निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग चार .

Submitted by किंकर on 10 July, 2015 - 11:44

निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग एक - http://www.maayboli.com/node/54551
निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग दोन - http://www.maayboli.com/node/54561
निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग तीन- http://www.maayboli.com/node/54583

वारी संतांच्या नजरेतून पाहताना, आपल्याला अलंकापुरी ते पंढरी हा ज्ञात मार्ग तर समजतोच, पण त्या पलीकडे वारीच्या निमित्ताने अज्ञाताचा प्रवास घडतो .

कारण आपण वारीचा इतिहास तपासताना प्रथम काही दशके , फार फार तर काही शतके मागे जातो. उपलब्ध कागदपत्रे किंवा जुन्या संदर्भांना कालमापनात बसवून, या सर्वात जुन्या परंपरेचे ,संस्कृती रक्षणाचे कौतुक करतो .

पण वेगवेगळे संत प्रत्यक्ष वारी किंवा पंढरी येथील सोहळा त्यांच्या नजरेतून पाहताना ,वारकऱ्यांच्या श्रद्धेला कालातीत मानतात . यात मनोभवे केलेली भक्ती एखाद्या गोष्टीचे आजचे अस्तिव , त्याचा उगम , याकडे शास्त्रोक्त नजरेने न पाहता ,अंतः करणातून आलेल्या श्रद्धेने पाहतात .

त्यामुळे खऱ्या वारकऱ्यांना पंढरपूरचा इतिहास पाहण्यात, कसलेच स्वारस्य नसते .कारण त्यांच्या दृष्टीने पंढरी ,भीमा तीर ,विठूराया यांना भूतकाळ नाही तर आहे फक्त भविष्य काळ . त्यांच्या दृष्टीने पंढरी काल होती, आज आहे, आणि उद्या हि राहील, कारण ती अविनाशी आहे . अशी हि प्रत्येक वारकऱ्यांच्या नजरेतील पंढरी, अचूक शब्दात पकडली आहे संत नामदेव यांनी. कारण ते म्हणतात -

आधी रचिली पंढरी ।
मग वैकुंठ नगरी ॥१॥

जेव्हा नव्हते चराचर ।
तेव्हा होते पंढरपूर ॥२॥

जेव्हा नव्हती गोदा गंगा ।
तेव्हा होती चंद्रभागा ॥३॥

चंद्रभागेचे तटी ।
धन्य पंढरी गोमटी ॥४॥

नासिलीया भूमंडळ ।
उरे पंढरीमंडळ ॥५॥

असे सुदर्शनावरी ।
म्हणुनी अविनाशी पंढरी ॥६॥

नामा म्हणे बा श्रीहरी ।
आम्ही नाचु पंढरपुरी ॥७॥

प्रत्यक्ष पंढरीची तुलना माहेर ते वैकुंठ ,म्हणजेच या भूतलावरील सर्वाधिक सुख देणारे ठिकाण म्हणून करताना , त्याचे महत्व ,त्याचे पावित्र्य हे शब्दातीत असल्याचे नेहमीच जाणवते. संत एकनाथ अश्या पंढरीची वारी करताना पंढरपूर आणि परिसर या सर्वांकडे किती वेगळ्या नजरेने पाहतात. त्यांना पंढरी म्हणजे आपले शरीर वाटते . शरीरात जसा प्राण रुपी आत्मा आहे,तसा पंढरीत पांडुरंग आहे .

भीमेतील पाणी फक्त पाणी नाही, तर ते उदक म्हणजे पवित्र जल आहे . पण हे जल कशाचे आहे तर भाव भक्तीचे आहे . भीमातीरी वाळवंट आहे पण त्यात वाळू पसरली आहे ती दया क्षमा शांती यांची.

म्हणजेच एकनाथ जणू काही सांगत आहेत कि ,वारी करा पुण्य जोडा पण कसे तर आत्मशुद्धीतून. गोपाळकाला करताना त्यात अनेक पदार्थांची मिसळण करावी लागते आणि ते एकत्रित कालवल्यावर त्याची गोडी अमृतासम होते . तसे आपण आपली इंद्रिये मनोविकार यावर नियंत्रण मिळवून दश दिशांना धावणारे मोह एकत्र करून त्यांना आवरले तर ती कृती देखील गोपाळकाल्या प्रमाणे अमृतासम समाधान देईल

रूपक अलंकाराचा अप्रतिम वापर करीत, नाथांनी घडवलेली हि वारी देखील आपल्याला मूळ वारी इतकाच आनंद देत राहते -

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ।
नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥

भाव-भक्‍ति भीमा उदक ते वाहे ।
बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥

दया क्षमा शांती हेंचि वाळुवंट ।
मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥

ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद ।
हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥

दश इंद्रियांचा एक मेळ केला ।
ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥

देखिली पंढरी देहीं-जनी-वनीं ।
एका जनार्दनी वारी करी ॥६॥

देहरूपी पंढरीतील या वारीत आपण जितके तल्लीन होतो, तितकेच प्रत्यक्ष वारीत देखील रंगून जातो . आणि हि तल्लीनता किती टोकाची आहे पहा. संत चोखामेळा यांना,आपल्या बरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नाचत असल्याचा भास होतो आहे . वारीत जातीहीनता उच्च ,नीच यांचा लवलेश नसला, तरी दुर्दैवाने प्रत्यक्ष पंढरीत, जुन्या रूढी, परंपरा यांची जोखडे दीर्घ काळ होती .त्यामुळे चोखोबांना देवळात प्रवेश शक्य नव्हता .

पण या परिस्थितीवर मात करताना, वारीची सांगता करताना , मंदिराच्या पायरीचे दर्शन देखील ते इतक्या भक्ती भावाने घेतात कि जणू गाभारा सोडून विठूरायाने त्यांना बाहेर येत दर्शन दिले आहे, असेच वाटत राहते. हि त्यांची निस्पृह भक्ती किती सुरेख उतरली आहे हे आपणास या रचनेत दिसते -

अबीर गुलाल उधळीत रंग ।
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥

उंबरठ्यासी कैसे शिवू ? आम्ही जाती हीन ।
रूप तुझे कैसे पाहूं ? त्यात आम्ही दीन ।
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥२॥

वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।
विठ्ठलाचे नाम घेऊ हो‌उनी निःसंग ॥३॥

आषाढी-कार्तिकी भक्‍तजन येती ।
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ।
चोखा म्हणे नाम घेता भक्‍त होती दंग ॥४॥

संत तुकाराम हे देवत्व प्राप्त झालेले संत . पण ते मात्र जन्मभर वारकरीच होते . त्त्यांनी भक्तीची इतकी विविध रूपे, आपल्या समोर उलगडली आहेत कि त्यास कसलीच उपमा देत येत नाही. त्यांनी केलेल्या रचना ,त्यातील संदेश हे कधीच न संपणारे अक्षय होते . त्यावेळच्या पंडितांनी स्व अस्तीवाच्या भीतीपोटी तुकाराम व त्यांचे साहित्य यांना विरोध केला . त्यांची गाथा इंद्रायणी नदीत बुडवली. पण ती बुडली नाही .

याठिकाणी त्या पंडितांनी जे काही इंद्रायणीत टाकले ते बाड म्हणून बुडले असेल हि कदाचित पण त्यातला संदेश कधीच बुडाला नाही . कारण तो भक्तांच्या हृदयात कोरला गेला होता . आणि अश्या न भंगलेल्या अक्षय संदेशांना लोक त्यापुढे 'अभंग ' म्हणू लागले .अशाच अभंग रचनेतून वारकरी, त्यांची तल्लीनता,पांडुरंग प्रती असलेला समर्पण भाव, तुकोबांनी उतरवला आहे या रचनेत -

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई ।
नाचती वैष्णव भाईं रे ।
क्रोध अभिमान गेला पावटणी ।
एक एका लागतील पायीं रे ॥१॥

गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा
हार मिरविती गळां ।
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव ।
अनुपम्य सुखसोंहळा रे ॥२॥

वर्णअभिमान विसरली याती
एकएकां लोटांगणीं जाती ।
निर्मळ चित्तें जालीं नवनीतें ।
पाषाणा पाझर सुटती रे ॥३॥

होतो जयजयकार गर्जत अंबर
मातले हे वैष्णव वीर रे ।
तुका म्हणे सोपी केली पायवाट ।
उतरावया भवसागर रे ॥४॥

अशा या सर्वांग सुंदर वारीच्या सोहळ्यात आपण सगळेच जावू असे जेव्हा तुकोबा म्हणतात ,तेंव्हा त्यातून किती उच्च प्रतीचे सात्विक समाधान मिळेल हे सांगताना , त्यांनी या रचनेत खूप सोपे पण अर्थवाही शब्दांची उधळण केली आहे . या वारीत सर्वांनी यावे हि त्यांची कळकळ इतकी मनापासून आहे कि आपल्या वारीच्या सहभागासाठी ते फक्त विनवणी करून थांबत नाहीत तर शपथ घालून येण्याचे साकडे घालतात -

चला पंढरीसी जाऊं ।
रखमादेवीवरा पाहूं ॥१॥

डोळे निवतील कान ।
मना तेथें समाधान ॥२॥

संता महंता होतील भेटी ।
आनंदे नाचों वाळवंटी ॥३॥

तें तीर्थांचे माहेर ।
सर्व सुखाचें भांडार ॥४॥

जन्म नाही रे आणीक ।
तुका म्हणे माझी भाक ॥५॥

अशी वारकऱ्यांची दिंडी पंढरीस पोहचली, विठ्ठलाचे दर्शन झाले कि, त्या तृपतेत मन चिंब झाल्यावर शेवटी तुकोबा म्हणतात -

जातो माघारी पंढरीनाथा
तुझे दर्शन झालें आता

तुझ्या नादाने पाहिली मी
ही तुझीच रे पंढरी
धन्य झालों आम्ही जन्माचे
नाम घेऊ तुझे आवडीचें

दीपवली तुझी पंढरी
चालू झाली भक्‍तांची वारी
तुका म्हणे भक्‍ती करा तुझी
जाती पापें जन्माची पळोनी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भक्तिरसात चिंब भिजवून टाकलेत आज .....
किती मर्मग्राही विवेचन आणि तेही इतक्या रसाळतेने.... वाचताना अश्रू अनावर झाले ...

मनापासून धन्यवाद रविन्द्रजी ... _____________/\______________