निमित्त पालखी सोहळ्याचे .

Submitted by किंकर on 7 July, 2015 - 19:17

आता लवकरच श्री क्षेत्र देहू येथुन संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होईल . तर श्री क्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होईल.आणि मग पुढील तीन आठवडे आषाढी एकादशी पर्यंत - " बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल … " या जयघोषात पालखी मार्गच नव्हे तर तर प्रत्येक वारकऱ्याचे मन देखील दुमदुमून जाईल.

आज अनेक शतकांची परंपरा असलेली हि भक्तीची गंगा देहू, आळंदी येथून निघून, जेंव्हा पंढरीस पोहचते तेंव्हा त्या ठिकाणी, वारकऱ्यांचा जनसागर 'भवसागर' होवून जातो.अनेक धर्मात उच्च,नीच जात, पात यासारख्या अगम्य गोष्टीनी माणसातील 'माणूसपण' हरवत असताना, 'भागवत धर्माची पताका ' खांद्यावर घेवून खांद्याला खांदा देत चालणारी दिंडी, हे निरपेक्ष वृत्तीचे कोणतेही कार्य अक्षय असते हाच संदेश देत आहे

आज 'वारी' म्हणजे - सुनिश्चित काळाने एखादी गोष्ट पुनः पुन्हा करणे . आणि 'वारकरी' म्हणजे - सुनिश्चित काळाने एखादी गोष्ट पुनः पुन्हा करतो तो. अशा व्याखेत हा सर्व पसारा बसवून, त्यातील व्यवस्थापन कौशल्य , त्या मागची प्रेरणा, ध्येय यांचा अभ्यास जागतिक स्तरावर सुरु झाला आहे .

'मुंबईचा डबेवाला' आणि 'पंढरीचा वारकरी' हे अभ्यासाचे विषय बनून राहिले आहेत.दररोज काळ, काम, वेग यांचे गणित संभाळत मुंबईच्या धकाधकीत डबे वेळेवर पोहचवण्याचे कसब काय ? किंवा हजारो वारकऱ्यांना उन, पाऊस, वारा यांची पर्वा न करता २००कि मी पेक्षा जास्त अंतर सैनिकी शिस्तीने नेणारा दिंडीचा मालक काय ? त्यातील व्यवस्थापन कौशल्य आता जगाचे लक्ष वेधून घेत आहेत .

या अभ्यासकांना या कामा मागची प्रेरणा शोधायची आहे .पण प्रत्येक ध्येय पूर्तीचे उदिष्ट हे नेहमीच अधिक पैसा किंवा अधिक मान, उच्च पद इतकेच असते का ? हे सर्व मिळवल्यावर उदिष्ट पुर्तीकर्ता हा संपूर्ण यशस्वी असतो का ? या प्रश्नांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न विविध स्तरांवर होताना दिसतो .

पण यश म्हणजे पैसा , यश म्हणजे प्रसिद्धी ,का त्या पलीकडे मनः शांती , अनुभूती या गोष्टींचा प्रभाव माणसाच्या यशस्वीतेच्या प्रवासावर असतो ? या सर्वांचा कार्यकारण भाव जेंव्हा समजेल, तेंव्हाच या अभ्यासकांच्या हाती या दिंडी सोहळ्याचे आणि पालखी व्यवस्थापनाच्या यशाचे गमक लागेल .

मात्र गेली अनेक दशके चालणारी हि परंपरा आणि हा भक्ती मार्ग समजावून घेताना ,पारमार्थिक बाजू सामान्यांना समजावून देण्याचे कार्य कोणी केले असेल तर ,ते संत परंपरेने .आणि म्हणून आज सुरु झालेला हा पालखी सोहळा आपणही काही दिवस साजरा करू या. अर्थात त्यासाठी आपण प्रयत्न करू या संतांच्या नजरेतून विठूराया ,माउली ,पांडुरंग यांच्या दर्शनाचा.

मात्र या संत रचना माउली दर्शन, भक्ती या बरोबर सत्संग , नाम संकीर्तन ते संसारिक पाश, समाजरचना यावर विविध भाष्य करताना दिसतात. आणि म्हणूनच - 'ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस' या उक्ती प्रमाणे तयार झालेल्या , सर्वच संतांच्या सहभागातून बनलेल्या मंदिराचे पावित्र्य समजावून घेण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न. अर्थात यासाठी निमित्त पालखी सोहळ्याचे .

तर सुरवातीस प्रयत्न करू या संत ज्ञानेश्वर यांच्या भक्ती रचना आणि त्यातील संदेश पडताळून पाहण्याचा -

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥

हे चराचर चालवणाऱ्या देवा माझ्या प्रार्थनेने संतुष्ट होत तू मला असे दान दे कि ज्यामुळे सर्व विश्वाचे कल्याण होईल . म्हणजे देव पावला पाहिजे हा हट्ट आहे, पण या हट्टात एक आर्जव आहे ते विश्वाच्या कल्याणाचे.

या रचनेतील प्रत्येक शब्द वाढत्या श्रेणीने प्रत्येक प्राणिमात्राचे अंतिम कल्याण कसे होईल याची विवंचना करताना दिसतो. संत ज्ञानेश्वर यांनी त्यांच्या अनेक भक्ती रचना पूर्णत्वास नेताना - बाप रखुमादेवी-वरूं असे म्हणत किंवा थेट पांडुरंग ,विठ्ठल यांचा नामोल्लेख करत आपले साकडे घातले आहे पण पसायदानात मात्र ते देवाचा उल्लेख हे विश्वाच्या देवा असा करतात

याठिकाणी त्यांची भावना फक्त विश्व कल्याण या अति उच्च संकल्पनेत या साठी रममाण आहे कारण त्यांना मनापासून असे वाटते आहे -

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

आणि या अभूतपूर्व प्रार्थनेचे समर्पण करताना सर्व प्राणीमात्रांचे सुख हाच परमोच्च सुखाचा क्षण असल्याने , मी मागितलेले दान माझ्या पदरात पडले तर विश्वाच्या कल्याणाने सर्वात सुखी मीच होणार आहे असे म्हणत ते म्हणतात -

येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
दिंडी आणि पालखी यांची परंपरा खूप जुनी काही शतके मागे जाणारी असली,तरी संत ज्ञानेश्वर यांच्या काळात वारीचे स्वरूप कसे होते याची निश्चित माहिती नाही . परंतु पंढरी आणि विठूराया मात्र त्यांच्या रचनेत ठायी ठायी आढळतात त्यामुळे ते विठूरायास विचारतात - मी तुला नक्की कोणत्या रुपात पाहू ?
तू सगुण साकार आहेस कि निरून निराकार आहेस ? आणि मग त्याच्या विविध रूपाचे वर्णन करताना तुला काय म्हणू ? असा प्रश्न विचारतात . या ठिकाणी
खरे तर हा प्रश्न ज्ञानदेवांना पडला असेल असे मला तरी वाटत नाही ,पण सामान्य भक्तांना निर्माण होणारा संभ्रम दूर करण्यासाठी त्यांनी हि परिपूर्ण रचना साकारली आहे.
त्यामुळे -तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे ।
सगुण-निर्गुण एकु गोविंदु रे ॥१॥
अशी सुरवात करीत ते देवास तू स्थूल सूक्ष्म , आकार निराकार ,दृश्य अदृश्य ,व्यक्त अव्यक्त असा कसाही असलास तरी विठ्ठल रूप गोविंद तूच आहेस असे सांगताना ,शेवटी गुरु कडून प्राप्त झालेल्या ज्ञाना नुसार, तूच आमचा माय बाप आहेस हे स्पष्ट करण्यासाठी म्हणतात –
निवृत्ती प्रसादें ज्ञानदेवो बोले ।
बाप रखुमादेविवरू विठ्ठलु रे ॥७॥

संत ज्ञानेश्वर यांची बुद्धिमत्ता अलौकिक असली तरी त्यांची विठ्ठला प्रती भक्ती एक सामान्य भक्त म्हणूनच होती. त्यामुळे जेंव्हा त्यांना प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन झाले तेंव्हा त्या प्रसंगास ते दुर्लभ तर म्हणतातच ,पण पुढे जावून एखाद्या योग्यास जे दुर्मिळ आहे, ते माझ्या माउलीचे दर्शन मला झाले हे सांगताना ते म्हणतात -
योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी ।
पाहतां पाहतां मना न पुरे धणी ॥१॥
आणि या दर्शनाचे वर्णन करताना ते म्हणतात विठ्र्रायचे हे दर्शन मला अनेक प्रकारे झाले आहे पण त्याची नोंद माझ्या मनी मात्र माझी माउली म्हणून झाली आहे . त्यामुळे या रचनेच्या अखेरीस त्यांच्या ओठी शब्द येतात-

अनंत रूपें अनंत वेषें देखिला म्यां त्यासि ।
बाप रखुमादेवी-वरूं खूण बाणली कैसी ॥३॥

असे हे विठ्ठल भक्तीचे महात्म्य आपल्याला समजेल तितके उलगडण्याचा प्रयत्न आपण हि काही दिवस करू …
तर या प्रथम लेखाची सांगता करताना -" बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकराम
पंढरीनाथ महाराज कि जय "…
(क्रमशः )
निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग दोन - http://www.maayboli.com/node/54561

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री. किंकरजी - खूप सुरेख, अभ्यासपूर्ण, भावपूर्ण लिखाण आहे हे. मनापासून धन्यवाद.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत....

आगाऊ मनापासून धन्यवाद.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत....

का काय माहीत नाही पन त्याच्या (विठ्ठल) नावाने देखील डोळे भरु लागतात.

पुरंदरे शशांक ,सगुना , क्रिश्नन्त - आपल्या शुभेच्छा आणि विठुरायाचा आशीर्वाद पुढील लिखाणास नक्कीच प्रेरणा देत राहील . धन्यवाद !