जनसामान्यांची संघटना : शिवसेना

Submitted by नवनाथ राऊळ on 19 June, 2015 - 07:25

शिवसेना आज सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने थोडंसं....
------------------------------------------------------------------

नमस्कार मित्रांनो...

आपल्या व्यस्त दिनक्रमातून आणि बहुमूल्य वेळातून काही मिनीटे हवी आहेत मला... थोडी, आपण हे वाचण्यासाठी आणि थोडी, त्यावर चिंतन करण्यासाठी...
द्याल ही अपेक्षा आहे...

मी कोण आहे हे महत्वाचे नाही... मी तुमच्यापैकीच एक सामान्य मराठी माणूस आहे.. अगदी तुमच्यासारखाच..!
महाराष्ट्रावर जिवापाड प्रेम करणारा आणि उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची निस्सीम भक्ती करणारा असा एक सामान्य मराठी माणूस..!

आज महाराष्ट्रातील सत्तालोलुप आणि भ्रष्ट राजकारण्यांनी आणि तथाकथित समाजधुरिणांनी राज्याच्या वर्तमानाचे आणि भविष्याचे वाभाडे काढायचे जे उद्योग आरंभिले आहेत ते पाहून जीव तीळ तीळ तुटतो...

हाच का तो महाराष्ट्र जिथे संतविभूतींनी जन्म घेऊन येथील भूमीवर ज्ञानामृताचा सडा शिंपला आणि समाजोद्धाराचे कार्य केले..?
हाच का तो महाराष्ट्र ज्याकरिता शिवरायांनी आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी अहोरात्र खस्ता खाल्ल्या..?
हाच का तो महाराष्ट्र जो घडविण्यासाठी राजे आणि त्यांचे पराक्रमी मावळे पंचप्राण तळहाती घेऊन लढले..?
हेच का ते स्वराज्य जे उभे करण्याकरिता छत्रपतींच्या निष्ठावान मावळ्यांनी धारातीर्थी देह ठेवले..?

बघा, उत्तर सापडतंय का..?
खरंच, असह्य झालंय आजकालचं राजकारण, आणि म्हणून लिहावसं वाटलं...

शिवरायांनी मराठी माणसाला दिलेला अभिमान, स्वाभिमान आणि सन्मान; हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे (साहेबांना कैलासवासी मानायला मन तयार होत नाही) यांनी शिवसेनेच्या रूपाने पुन्हा जागवला... राख बाजूला सारून तो विस्तव पुन्हा चेतवला... आणि मराठी माणसाला खडबडून जागा केला...
त्यांचे हे कर्तृत्व आणि मराठी माणसाच्या दृष्टीने शिवसेनेचे महत्व वादातीत आहे...

एका राजकीय पक्षाला पहावे लागते, तशा सर्व प्रकारचे यशापयश आजमितीस शिवसेनेने पाहिले... एक राजकीय पक्ष म्हणून सर्व तऱ्हेचे धक्के झेलले, पचवले आणि दिलेही..!

तरीही जनसामान्यांची ही संघटना बाळासाहेंबाच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे आणि शिवसैनिकांच्या अढळ निष्ठेमुळे सदैव खंबीरपणे उभी राहिली...
जनमानसांतील शिवसेनेचा प्रभाव, स्थान आणि प्रेम कधीही कमी झाले नाही...
आणि म्हणूनच केवळ मतपेटीच्या आकड्यांच्या जोरावर या जनप्रेमाचे मोजमाप करणे अविचाराचे ठरेल...

दुर्दैवाने बाळासाहेब आज आपल्यात नाहीत. आज त्यांच्यापश्चात; 'आताची शिवसेना ही तेव्हाची राहिलेली नाही...', 'बाळासाहेब असताना ठीक होते.. आता कशाला शिवसेना..?' वगैरे प्रकारचे सूर काहीजणांनी आळवलेले अनेकदा कानी येतात... या लोकांना मी एकच प्रश्न विचारू इच्छितो की, शिवरांयांच्या मृत्युनंतर, 'आता कशाला हवे स्वराज्य?' असे म्हणत जनतेने स्वराज्य पुन्हा मुघलांच्या आणि यवनांच्या ताब्यात दिले असते तर ते तुम्हाला चालले असते का..?
आजही का तुम्ही महाराजांच्या शौर्याचे पोवाडे गात त्यांनी उभारलेल्या रामराज्याची उदाहरणे देता..? तेव्हा नाही ना वाटत की आता राजे नाहीत, आता कशाला आस धरायची सुराज्याची..? मग महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी निर्माण झालेल्या शिवसेनेबाबत असे का बोलता..?

बाळासाहेबांनी शिवसेना उभारून मराठी माणसाला एक वारसा दिला आहे.. त्यांच्यापश्चात आज तो जतन करायचीही बुद्धी आपणांस होऊ नये का..???

शिवसेनेवर मालकी हक्क केवळ मराठी माणसाचा.. महाराष्ट्राचा.. अन्य कुणाचाही नाही...
आणि हा वारसा आपण प्राणपणाने जपणे हे आपले कर्तव्य आहे.. तीच बाळासाहेबांना आदरांजली आणि तीच खरी श्रद्धांजली ठरेल...

शिवसेना केवळ एक राजकीय पक्ष नसून महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, विकासासाठी आणि उत्कर्षासाठी स्थापन झालेली एक संस्थाच आहे..! इतर प्रादेशिक पक्ष आणि शिवसेना यांत जडणघडणीच्या बाबतीत जमीन-अस्मानाचा फरक आहे.. म्हणूनच शिवसेनेची तुलना इतर पक्षांशी करणे तर्कसंगत ठरणार नाही...

मुंबईत १९९२ च्या दंगलीत धर्मांध माथेफिरूंनी हाहाकार माजवला होता. अशा वेळी त्यांना वठणीवर आणून मुंबईला वाचवले ते निधड्या शिवसैनिकांनीच..! मुंबईच्या रक्षणाला अखेर शिवसेनाच धावली हे उघड आणि वादातीत सत्य आहे आणि त्यावेळी शिवसेना नसती तर काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही...
यास्तवच मराठी माणसाला शिवसेनेचा नेहमी आधार वाटत आलेला आहे.. आपुलकी वाटत आलेली आहे... आणि हीच आपुलकी आपल्याला जपायची आहे.. आपला पक्ष, आपली संघटना आपणच घट्ट करणार, आपणच दुरुस्त करणार, आपणच जतन करणार, नाही का..?

केवळ एवढेच नाही, तर बेळगांवातील सीमावासिय मराठी बांधवांवर होणारे अत्याचार, महाराष्ट्रात परप्रांतियाचे होणारे अनिर्बंध अतिक्रमण, वगैरे वादग्रस्त प्रश्नांविरुद्ध शिवसेना आजपावेतो सतत लढत आलेली आहे...
शिवसेनेने केलेली आंदोलने आणि संघर्ष सर्वांसमक्ष आणि सर्वश्रुत आहे... कारण महाराष्ट्रची अस्मिता जपण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध आहे...

मा. शिवसेनाप्रमुखांचे २०% राजकारण आणि ८०% समाजकारण हे समीकरण प्रत्येक राजकीय पक्षासाठी आदर्शवत असेच आहे... आम्ही महाराष्ट्रात मराठी आणि हिंदुस्थानात हिंदू आहोत या आपल्या विधानावर ते सदैव ठाम राहिले. आणि बाळासाहेबांनी दिलेले हे संस्कार सच्चा शिवसैनिक कधीही विसरणार नाही...

म्हणूनच आपण सर्व मराठी बांधवांनी महाराष्ट्राच्या हिताकरिता इतर सर्व प्रकारचे स्वार्थ, भेद, आमिषे, प्रलोभने आणि हेवेदावे विसरून एकजुटीने शिवसेनेच्या पाठिशी राहिले पाहिजे. शिवसेना सुधारली पाहिजे.. जगवली पाहिजे आणि तगवलीही पाहिजे.. आपल्याच हितासाठी..!

आग्रह नाही, हे निवेदन आहे.. आणि यावर निर्णय तुमचाच आहे..!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनापासुन आवडला लेख.
आमच्या घरीपण सेनामय वातावरण होते.
पूर्वी कुठे नवख्या ठिकाणी जरी गेलो तरी शाखा पाहीली की बरे वाटायचे, कारण माहीत असायचे की काही अडचण आलीच तर शाखेत बसलेले शिवसैनिक नक्किच मदतीला धावून येतील.

नमस्कार नवनाथ जी,

फार सुरेख लेख लिहिला आहे तुम्ही.
आम्ही मुळ चे मुंबैकर, त्यात ही पार्लेकर, त्या मुळे सेनेशी जवळीक फार च जास्ती, मग आम्ही ९३-९४ च्या सुमारास नागपुरात गेलो राहायला साहजिकच त्या मुळे असेल किंवा अजुन काही असेल पण आज आमच्या घरी जरी भाजपेयी वातावरण असले तरी "सेना" आणि "साहेब" ह्यांच्या विषयी आम्ही एकजात सगळे हळवे आहोत. "साहेब" ही उपाधी बाळासाहेबांव्यतिरिक्त कुणाला लावु ही नये, आणि ती इतर कुणाला सुट ही होत नाही हे मात्र तेवढेच खरे. Happy
सेनेनी आणि साहेबांनी आपल्याला काय दिले...तर ते म्हणजे आपण ही संगठीत पणे काही चांगले करु शकतो ह्याचा "आत्मविश्वास" आणि आपण मराठी असल्याचा "अभिमान", असे माझे वैय्क्तिक मत आहे.
अधिक काय लिहिणे.....जय महाराष्ट्र !!

नवनाथ राऊळ, लेख पटला आणि आवडला.

मी मुंबईत दादरला राहतो जिथे शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेना हा पक्ष नसून तो एक ज्वलंत विचार आहे. त्याला बाळासाहेबांच्या वकृत्वाची धार आणि मराठी माणसाच्या प्रेमाचा आधार आहे. माझ्या लहानपणापासून शिवसेना ह्या पक्षामध्ये झालेली अनेक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. आणि त्यामुळे शिवसेना आता पुर्वीची राहिली नाही हे वाक्य मला पटते. काळाच्या ओघात राजकीय पक्षात शिरणार्‍या अपप्रवृत्या, कुरघोडीचे राजकारण या गोष्टी सेनेत सुध्दा आल्या. पुर्वी बाळासाहेबांचा शब्द म्हणजे शिवसैनिकांसाठी अंतिम आदेश आणि शिवसैनिक तो आदेश पाळणारच. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. पण मराठी माणसाविषयी सेनेची असलेली बांधिलकी तिळमात्रही कमी झालेली नाही हे मात्र आवर्जून नमुद करावेसे वाटते.

बा़ळासाहेबांच्या पश्चात "आता सेना संपली" असा प्रचार केला गेला पण याचे उत्तर महाराष्ट्रीयन जनतेनेच सेनेच्या विरोधकांना देऊन टाकले. अनेक राजकीय वादळे आली आणि गेली तरीसुध्दा शिवसेना त्यात टिकूनच नाही तर खंबीरपणे उभी आहे आणि पुढेही ह्या विचारांची वाटचाल अधिक जोमानेच होईल.

जय महाराष्ट्र!!!

शिवसेनेविषयी श्री. प्रकाश अकोलकरांचे 'जय महाराष्ट्र - हा शिवसेना नावाचा इतिहास आहे' हे पुस्तक जरुर वाचावे. सेनेच्या स्थापने पासुनचा सगळा इतिहास त्यात आलेला आहे.

Pages