चतु:शृंगीच्या माळावरची झोपडी - डॉ. अनुराधा सोवनी

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

परवा सहज गप्पा मारता मारता मी म्हटलं, ‘‘काय गंमत आहे पाहा! फर्ग्युसनच्या घरातून मी बाहेर पडले त्याला पंचवीस वर्षं होऊन गेली. मी कधी परत त्या घरात गेलेले नाही. जगभर कुठे कुठे माझी ‘घरं’ होती. तरीही अजून स्वप्नात ‘माझं घर’ म्हणून तेच येतं!’’ त्यावर चटकन बाबा म्हणाले, ‘‘हो, माझ्याही स्वप्नात तेच ‘माझं घर’ म्हणून दिसतं!’’

मला नवल वाटलं. मी परदेशी गेले त्यापाठोपाठ बाबा निवृत्त झाले. फर्ग्युसन कॉलेजमधला ‘बंगला क्र. १’ हा ‘स्टाफ क्वार्टर्स’चा भाग असल्यामुळे तिथून कुटुंब हललं, स्वतःच्या वास्तूत राहायला गेलं. त्यानंतर कारणपरत्वे दोन-चार घरं बदलत तेही आता स्वतःच्या बंगल्यात परत राहायला आलेले आहेत. तरी असं का?

बाबा म्हणाले, ‘‘तिथलं आपलं सर्वांचं आयुष्य हा आपला सर्वांत सुखाचा काळ होता.’’ हे ऐकून मी विचारात पडले. रोजचं गच्च आयुष्य पार पाडता पाडता दिवस कसा उगवतो, कधी मावळतो, समजत नाही. रोज काहीतरी नवं, ‘इंटरेस्टिंग’ घडलेलं असतं, किंवा ‘उद्या’ खुणावत असतो. त्यामुळे ‘स्मरणरंजना’ची गरज भासलेली नाही. जुन्या स्मृती असतात, काही स्पष्ट, काही धूसर, काही पारच पुसल्या गेलेल्या.

हे बाबांचं वय बोलतंय का? त्यांची व्यावसायिक कारकीर्द त्याच घरात घडली. मुलं मोठी झाली, शिकली, मार्गाला लागली, घरात नवी माणसं आली. घरच्या नि बाहेरच्या जबाबदार्‍यांचे ताण त्यांना पेलावे लागले असणारच. तरीही मागे वळून बघताना त्यांना चांगलंच आठवत असेल का?

पण त्या घराविषयी आठवणी खरंच सुखाच्या आहेत. निरभ्र, मोकळ्या, निवांत. झाडांच्या, फुलांच्या, पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या, निसर्गाच्या सान्निध्याच्या. ती गुपितं उलगडल्याच्या आनंदाच्या.

ते घर आमच्या वाट्याला येणं हा एक भाग्ययोग होता. भोवती प्रशस्त जागा. त्यात सर्व प्रकारची फळझाडं - तीन प्रकारचे आंबे, पेरू, फणस, सीताफळ, रामफळ, जांभूळ, बोरं, रायआवळे, चिक्कू, तुती; इतरही मोठमोठी झाडं - शेवगा, उंबर, कडुनिंब, क्षीरचाफा, चंदन, सागरगोटा, बारतोंडी, अजस्र महोगनी; त्यात नंतर आईबाबांनी लावलेली उपयुक्त झाडं - तोंडली, घोसाळी, पॅशनफ्रूटचे वेल. अळूची, कर्दळीची खाच. भेंडी, वांगी, टोमॅटो, कोथिंबीर, गवार अशा भाज्या. जाई, मोगरा, कुंद, फुटाणी, जास्वंदी (पाच प्रकारच्या), क्रोटन, रीप, हिरवा चाफा, बॉल लिली, प्राजक्त, कॉसमॉस अशी शोभेची झाडं. इतकं करूनही आम्हांला प्रचंड अंगणं शिल्लक होती. खेळायला, पळायला, लपायला, सायकल शिकायला.

या सर्व जागेत मध्ये कौलारू घर. उतरत्या लाल कौलांचं. चार मोठ्या खोल्या, दोन लहान खोल्या, दोन भलेमोठ्ठे हॉल, दोन व्हरांडे. घरात माणसं चार. त्यामुळे मी आणि माझा भाऊ मोठे व्हायला लागलो तशा आम्हांला आपापल्या खोल्या मिळाल्या. एक खोली ‘कोंबड्यांची खोली’, एक ‘कपडे वाळत घालायची.’ तिथे उंच उंच बांबूंवर आईच्या स्टार्च केलेल्या साड्या एकेरी टाकून वाळत घालायची सोय होती. आंब्याच्या दिवसांत त्याच खोलीत आंब्याची आढी घातली जायची.

घराच्या आवारात मागे तीन छोटी घरं. तिथे कॉलेजमधले शिपाई राहत. त्यांच्या बायका घरात कामाला येत. डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही ध्येयवादी संस्था. तिचे ‘लाईफ मेंबर्स’ कमी पगारावर काम करणारे. त्यांना ही जीवनशैली त्या पगारावर अशक्यच होती, पण परिस्थितीमुळे आईला मोलकरणीचं सुख भरपूर मिळालं. एक झाडतीये, एक निवडतीये, एक चिरतीये, एक पोळ्या करतीये! शिवाय रात्रीबेरात्री पाहुणे जेवायला आले की, मागच्या व्हरांड्यातला दिवा लागायचा. ही खूण ओळखून लगेच कुणीतरी मदतीला येई.

त्या घरात आम्ही प्रथम गेलो तो दिवस मला तुटक का होईना, नीट आठवतो. त्याआधीचं घर ‘फर्ग्युसन’च्या तिसर्‍या गेटाच्या एका टोकाला होतं. फारशी वस्ती नाही असं एका कडेला होतं. वडारवाडी, पांडवलेणी यावरून येणारा वारा तिथे धो धो वाहायचा. कॅलेंडरं फडफडत उडत घराबाहेर जायची. सतरंज्याही उडून जायच्या, त्यामुळे (आणि आम्ही पायात घुटमळू नये म्हणून) आई मला नि भावाला त्या सतरंज्यांवर पेपरवेटासारखं बसवून ठेवायची. एक लहान, ‘एल’ आकाराचा व्हरांडा होता, त्यात आमचा दिवाळीचा किल्ला असायचा. शेजारच्या घराशी एक भिंत सामाईक होती.

मी दुसरीत असताना सर्व सामानावर बसवून मला नव्या घरी नेलं गेलं. हे घर पहिल्या गेटमध्ये होतं. शेजारी लेडीज हॉस्टेल. समोर प्रिन्सिपॉलचा बंगला, शेजारी व्हाईस-प्रिन्सिपॉल, रेक्टर यांचे बंगले. एकूण पाच मोठे, सुटेसुटे बंगले. सगळी गंभीर, ज्येष्ठ माणसं. आमच्याशी खेळण्याजोग्या वयाची मुलं कुणी नाहीत. त्याचा एक महत्त्वाचा परिणाम असा झाला की, बाग हेच माझं मनोरंजनाचं साधन बनलं. झाडांवर चढणं, फळं-फुलं काढणं, रोज फेर्‍या मारून होणारे बदल टिपणं, हौदात खेळणं, झाडांना पाणी घालणं - यांत माझे अनेक तास मजेत जायला लागले.

स्वयंपाकघराशेजारी मातीचा एक लांब पट्टा होता. तिथे कॉसमॉसची फुलं यायची. दरवर्षी बिया पडून वाढत जायची. त्या पिवळ्या, सोनेरी फुलांच्या गर्दीत माझं डोकं बुडून जायचं, एवढी सणसणीत झुडपं होती. रामफळाचं एक झाड अगदी चढण्यासाठी बनवल्यासारखं होतं - आडव्या पायर्‍या असाव्यात तशा फांद्या चढत गेल्या होत्या. जमेल तेवढं वर चढून बसलं की, आपण पक्ष्यांच्या पातळीवर पोचायचो. शेजारच्या झाडांची सीताफळं खाणारे कोकीळ, पोपट, खारी व्यवस्थित दिसायचे. आई माझे कपडे घरीच शिवायची. त्यामुळे माझ्या फ्रॉकांना मला हवे तसे दोन मोठे खिसे असायचे. त्यात खाऊ भरून मी न्यायचे. खारीक, खोबरं, दाणे-गूळ, बिस्किटं - काहीच नाही तर पलीकडच्या झाडाखाली पिकून खाली पडणारे रायआवळे. शिवाय एखादं पुस्तक. मग पूर्ण दुपार झाडाच्या सावलीत उच्चासनावर मजेत जायची.

झाडांशी माझं बहुतांशी प्रेमाचं नातं होतं. अपवाद कारल्याच्या वेलाचा. त्याला सुंदर पिवळी फुलं यायची. वेल भरून जायचा. नखरेल कातीव पानं, स्प्रिंगसारखे गुंडाळलेले हिरवे तणावे, हा फुलांचा बहार-वेल फार छान दिसायचा; पण मला चिंता होती पुढे वाढणार्‍या कारल्यांची. आईला कारली आवडायची आणि उरलेल्या तिघांवर ‘पहिलं वाढलेलं खायचं’ ही सक्ती होती. हा बाका प्रसंग टाळण्यासाठी मी रोज जाऊन फुलं खुडून टाकायचे. धाकट्या भावालाही मी हेच करायला शिकवलं होतं. ‘अशी गळतात का फुलं? कसला तरी व्हायरस पडलेला दिसतो’, असं आई काळजीच्या सुरात म्हणायची, तेव्हा आम्हां दोघांना हसू दाबणं मुश्किल व्हायचं. सुदैवानं आम्ही कधी पकडले गेलो नाही, किंवा आमच्यावर संशयही आला नाही. कारण फणसाचं खरंच असं व्हायचं. भरपूर छोट्या छोट्या कोयर्‍या यायच्या. पुढे आपण सोनेरी, सुगंधी गरे खातो आहोत, असे मनाचे मांडे सुरू व्हायचे, पण एकही फणस मोठा व्हायचा नाही. फळं आधी तपकिरी, मग काळी पडायची, सुरकुतायची नि गळून पडायची. पुढे एक ‘झाडतज्ज्ञ’ आणला गेला, त्यानं मुळांना भुंगा लागल्याचं निदान केलं. मुळांना भोकं पाडून औषध भरलं, तेव्हा स्थिती सुधारली.

स्वयंपाकघरात वापरलं गेलेलं पाणी एका पन्हाळीतून अळूच्या नि कर्दळीच्या खाचेला जायचं. अळूविषयी मला फार प्रेम नव्हतं. पानांपेक्षा खालचे कंद - आळकुड्या - खायला जास्त मजा यायची. कर्दळीच्याही फुलांपेक्षा पानातच रस जास्त होता, कारण पानगी हा कोकणी पदार्थ आई फार छान करते. तांदळाच्या सुवासिक पिठीमध्ये दूध, लोणी, साखर घालून सरसरीत कालवायचं. कर्दळीच्या एका पानावर दाटसर लेप द्यायचा, त्यावर त्याच आकाराचं दुसरं पान ठेवायचं. हे ‘सँडविच’ दोन्ही बाजूंनी तव्यावर खरपूस भाजायचं. पानं काळी झाली की काढून टाकायची. आत त्याच आकाराची गुबगुबीत पांढरी गादी शिजून तयार असते. पानांच्या शिरांची सुंदर नक्षी त्यात उठलेली असते. गरम पानगी, त्यावर वितळणारं घरचं ताजं शुभ्र लोणी आणि आंब्याचं लोणचं हे ‘कॉम्बो’ माझ्या लेखी एक पक्वान्नच आहे. ते करण्यातला माझा सहभाग म्हणजे बरोबर सारख्या आकाराच्या पानांच्या जोड्या कापून आणणं, त्या धुऊन आणि पुसून देणं, त्या होताना टुकत बसणं नि लगेच त्यांचा चट्टामट्टा करणं!

बागेत फिरताना झाडावरची पाडाची फळं, वेलांवरची कोवळी तोंडली, झुडपांवरच्या भेंड्या, तुरीच्या शेंगातले दाणे असा माझा फराळ चालू असे. (त्या चवींना तोड नसते. बाजारात माल आपल्यापर्यंत पोचतो तोपर्यंत त्यातला जीव मरगळलेला असतो, खुमारी कितीतरी कमी झालेली असते.) कुणीतरी जांभळाच्या झाडावर चढून फांदी हलवायचं. मऊ जांभळं खाली जमिनीवर आपटून फुटू नयेत म्हणून आम्ही चादरी धरून ती झेलायचो. क्षणापूर्वी झाड सोडलेलं टपोरं जांभूळ आणि बाजारात मलूल होत गिर्‍हाइकांची वाट पाहणारं जांभूळ यांच्या चवीत काहीही साम्य नसतं!

सीताफळांवर इतक्या पशुपक्ष्यांचा डोळा असे की, जरा उशीर झाला, की त्यांनी खाऊन उरलेली उलटी छत्रीच फक्त दिसणार! म्हणून माझी रोज फेरी असे. जरा फळावरचे ‘डोळे’ उमलायला लागले नि पांढर्‍या रेघा दिसायला लागल्या, की ती तोडून घरात आणायची नि उबेला ठेवायची. मात्र एकदा माझी चांगलीच फजिती झाली. तांदळाच्या डब्यात मी दोन सीताफळं घालून ठेवलेली होती आणि ते साफ विसरले होते. यथाकाल भात करण्यासाठी डबा काढला गेला, तेव्हा त्याची स्थिती काय वर्णावी! तेव्हापासून मला फळं पिकवायला ती बुरणुसात गुंडाळून कोठीच्या खोलीत ठेवायचा दंडक पाळावा लागला.

मागे अंगणभर सावली देणारा एक अजस्र ‘गोटी’ आंबा होता. इडलिंबाएवढे गोल, हिरवे आंबे. ते कधी लाल-पिवळे होत नसत. कोयीला भरपूर रेषा. शिवाय एक धारदार कड. आंबरस काढताना हात कापायची गॅरंटी. खूप आंबे पिळले की थोडासासा रस मिळणार. तरीही या कष्टांचं फळ फार मधुर, कारण रस दाट, स्वादिष्ट, गर्द केशरी रंगाचा, गोड. त्यात रेषा उतरत नसत. शिवाय इतके आंबे यायचे की उन्हाळ्याचे सर्व महिने आंबरस-पुरी खाऊन, रोज येताजाता आंबे चोखूनही संपायचे नाहीत. मग आई रस आटवून वर्षभर टिकू शकणारा गोळा करायची. रस पुरेसा आटला, की प्लॅस्टिकच्या शीटवर मागच्या अंगणात वाळायला घातला जायचा. ही वार्ता लगोलग पसरायची नि कावळे, चिमण्या, साळुंक्या यांची एकच झुंबड उडायची. त्यांना हाकलायला मी किंवा भाऊ रखवालदार नेमले जायचो. हे कंटाळवाणं काम करण्याची मजुरी म्हणून आम्ही बसल्या बसल्या ते गोळे मटकावणं क्रमप्राप्तच होतं! भरपूर आच खाल्लेला रस उन्हं खाऊन आणखीच खमंग लागायचा. त्यामुळे ठेवरेवीची कटकट करायला फारसा ऐवज उरायचाच नाही.

माझे केस कायम लहान कापलेले; पण मला फुलांची फार हौस होती. रोज एखादं फूल किंवा गजरा डोक्यात असायचाच. शाळा नसेल तेव्हा माझ्या कपड्याला मॅचिंग फूल निवडलं जायचं, मग ती जास्वंद असो की टणटणी! एकदा तर कुठला गुलाब निवडावा हे ठरवता न आल्यानं मी गुलाबांचा गजरा घालून गेले होते.

आईनं मला गजर्‍याचे बरेच प्रकार शिकवले होते. विरळ, दाट, सुईत ओवून, पुडीचा दोरा पायाच्या अंगठ्याला बांधून फुलांभोवती दोरा गुंफत. यासाठी कळ्या लागायच्या, त्या नंतर डोक्यात फुलायच्या. जाईच्या मांडवात आत शिरलं, की बाहेरून न दिसणार्‍या खूप कळ्या मिळायच्या. हा मांडव मजेशीरच होता. वेल वाढून त्या भारानं पहिला तकलादू मांडव मोडला, तेव्हा नव्या मांडवासाठी पांगार्‍याचे चार मोठे सोट पुरले गेले नि त्यांना जोडून मांडव बनला. चारी खांबांना पुढे पानं फुटली नि वसंतऋतूत वर तेजस्वी लाल फुलांचे मुकुट झगमगायला लागले.

भाजीपाल्याच्या वाफ्याभोवती गुलबक्षी फुलायची. ती कुणी मुद्दाम लावली होती की नाही कोण जाणे, पण संध्याकाळी फुलं उमलायला लागली की तो कोपरा उजळून उठायचा. पांढरी, पिवळी, राणी कलरची फुलं. लांब देठ, खाली हिरवे मणी. त्यामुळे देठ गुंफून केलेली वेणी देखणी दिसायची. वास नसला तरी मी खपवून घ्यायचे. त्याहून लांब देठ बुचाच्या फुलांचे. आमच्या फाटकाशी दोन वृक्षराज होतेच, शिवाय पलीकडे सहा-सात वृक्ष होते. भिरभिरत फुलं खाली यायला लागली, की आसमंत त्या सुवासानं दरवळायचा. त्या काळी तिथे काहीच रहदारी नव्हती, त्यामुळे रस्त्यावर फुलांचा खच पडायचा. देठ एवढे लांब नि लवचिक असल्यामुळे साधी, डबल, तोड्याची अशी वेगवेगळी गुंफण करता यायची. ही वेणी डोक्यात घालण्यासाठी नव्हे, तर रस्ता सजवण्यासाठी असायची. फुलं संपेपर्यंत माझी फुलांची वेणी लांबत जाई. त्या भारानं ती तुटू नये म्हणून रस्त्यावर ठेवून, खाली बसून मी विणत असे. मग ती किती छान दिसतीय, हे बघून तोच छंद जडला - रस्त्याला या टोकापासून त्या टोकापर्यंत सलग माळा वाहायचा.

तशाच वेण्या कोरांटीच्या फुलांच्याही गुंफता यायच्या. आमचा प्राजक्त, जाई, मोगरा, कोरांटी, तेरडा, कॉसमॉस, जास्वंद - जी फुलं उपलब्ध असतील ती समोरच्या घरातल्या उभ्या गौरींच्या आराशीसाठी वापरली जायची. हरितालिकेला एकवीस प्रकारच्या पत्री गोळा करायला काहीच अडचण पडायची नाही.

खेळण्यासाठी बिट्टी नि सागरगोटे मला घरचेच मिळायचे. बिट्ट्याची फळं खाली पडली, की तशीच कुजायची. भिजवून, कुजवून, खरडून गर काढल्याशिवाय स्वच्छ बिट्टी मिळत नसे. सागरगोट्याचं झाड फारच खतरनाक होतं. फांद्यांना वाकडे वळलेले क्रूर काटे. त्याहून लहान पण तसेच भीषण काटे पानांवरही. बोंडही काट्यांचं चिलखत घालून, साळूसारखे काटे फिस्कारून दक्ष. खाली सर्वत्र काट्यांचा खच. एवढ्यातूनही मी बोंडं आणून, फोडून गुळगुळीत सागरगोटे मिळवायचे. याच काटेरी संरक्षणाचा वापर करून एका सनबर्डनं (शिंजिर / फुलखुचा) सागरगोट्याच्या फांदीच्या टोकाला आपलं घर बांधलं. कापूस, गवत, केस, बारीक चिंध्या आणून, त्यांची फांदीला गाठ मारून एक लटकणारा ‘हवामहल’ तयार झाला, मग अंडी आली, पिल्लं झाली, त्यांना अळ्या भरवून मोठं केलं गेलं, उडायला शिकवलं - हे सर्व त्या काट्यांत उभं राहून मी अगदी जवळून पाहिलं, त्याची चित्रं काढून ठेवली.

माझ्या खोलीच्या खिडकीबाहेर उंबराचं झाड होतं. उंबरं खायला बरेच पक्षी यायचे; पण मुख्य आकर्षण होता तांबट. त्याचं घरच त्या झाडाच्या खोडात होतं. मऊ खोड बघून, आपल्या भक्कम चोचीचे घाव घालून त्यानं मस्त बीळ तयार केलं होतं. ‘हे माझं झाड आहे, याल तर मार खाल’ असा संदेश आपल्या प्रतिस्पर्ध्यांना देत तो दिवसभर ‘कुक्, कुक्’ ओरडत असायचा. एवढा रंगीबेरंगी पक्षी, पण ओरडत नसेल तर झाडात पूर्ण लपून जायचा. छोटा आकार, हिरवं अंग, लालपिवळ्या पट्ट्यांची झाकीदार टोपी. झाडाला फळं असली की बरोबर हेच रंग असायचे.

‘रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर’ हा चिमुकला पक्षी देशांतर करून हिवाळ्यापुरता येणारा. आईला पक्षिनिरीक्षणात रस होता. घरी आपटे यांचं ‘आपले पक्षी’ हे पुस्तक होतं. त्यावर ती नोंद करायची - हा हिवाळी पाहुणा वर्षानुवर्षं बरोब्बर त्याच तारखेला अवतरायचा. तो लहानसा पक्षी झाडीत लपला तरी ‘टटर्रर्रर्र’ हा त्याचा विशिष्ट आवाज कुठूनही ओळखता यायचा. तसाच दुसरा हिवाळी पाहुणा म्हणजे पिवळ्या बुडाची शेपूट आपटत फिरणारा ‘राखी धोबी.’ तो एवढा वक्तशीर नव्हता, येणं चार-पाच दिवस इकडेतिकडे व्हायचं. चष्मेवाला, शिंपी, घार, साळुंक्या, पोपट, भारद्वाज, खाटिक, राखी वटवट्या, धनेश, तांबट, फुलचुखे, फुलटोचे, ब्राह्मणी मैना, साळुंक्या, चिमण्या, कावळे, डोमकावळे वगैरे सगळे नेहमीचेच यशस्वी कलाकर; पण दोन पक्ष्यांची आम्ही आसासून वाट पाहायचो. ते दुर्मीळही होते नि सुंदरही, पण एकदा आले की बर्‍याचदा दिसायचे. एक म्हणजे ‘गोल्डन ओरिओल’. याला मराठीत ‘हळद्या’ म्हणतात; पण त्याची चमक सोनेरीच असते. उडताना सोनं लखलखल्याचा भास व्हायचा. लालगुलाबी चोच, डोळ्यांतून वाढवलेल्या काजळकडा असं अनोखं, देखणं रूप. त्याहूनही सुंदर म्हणजे ‘स्वर्गीय नर्तकां’ची (पॅराडाईज फ्लायकॅचर) जोडी. काळी डोकी, त्यावर काळ्याच पिसांचा शिरपेच. ती छान लालसर रंगाची, तर तो शुभ्रधवल; पण खरी गंमत त्याच्या शेपटीची. दोन लांबलचक पांढर्‍या रिबिनी लोंबाव्यात अशी शेपटी, उडताना काय बाकदार, झोकदार वळणं घ्यायची! बॅलेरिना रिबीन फडकावत अचंबित करणारी वळणंवाकणं घेऊन पुन्हा एका जागी निश्‍चल उभी राहावी, तसं दृश्य.

पहिला मोठा पाऊस झाला, की दरवर्षी आम्हांला एक विलक्षण दृश्य पाहायला मिळायचं. पुढच्या अंगणात, पायर्‍यांपलीकडे जमिनीतून धूर निघावा तसे वाळवीचे पंखवाले किडे सतत झोत धरून वर वर जायचे. वर मीलन झालं की त्यांचे पंख गळून पडतात, आयुष्य संपतं. ही अचानक आलेली सुगी निसर्ग वाया थोडाच घालवणार आहे? जणू कुणी आमंत्रण देऊन बोलावलंय असं वाटावं तसे मोठमोठे बेडूक (टोड्‌स्‌) पायरीशेजारी हजर व्हायचे. बसल्याजागी चिकट जीभ बाहेर फेकली, की चारपाच किडे चिकटणारच. ते गट्टम करत सगळे बेडूक गळा हलवत, धपापत बसून असायचे. वरच्या तारेवर ओळीनं वेडे राघू नि कोतवाल असायचे. खालती स्थिर पंगत, तर वर तसाच भोजनसोहळा चाललेला, पण हवेतल्या हवेत. मस्त गिरकी घेऊन पक्षी पुन्हा तारेवर जायचे ते चोच भरून किडे घेऊनच. अंधार पडता पडता हे नाट्य सुरू व्हायचं. किती काळ चालायचं देव जाणे, कारण काही दिसेनासं झालं की आम्ही घरात यायचो; पण बेडकांचं ‘डराव डराव’, तारेवर बसण्याच्या जागेवरून धुसफूस होऊन पक्ष्यांनी केलेल्या ‘किर्र’च्या कुरबुरी बराच वेळ ऐकू येत.

असा आणखी एक अविस्मरणीय आविष्कार मला पाहायला मिळाला कण्हेरीच्या पानांवर. एका पानाला मागे एका छोट्या देठानं चिकटलेला एक सोनेरी शंख मला दिसला. पातळ प्लॅस्टिकचा बनवावा तसा स्पर्श. हा काही गोगलगायीचा शंख नव्हता. मग हे काय आहे? मग मी रोज नजर ठेवून राहिले. हळूहळू शंखाचा सोनेरीपणा लोपला. तो पारदर्शक, पांढरट तपकिरी झाला. बाकी काहीच घडेना, तेव्हा माझा उत्साह संपत आला होता; पण एके दिवशी मी जाता जाता पाहिलं नि खिळून राहिले. माझ्या नकळत शंख कधीतरी फुटला होता. त्यातून काळपट तपकिरी नाकतोड्यासारखं काहीतरी बाहेर आलं होतं, पानावर स्तब्ध बसून होतं. याला गवताच्या काडीनं टोचावं म्हणजे त्याची उडी मला पाहायला मिळेल, असं वाटून मी पुरेशी वाळकी काडी शोधायला लागले, तेवढ्यात तो किडा हालचाल करायला लागला. त्याच्या पाठीवरचे सुरकुतलेले, बोळा करून ठेवल्यासारखे पंख हळूहळू उलगडले नि माझ्या डोळ्यांदेखत ‘सुरवंटाचं फुलपाखरू’ झालं! तपकिरी रंगावर काळे-पांढरे ठिपके असलेलं, नेहमी दिसणारं हे फुलपाखरू त्या शंखात मुटकुळी करून बसलं होतं, याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती! तशी घरटी अनेकांची पाहिली. बुलबुल, शिंपी, खाटिक - प्रत्येकाचं वेगळं वैशिष्ट्य असे.

माझं घर शाळेपासून बरंच लांब होतं. प्रथम कुणीतरी सायकलवरून सोडायचं. म्हणजे पुढच्या दांडीच्या छोट्या सीटवर मला बसवून. मग तिथे मावेनाशी झाले, तेव्हा बसनं जायला लागले. पुढे सायकल शिकल्यावर माझी मी सायकलनं जायला लागले. शाळेतल्या मैत्रिणी सहज घरी येत नसत, कारण त्यांची सगळ्यांची घरं शाळेच्या नि एकमेकींच्या जवळ होती; पण दोन कारणांसाठी त्यांना माझ्याकडे यावंसं वाटे. एकतर रंगपंचमीला. तेव्हा पिचकार्‍यांतून रंग उडवणं व्हायचंच; पण आम्हांला हौदात रंग घालून मग पाण्यात उतरून खेळायची परवानगी मिळे. ही गंमत इतर कुणाच्या घरी नव्हती. दुसरी गंमत टेकडीवरची. हे मात्र मी घरी कधी सांगितलं नाही.

फर्ग्युसन कॉलेजमध्ये तेव्हा इमारती कमी होत्या, कुठेच कुंपणं नव्हती. त्यामुळे ते सर्व आवार आम्हांला आमचंच वाटे. त्यामागे असणारी टेकडीही आमचीच वाटे. मैत्रिणी घरी आल्या, की आम्ही स्वच्छंद बागडायला बाहेर पडायचो. पुलावर उभं राहून कॅनॉलच्या पाण्यात काड्या टाकायचो. कुणाची काडी पुढे जाते अशी शर्यत असे. मग टेकडीवर जायचं. ते बरोब्बर दुपारी साडेतीनची वेळ गाठून. वर असणार्‍या टाक्यातलं जास्तीचं पाणी त्या वेळी उंच उंच पाइपामधून कारंज्यासारखं बाहेर टाकलं जायचं. त्यात आम्ही चिंब भिजायचो; पण तसं घरी यायची टाप नव्हती. त्यामुळे नंतर अर्धा तास फ्रॉकचा किंवा स्कर्टचा घोळ लांब धरून वार्‍यावर वाळवायचा नि मगच खाली धावत सुटायचं.

घर शंभर वर्षांपेक्षा जुनं होतं, हे कौलांवरच्या बनवणुकीच्या वर्षाच्या आकड्यावरूनही समजायचं. प्रथम फक्त पुढच्या दोन खोल्या नि त्यांना जोडणारा व्हरांडा होता. मग हळूहळू विस्तार वाढत गेला. त्यामुळे प्रथम ‘बाहेरच्या’ असणार्‍या दगडी भिंती ‘आतल्या’ झाल्या. ते घडीव चिरे नव्हते, त्यामुळे त्यांना वेडेवाकडे पैलू होते. त्यावर धूळ साठायची. घराचं छप्पर खूपच उंचीवर होतं. वरपर्यंत कुठलाच झाडू पोचायचा नाही. अगदी लांब बांबूला बांधलेली केरसुणीसुद्धा. शिवाय प्रत्येक खोलीच्या कौलांत दोन-तीन काचेची कौलं होती. त्यातून सूर्यकिरणांचे झोत यायचे. स्वयंपाकघरात खूप वरच्या दगडांवरची धूळ चमकायला लागली की आईला फास त्रास व्हायचा, पण इलाज नव्हता. घराला ठिकठिकाणी उंबरे होते. खोल्या वेगवेगळ्या पातळ्यांवर होत्या. बाहेरची बाग जशी यदृच्छया वाढत गेली होती तसं घरही जमेल तसं इकडेतिकडे वाढलं होतं. दारं अगदी बुटकी होती. बाबा नि भाऊ - दोघंही सहा फुटी उंचीचे. दाराला आपटून टेंगळं यायची, तेव्हा दोघंही दारांशी नकळत वाकायला शिकले.

कौलं जुनी, जीर्ण. एकदा मी रात्री अभ्यास करत कॉटवर पडले होते. वर छतावर पाल पळत होती ते बघत होते, तर कौलाचा भुगा माझ्या डोळ्यांत पडला. पळत जाऊन डोळ्यांतले कण काढून घ्यावे लागले, कारण दुसर्‍या दिवशी परीक्षा होती.

कोयनानगरचा भूकंप झाला तेव्हा बाबा बाहेरगावी होते, आम्ही मुलं लहान होतो. दोघांना गाढ झोपेतून हलवून आईनं कसंबसं उठवलं; पण मग तिला काय करावं सुचेना. पायाखाली जमीन हादरत होती. जुनं घर, खाली पडून ढिगार्‍यात गाडले गेलो तर? पण बाहेर जावं, तर अंधार नि घराहून जुनी झाडं. त्यांच्याखाली चिरडलो गेलो तर? शेवटी तिनं डोकं चालवलं. मागच्या अंगणाचं दार उघडून (कारण नाहीतर चौकट हलून दार जाम व्हायचं) आम्ही तिघं दाराच्या चौकटीत उभे राहिलो. आता पुढे ढिगारे पडोत की मागे! घरात खूप चिचुंद्य्रा होत्या. अधूनमधून उंदीर आले, तर विषारी पदार्थ गुळात मिसळून पिंजरे लावले जायचे, सापडलेले उंदीर मारले जायचे; पण चिचुंद्री म्हणजे लक्ष्मी! तिला मारायला कुणी तयार नसायचं. मग पिंजरे पलीकडच्या कॅनॉलपाशी नेऊन चिचुंद्य्रांची मुक्तता व्हायची. त्या अर्थात परत यायच्या.

मी एकदा दिवाणावर झोपले होते. दोन मोठ्या लाकडी पेट्यांवर आडवी फळी टाकून हा दिवाण बनला होता. दोन पेट्यांमधे अंतर होतं. तिथून ‘च्यूकच्यूक’ आवाज आल्यामुळे मी लोंबणारी चादर वर करून पाहिलं, तर तिथे चिचुंद्य्रांनी घर केलं होतं. त्यात माझ्या रिबिनी, कुरतडलेले मोजे, रुमाल असा बराच रंगीबेरंगी खजिना होता. ‘एकच मोजा कसा हरवतो तुझा?’ असा वेंधळेपणाचा ठपका माझ्यावर वारंवार आला होता, त्यामुळे मी चिडून धुणं वाळत घालायची काठी घेऊन आले नि खूप ढोसलं. चिचुंद्य्रा केव्हाच पळून गेल्या. त्या कितीही लहान फटीतून अंग चपटं करून पलीकडे जाऊ शकायच्या.

बाहेर हिरव्या चाफ्याचं मोठं झाड होतं. त्याच्या वासानं साप येतात असा प्रवाद होता. साप कधी दिसले नाहीत; पण मुंगसं दिसायची. एकदा एक आई नि चार पिल्लं अशी मुंगूसगाडी पळत गेली. आईच्या शेपटीचं टोक पिल्लाच्या तोंडात, त्याच्या शेपटीचं टोक त्याच्या मागच्या पिल्लाच्या तोंडात - अशी.

जुन्या घराचा एक तोटा म्हणजे खाजरे, केसाळ सुरवंट. माझ्या खोलीत ते सर्वांत जास्त असायचे, कारण छतावर झाडाच्या फांद्या वाकल्या होत्या, त्यांच्यावरून ते कौलात पडायचे नि भिंतींवरून सरपटत घरभर व्हायचे. पावसाळ्यात सुरवंटांमुळे भिंती काळ्या दिसायच्या. चुकून हात लागला तर खाज सुटायची, आग व्हायची. भिंतीला टेकलं नि पाठीमागे सुरवंट असला, तर पाठीवर लाल गांधी उठायच्या, आग होत राहायची. मी रडकुंडीला आल्यावर एक उपाय शोधला गेला - रॉकेलमध्ये टाकलं की सुरवंट मरायचं. मग शाईच्या दौतींमध्ये रॉकेल भरून त्या खोलीत ठिकठिकाणी ठेवल्या गेल्या. खोलीत गेल्या गेल्या दिवा लावून आधी सुरवंट शोधायचे, वर्तमानपत्रानं खाली पाडायचे, पेपरावर घेऊन दौतीत टाकायचे. शेवटी दौतीत दाट काळी जेली भरल्यासारखं दिसायचं. मग मागच्या आंब्याखाली फरशांचा पार होता, त्यावर दौत उपडी करून त्यावर पेटती काडी टाकायची, की एक छोटीशी होळी होऊन सगळे सुरवंट भस्म व्हायचे. रोज अशा तीन-चार होळ्या व्हायच्या.

असे सगळे त्रास असूनही ते घर ‘आमचं’ होतं. आमच्यापूर्वी तिथे राहून गेलेल्या एक बाई एकदा घर बघायला आल्या नि ‘हे काय, तुम्ही स्वयंपाकघराची कोठीची खोली काय केलीये?’, ‘या खोलीत चक्क कोंबड्या ठेवल्या आहेत?’, ‘आम्ही राहत असताना इथून आत यायचो, तुम्ही सगळं बदलूनच टाकलंत की!’ असं नाराजीच्या सुरात म्हणत फिरल्या. मला ते ऐकताना राग आला, म्हणावंसं वाटलं, ‘हे आमचं घर आहे, तुमचं नाही! आम्ही काय वाट्टेल ते करू!’

त्या घरातून बाहेर पडल्यानंतर मला त्या घराची पूर्वपीठिका कळली आणि लक्षात आलं - ते खरंतर आगरकरांचं घर! फर्ग्युसन कॉलेज सुरू झाल्यावर पहिले प्रिन्सिपॉल होते थोर समाजसुधारक, प्रखर देशभक्त, झुंजार पत्रकार गोपाळ गणेश आगरकर. त्यांच्यासाठी आवारातलं हे पहिलं घर बांधलं गेलं, म्हणून तो ‘बंगला क्रमांक एक’! त्या वेळी मुठेच्या पुलापलीकडे काहीच नव्हतं. फक्त शेतं नि ‘चतुःशृंगीचा माळ’. म्हणून या घराला म्हणत ‘चतुःशृंगीच्या माळावरची झोपडी’. १८९२ ते १८९५ या काळात आगरकर तिथे राहिले, मग त्यांचा क्षयानं अकाली मृत्यू झाला.

त्या घरावर आता ‘नीलफलक’ आला आहे, खाली कोब्याऐवजी चकचकीत टाईल्स्‌ आल्या आहेत, दगड सपाट करून सरळ गुळगुळीत भिंती, त्यांना चुनासफेतीऐवजी प्लॅस्टर असं सगळं आधुनिक, सोयीचं नि चकाचक घर झालं आहे. हे सगळे सांगोवांगी, कारण मी तिथे जाऊन पाहिलेलं नाही, बघावंसं वाटत नाही. काय गरज आहे? आमच्या आयुष्यातला ‘सर्वांत सुखाचा काळ’ घेऊन आमचं घर आमच्या स्वप्नांमध्ये येतंच की!

***

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' (दिवाळी - २०१२)

***

हा लेख मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास परवानगी दिल्याबद्दल डॉ. अनुराधा सोवनी व श्रीमती सुजाता देशमुख (संपादक, मेनका प्रकाशन) यांचे मनःपूर्वक आभार.

***
विषय: 
प्रकार: 

खूप सुंदर लिहिलंय. पानगीचं वर्णन, सुरवंटाची होळी, वेगवेगळ्या मोसमातले बदल. खूपच तरल लिहिलंय. लेख वाचून मन कुठे भूतकाळात गेलं कळलं नाही. परत सावकाशीने वाचणार.

खूप सुंदर आठवणी आणि चित्रदर्शी वर्णन... फर्ग्युसनमधील ते जुने बंगले, आजूबाजूची समृद्ध हिरवाई आणि तेथील निवांत वातावरण पुन्हा एकदा डोळ्यांसमोर आलं.

आहा....काय मस्तं लिहिलय. तुमच्या घराच्या आठवणी वाचतांना ते घर, तुमची बाग अगदी डोळ्यासमोर उभी राहिली. नशीबवान आहात की इतक्या छान घरात, झाडे, फुले, फळे, पक्षी यांच्या संगतीत तुमचं बालपण गेलं. खर्या अर्थाने संपन्न, समृद्ध बालपण जगलात.
श्री. आगरकरांचा या घराशी आलेला संबध तर खासच.

एकुणएक इमॅजिन केल मी..
अतिशय सुंदर लिहिलय तु.. खरच आभार तुझ्या स्वप्नातल्या घराला इथ आमच्यासमोर उभ केल्याबद्दल..

काय सुंदर लिहिलंय.. आहाहा झाले वाचतावाचता.

नशीब लागते असले बालपण लाभायला. माझ्या नशिबाने मला इतके भरभरुन नसले तरी एक छोटासा तुकडा वाट्याला आलेला, हे वाचताना सतत तेच आठवत होते.

आहाहा.. फारच सुरेख..
नशीब लागते असले बालपण लाभायला. माझ्या नशिबाने मला इतके भरभरुन नसले तरी एक छोटासा तुकडा वाटयाला आलेला, हे वाचताना सतत तेच आठवत होते.>> +१

अनुराधा, खूप लकी आहेस गं! नुसतंच असं बालपण मिळालं म्हणून नाही, तर तो अनुभव सहज सुंदर शब्दांमधे गुंफण्याचं सामर्थ्य पण तुला लाभलंय. जियो!

चिनुक्स इतकं सुंदर लिखाण आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद.

फारच सुंदर लेख ...असं बालपण मिळायला भाग्य तर लागते पण त्याहून जास्त खूप छान शब्दात मांडलाय सारा अनुभव अगदी समोर सारे बघितल्यासारखे वाटले ..
धन्यवाद चिनुक्स ..

संपूर्ण लेख म्हणजे जणू काही बालकविंनी गद्यात सादर केलेले पद्यच होय, या नजरेने लिखाणाकडे पाहात गेलो, अनुभवले वर्णन केलेले रांगोळीचे सुंदर ठिपके. प्रत्येकाच्या बालपणाला साद घालत गेल्या डॉ.अनुराधा सोवनी यांच्या ह्या ओळी. फ़र्ग्युसन दुरूनच पाहिले, पण आता मन बंगला क्रमांक १ भोवती रममाण झाले...न जाताही, तिथे असल्याची भावना निर्माण झाली, हे सारे यश लेखिकेच्या स्मृतीशृंखला क्षमतेचे.

लेखातील "...आयुष्यातला ‘सर्वांत सुखाचा काळ’ घेऊन आमचं घर आमच्या स्वप्नांमध्ये येतंच की!..." ~ हे वाक्य सारे काही सांगून जाते....सर्वांचेच मत असणार हे.

एरव्ही असले सर्वांगसुंदर लेख नजरेसमोर येतही नाहीत....(दिवाळी अंकांची सोबत नसल्याने...) त्यामुळे मुद्दाम परवानगी घेऊन लेख ’मायबोली’ वर आणण्याचे आणि त्याचा आनंद दिल्याचे श्रेय श्री.चिनूक्स याना देणे आवश्यक आहेच. आभार.

वाह!! पार गुंगून व्हायला झालं..सर्व काही आपण पाहातच आहोत प्रत्यक्ष, असा भास झाला..

मनाच्या खोल कप्प्यातून बाहेर पडणार्‍या भावना साध्या, सुंदर शब्दरचनेमुळे पार आतवर पोचल्या..

वाचताना संपूच नयेसं वाटलं.. Happy

इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद, चिनूक्स!!!

'टुकत राहणे' हा एरवी कृतीतच असणारा शब्दप्रयोग पुन्हा वाचनात आला. माहेरमधला लेख वाचला होताच, त्यावेळीही वाचताना जागोजागी हसू फुटलं होतं, मज्जा वाटली होती, हेवाही वाटला होता. आज पुन्हा तोच अनुभव जसाच्या तसा आला... मस्त वाटलं अगदी.

चित्रदर्शी लेखन. सगळ घर शब्दाबरोबर फिरून बघितले >
इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद, चिनूक्स!!!

किती सुंदर लेख. झाडामाडात बालपण अनुभवणे ही किती भाग्याची गोष्ट. आणि तेही फर्ग्युसनच्या आवारात. Happy

सगळा परिसर डोळ्यासमोर आला. रणरणत्या उन्हात झाडाच्या छायेखाली वाटावे तसे शीतळ वाटले, लेख वाचून.

थँक्स फॉर शेअरिंग.

अगदी चित्रदर्शी. पानगी, चिचुंद्री वगैरे वाचायला मजा आली.
धन्यवाद चिन्मय इथे शेअर केल्याबद्दल.

Pages