7. राधे.... गोकुळ सोडताना....

Submitted by अवल on 9 June, 2015 - 21:00

आणि आठवतो तो ही दिवस राधे, गोकुळ सोडतानाचा....
मी निघालो होतो मथुरेला जाण्यासाठी. तुम्ही सगळे यमुनातिरी आलेलात, निरोप द्यायला. मथुरेला जाणं भागच होतं. कंसाचे अत्याचार आता थांबवणं गरजेचेच होते. वसुदेवबाबा अन देवकीमातेला सोडवायचे होते साऱ्यातून.
मी,नंदबाबा, यशोदामाई, पेंद्या, सारे गोप, तू, साऱ्या गोपी आपण सगळे यमुनातिरी पोचलो. मग मात्र मी सगळ्यांना थांबवलं. मला माहिती होतं, आता आपली भेट होणार नाही. पण तुम्ही सगळे याकडे फक्त काही काळाचा विरह म्हणून पहात होतात.
नंदबाबांच्या पायाशी मी वाकलो, त्यांनी धड वाकूही दिलं नाही अन आपल्या छातीशी धरलं. "बाबा मी मथुरेला जातो. आता गोवर्धन पाठीशी आहे, नाही येणार काही इथे संकट"
"कान्हा हो रे, नको इथली काळजी घेऊस. तू इतके छान बस्तान लावून दिलं आहेस, कसलीच काळजी नाही बघ इथली. तू तुझी काळजी घे. कंसाशी नीट बोल, तुझे गोड आर्जवी बोलणे तो नाहीच नाकारू शकणार. अन वसुदेव, देवकी त्यांना आमचा नमस्कार सांग. त्यांची ठेव आम्ही नीट जपली ना हे सांग बाबा."
" बाबा, असं नका म्हणूत, मी तुमचाच. हा कान्हा इथेच ठेऊन जातोय. मथुरेला जातोय तो श्रीकृष्ण बाबा"
"जा बेटा, जा. मोठा हो, आभाळा एव्हढा मोठा हो.." आणि नंदबाबा डोळे पुसत निग्रहाने दूर झाले.
"अन मग मोठा अवघड क्षण तुझ्यासमोर उभा राहिला ना कान्हा? यशोदामाईला निरोप देणं, हे तुझ्या आयुष्यातला अनेक अवघड क्षणांपैकी एक असेल ना रे?"
" खरं सांगू राधे, मलाही तसच वाटत होतं. पण माई फार फार वेगळी अन खूप ताकदीची बाई. ज्या क्षणी मी तिचा नाही हे तिला कळलं, त्या क्षणी तिने मला तिच्या प्रेमाच्या बंधनातून मुक्त केलं, अगदी मनापासून, आनंदाने, अन एका तृप्ततेनेही.
मी वाकलो पायाशी तर म्हणाली, "कान्हा खाली बस रे जरा, लहान होतास तेव्हा कसा माझ्या कमरेपर्यंतच यायचास..."
मी गुढग्यावर बसलो तशी पटकन ओढून धरलं तिने मला पोटाशी. मग मी ही लहानपणी घालायचो तसा विळखा घातला तिला. तो एक क्षण.... तो एक क्षण .... अनेक युगं जगलो आम्ही दोघंही...
अन मग दुसऱ्या क्षणी नाळ कापावी, आपल्या मुलाला स्वताचा श्वास घेता यावा म्हणून नाळ कापावी तशी, अत्यंत निग्रहाने माईने स्वताला खटकन दूर केलं. म्हणाली,
" कान्हा, जा तू. देवकी कधीची डोळे लावून बसलीय. सारी मथुरा तुला बोलावतेय. त्या कंसाचे अपराध आता अगदी नाही सहन होत आहेत, जा, जा, कान्हा. अन माझी काळजी नको करूस, माझ्याकडे तुझ्या इतक्या आठवणी आहेत, तुझी सारी बाळलेणी, दुपटी, झबली आहेत. प्रत्येक रांजण, गोकुळातली प्रत्येक जागा तुझ्याशी इतकी बांधलेली आहे, की मला तू नाहीस याचं दु:ख करायलाही वेळ होणार नाही बघ. त्या सगळ्या आठवणी सारे आयुष्य जपून ठेवेन बाळा. जा, शुभास्ते पंथानाम्..."
"कान्हा...., अगदी खरं रे. ही यशोदामाई, खूप वेगळी, खूप मोठी, कोणालाच नाही कळली बघ. आईपण कसं असावं याचे दुसरे कोणते उदाहरण असेल सांग. आईपणाचे लाड, कौतुक, थोरवी, मुला बद्दलचा लळा प्रत्येकीलाच असतो. पण मुलाच्या मोठे होण्यासाठी आपलाच असणारा अडसर असा दूर करणारी आई विरळाच बघ कान्हा. लहानपणी तुला शिस्त लागावी म्हणून, तुझ्या खोड्यांनी गोपगोपींना त्रास होऊ नये म्हणून हीच माय बांधून घालायची तुला. मग तू किती कांगावा करायचास, किती मखलाशी करायचास, माझ्याकडे तक्रार करायचास. अन मी समजावलं की कधी मानायचास, कधी रुसून बसायचास. हे सगळे लाड, शिस्त लावणं कित्ती मनापासून, आसूसुन केलं तिने. अगदी सगळ्या आया करतात तसच. पण हे स्वताहून दूर होणं केवळ, केवळ माईच करू जाणे"
"खरय राधे, आपली मायेची पाखर मुलाला खुजं करून टाकेल हे कळल्याक्षणी यशोदामाईने मला अलगद दूर केले. अन्यथा तो क्षण या श्रीकृष्णालाही खूप अवघड गेला असता... "
"अन मग सारे गोप रडू लागलेले, मुक्त हस्त प्रेम अन प्रेमच केलं त्यांनी माझ्यावर. कसलीही अपेक्षा न ठेवता केलेलं निर्वाज्य प्रेम या गोपांचे. मी म्हणेन ते, म्हणेन तसे करणारे हे गोप. कसा मुक्त होणार होतो मी त्यांच्या प्रेमातून? कसा समजावणार होतो मी त्यांना?
अन तू फार मोठा निर्णय घेतलास तेव्हा. हो तूच सूचवलं होतस मला. फक्त एक नजर टाकलीस तू माझ्या कमरेपासच्या तुझ्या प्राणप्रिय बासरीकडे.... तसंही ही बासरी द्वारकेच्या कोलाहलात हरवून गेेली असती. तिचा आवाज तिथे दबलाच असता. ...."
"हो, ती बासरी माझी प्राणप्रिय सखी होती. पण गोपांचा तो प्राण होता रे. साऱ्या गोमाता तुझ्या बासरीने पाझरायच्या, मुक्त पाझरायच्या. वासरांना पोटभर पाजूनही पासरी पासरी पाझरायच्या त्या, तुझ्या त्या बासरीच्या सुरांनी. म्हणून तर गोकुळ बहरले. साऱ्या पंचक्रोशीला दूधदूभते पोचवू शकायचे हे गोप. त्या बासरीवर माझा जीव होता, पण ती जीव होती गोपांची....तिच्यावर हक्क होता, फक्त गोपांचा, कान्हा..."
" खरय, राधे... म्हणूनच मग मी ती बासरी गोपांकडे सोपवली. एका अर्थाने त्यांचा कान्हा त्या बासरीपुरता त्यांनाच परत केला.
अन मग सगळ्या गोपी पुढे झाल्या. त्यांचा उत्साह, त्यांचे तारूण्य, त्यांचे सौंदर्य, यांना मी कसा पुरा पडणार होते? पण तू पुढे झालीस म्हणालीस, 'पेंद्या , सगळे गोपहो मिळाली ना बासुरी, मग वाजवाना. ' अन गोपांनी वाजवलेल्या बासरीवर तुझी पावलं थिरकू लागली. तू अन मी केलेली रासक्रिडा तू गोपींना देऊन टाकलीस. गोपींही भान हरपून गरबा करू लागल्या. माझ्या भोवती कडे करून गोपी आपली रासक्रिडा करण्यात मग्न झाल्या. त्यांचे सारे लक्ष तुझ्या हालचालींवर केंद्रित झाले, तशी तू खूण केलीस मला... जा, कृष्णा जा...."
" दुसरा काही पर्यायच नव्हता कृष्णा, त्या गोपींना समजावणं खरच अशक्य होतं. त्या माई इतक्या मनाने कणखर नव्हत्या त्या. हा वियोगाचा क्षण त्यांना झेपणारा नव्हता कृष्णा...त्यांच्या दु:खातून त्यांना बाहेर काढायचं तर ही रासक्रिडाच एकमेव उपाय होता..."
" पण राधे, त्यामुळे मी तुझा निरोपही नाही घेऊ शकलो ग.... ना तुला बासरी देऊ शकलो, तुझी रासक्रिडाही केवळ तुझी नाही राहिली, तुझ्याजवळ काहीच न देता मी निघून गेलो, राधे.... क्षमा कर राधे..."
"नाही रे श्रीरंगा.... नको असे म्हणूस"
"राधे कसं सावरलस स्वता:ला? माईकडे माझे सारे बालपण होते, नंदबाबाकडे गोकुळ, गोपांकडे बासुरी अन गोपी रासक्रिडा. त्या त्या गोष्टीत माझा विरह ते सोसत होते, पण तू? तू एकटीच, कसलीही आधार, कसलीही ओळखीची खूण न देता, तुला अगदी एकटी टाकून गेलो ना मी..? काय होतं तुझ्या सोबत, राधे!"
" कृष्णा नको रे शिणूस.... लौकिक अर्थाने तुझा अंश, अनय होताच की माझ्या सोबत. अन खरं सांगायचं तर मी दूर झालेच कुठे तुझ्यापासून? मी तर तुझा विवेक, मी तर तुझी विचारशक्ती, मी तर तुझी प्रेरणा, मी तर तुझ्यातल्या जागतेपणाची खूण, मी तर तुझ्या असण्याची जाणीव.... अरे मी होतेच सतत तुझ्या सोबत... बघ आताही आहेच की मी तुझ्यासोबत, तुझ्या आत. अरे, मी राधा, कृष्णाची राधा, तिला दुसरं अस्तित्वच कुठेय? कृष्ण आहे तर राधा आहेच ना,..."
"राधे..."

.......

राधे...१. http://www.maayboli.com/node/51393
राधे...२. http://www.maayboli.com/node/51440
राधे...३. http://www.maayboli.com/node/51543
राधे...४. http://www.maayboli.com/node/51594
राधे...५. http://www.maayboli.com/node/51968
राधे...६. http://www.maayboli.com/node/52356
राधे...८. http://www.maayboli.com/node/54680

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राधे........... कित्ती दिवसानी भेट्लीस ग....

अवल, एक एक वाक्य जणू टपोरा मोती..... खुप सुरेख सर गुम्फला आहेस तू.....

खुप सुंदर लिहिलंयस गं..


कृष्णा नको रे शिणूस.... लौकिक अर्थाने तुझा अंश, अनय होताच की माझ्या सोबत. अन खरं सांगायचं तर मी दूर झालेच कुठे तुझ्यापासून? मी तर तुझा विवेक, मी तर तुझी विचारशक्ती, मी तर तुझी प्रेरणा, मी तर तुझ्यातल्या जागतेपणाची खूण, मी तर तुझ्या असण्याची जाणीव.... अरे मी होतेच सतत तुझ्या सोबत... बघ आताही आहेच की मी तुझ्यासोबत, तुझ्या आत. अरे, मी राधा, कृष्णाची राधा, तिला दुसरं अस्तित्वच कुठेय? कृष्ण आहे तर राधा आहेच ना,..."

टचिंग....

खूप छान लिहिलंय हे...

गोकुळ- गोप-गोपींच्या कॄष्णावरील निर्व्याज प्रेमाचं हे प्रतिक ! कॄष्णा, मी तुझा आणि तू फक्त माझाच, हा आणि हा एकच भाव जपलेला प्रत्येक जीव आणि या निरपेक्ष भावानेच काळावरही मात केली, हे गोकुळ आणि त्यातील रासक्रीडा अमर झाली भावभक्तीच्या विश्वात ! काळ-वेगाचे सारे परिमाण ओलांडून....

राधे राधे

लौकिक अर्थाने तुझा अंश, अनय होताच की माझ्या सोबत.

.....

Proud

बाप रे ! काय हे महान मुक्ताफळ ! नवरा म्हणजे साक्षात प्रियकराचा अंश !

विबासं चं इतकं उदात्तीकरण एकता कपूरलाही जमलं नसेल !

धन्यवाद सर्वांना ___/\___
काऊ >>> कृष्णकिनारा : डॉ. अरुणा ढेरे
पृष्ठ क्रमांक 37
ओळ 12,13
हे कृपया वाचावे. अरुणाताई अभ्यासाशिवाय असे लिहिणार नाहीत हा विश्वास मला आहे. म्हणूनच डोळे झाकून ही माहिती स्विकारली.>>>

मला खरंतर हे वाक्य फार ऑड वाटल्यामुळे हसू आलं वाचताना:
>> अन मग सगळ्या गोपी पुढे झाल्या. त्यांचा उत्साह, त्यांचे तारूण्य, त्यांचे सौंदर्य, यांना मी कसा पुरा पडणार होतो?

कृष्णाने गोकुळ सोडण्याच्या संदर्भात गोपींच्या तारुण्याला आणि सौंदर्याला पुरं पडण्याचा काय संबंध? Happy

कृष्ण आहे तर राधा आहेच ना >>> अचूक शब्दात पकडलं आहेस. खूप आवडला हा भाग Happy

अन मग सगळ्या गोपी पुढे झाल्या. त्यांचा उत्साह, त्यांचे तारूण्य, त्यांचे सौंदर्य, यांना मी कसा पुरा पडणार होतो? >>> हे मला पण खटकले. जरा उलगडून सांग.

माधव >>> अन मग सगळ्या गोपी पुढे झाल्या. त्यांचा उत्साह, त्यांचे तारूण्य, त्यांचे सौंदर्य, यांना मी कसा पुरा पडणार होतो? >>> हे मला पण खटकले. जरा उलगडून सांग.<<<
मला असं वाटलं की, प्रत्येकाला जाताना काहीतरी देऊन गेला कृष्ण. त्याची अनुपस्थिती कमीतकमी जाणवेल, असं काहीतरी तो देऊन चालला होता. पण या गोपींना काय देऊ शकणार होता तो? गोपींचे कृष्णाच्या आयुष्यातले महत्व होते ते तारुण्यसुलभ उत्साहाचे, सौंदर्याचे. म्हणजे तारुण्य, सौंदर्य, तारुण्याचा रसरशीतपणा याच्याशी मला गोपी निगडित वाटतात. त्यांना कृष्ण काय देऊ शकणार होता जाताना, तर एक मोठी पोकळी, एकटेपणा. त्यांच्या तारुण्यसुलभ भावनांना पुरेल असे तो काहीच देऊ शकत नव्हता.त्या अर्थाने तो पुरा पडणार नव्हता असं म्हणतोय कृष्ण. अन त्या सगळ्याला राधेची रासक्रिडा, नृत्य, गरबा हाच किती समर्पक उपाय राधेने सांगितला असं काहीसं.
खरं सांगायचं तर हे माझे नंतरचे विचार. लिहिताना हा इतका साधकबाधक विचार, त्याची तार्किकता नाही मी तपासत. रादर बऱ्याच अंशी जे मनात आले ते उतरवले असेच होते. टायपो झाला नाही ना इतकेच बघते मी एकदा लिहिल्यावर.
याच लेखाबाबत एक घोडचूक केलेली... मथुरा न म्हणता द्वारका लिहिलेलं. पण तीही चूक एका सखीनी दाखवली तेव्हा लक्षात आली. इतकं न संपादित करता लिहिते, सो हे त्या त्या क्षणांचे देणे. ते तसेच स्विकारते मी. नंतरची कारागिरी नाही जमत मला. अन मला तसेच आवडतेही, काहींना जास्त काटेकोर लेखन आवडते, मला उत्स्फुर्त आवडतं, इतकाच फरक.
पण धन्यवाद माधव, तुमच्या मुळे त्या क्षणीचे विचार उलट वळून पाहता आले Happy

माझ्या करता गोपी म्हणजे संसाराच्या विवंचनेत आकंठ बुडालेल्या स्त्रिया (स्त्रियाच का हे मला पण नाही माहीत). प्रत्येकीच्याच मनात काम (इच्छा) आहे. षट्रिपूतला हा सगळ्यात महत्वाचा. ह्याच्याच जिवावर बाकीचे पाच टिकून राहतात. कृष्ण त्या प्रत्येकीचीच जी इच्छा आहे ती शमवतो (कदाचीत पुरी न करताही. कारण एक इच्छा पुरी झाली की लगेच दुसरी निर्माण होते. त्याला अंत नाही) आणि प्रत्येक गोपीला तो इच्छेपलीकडच्या जगात नेतो - जिथे केवळ आनंद आहे. ही त्याची रासलिला. आता तो नसताना ती कशी होणार ?

गरबा नाचताना बघितलात का? खरोखर भान हरपून नाचतात. सगळं विसरून पूर्ण तादात्म्य असतं. अर्थात हे काहींच्यातच. ते तादात्म्य मला अपेक्षित होतं... मला नीट उलगडून सांगता येत नाहीये...