सायकलीसंगे जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू

Submitted by मार्गी on 19 July, 2015 - 09:27

सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना

सर्व माबोकरांना मन:पूर्वक अभिवादन!

३० मेच्या सकाळी करगिलमध्ये लवकर जाग आली. लवकर तयार झालो. आज माझी पहिली परीक्षा आहे! आज लदाख़ प्रदेशात सायकलिंगची सुरुवात होईल. आजच्या दिवशीच्या स्कोअरनुसार पुढचा अंदाज येईल. आज हेही मुळात कळेल की, मी लदाख़मध्ये सायकलिंग करू सुद्धा शकतो का नाही. काल रात्रीच्या तुलनेत आत्ता मन शांत आहे. एक उत्सुकता आहे. कालपर्यंत करगिलवरून बटालिक आणि दाह ह्या रस्त्याने लेहला जाण्याचा विचार करत होतो. मागच्या वेळी बटालिकमधून जाणारा रस्ता बघितला नव्हता. आणि बटालिकच्या रस्त्याने गेल्यास पहिल्याच दिवशी सिंधू नदीचं दर्शन होण्याची शक्यता होती. पूर्वी त्या रस्त्यावर जायला परमिट लागायचा; परंतु आता लदाख़मध्ये भारतीय पर्यटकांना कोणत्याही परमिटची आवश्यकता उरलेली नसल्यामुळे इथेही परमिट लागणार नाही असं वाटलं होतं. पण करगिलमध्ये चौकशी केली तर कळालं की बहुतेक परमिट घ्यावा लागेल. कोणी स्पष्ट सांगू शकत नव्हतं. अगदी ५०- ५० अशी मतं येत होती. काही म्हणत होते की, परमिट घ्यायची काहीच गरज नाही; काही म्हणाले की कमिशनरकडून परमिट घ्या. शेवटी काल संध्याकाळच्या शंकाकुशंकांमध्ये ठरवलं की, बटालिकच्या ऐवजी मुख्य राष्ट्रीय महामार्गाने मुलबेकच्या रोखानेच पुढे जाईन.

सकाळी हॉटेलमधून बाहेर पडल्या पडल्या हलक्या पावसाने स्वागत केलं. लदाख़ प्रदेशात पाऊस? अर्थात् पाऊस अगदी भुरभुर होता. पुढे जाता आलं. काल करगिलला येताना वाटेत द्रासमध्ये ३३०० मीटर उंचीवर काही वेळ थांबलो होतो तेव्हा श्वास घेताना किंचित त्रास झाला होता. काल करगिलमध्ये रस्त्यावर चालताना किंवा चढ चढतानाही किंचित धाप लागत होती. पण सायकलिंग सुरू करताना आता काहीच अडचण येत नाही आहे. नक्कीच करगिलमध्ये रात्री थांबल्याचा फायदा झाला. आज पहिलाच दिवस आहे. आज अगदी थांबत थांबत जायचं आहे. आज मन कालच्या सारखं निराश नाहीय; पण आज चाळीस किलोमीटर दूर मुलबेकला जरी पोहचलो तरी स्वत:ला धन्य समजेन. हळु हळु पुढे गेलो. सुरू नदीने उत्साह वाढवला. पाउण तासात करगिल गावाच्या बाहेर मुख्य रस्त्यापर्यंत पोहचलो. इथे आमलेट- चहा घेतला.

करगिल युद्धाच्या वेळेस हानी झालेला पेट्रोलपंप दिसला. रस्ता इथून थोडा वर जातो. सायकल चालवताना काहीच अडचण आली नाही. एक अडचण नक्की आली- सामान योग्य प्रकारे बांधण्यामध्ये. जर ह्यापूर्वी सायकलवर मोठा प्रवास केला असता तर सामान बांधण्याची सवय झाली असती. असो. थकव्याऐवजी सामान नीट लावण्यासाठी मध्ये मध्ये थांबावं लागत आहे. पण अहाहा! काय नजारा आहे! खरोखर विश्वास बसत नाहीय की, मी "इथे" सायकल चालवतो आहे... पहिल्या दोन तासांमध्येच बारा किलोमीटर झाले! आता पहिला चढसुद्धा संपला. आता इथून मुलबेकपर्यंत शक्यतो समतल रस्ताच आहे. एकापाठोपाठ एक वळणं येत आहेत. छोटे छोटे डोंगर येऊन मागे जात आहेत. मध्ये मध्ये थोडी वस्तीसुद्धा आहे.

आता खरोखर मी दुपारपर्यंत मुलबेकला पोहचू शकतो. क्या बात है! मध्ये एका पॅचमध्ये रस्ता थोडा कच्चा आहे. पण एकंदरित रस्ता उत्तमच आहे. सुरुवातीला लागलेल्या पावसानंतर पाऊस नाही लागला. पण पुढे परत एका ठिकाणी पाऊस लागला. योगायोगाने तिथे एक टी स्टॉलसुद्धा होता. सायकलसाठी शेल्टरसुद्धा मिळालं. पाऊस, थंडी, लदाख़ आणि त्यात चहाचा आस्वाद! लवकरच पाऊस थांबला. पुढे निघालो. रस्त्यामधून जाणारे बाईकर्स बेस्ट लक देत आहेत तर कधी हाताने सॅल्युटसुद्धा करत आहेत!

मुलबेक! ह्या ठिकाणापासून पुढे बौद्ध प्रभाव अगदी स्पष्ट दिसत जातो. इथूनच जुले जुले म्हणजेच हॅलो/ नमस्ते सुरू झालं! लदाख़ी माने दिसत आहेत. भगवान बुद्धांनी म्हंटलं होतं की, भविष्यात एक बुद्ध असा येईल जो मैत्रेय म्हणजे मित्र स्वरूपातला असेल. ही विशाल मूर्ती त्याच मैत्रेय बुद्धाचं प्रतिक आहे. इथे बाईकर्सनी खूप कौतुक केलं; फोटोसुद्धा घेतले. काहींनी सायकल चालवून बघितली. तिथून कशी तरी सुटका करून पुढे निघालो. हॉटेल अजून दिसत नाही आहे. मुलबेक गावामधल्या मुलांनीही थांबवण्याचा प्रयत्न केला. काही अंतर मागेही आले. मागच्या वेळेस मी जेव्हा आलो होतो, तेव्हा मुलबेकनंतर एका ठिकाणी नेपाळी हॉटेलमध्ये जेवण केलं होतं. पुढे वाखा गावात तेच हॉटेल दिसलं. इथे भरपेट जेवलो. आलू पराठे आणि भाजी- वरण. करगिलपासून ४४ किलोमीटर झाले आहेत आणि अजून दुपारचे दोनही वाजलेले नाहीत! एकदम ऊर्जा आली! एकदा वाटलं की, आता इथेच थांबूया. पण विचार केला की, अजूनही खूप वेळ आहे आणि फार थकवा आलेला नाहीय. म्हणून पुढे निघायचं ठरवलं. पुढे लगेच नमिकेलाचा घाट सुरू होणार आहे. पुढचं गाव त्यानंतरच येईल आणि मुक्काम करण्याची जागासुद्धा त्याच्या पुढेच मिळेल. पण अजून खूप वेळ हातात आहे. नमिकेला जरी पायी पायी चढावा लागलं तरीसुद्धा सहज पार होईल. आणि संध्याकाळी आठ वाजेपर्यंत प्रकाश असेल.

वाखापासून पुढे लगेचच नमिकेला घाट सुरू झाला. लदाख़ी भाषेमध्ये "ला" म्हणजे घाट. नमिकेला, झोजिला, फोतुला हे सर्व "ला" म्हणजे घाट आहेत. लदाख शब्द सुद्धा ला- दाख म्हणजे घाटांचा प्रदेश अशा अर्थाचा आहे. पहिले पाच किलोमीटर सायकल चालवली पण जेव्हा नमिकेला नऊ किलोमीटर होता; तिथून पुढे पायी पायी जावं लागलं. आणि तेच योग्य होतं कारण चढाच्या रस्त्यावर जास्त ऊर्जा खर्च करण्यापेक्षा ऊर्जा राखून ठेवलेली चांगली. इथे सहज पार झालो तर हीच ऊर्जा दिवस संपताना वापरता येईल. रस्त्यावरून जाणारे लोक हात दाखवून प्रोत्साहन देत आहेत. मोबाईलमध्ये गाणी सुरू केली. मी आता चक्क ३५०० मीटरहून अधिक उंचीवर जातो आहे! आनंद मनात मावत नाहीय! चढत असल्यामुळे थोड्या थोड्या वेळाने थांबावं लागत आहे. सुरुवातीला सावली बघून थांबत होतो. पण जशी उंची वाढत गेली, तसं वातावरण थंड होत गेलं. आता तर सावलीत थांबायच्या ऐवजी उन्हात थांबावं लागत आहे! जेव्हा नमिकेला तीन किलोमीटर होता, तेव्हा रस्ता समतल झाला. खालच्या ग्राफमध्ये बघता येईल. तिथून वरून येणा-या हवेनेसुद्धा साथ दिली आणि मग पुढे सायकलवर बसूनच निघालो. काही वेळातच नमिकेला टॉपवर पोहचलो. तिथे थोडा वेळ थांबून पुढे निघालो.

आता उतरताना आणखी मजा आहे! उतरणंही सोपं नाही. पेडल मारावे लागणार नाहीत; पण ब्रेक्स खूप काळजीपूर्वक वापरावे लागतील. मध्ये मध्ये ब्रेक्सना ब्रेकसुद्धा द्यावा लागेल नाही तर ते गरम होतील आणि नाराज होतील. तरीही सहजपणे उतरत गेलो. कुठेही इतका तीव्र उतार नव्हता की, पायी पायी उतरावं लागेल. मध्ये मध्ये थांबत उतार पार केला. आता संध्याकाळचे सहा वाजत आहेत. आता मुक्कामाच्या जागेचा शोध. पहिलं लागलेलं गाव अगदी छोटं होतं. पुढे बटालिकच्या रस्त्याकडून येणारा एक रस्ताही लागला. पण अजून हॉटेल किंवा गाव आलं नाही आहे. आता थकवा जाणवतो आहे. भूक फारशी लागलेली नाही पण आता सामान्य चढसुद्धा अवघड वाटतोय. पुढे तर अशा चढावरसुद्धा पायी पायी चालावं लागलं. एनर्जी बार/ चॉकलेट व ओआरएस जवळ असूनही मी घेतले नाहीत. कदाचित त्यामुळेच आता सामान्य चढसुद्धा कठिण जातोय. पण आता बुधखारबू जवळच आहे. सात वाजले आहेत, पण अंधार होण्यापूर्वी तिथे पोहचेन.

बुधखारबूमध्ये घरं तर दिसली पण हॉटेल नाही दिसलं. गोंपा आणि गेस्ट हाउससुद्धा आहेत पण बंद आहेत. लोकांनी सांगितलं की, अजून पुढे हॉटेल मिळेल. पायांना ओढत ओढत पुढे नेलं. आत्तापर्यंत नक्कीच सत्तर किलोमीटर तरी झाले असले पाहिजेत! पहिल्याच दिवशी सत्तर किलोमीटर!! सकाळी तर मुलबेकला पोहचलो तरी मला लॉटरी मिळाल्यासारखं वाटत होतं. आता तर त्याच्या बरंच पुढे आलो आहे. हा उत्साह मनात असूनही दिवसाचे शेवटचे किलोमीटर सोपे गेले नाहीत. बुधखारबू गावसुद्धा हळु हळु मागे पडत जातं आहे. आता कुठे हॉटेल मिळणार? इथे तर सगळा मिलिटरी टीसीपी- ट्रान्झिट कँप परिसर आहे. इथे हॉटेल मिळणं कठिणच आहे.. पुढे एक मिलिटरी कॅफे दिसला. तिथे लिहिलं आहे- सिव्हिलिएन्स आर वेलकम! तिथे जाऊन चौकशी केली. आधी त्यांनी माझी चौकशी केली की मी कोण, कुठून, कुठे जातोय. सायकलवर? करगिलपासून? ओह हो! ते खूप चकीत झाले. योगायोगाने तो कॅफेटेरिया मराठी जवान चालवत होते. त्यांनी लगेच सांगितलं, काळजी करू नकोस. आम्ही तुझी व्यवस्था करतो. मी म्हणालो की, माझ्याकडे स्लीपिंग बॅग आहे; मला फक्त एखाद्या हॉटेलात थोडी जागा मिळेल का. त्यावर ते म्हणाले, तू आमच्यासोबतच थांब. आज आमचाच गेस्ट बन. त्या जवानांचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा तिथेच होते. त्यांनी लगेच बोलणं केलं. “करगिल से साईकिल पर" शब्द प्रभावी ठरले आणि लवकरच मला सेनेच्या जवानांसोबत थांबण्याची संधी मिळाली...

खरोखर आजचा दिवस आश्चर्याचे असंख्य धक्के देतोय! नशीब कोणाला कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही! सेनेच्या जवानांसोबत पूर्वी अनेकदा भेटी गाठी झाल्या होत्या; रिलिफ कामाच्या वेळी सोबत कामही केलं होतं. पण आज त्यांच्याच टीसीपीमध्ये; त्यांच्याच बराकीमध्ये थांबण्याची संधी! सोन्याहून पिवळं! लवकरच जवान मला त्यांच्या बराकीमध्ये घेऊन गेले. त्यांनी म्हंटलं की, आम्ही कँपच्या एका बाजूला जातानासुद्धा कधीच एकटे जात नाही; कमीत कमी दोघं तरी जातो आणि तू एकटाच कसा आलास! मला महाराष्ट्रातल्या मेजर- लेफ्टनंट अशा अधिका-यांच्या बराकीत जागा दिली. माझं गाव- परभणी- एक मेजर त्याच जिल्ह्यातला होता. मग तर काय! तेसुद्धा खुश आणि मी आधीच आनंदाने बेभान! खरोखर जीवन कोणाला कुठे नेईल सांगता येत नाही! पहिल्यांदाच आतून मिलिटरी कँप बघतोय. त्यांची राहणी; त्यांची जीवनशैली जवळून बघता येते आहे.

अशा प्रवासामध्ये फिरण्याबरोबरच अशी संधीही मिळते जेव्हा आपण लोकांना आणि निसर्गाला एका वेगळ्याच प्रकारे भेटू शकतो. अशी परिस्थिती तयार होते ज्यामध्ये सामान्यत: न होणा-या गोष्टी घडतात. वेगळ्या भेटी होतात. ही संध्याकाळही अशीच विलक्षण आहे. खरोखर पहिला दिवस स्वप्नवत् आहे. मी खरोखर लदाख़मध्ये सत्तर किलोमीटर सायकल चालवली आहे...? ..आणि काय खरोखर मी मिलिटरीच्या सैनिकांसोबत आहे? “कन्धों से मिलते है कन्धे कदमों से कदम मिलते हैं.." पहिल्याच दिवशी खरं झालं आहे, खरोखर?


सुरू नदीच्या सोबतीने सायकलिंग सुरू


करगिलमधील गुरुद्वाराचा बोर्ड


करगिल युद्धाची खूण


नदी आणि वर येणारा रस्ता


शौर्याची अशी अगणित स्मृतीचिन्हं जम्मू- कश्मीर- लदाख़मध्ये आहेत..


मैत्रेय बुद्ध


नमिकेला घाटाचा चढ


नमिकेला घाट सुमारे ३८०० मी.


आजच्या सायकलिंगचा लेखाजोखा- करगिल- बुधखारबू सुमारे ७१ किमी आणि सुमारे १९०० मी. चढ व १००० मी. उतार

पुढील भाग: सायकलीसंगे जुले लदाख़ भाग २- बुधखारबू- फोतुला- लामायुरु- खालत्सी- नुरला
मूळ हिंदीमधील ब्लॉग:
साईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना

साईकिल पर जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान, वेळ काढून निवांतपणे लक्षपूर्वक वाचुन काढेन. आत्ता गडबडीत आहे. Happy
इथे देत असल्याबद्दल धन्यवाद.

सोलो सायकलिंग आणि ते ही लदाख मधे... ग्रेट!!! हॅट्स ऑफ >>>>>>>

केवळ स्वप्नवत आहे हे सारे ...... तुम्ही सॉलिड धाडसी आहात बुवा ......