ढेकूण होस्टेल अन पुणे.

Submitted by दीड मायबोलीकर on 3 August, 2015 - 15:01

सोमन | 3 August, 2015 - 20:34

hostel chya room madhe dhekhna jhali ahet
barch upay karun thaklo
kahi jhalim upay ahe ka

<<

हे या लेखाचे स्फूर्तीस्थान. (इथला प्रतिसाद)

तिथे प्रतिसाद लिहायला सुरुवात केली :
>>
अगगं!

सोमन, पुण्यात आहात काय?
<<

मग प्रोफाइल चेक केलं, अन येस्स! पुणेच.

अन मग ढेकूणपुराण साक्षात समोर उभे ठाकले!

पुणे अन ढेकूण हे फाऽर जुने नाते आहे.

"विस्मृतीत गेलेल्या वस्तू" असं एक सदर सकाळ किंवा लोकसत्तेत वाचल्याचं आठवतंय. त्यात पाटा-वरवंटा, उखळ-मुसळ इ. सोबत, एक "ढेकण्या" नावाची पेशवाईकालीन वस्तू होती.

ढेकणी म्हणजे अनेक छोटी, आरपार नसलेली भोके पाडलेली लाकडी पट्टी. या ढेकण्या रात्री अंथरुणाच्या आजूबाजूला ठेवत असत. व सकाळी उन्हं वर आल्यावर, तापल्या जमीनीवर ढेकण्या आपटून त्यात लपलेले ढेकूण बाहेर काढून मारत असत.

समहाऊ, ढेकूण चिरडून मारायचा नाही अशी (अंध)श्रद्धा होती. मारला, तर एकतर घाण वास येतो. अन दुसरं, त्याच्या रक्तातून अनेक ढेकूण येतात अशी ती अंश्र. म्हणून मग ढेकूण दिसला, की चिमटीत पकडून जवळच्या अमृतांजनाच्या बाटलीत भरलेल्या रॉकेलमधे टाकून द्यायचा. अश्या बाटल्या पूर्वी घरोघरी असत. अन दुसरा तो 'फ्लिट'चा पंप. त्यात भरायच्या बेगॉनपेक्षा अनेकदा रॉकेलच भरले जाई.

ताई पुण्याला युनिवर्सिटीत शिकायला होती. ती घरी आली की आधी तिचे सगळे कपडे गरम पाण्यात टाकले जात, अन बॅगेचे डीटेल इन्स्पेक्शन होई. ढेकणांसाठी. पुढे मी पुण्यात शिकायला गेलो, तेव्हा तोच प्रोटोकॉल फॉलॉ झाला.

तात्पर्यः टाईम्स चेंज, पुणे डझण्ट Wink

तर पुणे अन ढेकूण, एकूणात जुनं नातं.

आमच्या ससूनच्या होस्टेलला, अन 'सासनात' प्र च ण्ड ढेकूण. तेव्हा ऑबव्हिय्सली ढेकूण काँबॅट टेक्नॉलॉजी फारच अ‍ॅडव्हान्स्ड स्टेजेसला पोहोचली होती.

ढेकूण आमच्या दिनचर्येस एकाद्या सिनेमाच्या बॅकग्राउंड म्युझिकप्रमाणे व्यापून असत.

कॉलेजात खुर्चीत/बाकावर बसलो, की मधल्या फटीतून येऊन चावत. बुडाला खाज येणे, म्हणजे ढेकूण चावणे हे सिंपल इक्वेशन होते. त्या बाकांच्या फटींत कागद, चिकटपट्ट्या भरणे हा एक इलाज.

पीजी करताना ओपीडीत जाताच आपल्या खुर्चीच्या भेगांवर स्पिरिट ओतणे, हा इलाज आम्ही करत असू. स्पिरिट = अल्कोहोल Wink यामुळे, तिथले ढेकूण चिंग होऊन बाहेर येत अन लाश होऊन पडत. मग त्यांना गोळा करून कागदात बांधून 'मामा'जवळ देणे. (वॉर्डबॉय = मामा) हे पहिले आन्हिक असे.

पेशंट बसणार त्या स्टुलावर मात्र अजिब्बात स्पिर्ट ओतायचे नाही असा शोध लवकरच लागत असे, ज्यामुळे शिकाऊ डॉक्टरचे अनुभवी डॉक्टरात रूपांतर होत असे. कारण पेशंट कंफर्टेबली बसला, की २ आड एक अजोबा निवांत ३ पिढ्यांचा इतिहास सांगत डोके खाणार हे नक्की असे. तेव्हा ढेकूण हा प्राणी रॅपिड पेशंट टर्नोव्हरसाठी महत्वाचा मदतनीस होत असे.

त्या काळी ढेकणांचा दिनचर्येवरचा प्रभाव इतका जास्त होता, की आजकाल वर-खाली डुबक्या मारणार्‍या अवल यांच्या मसूरीच्या उसळीच्या धाग्यावर ज्याची रेस्पी मी दिलिये, त्याप्रमाणे डब्यातही 'आज ढेकणाची उसळ आहे' अशी बातमी आम्ही एकमेकांना देत असू.

तर, होस्टेलचे ढेकूण.

यांचा शोध होस्टेलवासी झाल्यानंतर ४-५ महिन्यांनी लागतो. घरी यांची अजिबात सवय नसते. सकाळी उठून कडेकडेने अंग खाजणे. थोडे पुरळ आल्यासारखे वाटणे इ. बाबी होतात. डास चावला असे वाटून आपण गप बसतो.

अचानक एक दिवस एकादा मुरमुर्‍याएवढा रक्तभरला टम्म फुगलेला ढेकूण दिसतो अन मग कळतं की आजकाल असं विक विक का वाटतंय? आमचा एक मित्र चक्क अ‍ॅनिमिक झाला होता ढेकून चावल्याने. मग हळूहळू ढेकणांबद्दलचा अभ्यास वाढत जातो.

खोलीत ढेकूण असल्याचे पहिले चिन्ह म्हणजे, भिंतींतल्या भेगांच्या बाजूला दिसणारे बारीक काळे ठिपके. ही ढेकणांची शी असते, अन ढेकूण असल्याचे पहिले लक्षण. तेव्हा या भेगा बुजवणे, हा पहिला इलाज. आम्ही प्लास्टरॉफ पॅरिस ऑर्थो वॉर्डातून आणत असु. तुम्हाला रंगवाल्याच्या दुकानात मिळेल. थोडे थोडे पाण्यात कालवा, अन आधी त्या भेगा बुजवा. भिंत कशी दिसते त्याची काळजी नंतर करा. आम्ही भिंतभरून रेखाच्या फोटोंचं कोलाज केलं होतं त्यावर Wink (त्या कागदांखालीही यथावकाश ढेकूण झाले अन मग त्या भिंतीलाच एक दिवस काडी लावली ती वेगळी स्टोरी)

लोखंडी पट्ट्यांचे पलंग हे यांचे माहेरघर.

कॉर्नर्सना काळ्या ठिपक्यांसोबत छोटुकली पांढरी अंडी अन ढेकणांची पारदर्शक छोटी पिल्लं अन काही मोठे पिकलेले तपकिरी-काळे ढेकूणही तिथे दिसतील. आजकाल एमसील आहे, त्या गॅप्स बुजवता येतील. आम्ही मेणबत्तीचे मेण त्यावर टपकवत असू. नॉट सो स्ट्राँग इलाज.

आमच्या काळी, आम्ही त्यावर उकळते पाणी टाकणे, पलंग गच्चीवर उन्हात घालणे असे इलाज करीत असू.

मालधक्क्याजवळ चोरबाजार भरतो, तिथून एक 'स्टो रिपेर'वाल्यांचा ब्लोटॉर्च सारखा स्टो आणला होता काही मित्रांनी. त्याच्याने लोखंड लाल होईपर्यंत तापवणे असा एक इलाज होता. एका रुममधल्या बहाद्दरांनी पलंगाच्या दोन पायांना दोन वायर्स लावून त्या सॉकेटमधे घालून पलंगला शॉक देण्याचा इलाजही केला होता. ढम्म! सा आवाज होऊन ब्लॉकचे लाईट गेलेले, पण ढेकूण टपटप खाली पडले होते म्हणे.

नव्या रुम मधे शिफ्ट होण्याआधी ती रुम धुवून, बेगॉन स्प्रे करून, भेगा बुजवून वगैरे कितीही केले, तरी नवे ढेकूण एप्रनच्या खिशात बसून येतच असत. अन मग दिसला ढेकूण की त्याला टाचणीवर सुळी दे. पाठीला फेविकॉलचा थेंब लावून भिंतीला चिकटव. सिगारेट लायटरची ज्योत मॅक्सिममवर करून त्याला भाजून त्याचा मुरमुरा कर, अक्षरश: मुरमुर्‍याएवढे मोठे होतात अन फट्कन फुटतात Wink किंवा हीलेक्स सीलण्ट स्प्रे मारून आहे त्या जागी चिकटवून टाकणे, फार संताप असेल तर भिंगाखाली घेऊन ब्लेडने फक्त माऊथपार्ट कापून टाकणे असेही अनेकानेक इलाज केले जात.

शेवटचा अल्टिमेट नाईटमेअरिश इलाज सांगून मी थांबणारे. बाकी लोकांनाही इलाज सुचवू देत Wink

तर आमच्या एका मित्राने पीजी होस्टेलला नवी सिंगलसीटर रूम मिळवली. तिथले ढेकूण मारण्यासाठी ओटीतून एक ईथरची बाटली, अन मामांना सोबत घेऊन रुमात पोहोचले. पलंगाचे कोपरे, टेबल खुर्चीच्या फटी, भिंतीतल्या भेगा इथे इथर ओतून ढेकूण बाहेर आले. बाटली अशी बाजूला ठेवलेली. अन मामासाहेबांनी खिशातून आगपेटी काढून बिन्धास्त पलंगाला काडि लावली!

इथर कसे पेटते, हे इथे कुणी पाहिले आहे ते ठाऊक नाही, पण एक भक्क्क! आवाज. प्रचण्ड मोठा फ्लॅश ऑफ लाईट, पलिकडच्या खिडकीत चढून ओरडणारा मामा. दाराबाहेर ओरडणारा मित्र. धावून येणारं पब्लिक.

तेवढ्यात तिकडून आलेल्या अ‍ॅनास्थेशिआच्या चीफ रजिस्ट्रारने इथरच्या बाटलीचा स्फोट होईल म्हणून मच्छरदाणीचा गज वापरून ती बाटली फोडली!

पुढचे पुराण बरेच झाले. कुणालाच शारिरीक इजा झाली नाही या बेसिसवर त्या प्रकरणावर पडदा पडला. टेबल खुर्ची अन भिंतींवर त्या अग्नीकांडाच्या खुणा मात्र वर्षानुवर्षे होत्या....

सो लोक्स,
ढेकणांचे तुमचे अनुभव कोणते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन दुसरं, त्याच्या रक्तातून अनेक ढेकूण येतात अशी ती अंश्र. >>> हायला हे असे नसते का मग? या कारणासाठी मी कित्येक ढेकणे न मारता चिमटीत पकडून त्यांना बाथरूममध्यल्या बादलीत नेऊन जलसमाधी दिली आहे..

तसेच एकदा आमच्या बेडच्या ड्रावरच्या फटीत लपलेली ढेकणे मी लायटरने जाळायच्या प्रयत्नात बेडचा बराच दर्शनी भाग काळा पाडलेला आणि जाम मार खाल्लेला ..

पण मी पुण्याचा नाहीये, मुंबईचा आहे. या लहानपणीच्या आठवणी आहेत, तेव्हा कधीतरी सीझनल ढेकणे झाली होती ईतकेच

ढेकुण हा एक नंबर खतरनाक प्राणी आहे, कधी राहिलो ढेकणांच्यात तर ते गेल्यावरही आपल्या हातांवर वळवळत आहेत अशी स्वप्नं पडतात !!

लेख अगदी मस्त झाला आहे.

पुण्यातलं हॉस्टेललाईफ ज्यांनी अनुभवलं आहे त्यांना ढेकणांचा सहवास मिळाला नाही असं होणं हे जवळपास अशक्यंच आहे. अशा भाग्यवंतांमध्ये मीदेखील आहे :). आमच्या हॉस्टेलच्या खोलीत ढेकणांशी लढाईसाठी अनेक उपाय केले गेले, पण ढेकूण त्या सर्वांना पुरुन उरले हे ओघाने आलंच.

आम्ही नेहमी करत असलेला एक उपाय म्हणजे ढेकूण पकडून रॉकेलमध्ये टाकणे. सहा महिन्यांच्या या नेमाने चालणार्‍या उपक्रमाचा परिणाम म्हणून त्या रॉकेलच्या वाडग्यात सुमारे अर्धा किलोचा ढेकणांच्या मृतदेहांचा खच पडला होता! परंतु इतक्यावरच भागलं तर काय पाहिजे होतं?

ढेकणांना पकडून रॉकेलमध्ये टाकण्याऐवजी सगळी रुम रॉकेलने धुण्याची सुपिक कल्पना हॉस्टेलमधल्या एकीच्या डोक्यातून बाहेर पडली आणि तिच्या दोन रुम पार्टनरनीही लगेच होकार दिला! कसं माहीत नाही पण त्यांनी जवळपास दहा लिटर रॉकेल मिळवलं आणि होळीतल्या पिचकार्‍या वापरुन सगळ्या भिंतींवर उडवलं! रुममध्ये असलेल्या बेडनाही रॉकेलने आंघोळ घालण्याचा कार्यक्रम झाला! प्रत्येकजण उत्साहाने हा सोहळा पाहण्यास हजर!

अर्थात ढेकणांवर याचा फारच थोडा परिणाम झाला!

रेक्टरने त्या तिघींना सगळी रुम पुन्हा पाण्याने धुवून काढायला लावली. चार वेळा रुम धुवूनही रॉकेलचा वास कितीतरी दिवस जात नव्हता! ढेकून गेले नाही ते नाहीतच!

छान बाफ आणि अनुभव...

लोखन्डी पलन्गाच्या कोपर्‍यात लपलेल्या ढेकणान्ना मारण्यासाठी त्या कोपर्‍यान्ना मी नियन्त्रित प्रमाणात शेक द्यायचो. शेक देण्यासाठी वर्तमान पत्राची गोल पुन्गळी करुन त्याच्या एका टोकाला पेटवायचे. आगिवर नियन्त्रण रहाते, अकस्मात हल्ला झाला आहे म्हणुन ढेकुण सैरावैरा पळण्याचा प्रयन्त करतात... पण तुमच्या कडे भरपुर वेळ असतो... मारले जातात. चार कोपर्‍यान्साठी चार TOI चे कागद. हा उपाय ३-४ आठवड्यातुन एकदा करायचो.

रोजच्या मारण्यासाठी (वर लेखात उल्लेख केल्याप्रमाणे) रॉकेलने भरलेल्या बाटलीत रॉकेलसमाधी द्यायची...

मला अधे मधे एखादा चावतो आणि मी कुठल्याही श्रद्धा अंधश्रद्धेच्या परे असल्याने त्यांना व्यवस्थितरित्या चेंदुन टाकते Wink पण मी फ्लॅटवर राहत असल्याने पलंग वगैरे सारखा मोहमाया नैत जवळ.. गादी खालीच टाकलीय..
पेटवुन देऊ म्हणता ? aha.gif

ते सायचं पेस्ट कंट्रोल केले की मी दुसऱ्या मित्राच्या रूम वर झोपायला जातो असो कारण त्या पेस्ट कंट्रोल वाल्या रूम मधे झोपणे म्हणजे पार गॅस चैंबर मधे झोपल्या सारखे असे, आम्ही पलंग बाहेर काढुन त्याच्या लोखंडी पट्टयांच्या मधे पेपर भरून ते सगळे गणित पेटवुन देत असु ! मग नंतर तो पलंग काही काळ (३-४ दिवस तरी) शुचिर्भूत होत असे.

बाकी दीमा, रम्य ते मेडिकल कॉलेज चे हॉस्टल!! मी पुण्यात आलो तेव्हा UPSC नावाची एग्जाम असते हे बहुतेक पुणेरी घरमालकांस माहिती नव्हते म्हणुन मला सलग ४ दिवस

"ते काय म्हणतात तुमचे ते युपीएसी का काय तो किती वर्षांचा कोर्स आहे म्हणे!?" असे प्रश्न येत होते, शेवटी तरस खाऊन आमच्या एक तळेगाव च्या भाऊसाहेब सरदेसाई रूरल हॉस्पिटल अन mimer चा विद्यार्थी असलेल्या मित्राने आमच्यावर कृपा करून आम्हाला बॉयज हॉस्टल ला पैरासाइट म्हणुन चिकटवले अन आम्ही पुण्यात रुळलो, एकदा ढेकणे टाइट करायची म्हणुन मामा ला आमच्या एक ऑर्थो मित्राने स्पिरिट आणायला सांगितले होते, ते मामा शौक़ीन त्यांनी आमच्या मित्राच्या नावावर सर्जिकल मधुन स्पिरिट घेतले अन घच्चकन पाऊण बाटली नरडीत रिकामी केली, तसे ते रेगुलर होते पण नंतर त्यांना बहुतेक ओडी रिएक्शन झाली अन तो मामा शुद्धिवर येऊस्तोवर आमचा मित्र बिचारा खांबावर चढ़ून बसला होता

ढेकूण, डास आणि झुरळ हे तीन प्राणी जिथे दिसतात तिथेच चिरडले जाण्यासाठी जन्माला आलेले असतात.. सो नो मर्सी.. जस्ट किलिंग.. दिसला की धोपट..

सी ओ ई पी च्या F (किंवा एकंदर कुठल्याही) ब्लॉकमधे जे राहिलेले असतील त्यांनी ढेकणांना भरपुर मेजवानी दिलेली आहे. माझे आई वडील एकदा रुमवर आले तेव्हा कॉटवरील ढेकणे पाहुन हादरुनच गेले होते. फक्त पहिल्यांदा त्रास होतो ढेकणांचा नंतर एकदा सवय झाली की काही वाटत नाही Happy

दीड मायबोलीकर,

झकास लिहिलेत ... हॉस्टेल आणि ढेकण अतूट रिश्ता :D! ह्या ढेकणांचा पहिला अनुभव पुण्यातच भेटला. खूप वैताग आणला होता. पहिल्याच वर्षी गादीत भरपूर झाले. सगळे लक्षण बरोबर लागू Happy

शेवटी खटनील नावाचं औषध आणलं ... ते रोज म्हणजे जवळजवळ ८ १० दिवस वापरले, ढेकण ते औषध लागल की बाहेर येऊन वळवळ करायचे. मग काय रोज औषध मारायची आणि गादी उन्हात नेऊन धोपटली लाकडी फळीनी ...

आणि शेवटी चून चून के खातमा Happy कैक जीवहत्या झाल्या माझ्या हातून Sad

दुसरा त्रासदेऊ प्राणी म्हणजे झुरळ ... हा दिसला रे दिसला की आधी कल्लोळ, ओरडा ... मग झाडू घेऊन आम्ही ह्याच्या मागे Lol

सोपा , स्वस्त ,निर्धोक उपाय:
पातळ खळ ब्रशने लावा.लाकूड, भिंत ,गाद्या उशा ,कशालाही.साधारण चार चार दिवसांनी पाचसहावेळा करा.मात्र हॅास्टेलच्या सर्व रूमसमध्ये एकाच महिन्यात करा. ढेकूण लहान मोठे immobile होतात खळ वाळली की.अंडी फुटुन नवीन पिढीही तयार होत नाही.

भारी लिहलयं Lol
माझा ढेकणांशी सामना गेल्यावर्षी उसगावात झाला! तोपर्यंत ढेकुण कसे दिसतात हेही माहित नव्हतं Sad .. प्राथमिक लक्षणं दिसु लागली... नंतर एक छोटा प्राणी दिसला तर त्याचा फोटो काढुन मित्राला व्हॉ अ‍ॅपवर पाठवला.. मग कळालं हाच तो बेड बग!
अपार्ट्मेंट ऑफिस्मधे सांगितलं तर त्यांनी एक भली मोठ्ठी लिस्ट दिली पुर्वतयारीची..मग पेस्ट कंट्रोल सोपस्कार! अगदी लालबुंद नक्षी उमटली होती दोन्ही हातावर Sad .. शेव्टी मीच रुम सोड्ली नि माझ्या बरोबर तेही येवु नयेत अशी देवाला प्रार्थना!

>> फक्त पहिल्यांदा त्रास होतो ढेकणांचा नंतर एकदा सवय झाली की काही वाटत नाही << असेल बुवा ! कारण खरंच माझ्या एका रूममेटने कधीच ढेकणांचे टेन्शन घेतले नाही. आम्ही मात्र दर दोन आठवड्याला अंथरून-पांघरूण, गाद्या-उश्या बाहेर उन्हात टाकायचो.
सेकन्ड शिफ्ट वरून आलेला एक रुममेट रात्री १ ला उदबत्तीने फटीत लपलेले 'फटाके' फोडायचा, अन त्याच्या सुवासात (?) तो शांत मनाने झोपायचा.
दिमा.. रुममधे ढेकणांचा उपद्रव झाल्यास सुरवातीला होणारा संताप, कधी हतबल होउन रात्री उठून बसणे ई. सर्व आठवले लेख वाचुन!

ढेकूण प्रसाराचा मोठ्ठा एक्स्चेन्ज म्हनजे त्याकाळी असलेली येष्टीची स्टँडवरची बाके. ती लाकडी बाके लाकडी पट्ट्यांची असत. त्यात हजारो ढेकूण असत. बाकावर बसलेल्या 'पाशिंजरांच्या' धोतरात लुगड्यात पैजाम्यात . शेकडो ढेकूण घुसत आणि वेगवेगळ्या गावाना प्रवासाला जात. आर्य जसे कुठून धृवावरून आले आणि भरतखंडात पसरले तसे. त्या काळातले घरेही शिंची लाकडाची, शेणाने सारवलेली. घरात कपाटे नसल्याने असंख्य पोत्याची बाचकी म्हणेजे ढेकणांची अभयारण्येच. फार ढेकणांचा सुळसुळाट हो. झोपेचे खोबरे म्हणजे काय ते हे. यमराज्यात एक रात्र. आम्ही बोटानीच चिरडायचो. भल्ताच आसुरी आनन्द मिळायचा. एकवीस वेळा घर कपडे नि:ढेकूण केले तरी बेटे क्षत्रियांसारखे पुन्हा हजरच. मग आम्ही त्यांचे सोबत एखद्या डयबेटीसप्रमाणे जगायला शिकलो. वर्गात पुढेबसलेल्या एखाद्या वर्ग बंधूच्या पांढर्‍या स्वच्छ सदर्‍या च्या पाठीवर एखादा लालबुंद सरदार एकडून तिकडे फिरताना दिसे. आम्हाही 'चावू दे साल्याला' म्हणत त्याला सांगायचो नाही.

अलिकडे स्टँडावर शिमिटाची बाके आली, घरे शिमीटाच्या गिलाव्याची झाली, फरणिचरें लाकडाऐवजी फाय बर प्लास्टिक्ची झाली त्यामुळे त्यांच्या लपायच्या सगळ्या 'डेन्स'नष्ट झाल्या. त्यामुळे ही मंडली गेल्या कित्येक वर्षात दिसत नाहीत. आमच्या पोरानी तर अजून ढेकूण पाहिलेलेच नाहीत !!

ढेकणं मरू द्या हो, रेखाच्या फोटोंना काडी लावावी लागली त्याची दर्दभरी दास्ताँ सुनवा!
<<
बच्चन हो! फक्त बच्चन.
त्याच्या गळ्यात पडली अशी कुजबुज सुरू झाली, अन आमचा प्रेमभंग झाला की इकडे. म्हणून काडी लावली गेली खरं तर. नाहीतर ढेकणांसकट रेखाला नांदवून घेत होतोच की.

शिवाय फोटोखालचे ढेकूण मारण्यासाठी फक्त कागदा वरून दाबले की झाले. (हात न रंगवता ढेकूण निजधामास पोहोचवता येत).. अनेक मित्र फक्त असे फोटोखालचे ढेकूण मारण्यासाठी रुमवर हजेरी लावत. समाजसेवा हं. फक्त समाजसेवा. अन मित्रप्रेम. दुसरं कै नै.

कित्ती कित्ती त्या रंगीत आठवणी.. Wink
लिहू कधीतरी डिट्टेलवार. रंगीत पाण्याचं इंधन भरलं की मगच लिहिता येइल मात्र.. Lol

लोल.
माझ्या हॉस्टेलच्या रूम मध्येही ढेकणं असायचीच. बरेचदा ती नेमके एखाद्या मुलीबरोबर गप्पा मारत असतानाच शर्टाच्या बाहेर यायची. मग लगेच चीत्कार वगैरे आणि त्या मुली मग पुढे ह्याला बोलू की नको हा विचार करत असणार.

ढेकणं साली मरत नाहीतच. पण पहिल्या वर्षी सहन केल्यावर तो खडूचां शोध लागला. मग निदान माझ्या पलगांवर ती कमी असतं.

अमेरिकेत बेड बग्ज आमच्या तीन घर पलीकडे राहत असणार्‍यांकडे झाले होते. आम्ही त्या काळात त्यांना दरवाज्यातूनच कटवायचो किंवा चल बाहेरच स्टारबग्ज मध्ये जाऊ असे म्हणून बोळवण करायचो.

रवी, हा फर्ग्युसन च्या होस्टेल ला होता. तिथेही ढेकूण होतेच. त्याच्या रूम मेट्स नी तो लोखंडी पलंग
एकदा जिन्यावरून धडधडत खाली फेकला होता. तरी ढेकूण होतेच. १९७४-७५ चा किस्सा.

छान लेख.

मस्तं ! Happy
दिमा, पुण्याला नव्हे तर मुंबईलाही हॉस्टेलात ढेकूण असतात बरं का!
ढेकणांना मुली आवडत नाहीत असा माझा कित्येक दिवस समज होता (नंतर तो खोटा ठरला)
जेजेत असताना आमच्या लेडिज हॉस्टेलात कधीच ढेकूण दिसला नाही पण बॉयफ्रेंडच्या तोंडून 'ढेकूणकीच्या शत्रूसंगे युद्धं आमचे सुरू' या सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकल्या होत्या.
पूढे सायनात पीजी करताना मिक्स्ड हॉस्टेल असूनही त्याच्या रूमात ढेकणांचे ईवान आणि माझ्या रूमात एकही नव्हता ढेकूण.
एकदाच त्याच्या रूममध्ये जाऊन दिवसाढवळ्या इतस्ततः फिरणारी ती ढेकणांची गँग बघून घाबरून गेले होते. त्यात त्याने गादी उलटी करून त्याखाली कोपर्‍यात असलेली ढेकूण कॉलनी दाखवली. ती पाहिल्यावर तर पुन्हा कधी कधी त्या दरवाजाच्या आत पाय टाकला नाही.कितीही टेंप्टेशन झालं तरी ! Wink
नंतर लग्नं झाल्यावर त्याच हॉस्टेलात आणि त्याच फ्लोअरवर एकत्रं रूम मिळाली. तेव्हा याचं सगळंसामान धुवून वाळवून रूमात घेतलं. गादी स्वतःची असूनही दान करून टाकली.
त्यामुळे एम्डी संपेपर्यंत ढेकूण नाही आले.
यावरून मुलींचे रक्तं ढेकणांना आवडत नाही असा निष्कर्ष काढला होता.
पण इकडे शिफ्ट झाल्यावर मुलाला सांभाळायला एक गावातली मुलगी ठेवली आणि घरभर ढेकूणच ढेकूण. पूर्ण निर्दालन केलं तरी ही मुलगी शनि/रवी गावी जाऊन आली की ढेकणांची नवी फौज हजर. मग तिला काढून टाकल्यावर आणि तीन महिने रेखाच्या कागदावर हात फिरवणे सोडून , Wink बाकी तुमच्या लिस्टीतले बरेचसे उपाय केल्यावर गेले ते ढेकूण!
आता गावातले पेशंट बर्‍याच जुन्या दिवसांच्या रिपोर्टांच्या फायली घेऊन येताय तेव्हा टेबलावर ढेकूण , त्यांची अंडी, झुऱळांचे कोष असे काय काय पडते. पण सुदैवाने अजून नवे ढेकूण तीन चार वर्षांत घरी आलेले नाहीत.

खुमासदार लिवलय. बाबा रेल्वेत असल्याने ढेकणे घरी यायचीच यायची. वैतागलो होतो जाम. लहानपणी मच्छरदाणी वापरली जात असल्याने कायम तिच्या कानाकोपर्‍यात असायचे हे ढेकुण. आता सर्व बन्द म्हणून मोठ्ठा सुटकारा.

लहानपणी ते गाणे ऐकले होते ते कोणाला माहीत आहे का? माहीत असल्यास इथे लिव्हा.

या ढेकणाने मजला पिसाळले....

या ढेकणाने मजला पिसाळले

ढेकूण झाले घरात म्हणून गेलो मी रानात
तिथे जाऊन बघतो तर ढेकूण माझ्या कानात
या ढेकणांनी...

ढेकूण झाले घरात म्हणून गेलो मी वेशीत
तिथे जाऊन बघतो तर ढेकूण माझ्या मिशीत
या ढेकणांनी...

ढेकून झाले घरात म्हणून गेलो मी वाडीत
तिथे जाऊन बघतो तर ढेकूण माझ्या दाढीत
या ढेकणांनी...

... अँड सो ऑन अँड सो फोर्थ. इम्याजिनेशनच्या वारूला यमकाचा रथ जोडून काय पण.
Happy

आम्ही त्या काळात त्यांना दरवाज्यातूनच कटवायचो किंवा चल बाहेरच स्टारबग्ज मध्ये जाऊ असे म्हणून बोळवण करायचो.
<<

ढेकूण किती पिसाळतात, त्याच्या आठवणीनेच केदार यांच्या स्टारबक्सचे स्टार-बग झालेय Lol

Pages