भटकंती -८

Submitted by इन्ना on 26 June, 2015 - 09:11

भटकंती - ८ तदाओ आन्दो .

आर्किटेक्चरला असताना कॉलेज ला दांडी मारून केलेले उद्योग पण समृद्ध करणारे होते.

उगाच एम८० वर डेक्कन वरून , मुळशी, कोंढवा, बाणेर वगैरे उन्हात भटकून तथाकथीत कंटेपररी ( पुण्यात चुकार एखाद दोनचार उदाहरण वगळता दुष्काळ होता तेव्हा ) आर्किटेक्चर चा अभ्यास! कंटेम्पररी , समकालीन हा शब्द आवडायला लागला होता. एक प्रकारच सबकल्चर/ कल्ट होउ घातलेले आम्ही काही बॅक बेंचर्स! पुण्यात काहीही नाही ह्यावर शिक्कामोर्तब करून, जगात इतर आर्किटेक्ट कसे विचार करतात , व्यक्त होतात , रुढ पायंडे मोडताना काय आणि कसा संघर्ष करतात. हे समकालीन नमुने बाकी कुठे कुठे काय आहेत? ह्याचा शोध चालू झाला.
हे असले प्रकार बॅक्बेन्चर्स च करू जाणतात. Lol . नाहीतर कंटेम्पररी आर्किटेक्चर नावाच एकही विषय अभ्यासाला नसताना उगा मुर्खासारखी यातायात कोण करेल?

नव्वदच्या दशकात पुण्यात आर्किटेक्चर कॉलेज २ आणि तिथल्या लायब्ररीज अत्यंत बेसिक. मग सापडली ब्रिटिश काउंसिल ची लायब्ररी. ( फक्त ब्रिटिश पब्लिकेशन्स असायची पण त्यातही, कॉलेजला दांडी मारून , रेफरन्स सेक्शन च्या गार हवेत , चार्ल्स जेन्क्स आणि त्यांची पोस्ट मॉडर्निझम बद्दलची पुस्तकं , लॅन्ड्स्केप्स बद्दलची पुस्तकं , बॅनिस्टर फ्लेचर चा ठोकळा, फोटोग्राफीबद्दलची पुस्तकं ,असंख्य डिझाइन आणि आर्किटेक्चरची मासिक वाचलीत . अजूनही एखादा रेफरन्स आठवताना रेफरन्स सेक्शन मधील शांतता, गार हवा , कारपेटवर आवाज न करता सरकणार्या निळ्या खुर्च्या , अन सुशेगात वाचलेल ते पुस्तक असच आठवतं .

अश्याच एका निरुद्देश वाचनात अवचित सापडला तदाओ आन्दो नावाचा आर्किटेक्ट . ( तडाओ आन्डो अस म्हणायचे मी तेव्हा)
हैला हे भारीये ! अस मनातल्या मनात म्हणायच्या ऐवजी आवाजी बाहेर पडल्याने लायब्ररियन ने डोळे वटारले. मग मी रुपाली अन अतूल टपरीच्या चहाबरोबर आन्डो सान ना घेउन बसलो.

चर्च ऑफ लाइट नावाच सुबक लहानस स्ट्रक्चर! तिथुन ह्याच्या डिझाइन्स्च्या प्रेमात पडण सुरु झाल. नन्तर कामानिमित्त केलेल्या जपान प्रवासात, आवर्जून पाहिली त्यांची डिझाइन्स. वाचलेल अनुभवण तितकच मस्त.

जपान ला जायची पहिली संधी मिळाली तेव्हाच काय काय नक्की पहायच ह्याची लिस्ट करून ठेवली होती. काम फक्त तोक्यो मधे असणार होतं, त्यामुळे आन्डो सानची २१-२१ डिझाइन साईट पहायच ठरवल.

जपान मधल्या दहा पैकी आठ जण तोक्योत अस गमतीनी म्हटल जातं. जगातली सर्वात घनदाट लोकवस्ती असलेल महानगर. आकाशाला गवसणी घालणार्‍या इमारती अन दिवसाच्या कोणत्याही प्रहरी ओसंडून वाहणारे रस्ते. ह्यातल एक हॅपनिंग उपनगर आहे रोप्पोन्गी. बरेचसे ठिपके जुळत जुळत ही इमारत उभी राहिली. डिफेन्स च्या ताब्यातली एक मोकळी जागा होती. समकालीन कलाकाराना तथाकथीत अंगावर येणार्‍या विकासात जपानीपण हरवतय अशी खंत होती . एस्थेटिक्स /सौंदर्यशास्त्राचा अभ्यास करणार व्यासपीठ असाव ही मागणी होती. इसे मियाके नावाच्या अंतरराष्ट्रीय किर्तीच्या फॅशन डिझायनर नी आन्डो च्या सहाय्याने पहिला प्रस्ताव मांडला अन सगळे टिपके जुळायला सुरवात झाली. २००२ पासून सलग २- २.५ वर्ष एकामागोमाग एक संकल्पना सादर केल्या गेल्या. अन अखेर २००५ मधे कामाला सुरवात झाली . बर्याच अडचणी होत्या. जागा ,मैदान अथवा खुली जागा म्हणून आरक्षित होती. त्यामुळे बहुतांश भाग जमिनी खाली असण अपेक्षित होतं .आजूबाजूच्या उंच इमारतींच्या गर्दीत ही पिटुकली इमारत हरवण्याची भिती होती.

संकल्पना होती पिस ऑफ क्लॉथ , कापडी रुमाल. ओरिगामीच्या घडीची आठवण करून देणारा . मियाकी इसे यांच्या संकल्पने प्रमाणे एक साध कापड, जरुरीप्रमाणे, अन ते कापड वागवणार्या माणसाच्या व्यक्तीमत्वाप्रमाणे, वेगवेगळी रुपडी धारण करतं. दोन चौकोन डायगोनली दुमडून उंच सखल मैदानावर, मावतील तसे ठेवले , इतक सोप आणि सहज .
cloth

वास्तुविशारदाच्या पुढे बरिच आव्हान असतात , एखाद्या शिल्पकारानी शिल्प घडवाव तशीच वास्तू विशारद इमारत घडवत असतो, पण संकल्पनेच्या पुढे जाउन त्या संकल्पने ला तांत्रीक चौकटीत बसवणे , नगरविकासाच्या जटिल आकडेमोडीत बसवणे , एक कंपोझिशन म्हणून आसपासच्या इमारती ,निसर्गाला पुरक असणे , त्या पलीकडे जाउन संकल्पने तली सहजता न हरवता ती इमारत म्हणून प्रत्यक्षात आणणे. ह्या सगळ्या आघाड्यांवर आन्दोसान पुर्णपणे यश्स्वी होतात.

एखाद्या वास्तुविशारदाच काम सुरु होतं ते जागेच्या वापराच नियोजन करण्यापासून. मग नियोजन आतलया जागेच, त्यांच्या एकमेकांशी संबंधाच , छायाप्रकाशाच. त्या बिल्ट अन्बिल्ट च्या गोफ विणत ,बांधकाम साहित्य कोणत ? त्याचा पट मांडणे, त्यांचे पोत , रंग कंपोज करणे . ह्या सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे ती वास्तू वापरणार्या , तीच्या असण्यानी ज्याना , किंवा तस असण्यानी कोणाकोणाला कसा कसा फरक पडतो त्याचा विचार , अभ्यास.

ह्या सगळ्या मुद्द्याना अत्यंत समर्थ पणे पेलत २१-२१ डिझाइन साईट साकारली आहे .
नियोजीत इमारती मागे उंच झाडांची रांग योजल्यामुळे , काँक्रीट अन काचेच्या टोलेजंग इमारतींच्या गर्दीच्या स्कायलाइन ऐवजी हा हिरवा बॅक्ड्रॉप बहार आणतो.

skyscraperspathawaysignage

अत्यंत काळजीपुर्वक जोपासलेल्या हिरवळीच्या मैदानातून एका पायवाट आपल्याला ह्या सुबक ठेंगणीच्या दिशेनी नेते . इमारतीचा बहुतांश भाग जमिनी खाली असल्यानी सामोर्‍या येतात त्या दोन मोठ्या स्टीलच्या त्रीकोणी प्लेट्स.
roof

हे रूफ! अलगद उतरत हिरवळीला येउन भिडणारं. आत प्रवेश केला की एक लहानसा स्वागत कक्ष आणि खाली उतरणा र्‍या पायर्‍या.
staircase to basement

खालचा उलगडलेला मजला अनपेक्षित मोठा हॉल आहे. ज्यात दोन गॅलरीज ( कक्ष म्हणा हव तर) आहेत. एक त्रिकोणी कोर्टयार्ड खाली उजेड पोचवत . आणि तळघरातल्या हॉल्स मधे असल तरी बंदिस्त वाटत नाही.

stairs

मी दोनदा जाउन आले तिथे, प्रत्येक वेळी गॅलरीज मधे कॉन्टेपररी आर्ट , स्कल्पचर्स , पेंटिंग्स ची फिरती प्रदर्शने होती, होतकरू कलाकार आवर्जून हिरीरीने चर्चा करत होते . सर्व वयोगटातील, हौशी , व्यावसायीक , कलाकार समिक्षक , स्टुडन्ट्स चा सहभाग जाणवला .मला अगदी युटोपिअन वाटल हे सगळ.
exhibition

तिथे स्वागत कक्षामधे आन्दो सान च एक पत्र वजा निरोप आहे. हा प्रोजेक्ट का अन कसा केला ह्याबद्दलच . त्याचा थोडक्यात सारांश असा,

"माझी अशी ठाम समजूत आहे की जपान हे अस एक राष्ट्र आहे की त्याचा र्‍हास होण उर्वरीत जगालाही घातक होइल. ह्याचाच अर्थ जपानच जपानीपण , एस्थेटिक्स जतन केलं पाहिजे. इथे ,एस्थेटिक्स म्हणजे जबाबदारीची जाणीव, न्यायाची जाणीव, सभोवतालच्या वातावरणा बद्दल , लोकांबद्दल संस्कॄती बद्दल आदर हे सगळ आल . पर्यावरणाबद्दल , जगण्याबद्दल , जिवनाबद्दल कृतज्ञता आली. आणि हे सगळ जपानीपण जतन करायचय आपल्याला
१९६० नंतरच्या वाढत्या आर्थिक सुबत्तेबरोबर , नफेखोरी हे सुत्र बनत चालल आहे. ह्या नव्या जिवन शैलीत सुबत्ता , पैसा असणे हे महत्वाचे बनत चालले आहे, जिवनाची जुनी मुल्य नाहीशी होतायत, तोक्यो मधल्या कोणत्याही रस्त्यावर उभ्या टोलेजंग काचेच्या इमारती जपानी आहेत का? सुंदर आहेत का? आपल्या पुढच्या पिढीला आपण जपानीपण म्हणून काय देणार?
मला अशी सुंदर वास्तू रचायची आहे, ज्यात जपानी पण काय आहे , सौदर्य, त्याची समज , नवे विचार ह्यावर चर्चा होइल,
हा प्रोजेक्ट म्हणजे माझ्या त्या स्वप्नाचे मुर्त रूप आहे. सहज सरल जपानी समकालीन सौंदर्यवृत्तीच उदाहरण म्हणून आपण. आणि सभोवतालच्या सवंग प्रदर्शन करणार्‍या देखण्या फसाडस् वर उतारा पण. " - तदाओ आन्दो.

एक राष्ट्र म्हणून आपली ओळख , एस्थेटिक्स जपल पाहिजे, आणि तेवढच नाही तर ते जपणं म्हणजे जुनं ते राखून म्युझियम्स बनवणे नसून , समकालीन विचारानी ते समृद्ध करणे. आहे हे जाणणे, चळवळ बांधून त्यात नव्या पिढीलाही ओवणे हे महत्वाच काम आन्दो सान करतात. मला विद्यार्थी असताना भावलेले आन्दो सान , आता मी स्वतः प्रॅक्टीस करताना अजून मोठे भासतात !!

आधिची भटकंती
http://www.maayboli.com/node/31802 भटकंती-१
http://www.maayboli.com/node/35461 भटकंती २
http://www.maayboli.com/node/35470 भटकंती ३
http://www.maayboli.com/node/47043 भटकंती ४
http://www.maayboli.com/node/48169 भटकंती ५
http://www.maayboli.com/node/48184 भटकंती ६
http://www.maayboli.com/node/51925 भटकंती ७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख सुंदर आहे पण फोटो आल्याशिवाय तो पूर्ण वाटत नाहिये! मग फोटो बघुन सविस्तर प्रतिसादाला जागा राखुन ठेवतो !! Happy

छानच लिहितेस. Happy
न राहवून हे नाव गूगल केलं. फोटो पाहिले. या इमारतीकडे आर्किटेक्टच्या नजरेतूनच पाहिलं पाहिजे हे जाणवलं. आणि तू अजूनही सविस्तर लिहायला हवं होतंस असंही वाटलं. Wink

इन्ना...

~ खरं तर वास्तुशास्त्र आणि त्याचे अभ्यासक ज्याना आपण विशारद म्हणू ओळखतो, त्यांच्याकडे हे ज्ञान मिळविण्यासाठी मुळातच दैवी अशी प्रज्ञा असावी लागते. ते सार्‍यानाच जमेल असे नाहीच. ह्या कलेवर वा त्यातील जादूवर भाष्य करणारी व्यक्तीसुद्धा या क्षेत्रात कार्यरत असावी लागत असेल (असे मला वाटत आहे). त्यामुळे मी फक्त तुझ्या लेखनशैलीचा वाचनातून आनंद घेतला असेच म्हणत आहे. बाकी जपानमधील दहापैकी आठ नागरिक टोकियोत राहतात हे निरीक्षण गंमतशीरच आहे. हे महानगर महाप्रचंड आहे हे तर वेगवेगळ्या वाचनातून माहीत झाले आहेच, तरीही इतक्या प्रचंड दाटीने लोक तिथे (च) का राहातात ही विचार करण्यासारखी बाब आहे.

तुम्हा आर्किटेक्ट शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी तदाओ आन्दो सान हे नाव किती ऋषितुल्य आहे हे तुझ्या भाषेवरून उघड होतेच आहे.

मस्त लेख! प्रचिच्या प्रतिक्षेत! भाची आर्किटेक्ट करतेय फोटो टाकले की तिला वाचायला देईन...

फोटो असायला हवेत असे प्रथम वाचनात मनात आले खरे पण नंतर वाटले हे शब्द व्यवस्थित वाचून सावकाशीने फोटो पाहत तुलना करावी.
वास्तु प्रत्यक्ष कधी बघायला मिळेल कोण जाणे पण या शब्दांतून यथार्थ ओळख झाली.

सहज कुतूहल म्हणून तदाओ आंदो यांच्या रचनांबद्दल पाहिले वाचले होते. फोर्ट वर्थ म्युझियममधील रेस्टॉरंट आणि ओसाकाच्या Galleria Akka मधील भिंतीत लुप्त होत जाणारा जिना यांचे फोटो अजूनही नेटवरून शोधून बघत बसतो कधी कधी.

आर्किटेक्चरची डिग्री अथवा प्रशिक्षण नसतानाही असे जागतिक स्थान निर्माण करणे म्हणजे ग्रेटच.
लेखातील लिहिलेल्या इमारतीची जमिनीला टेकून पुन्हा वर उसळणारी छपरे फार भावली. त्यामागील कारण लेख वाचून कळले.
कधीतरी तू त्यांना भेटावेस ही शुभेच्छा!

ज्या सहजतेनं तुमची "आतली नजर" माझ्यासारख्या सामान्य माणसापर्यंत पोचवतेस त्याला कौशल्याला दन्डवतच. _/\_ Happy

लेख नेहमीप्रमाणे उत्तम.
फोटोसहीत परत एकदा वाचेनच.

भागांचे धुमकेतु झालेत एवढीच एक छोटिशी तक्रार.

छान लेख. तुम्हाला कात्सुरा व्हिला बद्दल माहीत आहे का? पाध्यांच्या तोकोनोमा पुस्तकात त्या व्हिलाचे फार सुरेख वर्णन आहे. तिथे गेला आहात का? आणि फोटो जरूर टाका वाट पहाते आहे. तदाओ आंदो बद्दल अजून वाचून काढते. आम्ही लॉरी बेकर फॅन.

आफ्टर लाँग टाईम, मौन सोडलंस तर.. Happy पहिला आनंद त्याचा Happy
तदाओ आंदोंचा परिचय आवडला. तुझ्याकडून आणखी अशा अनेक कला आणि शास्त्राचा संगम साधणा-या वास्तूविशारदांची ओळख करून घ्यायला आवडेल. जागतिक आणि भारतीयही. शिरिष बेरी प्राधान्यक्रमाने.

वास्तूविशारदांच्या कार्यपद्धतीबद्दलचे दोन पॅराज विशेष आवडले, त्या तपशीलवार पार्श्वभूमीमुळे आंदोंचा प्रोजेक्ट समजून घेणं सोपं गेलं. आता तुझे फोटो किंवा गूगल करून त्या इमेजिस बघणं ही इंटरेस्टिंग प्रोसेस असेल.

तू खरंच फार छान लिहितेस इन्ना! प्रत्येक ओळ वाचताना ती डोळ्यांसमोरही उमटत जाते, त्या वर्णनात समरस व्हायला होतं.

अमा, सेम पिंच Happy मीही लॉरी बेकर फॅनक्लबमधे.

इन्ना, तुमची पूर्ण भटकंती वाचून काढली. अत्यंत आवडता विषय पण खूप कमी वाचायला मिळतं. त्यामुळे अधाशासारखी वाचत गेले. सुरेख लिहिलंय, खूप माहिती मिळाली, पण अजून मोठे लेख लिहा ना प्लीज..

तदाओ आंदो बद्दल लगेच गूगल केलं. काय भन्नाट माणूस आहे, आधी ट्रक ड्रायव्हर, मग बॉक्सर आणि म्मग कुठलंही फॉर्मल ट्रेनिंग न घेता, आर्किटेक्ट _/\_ शैली किती सुंदर, अगदी लाइव्ह हाइकु आहेत सार्‍या बिल्डिंग्स..

धन्यवाद ओळख करुन दिल्याबद्दल आणि अजून खूप खूप लिखाण आन्दो Wink

फोटो टाकलेत. पहिला अन तिसरा फोटो इंटर्नेट वरून बाकिचे मी काढलेले आहेत .
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
अशोक पाटिल मामा , एक डाव ऑफिस टायमाला याच तुम्ही तिथल्या लोकल नी , तोक्योची लोकसंख्या झटक्यात कळते. Happy
वर्षूतै , फाउंटन हेड वाल्याची जातकुळी अजूनच वेगळी. आन्दो सान रिबेल करून नाही, तर रुढीना , जनसामान्याना बरोबर घेउन बदल करू जाणतात. खरतर रोआर्क नी बिथरवलेल डोक आन्दो सान , कोरिआ यांची कामं पाहून ताळ्यावर आल.
अमेय , भेटायची इच्छा आहेच , ओळख काढून ठेवली आहे. Happy योग यावा!
धुमकेतू Biggrin प्रयत्न करते तरी नियमाने सुर्याभोवती फिर्ता येण कठीण दिसतय!
अमा जपानी एस्थेटिक्स चा उत्तम नमुना आहे कत्सुरा व्हिला ( इम्पेरियल पॅलेस ) मीही अजून पाहिला नाहीये.

इन्ना....

~ तूच बघ आता हा लेख नव्याने....फ़ोटोजमुळे लेखाला केवळ देखणेपण लाभले नसून माझ्यासारख्या कला शाखेच्या व्यक्तीला फ़ोटो संगतीने लेख वाचताना पुन्हा नव्याने सारे समजू लागले. खूपच सुंदर झाले आहे सारे.

कधीतरी तुझ्याकडून "अ‍ॅन्टिला" विषयी असेच अभ्यासू भूमिकेतून केलेले लिखाण वाचण्याची इच्छा आहे.

छान फोटो. Happy

काही फोटोंलगत खाली उजवीकडे लगेच मजकूर सुरू होतोय. संपादनात जाऊन त्या त्या ठिकाणी फोटो-लिंकनंतर एंटर/डबल एंटर मार ना... म्हणजे तो शब्द खाली येईल.

उगा मुर्खासारखी यातायात कोण करेल?>>>>>
तुझ्या मुर्खपणाला मी छुप खतपाणीच घातल.तरीही तु यातुन अनेक प्राध्यापकांशी पन्गा घेतलास.त्याचा अन्तर्गत मुल्यमापनावर परीणाम होणार हे महित असायच.त्यामुळे मनातुन भितीही वाटायची.एकदाची अर्किटेक्ट झालिस आणि गन्गेत घोड न्हाल.आज तुझ यश पह्ताना मात्र आपण केल ते बरोबर होत अस वाटतय..भितिपलिकडच सेल्फ लर्नींगच तुझ्या जास्त कामी येतय.
फोटो टाकल्यावर लेख चांगला वाट्तोय.

मस्त लिहिलं आहेस इन्ना. आता जेव्हा कधी तोक्योला जाणे होईल (?) तेव्हा नक्की बघायला जाईन.

तदाओ आंदो बद्दल लगेच गूगल केलं. काय भन्नाट माणूस आहे, आधी ट्रक ड्रायव्हर, मग बॉक्सर आणि म्मग कुठलंही फॉर्मल ट्रेनिंग न घेता, आर्किटेक्ट _/\_ शैली किती सुंदर>>
हे असे अनुभव जपानच्या वास्तव्यात अधुनमधुन येत होते.

Wow! This is a true treasure. Keep it up.
Keep posting. As many had already suggested, would like to know more through your eyes.

अप्रतिम लेख ...

पण मला स्वतःला ती अति ऊंच इमारत आणि ती उतरती रुफ्स असलेली जागा यांचा परस्पर काय संबंध आहे हे उमगले नाही .. (माझा बुद्धीदोष असावा ...)

धन्यवाद प्रतिक्रियांबद्दल.
शशांकजी, उतरत्या छपरांची इमारत लहान्खुरी आहे. तीच्या अन मागच्या उंच इमारतींमधे जणूकाही हिरवा पडदा आहे. अ‍ॅप्रिसिएशन बॅक्ड्रॉप म्हणता येइल. नाहीतर की छोटूकली त्यांच्या जंजाळात हरवून गेली असती.

Pages