काळ आला होता पण वेळ आली नव्हती ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 April, 2015 - 16:03

.
आज दिनांक २४ एप्रिल २०१५, .. वर कुठेतरी यमराजाने माझे नाव लिहायला घेतले होते ...
.

साडेआठची वेळ. शुक्रवारची रात्र. कित्येकांच्या वीकेंड मस्तीला सुरूवातही झाली असावी. पण माझे मीटर अजूनही चालूच होते. इन्क्रीमेन्ट कमी होवो वा जास्त, मनासारखे होवो वा अपेक्षेपेक्षा कमी, इथे कामापासून कोणीही पळू शकत नाही.

ऑफिसमध्ये काय ऐकू येत असेल तर ती निव्वळ एसीची घरघर. पलीकडच्या क्युबिकलमध्ये काही पाने फडफडत होती जी माझ्याबरोबर आणखी एक जण ऑफिसमध्ये उपस्थित आहे याची जाणीव करून देत होती. तो निघून जायच्या आत माझे काम आटोपले म्हणून मी खुश होतो. पण उद्या मला सुट्टीच्या दिवशी पुन्हा कामाला यायचे होते. आणि तो मात्र तासाभराने काम उरकून थेट सोमवारीच उजाडणार होता.. लाईफ आहे. हर दिन सण्डे नही होता, और हर हफ्ते सॅटरडे ऑफ नही होता. ही वस्तुस्थिती स्विकारून झाली होती. पावले कष्टाने उचलतच ऑफिसच्या बाहेर पडलो, पण हेच जर उद्या यायचे नसते तर, कदाचित तरंगतच ....

असो,
तर, ऑफिस बाहेरील चहाच्या टपरीवर आवराआवर चालू होती, पण संध्याकाळी सातला काढलेला शेवटचा समोसा अजूनपर्यंत ताजा असावा. आता स्टेशनपर्यंत माझा हाच सोबती होता. ईतरवेळी मोबाईलमध्ये ट्रेन टायमिंग चेक करतो आणि किती वेळ हातात आहे त्यानुसार समोसापाव घेऊन सटकायचे की सॅण्डवीचची ऑर्डर द्यायची हे ठरवतो. आज उशीर झाल्याने लवकरात लवकर घरी पोहोचायचे होते, पण त्याचबरोबर घरी जाऊन तीच चहा खारी आणि आयपीएलची मॅच, म्हणून वेळेत पोहोचायचा फारसा उत्साह ही नव्हता. स्टेशनजवळ पोहोचलो आणि बाहेरील ईंडिकेटरवर समजले की ट्रेनची वेळ झाली आहे. मुंबई म्हटले की दर पाच मिनिटांनी ट्रेन! पण त्यातील माझ्या कामाची ट्रेन दर तिसरी असल्याने एक चुकली की पंधरा मिनिटे विश्रांती.

सबवेमधून आत शिरलो, जिन्याने वर जायला लागलो, तसे वरतून तुरळक गर्दी अंगावर आली. म्हणजे नुकतीच ट्रेन आली असावी. समोर आलेली ट्रेन आळसापायी सोडण्याइतका मी मुर्ख नव्हतो. टपाटप चार तंगड्या टाकत वर पोहोचलो तसे डोळ्यासमोर ट्रेन सुरू होताना दिसली. गर्दी भेटण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही एका डब्यात दहा-बारा टाळकी खिडक्या अडवून बसली होती तर एक कंपार्टमेंट बरेचसे रिकामेच दिसले. पटकन त्यातच चढलो. अन चढताच जाणवले आपण चुकीच्या जागी आलो आहोत. तो लेडीज फर्स्टक्लास होता.

आत बहुधा दोनेक बायका बसल्या होत्या. मला पाठमोर्‍या होत्या. त्यांना आपली फजिती समजायची आधीच उतरून मागच्या डब्यात जाऊया असा विचार केला. ट्रेनने तसाही फारसा वेग पकडला नव्हता, उतरून पटकन मागच्या डब्यात जाणे सहज शक्य होते. एवढी वर्षे मुंबई लोकलचा प्रवास केल्यानंतर ट्रेन कसा वेग पकडते आणि आपण कोणत्या वेगापर्यंत चढू-उतरू शकतो याचा अंदाज प्रत्येक मुंबईकराला आला असतोच. मलाही होताच. पण धांदलीत एक चूक मात्र झाली. पटकन उतरून मागच्या डब्यात जाऊया म्हणत मी मागे वळून उतरलो खरे.. पण कसे काय लक्षात आले नाही देवास ठाऊक, नेमके ट्रेनच्या वेगाच्या विरुद्ध दिशेने उतरलो. परीणाम जो होणार होता तोच झाला.

उतरल्या उतरल्याच, पहिल्याच पावलाला धडपडलो. चूक लक्षात आली. ट्रेनच्या दरवाज्याच्या दांड्याला पकडलेला हात मी अजून सोडला नव्हता. पण पाय घसपटू लागले होते. हळूहळू ट्रेन वेग पकडत होती. हात सोडला असता तर शरीरावरचा सारा कंट्रोल जाऊन नशीब नेईल तिथे फरफटत जावे लागले असते. कदाचित ट्रेनच्या खालीही आलो असतो. अगदी खाली गेलो नसतो तरी धावत्या ट्रेनचा एखादा वेडावाकडा फटकाही खेळ संपवण्यास पुरेसा होता. जसा वेग वाढत होता तसे तो हात सोडण्याचा पर्याय आणखी आणखी बाद होऊ लागला. मला वर खेचून घ्यायलाही कोणी नव्हते. थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म संपले असते आणि मी लटकू लागलो असतो, की आणखी काही झाले असते.

एवढे सारे विचार, खरे तर त्या वेळेस डोक्यातही येत नव्हते. मी हळूहळू शरीराच्या भाराने आणखी खाली खाली सरकत आता जवळपास आडवा व्हायचाच बाकी होतो. मनगटावरचा ताण वाढला होता. आता आपला हात कुठल्याही क्षणी सुटू शकतो याची एक थंडगार जाणीव झाली. अगदी चौथ्या पाचव्या सेकंदालाच. एवढे सारे काही वेगाने घडत होते.
मी माझ्या नशीबाला दोष देऊ लागलो, आपल्याच कर्माने मी रनआऊट होत होतो. अगदी क्षुल्लक पद्धतीने, नाहक बळी जात होता. मी कुठलाही स्टंट करायला गेलो नव्हतो, बस्स कसल्याश्या तंद्रीमध्ये केलेला निव्वळ मुर्खपणा होता..

आज सकाळीच नव्याकोर्‍या जीन्सचे उद्घाटन केले होते. आता ती मळून फाटायची शिल्लक राहिली होती. सकाळपासून जरा कुठे घासल्यासारखे वाटले तर तिला झटकून साफ करत होतो, पण आता समजत होते, जिवापेक्षा मोल कश्याचेही नसते जगात. इतक्यात अचानक एक चमत्कार झाल्यासारखे ट्रेनचा मंदावणारा वेग जाणवू लागला. कदाचित कोणाच्या तरी लक्षात आले असावे, कदाचित कोणीतरी ते मोटरमनच्या ध्यानात आणून दिले असावे, वा कदाचित त्यानेच किंवा त्याच्या सहकार्‍याने मला या अवस्थेत पाहिले असावे.. काही का असे ना, ट्रेन थांबत होती. मी अजूनही फरफटतच होतो, पण आता शरीरावर ताबा मिळवण्यात थोडाफार यशस्वी झालो होतो. अंग एका रेषेत ठेवणे शक्य झाले होते. हळूहळू ट्रेन पुर्णपणे थांबली तसे अलगद हात सोडत पुर्ण खाली झोपलो, आणि आपण सुखरूप आणि सुरक्षित आहोत याची खात्री करतच सावकाशीने उठलो.

"एवढी काय घाई होती रे... मागे ट्रेन नाहीये का.."
"पागल है क्या... अभी निचे चला जाता तो.."
दोनचार लोक बडबड करत माझ्या अंगावर आले, मी मात्र मुकाट मान खाली घालून तिथून निघून जाऊ लागलो.

"हिरो समजते है खुदको, शायनिंग मारने जाते है .."
पाठीमागून माझ्याबाबतीतच चर्चा ऐकू येत होती, मी बस्स त्या गावचाच नाही अश्या आविर्भावात तिथून सटकत होतो. पाठोपाठ ट्रेनही सुटल्याचा आवाज आला. ती कोणासाठी फार थांबून राहत नाही.. मेलो नव्हतो मी. जिवंत होतो. एक नवा जन्म मिळाल्याचा आनंद होत होता. त्याचवेळी अंगावरचा शहारा काही जायला मागत नव्हता.

दहापंधरा मिनिटे बाहेरच्या हवेत श्वास घेऊन आलो आणि तिच्या मागची, माझ्या नशिबात असलेली ट्रेन पकडली.

घरी आलो आणि हा अनुभव लिहायला घेतला. आता रात्रीचा एक उलटून गेलाय, याच अनुभवावरचा माझा मायबोलीवरचा आणखी एक धागा मी प्रकाशित करतोय. पण हेच थोड्यावेळापूर्वी अशी स्थिती होती की या आधीचा धागाच माझा शेवटचा धागा ठरला असता. तेच माझे शेवटचे लिखाण ठरले असते. हे कधी लिहिलेच गेले नसते. नक्कीच वर कुठेतरी यमराजाने माझे नाव लिहायला घेतले होते, पण कदाचित त्याला ‘ऋ’ कसा लिहायचा हेच जमले नसावे..

गॉड ब्लेस मी, गॉड ब्लेस यू ऑल..
- ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

..

ट्रेन से मस्ती, जान नही सस्ती... !
भावा जरा जपून...! पायी जावं लागत नाही ना, मग थोड उशीर झाला तरी चालतो.. कसे...!

ऋन्मेऽऽष,

मरायला टेकलेलात खरे, पण मेला नाहीत तुम्ही! तर मायबोलीवरील दार ठोठावून आलेल्यांत तुमचा नंबर लागला म्हणायचा. ज्याचा शेवट गोड ते सारंच गोड असं म्हणा आणि दाठो क्लबात सदस्यत्व मिळाल्याचा आनंद साजरा करा.

आ.न.,
-गा.पै.

ऋन्मेष, नशीबबलवत्तर म्हणून वाचलास. लोकल ट्रेनचा प्रवास हा जरी मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असला तरी त्यातुन प्रवास करताना काही सुरक्षेविषयी असलेल्या सुचनेचे पालन करणे नेहमी चांगलं. यापुढे सावधगिरी बाळग.

काळजी घ्या.
खरं तर थेट त्या बायकांना सांगून माफी मागितली असती आणि पुढच्या स्टेशनवर उतरला असतात... तरी चालले असते Happy

खरं तर थेट त्या बायकांना सांगून माफी मागितली असती आणि पुढच्या स्टेशनवर उतरला असतात... तरी चालले असते +१

अरे बापरे..
असच ठाण्यावरुन विक्रोळीसाठी ट्रेन घेतली तेव्हा चढताना मागच्या एका बाईने माझी सॅक पकडली आणि त्यामुळे मी कमरेपासुन अर्धी बाहेर ट्रेनच्या..बेक्कार .
आतल्या बायांनी मला ओढून धरलं ती थोडूशानं वाचली नै तर .. विचारही नै करवत . नॉर्मल व्हायला विक्रोळी यावं लागलं मला. धडधड थांबायला तयार नै .. that feeling was horrible , beyond words..
God bless you.. पुढ सांभाळून ..

ओय होय! काळजी ही घेण्याकरताच असते!
बी केअरफुल. १० मिनीट इकडेतिकडे झाल्यानी फार फरक नाही पडत. मुंबई, लोकल्स, गर्दी अनुभवलेली आहेच; त्यामुळे कल्पना आहे काय झालेलं असेल याची.

जर्बेरा, दिनेशदा,
सहमत
थांबल्याने फरक पडला नसता,
किंबहुना कित्येक जण फसगतीने फर्स्टक्लासच्या डब्यात चढतात तेव्हा मीच त्यांना ओरडून `अगले स्टेशन उतर जाओ' असे सुनावतो, अन्यथा काही कुटुंबासकट चढलेलेही टीसी पकडणार तर नाही ना या भितीने बायकापोरांनाही चालत्या ट्रेनमधून उतरायला लावतात.

पण वर म्हटल्याप्रमाणे, मी डबा चेक न करता रिकामा बघत चढलो, ही आपली फजिती झालीय आणि ती कोणाच्या लक्षात यायच्या आधी पटकन मागे जाऊया या भावनेतून ते घडले.

अन्यथा या आधीही असाच एकदा महिलांच्या डब्यात चढलो होतो. इनफॅक्ट ती लेडीज स्पेशलच होती म्हणून गोंधळलेलो. तेव्हा माझ्या उशीरा लक्षात आल्याने ट्रेनने वेग पकडलेला. मी उतरायचा कुठलाही शहाणपणा न करता माझ्याशी नजरानजर झालेल्या महिलांना सॉरी म्हणालो आणि त्या सर्वांकडे पाठ करून पुढचे स्टेशन येईस्तोवर दारावर गुमान उभा राहिलेलो.

बापरे...
यापुढे सावधगिरी बाळगा. चालत्या ट्रेन मधून उतरण्याचा मुर्खपणाही कधी करू नका. (कोणीही)

ऋन्मेऽऽष, आमीर खान चा इश्कमधला फेमस डॉयलॉग आठवला आज तुमच्यामुळे. "बस , ट्रेन और छोकरी एक गयी तो दुसरी आती है. "

<<मुंबई म्हटले की दर पाच मिनिटांनी ट्रेन! पण त्यातील माझ्या कामाची ट्रेन दर तिसरी असल्याने एक चुकली की पंधरा मिनिटे विश्रांती.>>

आपला जीव त्या पंधरा मिनिटे विश्रांतीपेक्षा नक्कीच मोठा आहे. त्यापेक्षाही घरच्यांसाठी महत्वाचा आहे. तेव्हा देवाने दुसरा जन्म दिला असे समजुन त्याचे आभार माना, तसेच पुन्हा असे न होण्याची दक्षता घ्या.

शलाका, पण मी त्याच आमीरच्या दस दस की दौडचा फॅन आहे.. Wink
जोक्स अपार्ट, या अनुभवानंतर आपसूकच दक्षता घेतली जाईलच, काळजीबद्दल धन्यवाद Happy

थरारक अनुभव, वाचतना काटा आला. यापुढे काळजी घ्यालच !. बायका तर स्वतः पुढच्या स्टेशनपर्यत प्रवास करा असे सान्गतात अशा प्रसन्गी.

यमराजाने माझे नाव लिहायला घेतले होते, पण कदाचित त्याला ‘ऋ’ कसा लिहायचा हेच जमले नसावे..>>>> यमराजाने ॠ जरी लिहिला असता तरी त्यावर जगन्नियन्त्याची सही झाली नव्हती हे लक्षात घ्या. त्याने सही केली नसेल तर आपल्या केसालाही धक्का लागू शकत नाही. मात्र जर त्याने सही केली असेल तर मात्र तज्ज्ञ डॉक्टरान्ची फौजही त्यान्च्या सुसज्ज यन्त्रणान्सह आपल्याला वाचवू शकत नाही, हेही तितकेच खरे.

नंतर १५ मिनिटे घालवलेच ना विश्रांतीत? सिग्नल तोडून वेळ 'वाचवणारे ' पुढच्या चौकात मित्र भेटला की अर्धा तास गप्पा मारीत उभे राहतात !

Pages