पालक -मेथी टिक्कड आणि दाल.

Submitted by सुलेखा on 6 June, 2015 - 22:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

टिक्कड मका पिठाचे करतात.. मका पिठ भिजवुन त्याचा लहान गोळा हातावर बाटी सारखा थापुन, मातीचा तवा व चुलीच्या सारणावर ठेवुन भाजतात. टिक्कड वरुन कडक भाजला जातो पण आतुन मऊसर असतो.दाल मध्ये चुरून खातात.येथे मूळ कृतीत बदल केला आहे..मका पिठ थोडेसे भरभरीत असते त्यामुळे त्यात कणिक व तेलाचे मोहन घालुन केले आहेंत.बाकी साहित्य मूळ कृती प्रमाणे घेतले आहे.
साहित्य :--२ कप मका पिठ व १ कप कणिक
पालक व मेथीची भाजी बारीक चिरलेली साधारण १ कप.
२ चमचे तीळ.
मीठ व २चमचे तेलाचे मोहन.
हिरवी मिरची व आले जाडसर वाटलेले चवीप्रमाणे घ्यावे.
वरुन लावायला पातळ केलेले तूप २ चमचे.
दाल साहित्य :-१ वाटी तूरीची डाळ /मूगाची पिवळी डाळ/ या दोन्ही डाळी सम प्रमाणात
हिरवी मिरची आले पेस्ट १ चमचा.
१ मोठा टोमॅटो बारीक चिरुन घ्यावा.
मीठ.-गरम मसाला चवीनुसार.
२ चमचे तूप फोडणी साठी हिंग -जिरे-मोहोरी-हळद-लाल सुक्या मिरचीचे२/३ तुकडे
कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

कूकर मध्ये डाळ शिजवुन घ्यावी.शिजवलेल्या डाळीला घोटुन त्यात टोमॅटो-हिरवी मिरची आले पेस्ट -हळद-मीठ --मसाला घालुन उकळवून घ्यावी.तूप गरम करुन हिंग -जिरे-मोहोरी व लाल मिरचीचेतुकडेघालुन लगेच ही फोडणी गरम दाल वर ओतावी.आता यावर चिरलेली कोथिंबीरघातली कि दाल तयार आहे.ह्या दाल मध्ये आंबट पणा टॉमॅटो चा येतो.त्या अंदाजाने टोमॅटो घालायचा आहे.
आता टिक्कड पाहू. मकापिठ,कणिक, मेथी-पालक भाजी-हिरवी मिरची आले पेस्ट्,तीळ,मीठ,तेलाचे मोहन व लागेल तितकेच पाणी घालुन गोळा करुन त्याला थोडे तेल लावून घ्या. पोळी साठी घेतो त्यापेक्षा थोडे मोठे गोळे करुन घ्या. पोळपाटावर प्लॅस्टीक शीट /पिशवी ठेवून त्यावर गोळा ठेवुन जाडसर लाटुन घ्या. गरम तव्यावर दोन्ही कडुन भाजुन घ्या. ह्या भाजलेल्या टिक्कड ला वरुन थोडेसे गरम तूप लावा. असे सगळे टिक्कड भाजुन घ्या.हे टिक्कड दाल बरोबर खायला घ्या.
टिक्कड गरम व थंड ही छान लागतात. त्याबरोबर कैरीचे लोणचे असले तर मस्तच.
टिक्कड मधे पुदिना चिरलेला,कांदा व कांदा पात घालुन ही करतात.
दाल ला लसणीचा तडका दिल्यास छान चव येईल.
1-IMG_20150604_210358.JPG

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुलेखा.. अगं किती दिवसांनी आलीस इकडे..
मस्तये रेसिपी, आवडत्या दहात टाकून ठेवलीये ,करीन लौकरच..
तुझ्या रेस्पी वाचून एम पी ची भारीच आठवण येते, पण एम पी चीये का ही रेसिपी??आठवत नाहीये

वर्षू .इथे लिहीलेली जैन रेसिपी आहे त्यात मीअगदीच कमी प्रमाणात हिरवी मिरची वापरली आहे.पण मूळ रेसिपीत फोडणीत ही लाल तिखट घालुन दाल झन्नाट करतात. मी टिक्कड पातळ केले आहेत.खरे तर गाकरा इतके जाड करायला हवे होते.पण इथे उसगावातल्या मैत्रीणीला रूचेल असे केले आणि खूपच आवडले.शेंगदाण्याची चटणीहीआवडली.

मस्त रेस्पी! खूप दिवसांनी सुलेखाताई दिसल्यात Happy
मला टिक्कड म्हणजे बाटीटाईप काही असेल असं वाटलं होतं. पण हासुद्धा प्रकार मस्तच लागेल.
शुद्ध तुपाची, भरपूर लसूण तळून केलेली चळचळीत खमंग फोडणी घातलेल्या त्या दालच्या नुसत्या कल्पनेनीच भूक खवळलेली आहे. Wink

सुलेखा..................बस्स नामही काफी है!
जोक अपार्ट.........अगं तुझं नाव पाहिलं की सुंदर, टेस्टी वेगळी रेसिपी असणार खात्रीच असते!

मस्तं!
तुमच्या रेसिप्यांची वाटच पहात असते.
हमखास यशस्वी प्रकारात तुमच्या रेसिपीज असतात.
बघायलाही मजा येते आणि करायलाही!

मस्त रेसीपी. मला नाव वाचून वाटले होते कि पालक मेथी ग्रेव्ही मध्ये मक्याचे बारके गोळे असतील. फ्राय केलेले वगैरे. पण हे वेगळे आहे. मला जमेल.

भारी आहे रेसिपी
<<<< शुद्ध तुपाची, भरपूर लसूण तळून केलेली चळचळीत खमंग फोडणी घातलेल्या त्या दालच्या नुसत्या कल्पनेनीच भूक खवळलेली आहे.>>>>> +1000

अरे मस्त आहे रेसिपी! आमच्याकडे सगळ्यांना आवडण्याची दुर्मिळ शक्यता , त्यामुळे नक्की करणार!

मस्त रेसिपी. मलाही टिक्कड म्हणजे बाटी टाईप वाटलं. चुरून खातात दालमध्ये वगैरे लिहिल्यामुळे आणखीनच.