सायकलीसंगे जुले लदाख़ भाग २- बुधखारबू- फोतुला- लामायुरू- खालत्सी- नुरला

Submitted by मार्गी on 20 July, 2015 - 10:09

सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू

सर्व माबोकर मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन आणि धन्यवाद...

३१ मे, रविवारची सकाळ! सेनेच्या जवानांसोबत चांगला आराम झाला. कालच्या दिवसावर अजूनही विश्वास बसत नाहीय. काल रात्री जवानांसोबत मस्त गप्पा झाल्या. पहिल्यांदा त्यांच्यासोबत राहात असल्याची थोडी भिती वाटली. पण वातावरण अगदी अनौपचारिक होतं. अर्थात् सुरक्षेच्या नियमांप्रमाणे सामानाची तपासणी केली. माझ्याकडे ओळख दर्शवणारे कागदपत्र होते; पण त्यांना ते बघण्याची गरज वाटली नाही. रात्री बराकीमध्ये थांबणं अपूर्व होतं. ही जागा ३४०० मीटर पेक्षा जास्त उंच आहे. २७०० मीटरपासून त्या उंचीवर एकाच दिवसात आल्यामुळे थंडी खूप जाणवली. पण श्वास घेण्यामध्ये काहीच अडचण आली नाही. शरीराने आता खूप जास्त प्रमाणात उंचीशी जुळवून घेतलं आहे. रात्री बराकीमध्येच जवानांनी जेवण बनवलं होतं. रात्री आतमध्ये शेकोटीही पेटवली होती. एकूण कालची‌ संध्याकाळ चिरस्मरणीय होती. सर्वांनी खूप कौतुक करून प्रोत्साहन दिलं आणि आपुलकीने लक्ष दिलं. त्यांचे अनुभवसुद्धा सांगितले. हिवाळ्यात इथे खूप बर्फ पडतो. तरीसुद्धा हा कँप इथेच सुरू राहतो. हिवाळ्यात इतका बर्फ असतो की, उच्छ्वासाचाही लगेच बर्फ होतो. इथे मिलिटरीने चांगली व्यवस्था केलेली आहे. त्यांच्यासाठी वेगळं रेशन, इंधन, उष्णतेसाठीची साधनं हे साळं येतं. परंतु तरीही मेजर- लेफ्टनंटसारख्या अधिका-यांच्या मानाने व्यवस्था साधीच वाटली. अर्थात् हे विसरून चालणार नाही की, हे एक दुर्गम क्षेत्र आहे आणि झोजिला नुकताच म्हणजे वीस दिवसांपूर्वी १० मे ला सुरू झाला आहे. मनाली रोड सुरू होण्याची तर अजून चिन्हंही नाहीत. म्हणून इथे साधनांची थोडी कमतरता असणं स्वाभाविक आहे. मिलिटरीचं 'वेट कँटीन' सुद्धा दिसलं. मिलिटरीचं‌ जग आतून बघता आल्यामुळे धन्य धन्य वाटत आहे.

जास्त उंचीचं ठिकाण असूनही झोप ठीक लागली. पण पहाटे तीन वाजता जाग आली. उजेड व्हायला अजून एक तास आहे. हळु हळु जवान उठले. त्यांच्यासोबत मीही तयार झालो. कँपमध्ये एका ठिकाणी 'कन्धों से मिलते हैं कन्धे कदमों से कदम मिलते हैं' सुद्धा ऐकू आलं. चारही बाजूंना बर्फाच्छादित पर्वत आहेत! खरोखर किती विलक्षण जागा आहे ही...

काल सत्तर किलोमीटर चालवल्यामुळे आज विश्वास वाटतो आहे की, मी आजसुद्धा जवळ जवळ तितकंच चालवू शकेन. आज सगळ्यात आधी फोतुला पार करायचा आहे. फोतुला श्रीनगर- लेह रस्त्यावरचं सर्वोच्च स्थान आहे. उंची सुमारे ४१०० मीटर आहे. आज जर सत्तर किलोमीटर झाले तर उद्या लेहला पोहचता येईल. त्यामुळे चांगलाच उत्साह वाटत आहे. कालचा थकवा अजिबात जाणवत नाही आहे. अशा वातावरणामध्ये थकवा जाणवेल तरी कसा! सकाळी जवानांनी खास आर्मीची रोटी खाऊ घातली. नंतर कॅफेटेरियामध्ये मॅगीसुद्धा खाऊ घातली. इथे अजून मॅगीवर बॅन आला नाही आहे. किंबहुना मॅगी माझ्या बरीच उपयोगी आहे! जवानांनी माझं भरपूर आतिथ्य करून मला बाहेर सोडलं. माझ्याजवळ त्यांना देण्यासाठी काही नाही आहे. काही चॉकलेट आणि सुकामेवा आहे; तेच दिलं. त्यापैकी काही जण आता कॉन्वायमधून निघत आहेत...

आता पहिलं उद्दिष्ट फोतुला ओलांडणे आहे. इथून फोतुला पंधरा किलोमीटर असावा. पण फोतुला ओलांडायला बराच वेळ लागेल. त्याआधी येणा-या एखाद्या गावात परत नाश्ता करावा लागेल. सायकलिंग अनेक अर्थांनी कसोटी क्रिकेट सारखं आहे. कसोटीत बॅटिंग करताना पहिल्या तासामध्ये बॉलर्सचा आदर करावा लागतो; नवा चेंडू स्विंग होतो; फिरतो; त्याच प्रमाणे पहिल्या तासामध्ये सायकलिंग थोडं संथ असतं. रात्रभर झोपलेलं शरीर थोडं कडक असतं. हळु हळु पुढे जाण्याच्या प्रवाहामध्ये ते लवचिक होत जातं. मग पाय सहजपणे चालू लागतात. हळु हळु सायकलिंग किंचित सोपं होतं. बुधखारबूच्या पुढे पहिलं गाव हंसकोट आहे पण तिथे हॉटेल मिळालं नाही. पुढे गेलो. रस्त्यात मिलिटरीचा खूप मोठा कॉन्वाय लागला. अनेक जवानांना मान झुकवून आणि सॅल्युट करून अभिवादन केलं. तेसुद्धा उत्तरादाखल सॅल्युट करत आहेत. खरोखर असा अनुभव शब्दात कसा सांगणार..

फोतुला किती दूर आहे हे कळत नाहीय. पण काय नजारा आहे! पर्वतात दूरवर कुठे कुठे वस्ती दिसते आहे. तिथे मेंढ्या चरत आहेत. दोन डोंगरांच्या मधून वाहणारं पाणी! नशीब!!! सुमारे दिड तास पुढे गेल्यानंतर एक लहान गाव आलं. इथे एक हॉटेल आहे. कमीत कमी चहा तर मिळेलच. बघितलं तर चहा तर आहेच; पण आमलेटसुद्धा आहे. एक आमलेट खाल्लं आणि एक पार्सल घेतलं. हे लदाख़चं वैशिष्ट्य आहे. कितीही छोटं दुकान असलं तरी त्यातही पुष्कळ गोष्टी मिळतात. अंडे असतील तर आमलेट मिळेलच. मॅगी, चिप्स आणि चिक्कीसुद्धा आहे! झोजिला थोड्याच दिवसांपूर्वी उघडल्यामुळे नवीन स्टॉक आलेला दिसतोय.

चांगला नाश्ता करून पुढे निघालो. आता फोतुला पार करून लामायुरूपर्यंत जेवण मिळणार नाही. पुढे लगेच फोतुलाचं अंतर दिसलं. फक्त अकरा किलोमीटर. पुढे तीन किलोमीटर सायकल चालवता आली. आता उरलेले आठ किलोमीटर पायी पायी जावं लागेल. ते गाणं लगेच आठवलं- वहाँ हाथी ना घोड़ा है बस पैदल ही जाना है! पायी पायी जाताना मोबाईलमध्ये गाणी‌ सुरू केली. “जहाँ दूर नजर दौडाए आज़ाद गगन लहराए...”

पुढे जाण्याची अजिबात घाई नाही. त्याउलट हळु हळु आणि निवांतच जातोय. कारण आत्ता मी जवळपास ३८०० मीटर उंचीवर आहे. जर मी इथे जास्त वेळ थांबलो तर पुढे लदाखमध्ये लागणा-या अधिक उंच "लां"साठी मला मदत होईल. त्यामुळे अगदी पायांच्या नैसर्गिक चालीने पुढे जात राहिलो. फोटो घेण्याच्या निमित्ताने थांबत राहिलो. श्वास सामान्यच आहे. पण नजारे काय वर्णावेत! गाडीने जाणं एक गोष्ट आहे आणि सायकलवरून जाणं अगदी वेगळी गोष्ट आहे. आता मला हा राष्ट्रीय महामार्ग एक वाटतच नाहीय. मी तर त्याला वेगवेगळ्या गावांना जोडणारा रस्ता म्हणूनच बघतोय. आणि जसा आपण वेग कमी करतो; तशी आपली बघण्याची गहराई वाढते. गाडीतून दिसल्या नसत्या अशा अनेक गोष्टी. मेंढपाळ दूर डोंगरात आत जात आहेत. डोंगरातून पाण्याच्या धारा नाचत खाली येत आहेत. दूरवर बर्फ तर आहेच...

आठ किलोमीटर पायी जायला दोन तास लागले. मंद गतीने पुढे जाताना अगदी छोटी छोटी उद्दिष्टं ठेवत गेलो. एकदा व्ही व्ही एस लक्ष्मणनी एका मुलाखतीत सांगितलं होतं ना की, टेलएंडर्ससोबत भागीदारी करताना त्याचा एक फॉर्म्युला असायचा. ते खूप छोटी छोटी उद्दिष्टं समोर ठेवायचे. जसं पुढच्या दोन ओव्हर्स खेळून काढू. किंवा पुढच्या अर्ध्या तासात पाच रन बनवायचे. त्याप्रमाणे मनासमोर छोटं टारगेट ठेवून पुढे जात राहिलो. फोतुलाच्या पाच किलोमीटर आधी चहा मिळाला. बिस्किटसुद्धा खाल्लं. पुढे थंडी वाढली. जीवनात पहिल्यांदाच चालत चालत चार हजार मीटर उंचीवर जातो आहे. फोतुला! इथे थांबून पार्सल आणलेलं आमलेट खाल्लं. आता मोठा उतार मिळेल. इथून लामायुरूपर्यंत मोठा उतार आहे.

लामायुरूमध्ये अनेक पर्यटकांनी थांबवलं. एक दक्षिण भारतीय काका खूप खुश झाले. तेसुद्धा सायकल चालवतात. मला सायकलवरून येताना बघून त्यांना एकदम आनंद झाला. तुम्हीसुद्धा इतकं सायकलिंग करू शकता, असं त्यांना सांगून पुढे निघालो. काही पर्यटकांनी माझ्यासोबत सेल्फी घेतली! लामायुरू गोंपा बघण्याचं लक्ष्य नसल्यामुळे चहा घेऊन पुढे निघालो. इथली पर्यटकांची गर्दी बघून लेहला पोहचल्यासारखंच वाटलं. इतक्या वेळच्या निर्जन परिसराचं रुपांतर शहरामध्ये झालं. पुढे बरंच पुढे आल्यावर परत शांतता झाली. उतार सुरूच राहिला. मूनलँड जवळून बघता आला. खरोखर निसर्गाची जादू विलक्षण आहे! पण ह्या मूनलँडलाही शहरीकरणाचा फटका बसतोय!

आता सिंधू नदीची वाट बघतोय. खालसीपासून सिंधू नदीसुद्धा ह्या रस्त्याला येऊन मिळेल. पुढे क्वचित चढ येत आहेत. पण उतार सुरूच आहे. इथे रस्ता अगदी अरुंद दरीतून जातोय. खालसी नदीच्या किनारी असल्यामुळे त्याची उंची अजून कमी असणार आणि तोपर्यंत उतार सुरूच राहणार असं दिसतंय. पण काय रौद्र भाग आहे हा! आता तर सतत खाली उतरण्याचीच भिती वाटते आहे. एकदा तर वाटतंय की, रस्ता बरोबर आहे ना. मी रस्ता चुकलो तर नाही? पण रस्त्यात कोणताही फलक आला नाहीय. मध्ये वाहतुकसुद्धा लागत नाहीय. एक पहाडी नदी येऊन रस्त्याला मिळाली. नक्कीच हीसुद्धा सिंधूला भेटायला जाते आहे.. पुढे एक फलक मिळाला. हाच रस्ता बरोबर आहे. आता लवकरच खालसी आणि सिंधूचं दर्शन होईल... इथेच बटालिकवरून येणारा रस्ताही मुख्य महामार्गाला मिळेल.

सिंधू नदीचं पहिलं दर्शन!! अहा हा! तिबेटमधून येणारी रमणीय धारा! आता लेहपर्यंतचा बराचसा प्रवास सिंधूच्या सान्निध्यातच होईल. खालसीच्या थोडं पुढे खालत्सी गाव लागतं. इथेसुद्धा पर्यटकांची गर्दी आहे. चहा पिऊन पुढे निघालो. जर उद्या लेहला पोहचायचं असेल तर मला आज खालत्सीच्या अजून पुढे जावं लागेल. खालत्सीपासून लेह ९७ किलोमीटर आहे. आज नुरला इथे थांबेन. तिथे गेस्ट हाउस मिळेल अशी माहिती मिळाली. नुरला अजून बारा किलोमीटर पुढे आहे. आत्ता संध्याकाळचे साडेपाच झाले आहेत. अंधार पडण्याची भिती नाही. इथून पुढे तीव्र चढसुद्धा नाही आहे.

सिंधू नदीच्या निनादासह पुढचाही टप्पा लवकरच पूर्ण झाला. नुरलापासून पुढचं गाव ससपोल चोवीस किलोमीटर दूर आहे. आज तिथे पोहचू शकणार नाही. त्यामुळे नुरलाच ठीक आहे. नुरलामध्ये हॉटेल महाग आहेत; पण होम स्टे मिळू शकेल. आणि मिळालासुद्धा. एका माणसाकडे थोडी विचारपूस केली. लवकरच त्यांच्याकडेच होम स्टे मिळाला. लदाख़मध्ये कित्येक गावांमध्ये अशा प्रकारे पैसे देऊन घरी राहता येतं. आज पहिल्यांदा एखाद्या लदाख़ी घरामध्ये राहणार आहे. लदाख़ी‌ गावं छोटी असली तरी समृद्ध आहेत. माने, प्रेअर व्हील आणि प्रेअर फ्लॅग लागलेले आहेत. घरामध्ये दोन लहानशा निरागस प-यासुद्धा भेटल्या. गच्चीतल्या खोलीत राहण्याची व्यवस्था झाली. अखंड गरजणारा सिंधू नदीचा रौरव स्पष्ट ऐकू येतो आहे.

आजसुद्धा चांगली सायकल चालवली. बुधखारबूपासून सुमारे ६५ किलोमीटर आलो आहे. पण एक गोष्ट खरी की, फोतुलानंतर सुमारे पंचवीस किलोमीटर उतार असूनही फार पुढे जाता आलं नाही. कदाचित दुपारी फोतुलावर आमलेट खाल्ल्यानंतर काहीच खाल्लं नसल्यामुळे असेल. त्यामुळे ऊर्जा किंचित कमी वाटते आहे. संध्याकाळीही काहीच खायची इच्छा झाली नाही. सोबत बिस्किट होते; पण भूकच नाहीय. आजची रात्र सिंधूच्या गर्जनेच्या सोबतीने..


जहाँ दूर नजर दौडाए.. आज़ाद गगन लहराए लहराए लहराए..


वक़्त झरना सा बहता हुआ गा रहा है यह कहता हुआ...


लामाजी


फोतुलाजवळ


लामायुरू


मूनलँड


आजच्या सायकलिंगचा लेखाजोखा- अंतर ६५ किमी; चढ सुमारे १७०० मी आणि उतार २१०० मी


सिंधू!!!!!!!


"तू मेरे साथ साथ आसमाँ‌ से आगे चल.. तुझे पुकारता है तेरा आनेवाला कल.. नई हैं मन्जिलें..
नए हैं रास्ते.. नया नया सफ़र है तेरे वास्ते.. नई नई है ज़िन्दगी.."- सिन्धू

पुढील भाग: सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ३- नुरला- ससपोल- निम्मू- लेह...

मूळ हिंदीमधील ब्लॉग:
साईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना

साईकिल पर जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू
साईकिल पर जुले लदाख़ भाग २- बुधखारबू- फोतुला- लामायुरू- खालत्सी- नुरला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरीच आहे.

पण काही प्रश्न

१. तुम्ही मे मध्ये का गेलात? म्हणजे तेंव्हा दोन्ही रस्ते बंद असतात. आणि मे एन्ड पर्यंत सुरू होत नसतात. जनरली ज्यांना स्नो वॉलचे फोटो काढायचे असतात तेच मे च्या शेवटच्या आठवड्यात जातात. प्लानिंग् चूकली का? किंवा ओव्हरसाईट?
२. कारगिल मार्गे का गेलात? जनरली मनाली लेह सायकल ट्रीप जास्त पाप्युलर आहेत.
३. तुम्ही प्रामाणिकपणे लिहिले की तुम्ही सरळ उतरून सायकल चालवली. - दॅट्स रियली ग्रेट पण तुम्ही चढाची तयारी कमी केली होती का? की शारिरीकपेक्षाही मानसिक थकव्यामुळे तुम्ही उतरलात.

प्रश्न भोचक नाहीत. उत्सूकतेचे आहेत उत्तर दिलेच पाहिजे असे नाही. पण दिलेत तर आभारी राहीन.

लेहला जाणे हे भारीच. पण सायकलवर एकट्याने प्रवास करणे हे जास्त भारी!! त्यासाठी हॅट्स ऑफ !

लेहला जाणे हे भारीच. पण सायकलवर एकट्याने प्रवास करणे हे जास्त भारी!! त्यासाठी हॅट्स ऑफ !+१

मस्त लिहिलंय

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!!!

@केदार जी, सर्वप्रथम नमस्कार! तुमची कमेंट पाहून आनंद झाला. ज्या सायकलिस्टसकडून प्रेरणा मिळाली; त्यांच्यात तुम्हीसुद्धा आहात! Happy आवर्जून कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही मांडलेले मुद्दे आधीच्या भागांमध्ये आले आहेत. मूळ योजना मनाली- लेहचीच होती; पण शक्यतो मेच्या शेवटी सुरू होणारा मनाली- लेह रस्ता ह्या वेळेस १ जूनच्या सुमाराससुद्धा सुरू होण्याची लक्षणं नव्हती (श्रीनगर- लेह मेच्या सुरुवातीलाच ओपन होतो; ह्या वेळी १० मे पासून ओपन होता.). त्यामुळे करगिलवरून गेलो आणि येताना मनालीवरून येण्याचा विचार होता. सायकलिंगची ब-यापैकी तयारी केली होती; सिंहगड ७५ मिनिटात चढलो होतो; तयारीचं वर्णन पहिल्या भागात दिलं आहे. इतर तपशील पुढेही विस्ताराने येतील.

सर्वांना पुनश्च धन्यवाद.

निरंजनभौ - सादर प्रणाम स्वीकारणे ....
अतिशय अकृत्रिम लेखनशैली आणि धाडसाचे पुनःपुन्हा कौतुक ... Happy