फेथ हीलिंग

Submitted by प्रकाश घाटपांडे on 14 July, 2015 - 04:03

मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम् । यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम्|| समूह उन्मादाचे वातावरण तयार करुन पेशंटला त्या अवस्थेत नेण्यात येते. तो त्या उन्मादाच्या प्रभावात आला की तो आपल्या वेदना, दु:ख विसरतो. काही काळ त्याला बरे वाटते. आधुनिक उपचाराचा खर्च, त्याच्या मर्यादा पहाता फेथ हीलिंग कडे माणुस न वळला तरच नवल. रोगमुक्ती झाली नाही पण मेंदुला व पर्यायाने शरीराला बर वाटत असेल तर ती रोगमुक्ती का मानू नये असा पेशंट विचार करतो. माणूस अमर थोडाच आहे? यातच त्या फेथहीलिंग वाल्यांच यश आहे. असो!
हा व्हिडिओ पहा
https://youtu.be/gVMMIaoVTPU

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घाटपांडे,

हेट हीलिंग नावाचा एक नवीन उपचार आलेला आहे. आपल्याला कशाचातरी किंवा कोणाचातरी राग आल्यानंतर कुठेतरी जाऊन थयथयाट केला की बराच वेळ स्वतःच्या व्याधी, चिंता ह्यांचे विस्मरण होते. त्यासाठी समूह उन्मादाची आवश्यकता नसते. तो समूह उन्माद नंतर एक बायप्रॉडक्ट म्हणून निर्माण होतोच. ह्या उपचार पद्धतीसाठी एक इन्टरनेट कनेक्शन आणि विशिष्ट संकेतस्थळावरील सदस्यत्त्व फक्त आवश्यक आहे.

सर्व देव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति | ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मति दे भगवान!

>>बरं, पण मग पुढे काय? इथे नक्की कसली चर्चा अपेक्षित आहे?<<
अरुंधती कुलकर्णी तो व्हिडिओ पाहून आपल्याला म्हणजे वाचकांना काय वाटत ही चर्चा अपेक्षित आहे.

सुरवातीचा श्लोक हे सांगतो कि फेथ हीलिंग ही येशूची मक्तेदारी नाही आमच्या धर्मात पण ती गोष्ट सुरुवातीपासून आहे. असा देखील अर्थ काढता येतो

रोग फक्त औषधांनीच बरे होतात हे खरे नाही म्हणुन पर्यायी उपचार निघाले आहेत ज्यात रेकी, योगोपचार, निसर्गोपचार किंवा अन्य कोणत्या पध्दती आहेत हे जाणुन घ्यायला मी सुध्दा उत्सुक आहे.

फक्त चर्चा होणार आहे हे ग्रुहीत धरुनच मी लिहीतो आहे.

बेफि
द्वेष हीच ज्यांची आनंदाची प्रेरणा आहे ते लोक हेट हिलिंग हा उपचार वापरतात. पण या उपचाराने तात्पुरते बरे वाटते. पण नंतर मानसोपचाराची गरज निर्माण होतेच असे माझे निरिक्षण आहे.

>>रोग फक्त औषधांनीच बरे होतात हे खरे नाही म्हणुन पर्यायी उपचार निघाले आहेत<<
खर आहे. म्हणुनच व्यायाम आहार विहार या गोष्टींना मह्त्व आहे

चारोळी लेखाची सुरुवात आमच्या धर्मातल्या श्लोकानी करायची त्या करता आख्खी एक ओळ आणि येशूचा संपुर्णपणे अनुल्लेख हे तर वेगळेच काही निर्देशित करते आहे, पण असो.... संशयाचा फायदा देऊच करतो.

तर "समकालीन युगात ख्रिस्ती धर्माचे लोक 'समूह उन्मादाचे' वातावरण तयार करुन आपल्या वेदना, दु:ख विसरायला मदत करत असतील तर ते चांगले का वाईट...." असा मुद्दा आहे का ?

खरोखर बरे होणे आणि बरे 'वाटणे' यात फ़रक आहे. मुळात रोग/आजार जसा आहे तसा आहे पण उन्माद अवस्थे मधे असल्याने त्याचे दु:ख कमी होते. वेदना असतील तर त्या कमी जाणवतात. मग उन्माद अवस्था उतरल्यावर काय?परत त्या वेदना/ आजार जैसे थे च असणार का?
जी काही उन्माद/झिंग येतीये ती नेमकी कश्याने येतीये? मास संमोहन/विशिष्ठ संगीत का अजुन काही?
हे जर तात्पुरते असेल तर त्याला औषध कसे म्हणायचे?
विश्वासाने (फ़ेथ) औषध घेणे आणि बरे होणे आणि फ़क्त बरे वाटणे हे नशा करण्या सरखेच आहे. थेरपी बद्दल सांशकता आहे.

>>>अरुंधती कुलकर्णी तो व्हिडिओ पाहून आपल्याला म्हणजे वाचकांना काय वाटत ही चर्चा अपेक्षित आहे.<<<

घाटपांडे,

अश्या प्रकारे रोगनिवारणाचा जाहीर दावा करणार्‍यांबाबत नक्कीच काहीतरी कायदा असेल आणि तो पुरेसा व्यापक नसला तर करताही येईल, संबंधितांना इच्छा असल्यास!

>>>रोगमुक्ती झाली नाही पण मेंदुला व पर्यायाने शरीराला बर वाटत असेल तर ती रोगमुक्ती का मानू नये असा पेशंट विचार करतो. <<<

हा निष्कर्ष ज्या लोकांचा आहे त्यांना अडाणी किंवा भाबडे म्हणण्यापेक्षा मूर्ख म्हणावे लागेल किंवा हुषार म्हणावे लागेल. जर ते आशा बाळगून येत असतील तर मूर्ख आणि मुळातच नीट असताना रोगाचे व रोग बराही झाल्याचे अशी दोन नाटके करून पैसे मिळवत असतील तर हुषार!

हे एका चॅनेलवरही नियमीतपणे दाखवतात. त्या कार्यक्रमातील त्या लोकांच्या मते असलेले गांभीर्य राहते दूर आणि आपण खो खो हसू लागतो.

प्रत्येक सहभागी व्यक्तीचे वर्तन धादांत खोटे आहे हे सहज ओळखता येते.

बेफिकीर,

>> प्रत्येक सहभागी व्यक्तीचे वर्तन धादांत खोटे आहे हे सहज ओळखता येते.

क्या बात. आता तर यापुढे काही चर्चेची गरजच उरली नाहीये! Happy

आ.न.,
-गा.पै.

>>हा निष्कर्ष ज्या लोकांचा आहे त्यांना अडाणी किंवा भाबडे म्हणण्यापेक्षा मूर्ख म्हणावे लागेल <<
हा निष्कर्ष नसून श्रद्धाळु वा सश्रद्ध लोकांची समजूत वा श्रद्धा असते. पण मूर्ख म्हणण्याशी मी असहमत आहे.डॉ दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी प्लँचेट चा वापर केला म्हणुन अंनिसने गुन्हा दाखल करणे योग्य कि अयोग्य? या धाग्यात मी याची सविस्तर चर्चा केली आहे.
http://www.maayboli.com/node/49918?page=6#comment-3189597
माणुस या पर्यायी उपचार पद्धतीत तेव्हा जातो जेव्हा त्याला मुख्य प्रवाहातील व मॉडर्न मेडिसिन उपयोगी पडत नाही वा त्याचा गुण येत नाही.अथवा आर्थिक दृष्ट्या तो उपचार घेण परवडत नाही. माणुस हताश होतो असहाय्य बनतो त्यावेळी तो चिकित्सक दृष्टीने पाहू शकत नाही. ज्या गोष्टीचा आधार त्याला वाटतो तिकडे तो जातो. मेंदु त्याला तस करायला भाग पाडतो.प्रत्येकाच्या अनिश्चिततेला तोंड देण्याच्या क्षमता वेगळ्या असतात तशा त्या वेळो वेळी बदलत देखील असतात.कधी कधी मलाही अस वाटत की जर आपण त्यांना सक्षम व व्यवहार्य पर्याय सुचवू वा देउ शकत नाही तर ते ज्या पर्यायाचा आधार घेतात त्याची तरी टिंगल करु नये. अंधश्रद्धे पोटी का होईना जर त्यांचे चार दिवस सुखाचे जात असतील जाउ देत. तुमच्या अंधश्रद्धेचा टेकू काढून हा घ्या वैज्ञानिक दृष्टीकोना चा व विवेकवादाचा टेकू असे सोल्युशन देता आल असत तर किती बर झाल असत.

घाटपांडे,

>>>माणुस या पर्यायी उपचार पद्धतीत तेव्हा जातो जेव्हा त्याला मुख्य प्रवाहातील व मॉडर्न मेडिसिन उपयोगी पडत नाही वा त्याचा गुण येत नाही.अथवा आर्थिक दृष्ट्या तो उपचार घेण परवडत नाही. माणुस हताश होतो असहाय्य बनतो त्यावेळी तो चिकित्सक दृष्टीने पाहू शकत नाही. <<<

म्हणून सहानुभूती वाटणे वेगळे, त्या माणसाने निवडलेला पर्याय उचित आहे असे म्हणणे वेगळे. असे मला वाटते.

>>>ज्या गोष्टीचा आधार त्याला वाटतो तिकडे तो जातो. मेंदु त्याला तस करायला भाग पाडतो.प्रत्येकाच्या अनिश्चिततेला तोंड देण्याच्या क्षमता वेगळ्या असतात तशा त्या वेळो वेळी बदलत देखील असतात.<<<

सहमत आहे. पण एकुणात जग अश्या पातळीला पोचलेले आहे की एखादी विशिष्ट उपचारपद्धती बोगस आहे किंवा नाही हे आता बहुतेकांना समजते. स्टेजवरून उतरल्यानंतर तो माणूस कसा चालला, एरवी तो नेमका कसा चालतो वगैरेची उदाहरणे यू ट्यूबवरतरी नाहीत. Happy

>>>कधी कधी मलाही अस वाटत की जर आपण त्यांना सक्षम व व्यवहार्य पर्याय सुचवू वा देउ शकत नाही तर ते ज्या पर्यायाचा आधार घेतात त्याची तरी टिंगल करु नये. <<<

त्यांच्या अवस्थेची टिंगल करू नये, त्यांनी स्वीकारलेल्या पर्यायाची टिंगल करणे ही त्यांची टिंगल नव्हे. सहृदयतेने जर सीमा ओलांडल्या तर अतिरेकीही बुद्ध ठरू शकतील.

>>>अंधश्रद्धे पोटी का होईना जर त्यांचे चार दिवस सुखाचे जात असतील जाउ देत. तुमच्या अंधश्रद्धेचा टेकू काढून हा घ्या वैज्ञानिक दृष्टीकोना चा व विवेकवादाचा टेकू असे सोल्युशन देता आल असत तर किती बर झाल असत.<<<

त्यांचे चार दिवस नव्हेत तर स्टेजवर चालण्याचे चंद क्षण सुखाने जात आहेत, तेही, जर तसे खरेच काही घडत असले तर! जर खरेच तसे काही घडत असेल तर त्यावर संशोधन झालेलेही असेल. वैज्ञानिक संशोधन झालेले नसेल आणि तरीही तसे घडत असेल तर तो शेवटचा नाही तर पहिला पर्याय ठरेल रोगमुक्त होण्याचा! Happy

अरे बापरे! तो व्हिडियो आत्ता पाहिला. सकाळी गडबडीत पाहायचे राहून गेले.

हो, अशा अनेक सभा गावोगावी, शहरोशहरी भरत असतात आणि त्यांना हजारो-लाखोंच्या संख्येने उपस्थितीही असते. फेथ हीलिंग हा कोणत्या अमुक एक धर्माचा मक्ता नाही. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यांसारख्या सर्व धर्मांमध्ये 'फेथ हीलिंग' केले जाते आणि लोक प्रचंड संख्येत त्यात उपचार, करमणूक, विरंगुळा, श्रद्धा, सहानुभूती आणि मनावरचा ताण हलका करण्यासाठी सामील होतात. फेथ हीलिंग हे अनेक आदिवासी, वन्य जमातींमध्येही चालते. सुशिक्षितांमध्ये, अशिक्षितांमध्ये, गरीब - श्रीमंतांमध्ये, सर्वत्र चालते. त्यात भरपूर आर्थिक उलाढाल होत असते. किंवा प्रत्यक्षात तशी दिसत नसली तरी छुपे मार्केटिंग व छुपी उलाढाल असते. यातून किरकोळ किंवा तात्पुरता आराम मिळेल हे माहीत असूनही कित्येक लोक केवळ वेदनेतून सुटका झाली तर बघावे या उद्देशाने तिथे जातात. काही काळ त्यांना त्या वातावरणात व काही वेळा तिथून परत आल्यावरही वेदनांपासून जरा मोकळे आयुष्य जगता येते. तेवढा जरी रीलिफ मिळाला तरी तो अडचणीत सापडलेल्या, वेदनेने ग्रस्त माणसाला व त्याच्या जवळच्या व्यक्तींना हवा असतो. मग तिथे लॉजिक काम करत नाही.

वेदना ही 'मेंदूला' जाणवते व मेंदूकडून परत सर्व शरीराकडे ती संवेदना पोचवली जाते. बरोबर का?
तर त्या मेंदूलाच जर काही काळ संमोहित केले, किंवा बधीर केले तर काही काळ मेंदू बाकीच्या शरीराकडे वेदनेचा संदेश नेण्याचे बंद करेल, हे बरोबर का? माझ्या मते पेनकीलर्समध्येही हीच प्रणाली वापरली जाते ना? मूळ वेदना ही नष्ट होत नाही. परंतु तिची शरीराला (व मेंदूला) होणारी जाणीव बधीर केली जाते. करेक्ट?

घाटपांडेजी,
"प्रत्येकाच्या अनिश्चिततेला तोंड देण्याच्या क्षमता वेगळ्या असतात तशा त्या वेळो वेळी बदलत देखील असतात.कधी कधी मलाही अस वाटत की जर आपण त्यांना सक्षम व व्यवहार्य पर्याय सुचवू वा देउ शकत नाही तर ते ज्या पर्यायाचा आधार घेतात त्याची तरी टिंगल करु नये. "
<<
हे वरवर पाहता सेन्सिबल वाटत असलं तरी योग्य नाही. टिंगल केलीच पाहिजे.

अनिश्चिततेला तोंड देण्याच्या क्षमता कमी असलेल्या कमकुवत माणसांना लक्ष्य करूनच या फेथ हीलींगचे दुकान चालत असते. नुसत्याच फेथ हिलींगवर हे थांबत नाही, मांत्रिक, फकीर, बाबा, बुवा इत्यादी 'गॉडमेन' त्या 'गिर्‍हाइका'चे मानसिक, आर्थिक व प्रसंगी शारिरीक शोषणही करीत असतात.

सक्षम व व्यवहार्य पर्याय नेहेमीच उपलब्ध असतात. फेथ हिलींगने बरे होणारे आजार मानसोपचारांनी नक्किच बरे होतात. परवाच कर्नाटकातील भानामतीबद्दलची बातमी पेपरात होती, त्याची इथे चर्चाही झालेली होती. प्रशासनाने हस्तक्षेप करून मानसोपचार उपलब्ध करवले, तेव्हा ते प्रकरण आटोक्यात आले.

टिंगल करणे हा फारच माइल्ड प्रकार झाला, या असल्या 'फेथ हीलर्स'ना व त्यांच्या कारवायांना कडक पायबंद घातलाच गेला पाहिजे. ज्यामुळे तसल्या प्रकारांना बळी पडणार्‍यांची संख्या कमी होईल. हाच विचार बुवाबाजी विरोधी विधेयक आणण्यासाठीचा लढा देताना अंनिसचा होता.

आधुनिक वैद्यक आपल्या परीने प्रयत्न करीत असले, तरी ते आजही १००% ग्यारंटेड उपचार करण्याच्या स्टेजला नाही. त्यामुळेच बेफिकीरांच्या लेखात लिहिले तसे 'खिडकीवर अंगारा शिंपडून आलो' असे, किंवा पेशंटच्या रुम्समधे ते अखंड जप करणारे विजेचे यंत्र लावून ठेवणे. ऑपरेशनला नेताना अंगार्‍याच्या पुड्या डोक्याखाली ठेवणे इ. प्रकार आम्ही पाहतो; ओ.टी.च्या वेटींग रूममधे, आयसीयूच्या जवळ, सर्वधर्मीय पेशंट्सना 'फेथ' ठेवता येईल अशा देवांच्या देव्हार्‍यांची/देवळांची सोयही करतो.

डॉक्टरांवर 'श्रद्धा' असली की निम्मे आजार पळतात तोही एक फेथ हीलिंगचा प्रकार आहे, असे म्हणता येईल, ज्यामुळे आजारासोबतचे चिंता, भीती यांतून आलेली लक्षणे निघून जातात व उपचारांचा गुण लवकर येतो. पण म्हणून डॉक्टरचे दर्शन घेऊन फी रूपी दक्षिणा वाजवली की झाला बरा, असे होत नाही, हे पेशंटला ठाऊक असते.

फेथ ही फक्त इंजेक्शन देताना हात धरण्यापुरती मर्यादीत आहे. फेथ तुम्हाला 'बरे' करणार नाही, ती तुम्हाला तुमच्या आजारावर मात करायला मदत करील, हे सांगत राहणे गरजेचे आहे.

उपचारांसाठी नुसती 'फेथ' कामाची नाही. तसल्या प्रकारचे प्रचार व उपचार करणार्‍यांची पोलखोल व टिंगल करणे, हे आपल्यासारख्यांनी केलेच पाहिजे.

अन्यथा, त्या कमकुवत मनांना फेथ हीलर्स वा तत्सम चोरांपासून कोण वाचविणारा?

@ अकु

>>
माझ्या मते पेनकीलर्समध्येही हीच प्रणाली वापरली जाते ना? मूळ वेदना ही नष्ट होत नाही. परंतु तिची शरीराला (व मेंदूला) होणारी जाणीव बधीर केली जाते. करेक्ट?
<<

पेन is defined as subjective unpleasant sensation. एकाची वेदना दुसरा अनुभवू शकत नाही, ती समजवून सांगता येत नाही. तिला आम्ही व्यक्तीशः अनुभवायचे "अनप्लीझंट" इतकेच म्हणून थांबतो. तिची तीव्रता व्याख्येत 'क्वांटिफाय' केलेली नाही.

बेसिकली वेदना, ही शरीरातल्या अमुक ठिकाणी काहीतरी गडबड आहे, हा संदेश मेंदूपर्यंत पोहचविणारा डिस्ट्रेस सिग्नल आहे. वेदनेचा दुसरा उपयोग म्हणजे दुखर्‍या अवयवाला आपोआप आराम दिला जातो, ज्यामुळे 'हीलींग' 'फॅसिलिटेट' होते. (दुरुस्तीची क्रीया सुलभ होते?)

काहींदा किरकोळ वा काल्पनिक वेदनेलाही आपला मेंदू व मन, खूपच जास्त 'एक्झॅजरेटेड' प्रतिसाद देत असतो. तेव्हा त्या वेळी, ती संवेदना दाबून टाकणेही योग्य असते. यावेळी पेन "किलर्स" दिली जातात. आपला मेंदू स्वतःही 'एंडॉर्फिन्स' नावाची पेन किलर्स तयार करीत असतो. जी उदा. व्यायामानंतर येणारी वेदना दाबून टाकण्यासाठी कामी येतात. वेदना दूर नेल्यास 'बरे' होण्याची क्रिया सुलभही होते. वेदनारहित आरामाने अनेक मोठे आजारही बरे करणे, 'रेक्युपरेट होणे' शरीरास सोपे जाते.

गेट थियरीत, (मेंदूला फसवून वेदना थांबवणे) वेदना मेंदूकडे वाहून नेणार्‍या दरवाज्यातून चुकीचे सिग्नल पाठवणे असा उद्योग केला जातो. उदा. संधिवाताने दुखणार्‍या गुडघ्यावर आयोडेक्स वा टायगर बाम चोळले, की त्या त्वचेचा दाह होतो. त्वचेचा दाह, व गुडघ्यातली वेदना एकाच प्रकारचे सिग्नल, एकाच 'दरवाज्या'तून मेंदूला पाठवतात. पैकी त्वचेचा दाह हा दुर्लक्षिण्याजोगा आहे, हे मेंदूस ठाऊक असल्याने, तो त्या भागातून येणार्‍या डिस्ट्रेस सिग्नलकडे दुर्लक्ष करतो. व या मेकॅनिझमने आयोडेक्स/बाम सारख्या सरफेस इरिटंट औषधांचे काम चालते.

वेदना थांबविण्याचे इतरही मार्ग आहेत. अनेक प्रकारची, क्षमतांची वेदनाशामक औषधे उपलब्ध आहेत. ही औषधे, वेदना कमी करण्यासोबतच, सूज उतरविणे, ताप कमी करणे, झोप आणणे इ. कामेही करीत असतात.

>>मूळ वेदना ही नष्ट होत नाही.<<
तो फक्त सिग्नल आहे. तो बंद केला, अन हिलींगचे काम सुरू ठेवले, (इतर औषधे सोबत देवून) तर पेशंट लवकर, व 'वेदनारहित' रित्या Wink बरा होतो.

हे शुद्ध अवांतर आहे, पगारे. Wink (हा हलकटपणा आहे माने! या चालीवर वाचावे.)

आपण रानटि अवस्थेकडे नव्हे, तर उज्ज्वल भूतकाळाकडे जोमाने वाटचाल करीत आहोत.

इतिहास कशाला म्हणतात व तो का अभ्यासतात, हे विसरले, की असे होते.

>>>आपण महाशक्ति बनण्याकडे वाटचाल करत आहोत कि पुन्हा रानटी अवस्थेकडे जात आहोत हेच समजत नाही आहे.<<<

हा प्रतिसाद नेमका कसा काय आवश्यक आहे ते समजले तर आवडेल.

दिड मायबोलीकर, उत्तम पोस्ट. अगदी योग्य सांगितलत. Happy

---------------------------------
जरासे आणखी काही,
रोग आणि मन ह्यांची जोडी असते. कधी वेदना कमी पण मन ज्यास्त 'उगाच; संवेदनशील होते. कारण मेंदूचा तो भाग ज्यास्त अल्रर्ट करतो/होतो. कधी कधी तश्या प्रकारची जखम असेल तर , तर कधी कधी आपण(मनानेच) ज्यास्त फोकस करायला भाग पाडतो.

उदाहरण, हाड दुखावले तर तो भाग आपोआप ज्यास्त स्पाज्म मध्ये जातो. कारण तो हिलींग चा एक भाग असतो. पण अति घाबरल्याने तो भाग आणखी जखडू शकतो.

क्रमशः

समाजातले हे रानटि प्रकार नि स्व फायद्यासाठि समाजातिल मोठ्या समुहाला निर्बुध्द बनवणारे लोक नि त्यांची व्यवस्था पाहिली की दाभोळकर सर तुमचि हटकून आठवण येते.एक हरणारि लढाई तुम्हि ज्या त्वेषाने लढलात प्रतिगाम्यांना आपल्याला दुकान बंद करावे लागते की काय अशी उरात धडकी भरवलीत. त्याला माझ्या सारख्या सामान्य माणसाचा सलाम....

>>>आपण महाशक्ति बनण्याकडे वाटचाल करत आहोत कि पुन्हा रानटी अवस्थेकडे जात आहोत हेच समजत नाही आहे.<<<

हा प्रतिसाद नेमका कसा काय आवश्यक आहे ते समजले तर आवडेल.

पगारे,

उदात्तीकरण आणि मुद्देसूदपणा ह्यात फरक आहे हे तर तुम्ही जाणताच!

दाभोळकरांबाबत श्रद्धा व्यक्त करताना महाशक्ती आणि रानटी अवस्था हे दोन असंबद्ध घटक कसे एकाच प्रतिसादात एकत्र येऊ शकतात ह्यावर आपले मत मिळेल का?

पर्यायाचा आधार घेतात त्याची तरी टिंगल करु नये. >>>>> दीड मायबोलीकर ह्यात टिंगल करु नये हे विधान हतबल झालेले रोगी जे काही मार्ग स्विकारत आहेत त्याची टिंगल करु नये अशा अर्थानी लिहिलेलं आहे. (तुम्ही त्या बाबा बुवांची टिंगल/कारवाई करायला पाहिजे असं लिहिलत म्हणून हा पोस्टप्रपंच)

>>दीड मायबोलीकर ह्यात टिंगल करु नये हे विधान हतबल झालेले रोगी जे काही मार्ग स्विकारत आहेत त्याची टिंगल करु नये अशा अर्थानी लिहिलेलं आहे<<
धन्यवाद वैद्यबुवा मला अभिप्रेत असलेला अर्थ आपल्यापर्यंत अचूक पोचला याबद्दल. दीड मायबोलीकरांचे मायबोलीवरील वय १ आठवडा पाच दिवस आहे. हे खरे असेल तर त्यांना मायबोलीच उत्खनन करायला वेळ लागणार आहे.
खालील परिच्छेद हा डॉ दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी प्लँचेट चा वापर केला म्हणुन अंनिसने गुन्हा दाखल करणे योग्य कि अयोग्य? यात दिलेल्या एका प्रतिक्रियेचा निवडक भाग आहे. काहींसाठी ती पुनरावृत्ती असली तरी अनेकांसाठी हा भाग नवीन असणार आहे.
"अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. दाभोलकर हे कार्यकर्त्यांसमोर सातत्याने मांडायचे. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच.बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अ‍ॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते.
दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. समजा हे नौटंकी जरी मानले तरी त्यातून प्रबोधक व प्रबोधन घडत होते हे नाकारता येणार नाही.

Pages