वासुदेव

Submitted by संतोष वाटपाडे on 24 May, 2015 - 00:14

* वासुदेव*
पायात घुंगरु टाळ कपाळी मोरपिसाचा तुरा
ओठात इठुचे नाव घालितो साद निळ्या अंबरा
वासुदेव आला घरी टाक भाकरी तव्यावर आई
भारूड म्हणत नाचला थकुन थांबला जायचा न्हाई....

छम्माक वाजला टाळ धावले बाळ अंगणी आले
घरधनी उचलुनी फाळ तुडवण्या गाळ पहाटे गेले
वासरे लाडकी घेत पहा रांगेत निघाल्या गाई
वासुदेव आला घरी भाज भाकरी तव्यावर आई...

सांगतो एक बातमी तुझी लक्षिमी खरी धाकातं
शोभतेही बावनकशी नथणि छानशी तुझ्या नाकातं
गावात तुझ्यासारखी गुणी पारखी कुणी ना बाई
वासुदेव आला घरी एक भाकरी वाढ ना आई...

शेतात उभी बाजरी कडाला तुरी टप्पुरं दाणं
झोपडीमधी अंधार तरी भरणार उद्याला सोनं
संसार तुझा पंढरी इठोबा घरी तुच रखुमाई
वासुदेव आला घरी एक भाकरी वाढ ना आई
भारूड म्हणत नाचला थकुन थांबला जायचा न्हाई..

-- संतोष वाटपाडे (नाशिक)
{ भवानी वृत्त = १३ + ८ + ९ }

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी..

छान!

खूप छान झालीय रचना.
वन ऑफ द बेस्ट! (अर्थात हे तुम्हाला वारंवार म्हणावंच लागतं...इतकं छान लिहिता तुम्ही)