'सांध्यपर्वातील वैष्णवी'

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

'सांध्यपर्वातील वैष्णवी' हे कवी ग्रेसच्या कवितासंग्रहाचं नाव आहे. ग्रेसच्या पुस्तकाच्या नावाचा अर्थ विचारतोस तू? शिव शिव!!
शोनूने त्यावर छानच आणि समर्पक लिहिले आहे.
ग्रेसने असे काही गूढ शब्दसमूह निर्माण केलेत की त्याचा नेमका अर्थ चिमटीत पकडणे शक्य नाही बस त्याची नादमधुरता, लय अनुभवत रहावी.

सायंकाळचे महत्व ग्रेसच्या भावविश्वात अनन्यसाधारण आहे. त्याच्या पहिल्याच पुस्तकाचे नाव 'संध्याकाळच्या कविता'. त्यानन्तर मध्ये एक 'संध्यामग्न पुरुषाची लक्षणे' नावाचा कविता संग्रह येऊन गेला. त्याच्या साहित्यात या सांध्यवेळा ठायी ठायी भेटतच राहतात. उदास करीत राहतात. विषण्ण करीत राहतात...

स्वत: ग्रेसच म्हणतो...

"छायाप्रकाशाचे हे खेळ असेच दर पावला गणिक ठेचा देतात. अंधार गर्भात तेज असते की तेजोगर्भात अंधार? मला माहीत नाही.माहीत करून घेण्याचा प्रयत्नही मी कधीच सोडून दिला आहे.तेजाचा तोल ढळू लागला की श्याम संध्या येते आणि अंधार बेताल होऊ लागला की पहाटसंध्या येते, हेच वास्तव. म्हणूनच कुठल्याही संध्याकाळी मी स्वत:कडे स्वच्छ बघू शकतो.विश्वाचे अमर्याद तोल सांभाळणार्‍या या क्षणभंगुर उदास मुहुर्तात मला झाकोळणारी मंदिरे,घुंगुरांचे घंटानाद,पाखरांचे पंखपखवाज आणि उजळणारी गोपुरेही खुणावू लागतात. माझ्या अनुभवविश्वात संध्याकाळ फार मोलाची.. पण तीही माझ्या मालकीची नाहीच! संध्याकाळ फार मोलाची.. पण संध्याकाळ थोपवून धरलेली नाही मी, धरताही येणार नाही.. मी फक्त तेजाचे कराल कौस्तुभमणी उरात खुपसून घेतो आणि अंधाराची भयाण भुतावळही अंगावर घेतो. काहीच नाकारीत नाही. बिनतक्रार सर्व स्वीकारतो आणि असे करताना जीव शिणला की पुन्हा थकल्या अंगाने संध्याकाळचीच वाट पाहातो. तिथेच विश्रांती! भयग्रस्त वास्तवाच्या या कालस्त्रोतावर सर्व संध्याकाळींचा एक सलग पूल बांधून घेता आला तर किती बरे होईल असेही मला अनेकदा वाटून जाते.. हा विचार फोल असेल पण मोलाचा नाही? पळवाट नकोच मला, फक्त दु:ख टेकण्यापुरती थोडीशी संदिग्धता चक्रतोलाच्या केंद्रबिंदूवर थिरकणारी माझी संध्याकाळ मी माझ्यापुरती थोडी दीर्घ करू पाहतोय....."

सांध्य पर्वातील वैष्णवी चे दोन अर्थ सांगता येतील. दिवस आणि रात्रीच्या या संधिकालाचा आता विस्तार झाला आहे. हे सूक्श्माचे स्थूलात की स्थूलाचे सूक्स्मात रूपान्तर झाले आहे?. हा संध्याकाळचा period आहे त्यालाच सांध्यपर्व म्हटले आहे. तो केवळ काळाचा तुकडा नाही तर त्याचे पर्वात रूपान्तर झाले आहे....
वैष्णवी म्हणजे गीतरचनेचा तो प्रकार आहे. बहुधा माझ्या माहितीनुसार बंगालातल्या बाऊलपंथियांच्या भक्तीरचनेस' वैष्णवी' म्हणतात...

दुसरे असे की ग्रेसचे वय आता ६५ च्या आसपास असावे. आयुष्याच्या संध्याकाळची चाहूल लागली आहे. या संध्याकाळातील मानसिक आंदोलने म्हणजे ही कदाचित सांध्यपर्वातील वैष्णवी असेल, कुणी सांगावे!!

अर्थात हा आपला एक अंदाज हं! अन्यथा ग्रेसच्या लिखाणाचा अर्थ वेदांसारखाच नेति, नेति, नेति म्हणजे असाही नाही, असाही नाही आणि असाही नाही असेच म्हणावे लागेल!!!!!!

विषय: 
प्रकार: 

ऱोबीन, सुंदर लिहिलं आहेस.. पण तुझ्यासारख्या कडून अजून खोलवर काहीतरी अपेक्षित होतं..

ता. क. -- आमचा प्रिय हूड हरवला आहे Sad

किती जुने लिखाण. दरम्यान तेव्हा ६५ वषांचे ग्रेस ७४ व्या वर्षी गेले ही !! आज अचानक पुस्तकातल्या मोरपिसासारखे हे पान सापडले . माबो वर नवीन आलेल्यासाठी त्याचा 'उद्धार'करावा म्हणतो. Happy

>>>> आयुष्याच्या संध्याकाळची चाहूल लागली आहे. या संध्याकाळातील मानसिक आंदोलने म्हणजे ही कदाचित सांध्यपर्वातील वैष्णवी असेल, कुणी सांगावे!! <<<<
मला हेच समर्पक वाटते. (यावर हातोहात आख्खे एक स्वगत पाडता येईल मला)

छान लिहीलंय.

हॄदयनाथ मंगेशकरांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की ग्रेस स्वतः देखील त्यांच्या कवितेचा अर्थ सहसा सांगत नाहीत. म्हण्तात तुम्ही जो लावाल तोच त्याचा अर्थ.