"डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक" परिक्षेचा अभ्यास कसा करवून घ्यावा ?

Submitted by विनार्च on 9 November, 2013 - 04:44

माझी लेक चौथीला असताना, स्कॉलशीपच्या अभ्यासासाठी जो धागा मी काढला होता त्यावरचे प्रतिसाद मला अभ्यास करवून घेताना फारच उपयोगी पडले होते म्हणून हा धागा काढते आहे.
सहावीत दिल्या जाणार्‍या "डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक" परिक्षेचा अभ्यास कसा करवून घ्यावा ?
मी बाजारात मिळाली ती दोन पुस्तकं आणली आहेत पण त्यात फक्त प्रश्नपत्रीकाच आहेत. पहिली ते सहावीची विज्ञानाची पुस्तके वाचावीत असा सल्ला त्यात दिला आहे. तितकच पुरेसं आहे का?
पहिली परिक्षा पार केल्या नंतर पुढील पायर्‍यांसाठी काय तयारी करावी लागेल ?
ज्यांना ह्या परिक्षेबद्द्ल माहीत आहे किंवा ज्यांच्या मुलांनी ही परीक्षा दिली आहे त्यांनी प्लीज मदत करा.
माझी लेक आता पाचवीला आहे आणि विज्ञान विषयाची तिला खूप आवड आहे. सध्या ती डॉ. बाळ फोंडके यांची "कोण?" "का?" "कसं?" ही पुस्तक वाचतेय......असं तिच बरच आवांतर वाचन सुरुच असत...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा अनन्या!! तुझं खूप खूप अभिनंदन! तुझी इतर विषयांमधलीही आवड आणि प्रगती मायबोलीवर वेळोवेळी पाहिली आहे. खूप कौतुक वाटलं. तुला पुढच्या सर्व गोष्टींकरता शुभेच्छा! Happy

संतोष सराफ, स्वरांगीचंही खूप अभिनंदन!!

संतोष सराफ, सॉरी हं तुमच्या मुलीचं यश नजरेतुन सुटलं माझ्या . आत्ता वाचलं
तिचे आणि तुमचे ही मनापासून अभिनंदन !! आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!

धन्यवाद सर्वांना.
तुमच्या प्रतिक्रियांनी हुरूप आला म्हणून आणि इथे रेकॉर्ड देखील असावे आणि लोकांना उपयोगी पडावे म्हणून प्रकल्पाबद्दल थोडेसे:-
-प्रकल्प विषय नेहमी पर्यावरण, सामाजिक समस्या यांविषयी असतो.
-प्रकल्पाची आखणी करण्यासाठी MSTA या वेबसाईट वर लक्ष ठेऊन रहाणे गरजेचे असते. वर्षाच्या सुरुवातीलाच प्रकल्पाचा विषय जाहीर होतो.
- विषय खूप व्यापक असतो. ताजा असतो आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या परिसरातच आपल्याला जाणवणाऱ्या समस्येसंदर्भात या विषयाच्या अनुषंगाने काम करायचे असते.
-मूळ विषय जरी व्यापक असला, तरी त्याचा अगदी एखादा पदर किंवा छोटा भाग आपल्याला पुरेसा होतो. कारण प्रकल्प करणारी मुले छोटी असतात. त्यांचा आवाका पाहूनच आपल्या परिसरातील एखादी समस्या निवडावी. म्हणजे उदाहरणार्थ- विषय आहे 'प्रदूषणावर शाश्वत उपाय', तर एखाद्या विद्यार्थ्याच्या आसपास एखादे तळे असेल, त्यात गणपती विसर्जन होत असेल, त्यामुळे तळ्यात होणारे जलप्रदूषण, त्याचा निसर्गावर, आजूबाजूच्या लोकसंख्येवर होणारा परिणाम, पिकांचे नुकसान, पिण्याचे पाणी दुषित होणे, पक्षी स्थलांतरावर होणारा परिणाम… ही झाली समस्या. आपण निवडलेली.

आणि मग या समस्येवर एखादा भन्नाट उपाय, कृत्रिम तात्पुरते पर्यायी तळे निर्मिती, लोकजागृती, शाडू किंवा POP टाळून माती वापरणे किंवा अगदी थेट रसायन शास्त्राचा अथवा जीवशास्त्राचा इंटेलिजन्स वापरून समस्येवर मात करणारे मॉडेल बनवणे…. अश्या प्रकारचा एखादा उपाय घेऊन प्रकल्प करावा. त्यात विद्यार्थ्याच कल जो असेल त्याप्रमाणे उपाय योजना घ्यावी. एखादे मूल सर्व्हे करण्यात पटाईत असते तर एखादे जीवशास्त्रात. एखाद्याला पक्षी निरीक्षण चांगले करता येऊ शकेल किंवा त्यांच्यातले बदल नोंदवू शकेल कोणी… त्यामुळे आपापल्या पद्धतीने समस्येवर उत्तर शोधावे. (मी तर स्वरांगी सहावीत असताना 'शाश्वत अन्नव्यवस्था' या विषयावर फायबर ऑप्टिक चा वापर केलेला आहे आणि सूर्यप्रकाश चक्क वाहून नेलेला आहे. आता तुम्ही म्हणाल,या दोन विषयांचा एकमेकांशी काय संबंध? पण तो संबंध जोडूनच समस्येचे उत्तम निराकरण केले गेले. त्यामुळे तुमच्या आणि तुमच्या पाल्याच्या आवडत्या क्षेत्रात समस्येचे उत्तर असतेच असते. ते शोधायचे असते इतकेच.)

पण हे सगळे करणार कधी? प्रकल्प तयार करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. - म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षेचा निकाल लागल्यावर जेंव्हा आपल्याला आपण पुढच्या पातळीवर निवडले गेलो आहोत किंवा कसे ते कळते. आणि मग त्यानंतर केवळ पंधरा दिवसात प्रकल्प सादर करावयाचा असतो.
त्यामुळे निवड होवो किंवा न होवो; प्रकल्पाचे विषय आधीपासून डोक्यात घोळवत ठेवा. त्याने नुकसान होत नाही. झाला तर फायदाच होतो.

प्रकल्प कोणी करावा? जमेल तितक्यांनी. त्या विद्यार्थ्याने स्वत: तर करावाच, पण त्याच्या पालकांनी, आज्जी आजोबांनी, भावंडांनी आणि सवंगड्यांनी देखील त्याला साथ द्यावी. शिक्षकांना बरोबर घ्यावे. जवळपास असलेल्या कृषी संशोधन वगैरे असल्या संस्थांची मदत घ्यावी. तिथे भेट द्यावी. मुलाखत घ्यावी. हे सर्व पाल्य करत असताना पालकांनी फोटो आवर्जून घ्यावेत. प्रकल्पात लावायला कामी येतात.

परंतु प्रकल्प संपूर्णपणे कॅप्टनशिप प्रमाणे पार पाडणे हे त्या विद्यार्थ्याचेच काम होय. प्रकल्पाचा मूळ हेतू, तत्व, बनवलेले मॉडेल , मुलाखती…. हे सर्व त्याचे त्यानेच करायचे आहे. अन्यथा प्रकल्पाच्या मुलाखतीत विद्यार्थ्याला तत्वाच्या अनुषंगाने विषयाची खोली कळली नसेल तर मार्क्स वर परिणाम होतो.
प्रकल्पाचे सादरीकरण करताना साधेपणा आणि कल्पकता महत्वाची असते.
आणि शिवाय हे सर्व मी सांगण्याच्या आधी त्यांच्या हँडआउट मध्ये फार छान विशद केलेले तुम्हाला आढळेल. त्यामुळे MSTA वर सतत जात येत रहा. (अर्थात व्हर्च्युअली)…

प्रकल्पाच्या विषयावर देखील विद्यार्थ्याशी सतत आणि सखोल चर्चा आवश्यक असते. प्रकल्पाच्या विषयासंबंधी, तुम्ही मागोवा घेतलेल्या तत्वाविषयी सर्फ करा आणि विपुल माहिती गोळा करा. लक्षात ठेवा, जगभरात प्रत्येक समस्येवर प्रचंड काम चालू असते. त्या सर्वांचे संदर्भ वापरणे प्रकल्पाची शोभा वाढवते. इंटरन्याशनल स्टँडर्ड्स माहित असणे आणि त्याचा वापर करून घेणे यासारखी स्पेशल गोष्ट अन्य नाही.

प्रकल्पात आलेख, चित्रे, फ्लो चार्ट यांना अनन्यसाधारण महत्व असते. गणिताने, सांख्यिकीने आकडेवारीची पद्धत सादरीकरणात डौल आणते. परीक्षकाला विषय समजाउन घ्यायला मदत करते.

प्रकल्पाची मुलाखत घेणारी मंडळी मोठी मोठी तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ असण्याची शक्यता असते. त्यामुळे विषयाची मांडणी आणि त्याहीपलीकडे साधेपणाने विद्यार्थ्याचे प्रामाणिक प्रयत्न आणि विषयाच्या खोलात जाउन प्रकल्प पुरा करण्याची तळमळ त्यांना भावते. पाल्याला बरोब्बर तसेच तयार करा. विषयाच्या फंडामेंटल कडे पाल्याला सतत आणा. त्याला विषयाच्या खोलीत जाण्याची सवय लागली की तो मुलाखतीत देखील असाच खोलवर पोहोचू शकतो.

… बाकी जनरल मुलाखतीबद्दल देखील लिहेन मी. पण मंडळी बोअर होत नसेल तर….

सुंदर!
बोअर काय, आम्ही तर उत्सुक आहोत पुढे अजून जाणून घ्यायला.
तुम्ही अगदी इत्यंभूत लिहा.

अनन्या, विनार्च, स्वरांगी, संतोष सराफ तुमचे खूप अभिनंदन! अनन्या आणि स्वरांगी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

प्रतिक्रीयांबद्दल खूपच धन्यवाद.
आत्तापर्यंत आपण ज्या पोस्ट्स वाचल्या असतील किंवा मी दिलेली माहिती पाहिली असेल त्यावरून मंडळींच्या हे लक्षात आले असेल की सुरुवातीपासूनच ही परीक्षा भरपूर आव्हानात्मक आणि तरीही मुलांना हवीहवीशी असते. यात गुण मिळवणे म्हणजे आपली माहिती आणि बुद्धिमत्ता देखील पणाला लावणे असते. इथे अनन्याने लेखी परीक्षेत जे ७२ गुण मिळवले आहेत ते म्हणजे प्रचंड यश होय.
त्यामुळेच या परीक्षेत कमी मार्क्स मिळवलेल्यांनी अजिबात खट्टू होऊ नये. एक तर काहीतरी नवे शिकल्याचा आनंद आणि पुढच्या वर्गात शिक्षणासाठी येणाऱ्या विज्ञान विषयाच्या दृष्टीने आपसूकच झालेला अभ्यास अश्या दोन उपलब्धी या दृष्टीने या लेखी परीक्षेकडे विद्यार्थ्याने पाहिले पाहिजे.
त्यामुळेच ज्याप्रमाणे जुन्या काळी सामान्य घरांत स्कॉलरशिपला बसणे काहीसे अनिवार्य होते त्याप्रमाणेच या परीक्षांना पाल्यांना बसवावेच. कारण यामुळे पुढच्या शालेय परीक्षा सुकर होतात. (अगदी मेडिकल, इंजिनियरिंग प्रवेशापर्यंत... मूल पुढे काय करियर करणार आहे हे आपल्याला आधीच माहिती नसते. त्यामुळे या परीक्षेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचा कल देखील कळतो. मूल विज्ञान शाखेसाठी योग्य असेल, संशोधक बनण्यास त्याच्या अंगी गुण असतील तर या स्पर्धा परीक्षेला सामोरे गेल्याने त्याच्या पुढच्या वाटचालीचा जणू पायाच रचला जातो. शिवाय व्यक्तिमत्व विकास होतो तो वेगळाच. आणि अन्यथा पुढे जाउन इतर शाखेत चमकणारी मुले देखील पूर्वाश्रमीची होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेची पदक विजेती असू शकतात. आहेत. )
मुले परीक्षार्थी न रहाता ज्ञानपिपासू बनण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा परीक्षा एक योग्य पाउल आहे.

प्रात्यक्षिक परीक्षांचा निकाल लागल्यावर पुढे दोन टास्क असतात. एक म्हणजे प्रकल्प तयार करणे आणि दुसरे म्हणजे जनरल मुलाखतीची तयारी. पैकी प्रकल्पाबद्दल आधी बऱ्यापैकी सांगितले आहेच; पण मुलाखतीविषयी सांगायचे म्हणजे या चिमुरड्या मुलांच्या आयुष्यात एक अत्यंत स्वाभिमानाची अशी गोष्ट असते ती या मुलाखतीला सामोरे जाण्याची.

'बालवैज्ञानिक' ही अशी एकमेव स्पर्धा परीक्षा असावी, जिथे मुलाखतीत मुलाला काय येते हे पाहिले जाते. काय येत नाही हे महत्वाचे नव्हे. या आजूबाजूला पसरलेल्या प्रचंड ज्ञानसागरात मनुष्याच्या एका छोट्या पोराच्या इवल्याश्या मेंदूत कितपत ज्ञानाचा साठा असणार? किती मावू शकणार? त्यामुळे विद्यार्थ्याला आपल्याला काय येत नाही याची फिकीर नको. काय येते त्याचा अभिमान बाळगून प्रामाणिकपणे त्याने मुलाखतीस सामोरे जावे.

मुलाखतकार छोट्या सहावीच्या विद्यार्थ्यांकडून त्यांचा आवडीचा विषय किंवा त्यांची एक्स्पर्टसी कशात आहे हे तपासण्याच्या खटपटीत असतात. त्यांना त्यात ताबडतोब यश मिळून तुमच्या पाल्याची मुलाखत यशस्वी व्हावी म्हणून एक गोष्ट जरूर करावी. मुलाला मुलाखतीसाठी अजिबात फॅब्रिकेट करू नये. त्याला त्याचा आवडता विषय कोणता हे तुम्ही सांगू नका. गाणे आवडणाऱ्या मुलाने 'गाणे आवडते' सांगितल्यावर विज्ञानाचे आणि पर्यायाने मुलाचे देखील काहीही नुकसान होत नसते.

मुलाखतकार केवळ या शोधात असतात कि मूल ज्या विषयाची आवड बाळगून आहे, रुची बाळगून आहे, त्यात ते कितपत पारंगत आहे. किती रस घेते आहे. त्या विषयाच्या अंतरंगात किती सखोल ज्ञान अद्याप विद्यार्थ्याला प्राप्त झाले आहे.

उदाहरणादाखल सांगतो, सहावीच्या मुलाखतीत स्वरांगीने आधी भौतिक शास्त्रात रुची दाखवली होती. त्यानंतर त्यांनी तिला 'पुली- कप्पी' कुठे पाहिली आहेस असे विचारले. तिने सांगितले, टेनिस कोर्ट मध्ये. मध्यभागी जिथे नेटची रोप करकचून आवळलेली असते तिथे त्या खाम्बांपाशी.
यावरून मुलाखतकारांना तिचा आवडता खेळ देखील समजला. मग त्यानंतरचे त्यांचे प्रश्न जरी विज्ञानाचे असले तरी ते सगळे प्रश्न टेनिस या खेळाला धरून होते. चेंडूचा बाउन्स, त्याची तन्यता, शरीरात होणारे जीवशास्त्रीय बदल, खेळताना शरीर काय कंझ्युम करते… वगैरे. अर्थात मुलाखत घेणाऱ्यांची भाषा अशी असते की विद्यार्थ्याला सहसा त्याच्याकडून कोणती वैज्ञानिक माहिती काढून घेतली आहे ते कळत नाही; पण मुलाखत घेणार्यांना मुलाचा वैज्ञानिक दृष्टीकोन सहज कळतो. त्याच्या आवडीच्या विषयात मूल खुलते. भरपूर बोलते. हेच मुलाकडून अपेक्षित असते.

परंतु काही मुले बुजरी असतात. लवकर खुलून बोलत नाहीत. पण म्हणून त्यांच्या पालकांनी काळजी करू नये. मुलाखत घेणारे मुलांकडून माहिती काढून घेण्यात एक्स्पर्ट असतात असा माझा अनुभव आहे. किंबहुना कधीकधी अगदी पाच मिनिटांत बाहेर येणाऱ्या मुलाकडून त्यांचे संपूर्ण समाधान झालेले असते आणि एखाद्या विषयाची अगदी सखोल जाण मुलाने विशद केलेली असते.

पण मंडळी, यासाठी मुलाच्या पालकांनी मुलाला क्वालिटी टाईम देणे फार गरजेचे आहे. तुमचे फिल्ड कोणतेही असो. त्यावर मुलाशी भरभरून बोला. तुमच्या आयुष्यात तुम्हाला येणाऱ्या रोजच्या आव्हानांचा मुकाबला तुम्ही कसा करता हे त्याच्याबरोबर शेयर करा. गृहिणी असाल, तर तुम्हाला येणारी आव्हाने मुलांच्या डोळ्यासमोर असतात.(उदा,: अचानक पाहुणे येणे, झटपट भाज्या चिरण्याची कला आत्मसात करणे, पोळी बरोब्बर गोल लाटता येणे-एक शंका- गव्हाच्या कणकेची पोळी का लाटली जाते? कणकेत असा कोणता गुण आहे? आणि मग ज्वारीच्या पिठाची पोळी लाटून पाहिली तर??) त्या आव्हानांचा फडशा पाडताना मुलाला त्यात सामील करून घ्या. त्याच्या निर्णय-क्षमतेला मान द्या. सहकारी असल्याप्रमाणे त्याच्याशी चर्चा करा. ….पण…. पण… स्वत:चे वय विसरून! हो! प्रसंग अजिबात गंभीर होता कामा नये. खळखळून हसत, मजेत त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या गप्पा ऐकत, त्याला प्रतिसाद देत… अन्यथा मैफिल रंगणार नाही.

हे असे पर्सनल रिस्पेक्ट समजलेले मूल ना ओव्हर कॉनफीडंट असते ना अवघडलेले असते.

अजून एक- सांघिक खेळ भरपूर खेळणारे मूल नियमांचे काटेकोर पालन करणारे असते. शिस्तबद्ध असते. त्यामुळे सांघिक खेळ खूप खेळणारी मुले मुलाखतीत यशस्वी होण्याची शक्यता वाढते.

अपोआप ही गोष्ट आपल्याला अधोरेखित झालेलीच असेल की या परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर घोकंपट्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला वाव नाही. वैज्ञानिक नियम रटून घेतल्याचा कोणताही फायदा तुमच्या पाल्याला मिळणार नाही. त्यामुळे परीक्षा हॉल मध्ये किंवा मुलाखतीस जाताना शेवटच्या क्षणापर्यंत घोकत रहाणारी, पुस्तकात डोके घातलेली मुले इथे यशस्वी होण्याची शक्यता जरा कमीच असते. स्वच्छंदी, बागडणारी आणि तरीही ज्ञानपिपासू, समंजस, समाजाभिमुख, हळवी आणि सोल्युशन प्रोव्हाईडर वृत्तीची मुले या प्रकारात हमखास यशस्वी होतात. आणि मग त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांना करीयरच्या अनेक संधी खुल्या असतात.

संतोष सराफ, तुमच्या सर्वच पोस्ट्स खूप सुंदर आहेत अगदी परीक्षेचा अभ्यास हा मुद्दा बाजूला ठेवला तरी पाल्याच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी देखील खूप सुंदर पोस्ट्स

इथे लिहिल्यब्द्दल धन्यवाद .

स्वरांगीचे अभिनंदन. Happy

संतोष सराफ, उत्तम पोस्ट! फार छान पद्धतीने माहिती देत आहात.

>> परीक्षेचा अभ्यास हा मुद्दा बाजूला ठेवला तरी पाल्याच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी देखील खूप सुंदर पोस्ट्स
>> +१

परीक्षा हॉल मध्ये किंवा मुलाखतीस जाताना शेवटच्या क्षणापर्यंत घोकत रहाणारी, पुस्तकात डोके घातलेली मुले इथे यशस्वी होण्याची शक्यता जरा कमीच असते. स्वच्छंदी, बागडणारी आणि तरीही ज्ञानपिपासू, समंजस, समाजाभिमुख, हळवी आणि सोल्युशन प्रोव्हाईडर वृत्तीची मुले या प्रकारात हमखास यशस्वी होतात. आणि मग त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांना करीयरच्या अनेक संधी खुल्या असतात. >>> अगदी अगदी !!

सुंदर पोस्ट , संतोष सराफ.

संतोष सराफ, छान पोस्ट्स!

मी इथे freshman research initiative नावाच्या उपक्रमात दोन सेमिस्टर काम केले ज्यात कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना research methods ची ओळख करून दिली जाते. ह्यात individual आणि group असे दोन्ही प्रकारचे projects होते. मला भारतात अशा प्रकारच्या कार्यशाळा घेण्याची इच्छा आहे.
साधारणतः आठवी ते अकरावी ह्या वयोगटासाठी. कारण तर्कशुद्ध विचार करता येणे हे एक कौशल्य आहे आणि ते सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी आवश्यक आहे. Rather it's a life skill. मी ज्या कोर्सला शिकवत होते त्यात देखिल आम्ही चित्रपट, संग्रहालये, चित्रं प्रदर्शने अशा ठिकाणी फिल्ड व्हिजीट ला घेऊन जायचो. कारण विज्ञान हे फक्त प्रयोगशाळेत शिकण्याची गोष्ट नाही. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीतून विज्ञान शिकता येतं. आणि वैज्ञानिक दृष्टीकोन (rational thinking) हा आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत आवश्यक असतो.

पण त्याचवेळी माहिती = ज्ञान हे संपूर्णपणे चुकीचे समीकरण आहे. मुलाला पाढे किंवा अजून काही टेबल्स (periodic table, logs, formulas etc) पाठ येणे किंवा एखाद्या गोष्टीची माहिती असणे पुरेसे नाही. आजकाल बरीच सारी माहिती ही महाजालावर एका क्लिक वर उपलब्ध आहे!
१. आपल्याला मिळणारी माहिती योग्य/परिपूर्ण आहे का हा प्रश्न पडणे गरजेचे आहे. (Literature review)
२. त्या महितीच्या आधारावर नवीन ज्ञान मिळवण्यासाठी योग्य प्रश्न विचारता आले पाहिजेत. (Formulating multiple hypotheses)
३. त्या प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी कल्पनाशक्ती वापरता आली पाहिजे. (experimental design). The true sign of intelligence is not knowledge but imagination - Albert Einstein.
४. मिळालेली उत्तरे तपासून बघणे (Analytical skills, accepting or refuting the null hypothesis)
ह्या कोणत्याही संशोधनाच्या चार मुलभूत पायऱ्या आहेत. आता हे संशोधन केवळ शास्त्र विषयाशी संबंधित असेल असं नाही. आणि ही वैज्ञानिक पद्धत आत्मसात करण्यासाठी तुम्ही हुशार (=चांगले, ८०-९०% मार्क मिळवणारे विद्यार्थी) असलं पाहिजे असंही नाही. उलट ह्या प्रकारे विचार करायला शिकणे हे फार प्राथमिक शिक्षण आहे. आणि अशा प्रकारे विचार करू शकणारे लोकं एक सुजाण समाज घडवतील. तर्कशुद्ध विचार करणे हे एक स्कील आहे जे प्रत्येकाला आले पाहिजे.

अजून एक गोष्ट जी भारतात इतक्या चांगल्या पद्धतीने शिकवली जात नाही, which I feel we don't emphasize enough, ती म्हणजे संख्याशास्त्र (statistics). आपण अंकगणितावर खूप मेहनत घेतो त्यामुळे एकुणात आपल्या लोकांचे गणित चांगले असते. पण जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या data कडे/विधानांकडे बघत असता तेव्हा त्याचा योग्य अर्थ लावण्यासाठी तुम्हाला संख्याशास्त्राची गरज असते. Sample size, positive/negative controls, correlation coefficient, percentage, average, mean, median, mode, standard deviation, standard error, error bars, p-value, statistically significant difference ह्या सगळ्या संकल्पना खूप अवघड/किचकट नाहीत (मला दुर्दैवाने ह्यातील सर्व संज्ञांचे पर्यायी मराठी शब्द माहिती नाहीत). रोजच्या व्यवहारातल्या उदाहरणांतून शिकता येतील इतक्या सोप्या आहेत. पण आपल्याकडे ह्या संकल्पना शिकवण्यावर फारसा भर दिला जात नाही. जर सामान्य माणसाला ह्या संकल्पना कशा वापरायच्या हे माहिती असेल तर अनेक ठिकाणी आपली फसवणूक होणार नाही. कोणत्याही data चं महत्व किंवा त्यातला फोलपणा लगेच लक्षात येईल.

I would really love to work on a workshop module where we can teach research methods to everybody not just handful of students. आणि मला ह्याची खात्री आहे की आपण स्वतः लावलेला अगदी छोट्यातला छोटा शोध देखिल खूप आनंद देऊन जातो. Even if it is reinventing a wheel sort of a thing! Because learning is always better than being taught. And what you learn on your own stays with you more than what you are taught.

हा अवांतर प्रतिसाद आहे ह्या धाग्यावर पण मला लिहावसं वाटत होतं खूप म्हणून लिहिलं!

संतोष सराफ, तुमच्या सर्वच पोस्ट्स खूप सुंदर आहेत अगदी परीक्षेचा अभ्यास हा मुद्दा बाजूला ठेवला तरी पाल्याच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी देखील खूप सुंदर पोस्ट्स

इथे लिहिल्यब्द्दल धन्यवाद .<<<<<. खरच धन्यवाद !

रोजच्या व्यवहारातल्या उदाहरणांतून शिकता येतील इतक्या सोप्या आहेत. पण आपल्याकडे ह्या संकल्पना शिकवण्यावर फारसा भर दिला जात नाही. जर सामान्य माणसाला ह्या संकल्पना कशा वापरायच्या हे माहिती असेल तर अनेक ठिकाणी आपली फसवणूक होणार नाही. कोणत्याही data चं महत्व किंवा त्यातला फोलपणा लगेच लक्षात येईल.
>>
क्या बात!

दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं हार्दिक अभिनंदन..

संतोष सराफ अत्यंत सुरेख पोस्ट...

सध्याच्या शाळेच्या अभ्यासाच्या पॅटर्न मध्ये सुद्धा असा अभ्यास करायला मिळावा हे फारच उत्तम आहे..

तुमच्या मुलीला विचारलेला प्रश्न वाचून मला माझ्या १०वीतल्या एन.टी.एस.च्या मुलाखतीची आठवण झाली..

सुरुवात नेहमी प्रमाणेच काय करतोस? तुझी आवड काय? आई वडील काय करतात? व्यवसाय आहे मग तुला त्यातले काही माहिती आहे का? आणि मग तिथून पुढचे सगळे प्रश्न फक्त त्या व्यवसायात कुठे कसे काय शास्त्र आहे ह्यावरच..

संतोष सराफ, तुमच्या सर्वच पोस्ट्स खूप सुंदर आहेत अगदी परीक्षेचा अभ्यास हा मुद्दा बाजूला ठेवला तरी पाल्याच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी देखील खूप सुंदर पोस्ट्स >>> अनुमोदन

संतोष सराफ, खूप चांगली माहिती... सगळया पोस्टना +१
मुलाखतीच्या वेळी मला थोडी चिंता वाटली होती कारण अनन्याचा अबोल स्वभाव पण तिने खूप सुंदर उत्तर दिली... त्यासाठी तिची खास तयारी करुन घेतली नव्हती.. फक्त मनात असेल ते बोलून टाक म्हटल होत. तिला पर्सनल इंटरव्ह्युमध्ये विचारल की "तुला भौतिकशास्त्र जीवशास्त्र व रसायनशास्त्र यापैकी जास्त कोणता विषय आवडतो?" यावर तिने उत्तर दिले की ,"रसायनशास्त्र ...पण मला त्या संज्ञा पाठ नाहीत जास्त ...त्यातले छोटे छोटे प्रयोग करायला आवडतात." मग त्यानी तिलाच विचारल की," तुला कोणता विषय आवडतो?"
हिने खगोलशास्त्र सांगितल.. त्यावर त्यांनी सगळ्यात मोठा ग्रह विचारला... तिने त्यांना विचारले आपल्या सूर्यमालेतला की आपल्या गॅलेक्सी मधला?....( हे ऐकून मी बेशुद्ध .)
यावरुन सुरु झालेली मुलाखत ...दिर्घीका ..नेब्यूला .. ब्लॅक होल ..वाॅर्म होल अशा वळणा वळणाने पूर्ण झाली ( डिस्क्लेमर... वरील शब्दांचे अर्थ प्लीज मला विचारु नये. मी घोर अज्ञानी आहे )
ती ही माहिती कुठून मिळवते.. हे ही विचारल..
(याचे उत्तर ऐकून मी "काय??" इतक्या जोरात ओरडले की रस्त्यावरच्या गाड्याही थांबल्या Proud )
तिने सांगितले की आधी ती विकीपिडीया रिफर करायची मग तिला कळलं की नासाची साइट आहे सो आता ती माहिती तिथूनच घेते.

ह्या स्पर्धेनिमीत्त अनन्याला जे नविन ज्ञान मिळाल ते आहेच पण सोबत माझ्या पदरात पण बरीच नविन माहिती पडली .... लेकीबद्दल Wink

Pages