कोल्हापूर निजामुद्दीन एक्सप्रेस - एक चांगला पर्याय

Submitted by पराग१२२६३ on 14 June, 2015 - 12:51

९ जून २०१५ ला मला कोल्हापूरहून पुण्याला जायचे होते. नेहमीप्रमाणेच पहिला पर्याय म्हणून मी रेल्वेगाड्यांच्या आरक्षणाची स्थिती जाणून घेण्यास सुरुवात केली. शाळांच्या सुट्ट्या संपत आल्यामुळे रोजच्या गाड्यांना प्रचंड वेटिंग लिस्ट होती. अगदी कोयनेलाही १५३ वेटिंग होते. अलीकडील काळात कोल्हापूर-पुणे रेल्वे प्रवासासाठी नवे आणि चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ९ जूनसाठी मी १२१४७ कोल्हापूर ह. निजामुद्दिन एक्सप्रेसचा पर्याय निवडला. ही गाडी सुरू झाल्यापासून मी या पर्यायाचा बऱ्याचदा उपयोग करून घेत आहे. या गाडीतील जागाही संपत आल्याचे लक्षात येताच, प्रवासाच्या तीन दिवस आधी माझे आरक्षण करून घेतले आणि मी थोडा निवांत झालो.

९ जूनला गाडीची वेळ सकाळी ९.०५ची होती. मात्र नेहमीच्या सवयीप्रमाणे आणि मी स्वतःच तयार केलेल्या नियमानुसार मी किमान तासभर आधीच रेल्वे स्टेशन गाठले. कोल्हापूर स्टेशनच्या आवारातच असलेल्या पूर्वीच्या रेल्वे फाटकाजवळ येताच गाडी फलाटावर येत असल्याचे दिसले. गाडी तिच्या जागेवर (फलाट क्र. २) येऊन थांबल्यावर निव्वळ उत्सुकतेपोटी मी थोडे पुढे असलेल्या बुकींग कार्यालयात जाऊन गाडीच्या जनरलसाठीच्या गर्दीचा अंदाज घेऊ या असा विचार केला. कारण ही गाडी सुरू झाल्यानंतर जनरलमध्ये गर्दी खूप वाढलेली आहे आणि त्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहारला जाणाऱ्यांचा समावेश असतो. पण त्या दिवशी कोल्हापुरातून निघताना जनरलला गर्दीच फारशी नव्हती. आरक्षण मात्र फुल्ल झाले होते. त्यानंतर मी माझ्या डब्याजवळ पोहचलो. पाहिले तर तब्बल २४ वर्षे जुना डबा. म्हणजे आणखी चार-पाच वर्षांमध्ये हा डबा सेवेतून काढून घेणे अटळ. केवळ लोकप्रिय आणि अनावश्यक घोषणा, मोठ्या प्रमाणात रेल्वेगाड्या सुरू करतानाच डागडुजी-साफसफाई, संचालन यातील कर्मचारी कपात यासारखे निर्णय होऊ असल्याने त्याचा रेल्वेच्या आरोग्यावर कसा परिणाम होत आहे त्याचे हे पहिले दर्शन झाले. त्या डब्याचे पीओएच (म्हणजे जुन्या डब्याला नव्यासारखे पुन्हा सजविणे) होऊन सव्वा वर्षच झाले होते, तर पुढच्या पीओएचचा ड्यू मंथ ऑक्टोबर २०१५ निश्चित करण्यात आले आहे. त्याचा अर्थ अजून चार महिने तरी या डब्याची स्थिती सुधारणार नाही.

माझ्या सीटवर पोहचलो, तर साईडच्या बर्थला सीटमध्ये रुपांतरित करता येणे शक्य नाही हे लक्षात आले. कारण बर्थ वर केल्यावर त्याला आधार देणाऱ्या क्लिप गायब होत्या. बाहेर हवा चकचकीत असली तरी जून असल्याने कोल्हापुरात हवा बरीच दमट झाली होती आणि आकाशात वेगवेगळ्या रंगांचे ढगांचे थर अतिशय आकर्षक दिसत होते. पंखा लावावा म्हटले, तर डब्यातील कोणताच पंखा चालत नसल्याचे माझ्याबरोबरच अन्य प्रवाशांच्या लक्षात आले. गाडी सुटण्याची वेळ जशी जवळ येत होती, तशी फलाट व गाडीतील लगबग वेग घेत होती. मात्र यापेक्षा शेजारच्या फलाट क्र.-१ च्या शेजारील लोको स्टॅबलिंग लाईनवर शांतपणे उभे असलेले कृष्णराजपुरमहून आलेले निळ्या-पांढऱ्या रंगसंगतीतील मोहक डब्ल्यूडीपी-४ हे इंजिन अधिक लक्ष वेधून घेत होते. न राहून मी त्याचा फोटो काढून घेतला.

एकीकडे हे सर्व घडत असताना गाडी सोडण्यासाठीची तयारी रेल्वे कर्मचारी करत होते. वेगवेगळ्या विभागांकडून डॉक्युमेंटेशन सुरू होतेच. स्टेशन मास्तरने पुण्याहून सेक्शन कंट्रोलरकडून गाडीला सोडण्यासाठी परवानगी घेतली होती. दरम्यानच्या काळात ब्रेक पॉवर सर्टिफिकेट आणि अन्य कागदपत्रांवर ड्रायव्हर आणि गार्डच्या नोंदी आणि स्वाक्षऱ्याही घेऊन झाल्या होत्या. योग्यवेळी स्टेशन मास्तरने आपल्या केबीनमधील ब्लॉक इस्ट्रुमेंटच्या माध्यमातून दोन किलोमीटर पुढे असलेल्या गूळ मार्केटच्या स्टेशन मास्तरला इलेक्ट्रॉनिक संदेश (ट्रेन कमिंग फ्रॉम) पाठविला, त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याने ट्रेन गोईंग टू संदेश पाठविला आणि निजामुद्दीन एक्सप्रेस कोल्हापुरातून प्रस्थान करण्यासाठी स्टार्टर आणि ॲडव्हांस्ड स्टार्टर सिग्नल ऑफ झाला. सिग्नल मिळाल्यावर आमच्या लोको पायलटने हॉर्न वाजवून त्याची सूचना गार्डला दिली. गार्डनेही ठीक ९.०५ वाजता हिरवा बावटा दाखविल्यावर पुण्याच्या ११३८८ या क्रमांकाच्या डब्ल्यूडीएम-३डी अश्वाने आमच्या १९ डब्यांच्या रथाला गती देण्यास सुरुवात केली. त्याचा आवाज मात्र कर्कश्य होता. गाडी फलाटावरून बाहेर पडताना रोलिंग आऊट हटमध्ये बसून अखेरची तपासणी करण्यासाठी कर्मचारी गाडीच्या चाकाच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होते. कोल्हापूर-पुणे प्रवासासाठी निजामुद्दीन एक्सप्रेस आणि अहमदाबाद एक्सप्रेस हे दोन चांगले पर्याय उपलब्ध झाल्यामुळे अलीकडील काळात या शहरांदरम्यान रेल्वेची गर्दी पुन्हा वाढू लागली आहे.

आता गाडीने वेग घेतला आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.-४, वलिवडे हॉल्ट स्टेशन व त्यानंतर पंचगंगा नदी ओलांडले. राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या गूळ मार्केट स्टेशनमध्ये नुकतील एक मालगाडी दाखल झाली होती आणि आलेल्याच डब्ल्यूडीजी-४ च्या मदतीने तिचे लगेच शंटिंग सुरू होते. माल उतरवून घेण्यासाठी ट्रकवाल्यांचीही ट्रकसकट धावपळ सुरू झाली होती. कारण उशीर झाला तर डिमरेज चार्जस लागण्याची शक्यता. बऱ्याच वर्षांनी या स्टेशनमध्ये अशी हालचाल पाहून खूपच उत्साहित व्हायला झाले. भविष्यात येथूनच कोल्हापूर कोकण रेल्वेला आणि कदाचित कराडलाही थेट जोडण्याची योजना आहे. पंचगंगेच्या पुलावर वेग मर्यादा लागू असल्यामुळे गाडीचा वेग थोडा कमी झाला होता. मात्र रुकडीचा डिस्टंट डबल यलो असल्याने वेग कमी होत गेला होता. रुकडीत मेन लाईनवर आम्ही सातारा-कोल्हापूर पॅसेंजरची वाट पाहत उभे होतो. काही मिनिटांतच खचाखच भरलेली पॅसेंजर आली आणि लागलीच आम्हाला रुकडी सोडण्याची परवानगी मिळाली. प्रवासातील पहिले क्रॉसिंग वेळेत पार करून गाडी पुढे धावू लागली. हातकणंगले, जयसिंगपूर अशी स्थानके आणि हो कृष्णेचे जवळजवळ कोरडे पात्र ओलांडत असताना या गाडीत ऑन-बोर्ड हाऊस किपिंग सुविधा सुरू झालेली पाहून सुखद धक्का बसला. त्यासाठीच्या कर्मचाऱ्यांनी गाडीची वरवर स्वच्छता केली. माझ्या कम्पार्टमेंटमध्ये असलेल्या लहान मुलांचे इकडे-तिकडे फिरत वेफर्स वगैरे खाणे चालले होते. त्यामुळे आमच्या सीटजवळ कचरा जमण्यास सुरुवात झाली होती. ते पाहून स्वच्छता अधिकाऱ्याने त्यांना कचरा न करण्याचे जरा दरडावतच बजावले. अजून गाडी सुटून एक तासही झालेला नाही आणि तेवढ्यात तुम्ही असा कचरा करायला सुरुवात केलेली आहे असे त्याने ऐकविले. त्यानंतर चेकर आला आणि आमची तिकिटे तापसू लागला. माझ्याजवळ बसलेल्या लहान मुलीला गमतीने त्याने तिकीट विचारल्यावर ती अक्षरशः आपल्या आजोबांच्या पाठीमागे लपून बसली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव सर्वांनाच हसवत होते.

गाडी मिरजेत वेळेच्या आधी १०.०२ वाजता पोहचली. दरम्यानच्या काळात तृतीयपंथीय ठराविक प्रवाशांकडून पैसे उकळून गेले होतेच. आज वेळेआधी येऊनही मिरजेचा होम सिग्नल ऑफ मिळाल्याने गाडी थेट फलाट क्र.-१ वर येऊनच थांबली. इकडे एक नंबरवर आमची गाडी येत होती, त्याचवेळी दोनवर अजमेरहून आलेली २३ डब्यांची १६२०९ बेंगळुरु एक्सप्रेस कृष्णराजपुरमच्या डब्ल्यूडीपी-४ बीबरोबर येत होती, तर पलीकडे हुब्बळ्ळीच्या दिशेने आलेली बीसीएन मालगाडी दोन डब्ल्यूडीजी-४ सह पुण्याच्या दिशेने सिग्नल मिळण्यासाठी वाट पाहत उभी होती. पण रेल्वेवाहतुकीत प्रवासीगाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने सांगलीच्या बाजूने येणाऱ्या अजमेर बेंगळुरु एक्सप्रेससाठी ही गाडी आधीपासूनच तेथे थांबवून करून ठेवण्यात आली होती. मात्र त्यानंतरही आमची गाडी मिरजेतून सुटून पुढचे ब्लॉक स्टेशन (सांगली) गाठल्याशिवाय या मालगाडीला जागेवरून हलता येणार नव्हते.

मिरज म्हटले की, गरमागरम चहा आणि इडली-वडा आलाच. हे सगळे फलाटावरील प्रवाशांची गर्दी गाडीत चढले होते. मीही गरमागरम वडा-पाव खाण्याचा बेत आखला. मस्तच आणि गरमागरम होता तो वडा-पाव. गाडीत आला हळुहळू नवे प्रवासी आपापल्या जागा शोधून स्थानापन्न झाले होते. तोपर्यंत तिकडे अजमेर-बेंगळुरुचे गार्ड व चालक बदलले गेले होते. वेळ झाल्यावर पुन्हा एकदा मिरजेच्या उप स्टेशन मास्तरने सांगलीहून लाईन क्लिअर घेऊन आम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला होता. मात्र मिरजेनंतर लगेचच झोन बदलत असल्याने अजमेर-बेंगळुरुला आणखी काही वेळ मिरजेत घालवावा लागणार होता. कारण ही गाडी पुढे सोडण्याआधी पुणे आणि हुबळीच्या सेक्शन कंट्रोलर्सने संदेशांची देवाणघेवाण करणे आणि पुण्याच्या कंट्रोलरने मिरजेच्या स्टेशन मास्तरला त्यासाठी परवानगी देणे आवश्यक होते.

आमची गाडी मिरज सोडण्याच्या तयारीत असतानाच आणखी काही तृतीयपंथीय धावत-धावत डब्यात वसुली करून गेले होते. नंतर सांगलीत अधिकृत वेळेइतकाच थांबा घेऊन निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. सांगलीतही मालगाडीचे मार्शलिंग सुरू असताना दिसले. दरम्यान प्रवाशांच्या आपापसात गप्पा-टप्पा सुरू होत्याच. केवढे वैविध्य होते त्यांच्या गप्पांच्या विषयांमध्ये. मात्र माझे लक्ष खिडकीच्या बाहेरच जास्तीतजास्त होते. त्या दिवशीचे वातावरणच माझे लक्ष सतत खिडकी बाहेर वेधून घेत होते. कोल्हापूरपासून जेजुरीच्या अलीकडेपर्यंत चकचकीत हवा, निळे आकाश आणि त्यावर काळ्या, राखाडी आणि पांढऱ्याफटक अशा तीन रंगांच्या ढगांनी केलेल्या आकृत्या यांनी साथ दिली आणि प्रवास खूपच आल्हाददायक केला. इतकेच काय वळवाच्या पावसाने थोडेसे भिजलेले डोंगर आणि त्यावर हलकेच उगवू लागलेली कोवळी हिरवळ आणि त्या डोंगरांवर पडलेली ढगांची सावली आणि उन ही दृश्येही मस्तच होती. हे ढग आणि इतर घटक मान्सून जवळ आल्याचेच संकेत देत होते. त्यामुळे आजूबाजूच्या शेतांमध्येही शेतकऱ्यांची खरीपासाठीची लगबग दिसत होती.

सांगलीनंतर मला अपेक्षा होती भिलवडीत गोंदियाहून कोल्हापूरकडे निघालेली ११०४० महाराष्ट्र क्रॉस होईल. मात्र हे क्रॉसिंग थोडे अलीकडेच - नांद्रेत झाले. तेथे महाराष्ट्र लूपवर जात असतानाच निजामुद्दीन तेथे आली होती. परिणामी नांद्रेच्या स्टेशन मास्तरने आम्हाला होमलाच दोन मिनिटे डिटेन करून ठेवले होते. महाराष्ट्र डाऊन होम ओलांडून त्याच्या पुढे ॲडिक्वेट डिस्टंसवर गेल्यावर स्टेशन मास्तरने लगेचच भिलवडीहून लाईन क्लिअर घेतल्याने आम्ही दोन-तीन मिनिटांतच मेन लाईनवरून पुढे निघून गेलो. पुन्हा आमच्या निझामुद्दीन एक्सप्रेसने वेग घेतला. वेगात किर्लोस्करवाडी ओलांडले, तेव्हा तिथं मिरजमार्गे हुबळीकडे निघालेली बीआरएन-बोस्ट वाघिणींची मालगाडी डिटेन केल्याचे दिसले. दरम्यान पुन्हा सिव्हील ड्रेसमधील अनेक तिकीट तपासनीस आणि पोलीस गाडीत चेकींग करण्यास आले. त्यांना आमच्या पुढच्या कम्पार्टमेंटमध्ये एक जण सापडलाच. माझ्या मनात विचार आला, आज काय चाललय काय - आधी ऑन-बोर्ड हाऊस किपिंग, कधी नव्हे ते या गाडीत आणि कोल्हापूर-पुण्यादरम्यान दोन-दोनदा तिकीट तपासणी.

आमच्या येथे आल्यावर माझ्या शेजारच्याने त्यांना पंखे बंद असल्याचे सांगितले. त्यात मागच्या बाजूच्या चेकरने त्या प्रवाशाला विचारले की, कधीपासून बंद आहेत पंखे. पण त्या प्रवाशाला हे ऐकू न आल्याने त्याने वेगळेच उत्तर दिल्याचे पाहून चेकर आवाज चढवून जरा उद्धट स्वरातच बोलू लागला. पण त्यानंतर १० च मिनिटांमध्ये पंखे सुरू झाले, हे विशेष. दरम्यान मधली स्थानके पार करत आम्ही पावणेबाराला कराडला आलो. तेथे आणखी गर्दी आत शिरली. दोनच मिनिटात गाडी सातारा या आपल्या पुढच्या व्यावसायिक थांब्याच्या दिशेने निघाली. इकडे गाडीचे साताऱ्याच्या दिशेने मजल-दरमजल करणे सुरू झाले, तसे तिकडे प्रवाशांचे आपल्याजवळचे डबे उघडून जेवण सुरू झाले. दरम्यान व्हेज बिर्याणीवाला चार-पाच फेऱ्या मारून आपली सर्व बिर्याणी खपवून गेला. या काळात भेळवाला, चहावाला आणि पाणीवाला इतकंच काय तृतीयपंथीयांचीही ये-जा सुरू होतीच. खिडकीतून सहज बाहेर जरा जास्तच डोकावून गाडीच्या मागे पाहिले, तर दोन-तीन डबे मागच्या खिडकीतून एक हात मोठ्या ताटासकट बाहेर आलेला दिसला. ताटाची अगदी मस्त धुलाई चालली होती. मात्र तसे करताना त्या महाशयांना हेही समजत नव्हते की हे पाणी त्यांच्या मागील बऱ्याच खिडक्यांमधून प्रवाशांच्या अंगावर जात आहे. आपला समाज किती आळशी, किती बेफिकीर आणि किती बेजबाबदार आहे, याचे हे उदाहरण. अशी उदाहरणे भारतीय रेल्वेवर अगदी आरामात दिसतात आणि आपण आपले रेल्वेलाच याचा सगळा दोष देऊन भारताची अमेरिका करण्याची स्वप्ने पाहत राहतो.

साताऱ्यात शिरताना मनात आले की, आता इथे थोडा वेळ थांबावे लागेल. कारण निजामुद्दीन म्हैसूर सुवर्ण जयंतीचे क्रॉसिंग होईल असे वाटले. पण दोनच मिनिटांमध्ये आमच्याच अश्वाची कर्कश्य शिट्टी ऐकली आणि मनाशीच म्हटले सुवर्ण जयंती लेट आहे. म्हणजे आता पुढे कुठेतरी शक्यतो आदर्कीत थांबावे लागेल बहुतेक. पण साताऱ्याच्या पुढचेच जरंडेश्वर आले आणि गाडी अचानक थांबली. मग वाटले आली वाटतं सुवर्ण जयंती. १० मिनिटे झाली, १५ झाली, २० झाली आणि मग वेगवेगळे विचार डोक्यात सुरू झाले. काय झालंय, अजून गाडी क्रॉस होत नाहीए. वाटलं पुढे काही तरी प्रॉब्लेम - गाडी घसरणं वगैरे असावा. मग दाराशी गेलो, तेव्हा आमचा असिस्टंट लोको पायलट स्टेशन मास्तरच्या केबीनकडे जाताना दिसला आणि तो माझ्या पुढे असलेल्या एका प्रवाशाच्या प्रश्नाला उत्तर देत होता. त्याचे थोडे टेक्निकल बोलणे त्या प्रवाशाच्या लक्षात आले नाही, तो मला म्हणाला इंजिन गरम झाले आहे. गाडी थांबली की आतील गर्दी लगेच बाहेर येते. हा नियम येथेही लागू झालाच.

इंजिनात निर्माण झालेल्या बिघाडाची माहिती स्टेशन मास्तरच्या वहीत नोंदविण्यासाठी तो लोको पायलट तेथे गेला. याची कल्पना गार्डलाही दिली गेली. मग मीही खाली उतरून इंजिनाकडे जाण्यास सुरुवात केली. तेव्हा आमचा अश्व दमल्याचे (इंजिन बंद पडल्याचे) लक्षात आले. मग रेल्वेच्या पातळीवर खरोखरच झपाट्याने हालचाली सुरू झाल्या. आम्हाला लाईन क्लिअर दिलेली होती, तो सिग्नल स्टेशन मास्तरने कँसल केला. इंजिनातील बिघाडाची बातमी लगेच पुण्याला सेक्शन कंट्रोलरला कळविण्यात आली. त्यानेही लगेच कारवाई सुरू केली. तोपर्यंत जरंडेश्वरच्या स्टेशन मास्तरच्या वहीत इंजिनाच्या बिघाडाची नोंद झाली होतीच. त्यानंतर आमचा असिस्टंट लोको पायलट पुन्हा इंजिनाकडे गेला. त्याच्या पाठोपाठ पाईंटस्मनही स्टेशन बुक आणि बावटे घेऊन इंजिनाकडे गेला. माझ्यामागोमाग इंजिनाजवळ आलेला तो (इंजिन गरम झाले आहे म्हणणारा) प्रवासी मला विचारू लागला, आता कधी गाडी हलणार. मी उत्तर दिले मध्ये (सातारा-पुण्याच्या मध्ये) कोठेतरी मालगाडी असली तर त्याची इंजिने येतील लवकरच. आणि झालेही तसेच.

आमच्या गाडीसाठी जरंडेश्वरच्या पुढच्या स्टेशनमध्ये - पळशीमध्ये मिरजेकडे निघालेली मालगाडी डिटेन करण्यात आली होती. सेक्शन कंट्रोलरने त्या गाडीची इंजिने काढून आमच्या गाडीला जोडण्याचा निर्णय घेतला आणि ती इंजिने जरंडेश्वरला धाडली. रेल्वेवाहतुकीत प्रवासीगाड्यांना प्राधान्य मिळत असल्याने आणि त्यातच आमची गाडी सुपरफास्ट श्रेणीतील असल्याने हे करणे आवश्यक होते. जरंडेश्वरमध्ये ती इंजिने आमच्या गाडीला बंद पडलेल्या इंजिनाच्या पुढे जोडली गेली. त्याचीही पळशी आणि जरंडेश्वरच्या बुकात नोंद घेतली गेली. या सर्व घडामोडींत ५० मिनिटे गेली. दरम्यान सुवर्ण जयंतीही जवळ आली होती. आमची इंजिने रेडी होईपर्यंत सुवर्ण जयंतीला साताऱ्याच्या दिशेने जाण्यास परवानगी मिळाली आणि लूप लाईनवरून ती क्रॉस झाली आणि दोनच मिनिटांत आम्हालाही लाईन क्लिअर मिळाल्याचा इंजिनाचा हॉर्न ऐकू आला. या नव्या इंजिनांचा हॉर्न मात्र कर्कश नव्हता. अशा रितीने बरोब्बर ६० मिनिटांनी आमची निजामुद्दीन एक्सप्रेस तीन अश्वांसह पुण्याकडे निघाली. पुढचे ब्लॉक स्टेशन (पळशी) ओलांडताना ज्या मालगाडीची इंजिने आमच्या गाडीला जोडली गेली होती, ती आता नव्या अश्वांच्या प्रतीक्षेत उभी असलेली दिसली. आता या गाडीला पुण्याहून बदली इंजिने येईपर्यंत तेथेच वाट पाहत उभे राहावे लागणार होते.

आता मला वाटत होते की, आम्हाला पुण्यात पोहोचायला किमान सव्वापाच वाजतील. पण गाडीचा वेग अनुभवतानाच एक बाब लक्षात आली की, आमची गाडी सुपरफास्ट श्रेणीतील असल्याने सेक्शन कंट्रोलरने पुण्यापर्यंत अन्य सर्व गाड्या बाजूला ठेवून आमच्या गाडीला पुढे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून दिला जात आहे. त्यात लोकमान्य टिळक (ट) हुबळी एक्सप्रेस, कोयना, पुणे कोल्हापूर पॅसेंजर आणि आणखी दोन मालगाड्यांचाही समावेश होता. दुसऱ्या गाड्यांचे चालक-गार्ड, स्टेशन मास्तरशी सिग्नल एक्सचेंज करत आम्ही पुढे सरकत होतो. दरम्यानच्या काळात जेवणानंतर डुलक्या काढून काही जण पुण्यात उतरण्यासाठी फ्रेश होऊ लागले होते. चेकरही सारख्या फेऱ्या मारत होताच. जेव्हा पुण्यात फलाट क्र. १ वर आलो, तेव्हा घड्याळात १६ वाजून ०२ मिनिटे झाली होती. म्हणजे मधल्या गोंधळामुळे वाया गेलेला वेळ निजामुद्दीन एक्सप्रेसने बराच भरून काढत पुण्यात पोहोचण्यासाठी केवळ ७ मिनिटांचा उशीर केला होता. मात्र रेल्वेतील अशा प्रयत्नांना आपण फारच कमी लक्षात घेत असतो आणि प्रशंसा करण्यास कायमच कचरत असतो. रेल्वे किंवा अन्य सरकारी यंत्रणा म्हणजे शिव्याशाप घालण्याचे हक्काचे लक्ष्य अशी आपली समजूत झालेली असते. तशी समजूत करून देण्यात माध्यमेही आघाडीवर असतात.

अशा प्रकारे चेकरच्या सारख्या फेऱ्या, ऑन-बोर्ड हाऊस किपिंग, इंजिन बंद पडणे, त्यानंतरच्या घडामोडी आणि एक तास वाया जाऊनही जवळजवळ वेळेतच पोहचलेली गाडी हे या गाडीच्या प्रवासात मी पहिल्यांदाच अनुभवले.

गाडीतून उतरल्यावर नेहमीच्या सवयीने लांबच्या गेटमधून स्टेशनच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. स्टेशनबाहेरील सिटी बसच्या स्थानकाकडे जाताना अचानक पुणे सिकंदराबाद शताब्दीच्या सायडिंग ट्रॅकवर उभ्या असलेल्या दोन डब्यांनी लक्ष वेधून घेतले. मग काय थोडा वेळ तेथे थांबून ते नवे कोरे डबे न्याहाळून बाहेर पडलो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही भारी लिहिता. एव्हडी वर्षे मिरज पूणे प्रवास केला आहे मात्र या नजरेने कधीच प्रवासाकडे पाहिलेले नाही.

मिरजेला स्टेशनवर अजूनही उत्तम इडली चटणी मिळते हे वाचून आनंद झाला. लहनपणी घरी पाहुणे आले तर त्यांना स्टेशनवर सोडायला जाऊ तेव्हा मस्त इडली खायला मिळेल याचा आनंदच जास्त असे

एकदम बेस्ट
या गाडीने ती नवीन सुरु झाली होती तेव्हा कोल्हापूर दिल्ली दोन वर्षे बराच प्रवास केला आहे. एसीचे अटेंडेंटचांगले ओळखीचे झाले होते. नंतर कुरियरपेक्षाही फास्ट पार्सल मागवून घ्यायला खूप उपयोग झाला.
पण तुमच्या नजरेतून प्रवासामागच्या धडपडी, रेल्वे कार्यप्रणाली यांची ओळख होते ती फार विशेष वाटते.

खुप छान लिहीलंय . पण बराच वेळ घेते कि ही गाड़ी. बस लवकर जाते. त्रितीय पंथीयांधा अटकाव नाही?

अरे कोल्हापुर निजामुद्दीन गाडी आहे ही हे पटकन लक्षातच आले नाही. मी बहुतेक वेळा गोवा-निजामुद्दीनने प्रवास केला आहे. ९०च्या दशकात हीच एक भरधाव गाडी होती मिरज-पुणे जायला. ती आधी मिरजेतून सुटली की थेट पुण्याला थांबायची - मध्ये एखाद ठिकाणी सायडिंगला वगैरे. मग नंतर त्यात सातारा रोड, मग कराड, मग सांगली असे बरेच थांबे वाढवले गेले.

छान लिहिलंय! पण दिनेशदा यांना पडलेलाच प्रश्न पडला मला..कोल्हापूर - पुणे अंतर २३३ किमी आहे. त्याला रेल्वेने ७ तास लागतात? सुपरफास्ट असूनही?

पराग, नेहमीप्रमाणेच मस्त वर्णन. आपण सगळे रेल फॅन्स मिळून एकदा प्रवास करायला हवा एकत्र.

तुम्ही एकटे जाताना वरचे तपशील प्रत्यक्षात घडले हे कसे चेक करता? कारण अनेक ठिकाणी प्रत्येक वेळेस आपली जागा सोडून जावे लागेल ते करायला.

दुसरे म्हणजे गाडीत ठरवून उजव्या बाजूची जागा घेता का? उलट्या दिशेने जाणार्‍या गाड्या तिकडे बसले तरच दिसतात.

दिनेश, जिज्ञासा - रेल्वेने अंतर जास्त आहे (बहुधा २६०+). तरीही सात तास जास्तच आहेत. अनेक ठिकाणी सिंगल लाईन असल्याने क्रॉसिंग करता थांबावे लागत असेल. मधेमधे स्टेशने घेतली तर जास्त वेगाने गाडी जात नसेल. नाहीतर शंभर चा वेग धरला तरी दोन अडीच तासात पोहोचायला हवी. सरकारने हायवेला जितके प्राधान्य दिले आहे तितके सर्वात जवळून रेल्वे रूट्स बांधायला दिलेले नाही. त्यामुळे हे जुनेच रूट्स अजून चालू आहेत. हा म्हणे पूर्वी मिरज वरून वाढवून कोल्हापूर पर्यंत घेतलेला मार्ग आहे. पुणे/मुंबई-कोल्हापूर असा सर्वात जवळून प्लॅन केलेला असा मार्ग नाही. अनेक ठिकाणी तोच प्रॉब्लेम आहे. नाहीतर बंगलोर ला जायला सुद्धा मुंबईहून २४ तास लागायची गरज नाही.

त्यात रेल्वेचे विभाग. अनेक वर्षे कोल्हापूर भाग दक्षिण-मध्य रेल्वे कडे. त्यांचे प्रमुख केन्द्र सिकंदराबाद व सगळे प्राधान्य तिकडे.

वास्तविक आता हे सगळे भाग दुपदरी मार्गाने जोडायला हवेत व विद्युतीकरण करून वेगवान गाड्या असायला हव्यात उत्तर भारतात जाळे आहे तसे. मुंबई-पुणे-कोल्हापूर-सोलापूर-नाशिक हे सगळे एकमेकांपासून शेकडो लोक ३-४ तासांत जाउ शकतील असे जोडले पाहिजे (त्यामानाने अकोला, जळगाव, चाळीसगाव, नागपूर कनेक्शन्स चांगली असावीत थ्रू ट्रेन्स मुळे. नक्की माहीत नाही). हायवेवरचे प्रेशरही आपोआप कमी होईल. पण या भागाला कधी प्राधान्यच मिळत नाही. आश्चर्य म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय सत्ताकेन्द्र अनेक वर्षे बारामती, सांगली, कराड वगैरे मधे असूनही यात फरक पडला नाही (लातूर, औरंगाबाद, नगर कडेही तीच अवस्था). बहुधा फक्त एक काय ती बारामतीपर्यंत गाडी झाली.

जर ईजिन मध्ये बिघाड झाला नसता तर गाडी ६ तासात पोहोचली असती. जर ईजिन चे proper maintenance केले तर हे सहज शक्य आहे. स्विस सारखे time management केले तर क्रोसिंग , साईडिग वगैरे मध्ये लागणारा वेळ कमी करुन आजुन १ तास वाचेल. आणि हे करायला फार investment नाही लागत.

एवढ्या तत्परतेने इंजिन बदलून गाडी पुण्यापर्यंत आणल्याबद्दल रेल्वेचे विषेश अभिनंदन केलेते का पराग तुम्ही..

मस्तच! Happy

लांब अंतराचा रेल्वे-प्रवास खूप मिस करतेय मी...

फारएण्डची पोस्ट पण आवडली.
तसाच प्रश्न मलाही पडलाय - तुम्ही एकटे जाताना वरचे तपशील प्रत्यक्षात घडले हे कसे चेक करता?

मस्त लेख.

गाडीच्या अवतीभवती इतके सारे घडत असते हे कुठे कोणाला माहित असते. आम्ही सामान्य लोक गाडी आम्हाला हव्या त्या वेळी हवी तिथे पोच्लि नाही की शिव्या द्याय्चे काम फक्त करतो. Happy

गाडीच्या आगेमागे किती मेहनत असते ते इथे लिहुन ठेवल्याबद्दल आभार.

जबरदस्त लेख, आवडला.

स्टेशन मास्तरने पुण्याहून सेक्शन कंट्रोलरकडून गाडीला सोडण्यासाठी परवानगी घेतली होती. दरम्यानच्या काळात ब्रेक पॉवर सर्टिफिकेट आणि अन्य कागदपत्रांवर ड्रायव्हर आणि गार्डच्या नोंदी आणि स्वाक्षऱ्याही घेऊन झाल्या होत्या. योग्यवेळी स्टेशन मास्तरने आपल्या केबीनमधील ब्लॉक इस्ट्रुमेंटच्या माध्यमातून दोन किलोमीटर पुढे असलेल्या गूळ मार्केटच्या स्टेशन मास्तरला इलेक्ट्रॉनिक संदेश (ट्रेन कमिंग फ्रॉम) पाठविला, त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याने ट्रेन गोईंग टू संदेश पाठविला.

<<
<<
ह्या ऐवढ्या डिट्टेल नोंदि तुम्हाला कश्या कळल्या? Happy

साधारण १९९५ पर्यंत पुण्याहून मिरज-कोल्हापूरपर्यंतच ब्रॉड गेज असल्यामुळे ब्रॉड गेज गोवा एक्सप्रेसचा प्रवास मिरजमध्ये संपत व चालू होत असे. मिरजेनंतर प्रवासी व पार्सल मीटर गेज गोवा एक्सप्रेसमध्ये स्थानांतरित होऊन ती गाडी गोव्याकडे जात असे. या संपूर्ण मार्गाचे ब्रॉड गेज झाल्यावर रोजच्या या कसरतीची आवश्यकता संपली.
---०००---
कोल्हापूर पुणे हे महामार्गाने २३७ कि.मी., तर लोहमार्गाने ३२७ कि.मी. अंतर आहे. पण तरीही कोल्हापूर निजामुद्दीन आणि कोल्हापूर अहमदाबाद यासारख्या गाड्या आता सव्वासहा तासात हे अंतर कापत आहेत. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींग व सिग्नलिंग यंत्रणेमुळे हे शक्य झाले आहे. पूर्वी या प्रवासाला कमीतकमी आठ तास लागत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात या मार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी मिळालेली आहे. त्यानंतर हे अंतर सहज साडेपाच तासांत कापता येईल. आताही तसे होऊ शकते, पण काही तांत्रिक मुद्द्यांमुळे ते शक्य होत नाही आहे (जसे, कोल्हापुरात रेल्वे स्थानकात जास्त गाड्या सामावून घेण्याची क्षमता नाही इ.) मात्र या संपूर्ण मार्गाचे दुपदरीकरण प्रत्यक्षात यायला किमान दहा-बारा वर्षे वाट पाहावी लागेल.
---०००---
मी एकटा जात असलो तरी माझ्या सवयीप्रमाणे रेल्वेच्या सर्व हालचालींकडे लक्ष राहते. त्यामुळे डब्यात आणि डब्याच्या बाहेर (गाडीच्या आसपास) घडणाऱ्या रेल्वेविषयक घडामोडींकडे बसल्या जागेवरूनही लक्ष जातेच जाते. त्यामुळे त्या पुन्हा चेक करण्याची फारशी गरज भासत नाही. गाडीत मला उजव्या बाजूची सीट/बर्थ सर्वांत जास्त आवडतो. पण आरक्षण केल्यावर त्या बाजुलाच आपली जागा येईल असे नाही. मग आहे ती जागा स्वीकारावी लागते. कोल्हापूर पुणे एकेरी मार्ग असल्यामुळे कोणत्याही बाजूला सीट/बर्थ असला तरी फारसा फरक पडत नाही. आणि होय आपण सत्ताकेंद्राविषयी उल्लेख केला आहे. बारामती लोणंद मार्ग (सुमारे ५० कि.मी.) गेली कित्येक वर्षे रखडला आहे आणि अजूनही लोणंद फलटण एवढाच, म्हणजे निम्माही नाही, तयार झाला आहे.

मस्त लेख.
ईतकी वर्ष रेल्वे प्र्वास केलाय तरी ईतक्या बारीकसारीक तपशीलात कधीच शिरलो नाही. काही वर्षांपूर्वी डेक्कन क्वीनच्या ईंजिनात बसून केलेल्या पुणे-मुंबई प्र्वासाची आठवण झाली.

४० / ४५ वर्षांपुर्वी कोकणातला रस्ता नव्हता. मुंबई पुणे हायवे नव्हता, खाडी पूल नव्हता. त्यावेळी रस्त्याने जाणे कटकटीचे होते. आम्ही महालक्ष्मीने मुंबईहून कोल्हापूरला जात असू. मग तिथून एस टी ने मालवणला. त्यावेळी फोंडा घाटात गव्यांचा धोका असल्याने रात्रीच्या गाड्याही नसत.

कोकणमार्ग खुला झाल्यावर आता रेल्वेने कोल्हापूरला जायचे प्रयोजन राहिले नाही. कोकणात मात्र कोकण रेल्वे सोयीची आहे. खुप वेळ वाचतो आणि मस्त झोप काढून होते.

रेल्वे ही एक अजस्त्र यंत्रणा आहे. तिच्यात कमतरता निश्चितच आल्या आहेत आणि त्याबद्दल प्रतिक्रिया दिल्या पाहिजेतच. पण हे करताना डोळसपणा हवा. केवळ शिव्या द्यायच्या म्हणून देण्यापेक्षा जेथे चांगले काम होते आहे, त्यालाही पोच देणे गरजेचे असते. म्हणूनच इंजिन बदलण्याच्या तत्परतेचे अभिनंदन करावेसे वाटले.

खुपच इंटरेस्टिंङ लेख पराग. मस्त वाटतं ते तपशील वाचताना, रंगूनच जायला होतं Happy
कसलंही आजूबाजूच्या परिसराचं वर्णन नसूनही तांत्रिक गोष्टीही किती रंजक होऊ शकतात हे ह्या लेखामुळे समजलं.

रेल्वेनं पुणे-कोल्हापूर किंवा उलटा प्रवास दिवसा करून वर्षं झाली, आता तुमच्यामुळे करावासा वाटतोय. जाणार लवकरच. पण तुम्ही लिहिलेल्या तांत्रिक गोष्टी प्रत्यक्ष बघितल्या तरी समजायला कठीण आहेत. ते कसं करायचं ते थोडे बेसिक्स उलगडून सांगितलेत तर मुलं सोबत घेऊन ही निरिक्षणं करत प्रवास करणं मजेचं आणि एकीकडे शिकत शिकत होईल.

शक्य झाल्यास प्लीज पॅराग्राफ्स करा. त्यामुळे वाचणं सोपं होईल जरा.

प्रचंड आवडला!
रेल्वेच्या सगळ्या प्रवासाकडे आणि कारभाराकडे बघायची वेगळीच नजर तुम्हाला आहे.
लिहीत रहा आम्ही वाचतोय!

चांगले वर्णन.
रेल्वे चालकाला 'लोको पायलट' म्हणतात हे सर्वांनी लक्षात घ्यावे. 'इंजिन ड्रायव्हर' नाही! कारण रेल्वेत 'ड्रायव्हिंग' नसते. गाडी सरळ चालते.
तसेच 'लोकल" चालकाला 'मोटरमन'.

छान प्रवासवर्णन.

आधी शिर्षकात 'एक चांगला पर्याय' हे वाचुन हि गाडी कशी सोयीची आहे अश्या टाईपचे वर्णन असेल असे वाटले होते.
प्रत्यक्षात तुम्ही रेल्वे प्रवासाचे प्रवासवर्णन लिहिले आहे. तुम्ही याच फिल्डमधले आहात असे दिसते.

Pages