माझा सपशेल उडालेला फज्जा - BRM200

Submitted by limbutimbu on 30 March, 2015 - 06:59

यात सांगण्यासारखे, इथे लिहीण्यासारखे खरे तर काय आहे?
मी एका स्पर्धेत भाग घेतला, व अगदी सुरवातीच्या तासाभरातच मला स्पर्धेतून स्वेच्छेने बाहेर पडावे लागले, यात अभिमानाने सांगण्यासारखे खरे तर काहीही नाही. एका वाक्यात कळवता येते.
तरीही, वैयक्तिक अक्षमतेव्यतिरिक्तची बाहेर पडावे लागण्याची कारणमिमांसा माहित व्हावी म्हणून स्वतःच्याच फजितवड्याबद्दल हा लेखन प्रपंच.

दिनांक २८ मार्च, २०१५ रोजी पुणे युनिव्हर्सिटीच्या मुख्य गेटपासून रात्री ७ वाजता BRM200 या रेसला सुरुवात होणार होती व १३ तासात २०० किमी अंतर कापून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० ला संपणार होती.

ही शर्यत अर्थातच व्यक्तिव्यक्तिंमधिल नसून, व्यक्तिची स्वत:शी व वेळेशी होती. सर्व प्रवास रात्रीचा करायचा होता. व मार्ग पुणे युनिव्हर्सिटी, पाषाण रोडमार्गे देहू-कात्रज बायपासला चांदणी चौकात मिळायचे व पुढे जाऊन नविन कात्रज बोगद्यांमधुन पुढे कापुरहोळ ला पोहोचायचे, तिथे कंट्रोल पॉईंट होता, तिथुन परत फिरुन नविन कात्रज बोगद्यांकडून, कात्रज-देहूरोडबायपासने जाउन, पुढे जुन्या पुणे-मुंबै हायवेने लोणावळा गाठायचे, तिथुन परत फिरुन परत पुण्यात यायचे असा मार्ग होता.

आजवर कधीही मिळालेला नसेल इतका प्रतिसाद या शर्यतीला मिळून मजसारखे काही चूकार हवशेगवशे धरून एकूण ३६ जणांनी सहभाग घेतला, पैकी ३ जणांनी सुरवातच केली नाही, १३ जण क्विट झाले, व २० जणांनी शर्यत पूर्ण केली, पैकी सर्वात प्रथम आलेल्याने जवळपास आठ तासातच हे अंतर कापले.

खरे तर या शर्यतीत भाग घेण्याचे मी योजलेले नव्हते. पण गेले काही महिने या विचारात होतो, व म्हणून माझ्या मुलाची, तो शाळेत असताना वापरायचा, ती सायकल डागडुजी करुन घ्यायला सुरुवात केली होती. दोन महिन्यापूर्वी मुलानेच दोन्ही चाकांना टायरट्यूब बसवुन दिले. मग मी व माझा एक मित्र गिअरच्या शोधात राहिलो, अन् सरतेशेवटी आमच्या इथल्या “रोडसाईड” मेक्यानिककडून मागिल चाकास गिअर बसवून घेतले. मागिल गिअर व्हिल्सच्या रुंदीमुळे पुढील पेडलचे एकेरी चेनव्हील अडचणीचे ठरू लागले, व एकतर मागिल सर्वात लहान व सर्वात मोठ्या गिअरव्हिलवर चेन नेऊ पाहिल्यास चेन पडू लागली, म्हणून मेक्यानिकने ती व्हिल्स लॉक करुन ठेवली (म्हणजे तिथवर चेन जायचीच नाही). सर्वात बारके व्हिल वापरताच येणार नसेल, तर गिअरचा उपयोग काय? असे म्हणुन मी त्याला पुढेही गिअर व्हिल बसवायला सांगितले, ते त्याने बसवले. पण म्हणे त्याच्याकडे शिफ्टर नव्हताच. तर बिना शिफ्टरचे ते वापरू लागलो, पण आता पुढच्या चाकावरुन चेन पडू लागली. सबब, पुढच्या लहान (मध्यम) दात्यांच्या चाकावरुन चेन वापरु लागलो. या गिअरच्या मोठ्या चाकाचे दाते केवळ ४२ होते, तर मला ज्या चाकाचा उपयोग करता येत होता तिचे दाते केवळ ३२ होते. केवळ ३२ दात्यांच्या चक्रामुळे सायकल चालविने साध्या अंतराकरताही वैतागाचे होत होते व अक्षरष: २०/२२ चा वेग घेण्यासाठीदेखिल मेहनत करावी लागत होती. तेव्हा साधारण दोन आठवड्यांपूर्वी पुण्यात जाऊन पुढील बाजुस किमान ४४ वा ४८ दात्यांच्या मोठ्या व्हिलची सोय करण्याकरता शोध मोहिम घेतली, ती फसली. परत एकदा ८ दिवसांपुर्वीच्या शनिवारी पुण्यात गेलो, तर तब्बल तिन वेगवेगळ्या दुकानातुन तिन पार्ट्स खरेदी करावे लागले. ४८चे गिअर व्हील एका ठिकाणाहून, त्याचा खालचा शिफ्टर एका ठिकाणी, तर हॅंडलपासची लिव्हर एका ठिकाणाहून.
हे सर्व आणुन स्वत:च बसवले व पुढील दोनचार दिवस ऑफिसला रोज सायकलने जाऊयेऊ लागलो.
दरम्यान, वरील रेस जाहिर झालेली दिसली, तेव्हा करुन तर बघु, वाईटात वाईट काय होईल ? बाहेर पडावे लागेल.. असा विचार करुन घरात ही गोष्ट बोलल्यावर लिंबीची तत्काळ प्रतिक्रिया होती की “तू घरातला एकमेव कर्ता पुरुष, तुला काही झाले तर बाकिच्यांनी काय करायचे? काही नकोय भाग घ्यायला”……
मी शॉकमधे, पण कसेतरी तिची परवानगि घेण्यामधे यश मिळाले.

या रेसेस् मधे भाग घ्यायचाच म्हणुन मी तिनेक महिन्यांपूर्वीच माझे वेळापत्रक आखले होते नि त्यानुसार मी निगडी ते हिंजवडी/बापुजी देवाची खिंड/ कात्रज-बिबवेवाडी/ कात्रज बोगदा, असे टप्प्याटप्प्याने अंतर वाढवित नेऊन सराव करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात यापैकी एकाही ठिकाणी जाणे शक्य झाले नाही. येऊन जाऊन निगडी ते आळंदी इतकेच एकदा जाणेयेणे झाले. रोजचा ऑफिसला जाण्यायेण्याचा घर ते ऑफिस हा साडेतिन किमीचा टप्पा इतकाच काय तो सराव(?) म्हणे.

रेसच्या नियमाप्रमाणे पुढिल व मागिल दिवे असणे जरुरीचे, तेव्हा ते घ्यायला वेळात वेळ काढून ते बुधवारी विकत आणले. तेव्हाच पंक्चरचे सामानही आणले.

तशात गुरुवारी ऑफिसबाहेर गाडी लावलेली असताना कुणीतरी हॅंडलपासच्या गिअरलिव्हरशी खेळ केला होता त्यामुळे आता चेन मोठ्या व्हिलवर ठरत नव्हती. 

शुक्रवारी एक चंडीयाग घेतलेला, तो सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० दरम्यान पुरा केला, तेव्हा जेवणखाण वगैरे काही झाले नव्हते, होमाचा धूर मात्र भरपूर प्यायला-खाल्ला होता.

त्याच दिवशी संयोजकांचा SMS आला, की तुम्ही whatsapp वर दिसत नाही, दुसरा कॉन्टॅक्ट नंबर द्या. तेव्हा त्यांना कळविले की आता एका android चि सोय करतो व कळवतो. लगेच रात्री १० वाजता मुलिकडे जाऊन तिला दिलेला android तात्पुरता घेतला तो रात्री एक पर्यंत घरी पोहोचलो.

दुसरे दिवशी शनिवार, रेसचा दिवस, पाणी भरणे, चूल पेटवून पाणी तापविणे इत्यादी आन्हिके उरकून, सकाळी १०.३० नंतर सायकल तयार करण्याची सुरुवात केली.

विकतचे दिवे वाटेत पडू शकतात हे इथे वाचलेले असल्याने, स्पेअर दिवे/बॅटरीलाईट बसवले. बाटल्या अडकवायला तारेचे स्टॅन्ड असतात ते बसवले. मधल्या बारवर दोन पर्स लटकवल्या. हे बसविण्याकरताच्या प्लॅस्टिक स्ट्रीप्स व लाल जिलेटीन आदले रात्रीच आणले होते. गाडीची (सायकलची) परिस्थिती बघता यच्चयावत नटबोल्टना बसणारे स्पॅनर्स, स्क्रूड्रायव्हर, पक्कड, पंक्चरचे पाने, ठ्यूब, व्हॉल्वट्यूब, हवा भरायचा भलाथोरला पंप, वगैरे घेतले. हे सामान इतके होते, की मी जर रेसच्या वाटेत सायकल दुरुस्तीचे दुकान टाकून बसलो असतो तरी चालले असते. Proud
त्याचवेळेस सायकलला पुढेमागे लावण्यासाठी वहीच्या पुठ्ठ्यांवर रायडर नंबरची दोन कार्ड्स तयार केली नाईट रिफ्लेक्टीव चिकटपट्टीने. ती लटकवली.

शनिवारी सर्व कामातुन/पाहुण्यांमधुन वेळ काढून एक क्षणभरही झोपता आले नाही. आदले दिवशी चंडीयागामुळे दुपारचे जेवण नाही, रात्री मुलिकडे जाऊन आलो, तेव्हाही जेवण नाही, व आज शनिवारी दुपारी केवळ एक पोळी खाल्लेली. या इतक्याच आहारावर मी दुपारी पावणेपाचला घरुन निघालो अन् वेळेत युनिव्हर्सिटीपाशी पोहोचलो. सोडवायला मुलगा आलेला.

तिथे यथावकाश सर्वजण गोळा झाले. मायबोलीकर केदार जोशीही भेटला. त्याचा पहिला प्रश्न होता, लिम्ब्या सराव काय केला आहेस? मी म्हणले अरे काहीच नाहीरे सराव  मग जमले नाही तर सोडून द्यायचा प्रयत्न या बोलीवर तो विषय संपला.

तिथे माझे कुणि फोटो काढले नाहीत, अगदी मुलानेही सजल्याधजल्या लिम्ब्याचा एकही फोटू काढला नाही, पण बरेच जणांनी माझ्या सायकलचे मात्र फोटो काढले. Proud

रेस सुरु होण्या आधी पाऊस झाला थोडासा, पण मुसळधार पाऊस होईल असे वातावरण होते. सबब, रेस सुरु होताना मी रेनसुटचा वरचा भाग अंगात चढवला. डोईचे हेल्मेट रस्त्यावर मिळते त्यातिल होते. त्यास व्हेन्टिलेशनची सुविधा (भोके असणे) नव्हती, व काल व आजच्या दिवसात मला भोके पाडणे जमले नव्हते. रेसला सुरुवात झाल्यावर मी तसाच निघालो, व पुढे दोन जण चालले होते त्यांना माझ्याही नकळत मीच फॉलो करू लागलो, व माझ्या नैसर्गिक ताकदीच्या कितीतरी पुढे जाऊन सायकल त्यांचेबरोबरीने वेगात दामटली. खरे तर मला श्वासाचा त्रास तेव्हा होत नव्हता, पण अंग घामाने निथळते आहे हे जाणवू लागले. थोड्या वेळाने पुढील सर्वजण दिसेनासे झाले व तोवर माझ्या शिंपीमधे जाम दुखायला लागलो, चढ सुरू झाला होता, तेव्हा श्वासही जोरजोरात होऊ लागला. हेल्मेट नजरेआड येते म्हणुन वर करावे लागायचे, तेव्हा आतिल स्पंजाला बोट लागल्यावर त्यातुन घामाची धार खाली पडू लागली. कपाळावरून ओघळून घाम डोळ्यात जाऊ लागला होता. इथेवर येईस्तोवरच पहिल्या साताठ किमीमधेच माझ्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. चक्कर येऊन तोल जाऊन पडतो की काय असे वाटू लागले. मागिल गिअर बदलायला डावी की उजवी लिव्हर वापरायची हे आठवेना, आठवले तर लिव्हर हाताला सापडेना. शेवटी चांदणी चौकाचा टॉप नजरेत् आला, पण मी इतका बधीर “एक्झॉस्टेड” झालो होतो की चक्क सायकलवरून उतरून तो पन्नास फुटांवरचा टॉप गाठला.

तिथे दम खात थांबलो. मुलाला फोन केला की अरे मला खूप त्रास होतोय. याची अपेक्षा नव्हती. पण त्रास तर होतोय, काय करू? मला नाही वाटत मी पुढे जाऊ शकेन. मुलगा म्हणाला, थोडा दम खा, अन् प्रयत्न करा, नाहीच जमले तर बाहेर पडा अन् मला फोन करा, मी आत्ता निगडीच्या वाटेतच आहे आहे.
मग मी थोडे पाणी प्यायलो, ते पितानाही एकदम पिऊन चालत नव्हते, अजुनच त्रास झाला असता.. अजुनही मला असे का होते आहे याचे कारण कळत नव्हते, कारण श्वास जोरजोरात फुलला तरी तो “दम्याचा” ऍटॅक नव्हता, दमाही नव्हता तेव्हा, पण हातपाय गळून गेले होते. इतकुश्श्या अंतरातच माझे असे का व्हावे याचा विचार करीत मी परत सायकल पुढ चांदणीचौकाच्या उतारावरून बायपासकडे काढली. तिथेन पुढे सिंहगडरोडवरील उड्डाण्णपुलापर्यंत उतार असल्याने झकासपैकी गेलो, मनात वाटले की आपण उगीच घाबरलो, हे काय, हां हां म्हणता पार करू अंतर….

झाले , सिंहगडरोडवरील/कॅनॉलवरील उड्डाण पुल सुरु झाला, अन् मला परत त्यापुलाचा चढही पार करवेना, सर्वात उंचावर जाऊन परत थांबलो, थोडे पाणी प्यायलो. पाणि प्यायचीही भिती वाटत होती कारण एकदम पाणि प्यायल्यास नळ भरु शकतात व पोटात दुखू लागते. शिंपीतील दुखणे आता थांबले होते पण श्वास ताब्यात येत नव्हता. नाकाने श्वास घेऊन तोंडाने भसाभसा सोडीत होतो. परत एकदा जीव धरुन पुढे निघालो. शिंदेवाडीचा पुल लागला, तिथुन उजवीकडे वळण घेऊन नविन कात्रज बोगद्यांकडे जायचे होते. तो पुलही मला निभावेना, त्यावरही थांबायला लागले. अतिशय निराश झालो. परत थोडे पाणी पिऊन तसाच पुढे निघालो तर लक्षात आले की आता तर पुलाच्या उतारावरही मला वेग घेता येत नाही इतका शक्तिपात झालाय. मला असे का होतय काहीही कळत नव्हते. पुढे कात्रज बोगद्याकडचा चढ सुरू झाला. व एका विशिष्ट वेळेस मी सायकल थांबवली. मेंदु कलकलला होता. चक्कर येऊन पडण्यापेक्षा स्वत:च थांबणे हा चांगला उपाय सुचण्याइतकी बुद्धी शाबूत होती.
थांबल्यावर पहिल्यांदा लिंबीला फोन लावला व परिस्थिती सांगितली. सुरवातीला विरोध करणारी लिंबी तेव्हा फोनवर मात्र म्हणाली, की तू घाबरलेला आहेस, थकलेला आहेस, तरीही पंधरावीस मिनिटे अर्धातास विश्रांती घे, अन पुढे हो, तू जाऊ शकशील”. तिच्या म्हणण्यात बरेच तथ्य होते. पण मी त्या मन:स्थितीत नव्हतो, सबब तिला सांगितले की मी क्विट करतोय, मला पुढे जाऊन रिस्क घ्यायची नाही, जरी त्यांचि पिक अप् व्हॅन वगैरे असली तरीही. लिंबी बरे म्हणाली.

मग संयोजकांना फोन करुन सांगितले की मला क्विट करावे लागत आहे, तसदी बद्दल सॉरी, मुलाला बोलावतो आहे, माझे मी मॅनेज करेन.

मग मुलाला फोन करुन सांगितले, तेव्हा तो पिंपरीपाशी ट्रॅफिकजाम मधे अडकला होता. निगडीला घरी जाऊन मग येतो म्हणाला….
यथावकाश दोनअडिच तासांनी मुलगा आला, तोवर मी शिंदेवाडीपुलाचे खाली येऊन उभाच्या उभा. दरम्यान दीडेक लिटर पाणी रिचवले अन मग वाटू लागले की अरे उगीच सोडली, घाई केली सोडण्यात.
लक्षात आले की टेललॅम्प पडून गेलाय.

मग मुलाने सायकल चालवित घरी नेली, त्याचे मागोमाग स्कूटीवरुन मी गेलो.
BRM200 मधिल सहभागाचा माझा पहिलाच प्रयत्न सपशेल फसला होताच, तो देखिल केवळ एक तासाचे आत, वीसेक किमीमधेच. 

नंतर विचार करता यास अनेक बाबी कारणीभूत झाल्या होत्या असे जाणवले, त्या पुढील प्रमाणे.

१. अजिबात सराव न करता / अपुऱ्या सरावानिशी रेसला उतरणे
२. शेवटच्या क्षणापर्यंत सायकलची डागडुजी करावी लागणे व त्यामुळे तिच्याशी वापरण्याबाबत/ हाताळण्याबाबत जवळीक निर्माण झालेली नसणे. अगदि सीटची उंची किती हे देखिल शेवटपर्यंत निश्चित झालेले नव्हते.
३. पावसाळी हवा म्हणुन घातलेले रेनसुटचे जाकिट व व्हेन्टिलेशन नसलेले हेल्मेट महाघातक ठरले. यामुळे अंगात निर्माण होत असलेली उष्णता आतच साठून राहून शरिराने घामाद्वारे त्याचा प्रतिकार केला, व एरवी अगदी क्वचितच घामाघुम होणारा मी त्यावेळेस मात्र नखशिखांत ओला झालो.
४. स्वत:च्या नैसर्गिक कमी गतिने न जाता पुढिल वेगवान एक्स्पर्ट लोकांना फॉलो करणे ही घोडचूक होती. त्यामुळेही एक्झर्शन वाढले.
५. आधिचे तिनचार दिवस अतिश्रम व अपुरा आहार, अगदी रेसच्या दिवशीही आहाराबाबत दुर्लक्ष,
६. रात्रीची रेस असुनही आधिच्या तिनचार दिवसात दिवसाची काय, रात्रीचीही पुरेशी झोप/विश्रांती नाहीच नाही.
७. चाराठ दिवस आधीपासून आईच्या पायावर सूज आलेली, तेव्हा त्या काळजीने मन चिंताग्रस्त, द्विधा मन:स्थितीत.
८. रेसकरता स्वत:स कुठल्याच पद्धतीने शारिरीक/मानसिक दृष्ट्या तयार करू न शकणे, अन् तरीही भाग घेणे.
९. “होय, तू मनात आणलेस तर ही रेस करू शकशील” अशा आशयाचे वाक्य नि:शंकपणे सांगणारी एकही व्यक्ति आजुबाजुला नाही. येऊनजाऊन मुलगा म्हणाला, “करा हो बाबा, जमेल तुम्हाला, नै जमले तर बाहेर पडा!” पण त्यात तितका जोर नव्हता हे त्याला अन् मलाही ठाऊक होते.

तर इतके असताना या प्रयत्नातून साध्य काय झाले? आत्मविश्वास कमावला की गमावला ? होता तो ओव्हरकॉन्फिडन्स होता का? परत सुयोग्य प्रयत्न करणार का?

तर इतके असताना या फसलेल्या प्रयत्नातून साध्य काय झाले?
रेसची, रेसमधिल सहभागी, त्यांच्या सायकली, हत्यारे इत्यादी अनेक बाबींची ओळख जवळून झाली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण किती बारकाईने विचार करुन उतरायला हवे, किती प्लॅनिंग हवे, किती सराव हवा, किती तयारी हवी याचा अंदाज आला. एका चांगल्या ग्रुपबरोबर ओळख झाली. शिवाय केदारजोशीचे प्रत्यक्ष दर्शन झाले.

आत्मविश्वास कमावला की गमावला ?
डिस्अपॉइंट नक्कीच झालो, उदास झालो, पण नाऊमेद नक्कीच नाही झालो. इतक्या कमी अंतरात मी बाहेर पडेन घरच्या कुणालाच अपेक्षित नव्हते. किमान कापुरहोळ करुन तरी येईल असे त्यांनाही वाटत होते.
मी आधी प्रेडिक्ट केले होते की जर मी अमुक वेळेपर्यंत कापुरहोळहून परत वारजे/चांदणीचौकापर्यंत आलो, अन् तेव्हा सुस्थितीत असलो, तरच पुढे जाऊ शकेन.
अन् मी रेस करीनच वा नाही याचा निर्णय बहुधा त्या आधीच शिंदेवाडी ओव्हरब्रीजपर्यंतच कदाचित लागलेला असेल. हेच भविष्य खरे ठरले.

होता तो ओव्हरकॉन्फिडन्स होता का?
माहित नाही, कदाचित असेलही, मला पहिल्या पन्नास किमीची कात्रज चढ धरुन खात्री होती. पण ते शक्य झाले नाही.
सहभाग घेणे हा वेडेपणाही असेल. पण असे वेड लागल्याखेरीज हातुन काहीच होत नाही. यामुळे मी परत परत असे वेडेपणे करीत रहाणार हे नक्की.

परत सुयोग्य प्रयत्न करणार का?
अर्थातच होय. अधिकाधिक तयारी व पूर्वीच्या चूका टाळून परत परत प्रयत्न करणार.

याव्यतिरिक्तही एक गोष्ट साध्य झाली.... अन एक बाप म्हणुन ती साध्य होण्याला अपरिमित महत्व आहे.
काय झाले? की एकुणात त्या दिवशी माझ्या मुलानेच माझ्यापेक्षा जास्त किमी अंतर सायकल चालविली, ते देखिल आधी न ठरविता. त्यामुळे मग तोच म्हणाला, की मी एक सायकल बघितली आहे, ती घेणार अन मीच उतरणार रेसला.
मी त्याला म्हणालो, की अरे मी तरी हे का करतो? माझे बघुन तुम्हाला निदान थोडीजरी इच्छा झालि, अन त्यादृष्टीने तुम्ही प्रयत्न केलेत तर किती चांगले? माझे बघुन तुम्हाला इतके जरी कळले की असाही वेडेपणा करता येतो, व केलाच तर अशाप्रकारचे वेडेपणेच करायचे असतात, तरी खूप झाले.
यामुळे झालय इतकेच, की इथुन पुढे माझ्या साथीला माझा मुलगा असेल. त्याचा मोरल सपोर्ट असेल.

माझा एक मित्र आहे, तो देखिल हेच म्हणाला, की नोव्हे/डिसेम्बरचे सुमारास आपण उतरू. आता पाहुया पुढे काय काय होते ते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परत सुयोग्य प्रयत्न करणार का?
अर्थातच होय. अधिकाधिक तयारी व पूर्वीच्या चूका टाळून परत परत प्रयत्न करणार.

लिंब्या, हेच काय ते खरे महत्वाचे

बाकी सगळे मोहमाया Wink

वाह...मानले तुम्हाला...
तुम्हाला खरेच साष्टांग नमस्कार....
या वयात एवढी सगळी उठाठेव करून बीआरएममध्ये भाग घ्यायचा उत्साह दाखवलात, नव्हे काही अंतर पार केलेत इथेच जिंकलात.

शर्यत पूर्ण झाली नाही, खूप दमायला झाले या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. पण किमान तुम्हाला हे सगळे करून बघावेसे वाटले यासाठीच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.

गियर व्हिलचे वाचून तर थक्क झालो आहे. खरे सांगतो, दुकानात जाऊन रेडीमेड सायकल आणण्यापेक्षा तुमच्या प्रयत्नात जास्त धमाल आहे.

मला या सायकलचा फोटो बघायचाच आहे.

लिंब्या.. पुढच्या वेळेस अजून जोरात प्रयत्न कर..

सगळेच केदार जोशी नसतात.. पहिल्या प्रयत्नातच सगळ्या बीआरएम करायला.. Happy

आणि स्पेशल सायकलाचा फोटो पाहिजेच..

लिम्ब्या ब्रावो. एकच कर पुढच्या वेळच्या आधी. एखाद्या स्पोर्ट इन्स्ट्रक्टरचा /कोचचा सल्ला घे... असा एपिसोड काळजीपूर्वक मॅनेज करायचा असतो म्हणजे वार्म अप आणि आधल्या दिवशीचे विशिष्ट घतकांचा पुरवठा करणारा आहार (तो घरगुतीही असू शकतो), स्पर्धेआधीचे डा एट , ज्यामुळे स्नायूं ना एनर्जी मिळते . यावयात प्लॅनिंग महत्वाचे....

पण तुझ्या लाईफमधे 'करून पाहणे ' ही गोष्ट फारच अमूल्य आहे आणि तीच तुझी एनर्जी आहे.

लेख लई म्हंजे लैच आवडला

लिंब्या.. पुढच्या वेळेस अजून जोरात प्रयत्न कर.. >>+१११
"असा विचार करुन घरात ही गोष्ट बोलल्यावर लिंबीची तत्काळ प्रतिक्रिया होती की “तू घरातला एकमेव कर्ता पुरुष, तुला काही झाले तर बाकिच्यांनी काय करायचे? काही नकोय भाग घ्यायला”……"

लिंब्याजी राग नका मानु..पण हे वाचुन कोलंबसाचा जोक आठवला.. Proud

तुझे गिअर्सचे प्रयत्न वाचून मी ही थक्क झालो आहे ! मी सरळ दुसरी सायकल घेतली असती.

पुढच्या वेळी बी आर एम मध्ये चालवायला माझी दुसरी सायकल घेऊन जा. ती देखील खूप जबरी आहे.

शिवाय केदारजोशीचे प्रत्यक्ष दर्शन झाले. >> अरे दर्शन काय भाऊ. तुझी अन माझी भेट आधीही झाली होती. तू त्या गटग मध्ये सर्वांना घरचे तांदूळ दिले होते. त्यामुळे मी तुला हाक मारली.

मी तुला विचारले तेंव्हाच मला वाटले की तू कात्रज पर्यंत देखील येऊ शकशील की नाही. जेवढे अंतर जायचे आहे त्याच्या निदान अर्धे ते २/३ आपण आधी गेलेलो असलो तरच असे टाईम ईव्हेंट पूर्ण करता येतात.

विद्यापिठानंतर बावधन मार्गे चांदणी चौकात जायला पाषान सर्कल नंतर ४.५ किमी सगळा चढच आहे. त्यामुळे तिथेच दमायला होते.

BRM ह्या एन्डुरंस राईड असतात, १ तास सायकल चालवणे वेगळे अन अगदी कमी स्पीड मध्येही १२ तास सायकल चालवणे वेगळे. टोटल डिफरंट बॉल गेम. शारिरीक तयारी अन मानसिक तयारी हवी. प्रत्येक BRM वेगळी असते, आणि तिचे चॅलेंजेस वेगळे असतात. भलभले अगदी सुपर रॅन्डो लोकांना देखील रिसेट होऊन परत शून्यापासून मानसिक तयारी करावी लागते.

माझ्यामते तुला नडलेल्या गोष्टी.

१. सायकल चांगली नसणे. पण ही मायनर.
२. सायकलीचा सराव नसणे. ही आणि हीच मेजर.
३. तुझ्या एका फोटोत सायकल पाहिली, तिच्या सीटच्या अँगल ( समोरची बाजू) हा खूप वर आहे. त्यामुळे जांघेत दुखायला सुरू होते. Perineal nerve तात्पुरती डॅमेज होऊन जेनेटील एरिया मध्ये नम्बनेस येतो. आणि त्यामुळेच शिंपीमध्ये दुखायला सुरू झाले असावे.

बाकी तू जे १ ते ९ लिहिले आहेस ते आहेतच.

तर पुढच्या राईड आधी शरीराला सायकलीची सवय लावणे आवश्यक आहे. त्यासाठी खूप सारा सराव करणे भाग आहे. मग शरीरासोबत मानसिक तयारीही आपोआप होत जाते.

हवे असल्यास मी इथे सेंच्युरी प्लान देईल तो नियमाने पाळला तर १०० किमी + राईड सहज होतील.

बायदवे, तू आणि मी बोलत असताना एक गृहस्थ मला येऊन म्हणाले की, तू खूप फास्ट जातोस, ह्यावेळी बरोबर जाणार का? ते आठवतात का? तर तेच श्री ठिपसे. त्यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी सायकलींगला सुरूवात केली. गेली तीन वर्षे सायकल चालवत आहेत.

ह्यावेळी मलाही अनेक अनुभव नविन आले. लेखच होईल. पण लोकं बोअर होतील, माझे सायकलचे लेख वाचून. Happy

लिम्बु भाउ, दम्याचा त्रास असुनही इतक्या अंतरावरच्या स्पर्धेत भाग घेण्याचा विचार तुच करु शकतोस.
_/\_

हिम्सच्या दोन्ही पोस्टींना +१

लिंबू, प्रयत्न करत रहा. पुढल्या वेळेला भरपूर सराव करून शर्यतीत उतर. Happy

त्या सायकलीचा फोटो मलाही पहायचाच आहे.

लिंबूभाऊ.. तुमच्या निरागस पण प्रामाणिक प्रयत्नांचे खरच अप्रुप वाटले.
काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, असं नुसतंच वाटत रहाणार्‍या आमच्या सारख्यांसाठी केदार, आशू बरोबर तुमचा ही लेख प्रेरणादायी नक्कीच आहे Happy

केदार काही बोअर वगैरे होत नाही ... अगदी आवर्जून टाक तुझे लेख.... इथे बोअर होणारे पांचट लेखन खूप वाढले आहे त्र्वढीच तुमची सुखद झुळूक

तुम्ही देखील निगडीकर का? भेटा की मग एकदा सवडीने. मी देखील एके काळचा पट्टीचा सायकलस्वार आहे. काही टिप्स नक्कीच देऊ शकेल.

परत सुयोग्य प्रयत्न करणार का?
अर्थातच होय. अधिकाधिक तयारी व पूर्वीच्या चूका टाळून परत परत प्रयत्न करणार. >> हे महत्त्वाचे आहे!

केदारनी सुचना दिल्याच आहेत आणि तो नीट मार्गदर्शन करायला उत्तम आहे. फक्त हेच सांगावेसे वाटते की कुठलीही एंड्युरन्सची स्पर्धा करताना सराव आणि नीट आहार खूप महत्वाचा आहे. ते जर बरोबर झाले तर मग बाकीचे स्पर्धेच्या दिवशी २५% च करायचे राहते.

पुढील स्पर्धेला आणि त्यावरील लेखाला शुभेच्छा ! (सायकलचे फोटो पण टाका की इथे Wink )

रेस पूर्ण झाली नाही तरी प्रयत्न केल्याबद्दल अभिनंदन Happy
सायकलचा फोटो टाक.

केदार, लेखासाठी तुझ्यासमोर लाप्या वाजवाव्या लागतील असं वाटलं नव्हतं हा ! Proud

बाकी रॉहू आज इतक्या नॉर्मल पोस्ट कसे काय लिहित आहेत.. Wink Light 1

Limbu,
You tried honestly, accepted your mistakes and shortfalls! You are ready to correct them.

YOU ARE A WINNER ALREADY!!

You will certainly do well in the next one! just take small steps and practice regularly! Good Luck!

लिंबू
तुम्ही भाग घेतलात, आणि नंतर आलेल्या अपयशाबद्दल योग्य ते इन्ट्रॉस्पेक्शन केलंत.
पुढील वेळी नक्की या सर्व गोष्टींवर मात करालच!
शुभेच्छा!..............हो आणि सायकलचा फोटो पहायला नक्कीच आवडेल.

ब्राव्हो!

तुम्हाला आता याची गरज नाही, पण जर तुम्ही यातून नाउमेद झाला असता तर तुम्हाला एक गोष्ट कायम ध्यानात ठेवायला सांगितली असती, ती म्हणजे, अरे त्या ऋन्मेषला सायकल साधी चालवताही येत नाही, तर त्यामानाने मी एका सायकलस्पर्धेत सहभाग नोंदवला.... आणि हो, हा तुमचा लेख वाचून मलाही "मी सायकल का चालवत नाही" किंवा "का चालवू शकलो नाही" यावर लेख लिहायची खुमखुमी आलीय Wink

बाकी रॉहू आज इतक्या नॉर्मल पोस्ट कसे काय लिहित आहेत.. डोळा मारा दिवा घ्या

>>

अरे बाबानो हा लिम्ब्या आणि मी मायबोलीचे आद्य मेंब्रं आहोत. तो अगदी सुरुवातीस 'वाकड्या 'आय डीने लिहीत असे...प्रत्यक्षही भेट झाली आहे . अतिशय दिलदार माणूस आहे तो. त्याची माझी धार्मिक मते जुळत नसली तरी मतभेद आणि मनभेद यात आम्ही फरक करतो....
मनाने तरुण सतत नव्याच्या शोधात त्याची अनेक व्यवधानं सांभाळून सतत काहीतरी 'भानगडी ' करत राहण्याची वृत्ती मला जाम आवडते....

कौन कहता है की आसमानमे सुराग नही हो सकता..
एक पत्थर तो तबियतसे उछालो यारों.....

वॉव.. लिंबूटिंबू, तुमच्या धडपडीचे व पॉझिटीव्हीटीचे कौतुक वाटले!!
पुढच्या वेळेस सराव करून, पूर्ण तयारीने नक्की भाग घ्या! शुभेच्छा!!

लेख फार आवडला पण शीर्षक पटले नाही. फज्जा? माझा पहिला प्रयत्न असे काही पॉझिटिव्ह हवे होते. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत धड गियर ची सायकल नसताना हे यश कमी नाही.

साईना नेहवाल, सानिया मिर्झा, केदार जोशी, विश्वनाथन आनंद यांनाही सुरुवातीला अपयश आले असेलच.

लिम्ब्या, उपकरण आणि शिस्तबद्ध सराव या बाबत आपण भारतीय जरा जुगाड मेन्टॅलिटीत जातो.
मी पळायला सुरुवात केली मागल्या वर्षी तेव्हा लक्षात आले की फ्रान्समध्ये तसेच इतर सर्व पाश्चिमात्य देशात पळणे हा छंद किती गंभीरपणे घेतात. त्याचे वेळापत्रक बनवतात, कशा प्रकारे व्यायाम व सराव केला म्हणजे सर्वोत्तम रिझल्ट येतील, तसाच सराव का करायचा वगैरे वगैरे.
आता भारतातसुद्धा हे सायकलवीर तसेच अनेक मॅराथॉन पळणारे हौशी लोक हे गंभीरतेने करत आहेत.
तेव्हा पुढल्या वेळी आत्ता आहे त्यापेक्षा चांगले उपकरण शक्य झाले तर पैदा कर आणि सराव कर. २०० किमी शक्य आहे, बेष्ट आफ लक!

फज्जा उडाला असे समजू नका.. सुरूवातीला अडचणी येणारच असे समजून प्रयत्न करीत रहा.

पुढच्या सायकलचालीस शुभेच्छा!!

(मी यावेळच्या BRM ला तुम्हाला सर्वांना युनिवर्सिटीजवळ बाय बाय केल्यानंतर कापूरहोळ कंट्रोल पॉईंटावर होतो..)

Pages