जनसामान्यांची संघटना : शिवसेना

Submitted by नवनाथ राऊळ on 19 June, 2015 - 07:25

शिवसेना आज सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने थोडंसं....
------------------------------------------------------------------

नमस्कार मित्रांनो...

आपल्या व्यस्त दिनक्रमातून आणि बहुमूल्य वेळातून काही मिनीटे हवी आहेत मला... थोडी, आपण हे वाचण्यासाठी आणि थोडी, त्यावर चिंतन करण्यासाठी...
द्याल ही अपेक्षा आहे...

मी कोण आहे हे महत्वाचे नाही... मी तुमच्यापैकीच एक सामान्य मराठी माणूस आहे.. अगदी तुमच्यासारखाच..!
महाराष्ट्रावर जिवापाड प्रेम करणारा आणि उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची निस्सीम भक्ती करणारा असा एक सामान्य मराठी माणूस..!

आज महाराष्ट्रातील सत्तालोलुप आणि भ्रष्ट राजकारण्यांनी आणि तथाकथित समाजधुरिणांनी राज्याच्या वर्तमानाचे आणि भविष्याचे वाभाडे काढायचे जे उद्योग आरंभिले आहेत ते पाहून जीव तीळ तीळ तुटतो...

हाच का तो महाराष्ट्र जिथे संतविभूतींनी जन्म घेऊन येथील भूमीवर ज्ञानामृताचा सडा शिंपला आणि समाजोद्धाराचे कार्य केले..?
हाच का तो महाराष्ट्र ज्याकरिता शिवरायांनी आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी अहोरात्र खस्ता खाल्ल्या..?
हाच का तो महाराष्ट्र जो घडविण्यासाठी राजे आणि त्यांचे पराक्रमी मावळे पंचप्राण तळहाती घेऊन लढले..?
हेच का ते स्वराज्य जे उभे करण्याकरिता छत्रपतींच्या निष्ठावान मावळ्यांनी धारातीर्थी देह ठेवले..?

बघा, उत्तर सापडतंय का..?
खरंच, असह्य झालंय आजकालचं राजकारण, आणि म्हणून लिहावसं वाटलं...

शिवरायांनी मराठी माणसाला दिलेला अभिमान, स्वाभिमान आणि सन्मान; हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे (साहेबांना कैलासवासी मानायला मन तयार होत नाही) यांनी शिवसेनेच्या रूपाने पुन्हा जागवला... राख बाजूला सारून तो विस्तव पुन्हा चेतवला... आणि मराठी माणसाला खडबडून जागा केला...
त्यांचे हे कर्तृत्व आणि मराठी माणसाच्या दृष्टीने शिवसेनेचे महत्व वादातीत आहे...

एका राजकीय पक्षाला पहावे लागते, तशा सर्व प्रकारचे यशापयश आजमितीस शिवसेनेने पाहिले... एक राजकीय पक्ष म्हणून सर्व तऱ्हेचे धक्के झेलले, पचवले आणि दिलेही..!

तरीही जनसामान्यांची ही संघटना बाळासाहेंबाच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे आणि शिवसैनिकांच्या अढळ निष्ठेमुळे सदैव खंबीरपणे उभी राहिली...
जनमानसांतील शिवसेनेचा प्रभाव, स्थान आणि प्रेम कधीही कमी झाले नाही...
आणि म्हणूनच केवळ मतपेटीच्या आकड्यांच्या जोरावर या जनप्रेमाचे मोजमाप करणे अविचाराचे ठरेल...

दुर्दैवाने बाळासाहेब आज आपल्यात नाहीत. आज त्यांच्यापश्चात; 'आताची शिवसेना ही तेव्हाची राहिलेली नाही...', 'बाळासाहेब असताना ठीक होते.. आता कशाला शिवसेना..?' वगैरे प्रकारचे सूर काहीजणांनी आळवलेले अनेकदा कानी येतात... या लोकांना मी एकच प्रश्न विचारू इच्छितो की, शिवरांयांच्या मृत्युनंतर, 'आता कशाला हवे स्वराज्य?' असे म्हणत जनतेने स्वराज्य पुन्हा मुघलांच्या आणि यवनांच्या ताब्यात दिले असते तर ते तुम्हाला चालले असते का..?
आजही का तुम्ही महाराजांच्या शौर्याचे पोवाडे गात त्यांनी उभारलेल्या रामराज्याची उदाहरणे देता..? तेव्हा नाही ना वाटत की आता राजे नाहीत, आता कशाला आस धरायची सुराज्याची..? मग महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी निर्माण झालेल्या शिवसेनेबाबत असे का बोलता..?

बाळासाहेबांनी शिवसेना उभारून मराठी माणसाला एक वारसा दिला आहे.. त्यांच्यापश्चात आज तो जतन करायचीही बुद्धी आपणांस होऊ नये का..???

शिवसेनेवर मालकी हक्क केवळ मराठी माणसाचा.. महाराष्ट्राचा.. अन्य कुणाचाही नाही...
आणि हा वारसा आपण प्राणपणाने जपणे हे आपले कर्तव्य आहे.. तीच बाळासाहेबांना आदरांजली आणि तीच खरी श्रद्धांजली ठरेल...

शिवसेना केवळ एक राजकीय पक्ष नसून महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, विकासासाठी आणि उत्कर्षासाठी स्थापन झालेली एक संस्थाच आहे..! इतर प्रादेशिक पक्ष आणि शिवसेना यांत जडणघडणीच्या बाबतीत जमीन-अस्मानाचा फरक आहे.. म्हणूनच शिवसेनेची तुलना इतर पक्षांशी करणे तर्कसंगत ठरणार नाही...

मुंबईत १९९२ च्या दंगलीत धर्मांध माथेफिरूंनी हाहाकार माजवला होता. अशा वेळी त्यांना वठणीवर आणून मुंबईला वाचवले ते निधड्या शिवसैनिकांनीच..! मुंबईच्या रक्षणाला अखेर शिवसेनाच धावली हे उघड आणि वादातीत सत्य आहे आणि त्यावेळी शिवसेना नसती तर काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही...
यास्तवच मराठी माणसाला शिवसेनेचा नेहमी आधार वाटत आलेला आहे.. आपुलकी वाटत आलेली आहे... आणि हीच आपुलकी आपल्याला जपायची आहे.. आपला पक्ष, आपली संघटना आपणच घट्ट करणार, आपणच दुरुस्त करणार, आपणच जतन करणार, नाही का..?

केवळ एवढेच नाही, तर बेळगांवातील सीमावासिय मराठी बांधवांवर होणारे अत्याचार, महाराष्ट्रात परप्रांतियाचे होणारे अनिर्बंध अतिक्रमण, वगैरे वादग्रस्त प्रश्नांविरुद्ध शिवसेना आजपावेतो सतत लढत आलेली आहे...
शिवसेनेने केलेली आंदोलने आणि संघर्ष सर्वांसमक्ष आणि सर्वश्रुत आहे... कारण महाराष्ट्रची अस्मिता जपण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध आहे...

मा. शिवसेनाप्रमुखांचे २०% राजकारण आणि ८०% समाजकारण हे समीकरण प्रत्येक राजकीय पक्षासाठी आदर्शवत असेच आहे... आम्ही महाराष्ट्रात मराठी आणि हिंदुस्थानात हिंदू आहोत या आपल्या विधानावर ते सदैव ठाम राहिले. आणि बाळासाहेबांनी दिलेले हे संस्कार सच्चा शिवसैनिक कधीही विसरणार नाही...

म्हणूनच आपण सर्व मराठी बांधवांनी महाराष्ट्राच्या हिताकरिता इतर सर्व प्रकारचे स्वार्थ, भेद, आमिषे, प्रलोभने आणि हेवेदावे विसरून एकजुटीने शिवसेनेच्या पाठिशी राहिले पाहिजे. शिवसेना सुधारली पाहिजे.. जगवली पाहिजे आणि तगवलीही पाहिजे.. आपल्याच हितासाठी..!

आग्रह नाही, हे निवेदन आहे.. आणि यावर निर्णय तुमचाच आहे..!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहमत! शिवसेना आणि सैनिक नेहमीच सामान्यांसाठी झटणारे राहिले आहेत! शिवसेनेच्या वर्धापन दिनी हार्दिक शुभेच्छा आणि उत्तरोत्तर प्रगतीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना!

छान आहे लेख. बहुतांश पटला. तरीही शिवसेना फार बदलली आहे हे मात्र नक्की. हा बदल अर्थातच वाईट आहे. लहानपणी राजकारणातला ओ की ठो कळत नसतानाही जय भवानी जय शिवाजी म्हणायला एक मजा यायची, शिवसेना शाखा म्हणजे एक अशी जागा जिथे राजकारणाच्या पलीकडे एक समाजकारण करणारे मंडळ भरते असे वाटायचे, निवडणूक काळात पलीकडच्यांच्या पावभाजीपेक्षा शिवसेनेच्या टेबलावर मिळणारा वडापाव भारी वाटायचा... अर्थात शिवसेना म्हणजे शिवरायांचा पक्ष असाही एक समज बालमनात होता, तसेच बाळासाहेब या व्यक्तीमत्वाबद्दल प्रचंड आदरही मनात होता, जो आजही आहेच.. तरीही ज्या कारणासाठी हे होते ते सारे तसेच राहीले नाहीये, किंवा मोठे होता होता माझा पॉलिटीकल व्यू बदलला असेल म्हणा. हल्ली कुठलाच पक्ष आपला वाटत नाही तसेच शिवसेनाही आपली वाटत नाहीच. अगदी मी त्यांना मत दिले तरी ते ईतर सर्व पर्याय चाचपून एक निवडलेला पर्याय असतो. मध्यंतरी "माझे नाव शिवसेना" म्हणून ज्या कल्पक जाहीराती लागायच्या त्या मला माझ्या बालपणात घेऊन गेलेल्या काही काळ, पण आजच्या पार्श्वभूमीवर त्या मला नकली वाटायच्या. बाकी आमच्या भल्यामोठ्या फॅमिलीमध्ये अपवाद वगळता जास्त करून शिवसैनिकांचाच भरणा आहे, एवढाच काय तो आता आपलेपणा.

Same here, ऋन्मेऽऽष... फक्त एवढंच म्हणायचं होतं की पावसाळा at its best.. घर गळणारच.. कौलारू आहे...
पण आपलंच आहे शेवटी.. आपणच नको का दुरूस्त करायला.. Happy

पाउस् असुनही घराबाहेर पडावे लागले सारी मुंबइ ठप्प झलिय.लेख आवडला. तुंबलेल्या पाण्यात उभा आहे.तिथुनच शिवसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेछा

लेख आवडला... शिवसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा...

बाळासाहेबान्नी शुन्यातुन सर्व निर्माण केले. मला त्यान्ची मते, धडक कृती पटत नसली तरी अगदी रोखठोक मत व्यक्त करणारी राजकाणातील ते अत्यन्त दुर्मिळ व्यक्तीमत्व होते.

शिवसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा... >>+१

Why below statement? I thought ShivSena is in power in MH??
आज महाराष्ट्रातील सत्तालोलुप आणि भ्रष्ट राजकारण्यांनी आणि तथाकथित समाजधुरिणांनी राज्याच्या वर्तमानाचे आणि भविष्याचे वाभाडे काढायचे जे उद्योग आरंभिले आहेत ते पाहून जीव तीळ तीळ तुटतो...

कोणी काहीही म्हणा ... सेना नेहमीच आपलं माणूस वाटत आलीय. हे आपलंपण बाळासाहेबांनी निर्माण केल आणि उद्धव साहेबांनी टिकवलं, हेही नसे थोडके.

पण हे आपलेपण ८०% राजकारण आणि २० % समाजकारणाच्या टक्क्यांमध्ये किती टिकत ते बघावं लागणार.

लेख चांगला आहे..
बाळासाहेबांच्या वादातीत कर्तृत्वाला साष्टांग दंडवत ..

राजकीय मते मोठे होता काहीशी बदलत गेली तरी शिवसेनेबद्दल जो आपलेपणा वाटतो तो आहेच ..

मराठी माणसामध्ये एक प्रकारचा 'मोडेन पण वाकणार नाही' प्रकारचा अॅटिट्यूड आहे. तोच तंतोतंत अॅटिट्यूड राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेचा आहे. त्यामुळे तो आपलेपणा वाटत असावा..

माझी राजकीय मते शिवसेनेपेक्षा भाजपशी जास्त जवळीक साधतात तरीसुद्धा या वेळेसच्या सरकार स्थापनेवेळी भाजप कडून शिवसेनेचा अपमान होतोय अस वाटून भाजपचा राग यायचा. आपलाच अपमान होतोय अस वाटायचं..

बाळासाहेब गेले त्यावेळीच तर लख्ख आठवत मला. त्या नंतर एक दिवस सोडूनच माझा पेपर होता. आभ्यास करण खूप गरजेच होत पण मनच लागल नाही. सारख ते टिव्हीवर पाहिलेले ते दृश्य, बाळासाहेब परत या म्हणून आक्रोश करणाऱ्या स्त्रिया, तुडुंब भरलेले रस्ते डोळ्यासमोर येत असत..
घरातसुद्धा त्या दिवशी एक स्मशानशांतता पसरलेली होती. आमच्या सगळ्यांच्या डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते नकळत !! Sad

असो..

लेखाबद्दल खूप धन्यवाद ..
नाहीतर या भावना कुठे व्यक्त केल्या असत्या ..

सरकार स्थापनेवेळी भाजप कडून शिवसेनेचा अपमान होतोय अस वाटून भाजपचा राग यायचा. आपलाच अपमान होतोय अस वाटायचं >>> +१

माझी राजकीय मते शिवसेनेपेक्षा भाजपशी जास्त जवळीक साधतात तरीसुद्धा या वेळेसच्या सरकार स्थापनेवेळी भाजप कडून शिवसेनेचा अपमान होतोय अस वाटून भाजपचा राग यायचा. आपलाच अपमान होतोय अस वाटायचं..
>>>>

भावनिक दृष्ट्या तसं वाटलं असल्यास सहमत.

परंतु निवडणूकीपूर्वी आणि नंतरही राजकीय परिस्थिती आणि सेनेच्या नेतृत्वाचा अडेलतट्टूपणा याचा साकल्याने विचार केला तर भाजप नेत्यांचं फारसं काही चुकलं होतं असं वाटत नाही. कोणत्याही परिस्थितीत भाजप सरकारमध्ये उघडपणे राष्ट्रवादीबरोबर बसू शकत नव्हता, अशावेळी लोकसभेच्या निकालानंतर अनेक विधानसभा मतदारसंघांत भाजपला आघाडी आहे हे स्पष्ट दिसत असूनही सेना नेतृत्वाने जो आडमुठेपणा केला त्याचा विचार केल्यास केवळ भाजप होता म्हणून सेना सत्तेत सहभागी आहे हे स्पष्ट आहे.

भावनिक दृष्ट्या तसं वाटलं असल्यास सहमत. >>>> हो काही प्रमाणात भावनिकदृष्ट्या वाटत होते. पण पूर्णपणे नाही.

<<< अशावेळी लोकसभेच्या निकालानंतर अनेक विधानसभा मतदारसंघांत भाजपला आघाडी आहे हे स्पष्ट दिसत असूनही सेना नेतृत्वाने जो आडमुठेपणा केला त्याचा विचार केल्यास केवळ भाजप होता म्हणून सेना सत्तेत सहभागी आहे हे स्पष्ट आहे.>>>

भाजपची त्यावेळी अशी अपेक्षा दिसत होती कि शिवसेनेने गपगुमान भाजप सोबत यावे. भाजप देईल ती पदे निमुटपणे घ्यावी. अशी अपेक्षा का करावी त्यांनी.?
भाजप मोठा भाऊ आणि शिवसेना छोटा भाऊ झाले होते पण याचा अर्थ शिवसेनेचे महत्व शून्य तर नक्कीच नव्हते ना. भाजपला प्रतिमा चांगली ठेवून सरकार मध्ये सामील होण्यासाठी शिवसेनेची गरज होतीच..
तरी त्यांनी राष्ट्रवादीची भीती घालून उगाचच काहीतरी गोंधळ निर्माण करून शिवसेनेच्या तलवारीची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी शिवसेनेने सत्तालोलूप पणा न दाखवता खंबीर भूमिका घेतली तो अस्सल मराठी बाणा वाटला (मला) .

प्रकु,

निवड्णूकीनंतर भाजपने शिवसेनेला राष्ट्रवादीची घातलेली भिती हा सेनेच्या नेत्यांच्या जागावाटपाच्या वेळच्या अरेरावीला आणि आक्रस्तळेपणाला उत्तर होतं हे माझं वैयक्तीक मत. भाजपा नेते फारशा जागा वाढ्वून मागत नसताना अगदी पंधरा-वीस जास्तं जागा देण्यासही सेनेने जो नकार दिला त्याचा हा परिपाक असावा. सेना नेतृत्वाला महाराष्ट्रात आपणच निवडून येणार या असलेल्या ओव्हरकॉन्फीडन्समधून ते घडलं असावं. कदाचित लोकसभेला सेनेच्या आलेल्या जागांमागे मोदींचा करिष्मा होता हे पचवणं सेनेला जड गेलं.

मवीदे,

मोदींचा करिश्मा होता हे निर्विवाद सत्य आहे. पण महाराष्ट्र भाजपला तो करिष्म्याचा फील त्या वेळी जरा जास्तच मोठ्या प्रमाणात येत होता अस मला वाटत.
त्यामुळे भाजपची नेहमी अशी अपेक्षा होती कि शिवसेनेने हा करिश्मा मान्य करून पूर्णपणे त्यांना सरेंडर व्हाव. स्वतःच अस्तित्वच विसरून भाजप म्हणेल तस कराव.
शिवसेनेलाही मोदींचा करिश्मा आहे हे आतमध्ये मान्यच असाव पण त्यासाठी त्यांनी स्वतःच वेगळ अस्तित्वच सोडून द्याव ही भाजपची अपेक्षा जरा जास्त होती अस मला वाटत.

थोडक्यात या भानगडी झाल्या तो करिश्मा किती प्रमाणात आहे याच दोन्ही पक्षांच इंटरप्रीटेशन वेगवेगळ होत त्यामुळे ..!

बाकी तुम्ही एका बाजूने पाहत आहात आणि मी दुसऱ्या !
सो तुम्ही कट्ट्यावर म्हणालात तस लेट्स अग्री टू डीसअग्री हियर! (विथ नो हार्ड फिलिंग्स लिहायची गरज वाटत नाही तुमच्या साठी Happy )

धन्यवाद !!

बाकी तुम्ही एका बाजूने पाहत आहात आणि मी दुसऱ्या !
सो तुम्ही कट्ट्यावर म्हणालात तस लेट्स अग्री टू डीसअग्री हियर! (विथ नो हार्ड फिलिंग्स लिहायची गरज वाटत नाही तुमच्या साठी स्मित )
>>>>>

ऑफकोर्स प्रकु,

यात आपलं वैयक्तीक काहीच नाही आफ्टरऑल Happy

मोदींच करिष्मा होता हे सेना भाजप दोघांनाही मान्यंच होतं हे निर्विवाद. परंतु सेनानेत्यांची त्यावेळची वक्तव्यं म्हणजे वस्तुस्थिती नाकारण्याचा उत्तम नमुना होता. विशेषतः संजय राऊतनी सामनातून जे काही अग्रलेखांचं सत्रं चालवलं होतं, त्यामुळे सामान्य शिवसैनिकांचीही अशीच समजूत झाली असावी की मोदींचा करिष्मा वगैरे काही नसून सेनेचे खासदार स्वतःच्या कर्तृत्वावरच निवडून आले.

भाजप नेत्यांनीही काही प्रमाणात जागावाटपावरुन सेनेला ताणून धरलं होतं हे खरं, पण तो अर्थातच कुरघोडीच्या राजकारणाचा भाग होता जो सेनेनेही केलाच होता. भाजप बरोबर नसतानाही आपण पूर्ण बहुमताने निवडून येऊ हा सेनेचा भ्रम होता आणि सेनेविना आपल्याला बहुमत मिळेल हा भाजपचा. दोघांना एकमेकांविना पर्याय नाही हे उघड सत्य असूनही दोन्हीकडच्या नेतृत्वाकडून काही बालिश चुका झाल्या.

नमस्कार नवनाथ,
विष्या कडे वळण्याआधी थोडी मागची माहीती सांगतो, कारण "शिवसेना बदलली" हा सुरवातीचा आरोप आज काहि ठिकाणी तथ्यांशात बदलत चाललाय.
मी मुळचा ठाणेकर.
घरी सगले वातावरण सेनामय. वडील(आज वय वर्ष ७८- आजही युतिचा उमेदवार न म्हणता सेनाचे कोण आहे रे असे विचारणारे कट्टर सैनिक, काहिकाळ सेनेच्या रिक्षा युनियनचे पदाधिकारी हि होते)
वडीलांनी क्रुष्णा देसाई ते दिघे साहेब हि सगळीच स्थित्यंतरे पाहिली. आणि अर्थातच त्यामुळे किमान १९८० ते २००३या काळात मी हि त्या भगव्या वादळाचा हिस्सा होतो.
आजही मोठे साहेब (बाळासाहेब)आणि दिघेसाहेब याच नावांचा उच्चार त्याच प्रतिमांसकट मनात असतो.
पण तरीही काही गोष्टींची खंत मनात सलतच राहाते...
शाखेत या तिथे च बोलु असा निरोप आल्यावर पुर्वी सर्व सामान्य माणुस आपल्या सर्व अड्चणी आना दुर होतील इतका आश्वस्त होताना मी पाहिलाय.
आणि आज शाखेतल्या निरोपाचा अर्थ नवीन तोडपाणी असाही होतो हे हि मि पाहिल्यय ...
याला वचक म्हणा/जिव्हाळा म्हणा/ विश्वास म्हणा
८० % समाजकारण आणी २०% राजकारण हा मुद्दा कधीच मागे पडलाय.

प्रकु,

>> सेना मोदी इफेक्ट नाकारू पाहत होती हे खरय..

पण त्यामुळे शिवसेनेचा प्रचंड फायदा झालाय. लोकसभेत सेनेने भाजपसोबत लढून २०% मतं खेचली तर विधानसभेत भाजपविरुद्ध लढून १९% मिळवली (स्रोत : निवडणूक आयोग). महाराष्ट्रात सेनेकडून मोदी लाटेचा यशस्वी सामना केला गेलाय. आज मोदी नसते तर महाराष्ट्र भाजपमध्ये निवडून येण्यासारखं काय आहे?

एक गोष्ट निदर्शनास आणून द्यावीशी वाटते. आपण समजतो तशी शिवसेना जागावाटपाबाबत आडमुठी कधीच नव्हती. युती भाजपने तोडली आहे. नगरच्या प्रचारसभेत राजीवप्रताप रूडी यांनी याची स्पष्टपणे कबुली दिली आहे. म्हणे आमचे कार्यकर्ते युतील कंटाळले आहेत. Rofl महाराष्ट्र भाजपचे असे किती सक्रीय कार्यकर्ते आहेत? आणि त्यांनी असे काय मोठे दिवे लावलेत की शिवसेनेसोबत राहून आता ते कंटाळलेत? आज मुंडे असते तर युती तुटून दिली नसती. तर मग मुंड्यांच्या निधनानंतर अवघ्या ६ महिन्यांत असा काय मोठा हृदयपालट झाला महाराष्ट्र भाजपच्या कार्यकर्त्यांत? काही नाही! युती तोडायचं वरूनंच ठरलं होतं. बातम्या फक्त अशा द्यायच्या की शिवसेना दुराग्रही असल्याचा समज व्हावा. उद्धव त्याला बधले नाहीत याबद्दल त्यांचं अभिनंदन.

फक्त एक गोष्ट मला पटली नाही. ती म्हणजे शिवसेनेचे सरकारात सामील होणे. भाजपच्या सरकारची पुरती अब्रू घालवायला हवी होती.

आ.न.,
-गा.पै.

एक गोष्ट मला पटली नाही. ती म्हणजे शिवसेनेचे सरकारात सामील होणे.

>> युती करायलाच नको होती परत सेनेने. बसले असते भाजप्ये साहेबांपुढे झुलत.

फक्त एक गोष्ट मला पटली नाही. ती म्हणजे शिवसेनेचे सरकारात सामील होणे. भाजपच्या सरकारची पुरती अब्रू घालवायला हवी होती. +१
भाजप आणि एनसीपीची मिलीभगत आधी पासून होती. युती भाजपनेच तोडली. युती आणि आघाडी तुटायच्या बातम्यामध्ये काही क्षणाचा फरक होता. भाजप आणि एनसीपी ने आधीपासून सेटिंग केली होती. आवजी मतदान , एनसीपीचा बाहेरून / अनुपस्थ्तीतित राहून विश्वासदर्शक ठरावाला पाठींबा यामुळे जनतेने भाजपला घातलेल्या शिव्या यामुळेच भाजपला उपरती झाली (फडणवीस स्वतः म्हणाले तसे २० वर्षात त्यांना बसल्या नव्हत्या तेवढ्या शिव्या त्या २ दिवसात बसल्या). अमित शाह, मोदी , गडकरी आणि पवार ,प्रफुल पटेल वगैरेंचे संबंध जुनेच आहेत. अमित शाह सारखा बनियाबुद्धीच्या नेतृत्वाला एनसीपी बरोबर जाण्यात काही हरकत असायचे कारणच नाहि. एनसीपीवर एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे दुसरीकडे त्यांच्याशी मिलीभगत करायची हि भाजपेयी दुटप्पी वृत्ती आहे. सेना सरकारात सहभागी झाल्याने भ्रष्ट एनसीपी नेत्यांवर काही कारवाई होईल अशी आशा आहे. तसेच १५ वर्षे सत्तेबाहेर बसल्याने अजून किती हा प्रश्न आमदारांना अस्वस्थ करत असावा नाहीतर सेनेने खरेतर विरोधात बसायला हवे होते आणि जुमला पार्टी -एनसीपीची मिलीभगत अजून ठळकपणे जनतेसमोर उघड करायला हवी होती . भाजपकडे छोटे मित्रपक्ष , केंद्रातला पूर्ण फौजफाटा, मोदी , जाहिरातबाजी करूनही सेनेने एकट्याच्या जोरावर ६३ आमदार निवडून आणले ही त्यांची उपलब्धीच आहे.

मून:
Do you really think Shivsena's having power in MH Govt?? Do you...???
Well, I do really not..!
आणि आपणच जबाबदार आहोत त्याला.. आपणच बहुमत देऊ नाही शकलो...

पैलवान:
आज मोदी नसते तर महाराष्ट्र भाजपमध्ये निवडून येण्यासारखं काय आहे? >>> त्रिवार सत्य..!

प्रकु:
हाच लेख इतर कुणी लिहीला असता आणि मी प्रतिक्रिया देत असतो तर अक्षरशः तेच लिहीलं असतं जे तुमच्या पहिल्याच प्रतिक्रियेत वाचलंय...

जागावाटपावरून चाललेलं नाट्य हा कबड्डीतला हुल देण्याचा प्रकार वाटला होता. पण अखेरीस गडी मराठी माणसाचा बाद झाला...
भाजपाने स्वतः युती तोडली या विधानाशी सहमत.. कारणे काही का असेनात...
सेनेच्या सत्तेत सहभागी होण्याच्या निर्णयाबद्दलमात्र त्रिशंकू अवस्था आहे..

>>>> फक्त एवढंच म्हणायचं होतं की पावसाळा at its best.. घर गळणारच.. कौलारू आहे...
पण आपलंच आहे शेवटी.. आपणच नको का दुरूस्त करायला..>>>>>.योग्यच<<<<<
एक शिवसैनिक म्हणुन लेख आवडला.

नवनाथ Happy

गा पै,
तुमच्या प्रतिसादामधला शब्द न शब्द पटला अगदी.. सुंदर प्रतिसाद..

<<< फक्त एक गोष्ट मला पटली नाही. ती म्हणजे शिवसेनेचे सरकारात सामील होणे. भाजपच्या सरकारची पुरती अब्रू घालवायला हवी होती. >>>
हि तुमची गोष्ट फक्त मला पटली नाही .. Happy

त्यांची(भाजप) अब्रू घालवून सेनेला आणि मराठी जनतेला नक्की काय मिळणार होते.
त्यापेक्षा सत्तेत सहभागी होऊन महाराष्ट्राला एक स्थिर(?) सरकार दिले ते बरे झाले.
शिवाय १५ वर्षे बाहेर राहुन मग इतक्या जागा मिळवून पुन्हा बाहेर बसण्याने शिवसैनिकांचा पण हिरमोड झाला असता..
तसेच देशाच्या दृष्टीने भाजपची अब्रू जाणे हे फार काही चांगली गोष्ट नाही.. आता मिळाली तशी सत्ता पुन्हा मिळून दहा वर्षांचा कालावधी मिळाला तर बऱ्याच गोष्टी बदलता येतील ना..
त्यामुळे माझ्या मते जे झाले ते चांगलेच झाले. हेच शांतपणे झाले असते तर अधिक चांगले झाले असते बाकी काही नाही .

गा पै,

बाळासाहेब गेले त्यावेळी एक काव्य लिहिले होते कोणीतरी माबो वर.. तुम्हीच लिहिले होते असे मला वाटले खरे पण तुमच्या लिखणात नाही. ते खूपच समर्पक आणि सुरेख होते..
मी त्यावेळी माबो वर नव्हतो.. नंतर एकदा वाचलेले ..
विषय चालूच आहे तर इथे त्याची लिंक (मिळाल्यास) इथे पाडाल का कृपया .. ज्यांनी वाचले नसेल अशा शिवसैनिकांना नक्कीच वाचायला आवडेल Happy

धन्यवाद !

प्रकु,

>> त्यांची(भाजप) अब्रू घालवून सेनेला आणि मराठी जनतेला नक्की काय मिळणार होते.
>> त्यापेक्षा सत्तेत सहभागी होऊन महाराष्ट्राला एक स्थिर(?) सरकार दिले ते बरे झाले.
>> शिवाय १५ वर्षे बाहेर राहुन मग इतक्या जागा मिळवून पुन्हा बाहेर बसण्याने शिवसैनिकांचा पण हिरमोड
>> झाला असता..

सत्ता हे शिवसेनेचं लक्ष्य कधीच नव्हतं. सत्तेत असो वा सत्तेबाहेर, शिवसैनिकाने सदैव नेत्याच्या मागे उभं असावं अशी अपेक्षा आहे. शिवसैनिक सत्तेपेक्षा संघर्षासाठी आसुसलेला असतो.

महाराष्ट्र भाजपची अब्रू घालवणे याचा एक आयाम म्हणजे रा.वा.शी असलेली मिलीभगत पूर्णपणे उघडी पाडणे. जनतेच्या हितासाठी सरकारात सामील व्हायचा निर्णय घेतला पण मनोमीलन झालेले नाहीये. कधी होणारही नाही. मग स्वबळावर परत निवडणुका लढवलेल्या काय वाईट?

दुसरा आयाम काय त्याचं उदाहरण देतो. उत्तर महाराष्ट्रावर (खानदेश + थोडं वऱ्हाड) राजपुतांचा प्रभाव आहे. गेल्या विधानसभा निवडणुकींत तिथे राजपूत कार्ड सर्रास वापरण्यात आलं. त्यातून कधी नव्हे त्या भाजपला भरघोस जागा मिळाल्या. आता परिस्थिती बघा, मनमाडचे शिवसेनेचे पहिले महापौर दलित होते (नाव आठवत नाही). त्यांनी बाळासाहेबांना उघडपणे साष्टांग नमस्कार घातला होता. ते म्हणाले की केवळ शिवसेनेमुळे आज माझ्यासारखा दलित माणूस महापौरपदी बसू शकलाय. शिवसेनेने जातीपातींचं राजकारण कधीच केलं नाही. ही दशकानुदशकांची पुण्याई गेल्या विधानसभा निवडणुकीत कामी का बरं आली नाही? मतदार कशास भुलला? ते कारण सेनेने पूर्णपणे उघडं पडायला हवं होतं. महारष्ट्रात जातीपातींच्या राजकारणास आजिबात थारा मिळता कामा नये.

भाजपची अब्रू पूर्णपणे घालवणं म्हणजे मोदींच्या नावावर जी कर्तृत्वहीन लोकं निवडून येत आहेत त्यांना नेस्तनाबूत करणं.

आ.न.,
-गा.पै.

पैलवान, आपला मतितार्थ भाजपाची अब्रू ऐवजी महाराष्ट्र प्रदेश भाजपाची अब्रू असा असल्यास सहमत....
उपरोक्त रचनेची छापील प्रत (श्रेयोल्लेखासहित) बाळासाहेबांवरील माझ्या एका वैयक्तिक स्मृतिसंग्रहपुस्तिकेत जोडण्याची इच्छा आहे.. आपली अनुमती असावी..

Pages