ढेकूण होस्टेल अन पुणे.

Submitted by दीड मायबोलीकर on 3 August, 2015 - 15:01

सोमन | 3 August, 2015 - 20:34

hostel chya room madhe dhekhna jhali ahet
barch upay karun thaklo
kahi jhalim upay ahe ka

<<

हे या लेखाचे स्फूर्तीस्थान. (इथला प्रतिसाद)

तिथे प्रतिसाद लिहायला सुरुवात केली :
>>
अगगं!

सोमन, पुण्यात आहात काय?
<<

मग प्रोफाइल चेक केलं, अन येस्स! पुणेच.

अन मग ढेकूणपुराण साक्षात समोर उभे ठाकले!

पुणे अन ढेकूण हे फाऽर जुने नाते आहे.

"विस्मृतीत गेलेल्या वस्तू" असं एक सदर सकाळ किंवा लोकसत्तेत वाचल्याचं आठवतंय. त्यात पाटा-वरवंटा, उखळ-मुसळ इ. सोबत, एक "ढेकण्या" नावाची पेशवाईकालीन वस्तू होती.

ढेकणी म्हणजे अनेक छोटी, आरपार नसलेली भोके पाडलेली लाकडी पट्टी. या ढेकण्या रात्री अंथरुणाच्या आजूबाजूला ठेवत असत. व सकाळी उन्हं वर आल्यावर, तापल्या जमीनीवर ढेकण्या आपटून त्यात लपलेले ढेकूण बाहेर काढून मारत असत.

समहाऊ, ढेकूण चिरडून मारायचा नाही अशी (अंध)श्रद्धा होती. मारला, तर एकतर घाण वास येतो. अन दुसरं, त्याच्या रक्तातून अनेक ढेकूण येतात अशी ती अंश्र. म्हणून मग ढेकूण दिसला, की चिमटीत पकडून जवळच्या अमृतांजनाच्या बाटलीत भरलेल्या रॉकेलमधे टाकून द्यायचा. अश्या बाटल्या पूर्वी घरोघरी असत. अन दुसरा तो 'फ्लिट'चा पंप. त्यात भरायच्या बेगॉनपेक्षा अनेकदा रॉकेलच भरले जाई.

ताई पुण्याला युनिवर्सिटीत शिकायला होती. ती घरी आली की आधी तिचे सगळे कपडे गरम पाण्यात टाकले जात, अन बॅगेचे डीटेल इन्स्पेक्शन होई. ढेकणांसाठी. पुढे मी पुण्यात शिकायला गेलो, तेव्हा तोच प्रोटोकॉल फॉलॉ झाला.

तात्पर्यः टाईम्स चेंज, पुणे डझण्ट Wink

तर पुणे अन ढेकूण, एकूणात जुनं नातं.

आमच्या ससूनच्या होस्टेलला, अन 'सासनात' प्र च ण्ड ढेकूण. तेव्हा ऑबव्हिय्सली ढेकूण काँबॅट टेक्नॉलॉजी फारच अ‍ॅडव्हान्स्ड स्टेजेसला पोहोचली होती.

ढेकूण आमच्या दिनचर्येस एकाद्या सिनेमाच्या बॅकग्राउंड म्युझिकप्रमाणे व्यापून असत.

कॉलेजात खुर्चीत/बाकावर बसलो, की मधल्या फटीतून येऊन चावत. बुडाला खाज येणे, म्हणजे ढेकूण चावणे हे सिंपल इक्वेशन होते. त्या बाकांच्या फटींत कागद, चिकटपट्ट्या भरणे हा एक इलाज.

पीजी करताना ओपीडीत जाताच आपल्या खुर्चीच्या भेगांवर स्पिरिट ओतणे, हा इलाज आम्ही करत असू. स्पिरिट = अल्कोहोल Wink यामुळे, तिथले ढेकूण चिंग होऊन बाहेर येत अन लाश होऊन पडत. मग त्यांना गोळा करून कागदात बांधून 'मामा'जवळ देणे. (वॉर्डबॉय = मामा) हे पहिले आन्हिक असे.

पेशंट बसणार त्या स्टुलावर मात्र अजिब्बात स्पिर्ट ओतायचे नाही असा शोध लवकरच लागत असे, ज्यामुळे शिकाऊ डॉक्टरचे अनुभवी डॉक्टरात रूपांतर होत असे. कारण पेशंट कंफर्टेबली बसला, की २ आड एक अजोबा निवांत ३ पिढ्यांचा इतिहास सांगत डोके खाणार हे नक्की असे. तेव्हा ढेकूण हा प्राणी रॅपिड पेशंट टर्नोव्हरसाठी महत्वाचा मदतनीस होत असे.

त्या काळी ढेकणांचा दिनचर्येवरचा प्रभाव इतका जास्त होता, की आजकाल वर-खाली डुबक्या मारणार्‍या अवल यांच्या मसूरीच्या उसळीच्या धाग्यावर ज्याची रेस्पी मी दिलिये, त्याप्रमाणे डब्यातही 'आज ढेकणाची उसळ आहे' अशी बातमी आम्ही एकमेकांना देत असू.

तर, होस्टेलचे ढेकूण.

यांचा शोध होस्टेलवासी झाल्यानंतर ४-५ महिन्यांनी लागतो. घरी यांची अजिबात सवय नसते. सकाळी उठून कडेकडेने अंग खाजणे. थोडे पुरळ आल्यासारखे वाटणे इ. बाबी होतात. डास चावला असे वाटून आपण गप बसतो.

अचानक एक दिवस एकादा मुरमुर्‍याएवढा रक्तभरला टम्म फुगलेला ढेकूण दिसतो अन मग कळतं की आजकाल असं विक विक का वाटतंय? आमचा एक मित्र चक्क अ‍ॅनिमिक झाला होता ढेकून चावल्याने. मग हळूहळू ढेकणांबद्दलचा अभ्यास वाढत जातो.

खोलीत ढेकूण असल्याचे पहिले चिन्ह म्हणजे, भिंतींतल्या भेगांच्या बाजूला दिसणारे बारीक काळे ठिपके. ही ढेकणांची शी असते, अन ढेकूण असल्याचे पहिले लक्षण. तेव्हा या भेगा बुजवणे, हा पहिला इलाज. आम्ही प्लास्टरॉफ पॅरिस ऑर्थो वॉर्डातून आणत असु. तुम्हाला रंगवाल्याच्या दुकानात मिळेल. थोडे थोडे पाण्यात कालवा, अन आधी त्या भेगा बुजवा. भिंत कशी दिसते त्याची काळजी नंतर करा. आम्ही भिंतभरून रेखाच्या फोटोंचं कोलाज केलं होतं त्यावर Wink (त्या कागदांखालीही यथावकाश ढेकूण झाले अन मग त्या भिंतीलाच एक दिवस काडी लावली ती वेगळी स्टोरी)

लोखंडी पट्ट्यांचे पलंग हे यांचे माहेरघर.

कॉर्नर्सना काळ्या ठिपक्यांसोबत छोटुकली पांढरी अंडी अन ढेकणांची पारदर्शक छोटी पिल्लं अन काही मोठे पिकलेले तपकिरी-काळे ढेकूणही तिथे दिसतील. आजकाल एमसील आहे, त्या गॅप्स बुजवता येतील. आम्ही मेणबत्तीचे मेण त्यावर टपकवत असू. नॉट सो स्ट्राँग इलाज.

आमच्या काळी, आम्ही त्यावर उकळते पाणी टाकणे, पलंग गच्चीवर उन्हात घालणे असे इलाज करीत असू.

मालधक्क्याजवळ चोरबाजार भरतो, तिथून एक 'स्टो रिपेर'वाल्यांचा ब्लोटॉर्च सारखा स्टो आणला होता काही मित्रांनी. त्याच्याने लोखंड लाल होईपर्यंत तापवणे असा एक इलाज होता. एका रुममधल्या बहाद्दरांनी पलंगाच्या दोन पायांना दोन वायर्स लावून त्या सॉकेटमधे घालून पलंगला शॉक देण्याचा इलाजही केला होता. ढम्म! सा आवाज होऊन ब्लॉकचे लाईट गेलेले, पण ढेकूण टपटप खाली पडले होते म्हणे.

नव्या रुम मधे शिफ्ट होण्याआधी ती रुम धुवून, बेगॉन स्प्रे करून, भेगा बुजवून वगैरे कितीही केले, तरी नवे ढेकूण एप्रनच्या खिशात बसून येतच असत. अन मग दिसला ढेकूण की त्याला टाचणीवर सुळी दे. पाठीला फेविकॉलचा थेंब लावून भिंतीला चिकटव. सिगारेट लायटरची ज्योत मॅक्सिममवर करून त्याला भाजून त्याचा मुरमुरा कर, अक्षरश: मुरमुर्‍याएवढे मोठे होतात अन फट्कन फुटतात Wink किंवा हीलेक्स सीलण्ट स्प्रे मारून आहे त्या जागी चिकटवून टाकणे, फार संताप असेल तर भिंगाखाली घेऊन ब्लेडने फक्त माऊथपार्ट कापून टाकणे असेही अनेकानेक इलाज केले जात.

शेवटचा अल्टिमेट नाईटमेअरिश इलाज सांगून मी थांबणारे. बाकी लोकांनाही इलाज सुचवू देत Wink

तर आमच्या एका मित्राने पीजी होस्टेलला नवी सिंगलसीटर रूम मिळवली. तिथले ढेकूण मारण्यासाठी ओटीतून एक ईथरची बाटली, अन मामांना सोबत घेऊन रुमात पोहोचले. पलंगाचे कोपरे, टेबल खुर्चीच्या फटी, भिंतीतल्या भेगा इथे इथर ओतून ढेकूण बाहेर आले. बाटली अशी बाजूला ठेवलेली. अन मामासाहेबांनी खिशातून आगपेटी काढून बिन्धास्त पलंगाला काडि लावली!

इथर कसे पेटते, हे इथे कुणी पाहिले आहे ते ठाऊक नाही, पण एक भक्क्क! आवाज. प्रचण्ड मोठा फ्लॅश ऑफ लाईट, पलिकडच्या खिडकीत चढून ओरडणारा मामा. दाराबाहेर ओरडणारा मित्र. धावून येणारं पब्लिक.

तेवढ्यात तिकडून आलेल्या अ‍ॅनास्थेशिआच्या चीफ रजिस्ट्रारने इथरच्या बाटलीचा स्फोट होईल म्हणून मच्छरदाणीचा गज वापरून ती बाटली फोडली!

पुढचे पुराण बरेच झाले. कुणालाच शारिरीक इजा झाली नाही या बेसिसवर त्या प्रकरणावर पडदा पडला. टेबल खुर्ची अन भिंतींवर त्या अग्नीकांडाच्या खुणा मात्र वर्षानुवर्षे होत्या....

सो लोक्स,
ढेकणांचे तुमचे अनुभव कोणते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट आहे. Lol

अलिकडे स्टँडावर शिमिटाची बाके आली, घरे शिमीटाच्या गिलाव्याची झाली, फरणिचरें लाकडाऐवजी फाय बर प्लास्टिक्ची झाली त्यामुळे त्यांच्या लपायच्या सगळ्या 'डेन्स'नष्ट झाल्या. त्यामुळे ही मंडली गेल्या कित्येक वर्षात दिसत नाहीत. आमच्या पोरानी तर अजून ढेकूण पाहिलेलेच नाहीत !!>> अगदी अगदी!!

Lol सॉलिड लिहिलंय.. शेवटचा ईथर उपाय तर खत्तरनाक आहे.

माझ्या सुदैवाने की दुर्दैवाने मी अजून ढेकूण प्रत्यक्ष पाहिलाच नाहीये.

माझ्या सुदैवाने की दुर्दैवाने मी अजून ढेकूण प्रत्यक्ष पाहिलाच नाहीये.>>
अरेरे!! हाय कंबखत ..... Proud

ढेकणांनी उच्छाद मांडला की काही वेळा काही घर व काही व्यक्ती (ढेकुणप्रसारक) वाळीतही टाकले जायचे. Happy

अरारा... Lol
झकास लेख. बरीच ज्ञानप्राप्ती झाली.
ढेकुण मी पण बहुतेक एकदाच कधीतरी अणभवले आयुष्यात Proud

काही वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या बहिणीच्या घरी ढेकणांची वार्ता होती. तिकडच्या विद्यापीठाच्या हॉस्टेलात. उगाच पुण्याचे नाव आपले. Proud

रॉबिनहुड सर, अत्यंत भारी प्रतिक्रिया आहे तुमची अगदी ह ह पु वा झाली,

ढेकुण कंपनी बद्दल अंधश्रद्धा ऐकण्यात आली होती एक ती म्हणजे घरात मृत्यु झाला कोणाचा तर ते शव दहनाला नेईपर्यंत घरात ढेकणे थांबत नाहीई, तर एका रांगेत घराबाहेर जाताना दिसतात

अंबाजोगाईला असताना तिथल्या एकमेव थेटरात पिक्चर बघून आलो की आई आधी सगळ्यांचे कपडे चेक करायची ढेकणांसाठी. आमच्या आईसाहेबांना घरात एक ढेकूण जरी आला तरी आख्खी रात्र झोप येत नसे. त्यामूळे मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या क्वार्टर्सवर राहूनसुद्धा आम्चं घर ती नेहेमी ढेकूणमुक्त ठेवायची. Happy
आम्ही दोघं हॉस्टेलला गेल्यावर तिला पहिली चिंता ढेकणांचीच होती. पण तिच्या नशिबानी आम्हा दोघांना बिना ढेकनांची हॉस्टेल्स मिळाली. Happy

लेख मात्र भन्नाट. सगळेच उपाय Biggrin

बालपणी ही ढेकणांनी बुजबुजलेली पट्टी पाहिल्याचं चांगलं स्मरणात आहे!
साती.....अगं कस्सली शॉल्लेट्ट कविता लिहिलीस.हीही आमच्या बालपणीचीच बरं!
पुढे ....मी गेलो अंगणात............................................................................................................................
...................................................................................................................................................... असो...हे यमक ज्याने त्याने आपल्या जबाबदारीवर पूर्ण करणे!
हे पूर्ण करून ख्याख्या हसत असू(अर्थातच आमच्या बालपणी! )
गेले ते दिन गेले..............बालपणीचा काळ सुखाचा..............बालपण देगा देवा...........इ.इ.
मस्त लिहिलंय..........तरी
त्याप्रमाणे डब्यातही 'आज ढेकणाची उसळ आहे' अशी बातमी आम्ही एकमेकांना देत असू.>>>>ईईईईईईSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS

ढेकणांबद्दल ऐकलेली आणखी एक अंश्र म्हणजे ढेकणं असतात तिथे मृत्यूचा वास असतो. (अनारोग्य तर असणारच ना)
रॉबिनहूड, येस! पुण्यातले वाडे म्हणजे ढेकणांचे माहेरघर. अनंत वळचणी आणि अजस्त्र अडगळी. मध्यरात्री ढणढणे दिवे लावून ढेकूण शोधणे यापेक्षा दुसरे गेल्या जन्मीचे भोग नसतील. ढेकणांनी आमच्या बालपणावर असा काही प्रभाव टाकला होता की वनस्पती जिवंत असतात हे कळल्यावर पहिला प्रयोग आम्ही 'ढेकूण यांना चावतात का?' हा केला होता. ढेकणांनी आमच्याप्रमाणेच माती खाल्ली. शाळेत एका पिठ्ठ गोर्या मुलीचे आडनाव ढेकणे असल्याने फार वाईट वाटायचं.
तर रसिक श्रोतेहो, तुमच्या आयुष्यातल्या अशाच काही अविस्मरणीय ढेकूणस्मृती जागवत राहा. आपण ऐकत आहात लक्ष्मणरेखा प्रस्तुत फोन इन कार्यक्रम "तंदूरी नाईट". आज किशोरकुमार यांच्या जन्मदिनी त्यांनीच गायलेलं एक गाणं आपण आपल्या छोट्या ढेकूणमित्रांसाठी ऐकूया.. शब्द आहेत "धीरे से जाना खटियन मे खटमल.."

ढेकणासाठी फ्युमिगेशन पेस्ट कंट्रोल मेथड हा सर्वात नामी उपाय आहे. फक्त २-३ दिवस घर / रुम सीलबंद करुन ठेवावी लागते.

एकदा आमच्या घर मालकाला ढेकुण प्रॉब्लम सांगितल्यावर एक लीगल प्रॉब्लम झाला होता , तो म्हणजे हे ढेकुण निर्दालन युद्ध घोषित करावे कोणी, गनीम काही बधत नव्हता अन आम्हाला बापाच्या तुटपुंज्या पेंशन मधुन येणाऱ्या फंडात पेस्ट कंट्रोल केले असते तर महिनाभर मेस लावायची पंचायत झाली असती, मग आम्ही एक स्पेशल ऑपरेशन केले ,त्यानुसार आम्ही एका रिकाम्या रॉयल स्टैग च्या क्वार्टर मधे पाऊण बाटली जिवंत ढेकुण पकडले (पोरांचे ह्या युद्धकार्यातले एफर्ट वादातीत) व एकदिवस नंतर आम्ही हा भरलेला महास्फोटक "ढेकुण ग्रेनेड" मालकांच्या मेनगेट वर फोडला होता तेव्हा दुसऱ्या दिवशी वर्सेल्स च्या तहा प्रमाणे वाटाघाटी होऊन शेवटी एकदाचे युद्ध संपले.

दीड मायबोलीकर,.तुमच्या 'मित्रांची समाजसेवा' कळली Lol बच्चनवर नाव घेऊ नका, पाठीला कितीही ढेकणं चावत असली तरी हसतच असेल ती सदैव तुमच्याकडे पाहून. तरी तुमचे समाधान झाले नाही. खरंतर आता कर्णानंतर रेखाच! Proud

वर्किंग वूमेन्स हॉस्टेलमध्ये आम्ही सर्व मैत्रीणी मिळून टाईम्स आणून (ते काम माझे. मला फुकट मिळायचा) त्याच्या पुंगळ्या करून कॉटला जाळायच्या, बेडशीटं नेऊन गरम पाण्यात बुडवाय्ची. रॉकेलचे स्प्रे आणून मारायचे वगैरे कामं सुट्टद्च्या दिवशी करायचो. हॉस्टेलजवळच्या कूठल्याही मेडीकलमध्ये आम्हाला खटनिल मिळायचे नाही (काही पूर्वानुभव होते त्यांच्याकडॅ) त्यामुळे रेक्टर मॅडम किंवा वॉचमन कडून खटनिल आणून त्याची फवारणी करायची.

मुंबईत क्रॉफर्डमार्केटजवळ कुठेतरी जल्लाद नावाचे जालीम aushadh मिळते. फार स्ट्राँग असते. ते पाण्यात मिक्स करुन फवारले कि जातात ढेकूण.

aushadh हा शब्द मराठीत कसा लिहायचा ? Uhoh

भन्नाट लेख आणि प्रतिक्रिया!

आशुडी यांनी म्हणल्या प्रमाणे--जीथे ढेकुण तीथे काही वाईटाचा वास हे डोक्यात पक्क बसलय.
(काही पुर्वानुभव कारणीभुत.. अर्थात योगायोगच असणार)
तर असेच एका अगदी जवळच्या नातेवाईकांच्या घरी हे ढेकुण. त्यांच्या घरी जावुन आलो की नुसत संशयकल्लोळ. पर्स, बॅग, पिशव्या, डबे, सगळ्यांचे घातलेले कपडे..संशयीत.
अश्याच पद्धतीने काही ढेकुण घरी आले आणि वसले. बेड च्या वरती..लाईट ची पट्टी असते तीथे काळे डाग दिसायला लागले. नेमके हे लक्ष गेले ते रात्री. घरात ढेकुण आणि डोक्यात भुंगा. वैताग नुसता.
जवळच आवडत नाही म्हणुन राहीलेला अXE नावाचा घाण वासाचा डिओ होता. अतीशय रागाने तो अXE त्या काळ्या डागा वरती, ईलेक्ट्रिकपट्टि (वायर असते ति) मारला. तर काय त्यातुन बरेच ढेकुण बाहेर आले आणि चक्क मेले. जीव थोडा शांत झाला (माझा). मग पुढच्याच रविवारी-बेडरुम भर अXE फ़वारले. चांगले विकत आणुन आणुन फ़वारले. खरच ढेकुण गेले.
'त्या' नातेवाईकांना पण सुचवले. त्यांचे कमी झाले. (नंतरची पिलावळ मुटंट झाली असेल.)

तसाच. फक्त एस मोठा. auShadh औषध.
*
बाप्पू अन हुडोबा, लै भारी
*
भारी रिस्पॉन्सेस येताहेत !

लाकडी वासे, लाकडी खांब, लाकडी जिने अन तेही पुराणकाळातील असल्यामुळे ढेकुण हे घरात असतातच हीच धारणा होती लहानपणी. शेजार पाजार पण तसाच त्यामुळे त्यावर उपाय करणे एवढेच करायचो. रॉकेलनि भरलेली दौत असायचीच. ढेकणानी भरली कि त्यानंतरच रिकामी केली जायची. (याक्क ! हे आत्ता लिहिताना वाटतंय पण त्यावेळी काहीहि वाटत नसे. एकदम निर्लेप मनानी हे काम करत असू )
गाद्याना उन दाखवणे हा हि एक रंजक कार्यक्रम असे .
नंतर उपनगरात राहायला गेल्यावर हे सर्व आपोआपच संपल.
आता तर काय पेस्ट कंट्रोल वाल्यांनीच ताबा घेतलाय त्यामुळे AMC घेतली कि झाल

एकदम मजेशीर लिहिलंय. आमच्याकडे गिरगावात काही वर्षं ढेकणांचा त्रास होता. भिंतीचा कुठे गिलावा पडला असेल किंवा रंगाचे पोपडे पडले असतील तर तिथे निर्माण झालेल्या खडबडीत जागेतही ते आनंदाने राहात आणि रात्री आम्हाला छळत. पण एकदा बायरचे खास ढेकणांसाठी औषध आले होते. ते जरासे लावल्याबरोबर ते मरत. ते औषध लावायचे काम मी आवडीने स्वतःवर घेतले होते :डोमा:. एक दिवस कॉटचे कोपरे/पट्ट्या, गाद्या/उशा, लाकडी पाटाच्या पट्ट्या, भिंती वगैरे ढेकणांच्या अबोडात त्यांच्या बोडक्याला ते औषध लावले. आणि त्यानंतर ढेकूण गायब. आम्हाला कित्येक वर्षांनी सुखाची झोप लागू लागली.

तेव्हाच्या अनुभवावरुन ढेकणांचे दोन प्रकार असतात असे दिसले. एक गोलाकार आणि एक लांबोळके. उपाशी असतील तर ते चपटे असतात. सकाळला तट्ट फुगलेले असतात. रात्री तुम्ही दिवे मालवून झोपलात की त्यांचे उजाडते. मग एक एक करुन ते उशीच्या आपल्या मानेजवळच्या भागाशी जमतात व चावतात :राग:. उठून दिवा लावेपर्यंत पळूनही जातात. गाद्यांचे कोपरे, गादीच्या टाक्यांपाशी तयार झालेले खड्डे..ह्या ठिकाणीही ते असतात.

आज सगळा राग निघतोय माझा Lol

ढेकूण प्रसाराचा मोठ्ठा एक्स्चेन्ज म्हनजे त्याकाळी असलेली येष्टीची स्टँडवरची बाके. ती लाकडी बाके लाकडी पट्ट्यांची असत. त्यात हजारो ढेकूण असत. बाकावर बसलेल्या 'पाशिंजरांच्या' धोतरात लुगड्यात पैजाम्यात . शेकडो ढेकूण घुसत आणि वेगवेगळ्या गावाना प्रवासाला जात. आर्य जसे कुठून धृवावरून आले आणि भरतखंडात पसरले तसे>>>>:हहगलो: रॉहुन्चा प्रतीसाद भयानक आहे.:फिदी:

अंबाजोगाईला असताना तिथल्या एकमेव थेटरात पिक्चर बघून आलो

>>
अल्पना, हो हो हे आणखी एक संस्कृती प्रसारक केंद्र विसरलो. नगरला आशा नावाचे थिअ‍ॅटर होते / आहे. ते या बाबतीत फारच कुप्रसिद्ध असे. त्यात लाकडी खुर्च्या असत. तेथून चित्रपट पाहून आलेला माणूस 'भारित 'होऊनच येत असे. नगरात तेव्हा ५ थिअ‍ॅटर होती . पण हे अशा लैच भयंकर. कितीही चांगला चित्रपट असो जायची हिम्मतच व्हायची नाही. पुढे त्यात लोखंडी खुर्च्या आल्याने हा त्रास वाचला. स्टॅण्ड , थिएटर इथल्या ढेकणांची स्थिती 'यथा काष्ठं च ... 'अशी होत असे. न जाने कल कहां होंगे अशी बिचार्‍यांची स्थिती.
नाशिकला ढेकणे शास्त्री नावाचे एक प्रकांड विद्वान आहेत. आडनावावरून तरी माझे त्यांच्याबद्दल बरे मत नाही झाले ::फिदी:

बहुधा बालपणाचा पूर्वग्रह कारणीभूत....

एका काकूंकडे वेताचा सोफा होता. त्यात ही... ढेकणं. वेताच्या फर्निचर चा आम्ही धसका घेतलेला.. नंतर एकदा प्रभात ला '७ च्या आत घरात' बघायला गेलेलो. जीव खाल्ला ढेकणांनी पिक्चर संपेपर्यंत.

ढेकणाची एक पारदर्शक जात आहे. बहुधा 'बालढेकूण ' असावेत. ते फुगल्यानंतर टच्कन फोडायला मजा यायची. ( यायची म्हणजे काय यायचीच, उगीच्ग ईईईईईईई वगैरे काही करू नका )

ट्युलिप +१. आम्ही एक डाव धोबीपछाड पाहत होतो की खेळत होतो तेच कळत नव्हतं. आत्ता प्रभात बंद होणार असं कळल्यावर सर्व ढेकूणमित्लांना दोन मिनीट श्रध्दांजली वाहिली.

Pages