच बराकीत धारतिर्थी पडल्याचे निदर्शनात आले.नंतर ढेकणाची अंडी वापरुन अनेकांचा बदला घेतला ,परतू तो हरामखोर मात्र निसटला.

खतरनाक लेख...जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पुण्यात कसब्यात एका फ्लॅटवर आम्ही पाच मित्र रहात होतो. तेंव्हा चक्क सहा महिने ह्या लहान दिसणार्‍या पण जाम ताप देणार्‍या 'माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू' होते. त्यावेळी केलेले सर्व उपाय दि.मां. नी सांगीतलेल्या लिस्ट मध्ये आलेलेच आहेत. अगदी दर दोन दिवसाआड फवारणी चालायची फ्लॅटमध्ये. कधी कधी खुप मनस्ताप झाला असला तर दिवसातुन दोन दोन वेळाही. सरते शेवटी 'अंती विजयी ठरू' ह्या आशावादाच्या जोरावर आम्हीं विजय मिळवलाच.

खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे सकाळ मधे नुकत्याच जाहीराती स्विकारायला सुरुवात झाली होती तेव्हांची गोष्ट.

त्या वेळी सकाळ मधे एक जाहीरात यायची, ढेकूण मारण्याचे मशीन. हमखास ढेकूण मरतो. मनीऑर्डरने एव्हढे पैसे पाठवा, घरपोच पाठवू अशी जाहीरात यायची. ही जाहीरात वाचून एकाने मशीन मागवलं. तर पोस्टाने पार्सल आलं. त्यात लाकडाच्या दोन पट्ट्या, एक स्प्रिंग, रबराच्या रिंग्ज आणि जोडणीसाठी माहीतीपत्रक होतं. त्याप्रमाणे जोडणी केल्यावर लाकडाच्या दोन पट्ट्यांचा सांडशीसारखा चिमटा तयार होत असे. पुढच्या भागात एक ठोकळा होता.

माहीतीपत्रकात लिहीले होते, वरचा दट्ट्या मागच्या बाजूने दाबा. आणि वधस्तंभावर ढेकूण ठेवा. तो हलायच्या आत दट्ट्या सोडा. ढेकूण खल्लास.

हा किस्सा सकाळ मधेच पुन्हा पाच सहा वर्षांपूर्वी मार्केटिंगच्या पुरवणीमधे आला होता.

हे फक्त आणि फक्त इथल्या लोकांसाठी ज्यांनी याच्या प्रेमापोटी या धाग्याची शंभरी गाठायला मदत केली..
Say eeeeeeeeeeeeeeeeeeee...

जालावरुन साभार

भारी लिहिलय इतरांनी सुद्धा. सोन्याबापू, तुमचे किस्से आणि भाषा दोन्ही भारी! Lol

बाय द वे, हे सह्याच्याओ म्हणजे काय?

माहिती नाही अन ते "सायच्याहो" असते , आमच्याकडे लेकाच्या सारखी एक माइल्ड शिवी आहे ती सायच्या अन फोकनीच्या (ह्याचे पश्चिम महाराष्ट्रियन रूप म्हणजे फोकलीच्या किंवा फुकण्या हे असते बहुतेक)

आईग्ग फोटोची च कमी होती ती पण झाली पूर्ण!! ईईईईईईईई Happy

काय जिव्हाळ्याचे विषय येतात माबोवर Proud प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहेच दिसतंय ढेकणांचा. मला तर अमेरिकेत येऊन वाटायचे असले काही जीवजंतू इथे नसतीलच. पण पहिल्याच वर्षी या कल्पनेला सुरूंग लागला. उंदीर, झुरळं, डास, ढेकणं, मुंगळे, मुंग्या सगळी फौज आहेच. त्यामुळे या लेखाचा विषय पुणे ते अमेरिका असा केला तरी चालेल. Happy

आम्हाला ढेकणांचा प्रसाद मैत्रीणीने दिलेल्या सेकंडहँड क्रिब मधून मिळाला. बाळाला एकदा झोपवले असताना त्याच्या डायपर वर काहीतरी काळे फिरताना दिसले. जवळून पाहिले असता ढेकूणमहाराज! भयंकर पॅनिक व्हायला झाले. मग काय कानेकोपरे ढुंडाळता मोठी फौज असल्याचे दिसले. औषध मारून सग्ळ्या जमातीची विल्हेवाट लावून खाली टाकूनच आलो तो क्रिब. तरी गादीत ही जनता घुसली हे नंतरच लक्षात आले. मग पेस्ट कंट्रोलवाल्या लोकांना बोलावणे, बाळाला घेऊन ६-७ तास घराबाहेर जावे लागणे, बेडरूममधली यच्चयावत सगळी कपाटे रिकामी करून गरम पाण्यात कपडे धुवुन मोठाल्या प्लॅस्टीक बॅगेत भरणे, ती सगळी गाठोडी हॉलच्या मध्यभागी ठेवणे हे सगळे सोपस्कार पार पाडावे लागले तीनदा. :रागः
प्रचंड मानसिक, शारिरीक त्रास झालेला आहे या घाणेरड्या जमातीमुळे.

लहानपणी सावंतवाडीला गेलो की तेथील गोविंद थियेटर आणि एसटी स्टँडवर जी चावाचावी व्हायची .पण ढेकूण दिसायचा नाही. ढेकूण कसा दिसतो ते मला माहीत नव्हते.मस्त लेख आणि प्रतिसाद.
टीना, धन्यवाद.
साती, कवितेबद्दल धन्यवाद!

'ढेकुण' असं आता नुसतं जरी म्हटलं तरी पुण्यातल्या होस्टेल/flat च्या त्रासिक आठवणी जाग्या होतात. त्यांचा उपद्रव एवढा वाढला कि आपणच रूम सोडून जावे कि की असे वाटू लागले…. रॉकेल, खडू याचा भिंतीवर वापर करूनही हे महाभाग खोलीत अंधार होताच एखादी चळवळ सुरु करावी तसे बाहेर पडायचे आणि सगळी कडे वळवळायला लागयचे.

शेवटी त्यातल्या त्यात एक उपाय म्हणून फरशीवर अंथरूण घालून त्याभोवताली फुटभर अंतरावर पाणी-खडू-पाणी असे '३-लेयर प्रोटेक्शन' आवरण तयार केले आणी थोडा दिलासा (झोप) मिळाला… ही तटबंदी छेदुनही कुणी जर आत आलाच तर मात्र स्वहस्ते त्याला यमसदनी धाडण्यात येई.

त्या ढेकणान पेक्षा ज्या मित्राने दुसर्या होस्टेलहून त्यांची आयात केली त्याला जास्ती शिव्या खाव्या लागल्या… :प

मराठी माणसाची प्रतिभा हिंदी पुढे कमीच पडलीय ढेकणाच्या बाबतीत. त्यांनी कसं समर्पक नाव ठेवलंय. खाटेवरचा मल्ल तो खटमल्ल - खटमल. .

आपल्यासारख्या मर्त्य मानवांना काय घाबरणार आहेत का हे महारथी ढेकूण?
अहो ढेकूण झाले घरात म्हणून-
लक्ष्मी कमळात
शंकर हिमालयात
विष्णू क्षीरसागरात
रहायला गेले '- असे सुभाषित शिकवलेले होते आम्हाला लहानपणी!

ढेकूणपुराण मस्तच रंगले आहे एकूण!
साती , असाच ना तो श्लोक-
कमले कमला श्येते, हरः श्येते हिमालये |
क्षीराब्धौ च हरि: श्येते, मन्ये मत्कुणशङ्कया ||

आणि ते ढेकणांचं गाणं आम्ही 'ढेकणांनी मजला पछाडले' असं म्हणायचो.

काय प्रतिसाद पडले आहेत बदाबद ! रॉकेलच्या वाटीत ढेकूण टाकावे तसे!
(अर्थात लेख आणि प्रतिसाद आवडलेच.)

होय हीराजी.
हाच तो श्लोक.

आम्ही पण पछाडले म्हणतो पण रश्मीताईंना पिसाळले व्हर्जन हवी होती म्हणून ती दिली/
बाकी व्याकरणाच्या दृष्टीने कोणी दुसर्‍याला पिसाळत नाही तर पिसळवतो. मात्रं पछाडू शकतोच!
Wink

म्हणून तुम्ही लिहिलंय तेच बरोबर.

Pages