सफर माद्रिद ची....भाग २ आणि समाप्त.

Submitted by पद्मावति on 17 July, 2015 - 02:49

Palacio Real म्हणजे रॉयल पॅलेस ऑफ माद्रिद- येथील एक प्रमुख आकर्षण. युरोपातील प्रमुख राजवाड्यांपैकी याची गणना होते. याच्या सौंदर्याची तुलना फ्रांस च्या Versailles palace आणि विएन्ना च्या Schonbrunn बरोबर करतात. जवळजवळ तीन हजारहूनही अधिक खोल्या, दालने असलेला हा राजवाडा क्षेत्रफळामधे युरोपातील सर्वात मोठा समजला जातो.

या सुप्रसिद्ध राजवाड्याच्या तिकिटांच्या भयानक रांगांची ख्याती ऐकून असल्यामुळे आम्ही सकाळी लवकर आवरून, कसबसा ब्रेकफास्ट संपवून हॉटेलवरून निघालो. सुदैवाने आमचे हॉटेल अगदी या पॅलेस हून जेमतेम दहा मिनिटाच्या चालत जाण्याच्या अंतरावर असल्यामुळे सकाळी उठून टॅक्सी घ्या, बस घ्या ही चिंता नव्हती.

तिथे पोहोचलो तर तिकीट खिडकी अजुन उघडायचीच होती आणि रांगेत आम्ही दुसरे. म्हणजे तेच आम्हाला हवं होतं. युरोपात फिरताना एक लक्षात आलंय की जर तुम्हाला म्यूज़ियम्स किंवा असे महत्वाचे पॅलेस बघायचे असतील तर तिकीट खिडकी उघडतांना पहिल्या वीस-पंचवीस लोकांमधे तुम्ही पाहिजे. कारण नंतर साधारण नऊ-दहा च्या सुमाराला मोठमोठ्या टूर बसेस यायला लागतात आणि मग तूफान गर्दी सुरू होते. त्यापेक्षा थोडं लवकर उठून तिथे पोहोचले तर पुढचा हा त्रास वाचतो आणि सगळं शांतपणे बघता येतं.

तिकिटे घेऊन आत गेलो. सगळ्यात पहिल्यांदा या पॅलेस ची एक गोष्ट नजरेत भरते ती म्हणजे याचा प्रचंड विस्तार. दोन मोठी आणि देखणी उद्याने, पूर्वेला प्लाज़ा डी ओरिएंते. ह्या प्लाज़ा मधे स्पेनच्या अनेक राजांचे पुतळे एका ओळीत उभे आहेत. एक लहानशी बाग आहे, मुलांसाठी उद्यान आहे. उद्यानाला लागून लोकांना फिरायला, बसायला मोकळी जागा आहे. जवळपास कॅफेस, बार्स ची रेलचेल आहे. अगदी समोर हॉप ऑन हॉप ऑफ चा बस स्टॉप देखील आहे.

आत गेल्यावर आधी येतो तो प्लाज़ा दे ला आल्मेरा. याच्या प्रान्गणात उभे राह्यल्यावर सबंध पॅलेस चा नजारा दिसतो. खरंतर अवाढव्य आणि सुबक हे दोन शब्द एकत्र सहसा वापरले जात नाही. पण या वास्तुकडे बघितले की कळतं की एखादी प्रचंड आणि अवाढव्य वास्‍तु सुद्धा किती सुबक, सुघड असु शकते. तो सगळा दिमाख पाहूनच छाती दडपते.

बहुतेक असे राजमहाल उभारण्याच्या मागे हाच विचार असावा. राजघराण्याशी संबधित असलेल्या सर्वच गोष्टी- मग ते महाल असो किल्ले असो की शासकीय इमारती असो. सामान्य जनता या राजप्रातिकांसमोर हडबडुनच गेली पाहिजे. मग उठाव वगैरे करायची गोष्ट दूरच.
किंवा मग दुसरे कारण असेही असेल की आपल्या राज्यकर्त्यांचे ते वैभव, त्या शक्तीप्रदर्शनाने जनतेमधे एक सुरक्षिततेची भावना पण येत असेल. आपला राजा सर्वशक्तिमान आहे आणि कुठल्याही परकीय अक्रमणापासुन तो आपलं रक्षण करू शकतो असे काहीतरी त्यांना वाटत असेल.

palace 1.jpgpalace 2.jpg

आत गेल्यावर निरनिराळी दालने आहेत. त्यामधे प्रमुख आहे-- रॉयल लाइब्ररी, शस्त्रागार- जिथे अनेक प्रकारच्या तलवारी, जुनी हत्यारे, चिलखते बरेच काही. खास राजघराण्यासाठी असलेले चॅपेल आहे. थ्रोन रूम हे दालन फक्त राजा आणि राणी च्या खास पाहूणे आणि समारंभांसाठी.

काही फोटो

palace 3.jpgpalace 4.jpg

हे दोन फोटो राजवाड्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या काढले आहेत. आतल्या खोल्यांमधे मात्र फोटो काढू देत नाही त्यामुळे बाकीचे जालावरून घेतले आहेत.

palace 5.jpg
जालावरुन साभार

या पॅलेस चा मला सर्वात आवडलेला भाग म्हणजे किंग चार्ल्स तिसरा याचे राहण्याचे कक्ष. याची झोपायची, कपडे बदलण्यासाठीची, जेवायचे कक्ष सगळेच अती राजेशाही. इथलं उंची, कोरीव जड फर्निचर, नक्षीदार फ्रेम असलेले भलेमोठे आरसे, क्रिस्टल ची झुंबरे, मेणबत्त्यांचे स्टँड्स, उंच भव्य छत. त्यावर आणि भिंतीवर केलेली कलाकुसर तर नजर ठरणार नाही इतकी सुंदर.

palace 6.jpg
जालावरून साभार

palace 7.jpg
जालावरून साभार

काही कक्षातील तर संपूर्ण भिंती च्या भिंती तलम वेल्वेट किंवा त्यासारख़्या सुरेख मलमलि कपड्याने साजविलेल्या. सगळीकडे लाल, निळा, सोनेरी या रंगांचा भरपूर उपयोग इथल्या सजावटी-वर दिसतो.

एकेका दालनात गेले की वेड लागेल असे सौंदर्य, ऐश्वर्य सगळं भरभरून. एका नजरेत तर मावतच नाही. प्रथम पूर्णपणे ब्लॅंक व्हायला होतं. तोंडाचा आ आणि डोळे एव्हडे मोठाले झालेले असतात. हळूहळू सर्व बारकावे, नक्षी, कलाकुसर, रंग, रूप झिरपायला लागतं. लांब रुंद अव्वल दर्जाचे गलिचे, उत्तमातील उत्तम तलम पडदे, अतिशय उंची पोर्सेलिन, एक से एक सुंदर चित्रे, नक्षीदार भांडी, बोन चायना चे डिनर सेट्स, ब्रॉंझ चे पुतळे सगळं बघता बघता अक्षरश: मानसिक दमणुक होते.

palace 8.jpg
जालावरून साभार

palace 9.jpg
जालावरून साभार

माद्रिद दर्शनाचा आमचा शेवटचा थांबा होता Retiro Park. तीनशे पन्नास एकरांचा हा पार्क माद्रिद शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. दुपार किंवा संध्याकाळी म्यूज़ियम्स, पॅलेस बघून थकल्यावर इथे वेळ घालविणे फार छान वाटते. गरगर फिरल्यावर जरा रिलॅक्स करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. इथे लहान मुलांसाठी घसरगूंड्या, झोपाळे हे प्रकार आहेत. सायकली रेंट वर मिळू शकतात. आइस्क्रीम शॉप्स आहेत, एक आऊट-डोर जिम पण आहे. मधोमध एक अतिशय सुंदर निळा-शार तलाव आहे जिथे रो-बोट घेऊन मस्तॅंपैकी बोटिंग करू शकता.

palace 10.jpgpalace 11.jpg

माद्रिद मधे आमचे दोन-तीन दिवस अगदी छान मजेत गेले होते. बरेच बघितले होते पण खूप काही बघायचे राहूनही गेले. मुख्य म्हणजे येथील जगप्रसिद्ध Prado Museum. दूसरे म्हणजे माद्रिद हून एक तासांवर असलेले अतिशय सुंदर आणि संपन्न इतिहास असलेले शहर Toledo.

मला वाटतं की जगातील कुठल्याही प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय शहरात जा आपल्याकडे असणारा वेळ कधीच पुरत नाही. नेहमी काहीतरी राहून गेल्याची भावना रहतेच. असो.

माद्रिद मधून निघतांना वाईट तर वाटत होतं पण मनात म्हणालो ठीक आहे, माद्रिद कुठे पळून जातंय? येऊ ना पुन्हा कधी ना कधी......उम्मीद पे दुनिया कायम है...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माद्रिद कुठे पळून जातंय? येऊ ना पुन्हा कधी ना कधी......उम्मीद पे दुनिया कायम है...>>>>>>>>
प्रत्येक नव्या ठिकाणी भेट देऊन परतताना अगदी हीच हुरहुरीची भावना मनाला ग्रासून टाकते.........अजून खूप काही बघायचं राहिलंय...........
मस्त झाली माद्रिदची सफर!