काळ आला होता पण वेळ आली नव्हती ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 April, 2015 - 16:03

.
आज दिनांक २४ एप्रिल २०१५, .. वर कुठेतरी यमराजाने माझे नाव लिहायला घेतले होते ...
.

साडेआठची वेळ. शुक्रवारची रात्र. कित्येकांच्या वीकेंड मस्तीला सुरूवातही झाली असावी. पण माझे मीटर अजूनही चालूच होते. इन्क्रीमेन्ट कमी होवो वा जास्त, मनासारखे होवो वा अपेक्षेपेक्षा कमी, इथे कामापासून कोणीही पळू शकत नाही.

ऑफिसमध्ये काय ऐकू येत असेल तर ती निव्वळ एसीची घरघर. पलीकडच्या क्युबिकलमध्ये काही पाने फडफडत होती जी माझ्याबरोबर आणखी एक जण ऑफिसमध्ये उपस्थित आहे याची जाणीव करून देत होती. तो निघून जायच्या आत माझे काम आटोपले म्हणून मी खुश होतो. पण उद्या मला सुट्टीच्या दिवशी पुन्हा कामाला यायचे होते. आणि तो मात्र तासाभराने काम उरकून थेट सोमवारीच उजाडणार होता.. लाईफ आहे. हर दिन सण्डे नही होता, और हर हफ्ते सॅटरडे ऑफ नही होता. ही वस्तुस्थिती स्विकारून झाली होती. पावले कष्टाने उचलतच ऑफिसच्या बाहेर पडलो, पण हेच जर उद्या यायचे नसते तर, कदाचित तरंगतच ....

असो,
तर, ऑफिस बाहेरील चहाच्या टपरीवर आवराआवर चालू होती, पण संध्याकाळी सातला काढलेला शेवटचा समोसा अजूनपर्यंत ताजा असावा. आता स्टेशनपर्यंत माझा हाच सोबती होता. ईतरवेळी मोबाईलमध्ये ट्रेन टायमिंग चेक करतो आणि किती वेळ हातात आहे त्यानुसार समोसापाव घेऊन सटकायचे की सॅण्डवीचची ऑर्डर द्यायची हे ठरवतो. आज उशीर झाल्याने लवकरात लवकर घरी पोहोचायचे होते, पण त्याचबरोबर घरी जाऊन तीच चहा खारी आणि आयपीएलची मॅच, म्हणून वेळेत पोहोचायचा फारसा उत्साह ही नव्हता. स्टेशनजवळ पोहोचलो आणि बाहेरील ईंडिकेटरवर समजले की ट्रेनची वेळ झाली आहे. मुंबई म्हटले की दर पाच मिनिटांनी ट्रेन! पण त्यातील माझ्या कामाची ट्रेन दर तिसरी असल्याने एक चुकली की पंधरा मिनिटे विश्रांती.

सबवेमधून आत शिरलो, जिन्याने वर जायला लागलो, तसे वरतून तुरळक गर्दी अंगावर आली. म्हणजे नुकतीच ट्रेन आली असावी. समोर आलेली ट्रेन आळसापायी सोडण्याइतका मी मुर्ख नव्हतो. टपाटप चार तंगड्या टाकत वर पोहोचलो तसे डोळ्यासमोर ट्रेन सुरू होताना दिसली. गर्दी भेटण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही एका डब्यात दहा-बारा टाळकी खिडक्या अडवून बसली होती तर एक कंपार्टमेंट बरेचसे रिकामेच दिसले. पटकन त्यातच चढलो. अन चढताच जाणवले आपण चुकीच्या जागी आलो आहोत. तो लेडीज फर्स्टक्लास होता.

आत बहुधा दोनेक बायका बसल्या होत्या. मला पाठमोर्‍या होत्या. त्यांना आपली फजिती समजायची आधीच उतरून मागच्या डब्यात जाऊया असा विचार केला. ट्रेनने तसाही फारसा वेग पकडला नव्हता, उतरून पटकन मागच्या डब्यात जाणे सहज शक्य होते. एवढी वर्षे मुंबई लोकलचा प्रवास केल्यानंतर ट्रेन कसा वेग पकडते आणि आपण कोणत्या वेगापर्यंत चढू-उतरू शकतो याचा अंदाज प्रत्येक मुंबईकराला आला असतोच. मलाही होताच. पण धांदलीत एक चूक मात्र झाली. पटकन उतरून मागच्या डब्यात जाऊया म्हणत मी मागे वळून उतरलो खरे.. पण कसे काय लक्षात आले नाही देवास ठाऊक, नेमके ट्रेनच्या वेगाच्या विरुद्ध दिशेने उतरलो. परीणाम जो होणार होता तोच झाला.

उतरल्या उतरल्याच, पहिल्याच पावलाला धडपडलो. चूक लक्षात आली. ट्रेनच्या दरवाज्याच्या दांड्याला पकडलेला हात मी अजून सोडला नव्हता. पण पाय घसपटू लागले होते. हळूहळू ट्रेन वेग पकडत होती. हात सोडला असता तर शरीरावरचा सारा कंट्रोल जाऊन नशीब नेईल तिथे फरफटत जावे लागले असते. कदाचित ट्रेनच्या खालीही आलो असतो. अगदी खाली गेलो नसतो तरी धावत्या ट्रेनचा एखादा वेडावाकडा फटकाही खेळ संपवण्यास पुरेसा होता. जसा वेग वाढत होता तसे तो हात सोडण्याचा पर्याय आणखी आणखी बाद होऊ लागला. मला वर खेचून घ्यायलाही कोणी नव्हते. थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म संपले असते आणि मी लटकू लागलो असतो, की आणखी काही झाले असते.

एवढे सारे विचार, खरे तर त्या वेळेस डोक्यातही येत नव्हते. मी हळूहळू शरीराच्या भाराने आणखी खाली खाली सरकत आता जवळपास आडवा व्हायचाच बाकी होतो. मनगटावरचा ताण वाढला होता. आता आपला हात कुठल्याही क्षणी सुटू शकतो याची एक थंडगार जाणीव झाली. अगदी चौथ्या पाचव्या सेकंदालाच. एवढे सारे काही वेगाने घडत होते.
मी माझ्या नशीबाला दोष देऊ लागलो, आपल्याच कर्माने मी रनआऊट होत होतो. अगदी क्षुल्लक पद्धतीने, नाहक बळी जात होता. मी कुठलाही स्टंट करायला गेलो नव्हतो, बस्स कसल्याश्या तंद्रीमध्ये केलेला निव्वळ मुर्खपणा होता..

आज सकाळीच नव्याकोर्‍या जीन्सचे उद्घाटन केले होते. आता ती मळून फाटायची शिल्लक राहिली होती. सकाळपासून जरा कुठे घासल्यासारखे वाटले तर तिला झटकून साफ करत होतो, पण आता समजत होते, जिवापेक्षा मोल कश्याचेही नसते जगात. इतक्यात अचानक एक चमत्कार झाल्यासारखे ट्रेनचा मंदावणारा वेग जाणवू लागला. कदाचित कोणाच्या तरी लक्षात आले असावे, कदाचित कोणीतरी ते मोटरमनच्या ध्यानात आणून दिले असावे, वा कदाचित त्यानेच किंवा त्याच्या सहकार्‍याने मला या अवस्थेत पाहिले असावे.. काही का असे ना, ट्रेन थांबत होती. मी अजूनही फरफटतच होतो, पण आता शरीरावर ताबा मिळवण्यात थोडाफार यशस्वी झालो होतो. अंग एका रेषेत ठेवणे शक्य झाले होते. हळूहळू ट्रेन पुर्णपणे थांबली तसे अलगद हात सोडत पुर्ण खाली झोपलो, आणि आपण सुखरूप आणि सुरक्षित आहोत याची खात्री करतच सावकाशीने उठलो.

"एवढी काय घाई होती रे... मागे ट्रेन नाहीये का.."
"पागल है क्या... अभी निचे चला जाता तो.."
दोनचार लोक बडबड करत माझ्या अंगावर आले, मी मात्र मुकाट मान खाली घालून तिथून निघून जाऊ लागलो.

"हिरो समजते है खुदको, शायनिंग मारने जाते है .."
पाठीमागून माझ्याबाबतीतच चर्चा ऐकू येत होती, मी बस्स त्या गावचाच नाही अश्या आविर्भावात तिथून सटकत होतो. पाठोपाठ ट्रेनही सुटल्याचा आवाज आला. ती कोणासाठी फार थांबून राहत नाही.. मेलो नव्हतो मी. जिवंत होतो. एक नवा जन्म मिळाल्याचा आनंद होत होता. त्याचवेळी अंगावरचा शहारा काही जायला मागत नव्हता.

दहापंधरा मिनिटे बाहेरच्या हवेत श्वास घेऊन आलो आणि तिच्या मागची, माझ्या नशिबात असलेली ट्रेन पकडली.

घरी आलो आणि हा अनुभव लिहायला घेतला. आता रात्रीचा एक उलटून गेलाय, याच अनुभवावरचा माझा मायबोलीवरचा आणखी एक धागा मी प्रकाशित करतोय. पण हेच थोड्यावेळापूर्वी अशी स्थिती होती की या आधीचा धागाच माझा शेवटचा धागा ठरला असता. तेच माझे शेवटचे लिखाण ठरले असते. हे कधी लिहिलेच गेले नसते. नक्कीच वर कुठेतरी यमराजाने माझे नाव लिहायला घेतले होते, पण कदाचित त्याला ‘ऋ’ कसा लिहायचा हेच जमले नसावे..

गॉड ब्लेस मी, गॉड ब्लेस यू ऑल..
- ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्थातच,
जर मी आयुष्यातील छोट्यामोठ्या अपघातांबद्दल लेख पाडतो तर एका मोठ्या दुर्घटनेची नांदी वर लेख हवाच Happy

अप्पाकाका - ॠन्म्या तर बोलणी चालू असतानाची लाइव्ह अपडेटस सुद्धा टाकत राहील. बोलणी करायला निघताना एक लेख पाडेल.

ऋन्मेऽऽष,
आता कसा आहेस? कंबरेच दुखण थांबल का?
३ दिवस गावी असल्याकारणाने माबोवर आले नव्हते त्यामुळे आताच पाहिला तुझा लेख. बापरे! एकदम धस्सच झाले. खरच काळ आलेला पण वेळ आली नव्हती. यापुढे काळजी घे.

महिलांच्या डब्यात पुरुषांनी चढण्याचे प्रकार पुन्हा घडू नयेत याकरिता संसदीय समितीची शिफारसः-

http://www.loksatta.com/desh-videsh-news/change-women-coach-place-1098018/

मीपण डोंबिवलीला ट्रेनखाली गेले होते (लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये जी गॅप असते त्यातुन).त्याची आठवण झाली.

काही महिन्यांपुर्वीच. फास्ट ट्रेनमध्ये चढायला इतकी गर्दी होती. मी डोंबिवलीला उतरतांना मला चढणार्‍यांनी ढकलले आणि मागच्या गर्दीचे प्रेशर आणि पुढुन येणार्‍या गर्दीचे प्रेशर याचा परीणाम मी मधल्यामध्ये गॅपमधुन लोकलखाली पडले.

गर्दीतल्याच कोणीतरी मला वर ओढुन पुन्हा गाडीत घातले (खरं तर मला डोंबिवलीला उतरायचे होते). मग पुढे ठाण्याला उतरुन स्लो गाडीने पुन्हा आले डोंबिवलीला.

पियु,
खतरनाक आहे अनुभव.. तुझी त्यावेळची स्थिती समजू शकतो.
माझ्या गफ्रेंडनेही अगदी असाच नाही पण या प्रकारचा अनुभव घेऊन झालाय..
फरक इतकाच ती त्या गॅपमधून आत न सरकता तिच्या जवळ पडलेली.. ट्रेन चालू झालेली.. जर वेडीवाकडी हलली असती वा ट्रेनने ओढून घेतले असते तर नेमके पायच गेले असती.. इतक्यात तिला कोणीतरी खेचून बाजूला काढलेले.. पण पाय जाता जाता वाचले हा धक्का तिला बसला.. त्यानंतर त्याच स्टेशनला आमचे भेटायचे ठरलेले म्हणून मी दहापंधरा मिनिटांनी तिथे पोचलो, तेव्हा ती घाबरलेलीच होती. तिचे पाय गेले असते तर मी तिला सोडले असते की सांभाळले असते असे बावळट विचार सारखे बोलून दाखवत होती. त्यानंतर मला घेऊन मंदिरात जाऊन पाया पडून आली.

निल्सन,
ओकेय मी आता.. कंबरेचे ठणकने दोनचार दिवसात थांबले Happy

चालत्या ट्रेनमध्ये चढणारे स्वताचाच जीव धोक्यात टाकतात.>> स्वतःबरोबर मोटरमन आणि गार्डचाही जीव धोक्यात टाकतात. कोणाच्याही चुकीमुळे असो, पण आपल्या ट्रेनखाली एखाद्याचा जीव गेला हा मानसिक धक्का जीवघेणा ठरू शकतो.

कोणाच्याही चुकीमुळे असो, पण आपल्या ट्रेनखाली एखाद्याचा जीव गेला हा मानसिक धक्का जीवघेणा ठरू शकतो.

>> अगदी अगदी..

एकदा डोळ्यासमोर एकाने एक्स्प्रेसखाली जीव दिल्याचे पाहिले आहे तेव्हापासुन थरकाप उडतो.
नंतर कळाले कि तो मुलगा ओळखीचा होता. १०वीत नापास झाल्याने.. Sad

अंबरनाथ स्टेशनला तर पुर्वी जवळपास रोज प्लॅटफॉर्मवर रेल्वे क्रॉसिंगमध्ये गेलेल्या माणसाचे प्रेत ठेवलेले असायचे. लोकांना अक्कल यावी म्हणून. शेवटी लोकांची नजर मेली पण प्रेते संपेनात. Sad

@Nidhii
अभि. = अभिनंदन, ऋन्मेषचे, प्रसंगातून सहिसलामत वाचल्या बद्दल.

हे वाचून वाटले ऋन्मेऽऽष चे खरे नाव अभि आहे की काय. >>> अ‍ॅक्चुअली, मलाही तसेच वाटले, पुन्हा कोणाला ते ड्यू आय डी वगैरे जुने चिडवने उकरून काढायचे आहे का? त्यापेक्षा मेलोच असतो ट्रेनखाली तर बरे झाले असते वगैरे वगैरे.. पण वेळीच स्पष्टी दिल्याबद्दल धन्यवाद आणि क्षमस्व!

पण तू यमराजला IIN वाला समजलासकी काय 'ऋ' लिहीता न यायला? हा हा!. >> Proud Proud .. अ‍ॅक्चुअली आजच्या तारखेला तंत्रज्ञानाचा वापर करत ऋ टाईप करणे सोपे आहे पण लिहिणे तेवढेच कठीण.. मला स्वत:लाही फार उशीरा जमले होते. संदर्भासाठी माझ्या या ( http://www.maayboli.com/node/51187 ) लेखातील उतारा देतो.

"बहुतांश लोक आपले नाव स्वत:च्या हाताने लिहायला एवढ्या लहान वयात शिकतात, की कोणते ते वय हे आठवूही नये. पण मला मात्र पक्के आठवत होते की ईयत्ता चौथीपर्यंत मला ऋन्मेषचा ऋ लिहायला जमत नसल्याने मी तिथे चिनी भाषेतले कसलेसे चिन्ह काढत पुढे स्पेस (रिकामे घर) देत मेष लिहायचो. यावरून मेष या शब्दाचा नेमका अर्थ माहीत असलेले काही संस्कृतप्रचुर मित्र मला मेष मेष करत हाक मारायचे आणि स्वताच हसायचे!
पाचवीला गेल्यावर मी मोठ्या कष्टाने "ऋ" लिहायला शिकलो खरे, पण त्यानंतर मला इतरांना सांगावे लागायचे, अरे बाबांनो ऋन्मेषचा "ऋ" ऋषीतला येतो, हृदयातला नाही.. आणि मग एके दिवशी एके शुक्रवारी हृतिकचा ‘कहो ना प्यार है’ रिलीज झाला आणि लोकच मला समजवायला लागले, अरे गाढवा तूच चुकतोयस, तुझे नाव हृन्मेषच असणार .... अरे कमाल आहे, असणार काय असणार??
"

म्हणून मला लोकल आवडत नाही >>> गर्दीची लोकल ! .. अन्यथा रिकाम्या लोकलमधून दारावर उभे राहत प्रवास करणे एक सुख आहे. फार विरोधाभास दिसतो रोजच दोन विरुद्ध दिशांनी जाणार्‍या लोकलमध्ये.

"अंबरनाथ स्टेशनला तर पुर्वी जवळपास रोज प्लॅटफॉर्मवर रेल्वे क्रॉसिंगमध्ये गेलेल्या माणसाचे प्रेत ठेवलेले असायचे. "

हो, बदलापुर-कर्जतहून येणार्‍या गाड्यांच्या प्लॅटफॉर्मवर. मी रोज तिथूनच जायचे ऑफीसला. धावत-पळत स्टेशनवर आले की समोरच असायचे ते, गंजक्या स्ट्रेचरवर , पांढरट चादरीखाली झाकलेले... लोकांना बघण्यासाठी म्हणून नाही . बहुतेक अंबरनाथच्या म्युनिसीपल हॉस्पिटल मधे नेण्यासाठी उतरवलेले असायचे.

सोपे आहे ऋ लिहीणे, लहान मुलांना सुद्धा

पत्र आणि टरबुज हे शब्द शिकवायचे. म्हणजे त्र आणि ट हे दोन शिकवले की बस.
त्र काढायला लावायचा आणि मग त्र च्या तिरप्या दांड्या जिथे जुळतात तिथुन पुढे ट लिहायला शिकवायचे की झाला ऋ.

Pages