'महिला दिन’: मोझाम्बिकचा: भाग २

Submitted by आतिवास on 19 April, 2015 - 05:53

भाग १
वाचून, ऐकून, पाहून स्त्रियांच्या स्थितीबाबत माझं जे मत तयार होतंय, ते तपासून घ्यायची एक उत्तम संधी अशा दृष्टिकोनातून मग मी ७ एप्रिलची वाट पाहायला लागले….

प्रत्येक शहरात सार्वजनिक समारंभाच्या जागा ठरलेल्या असतात, तशीच इथली जागा म्हणजे एक बाग आहे. मानिका प्रांताची राजधानी असलेल्या चिमोयो शहरात ’२५ सप्टेंबर’ हा खड्डा नसलेला एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावर विधानसभा आहे, राज्यपाल निवास आणि बरीच मंत्रालयं आहेत. त्यामुळे हा रस्ता चांगल्या स्थितीत आहे. त्याच्या एका टोकाला असलेली ही बाग.

बाग हे आपलं उगाच दिलेलं नाव आहे खरं तर. एका मैदानात (जे ओलांडून जायला मला तीन मिनिटं लागतात) पंधरा-वीस उंच झाडं आणि बसायला पाच-सहा लाकडी बाकडी अशी ती बाग. अनेकदा किरकोळ विक्रेतच असतात इथं. काही वेळा भिकारी. तर या बागेत ‘दिया दि मुल्येर’ (Dia de Mulher) कार्यक्रम असणार होता. इथं h सुप्त आहे, उच्चारला जात नाही पोर्तुगीजमध्ये; आणि ‘ल्य’ ‘मूल्य’सारखा ठासून नाही म्हणायचा तर ले आणि ल्ये यांच्यामधला उच्चार करायचा. तो शब्द मुलेर असाही नाही. असो. ‘दिया’ म्हणजे दिवस आणि ‘मुल्येर’ म्हणजे स्त्रिया – महिला दिन. ‘कार्यक्रम काय आहे’ या प्रश्नाला उत्तर नव्हतं. पण कार्यक्रम संपला की आम्ही सगळ्याजणी बेलार्मिनाच्या घरी एकत्र जेवणार होतो – तो कार्यक्रम पक्का होता.

६ एप्रिलच्या रात्री तासभर पाऊस पडला तेव्हा उद्याच्या कार्यक्रमात यामुळे विघ्न तर येणार नाही ना – अशी शंका मनात आली. ७ एप्रिलच्या सकाळीही रिमझिम चालू होती. मी आधी म्हटलं तसं चिमोयोतले सार्वजनिक कार्यक्रम इथून सुरु होतात. इथं लोक जमतात, एक फेरी काढतात; मग जवळच्या एका सभागृहात कमी भाषणं आणि भरपूर नृत्यं असा कार्यक्रम असतो. बरेचदा या ठिकाणी मी पन्नास-साठ लोक पाहिले आहेत. आज संख्या किती असेल असं कुतूहल होतं.

(सकाळी) आठ वाजता मी बागेत पोचले तेव्हा मैदानात प्रचंड गर्दी होती. अर्थात प्रचंड म्हणजे एरवीच्या पन्नास-साठाच्या तुलनेत प्रचंड गर्दी – चारेकशे लोक सहज असतील. विविध प्रकारचे कापुलाना परिधान करून हसतमुख आणि प्रसन्न स्त्रिया; गणवेशातली शाळकरी मुलं-मुली; अनेक पुरुष; पोलीस (स्त्री आणि पुरूष दोन्ही); band पथक..... वातावरण एकदम उत्सवी होतं. मैदानाच्या एका बाजूला चौकोनी व्यासपीठ तर त्याच्या समोर काही अंतरावर आणखी एक छोटं व्यासपीठ होतं. चौकशी केल्यावर कळलं की राज्यपालादि मान्यवर मोठ्या व्यासपीठावर बसणार आणि दुस-या व्यासपीठावर विविध गट नृत्य सादर करणार अशी व्यवस्था आहे.

dia de mulhare stage 7 april 15.JPG

त्या गर्दीत फिरताना मला एक मुलगी दिसली. माझ्यासारखीच तीही एकटी होती आणि बहुधा माझ्यासारखीच आपल्या मैत्रिणींना ती शोधत होती. ती गणवेशात होती म्हणजे शाळेत जात होती; त्यामुळे ‘की क्लास?’ (कोणत्या वर्गात आहेस?) असा प्रश्न विचारून मी संवादाची सुरुवात केली. सहाव्या इयत्तेतल्या एनियाला (Enia) इंजिनीअर बनायचं आहे खरं; पण त्यासाठी किती वर्ष शिकावं लागेल हे तिला नेमकं माहिती नव्हतं. इथंही १०+२+४ अशी व्यवस्था आहे; त्यामुळे मी तिला माहिती देऊ शकले. घरी कोण कोण आहे, शाळा किती लांब आहे, बाकीच्या मैत्रिणी कुठे आहेत अशा संभाषणातून आणि माझ्या दिसण्यातून मी मोझाम्बिकन नाही हा अंदाज तिला आला.

मग तिने मला ‘तुम्ही कुठून आलात’ असा अपेक्षित प्रश्न विचारला. इथं आठवीच्या पुस्तकात ‘भारत’ आहे. अगदी थोडक्यात ओळख आहे ती. सहावीतल्या मुलीला माहिती नसणार. पण भारतात ती काही रमली नाही. तिने मोर्चा ‘माझ्या’कडे वळवला.

“तुझा नवरा काय करतो?” तिने विचारलं. इयत्ता सहावी; वय वर्ष बारा-तेरा; फार फार तर पंधरा.
“मी लग्न केलं नाही”, मी सांगितलं.
“बरं, मुलं किती आहेत तुला?” तिचा पुढचा प्रश्न.
मूल होण्यासाठी या समाजात लग्न ही आवश्यक गोष्ट नाही हे मला एव्हाना माहिती झालं होतं. कुणाशीही ओळख झाली की ही प्रश्नमालिका घडून येतेच येते. ‘लिव-इन’ इथं प्रचलित आहे. लग्न ही खर्चिक बाब असल्याने इथली मुलं त्यांच्या आई-बाबांच्या लग्नात हजर असू शकतात.
“मुलं नाहीत मला”, मी हसत उत्तरले.
तिने अत्यंत करुण नजरेने माझ्याकडं पाहिलं. “एक तरी मूल असावं गं स्वत:चं; खेळायला बरं असतं”, तिने माझी समजूत घातली.

“तुझा एक फोटो काढू का?” मी विषय बदलला.
तिने नकार दिला. विचारमग्न होत ती म्हणाली, “तुला निदान बॉयफ्रेंड तरी आहे का?”
मी नकार दिल्यावर ‘या बाईचं आयुष्य वाया गेलेलं आहे’ अशी तिची खात्री पटली.

“तुझा फोन नंबर दे मला. मी शोधून देते तुला बॉयफ्रेंड” असं म्हणत ती उत्साहाने माझ्या हातातल्या फोनमध्ये डोकावली. तो पाहून तिला माझा नंबर कळणार नव्हता म्हणून मी गप्प बसले.

हसू येता येता मी किंचित विषण्ण झाले. असे सल्ले मला अनेकदा मिळाले आहेत पण ते प्रौढ स्त्रियांकडून. मी त्यांना काही सांगत असते आणि त्याही मला काही सांगत असतात. पण तेरा वर्षाच्या मुलीच्या तोंडी हा विषय मला अपेक्षित नव्हता – विशेषतः आमची ओळखही नव्हती म्हणून. लैंगिकता ही अन्य आदिम प्रेरणांप्रमाणे (आहार निद्रा भय मैथुनंच ..) सहजप्रेरणा आहे. पण तिला अतिरेकी महत्त्व दिलं (स्वीकारून वा नाकारून) की सामाजिक प्रश्नांची एक मालिका तयार होते. लैगिकता नाकारण्याची गरज नाही, तिच्यासह जगताना आयुष्य बरबाद होणार नाही हे किशोरवयीन मुला-मुलींना कळण्यातून बरंच काही सकारात्मक घडू शकतं. ही मुलगी विनाविघ्न अजून दहा वर्ष शिकून इंजिनीअर होईल का नाही कुणास ठावूक!

मग गर्दीत हिंडताना अनेक ‘ग्रुपो दि पोपा’ (groupo de poupa) – म्हणजे ‘बचत गट’ भेटले. एका गटाचा एक गणवेश. टी शर्टवर ‘महिला दिन’ विषयक मजकूर लिहिलेला. या सगळ्या गटांनी त्यांचा फोटो काढायला विनासंकोच परवानगी दिली; माझ्या प्रश्नांना उत्तरही दिली; काही प्रश्न मलाही विचारले.
हा गट विशेष आनंदात होता कारण तो समारंभात नृत्य सादर करणार होता.

groupo de poupa1.JPG

तर हा गट सादरीकरणाची संधी न मिळाल्याने नाराज होता.

groupo de poup2.JPG

मान्यवर आले आणि इतस्तत: पांगलेली गर्दी व्यासपीठाच्या दिशेने धावली. आता पोलिसांची संख्याही वाढली होती. निवेदकाने ‘मुल्येर मोझाम्बिकना’ असा आवाज दिला आणि ‘ओये’ (विजय असो किंवा long live या अर्थाने) असा प्रतिसाद मिळाला. स्वागत, प्रास्ताविक असे औपचारिक सोपस्कार पार पडले आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. नृत्यांना.

मोझाम्बिकन जन्मजात नर्तक असतात असं मला वाटायला लागलंय. सूर आणि ताल त्यांचे अखंड सोबती असतात. अगदी टीव्हीवर नृत्य पाहतानाही दीड-दोन वर्षाची पोरंदेखील पाय नेमके नाचवतात. नृत्य करणा-या समुहाला पाहणं जितकं आनंददायक होतं; तितकंच आनंददायक होतं त्यांच्यासोबत गाणा-या-नाचणा-या समूहाला पाहणंही. पाठीवर पोर बांधून आलेल्या अनेक स्त्रियांचे पाय थिरकत होते आणि कंठातून स्वर लहरत होते. एक आनंदोत्सव होता तो. पारंपरिक गीत-नृत्याला शिट्ट्या-टाळ्या असा प्रतिसाद मिळत होता. स्वत:च्या शरीराला स्वीकारून त्यासोबत आनंदाने जगण्याची कला मोझाम्बिकन (आणि एकंदरच आफ्रिकन) स्त्रियांकडून भारतीय स्त्रियांनी शिकायला हवी हे पुन्हा एकदा जाणवलं.

एक गमतीदार गोष्ट म्हणजे सत्ताधारी फ्रेलिमो पक्षाचे अनेक गट होते नृत्य करणा-यांत. आणि निवेदक महिलांचा ‘जयजयकार’ करताना फ्रेलिमोचाही ‘जयजयकार’ करत होता. कार्यक्रम थोडा दुरून न्याहाळणा-या लोकांशी बोलताना ‘सगळ्या राष्ट्रीय दिवसांचं राजकियीकरण होत असल्याची’; ‘फ्रेलिमो ज्यात-त्यात स्वत:चा प्रचार करत असल्याची’ तक्रार आणि खंत त्यांनी व्यक्त केली. यातल्या काही लोकांशी माझी तोंडओळख असल्याने ते कदाचित स्पष्ट बोलले असतील माझ्याशी. लोकशाहीतले काही ‘रोग’ (सरकार आणि सत्ताधारी पक्ष: सरकारी यंत्रणा कायम असते हे विसरून श्रेय घेण्याची पक्षाची धडपड!) सर्वदूर आहेत हे लक्षात आलं.

दहा-बारा नृत्यं झाली आणि कार्यक्रम संपला. ‘मार्गदर्शनपर दोन शब्द’ वगैरे काही नाही – तेही एका अर्थी बरंच म्हणा! नाहीतरी असली भाषणं म्हणजे देणारे आणि ऐकणारे सगळ्यांसाठीच एक शुद्ध वैताग असतो. पण तरी माझी जरा निराशाच झाली. नृत्यं तर इथं प्रत्येकच कार्यक्रमात होतात आणि त्यात स्त्रियांचा सहभाग नेहमीच लक्षणीय असतो. मग आजचा दिवस आणि बाकी सारे दिवस यात काय फरक? पोर पाठीवर बांधून काम करणा-या अनेक स्त्रिया मला रोज दिसतात, तशाच आजही दिसल्या. मग आजचा दिवस आणि बाकी सारे दिवस यात काय फरक?

मग आम्ही बेलार्मिनाच्या घरी गेलो. तिथं जेवायचा बेत होता म्हणजे एकत्र स्वैपाक करून जेवायचा बेत होता. रांधा-वाढा-उष्टी काढा यातून आजही सुटका नव्हती तर!

अकरा ते तीन आम्ही स्वैपाक केला. फ्रांगो (कोंबडी), कार्ने (गोमांस) आणि अरोश/झ (भात), सलाड असा बेत असल्याने मी मदतही जेमतेम करू शकत होते.

मग तीन-चार तास या दोन पोरींनी माझं मनोरंजन केलं

two kids.JPG

यातली छोटी मस्त नाचत होती. बोलता येत नव्हतं तिला, पण माझी पाठ सोडत नव्हती ती.
तोवर बाकीच्यांनी वाईन, बीअर, जीन वगैरे सेवन केलं. जेवलो. मग इथं (पण) नृत्य झालं.

संध्याकाळी घरी परत येताना मी विचारमग्न होते. मला रोज माझ्या इच्छेनं जगता येतं; माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ‘स्त्री’ म्हणून प्रश्न नाहीत – आहेत ते सामाजिक प्रश्नांचे धागे. म्हणून मला स्त्रियांच्या स्थितीविषयी चर्चेत रस आहे का? पण रोज मला संघर्ष करावा लागत असेल तर असा एक दिवस ‘सुट्टी’ म्हणून उपभोगण्याकडे, मजा करण्याकडे माझा कल राहणार नाही का? तुम्ही जी चर्चा करणार तो माझा प्रश्न असेल आणि त्यातून सुटका नाही हे मला माहिती असेल तर मी कशाला चर्चा करत बसेन? तुमची चर्चा तुम्हाला लखलाभ!

‘दिया दि मुल्येर’ ने मला एक वेगळी बाजू दाखवली. माझ्यासारख्या जगण्याचे फारसे प्रश्न नसणा-या स्त्रीला ‘जगण्याचे प्रश्न असणा-या स्त्रियांनी विचारमंथन अथवा आत्मचिंतन केले नाही’ अशी तक्रार करण्याचा खरं तर काय अधिकार? उरलेले ३६४ दिवस आहेत, हा एक दिवस असू दे स्त्रियांचा मौजमजेचा दिवस! स्त्रियांच्या लढाईचा अर्थ थोडासा अधिक स्पष्ट झाला मला त्या दिवशी. मी आता भारतातल्या कष्टकरी स्त्रियांनाही कदाचित अधिक चांगलीसमजू शकेन.

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लैंगिकता ही अन्य आदिम प्रेरणांप्रमाणे (आहार निद्रा भय मैथुनंच ..) सहजप्रेरणा आहे. पण तिला अतिरेकी महत्त्व दिलं (स्वीकारून वा नाकारून) की सामाजिक प्रश्नांची एक मालिका तयार होते. लैगिकता नाकारण्याची गरज नाही, तिच्यासह जगताना आयुष्य बरबाद होणार नाही हे किशोरवयीन मुला-मुलींना कळण्यातून बरंच काही सकारात्मक घडू शकतं. >> +१०००००

तुमचा एकंदर समाजाकडे / सभोवतालच्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आवडतो.