काळ आला होता पण वेळ आली नव्हती ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 April, 2015 - 16:03

.
आज दिनांक २४ एप्रिल २०१५, .. वर कुठेतरी यमराजाने माझे नाव लिहायला घेतले होते ...
.

साडेआठची वेळ. शुक्रवारची रात्र. कित्येकांच्या वीकेंड मस्तीला सुरूवातही झाली असावी. पण माझे मीटर अजूनही चालूच होते. इन्क्रीमेन्ट कमी होवो वा जास्त, मनासारखे होवो वा अपेक्षेपेक्षा कमी, इथे कामापासून कोणीही पळू शकत नाही.

ऑफिसमध्ये काय ऐकू येत असेल तर ती निव्वळ एसीची घरघर. पलीकडच्या क्युबिकलमध्ये काही पाने फडफडत होती जी माझ्याबरोबर आणखी एक जण ऑफिसमध्ये उपस्थित आहे याची जाणीव करून देत होती. तो निघून जायच्या आत माझे काम आटोपले म्हणून मी खुश होतो. पण उद्या मला सुट्टीच्या दिवशी पुन्हा कामाला यायचे होते. आणि तो मात्र तासाभराने काम उरकून थेट सोमवारीच उजाडणार होता.. लाईफ आहे. हर दिन सण्डे नही होता, और हर हफ्ते सॅटरडे ऑफ नही होता. ही वस्तुस्थिती स्विकारून झाली होती. पावले कष्टाने उचलतच ऑफिसच्या बाहेर पडलो, पण हेच जर उद्या यायचे नसते तर, कदाचित तरंगतच ....

असो,
तर, ऑफिस बाहेरील चहाच्या टपरीवर आवराआवर चालू होती, पण संध्याकाळी सातला काढलेला शेवटचा समोसा अजूनपर्यंत ताजा असावा. आता स्टेशनपर्यंत माझा हाच सोबती होता. ईतरवेळी मोबाईलमध्ये ट्रेन टायमिंग चेक करतो आणि किती वेळ हातात आहे त्यानुसार समोसापाव घेऊन सटकायचे की सॅण्डवीचची ऑर्डर द्यायची हे ठरवतो. आज उशीर झाल्याने लवकरात लवकर घरी पोहोचायचे होते, पण त्याचबरोबर घरी जाऊन तीच चहा खारी आणि आयपीएलची मॅच, म्हणून वेळेत पोहोचायचा फारसा उत्साह ही नव्हता. स्टेशनजवळ पोहोचलो आणि बाहेरील ईंडिकेटरवर समजले की ट्रेनची वेळ झाली आहे. मुंबई म्हटले की दर पाच मिनिटांनी ट्रेन! पण त्यातील माझ्या कामाची ट्रेन दर तिसरी असल्याने एक चुकली की पंधरा मिनिटे विश्रांती.

सबवेमधून आत शिरलो, जिन्याने वर जायला लागलो, तसे वरतून तुरळक गर्दी अंगावर आली. म्हणजे नुकतीच ट्रेन आली असावी. समोर आलेली ट्रेन आळसापायी सोडण्याइतका मी मुर्ख नव्हतो. टपाटप चार तंगड्या टाकत वर पोहोचलो तसे डोळ्यासमोर ट्रेन सुरू होताना दिसली. गर्दी भेटण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही एका डब्यात दहा-बारा टाळकी खिडक्या अडवून बसली होती तर एक कंपार्टमेंट बरेचसे रिकामेच दिसले. पटकन त्यातच चढलो. अन चढताच जाणवले आपण चुकीच्या जागी आलो आहोत. तो लेडीज फर्स्टक्लास होता.

आत बहुधा दोनेक बायका बसल्या होत्या. मला पाठमोर्‍या होत्या. त्यांना आपली फजिती समजायची आधीच उतरून मागच्या डब्यात जाऊया असा विचार केला. ट्रेनने तसाही फारसा वेग पकडला नव्हता, उतरून पटकन मागच्या डब्यात जाणे सहज शक्य होते. एवढी वर्षे मुंबई लोकलचा प्रवास केल्यानंतर ट्रेन कसा वेग पकडते आणि आपण कोणत्या वेगापर्यंत चढू-उतरू शकतो याचा अंदाज प्रत्येक मुंबईकराला आला असतोच. मलाही होताच. पण धांदलीत एक चूक मात्र झाली. पटकन उतरून मागच्या डब्यात जाऊया म्हणत मी मागे वळून उतरलो खरे.. पण कसे काय लक्षात आले नाही देवास ठाऊक, नेमके ट्रेनच्या वेगाच्या विरुद्ध दिशेने उतरलो. परीणाम जो होणार होता तोच झाला.

उतरल्या उतरल्याच, पहिल्याच पावलाला धडपडलो. चूक लक्षात आली. ट्रेनच्या दरवाज्याच्या दांड्याला पकडलेला हात मी अजून सोडला नव्हता. पण पाय घसपटू लागले होते. हळूहळू ट्रेन वेग पकडत होती. हात सोडला असता तर शरीरावरचा सारा कंट्रोल जाऊन नशीब नेईल तिथे फरफटत जावे लागले असते. कदाचित ट्रेनच्या खालीही आलो असतो. अगदी खाली गेलो नसतो तरी धावत्या ट्रेनचा एखादा वेडावाकडा फटकाही खेळ संपवण्यास पुरेसा होता. जसा वेग वाढत होता तसे तो हात सोडण्याचा पर्याय आणखी आणखी बाद होऊ लागला. मला वर खेचून घ्यायलाही कोणी नव्हते. थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म संपले असते आणि मी लटकू लागलो असतो, की आणखी काही झाले असते.

एवढे सारे विचार, खरे तर त्या वेळेस डोक्यातही येत नव्हते. मी हळूहळू शरीराच्या भाराने आणखी खाली खाली सरकत आता जवळपास आडवा व्हायचाच बाकी होतो. मनगटावरचा ताण वाढला होता. आता आपला हात कुठल्याही क्षणी सुटू शकतो याची एक थंडगार जाणीव झाली. अगदी चौथ्या पाचव्या सेकंदालाच. एवढे सारे काही वेगाने घडत होते.
मी माझ्या नशीबाला दोष देऊ लागलो, आपल्याच कर्माने मी रनआऊट होत होतो. अगदी क्षुल्लक पद्धतीने, नाहक बळी जात होता. मी कुठलाही स्टंट करायला गेलो नव्हतो, बस्स कसल्याश्या तंद्रीमध्ये केलेला निव्वळ मुर्खपणा होता..

आज सकाळीच नव्याकोर्‍या जीन्सचे उद्घाटन केले होते. आता ती मळून फाटायची शिल्लक राहिली होती. सकाळपासून जरा कुठे घासल्यासारखे वाटले तर तिला झटकून साफ करत होतो, पण आता समजत होते, जिवापेक्षा मोल कश्याचेही नसते जगात. इतक्यात अचानक एक चमत्कार झाल्यासारखे ट्रेनचा मंदावणारा वेग जाणवू लागला. कदाचित कोणाच्या तरी लक्षात आले असावे, कदाचित कोणीतरी ते मोटरमनच्या ध्यानात आणून दिले असावे, वा कदाचित त्यानेच किंवा त्याच्या सहकार्‍याने मला या अवस्थेत पाहिले असावे.. काही का असे ना, ट्रेन थांबत होती. मी अजूनही फरफटतच होतो, पण आता शरीरावर ताबा मिळवण्यात थोडाफार यशस्वी झालो होतो. अंग एका रेषेत ठेवणे शक्य झाले होते. हळूहळू ट्रेन पुर्णपणे थांबली तसे अलगद हात सोडत पुर्ण खाली झोपलो, आणि आपण सुखरूप आणि सुरक्षित आहोत याची खात्री करतच सावकाशीने उठलो.

"एवढी काय घाई होती रे... मागे ट्रेन नाहीये का.."
"पागल है क्या... अभी निचे चला जाता तो.."
दोनचार लोक बडबड करत माझ्या अंगावर आले, मी मात्र मुकाट मान खाली घालून तिथून निघून जाऊ लागलो.

"हिरो समजते है खुदको, शायनिंग मारने जाते है .."
पाठीमागून माझ्याबाबतीतच चर्चा ऐकू येत होती, मी बस्स त्या गावचाच नाही अश्या आविर्भावात तिथून सटकत होतो. पाठोपाठ ट्रेनही सुटल्याचा आवाज आला. ती कोणासाठी फार थांबून राहत नाही.. मेलो नव्हतो मी. जिवंत होतो. एक नवा जन्म मिळाल्याचा आनंद होत होता. त्याचवेळी अंगावरचा शहारा काही जायला मागत नव्हता.

दहापंधरा मिनिटे बाहेरच्या हवेत श्वास घेऊन आलो आणि तिच्या मागची, माझ्या नशिबात असलेली ट्रेन पकडली.

घरी आलो आणि हा अनुभव लिहायला घेतला. आता रात्रीचा एक उलटून गेलाय, याच अनुभवावरचा माझा मायबोलीवरचा आणखी एक धागा मी प्रकाशित करतोय. पण हेच थोड्यावेळापूर्वी अशी स्थिती होती की या आधीचा धागाच माझा शेवटचा धागा ठरला असता. तेच माझे शेवटचे लिखाण ठरले असते. हे कधी लिहिलेच गेले नसते. नक्कीच वर कुठेतरी यमराजाने माझे नाव लिहायला घेतले होते, पण कदाचित त्याला ‘ऋ’ कसा लिहायचा हेच जमले नसावे..

गॉड ब्लेस मी, गॉड ब्लेस यू ऑल..
- ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष.....

ईश्वराने तुमच्या ललाटी भरपूर आयुष्यप्राप्तीची रेघ रेखाटली असल्यामुळेच असल्या चित्तथरारक अनुभवातून तुम्ही सहीसलामत वाचला आहेत....ज्या मोटरमनच्या नजरेस तुमची लटकलेली अवस्था आली व वाचविण्यासाठी त्याने ट्रेन थांबविली त्या अज्ञात देवदूतासम व्यक्तीचे तुम्ही इतरांपेक्षा जास्त आभार मानायला हवेत.

नंतर १५ मिनिटे घालवलेच ना विश्रांतीत? सिग्नल तोडून वेळ 'वाचवणारे ' पुढच्या चौकात मित्र भेटला की अर्धा तास गप्पा मारीत उभे राहतात !
>>>

रॉबिनहूडजी, सिग्नल तोडणारे वेगळी केस झाली, ते नियम तोडत दुसर्‍यांचाही जीव धोक्यात घालतात. चालत्या ट्रेनमध्ये चढणारे स्वताचाच जीव धोक्यात टाकतात.

चालत्या ट्रेनमध्ये चढू नका असा नियम असला तरी ट्रेनच्या दारावर लटकू नका असाही नियम असतोच, पण तरीही मुंबईत लाखो लोक लटकतच प्रवास करतात आणि आणि पडून मरतातही. यात त्यांची काही चूकही नसते. असतो तो नाईलाज.

मुंबईत ट्रेन फलाटाला लागायच्या आधी त्यात उडी मारून जो आधी चढेल त्यालाच बसायला जागा मिळते अन्यथा तास-दिड तास उभ्याचा प्रवास..
किंवा गर्दी वाढली तर असेही म्हणू शकतो, जो आधी चढेन त्यालाच व्यवस्थित उभे तरी राहायला मिळेन अन्यथा लटकूनच प्रवास.

माझे म्हणाल तर मी कधीही आजवर जीव धोक्यात टाकत शोशायनिंग मारायला स्टंट नाही केला. तसेच जर ट्रेनची गर्दी एवढी असेल की दारात लटकण्याशिवाय पर्याय नाही तर ती ट्रेन सोडतोच. पण ट्रेन फलाटाला लागायच्या आधी चढून व्यवस्थित बसायला मिळणार असेल तर अश्यावेळी ते तसे केलेय. प्रत्येक जण स्वताला झेपेल तसे करतोच. नाईलाजच असतो.

कालही जे झाले त्यात थोडासाच वेग पकडलेल्या ट्रेनमध्ये मी सहज चढतो हे मला ठाऊक असल्यानेच केले, आणि तसा चढलोही होतोच. याउपर पुढे जो अपघात झाला तो माझ्या धांदरटपणा आणि मुर्खपणामुळेच झाला.

असो, मी माझ्या चुकीचे समर्थन करत नाहीये, पण इथे आपल्या जगण्याची किंमत आपणच ठरवायची आहे, ती नियम बनवणार्‍या मायबाप शासनाच्या लेखी शून्य आहे.

अशोकमामा, हो त्यांचे तर लाख लाख आभार आहेतच.. त्यांच्यासाठी कदाचित साधीशी गोष्टही असेल माझा मात्र जीवच वाचला..

एकंदरीत ही तिसरी घटना आहे आयुष्यातील जेव्हा माझ्या जीवाचे कही बरेवाईट तर होणार नाही ना अशी स्थिती निर्माण झालेली.. वाचलोय प्रत्येकवेळी

भले इकडे शेकडो धागे विणा (आम्ही सहन करू) पण तंद्रीत राहून स्वतःची काळजी स्वतः घ्यायला विसरू नका, तुमच्या आप्तांसाठी तरी.

शुभेच्छा!

वाचुन धस्स झाले. काळजी घे रे बाबा. चालत्या ट्रेन ( नशीब पॅसेन्जर होती) मधून उडी मारण्याचा मुर्खपणा मी पण केलाय. ते कमी होत म्हणून काही वर्षानी टिळक रोडला चालू झालेली बस धावत् जाऊन पकडली होती.( जशी काही दुसरी मिळालीच नसती)

जीवन सुन्दर आहे, कशाला धोक्यात घालायचे?

काळजी घ्या!! यापुढे चुकु महिल्यांच्या डब्यात शिरलात तरी निर्लज्ज बना पुढच्या ठेसनाला उतरा पण डबा बदलण्याचे साहस करु नका.

बाळा, सांभाळून रे! तंद्री फार वाईट....
वेळ आली होती, काळ नव्हता आला हेच खरे.
आईवडिलांच्या पुण्याईमुळे अन कुलःस्वामी/स्वामिनीच्या आशिर्वादाने गंडांतर टळले असे समज.

देव तुझे रक्षण करो मित्रा. सरसरुन काटा आला अंगावर तुझा अनुभव वाचून.

खरं तर थेट त्या बायकांना सांगून माफी मागितली असती आणि पुढच्या स्टेशनवर उतरला असतात... तरी चालले असते >> अगदी खरे. +१

इथे सिंगापुरमधे कित्येक वेळी एकही वाहन रस्त्यावर नसते आणि लाल सिग्नल जोवर हिरवा होत नाही तोवर इथली लोक खास करुन सिंगापुरकर कधीच रस्ता ओलांडत नाही. इतका त्यांच्यात पेशन्स असतो.

ऋन्मेश, येथून पुढे नीट काळजी घे आणि रस्त्यावर जाताना गाणी वगैरे ऐकत जाऊ नकोस.

खूप पूर्वी म्हणजे मी जेव्हा फक्त अकरावीत होतो, अतिशय बुटका होतो, तेव्हा सातारच्या मोतीचौकाकडून राजवाड्याकडे जाताना राजवाड्यापुढे सिटीबस वळसा घालत असतानाच पुढच्या दारातुन मागल्या दिशेकडे तोंड करुन अस्साच उलटा उतरलो होतो, जेव्हा ड्रायव्हर बोम्ब मारित होता की उतरू नकोस.
अन व्हायचे काय? तू हात सोडला नव्हतास, मी सोडला होता, त्यात गाडी थोडी उजवीकडे वळत होती, अन मी उतरल्या उतरल्या भिंगरीगत गरागरा फिरलो होतो, नशिब माझे की पाय गुढग्यात कच्चकिनी पिळल्यागत फिरला नाही, गुढगा वाचला, पण मी गरागरा फिरुन तोल सावरण्याकरता हात पसरले ते एका माणसास इतक्या जोरात लागले की ब्बास्स रे ब्बास... अन मग काय? त्याने शिव्यांची लाखोली वाहिलीन, फक्त मी लहान असल्याने मला मारले नाही इतकेच! त्याला माझ्या हाताचा जबरदस्त फटका बसला होता व मी त्याला अडखळूनच माझा वेग सावरला होता.... बसच्या मागल्या चाकाखाली जाण्याऐवजी ऐनवेळेस मी माझी दिशा बसपासून दूर करू शकलो होतो, कसे ते ठाऊक नाही, व त्या माणसास धडकलो होतो.

असे वाटते की काही "मूर्खपणे" आयुष्यात होतातच होतात, अन त्याशिवाय शहाणपणही येत नाही! आपण इतकेच करू शकतो की अशा चूकांची पुनरावृत्ती होऊ नये याचि काळजी घेणे, व दुसरे कोणी त्यांचे अनुभव सांगत असतील, तर ते वाचून मनातल्या मनात स्वतःस त्याच्या जागी कल्पून त्याची अनुभूती घेऊन, त्या चूकांची आवृत्ती आपणही करणार नाही याचि काळजी घेणे.

काळजी घे.

खरं तर थेट त्या बायकांना सांगून माफी मागितली असती आणि पुढच्या स्टेशनवर उतरला असतात... तरी चालले असते>>> अनुमोदन

खरं तर थेट त्या बायकांना सांगून माफी मागितली असती आणि पुढच्या स्टेशनवर उतरला असतात... तरी चालले असते>>>>>>

बायकांची काय दहशत पसरली आहे हे दिसुन येते ह्या प्रसंगातुन.

बाळ ॠन्मेश नी एक वेळ गाडीतुन पडलो तरी चालेल पण बायकांच्या तावडीत एकट्याने सापडण्याचे टाळले.

चुनाभट्टीला माझ्या वहिनीच्या बाबतीत घडले ते असे. गाडी पकडताना तिचा तोल गेला आणि ती प्लॅटफॉर्मवर घसरली. तरी दरवाज्याचा दांडा तिथे धरुनच ठेवला होता.
क्षणार्धात प्लेटफॉर्मवरचा एक मुलगा तिच्या मदतीला धावला. त्याने तिला घट्ट पकडले आणि म्हणाला, ताई, दांडा सोडा, मी धरलेय.
तिला फक्त थोडेसे खरचटले. तिथल्या स्टॉलवाल्याने लगेच तिला पाणी आणून दिले. पण तो मुलगा मात्र तिथे थांबला नाही, आणि नंतर कधी तिला दिसलाही नाही.

रोजचा लोकल चा अप डाऊन आहे.... समजू शकतो तुझी अवस्था..
उर्वरीत आयुष्यात जास्तीत जास्त काळजी घे मित्रा

Safety MUST be our Topmost Priority ALWAYS!!

धन्यवाद सर्वांचे... काळजी करणारे कोणीतरी असतात म्हणूनच आपण अश्या संकटातून वाचतो .. जे काही झाले त्याचा मला फार मोठा मानसिक धक्का वगैरे बसला नाही.. जे काही होते ते इथे लिहून हलका झालो.. बस्स कंबरडे जरा मोडलेय.. दोन दिवस मूव लावून झोपतोय Wink

गामा पैलवानांनी म्हटल्याप्रमाणे तुम्ही यमराजाचं दार ठोठावलंत. नेमका यमराज तेव्हां आंघोळीला गेलेला होता म्हणून बरं. नाहीतर दार उघडलं असतं.

"जे काही झाले त्याचा मला फार मोठा मानसिक धक्का वगैरे बसला नाही." >>>> हे वाचून बरं वाटलं.

या अनुभवातून काय शिकाल?
समस्त स्त्रीवर्गापासून दूर पळण्याचा प्रयत्न केलात तर जिवावर बेतणारच. त्यापेक्षा लग्न करावं. यानं एक गनीम पक्का होतो. आणि हा गनीम स्त्रीवर्गाला आपल्यापासून दूर ठेवतो.

Pages