ढेकूण होस्टेल अन पुणे.

Submitted by दीड मायबोलीकर on 3 August, 2015 - 15:01

सोमन | 3 August, 2015 - 20:34

hostel chya room madhe dhekhna jhali ahet
barch upay karun thaklo
kahi jhalim upay ahe ka

<<

हे या लेखाचे स्फूर्तीस्थान. (इथला प्रतिसाद)

तिथे प्रतिसाद लिहायला सुरुवात केली :
>>
अगगं!

सोमन, पुण्यात आहात काय?
<<

मग प्रोफाइल चेक केलं, अन येस्स! पुणेच.

अन मग ढेकूणपुराण साक्षात समोर उभे ठाकले!

पुणे अन ढेकूण हे फाऽर जुने नाते आहे.

"विस्मृतीत गेलेल्या वस्तू" असं एक सदर सकाळ किंवा लोकसत्तेत वाचल्याचं आठवतंय. त्यात पाटा-वरवंटा, उखळ-मुसळ इ. सोबत, एक "ढेकण्या" नावाची पेशवाईकालीन वस्तू होती.

ढेकणी म्हणजे अनेक छोटी, आरपार नसलेली भोके पाडलेली लाकडी पट्टी. या ढेकण्या रात्री अंथरुणाच्या आजूबाजूला ठेवत असत. व सकाळी उन्हं वर आल्यावर, तापल्या जमीनीवर ढेकण्या आपटून त्यात लपलेले ढेकूण बाहेर काढून मारत असत.

समहाऊ, ढेकूण चिरडून मारायचा नाही अशी (अंध)श्रद्धा होती. मारला, तर एकतर घाण वास येतो. अन दुसरं, त्याच्या रक्तातून अनेक ढेकूण येतात अशी ती अंश्र. म्हणून मग ढेकूण दिसला, की चिमटीत पकडून जवळच्या अमृतांजनाच्या बाटलीत भरलेल्या रॉकेलमधे टाकून द्यायचा. अश्या बाटल्या पूर्वी घरोघरी असत. अन दुसरा तो 'फ्लिट'चा पंप. त्यात भरायच्या बेगॉनपेक्षा अनेकदा रॉकेलच भरले जाई.

ताई पुण्याला युनिवर्सिटीत शिकायला होती. ती घरी आली की आधी तिचे सगळे कपडे गरम पाण्यात टाकले जात, अन बॅगेचे डीटेल इन्स्पेक्शन होई. ढेकणांसाठी. पुढे मी पुण्यात शिकायला गेलो, तेव्हा तोच प्रोटोकॉल फॉलॉ झाला.

तात्पर्यः टाईम्स चेंज, पुणे डझण्ट Wink

तर पुणे अन ढेकूण, एकूणात जुनं नातं.

आमच्या ससूनच्या होस्टेलला, अन 'सासनात' प्र च ण्ड ढेकूण. तेव्हा ऑबव्हिय्सली ढेकूण काँबॅट टेक्नॉलॉजी फारच अ‍ॅडव्हान्स्ड स्टेजेसला पोहोचली होती.

ढेकूण आमच्या दिनचर्येस एकाद्या सिनेमाच्या बॅकग्राउंड म्युझिकप्रमाणे व्यापून असत.

कॉलेजात खुर्चीत/बाकावर बसलो, की मधल्या फटीतून येऊन चावत. बुडाला खाज येणे, म्हणजे ढेकूण चावणे हे सिंपल इक्वेशन होते. त्या बाकांच्या फटींत कागद, चिकटपट्ट्या भरणे हा एक इलाज.

पीजी करताना ओपीडीत जाताच आपल्या खुर्चीच्या भेगांवर स्पिरिट ओतणे, हा इलाज आम्ही करत असू. स्पिरिट = अल्कोहोल Wink यामुळे, तिथले ढेकूण चिंग होऊन बाहेर येत अन लाश होऊन पडत. मग त्यांना गोळा करून कागदात बांधून 'मामा'जवळ देणे. (वॉर्डबॉय = मामा) हे पहिले आन्हिक असे.

पेशंट बसणार त्या स्टुलावर मात्र अजिब्बात स्पिर्ट ओतायचे नाही असा शोध लवकरच लागत असे, ज्यामुळे शिकाऊ डॉक्टरचे अनुभवी डॉक्टरात रूपांतर होत असे. कारण पेशंट कंफर्टेबली बसला, की २ आड एक अजोबा निवांत ३ पिढ्यांचा इतिहास सांगत डोके खाणार हे नक्की असे. तेव्हा ढेकूण हा प्राणी रॅपिड पेशंट टर्नोव्हरसाठी महत्वाचा मदतनीस होत असे.

त्या काळी ढेकणांचा दिनचर्येवरचा प्रभाव इतका जास्त होता, की आजकाल वर-खाली डुबक्या मारणार्‍या अवल यांच्या मसूरीच्या उसळीच्या धाग्यावर ज्याची रेस्पी मी दिलिये, त्याप्रमाणे डब्यातही 'आज ढेकणाची उसळ आहे' अशी बातमी आम्ही एकमेकांना देत असू.

तर, होस्टेलचे ढेकूण.

यांचा शोध होस्टेलवासी झाल्यानंतर ४-५ महिन्यांनी लागतो. घरी यांची अजिबात सवय नसते. सकाळी उठून कडेकडेने अंग खाजणे. थोडे पुरळ आल्यासारखे वाटणे इ. बाबी होतात. डास चावला असे वाटून आपण गप बसतो.

अचानक एक दिवस एकादा मुरमुर्‍याएवढा रक्तभरला टम्म फुगलेला ढेकूण दिसतो अन मग कळतं की आजकाल असं विक विक का वाटतंय? आमचा एक मित्र चक्क अ‍ॅनिमिक झाला होता ढेकून चावल्याने. मग हळूहळू ढेकणांबद्दलचा अभ्यास वाढत जातो.

खोलीत ढेकूण असल्याचे पहिले चिन्ह म्हणजे, भिंतींतल्या भेगांच्या बाजूला दिसणारे बारीक काळे ठिपके. ही ढेकणांची शी असते, अन ढेकूण असल्याचे पहिले लक्षण. तेव्हा या भेगा बुजवणे, हा पहिला इलाज. आम्ही प्लास्टरॉफ पॅरिस ऑर्थो वॉर्डातून आणत असु. तुम्हाला रंगवाल्याच्या दुकानात मिळेल. थोडे थोडे पाण्यात कालवा, अन आधी त्या भेगा बुजवा. भिंत कशी दिसते त्याची काळजी नंतर करा. आम्ही भिंतभरून रेखाच्या फोटोंचं कोलाज केलं होतं त्यावर Wink (त्या कागदांखालीही यथावकाश ढेकूण झाले अन मग त्या भिंतीलाच एक दिवस काडी लावली ती वेगळी स्टोरी)

लोखंडी पट्ट्यांचे पलंग हे यांचे माहेरघर.

कॉर्नर्सना काळ्या ठिपक्यांसोबत छोटुकली पांढरी अंडी अन ढेकणांची पारदर्शक छोटी पिल्लं अन काही मोठे पिकलेले तपकिरी-काळे ढेकूणही तिथे दिसतील. आजकाल एमसील आहे, त्या गॅप्स बुजवता येतील. आम्ही मेणबत्तीचे मेण त्यावर टपकवत असू. नॉट सो स्ट्राँग इलाज.

आमच्या काळी, आम्ही त्यावर उकळते पाणी टाकणे, पलंग गच्चीवर उन्हात घालणे असे इलाज करीत असू.

मालधक्क्याजवळ चोरबाजार भरतो, तिथून एक 'स्टो रिपेर'वाल्यांचा ब्लोटॉर्च सारखा स्टो आणला होता काही मित्रांनी. त्याच्याने लोखंड लाल होईपर्यंत तापवणे असा एक इलाज होता. एका रुममधल्या बहाद्दरांनी पलंगाच्या दोन पायांना दोन वायर्स लावून त्या सॉकेटमधे घालून पलंगला शॉक देण्याचा इलाजही केला होता. ढम्म! सा आवाज होऊन ब्लॉकचे लाईट गेलेले, पण ढेकूण टपटप खाली पडले होते म्हणे.

नव्या रुम मधे शिफ्ट होण्याआधी ती रुम धुवून, बेगॉन स्प्रे करून, भेगा बुजवून वगैरे कितीही केले, तरी नवे ढेकूण एप्रनच्या खिशात बसून येतच असत. अन मग दिसला ढेकूण की त्याला टाचणीवर सुळी दे. पाठीला फेविकॉलचा थेंब लावून भिंतीला चिकटव. सिगारेट लायटरची ज्योत मॅक्सिममवर करून त्याला भाजून त्याचा मुरमुरा कर, अक्षरश: मुरमुर्‍याएवढे मोठे होतात अन फट्कन फुटतात Wink किंवा हीलेक्स सीलण्ट स्प्रे मारून आहे त्या जागी चिकटवून टाकणे, फार संताप असेल तर भिंगाखाली घेऊन ब्लेडने फक्त माऊथपार्ट कापून टाकणे असेही अनेकानेक इलाज केले जात.

शेवटचा अल्टिमेट नाईटमेअरिश इलाज सांगून मी थांबणारे. बाकी लोकांनाही इलाज सुचवू देत Wink

तर आमच्या एका मित्राने पीजी होस्टेलला नवी सिंगलसीटर रूम मिळवली. तिथले ढेकूण मारण्यासाठी ओटीतून एक ईथरची बाटली, अन मामांना सोबत घेऊन रुमात पोहोचले. पलंगाचे कोपरे, टेबल खुर्चीच्या फटी, भिंतीतल्या भेगा इथे इथर ओतून ढेकूण बाहेर आले. बाटली अशी बाजूला ठेवलेली. अन मामासाहेबांनी खिशातून आगपेटी काढून बिन्धास्त पलंगाला काडि लावली!

इथर कसे पेटते, हे इथे कुणी पाहिले आहे ते ठाऊक नाही, पण एक भक्क्क! आवाज. प्रचण्ड मोठा फ्लॅश ऑफ लाईट, पलिकडच्या खिडकीत चढून ओरडणारा मामा. दाराबाहेर ओरडणारा मित्र. धावून येणारं पब्लिक.

तेवढ्यात तिकडून आलेल्या अ‍ॅनास्थेशिआच्या चीफ रजिस्ट्रारने इथरच्या बाटलीचा स्फोट होईल म्हणून मच्छरदाणीचा गज वापरून ती बाटली फोडली!

पुढचे पुराण बरेच झाले. कुणालाच शारिरीक इजा झाली नाही या बेसिसवर त्या प्रकरणावर पडदा पडला. टेबल खुर्ची अन भिंतींवर त्या अग्नीकांडाच्या खुणा मात्र वर्षानुवर्षे होत्या....

सो लोक्स,
ढेकणांचे तुमचे अनुभव कोणते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बार्शीला तर थेटरात इतके ढेकूण असत की लोक वर्तमान पत्र घेऊनच जात, खुर्चीवर ते पसरून त्यात बसत. आजकाल बंद दार फ्लॅट सिस्टीम मुळे लोकांचे एकमेकांकडे येणेजाणे, दिवाळीच्या फरळाची देवघेव, एकत्र पापड सांडगे घालणे या बरोबरच ढेकुणही नामशेष झाले. जैव विविधतेला आणखी एक तडा !

जैव विविधतेला आणखी एक तडा !>>> :हाहा:. जीव साखळीत ढेकूण ह्या प्राणी नामशेष होण्याने काहीच बिघडत नसावे. असले घाणेरडे ढेकूण कुणाचे अन्नं असतील?

बार्शीला तर थेटरात इतके ढेकूण असत की लोक वर्तमान पत्र घेऊनच जात, खुर्चीवर ते पसरून त्यात बसत<<< हो. हे आठवलं. बार्शीचं ती दोन तीन थीएटर म्हणजे एक सांस्कृतिक खजिना होतं.

>>>> तर पुणे अन ढेकूण, एकूणात जुनं नातं. <<<<
हे एक ढेकणांचे फक्त पुण्याशी ओढुनताणून जोडलेले नाते सोडले, तर बाकी लेख झकास.
ढेकणे फक्त पुण्यातच नसतात, तर आसेतू हिमालय फिरणार्‍या रेल्वेच्या बोग्यांमधे महामूर असतात. आता असे म्हणू नका की या रेल्वेच्या सगळ्याबोग्या ढेकणे उचलायला पुण्यात येऊन जातात Proud
लोकल रेल्वेत चौथे सीट म्हणून न बसण्यामागे ढेकणांचा सहज चावा हे देखिल एक कारण असायचे असे आठवते.
गावोगावच्या एस्टीस्टॅन्डवरील लाकडी बाकांमधे ढेकणांच्या वसाहती अनुभवल्या आहेत. नंतर एस्टीवाल्यांना जादाचे शहाणपण सुचून त्यांनी ढेकणांवर प्रतिबंधात्मक उपाय करण्या ऐवजी महाराष्ट्रभरच्या स्टॅन्डवरील लाकडी बाकडी हटवुन तिथे कडाप्प्यची बाके बसवल्याची मोहिम आठवते.
असो.

या बरोबरच ढेकुणही नामशेष झाले. जैव विविधतेला आणखी एक तडा ! >>> आमच्याकडे ही बातमी ढेकणांपर्यंत पोहचली नाहिये असे वाटते, ते बिचारे अजूनही ईमाने ईतबारे त्यांचे काम चोख बजावत आहेत. Sad

लेख मस्त. प्रतिक्रियाही धमाल.
फार पूर्वी अगदी लहानपणी जुन्या वाड्यात ढेकूण होते. गाद्यांचे कानेकोपरे रॉकेलने भिजवून टाकायचे आणि मग थोड्यावेळाने मेलेले ढेकूण सुटून पडायचे. हे बघितल्याचं आठवतंय.

ढेकूण म्हणजे ज्यावर काही उपाय नाही असा व्हायरस असल्यासारखी धास्ती होती.

ढेकणांशी माझा पहिला मोठा सामना झाला तो अभियांत्रिकिच्या दुसर्‍या वर्षाला, प्रत्येक वर्षी नविन रुम असायची, दुसरं वर्ष सुरु झाल्यावर नविन रुम मध्ये संसार थाटुन झाला. पहिल्याच रात्री मच्छरांनी फोडुन काढले, दुसर्‍या दिवशी कछवा लावला, पण तरीही मच्छर चावलेच, मोठ मोठे लाल फोड आले होते. मित्राला म्हटलं हे मच्छर फारच जालीम दिस्ताहेत, त्या विकांताला चादर बदलताना बेडच्या कडेने काळे डाग दिसले आणि जालिम मच्छारांच कोडं उलगडलं. उशीच कव्हर काढलं तर आतमध्ये शिलाईच्या लाइनीत १००-१५० ढेकुन, एकतर होस्टेलला आधिच खाण्याचे वांदे त्यात कसबसं जे काही रक्त तयार होत असेल त्यात ह्यांचाही हिस्सा. असं कसं चालणार. मग रुम मधल्या तिन्ही बेडची टेस्ट झाली.
ढेकुण प्रजा भयंकर वाढलेली होती. मग काय आम्ही तिघे युद्धाला सज्ज झालो. पहिले सगळी रद्दी गोळा केली, पुंगळी करुन सगळे बेडचे कॉर्नर शेकले, ह्यात बरेच ढेकुन शहीद झाले, मग सगळ्या गाद्या, उश्या, त्यांचे कव्हर, चादरी, आणि ते तिन्ही बेड असा सगळा लवाजमा होस्टेलच्या टेरेस वर उन्हात भाजायला ठेवला. नंतर रुम पार्टनरने एक पंप आणला आणि ढेकुण मारायचं औषध (आता नाव आठवत नाही) त्यात टाकुण तिन्ही बेड्सला व्यवस्थित आंघोळ घातली.
नंतर परत कधी ढेकणं नाही झाले. Happy
अशी आमची ढेकुण युद्धाची काहाणी सुफळ संपुर्ण.. Proud

खतरनाक लिवलंय दीमा Lol
प्रतिसाद सुद्धा एक से एक.

<<ढेकूण प्रसाराचा मोठ्ठा एक्स्चेन्ज म्हनजे त्याकाळी असलेली येष्टीची स्टँडवरची बाके. ती लाकडी बाके लाकडी पट्ट्यांची असत. त्यात हजारो ढेकूण असत. बाकावर बसलेल्या 'पाशिंजरांच्या' धोतरात लुगड्यात पैजाम्यात . शेकडो ढेकूण घुसत आणि वेगवेगळ्या गावाना प्रवासाला जात. आर्य जसे कुठून धृवावरून आले आणि भरतखंडात पसरले तसे>> Biggrin

असले घाणेरडे ढेकूण कुणाचे अन्नं असतील?
<<

कोंबड्यांचं!

मशीनमधे उबवलेली पिवळ्या रंगाची कोंबडीची पिल्लं रस्त्यावर विकायला येत असत कधीकाळी. रस्त्याच्या कडेला पुठ्ठ्यांचं कंपाऊंड करून त्यात चू-चू करणारी खूप सारी गोंडस पिवळी छोटुकली पिल्लं.

एका होस्टेलकुमारांनी एक कोंबडीचं पिल्लू ५० पैशांत विकत आणलं होतं. ते मोठे झाल्यावर चिकन करीन असे तो सांगत असे. त्याचे चिकन होण्याच्या आतच मांजरीने त्याला पळवून नेलं ती गोष्ट वेगळी.

पण हे पिल्लू रूममधले ढेकूण टिपून खात असे!

हे एक ढेकणांचे फक्त पुण्याशी ओढुनताणून जोडलेले नाते सोडले, तर बाकी लेख झकास.
<<
लिंबूभौ,

होस्टेल पुण्यात होते, हा एक भाग. अन दुसरा त्या 'ढेकण्या'. इतके इनोव्हेटिव्ह ढेकूणनियंत्रक हत्यार बनवायला पुणेरी तैलबुद्धीच हवी. नैका?

पेठांतून दुपारच्या वेळी रस्त्यावर ढेकण्या आपटत गप्पा करणारे पुणेकर सर्रास दिसत असत म्हणे Wink

मलाही आठवतात ती फ्रेश पिवळ्या रंगाची पिल्लं. मी आईच्या मागे लागले होते तसं पिल्लू आणूया म्हणून. पण जिवंत अथवा मृत कोंबडी बिंबडीला घरी मज्जाव असल्याने तो विषय मागे पडला. तश्या मोठ्या कोंबड्या कधी पाहिल्याच नाहीत. ती पिल्लं ढेकूण खातात काय? मग बरं आहे. ज्यांच्याकडे ढेकूण झालेत त्यांनी ती पिल्लं पाळा....उंदीर झाल्यावर मांजरी पाळतात तसं.

ढेकूण महाशय अन्न ग्रहण (क्रिया १:२१ नन्तर सुरु होते) करतानाची नॅशनल जिओग्राफीची क्लिप.

https://www.youtube.com/watch?v=WfKCcSPCOQo

स्वादिष्ट अशा मेजवानी नन्तर ढेकणाचा अन्तरात्मा (ढेकणाला आत्मा असतो - प्रत्येक प्राण्याला आत्मा असतो असे प पू महाराजान्नी सान्गितले आहे) तृप्ततेचा ढेकर देतो आहे... तृप्ततेचा ढेकर मागच्या जन्मी ढेकूण असणारान्ना दिसत नाही. Happy

आमच्या गावात ढेकणे नाहीत अजिबात कारण विचारता कळले की वैदर्भीय उन्हात ती तगत नाहीत (मायला घराच्या आत सुद्धा सीजन मधे ४०℃ ते ४१ ℃ तापमान, माणसे मरायची ते ढेकणे कुठली तगायला) त्यामुळे पुण्यात जाइस्तोवर आम्ही ह्या प्रकारा बद्दल अनभिज्ञ होतो, ह्याच ढेकणामुळे एकदा मरता मरता राहिला होता आमचा एक मित्र, झाले असे की

आम्ही जिथे राहायचो त्याच्या जवळ दुसऱ्या एका ठिकाणी आमचेच काही ग्रामबंधु राहत असत, एकदा आमचा एक रूममेट कुठून तरी एक गंज मिसळलेले रॉकेल दिसावे असले औषध घेऊन आला होता, त्याचा उपाय सक्सेसफुल होताच ती बातमी समस्त पोरांत कानोकान झाली, तेव्हा आमचाच एक त्याच दुसऱ्या जागी राहणारा ग्रामबंधु आला अन,

"सायच्या हो आमाले बी देसान रे थे औषधी खटमल मार्याची" असे आर्जव केले, तेव्हा त्याला ते औषध देण्यात आले, नेहमीप्रमाणे रॉयल स्टैग च्या क्वार्टर मधेच! (बाटली म्हणुन तीच हाती लागे गुलाम) ती बाटली तो घरी घेऊन गेला व इलाज केला तर तो हिट झाला, मग त्याने ती विषारी बाटली रितसर एका कोपर्यात ठेवली, एक दिवस त्याच्या रूम मेट चा एक "ऑनसाईट" वरुन परत आलेला मित्र एका प्रसिद्ध परदेशी मद्द्याची पार्टी करायची म्हणुन रूम वर आला होता तेव्हा आमचा ग्रामबंधु गैरहजर होता म्हणुन त्याच्या ह्या रूममेट ने त्याला "परदेशी वारुणी" ची चव असावी म्हणुन टाइट अवस्थेत नेमकी तीच बाटली उचलली बेसिन मधे विसळली अन त्यात भरून ते परदेशी मद्य ठेवले, मित्र नाईट शिफ्टहुन परत येताच "ये रे फोकनीच्या, तुयासाठी तुयाल्या भावानं इम्पोर्टेड दारु ठेवल हाय" म्हणत त्याला तीच दारु जेवणासोबत पाजली, त्या नंतर १५ मिनिटांत ह्या गड्यास उलट्या चक्कर पोटात आग अन डोकेदुखी सुरु झाली, म्हणुन डॉक्टर ची धावपळ करता 'फ़ूड पॉइसोनिंग' झाल्याचे कळले, मित्र भर्ती झाला रितसर स्टमक क्लीनिंग वगैरे झाले तेव्हा त्याने त्या रूममेट ला विचारले
"विज्या सायच्या तू मनापासनं नाई पाजली वाटते दारु" असा आहेर देताच त्या रूममेट ने जोश जोश मधे ती बाटली दाखवली अन

"सायच्या आपण भावाले इसरत नाइ बे म्हणून त ह्या शिशीत दारु ठेवलती" असे म्हणाला

त्या नंतर रूम मधे शिव्यांचा शिमगा साजरा झाला होता हे अधिक सांगणे नलगे

प्रत्येक प्राण्याला आत्मा असतो असे प पू महाराजान्नी सान्गितले आहे>>>
ढेकणाची हत्या करणार्‍याला कुठली पापे लागतात? पुढचा जन्म कशाचा मिळतो? अहिंसावादी लोकांचे यावर काय मत आहे?
ढेकुण हे कुठल्या देवताचे वाहन आहे का?

डेंजर किस्सा सोन्याबापू.. थोडक्यातच निभावलं म्हणायचं.

वेळ आली होती पण काळ नव्हता आला म्हणावे लागेल कुल्स जी, वाचलो त्याच्या प्रीत्यर्थ तिसऱ्या दिवशी परत खंबा फोडला आम्ही Lol , आज त्या किश्श्या वर (त्या पेशेंट सहित) सगळी पोरे हसतात

होस्टेल म्हणजे ओल्ड मंकची किंवा तत्सम दारूची बाटली रूटीन वापरात असण्याचे दिवस.
प्रत्येक रूममधे पिण्याचे पाणीच अशा रिकाम्या खंब्यात भरलेलं असायचं. घरून पाहुणे येणार्‍या मेंब्रांनाही याच बाटलीतले पाणी ऑफर केले जाई, व त्यांनाही नवल वाटत नसे.

सोन्याबापू, खरंच डेंजर किस्सा!! Sad
ढेकुण हे कुठल्या देवताचे वाहन आहे का?>> असेल असेल, यमराजाच्या असिस्टंटचे नक्कीच.
पण खरंच ढेकणाना पुण्याचंच हवामान मानवतं बहुतेक. पुण्यात हॉस्टेलला आल्यावरच पहिल्यांदा ढेकुण पाहिले मी.. कोकणात बहुतेक घाम येउनच मरतात बिचारे Lol

आमच्या गावात ढेकणे नाहीत अजिबात कारण विचारता कळले की वैदर्भीय उन्हात ती तगत नाहीत (मायला घराच्या आत सुद्धा सीजन मधे ४०℃ ते ४१ ℃ तापमान, माणसे मरायची ते ढेकणे कुठली तगायला) त्यामुळे पुण्यात जाइस्तोवर आम्ही ह्या प्रकारा बद्दल अनभिज्ञ होतो >> +१ सोन्याबापु, इथ आल्यावर ते उन्ह परवडल पण हे नको अस वाट्टे..असतातहि एवढे गुळगुळीत की काय चावलय म्हणुन बघाव तर अर्धमेल्या तळहाताच्या पेशींना जाणवत पण नै Angry

आजुन एक किस्सा,आम्हि जुन्या घरी राहात होतो, एका रात्रि माझ्या कानातुन गद्गद आवज येत होता. कानातुन आमचे परम मित्र रक्त पिउन ,बाहेर आले होते.

टिक-२० उर्फ टिक ट्वेन्टी नावाचे एक जालीम ढेकणाचे 'औषध ' असे. हल्ली ते दिसत नाही. त्याचा वापर नन्तर मानवप्राण्यानी स्वतःचे आयुष्य संपवण्यासाठी करायला सुरुवात केल्याने कंपनीने त्याची विषमात्रा सौम्य केली त्यामुळे त्याची भेदकता कमी झाल्याने त्याची लोकप्रियता घ\टली ंउमुळात ढेकूनच निसर्गात कमी झाल्याने त्याची फार गरजही राहिली नसावी....

Pages