मेडिटरेनिअन सलाद आणी डिप- शाकाहारी

Submitted by वर्षू. on 18 June, 2015 - 07:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हुमुस (डिप) करता

४०० ग्राम उकडलेले छोले
४ टी स्पून ताहिनी ( भारतात सहज मिळते ही तिळाची पेस्ट)
दोन ,तीन लसणाच्या पाकळ्या ठेचून
१ टी स्पून मीठ
६ टेबल स्पून एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑईल ( मी बरतोली ब्रँड चं वापरलं, भारतात मिळणारा .'फिगारो' ब्रँड पण छान आहे.
३,साडे तीन टी स्पून लिंबाचा रस ( आवडीनुसार)
एक टी स्पून तिखट
कोथिंबीर किंवा पार्सले - बारीक चिरून

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाबा गनुश (डिप) करता

२ भरताची मिडिअम आकाराची वांगी
१/४ कप ताहिनी
१/४ कप लिंबाचा रस ( आवडीनुसार )
३ लसणाच्या कळ्या ठेचून
१/४ टी स्पून जिर्‍याची पूड ( जिरे भाजायचे नाहीयेत)
१/२ टी स्पून मीठ
२ टेबलस्पून पार्सले बारीक चिरून
१ टेबल स्पून ऑलिव्ह ऑईल ( ऐच्छिक- मी नाही वापरलेय)
-----------------------------------------------------------------------------------------------------------

तबुले सलाद करता

२ टेबल स्पून दलिया
१ कप उकळते पाणी
दोन लिंबांचा रस
१/२ टेबल स्पून ऑलिव्ह ऑईल
मीठ ( चवीनुसार)
१ कप बारीक चिरलेला पाती चा कांदा ( पातींसकट)
१ टेबलस्पून बारीक चिरलेली पुदिन्याची पाने
१ कप बारीक चिरलेली पार्सले ची पाने
१ काकडी सोलून, बारीक तुकडे करून
१ कप चेरी टोमॅटो
१ टी स्पून काळी मिरी पावडर

क्रमवार पाककृती: 

हुमुस

थोडेसे उकडलेले छोले वगळून , बाकीचे छोले, लसूण, मीठ, उकडलेल्या छोल्यातील पाणी ( हे बेताने घ्यावे. या डिप ची कंस्टीटंसी श्रीखंडा इतकी दाट असते), ताहिनी एकत्र फूड प्रोसेसर किंवा मिक्सी मधे अगदी बारीक वाटून घ्यावे. मधून मधून ऑलिव्ह ऑईल ही मिसळत राहावे. सर्व मिश्रण एक जीव झाले कि वरून सजावटीकरता वगळलेले छोले , कोथिंबीर / पार्सले , लाल तिखट भुरभुरावे .
पिटा ब्रेड आणी फलाफल वेज कबाब बरोबर हे डिप अप्रतिम लागते.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाबा गनुश डिप

वांगी छानपैकी भाजून, सालं काढून , काट्याने मॅश करा. थोडं टेक्शचर राहू द्या. थोडक्यात पार भरीत करू नका .
Proud . हे सर्व होईस्तोवर एका काचेच्या बोल मधे ताहिनी, लिंबाचा रस, मीठ, लसूण ,जिरेपूड एकत्र नीट मिसळून ठेवा. असे केल्यास त्यांचा स्वाद , सुगंध छानपैकी उतरेल डिप मधे. आता मॅश केली वांगी मिसळा.
हलक्या हाताने एकत्र करा. बारीक चिरलेली पार्सले वर सजवा . हवे असल्यास वरून ऑलिव्ह ऑईल स्प्रिंकल करा.

पिटा ब्रेड बरोबर सर्व करा.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तबुले सलाद

पाण्याला उकळी आली कि गॅस बंद करा. यात दलिया, लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑईल आणी मीठ घालून एक तासभर झाकून ठेवा.
चेरी टॉमेटो दोन भागात चिरून घ्या, टोमॅटो, पार्सले, पुदिना, पातीचे कांदे, काकडी,मीठ्,मिरपूड, सर्व पाणी काढून
घट्ट पिळलेला दलिया सर्व एकत्र करा.
तबुले तयार आहे. मात्र संध्याकाळी खायचा असेल तर सकाळीच करून फ्रिज मधे ठेवा. त्याचा स्वाद अजूनच वाढेल.

वाढणी/प्रमाण: 
तिन्ही डिशेस केल्या तर बर्‍याच जणांना पुरेल ..
अधिक टिपा: 

मेडिटरेनिअन डिप्स आणी सलाद करून काही तासांनतरच सर्व करावे. त्यांचा स्वाद मुरायला जरा वेळ लागतो.
लिंबाच्या रसाचे प्रमाण आवडीनुसार घ्यावे. लेबनीज रेस्टॉरेंट्स मधे मिळणारे तबुला सलाद फारच आंबट असते, म्हणून मलातरी आवडत नाही.
ऑलिव्ह ऑईल, आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेता येईल..

माहितीचा स्रोत: 
लेबनीज मैत्रीणी आणी नेट
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे हे सगळे. तबुले केलेले पण दलिया जरा सढळहस्ते घातल्याने वाट लागली. आता परत नक्कीच करेन.

बेस्ट रेसिपी एकदम. आणि तबुले सोडून बाकी दोन्ही आवडीचेच. करून बघेन मी पण घरी एकदा. बाहेर हे सगळं सहज मिळतं त्यामुळे घरी करायचा विचारही नाही केला कधी.

खबुस रोट्या त्यावर लाबने पसरवायचं आणि झतार पावडर टाकून पण मस्त लागतं.

शर्मिला ,हळिव म्हंजे जवस नाही..
अळीव.. त्याचे लाडू करतात ते.. सुमाक च्या जवळ जाणारी टेस्ट आहे अळीवांची Happy

सलाद पहिल्यादाच वाचले, बाबागनुश वर जुन्या मायबोलित चर्चा झाली होती, हमस काय नेहमिच्याच गोर्सरी लिस्टितले...रेसिपि आणि फोटो मस्तय.

आडो, तबुले सकाळी करून ठेवून रात्री खाऊन बघ.. सगळ्या टेस्ट्स, फ्लेवर्स छान उतरतात मग!!
नाहीतर पार्सले फारच स्ट्राँग लागतं चवीला.. लिंबाच्या रसामुळे सोबर होते त्याची टेस्ट.. पार्सले लीव्ह्ज पण खूपच
बारीक कापलेल्या हव्यात, पाहिजे तर फूड प्रोसेसर मधून चॉप केलेल्या.. नाहीतर चरबट लागतात..

वर्षु, मला पार्सलेच्या चवी/वासामुळेच तबुले नाही आवडत. पूर्वी जेव्हा खाल्लं होतं त्यादिवशी डोकं खूप दुखलं माझं, ब्लॅक लिस्टमध्ये गेलं तेव्हापासूनच. फतूश सलाड आवडतं त्यापेक्षा.

मला पार्सली अजिबात आवडत नाही. त्याच्या जागी मी आपली कोथिंबीर घालणार, चव वेगळी होईल पण मला चालेल. पार्सली घातले की बकरीचे खाणे तयार केल्यासारखे वाटते. आणि खुप बारिक चिरणे मला जमणार नाही. Happy

थांकु आडो फॉर द लिंक..मोर ऑर लेस सिमिलरच असतात या टेस्ट्स.. थोडे फार इन्ग्रेडिएंट्स बदलून.. Happy

साधना... पार्सले ऐवजी कोथिंबीर?? चक्क?? Happy

झतारसाठीच्या हर्ब्ज भारतात सहज मिळत नाहीत. आपल्या चवीसाठी पुदीना, कसुरी मेथी, ओवा, आले, हळीव वगैरे वापरून आपल्या चवीची चटणी करता येते. तसेही मूळ झतार प्रत्येक घरी वेगळ्या चवीचा असतो.

हा उपाय बघा कितपत पटतोय. जे कोरडे घटक असतील ( कसुरी मेथी, हळीव, हिरवी मिरची पावडर, ओवा ) यांची भरड पूड करायची जे ओले घटक असतील ( पुदीना, बेसिल, इतर हर्ब्ज ) त्यांची ऑलिव्ह ऑइल वापरून पेस्ट करायची, मग सगळे घटक एकत्र करायचे. वरुन तीळ घालायचे. मीठ टाकायचे. मी करतो असे कधी कधी.

अरे व्वा.. दिनेश छानेत हे ऑप्शन्स ही.. मला कसूरी मेथी सोडल्यास सर्व इतर इन्ग्रेडिएंट्स चालतील
कसूरी मेथी ची चव फारच इंडियनिश होईलशी वाटते.. Happy

काय मस्त फोटो आहेत! आवडले पदार्थ.
तबुले मध्ये दलिया ऐवजी कुसकुस घातले तर जास्त हलके वाटते. झतार साठी थँक्यू.

Pages