कॅलिफोर्नियाच्या तोंडचे पाणी पळते तेंव्हा…

Submitted by निकीत on 7 April, 2015 - 07:47

कॅलिफोर्नियात सध्या प्रचंड (ऐतिहासिक, न भूतो…, लय बेक्कार वगैरे वगैरे) दुष्काळ पडला आहे आणि त्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत हे प्रसारमाध्यमांतून आतापर्यंत आपल्याला समजले असेल; २०१२ साली सुरु झालेल्या दुष्काळाचे हे सलग चौथे वर्ष आहे. अमेरिकेची सुमारे १२% लोकसंख्या इथे राहते आणि एकून उत्पन्नापैकी २०% उत्पन्न इथून येते (सुमारे २ ट्रीलियन डॉलर). (अवांतर: कॅलिफोर्नियाची अर्थव्यवस्था इतकी मोठी आहे कि जर तिचा स्वतंत्रपणे विचार केला तर ती जगात ७व्या क्रमांकावर येते.) त्यामुळे इथल्या घडामोडी देशाच्याच दृष्टीने एक चिंतेचा विषय असतो. असो. तर, २०१३ पर्यंतचा दोन वर्षांचा दुष्काळ मी तरी फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम म्हणून सोडून दिला होता. काय तर म्हणे दुष्काळामुळे लॉनला आठवड्यातून तीनच वेळा पाणी घाला पण सक्ती नाही कशाचीच वगैरे. २०१४ मध्ये त्याची तीव्रता लक्षात येऊ लागली. त्या वर्षी सेन्ट्रल व्हेली मधील काही छोटी शहरे वगळता इतर कुठे पाणीकपात करावी लागली नव्हती. पण दुष्काळाच्या सलग चौथ्या वर्षामुळे मात्र आता सगळ्यांनाच याच्या झळा बसणार आहेत याची जाणीव झाली. सर्वात मोठा परिणाम अर्थात शेतीवर झालेला आहे. शेतकी उत्पन्न २०१४ मध्ये ४% घटले होते (उत्पादन जास्तच घटले होते) आणि २०१५ मध्ये त्यात आणखी घट होणार हे निश्चित आहे. अमेरिकेत वापरला जाणारा ५०% पेक्षा अधिक फ्रेश प्रोड्यूस (भाजीपाला, फळे, दूध, मांस इ.) हा एकट्या कॅलिफोर्निया मध्ये उत्पादित होतो. त्यामुळे अमेरिकेतील अन्नपदार्थाच्या किमतीवर या दुष्काळाचा परिणाम येत्या वर्षात होणारच आहे.

गेली ३ वर्षे काही ठोस कारवाई करण्यास कचणारया राज्य सरकारला अखेरीस गेल्या आठवड्यात जाग आली आणि गवर्नर जेरी ब्राऊन यांनी तातडीने घरगुती (शहरी उद्योग आणि हॉटेल इ. सहित) पाणीपुरवठ्यामध्ये २५% कपातीचे आदेश दिले. ब्राऊनसाहेब शेतीच्या पाणीपुरवठ्याबाबतचा निर्णय काही आठवड्यांनी घेणार आहेत म्हणे. गंमत म्हणजे, राज्यातील एकून पाणी वापराच्या ८०% पाणी शेतीलाच वापरले जाते घरगुती वापरासाठी सुमारे २०% पाणी वापरले जाते. त्यामुळे, शेतीच्या पाणीपुरवठ्याचा निर्णय खर्या अर्थाने महत्वाचा. आधीच गेल्या तीन वर्षात अनेक शेतकर्यांचे आणि शेतमजुरांचे कंबरडे मोडलेले आहे. त्यात कॅलिफोर्निया मधील पाणी हक्क (water rights) हे कायदेशीरदृष्ट्या अत्यंत जटील प्रकरण आहे. त्यातील अनेक लढाया अनेक वर्षांपासून अनेक कोर्टात (सुप्रीम कोर्टासकट) अव्याहतपणे चालू आहेत. त्याचबरोबर, लॉबिंग ग्रुप्समुळे शेतीसाठीचे पाणी हा एक चांगलाच राजकीय फोडणीचा विषय आहे. बघूया ब्राऊनसाहेब काय ठरवतायात ते. असो.

तर आता घरगुती वापराबद्दल. या २०% पैकी १४% पाणी हे एकट्या लॉस एंजिलीस शहर व उपनगरात वापरले जाते, ४% हे सॅन फ्रान्सिको बे एरियात तर उरलेल्या राज्यात फक्त २%च पाणी वापरले आते. गंमत अशी की लॉस एंजिलीस जवळ एकही मोठा पाणीपुरवठ्याचा स्त्रोत नाही. त्यामुळे तिथे लागणारे पाणी हे राज्याचा उत्तर भागातून पंप करून सुमारे ४०० मैल वाहून नेले जाते ! याला अर्थातच प्रचंड प्रमाणात उर्जा लागते - कॅलिफोर्नियाच्या एकून वीज वापरापैकी सुमारे २०% वीज ही फक्त पाणी लॉस एंजिलीसला वाहून नेण्यासाठी वापरली जाते (दरवर्षी सुमारे १०,००० मिलिअन युनिट्स = महाराष्ट्रातील १ कोटी घरे मिळून दरवर्षी जेव्हढी वीज वापरतात).

कॅलिफोर्नियाच्या पाण्याचे स्त्रोत म्हणजे पाउस आणि वितळणारा बर्फ़ - दोन्ही पडतात नोव्हेंबर ते मार्च दरम्यान. गेली ४ वर्ष पाउस कमी पडतोय आणि २ वर्ष बर्फ.गंमत म्हणजे अमेरिकेतल्या अनेक राज्यांमध्ये यंदा प्रचंड थंडी आणि बर्फ झाला (चुकीच्या किनाऱ्यावर अजूनही चालूच आहे :)) पण कॅलिफोर्निया मात्र कोरडाच राहिला. त्याची शेजारी राज्येदेखील (ओरेगन, नेवाडा - तसेही वाळवंटच आहे, Arizona इ.) थोडीफार कोरडी आहेत पण त्याची बरीच तीव्रता कमी आहे. ह्याला ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत की एल-निनो सिस्टीम याबाबत अजूनही संभ्रम आहे. ते काही असलं तरी ग्लोबल वॉर्मिंग मुळे या दुष्काळाची तीव्रता नक्कीच वाढली / वाढणार आहे. म्हणजे कसं हे थोडक्यात: जो स्नो फॉल (हिमवर्षाव) डोंगरांवर साठून राहतो त्याला स्नो पॅक म्हणतात. हा स्नो पॅकच उन्हाळ्यात वितळून नद्या आणि धरणामध्ये येतो. चांगला स्नो पॅक होण्यासाठी स्नो फॉल होण्यापूर्वी जमीन चांगली गोठून टणक होणे आवश्यक असते. म्हणजे बिलो फ्रीझिंग तापमान अनेक दिवस राहणे इ. जर जमीन टणक नसेल तर चांगला स्नो पॅक तयार होऊ शकत नाही. या वर्षी सरासरीच्या २५-३०% बर्फ पडूनही स्नो पॅक हा सरासरीच्या फक्त ८% च आहे. ग्लोबल वॉर्मिंग मुळे २०१४-१५ चा हिवाळा हा कॅलिफोर्नियामधील सर्वात उष्ण हिवाळा होता (warmest winter so far). किंबहुना, गेल्या १० वर्षात तापमानाचे अनेक उच्चांक सातत्याने मोडले गेले आहेत. तसेच उन्हाळ्यातील तापमानही वाढतच आहे - म्हणजे पाण्याची मागणीही वाढणार (त्याच प्रमाणात नाही, पण वाढणार). तसेच हायड्रो पॉवर जनरेशन कमी पण विजेची (एसी इ.) मागणी जास्त.

एक गोष्ट आहेच की या दुष्काळाची आणि भारतातील दुष्काळाची तुलनाच होऊ शकत नाही. कॅलिफोर्नियाचा घरगुती पाणीवापर सुमारे ५००-६०० लिटर प्रति माणशी प्रति दिन आहे; भारतात हा आकडा १००-१५० आहे (अनेक भागात याहूनही प्रचंड कमी). त्यामुळे २५% कपातीने कॅलिफोर्नियात काही जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही हे निश्चित. तसेच कॅलिफोर्निया मध्ये ग्राउंड वॉटर मुबलक असल्याने लोक बोअर / विहिरी खणून पाण्याची गरज भागवू शकतात आणि भागवतही आहेत. पण त्यालाही मर्यादा आहेत. ग्राउंड वॉटर टेबल गेल्या काही वर्षात घसरत आहे आणि पाणी हे एक सामुदायिक संसाधन आहे; एका माणसाने जर ते जास्त उपसले तर दुसऱ्या माणसाला ते कमी मिळेल.

आता यावर अनेक उपाय सुचवले गेले आहेत - पाणीकपात, पाणीबचत, कार्यक्षमता सुधारणा, पाण्याची किंमत वाढविणे (माझ्या मते सर्वात योग्य) वगैरे. नजीकच्या काळासाठी याहून अधिक फारसे पर्यायही नाहीत. पण दूरगामी दृष्टीकोनातून "नैसर्गिक संसाधने अमर्यादित आहेत" या गृहितकावर आधारलेले limitless growth हे विकासाचे प्रतिमान तपासण्याची अमेरिकेला आणि भारतासारख्या विकसनशील देशांनाही संधी आहे. त्याचबरोबर, यापुढील काळात अशा संकटाना सामोरं जाण्यासाठी आपण तयारच रहायला हवं. किंबहुना, ग्लोबल वार्मिंगमुळे त्यांची तीव्रता वाढणारच आहे (भारतात तर प्रकर्षाने - उदा. अनियमित मॉन्सून, हिमालयन ग्लेशिअल मेल्ट ई.).

या बाबतीत आपली काय मते आहेत, अनुभव काय आहेत, आणि भारतासारख्या देशाला काही शिकण्याजोगे आहे काय याची चर्चा करण्याकरता हा धागा काढला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामी, हळू हळू sustainability कशी वाढवायची ह्याबद्दल लोक जाग्रुत होत आहेत. वर्षानुवर्षांच्या सवयी बदलायला वेळ लागणार हे ग्रुहित धरले पाहिजे. तू ज्याला पेनी वाइज म्हणत आहेस तीच सुरुवात आहे लक्षात घे. एकदम घाउक बदल होणे शक्य नाही.>> ह्या वाक्याला तो रनिंग लेट प्रतिसाद होता! सॉरी ही वाक्यं पेस्ट करायला विसरले!

सी, कशाला उगीच धागा भरकटवण्याचे potential असलेली statements करते आहेस? Proud Light 1

निकित, मला वाटते अमेरिकेतल्या विकासाची किंमत इतर देश बऱ्याच पूर्वीपासून मोजत आहेत.
About climate change >> I agree Sad

charcha, धन्यवाद!

Happy धागा अजिबातच भरकटवायचा नाहीये. पण सिरीयसली तो काय म्हणतो तेच कळेना !!

ग्रीन हाऊस गॅस इ संबंधी लिहीते जरा वेळात.

ख्रिसमसला नवर्‍याच्या नावाने झाडाला दोरे कुणी नाही बांधत म्हणून हे वाक्य का?? >>>>> Rofl बिचार्‍या त्या लिंब्याला संबंधं नसलेले विषय हिंदुत्त्ववाद / ब्राह्मणवादाशी जोडतो म्हणून शिव्या बसतात.. इथे संबंध नसलेला विषय महिला मुक्तीवादाशी जोडल्याबद्दल सीमंतीनीला बक्षिस द्यायला हवं.. Proud

जिज्ञासा, तुझी कळकळ समजते आहे. अन्न किंवा रिसोर्सेसची नासाडी ह्याबाबत पूर्ण सहमत. पण निसर्गाशी एकरूपता किंवा संबंध नाहीच हे पटत नाही. बस्केने लिहिलं तसं हायकिंग, ट्रेकिंग, सायकलिंग, स्किईंग, नॅशनलपार्क्स, जंगलं हे सगळं निसर्ग जपण्याचे किंवा निसर्गाच्या जवळ जाण्याचेच मार्ग नाहीत का? असामीने लिहिलं तसं आपल्याला अपेक्षित असलेलं किंवा आपण पाहिलेलं 'निसर्गाशी नातं' इथे दिसत नाही असं म्हणता येईल.

निकीतच्या पोस्टीही चांगल्या आहेत.

Happy बक्षीस दिले तर घेईन की! शिव्या दिल्यात तरी चालेल. ईथे मुद्दा स्त्री मुक्तीचा नाही आणि मी तो तसा मांडला ही नाही. दोरे उदाहरण स्त्री विषयक आणि सबब भरकटवणारे वाटले तर "इथे हॉलीची पाने ख्रिसमसला लुटत नाहीत म्हणून असे म्हणता का " असेही वाचले तरी चालेल. निकीत चा मूळ लेख मला जितका आवडला तितक्या त्याच्या पोस्टी गोंधळात टाकणार्‍या वाटल्या.

निसर्गाशी स्पिरीच्युअल नाते असावे म्हणजे नक्की काय? जितकी ओढ आपण बकुळ किंवा चाफ्याबद्द्ल व्यक्त करतो तितकी ओढ मी डॅफोडिल्स किंवा लिलीज बद्दल अमेरिकन्स मध्ये पाहिली आहे. जसे भारतात सणवाराला पक्षी, प्राणी, फुले आपण महत्त्वाचे मानतो तसेच अमेरिकेतही आढळते.

मुद्दा ग्रीन हाऊस गॅसेसचा - एक कारण वीज निर्मीती करावी लागते म्हणून होते. फिजूल वापर जसे रात्री दुकानात लाईट्स चालू ठेवणे बंद व्हायला हवे हे खरे. पण मुळात भारत किंवा इतर ट्रॉपिकल देशा पेक्षा अमेरिकेत सूर्यप्रकाश कमी आहे. तसेच हवामान प्रतिकूल असल्याने एसी वापरावे लागणार नाहीतर वसाहती होणे कठीण.

अमेरिका किंवा प्रगत देशातील वीज, ट्रान्स्पोर्ट वापराचा त्रास इतरांना होतो हे काही अंशी खरे आहे. पण प्रगत देशातील शेती धान्य उत्पादन विषयक सुधारणा त्यामुळे सामान्यास अन्न उपलब्धी, वैद्यकिय सुविधा जसे लसीकरण इ इ मुळे फायदाही होतो.

क्लायमेट चेंज आणि इतर देशांवर परिणाम.

....

अगदी सहमत.

ग्लोबल वॉरमिंग मध्ये अमेरिकेचा हिस्सा मोठा अहे.

समुद्र पातळी वाढुन बिचारे मालदीव लवकर. बुडणार अहे

ईथे मुद्दा स्त्री मुक्तीचा नाही आणि मी तो तसा मांडला ही नाही. >>>> भारतीय सण आणि निसर्ग ह्या संदर्भात दसरा - आपट्याची पानं, पाडवा - आंब्याची / कडुलिंबाची पानं, नाग - दुध पाजणं, वडाच्या फांद्या तोडून त्याची पुजा करणं वगैरे काही न येता वडाला (बायकांनी) "नवर्‍याच्या" नावाने दोरे बांधणं हे स्त्रीवादाच्या पार्श्वभुमीशिवाय लिहिलेलं आहे हे पटत नाही. पण असो तो मुद्दा नाही. बक्षिस ऑलरेडी जाहीर केलेलं आहे. Wink

जितकी ओढ आपण बकुळ किंवा चाफ्याबद्द्ल व्यक्त करतो तितकी ओढ मी डॅफोडिल्स किंवा लिलीज बद्दल अमेरिकन्स मध्ये पाहिली आहे. जसे भारतात सणवाराला पक्षी, प्राणी, फुले आपण महत्त्वाचे मानतो तसेच अमेरिकेतही आढळते. >>>>> ह्याला अनुमोदन आहेच.

हो दसर्‍याचे उदाहरण मी लिहीले आहे आधी. असो धागा भरकटवायचा उद्देश नव्हता आणि नाही. म्हणून बक्षीसासाठी आभार स्पीच दिले असे मानून परत कॅलिफोर्निया दुष्काळकडे येवू.

मी पिंपरीत असून मला वाटायचे जगात कुणालाच इतके पाणी मिळत नाही तेवढे आपल्याला मिळते... उदा. वॉचमनने पाच वाजता पहाटे मोटार सोडल्यावर जर सोसायटीतील बाकीच्यानी नळ चालू ठेवले नाहीत तर सकाळी नऊपर्यंत, अन्यथा साडेसहा सुद्धा नाही. माणशी फारतर पन्नास लिटर मिळते आम्हाला दिवसाला...पाचशे म्हणजे चैनच आहे २५% कपातीनंतर ही!

पराग, होय हे सगळे निसर्गाशी असलेलं नातं जपण्याचे मार्ग आहेत! पण त्या गोष्टी आपण रोज करत नाही ना! आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात किती पर्यावरणस्नेही जीवनशैली अनुसरतो? आणि हे केवळ अमेरिकेतले लोकं करतात असं नाहीये..ह्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेत जगणारे सगळे लोकं असेच जगतात आजकाल Sad किती वर्ष झाली आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग वगैरे शब्द ऐकून? आपण किती सवयी बदलल्या आपल्या? हे सगळे प्रश्न एक माणूस म्हणून, एक कुटुंब म्हणून, एक समाज म्हणून आपल्याला स्वतःला विचारले पाहिजेत. त्यांची उत्तरे शोधली पाहिजेत.
>कार कमीतकमी वापरतो का? एक मैल अंतरासाठी देखिल आपण कार काढतो का?
>आपल्या शहरातली सार्वजनिक वाहतूक किती चांगली आहे?
>आपला आहार ऋतूनुसार बदलतो का? की आपण तोच एक आहार खातो? माझ्या आहारातले घटक पदार्थ कुठून येतात? ते माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती उर्जा खर्च होते? माझ्या इथे काय पिकतं? ते माझ्या आहारात किती येतं?( कारण ऋतुमानाच्या विरुद्ध आहार एकत्र करायला जास्ती उर्जा लागते.)
> आपण आपला कचरा कुठे टाकतो? recycle-reduce-reuse ह्यापैकी आपण किती गोष्टी करतो?
> आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण किती हानिकारक केमिकल्स वापरतो?
> आपण गरज नसताना किती खरेदी करतो? This is consumer driven economy! आपल्याकडे मोबाईल, कार, शूज, कपडे ह्या गोष्टी किती आहेत? त्यातल्या किती गोष्टींची आपल्याला खरंच गरज आहे? आपण गरज म्हणून खरेदी करतो की मूड म्हणून?
> आपल्याला असलेल्या गरजेपेक्षा अधिक वीज, पाणी, अन्न आपण वापरतो का?
> What is our carbon footprint?
>आपण किती प्लास्टिकच्या गोष्टी वापरतो? Insecticides, pesticides वापरतो?
ह्या सगळ्या गोष्टी डोळसपणे बघायला हव्यात. घरं बांधताना ती पर्यावरणस्नेही आहेत का ह्याचा विचार व्हायला हवा.

निसर्ग म्हणजे काही फक्त national parks मधला निसर्ग नाही ना? माझ्या घराच्या आत देखिल निसर्ग आहे. निसर्ग शोधायला कुठे जाण्याची गरज नाही! For e.g. A lawn is a very non eco friendly form of greenery because you destroy the biodiversity! Same goes for large scale agriculture (agriculture = monoculture= threat to biodiversity). ह्यावर एक King corn नावाची सुरेख डॉक्युमेंटरी आहे. मिळाल्यास जरूर पहा.

ह्या अर्थव्यवस्थेने आपल्याला सतत भुकेले ठेवायचे काम केले आहे. Now our wish-lists are full of things! Things we want - newer gadgets (that go absolute in couple of years thanks to the technology), more dresses, better cars. We are required to keep needing.

ज्या निसर्गात सगळ्या गोष्टी चक्रनेमीक्रमेण चालतात अशा निसर्गात आपण सतत वाढत जाणाऱ्या नफ्याची अर्थव्यवस्था चालवू पाहतो. How is it possible? आपल्या सुबत्तेच्या कल्पना देखिल मार्केट ड्रिव्हन झाल्या आहेत - दारचा नारळ, दोडका, केळी, घरचं दूध, तूप ही समृद्धी नाही का? की हातात आयफोन, दारात चारचाकी, मोठा बंगला आणि भरभक्कम बँक बॅलन्स ही खरी श्रीमंती? These are very Indian ideas but I am sure there are sustainable american ideas as well. But they don't seem to find a voice! मला वाटतं की दोन चार पिढ्यांपूर्वी इथल्या स्थानिक लोकांना ह्या जीवनशैलीची सवय/जाणीव नक्की असणार. (मी ते पाडस नावाचं पुस्तक वाचत होते. त्यात इथल्या (फ्लोरिडा) निसर्गाचं/ऋतूंच किती सुरेख वर्णन आहे!)

बात निकली है तो फिर दूर तलक जाएगी! We need to introspect our ideas of development, wealth and happiness. We have got only one planet and we are ruining it for ourselves at a scary speed!

जिज्ञासा, नासाडी बद्दल सहमत, पण अशी नासाडी भारतातही बघितल्येय. (रेस्त्रो, तेलगु लग्न इ. जनरलाईझ नाही करते, एक उदाहरण म्हणून म्हटलंय). निसर्गाला ओरबाडणे इ. करू नयेच, अमेरिकेने अतोनात खनिजे/ पाणी वापरणे हे ही ओरबाडणे, भारताने भरमसाठ लोकसंख्या वाढवणे हे ही ओरबाडणे आणि चीनच्या इंडस्ट्री अमाप प्रदूषण करतात आणि लोकसंख्या काबूत ठेवायला अमानुष उपाय करणे ही मूलभूत हक्कांवर गदा Happy
भारतात शहरी भागात जे जीवन जगतात ते निसर्गाशी जवळीक साधायला ४ कुंड्यात रोपं लावणे, वीकेंडला निसर्गाच्या सानिध्यात जाणे, भरमसाठ फोटो काढून डकवणे, झाडांची/पक्षांची इ. माहिती पुरवणे याच्या फार पुढे जात नाही. हेही चांगलंच आहे, बेबी स्टेप्स काही वाईट नाहीत, पण हे करताना जितकं अमेरिकन्सना ओरबाडू नये शिकतात तेव्हढंच भारतीय ही शिकतात असं वाटतं. गिव्हन मोर रिसोर्सेस आपण (भारतीय) ते रीस्पोन्सिबली वापरू हे विधान फारच धाडसाचं वाटतंय. मानवाचं बेसिक इन्स्टीग्ट फार बदलेल असं वाटत नाही. त्याच बरोबर गिव्हन इनफ केयॉस अमेरिकन नियम पळतील हेही तितकंच धाडसाचं विधान आहे,
परत भारत- अमेरिका तुलना वाटत असेल तर एस डबल ओ आर वाय.... नाही एस ओ डबल आय वाय.

वरचा प्रतिसाद आत्ता वाचला. काही प्रमाणात सहमत.
पण आयफोन, मोठ्ठ घर ही समृद्धी नाही आणि घराचं दूध, तूप हीच समृद्धी इथे अडखळलो.

फादर, सॉरी म्हणजे एस ओ डबल आर ई नाही काही! सॉरी म्हणजे एस ओ डबल आर वाय Proud

पण आयफोन, मोठ्ठ घर ही समृद्धी नाही आणि घराचं दूध, तूप हीच समृद्धी इथे अडखळलो.>> हे मला पडणारे प्रश्न आहेत! आता माझं भारतीयपण मी कसं लपवू? Uhoh (उद्या मी फ्रेंच असते तर कदाचित वेगळी उदाहरणं दिली असती पण मग त्याचा अर्थ फ्रांस आणि अमेरिकेची तुलना व्हावी असा निघेल का?)
गेल्या ५०-६० वर्षांत जगात सुबत्तेचे आणि राहणीमानाचे निकष फार झपाट्याने बदलले आहेत आणि ह्यातल्या बऱ्याच बदलांची सुरुवात ही अमेरिकेतून झाली आहे हे सत्य आहे. अर्थात त्याचमुळे प्रत्यक्ष अमेरिकेत हे बदल अधिक खोलवर रुजले आहेत. ह्या लेखात अमेरिकेच्या प्रॉब्लेम्सची चर्चा आहे म्हणून फोकस अमेरिकेवर आहे. पण मग त्याचा अर्थ भारतात हे प्रॉब्लेम्स अस्तित्वातच नाहीत असा होतो का? (माझ्या मते होऊ नये)
उद्या भारतातल्या पर्यावरणाच्या समस्यांची चर्चा करणारा धागा असेल तर भारत अमेरिका तुलना होत राहणार का (बहुदा हो पण आयडियली होऊ नये).
भारताचे स्वतःचे प्रॉब्लेम्स आहेत आणि अमेरिकेचे स्वतःचे पण हे दोन्ही देश आणि बाकीचे सर्व देश एकाच ग्रहावर राहतात ज्याचं नाव आहे पृथ्वी! आणि ह्या ग्रहाचे देखिल स्वतःचे काही प्रोबेल्म्स आहेत! त्यामुळे ज्या तुलनेने हे प्रॉब्लेम्स सोडवण्यात फारशी भर पडणार नाही अशा तुलना का कराव्या?

होतय काय की २५+ वर्षे भारतात राहूनही मी घराचं दूध तूप दोडकी केळीला समृद्धी म्हणू शकत नाही, कारण त्याच्याशी रिलेट होता येत नाही. ते कितीही आवडलं तरीही. बर जे जीवन जगतोय ते मला आवडतंय, कशाच्या तरी मागे धावतोय, दमतोय, थकलोय आणि आनंद मिळत नाहीये असंही होत नाहीये. स्वतः नासाडी जितकी कमी करता येईल तितकी करतो, पण गायी म्हशी पाळायची हौस नाही फारतर दुकानातून कंद आणून फुलं लावली आणि आली की खुश. अगदीच धोंडोपंत झालाय का?

मस्त चर्चा चालली आहे.
मूळ झगडा 'एन्व्हारायमेंटल वॅल्यू सिस्टीम्स' मधला आहे असे मला वाटते. टेक्नॉलॉजीच्या मदतीने सर्व पर्यावरणीय प्रश्न सोडवता येतील हा भ्रम आणि डीप ग्रीन्सचा आत्यंतिक निसर्गवाद याच्यातले मिडल ग्राऊंड शक्य आहे का?
अ‍ॅज अ स्पेशीज वी आर बाय नेचर एक्सप्लॉयटेटरी; वड/पिंपळ/ससे हे सगळे निव्वळ दिखाऊ टोकन रिस्पेक्ट्स असेच आता वाटू लागले आहे.
इकॉलॉजी राखली नाही तर इकॉनॉमीच राहणार नाही ही वेळ येईपर्यंत आपल्याला अक्कल येणार नाही.

निकीत.. काय योगायोग आहे बघ.. मी ,युरो व के. अश्विनी या इथे मायबोलिवरच ... आंतरराष्ट्रीय घडामोडी या बीबीवर... नेमक्या याच मुद्द्यावर ३ दिवसांपुर्वी चर्चा करत होतो व तिथे मी कॅलिफोर्नियाच्या वॉटर वॉर व पाणीपुरवठाच्या गेल्या १०० वर्षाच्या पॉलीटिक्स बद्दल लिहीले आहे. तसेच हिमालयन ग्लेशियर्सच्या मेल्टिंग व ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भात त्या बीबीवर मी हाच प्रश्न ३ दिवसांपुर्वी विचारला होता की भारत व इतर जग कॅलिफोर्नियाच्या या अडचणीतुन काय शिकु शकेल?

असो. तुझा हा लेख आजच वाचला. मस्त लेख आहे. तु एवढा जुना मायबोलिकर आहेस हे माहीत नव्हते.

तुझा लोकसत्तेतला पर्यावरणा बद्दलचा लेखही आत्ताच वाचला. तोही खुप आवडला. तुझा या विषयात अभ्यास आहे असे वाटते. पण लोकसत्तेतल्या ज्यांच्या लेखाला तु उत्तर दिले होतेस तो मुळ लेख तु तिथे दिलेल्या लिंकवरुन दिसत नाही. पण तु त्याबद्दल जे लिहीले आहेस त्यावरुन ती लेखिका फार राइट विंग रिपब्लिकन असावी अश्या संशयाला जागा आहे..:) कारण तेही पर्यावरण बदलाला व ग्रिनहाउस इफेक्टला अजिबात मानत नाहीत. आणी अशी ही पार्टी आज अमेरिकेच्या दोन्ही सभाग्रुहात मे़जॉरीटी बाळगुन आहे म्हणुनच नजिकच्या काळात तरी अमेरिकन काँग्रेस कडुन याबाबतीत काही ठोस पावले उचलली जातील व कॅलिफोर्नियाला केंद्राकडुन फार मदत मिळेल अशी संभावना नाही. हे जे काही कॅलिफोर्नियात होत आहे ते कॅलिफोर्नियाच्या डेमॉक्रेटिक पार्टीच्या लिबरल विचारसरणीने केलेला प्रॉब्लेम आहे असे म्हणुन काँग्रेस व सेनेट.. कॅलिफोर्नियाकडे पाठ फिरवील यात काहीच शंका नाही.असो.. तो या बीबीचा प्रश्न नाही.

तु जे जमीनीखालच्या अ‍ॅक्वाफरच्या अतिवापराबद्दल बोलत आहेस ते ऑलरेडी गेल्या १०० वर्षात झालेले आहे म्हणुन आता फार कमी रिझर्व्ह्स राहीले आहेत व आता मिडवेस्ट मधल्या अ‍ॅक्वाफरचे पाणी कॅलिफोर्नियाला डिव्हर्ट करायचा प्लान माझ्या ऐकीवात आला आहे. तुला यातील जास्त माहीती असावी असे वाटते.

"नैसर्गिक संसाधने अमर्यादित आहेत" या गृहितकावर आधारलेले limitless growth हे विकासाचे प्रतिमान तपासण्याची अमेरिकेला आणि भारतासारख्या विकसनशील देशांनाही संधी आहे.. हे मात्र तु बरोबर बोललास. आंतराष्ट्रीय घडामोडी या बीबीवर परवाच के अश्विनीने हे लिहीले होते...."पण दुर्दैवाने औद्योगीकरण/ विकास आणि पर्यावरण र्‍हास हे हातात हात घालून येत असल्यासारखं चित्र आहे"

जिज्ञासाने इथे बरेचसे व्हॅलीड मुद्दे उपस्थित केले आहेत. त्या मुद्द्यांना मोघम उत्तरे देण्याऐवजी या विकेंडला मुद्देसुद उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. ते मुद्दे म्हणजे मुंग्यांच्या वारुळामधे हात घातल्यासारखे आहे. त्या मुद्द्यांच्या डिस्कशनची व्याप्ती फार मोठी आहे व त्या अनुषंगाने बर्याच विषयांची सरमिसळ इथे होउ शकते.

कॅलिफोर्निया आमंड्स जे उत्तम व जगभर प्रसिद्ध आहेत त्यांच्या पिकासाठी फार पाणी लागते असे वाचून आहे. जे तिथे घेणे व्हायेबल नाही ते इकॉनोमीच्या रेट्यामुळे घेउन एक्स्पोर्ट केले जात आहे. ह्याने ही पाणी साठा कमी होत असेल.

रिसोर्स मॅनेज मेंट साठी जी कोण मिनिस्ट्री असेल ते काही प्रॉजेक्ट घेत नाहीत का म्हणजे वाळवंटात पाणी आणणे, डीसॅलिनेशन प्लांट टाकणे वगिअरे?

भारताने काही शिकण्याचे वाक्य मात्र विनोदी आहे.

सिमंतीनी:
निसर्गाशी स्पिरीच्युअल नाते असावे म्हणजे नक्की काय? >> नाते असावे असं मी म्हणतच नाहीये. भारत आणि अमेरिकेमधील ती एक तुलना होती. त्यातला मुद्दा एव्हढाच की संसाधनांच्या आर्थिक किमती असल्या तरीही त्यांचं एक सांस्कृतिक स्थान वेगळं असतं. प्रत्येक देशात आणि संस्कृतीत ते वेगळं असतं. भारतासारख्या देशात हजारो वर्षांच्या इतिहासामुळे निसर्गाचं संस्कृतीशी (आणि साहजिकच त्यामुळे धर्माशी) असणारं नातं अधिक घट्ट आहे. अमेरिकेत वेगळं आहे. चूक-बरोबर असं काहीच नाही. अजूनही कन्फ्युजिंग वाटत असेल तर आपला पास.
...प्रगत देशातील शेती धान्य उत्पादन विषयक सुधारणा त्यामुळे सामान्यास अन्न उपलब्धी, वैद्यकिय सुविधा जसे लसीकरण इ इ मुळे फायदाही होतो. >> फायदा होतोच हे मान्य. पण त्या कंपन्याना त्यांच्या पेटंटचे भरगोस पैसेही मिळतात.

जिज्ञासा:
ह्या अर्थव्यवस्थेने आपल्याला सतत भुकेले ठेवायचे काम केले आहे. >> कुठल्या अर्थव्यवस्थेने केले नाही? अगदी प्राचीन कालापासून विस्तार हाच मानवी सिविलायझेशन चा पाया राहिला आहे.
गेल्या ५०-६० वर्षांत जगात सुबत्तेचे आणि राहणीमानाचे निकष फार झपाट्याने बदलले आहेत आणि ह्यातल्या बऱ्याच बदलांची सुरुवात ही अमेरिकेतून झाली आहे हे सत्य आहे. >> अमेरिकेचा पायाच मुळी रोवला गेला तो संसाधाने मिळवण्यासाठी. त्यामुळे तिथे resource heavy सुबत्ता हा निकष राहणारच. तो बदलणं ही एक राजकीय/सांस्कृतिक प्रक्रिया आहे आणि म्हणूनच स्लो आहे.

मुकुंद: लोकसत्तेमधील लेख वाचल्याबद्दल धन्यवाद. मी जुना मायबोलीकर फक्त नावालाच. फार काही active वगैरे नसतो.
कॅलिफोर्नियाला केंद्राकडुन फार मदत मिळेल अशी संभावना नाही >> कॅलिफोर्नियाला त्याची फार गरज भासेल असे वाटत नाही. पर्यावरणाच्या अनेक योजनामध्यॆ कॅलिफोर्निया देशात (आणि काही बाबतीत जगात देखील) अग्रेसर आहे.
आता मिडवेस्ट मधल्या अ‍ॅक्वाफरचे पाणी कॅलिफोर्नियाला डिव्हर्ट करायचा प्लान माझ्या ऐकीवात आला आहे. >> मला याविषयी जास्त माहिती नाही. पण हे ऐकायलाच भयंकर वाटत आहे. प्रत्यक्षात येईलसे वाटत नाही. मध्ये अख्खा रॉकी उभा आहे.

अमा:
कॅलिफोर्निया आमंड्स जे उत्तम व जगभर प्रसिद्ध आहेत त्यांच्या पिकासाठी फार पाणी लागते असे वाचून आहे. जे तिथे घेणे व्हायेबल नाही ते इकॉनोमीच्या रेट्यामुळे घेउन एक्स्पोर्ट केले जात आहे.. >> बरोबर. म्हणूनच पाण्याच्या (आणि इतर सम्साधनाच्या) किमती वाढवून खरी कॉस्ट रिफ्लेक्ट करणारया झाल्या की ते आपोआपच अन्व्हायेबल होतील.
भारताने काही शिकण्याचे वाक्य मात्र विनोदी आहे. >> का? भारतात काही वेगळे विकासाचे मॉडेल आहे का ?

>>> पण दूरगामी दृष्टीकोनातून "नैसर्गिक संसाधने अमर्यादित आहेत" या गृहितकावर आधारलेले limitless growth हे विकासाचे प्रतिमान तपासण्याची अमेरिकेला आणि भारतासारख्या विकसनशील देशांनाही संधी आहे. <<<< हे महत्त्वाचे आहे...

पण त्याचबरोबर...
????? सशल, माझ्या मते तरी इथली उदाहरणं न बघता भारतानी स्वता:च्या परिस्थितीवर उपाय शोधावेत. सध्या तरी भारतात अमेरिकेतल्या फोल गेलेल्या मॉल आणि खूप पाणी वापरणार्‍या सबर्बन विकासाचे अंधानुकरण सुरू आहे.
त्यामु़ळे नैसर्गिक संसाधनांचा वापर केन्द्रस्थानी ठेवणे हे पटते पण कॅलिफोर्नियाकडून (आणि एकूणच सबर्बन / अर्बन स्प्रॉल विकास) विकासाबद्दल कल्पना घेऊ नयेत असे माझे तरी स्पष्ट मत आहे. <<<<

धनि यांचे हे मतही सुयोग्य, पटले.

>>>> मानवाचं बेसिक इन्स्टीग्ट फार बदलेल असं वाटत नाही. <<<<
अमितव, मला वाटते की "फुक्कट ते ते पौष्टीक" असे गमतीगमतीतही उच्चारून त्याचा प्रसार करुन त्याला प्रतिष्ठा मिळवून देऊन, जे जे फुकट ते ते हाडपावे हे मानवाचे (तसे तर डिस्कव्हरीवर दाखविले जाणारे दुसर्‍यांच्या शिकारी ढापणारे तरसही फुकटेच, तेव्हा केवळ मानवी इन्स्टिग्ट म्हणता येणार नाही) बेसिक इन्स्टिग्ट अधिकाधिक पक्के होत जात आहे... निसर्ग तर काय?//// फुकटम फाकटात उपलब्ध आहे....
एनिवे.... ह्युमन इस होपलेस...!

वाचते आहे. माहिती मिळतेय, अगोदर जे अभ्यासले आहे त्याबद्दल जिज्ञासाने ज्या कळकळीने मुद्दे मांडलेत ते आवडले. मानसिकता बदलली नाही तर अपरिहार्यतेपोटी भविष्यात बदल घडून यावेत किंवा येतील. सस्टेनेबल अशी जीवनशैली (नव्याने) अंगीकारणे हे खूपच आव्हानाचे व 'असुविधाजनक' असते.

स्वानुभवावरून म्हणू शकते की, सर्व सुविधांची सवय झाल्यावर पर्यावरणपूरक गोष्टी करणे, तसे बदल जाणीवपूर्वक आपल्या आयुष्यात घडवून आणणे हे खूपच अवघड काम! त्यापेक्षा आहे त्या जीवनशैलीचे व मानसिकतेचे समर्थन तुलनेने सोपे जाते.

पर्यावरणासाठी आपल्या सुखसोयींमध्ये कपात होण्याची कल्पना नकोशीच वाटते. शेवटी पुढच्या सत्तर ऐंशी वर्षांपुरताच विचार करायचाय, कारण शंभर वर्षांपेक्षा जास्त जगणे (सध्या तरी) अवघड आहे! Wink

अभ्यासपूर्ण धाग्यावर अवांतर प्रतिसाद वाटत असेल तर क्षमस्व! राहावले नाही म्हणून लिहिले.

जिज्ञासा, मुद्दे आवडले.

सध्या माझ्यासोबत रवांडा या देशातली अनेक माणसे काम करतात. ( तोच तो रवांडा, १९९४ साली वांशिक दंगलीत होरपळलेला ) त्या देशात प्लॅस्टीकच्या पिशव्यांवर पुर्णपणे बंदी आहे. मला खुप कौतूक वाटते त्यांचे.
मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवताहेत. आज जिथे जिथे प्लॅस्टीक वापरले जाते त्या प्रत्येक बाबीला पर्याय होता त्या काळात.

त्या उलट केनयात प्लॅस्टीकच्या पिशव्यांना खुप मागणी आहे. सरकारी नियम आहेत पण ते जुगारून त्यांचे उत्पादन होते. अश्याच एका उद्योगाशी मी काही काळ संबंधित होतो. रोजच्या उत्पादनाचे ( केवळ फ्लेक्सीबल पॅकेजींगचे ) टनावारी आकडे बघून मला वाटायचे, तेवढा कचरा तिथे रोजच्या रोज निर्माण होतोय.

छान लेख!
भारताला खरेच बरेच काही शिकता येईल यातून.
याचा अर्थं आपण त्यांच्यापेक्षा इन्फेरियर आहोत असे नव्हे तर अश्या एखाद्या समस्येचं कसं निराकरण करू शकता येतं त्याचा पिअर रिव्ह्यू.

लेख छान आहे!! विसकित देशांमध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती (अन्न, पाणी), वीज, पेट्रोल ह्याची वाट्टेल तशी उधळपट्टी चालू असते. आणि हे सगळे येथील लोकांच्या इतके अंगवळणी पडले आहे की कोणाला त्यात काहीच गैर वाटत नाही.

मूळ झगडा 'एन्व्हारायमेंटल वॅल्यू सिस्टीम्स' मधला आहे असे मला वाटते. >> म्हणूनच किंमत लावून एन्व्हारायमेंटल वॅल्यू मॉनेटाईझ केली की बरेचसे प्रश्न आपोआप सुटतात (रिफर: वस्तूंच्या किमतीत पर्यावरणीय बाह्यतेची किंमत अंतर्भूत करायची). किमती वाढल्या कि इनोव्हेशन / बचत वगैरे आपोआपच होतं. प्रत्येक देशात हे काही प्रमाणात केले जात असतेच. सरकार इतर धोरणे आखूनही बदल घडवून शकते (उदा. कॅप and ट्रेड जे SO२ एमिशन रोखण्याकरिता अतिशय उपयुक्त ठरले आहे).

विसकित देशांमध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती (अन्न, पाणी), वीज, पेट्रोल ह्याची वाट्टेल तशी उधळपट्टी चालू असते. विकसनशील देशांमध्येही जिथे आणि ज्याना संसाधने उपलब्ध आहेत त्यांचीही उधळपट्टी चालूच असते की.

टेक्नॉलॉजीच्या मदतीने सर्व पर्यावरणीय प्रश्न सोडवता येतील हा भ्रम आणि डीप ग्रीन्सचा आत्यंतिक निसर्गवाद याच्यातले मिडल ग्राऊंड शक्य आहे का? >> टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण प्रश्न सोडविण्याच्या बरेच जवळ जाऊ शकतो. ते पूर्ण सोल्युशन नाही हे मान्य.
उदा. चारचाकी गाडी. सर्वसाधारण गाडीमध्ये ~९५% उर्जा ही गाडीचे वजन ढकलायला वापरली जाते तर फक्त ५% उर्जा प्रवाशांना घेऊन जाते. इंजिनची कार्यक्षमता ४०% पकडू (ऑप्टीमिस्टिक). म्हणजे इंधनात जेवढी उर्जा असते त्याच्या केवळ २% उर्जा प्रवाशांना पुढे घेऊन जाते आणि ९८% उर्जा वाया जाते! - मुख्य कारण - गाडीच्या तंत्रज्ञानामध्ये मध्ये गेल्या १०० वर्षात विशेष गुणात्मक फरकच पडलेला नाही! अर्थात तंत्रज्ञान तयार झालं तेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास वगैरे विषय खिजगणतीतही नव्हते आणि इंधनाच्या किमती अत्यंतच कमी होत्या. तीच गत वीजनिर्मितीबद्दल - आता कुठे १०० वर्ष जुनं तंत्रज्ञान बदलू लागलंय.

तंत्रद्न्यान बदलत नाही कारण खाजगी कंपन्या ते विकू शकतात. त्यामुळे - ग्राहकांनी त्यांची पसंती बदलली पाहिजे किंवा सरकारने योग्य धोरण आखून आर्थिक गणितं बदलली पाहिजेत. वीजनिर्मिती क्षेत्रामध्ये जगातील जवळ जवळ सर्व (भारत सुद्धा) सरकारांनी धोरणे बदलली आहेत आणि त्याचे परिणाम दिसू लागलेत.
असो. जरा अवांतरच झालं.

अमितव, काय करणार एका प्रयोगशील शेतकऱ्याची आणि डेयरीवाल्याची नात आहे ना मी त्यामुळे सुबत्तेच्या जुनाट दुधातुपाच्या कल्पनाच डोक्यात येतात Proud

मुकुंद, तुमच्या इथल्या आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी (हा धागा माझा वाचायचा राहून गेला होता) दोन्ही पोस्ट्स मधून खूप चांगली माहिती मिळाली. ह्या विषयावर तुमच्याकडून अधिक वाचायला नक्की आवडेल!

अकु, खरंय! आपल्या सवयी मोडणं हे अवघड असतं आणि सुखाचं तर मुळीच नसतं! शिवाय आपल्या हयातीत न मिळणाऱ्या फायद्यांमुळे बदलण्याचे incentives कमी वाटतात! We are all slaves of instant gratification system!

निकित, मला भांडवलशाही अर्थव्यवस्था (capitalistic economy) अपेक्षित आहे. हे खरं आहे की विस्तार हा मानवी संस्कृतीचा पाया राहिला आहे. पण कोणत्याच मानवी संस्कृतींनी कधी चंगळवादाचा पुरस्कार केलेला नाही. सगळ्या संस्कृती ह्या त्या त्या भौगोलिक प्रदेशाच्या निसर्गाशी एकरूप झालेल्या आहेत. माझ्या मते अमेरिकन संस्कृती देखिल सदैव चंगळवादाकडे झुकलेली नव्हती. ज्या देशात थोरो, रेचल कार्सन सारखे विचारवंत, संशोधक होऊन गेले आणि ज्या देशाने इतक्या प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती मधे प्रगती केली तो देश चंगळवादी म्हणता येणार नाही. एक थियरी अशी आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले आणि अमेरिकन लोकांना अधिकाधिक उपभोगाची आणि खरेदीची सवय लावली गेली. आज Thanksgiving सारखा अर्थपूर्ण सण देखिल बाजारू अर्थव्यवस्थेने hijack केला आहे Sad This is probably the only country where you thank the God for blessing with everything you have one day and then go for shopping to get more stuff the next day!

The idea of monetizing the environmental cost of stuff is great and should be applied! सर्व बाजूंनी प्रयत्न व्हायला हवेत! जेव्हा आपल्या local Walmart store मधे एक made in Cambodia T-shirt $5 ला असतो तेव्हा आपल्याला हा प्रश्न पडतो का की ह्या T-shirt ची किंमत $५ (रु.३००) कशी? त्यासाठी उगवायला लागलेला कापूस, शर्ट बनवण्याचा खर्च, तो कंबोडियाहून इथवर आणण्याचा खर्च, ह्या एसी दुकानाचा, इथल्या कर्मचाऱ्यांचा खर्च ह्या साऱ्याची खरी पर्यावरणीय किंमत लावली तर हा शर्ट कितीला पडेल? These are
invisible environmental costs that somebody else pays when you buy stuff at Walmart or other big departmental stores. People in Cambodia pay it with unhealthy work conditions, abuse of land with cotton plantation, pollution, the Walmart staff pays it with lack of health benefits due to lower income and minimum wages and one day you or your children will also pay it because those pollutants are going to come to you through food/water/air!

हीच गोष्ट खाद्यपदार्थांच्या बाबतीत आहे. cage-free आणि caged eggs च्या किमतीत का फरक आहे? कारण caged eggs ही अत्यंत अनैसर्गिक पद्धतीने मिळवली जातात आणि त्यातून होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानाची कोणतीही किंमत तुम्हाला मोजावी लागत नाही.

आता कंबोडिया आपल्या लोकांसाठी कडक कायदे का बनवत नाही असा प्रश्न विचारू नका! कारण सोपे आहे - तुम्ही खरेदी करता म्हणून! उद्या तुम्ही ठरवा की मी असे कपडे घेणार नाही. This is consumer driven market and if you are able to choose wisely you can drive the industry to run more eco-friendly ways. अर्थात कंबोडिया सरकारने देखिल त्यांचे काम केलेच पाहिजे! जागरुकता तिथेही आलीच पाहिजे.

जेव्हा Apple दर तीन वर्षांनी आपल्या फोनचे charger socket design बदलून आधीचे सगळे chargers obsolete करते आणि लोकं जेव्हा रांगा लावून (त्यात मी पण आहे! एकदा हा गाढवपणा केलाय मी) तो नवीन फोन विकत घेतात तेव्हा ह्या संस्कृतीने आपल्या बुद्धिमत्तेचे कसे दिवाळे काढले आहे ते कळते!

पुन्हा एकदा हे america bashing नव्हे. भारतातल्या लोकांच्या वाईट सवयींवर देखिल भरपूर लिहिण्यासारखे आहे. इथे विषय अमेरिकेतला आहे म्हणून इथली उदाहरणे देत आहे! भारतातली उदाहरणे देखिल पुष्कळ आहेत Sad

Pages