मुळ्याचा चटका (आमच्या पद्धतीने)

Submitted by मानुषी on 28 March, 2015 - 04:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कोवळे मुळे: दोन, दोन चमचे हरभरा डाळ(भिजत घालण्यासाठी), १ हिरवी मिरची, अर्धा चमचा दाण्याचे कूट, दोन चमचे घट्ट दही, फोडणीसाठी : तेल, मोहोरी, हिंग, १ सुकी मिरची, कढिलिंबाची ३/४ पाने. वरून पेरायला बारीक चिरलेली कोथिंबीर(ऑप्शनल) चवीपुरते मीठ साखर.

क्रमवार पाककृती: 

सर्वात आधी हरभरा डाळ भिजत घाला. चटका करण्यापूर्वी २ तास डाळ भिजली पाहिजे.
मग फोडणी करून ठेवा. १ चमचा तेल तापल्यावर त्यात मोहोरी, हिंग, सुकी मिरची, कढीलिंबाची ३/४ पाने टाकून गॅस बंद करा.
मग मुळा किसून घ्या. त्यानंतर भिजवलेल्या हरभरा डाळीतले पाणी काढून टाकून ती एका हिरव्या मिरचीबरोबर मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
मग किसलेल्या मुळ्यात वाटलेली डाळ,आधी केलेली फोडणी, दही, मीठ, साखर, दाण्याचे कूट घालून नीट ढवळून घ्या. वरून कोथिंबीर पेरा.

अधिक टिपा: 

कोवळ्या मुळ्याला पाणी सुटेल पण दाण्याचे कूट आणि वाटलेली हरभरा डाळ यामुळे सगळे पाणी शोषले जाते.
तरीही उग्र वास आवडत नसल्यास मुळा थोडा पिळून पाणी काढू शकता.र
हरभरा डाळीचे वाटण घट्ट झाकणाच्या डब्यात फ्रिजमधे छान रहाते. म्हणजे थोडे जास्तीचे वाटण करून ठेवले तरी नंतर वापरता येते.
ही खरी कोशिंबीरच पण चटकदार असल्याने चटका.

माहितीचा स्रोत: 
आई हा चटका नेहेमीच करायची. माझ्या मते हा अगदी पारंपारिक पदार्थ आहे.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आणि सोप्पी आहे पाककृती.

रच्याकने, आज मुळ्याचा चटका नावाने दोन पाककृती आल्या पण दोन्ही लेखिकांनी फोटो काही टाकले नाही. ये ना चॉलबे:दिवा:

स्स्स्स्स्स........ आई अश्शीच करत असे.. मस्त गं मानुषी.. आठवण करून दिलीस या भूल्याबिसर्‍या रेसिपी ची Happy

मस्त आहे. मी दही आणि दाण्याचे कुट नाही घालत. लिंबू पिळते.

बाकी सेम अशीच करते.

मला माहेरी हा प्रकार माहिती नव्हता. पुण्याला नणंदेकडे शिकले.

छान आहे तूमचाही प्रकार .. मला वाटतं लालूने श्वेतांबरी या नावाने आणखी एक प्रकार लिहिला होता.

आमचीही हीच पद्धत. फक्त दाण्याचे कूट वगळून. ह. डाळ आहेच ना, परत कूट नको Happy फोडणीत जिरंही घालतो, मस्त लागतं.
गार, उत्तम विरजणाचं, अधमुरं दहीही घालतात कधीकधी या चटक्यात. तसाही ऑसम लागतो. उन्हाळ्यातल्या संध्याकाळी तर आणखीनच छान.