मानसोपचार आणि समुपदेशन

Submitted by साती on 6 March, 2015 - 07:08

(हा धागा प्रोग्रेसिव्ह असणार आहे. म्हणजे चर्चे दरम्यान जे काही प्रश्नं निर्माण होतील त्या अनुषंगाने मी या धाग्यात काही मुद्द्यांची वाढ करत जाईन. सध्या मोबाईलवरून लिहित असल्याने एकदम बरेचसे लिहिणे किंवा एडिट करणे किंवा संदर्भ देणे सोपे नाही. म्हणून जशी जमेल तशी भर या धाग्यात घालत जाईन)

माझ्या प्रॅक्टीसमध्ये मानसोपचाराची गरज असणारे खूप रुग्णं पहायला मिळतात. नोकरी, व्यवसाय,शिक्षणातले यश-अपयश, नातेसंबंधांतील गुंतागुंत अश्या मानसिक ताण वाढविणार्‍या कित्येक गोष्टी मधुमेह, उच्चरक्तदाब, अंगदुखी असे विविध आजार घडवून आणतात आणि असलेले आजार वाढवितात.

माझ्या कित्येक रूग्णांना तुम्हाला मानसोपचाराची गरज आहे असे सांगितले तरी ते घेत नाहीत. तुम्हीच द्या एक गोळी असे म्हणतात. खरं तर एक फिजीशीयन म्हणून मी मानसोपचाराची औषधेही लिहू शकते पण फार्मसी बाबतच्या कडक नियमांमुळे बरीचशी 'शेड्यूल एच' ड्रग्जआमच्या दवाखान्यात जास्तीत जास्त किती ठेवता येतील यांचा नियम आहे. त्यामुळे असलेला ठराविक कोटाच पुरवून पुरवून वापरावा लागतो. त्याहूनही महत्वाचे म्हणजे मानसिक रूग्णांना औषधोपचारांइतकीच समुपदेशनाचीही गरज असते जी माझ्या क्लिनिकमध्ये मला देता येत नाही. आमच्या एवढ्या मोठ्या जिल्ह्यात कायमस्वरुपी केवळ एकच सायकॅट्रीस्ट आहेत. ज्यांना त्यांच्याकडिल पेशंटच्या अतोनात संख्येमुळे एखाद्या पेशंटला द्यायला पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ नाही. त्यामुळे आमच्या जिल्ह्यात समुपदेशन नावाचा प्रकार नाही. मूळात सायकॅट्रिस्टसुद्धा नाही अश्या गावात काउंसेलर असणे तर शक्यच नाही.

मग कधीतरी मला वाटतं, शहरातल्या लोकांची मज्जा आहे बुवा. छोट्या छोट्या स्ट्रेससाठी गल्लोगल्ली काऊंसेलर उपलब्ध असतात. पण खरंच असं आहे का? जातात का शहरातले लोक काऊंसेलरकडे? काऊंसेलरकडे जाणं अजूनही तितकंच नामुष्कीचं राहिलंय का? एखाद्याला मानसिक उपचारांची किंवा समुपदेशनाची फार गरज आहे असे आपल्याला दिसतेय आणि आपण त्याला ते सुचवितोय यात ती व्यक्ती ऑफेंड तर नाही ना होत?

माझ्या प्रॅक्टीसमध्ये माझ्याकडे आलेल्या रूग्णांना मी गरज असल्यास 'मानसिक उपचार घ्या' असे सहज सांगू शकते.
गंमत म्हणजे अगदी आत्महत्येचे रूग्णंजरी असतील तरी माझ्याकडून बरा झाला आता मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेऊ आणि मग डिस्चार्ज देवू असं म्हणताच त्याच दुपारी बिल क्लिअर करून बहुतेक जण पळून जातात. ते डॉक्टर संध्याकाळी विजिटींगला येतात म्हणून. मग नंतर हे लोक कुढत जगतात, बरे होतात की परत एखादा आत्महत्येचा प्रयत्न करतात काही पत्ता लागत नाही.

तरिही रूग्णांना मानसोपचार देणे /द्यायची शिफारस करणे मला सहज शक्य आहे.
पण एखादा माझा रूग्णं नसेल तेव्हा? किंवा एखादा केवळ आंतरजालावरिल ओळखीचा असेल तेव्हा?
एकजण खूप चटका लावून गेला जीवाला. त्याला मानसोपचाराची गरज आहे हे त्या संस्थळावरिल प्रत्येकाला समजत होतं. काही ते उघडपणे लिहित तर काही उगाच वादासाठी वाद म्हणून त्या आयडीला / त्याच्या थोड्याफार विक्षिप्त लिखाणाला सपोर्ट करित. मग एकदा त्याने आत्महत्याच केल्याची बातमी आली. (कृपया त्याचे नाव माहित असलेल्यांनी इथे लिहू नका. मी केवळ एक उदाहरण घेतले आहे.) आपण अगोदरच त्याला समुपदेशनासाठी, मानसोपचारांसाठी का नाही जास्तं हॅमर केलं असं वाटत राहिलं.

आत्ताही कुणाला खरेच समुपदेशनाची गरज आहे असे केवळ आंतरजालावरच्या ओळखीतून लिहावे का, असा प्रश्नं मला पडलाय.

असो. तर मानसोपचारतज्ज्ञांचे एक जादाचे काम मला वारंवार पडत असल्याने माझ्यापुरते थोडेफार सतत वाचत असते.
पुस्तकांचा संदर्भ इथे दिला तर सगळ्यांनाच ते वाचायला जमेल असे नाही.
ढोबळमानाने जे आजारांचे वर्गीकरण आहे त्यापैकी कुठला आपल्याला आहे का हे समजण्यासाठी कित्येक टेस्ट जालावर उपलब्ध आहेत. यातल्या काही वर्तमानपत्रातल्या सो कॉल्ड आरोग्यविषयक स्तंभातही येत असतात. काही ठिकठाक असतात तर काही अगदीच यथातथा.
काहींची मांडणी इतकी सोप्पी असते की 'प्रत्येक प्रश्नात ए निवडला तर आपण रोगी , सी निवडला तर आपण अगदी फिट आणि बी निवडला तर सीमारेषेवर' असं कोरिलेशन चाचणी देणार्‍याला देतादेताच समजतं. त्यातही एखादा मुद्दाच उदाहरणार्थ नैराश्य, व्यसनाधिनता असे घेऊन त्यांच्या निदानासाठी बनविलेल्या चाचण्या बर्‍याच सापडतील. पण एकंदर स्वतःला मानसिक मदतीची गरज आहे का हे ठरविण्यात मदत करणार्या चाचण्या कमीच.
(याच लेखात मी अगोदर 'आपल्याला संभाव्य मानसिक आजारांकरिता समुपदेशन किंवा उपचारांची गरज आहे का?' याचा अंदाज करण्यास मदत करणारी एक चाचणी दिली होती. चर्चा पुढे जाण्यास किंवा अधिक मुद्दे पुढे येण्यास मदत व्हावी म्हणून. आणि एकदा ती चाचणी देऊन पहा असे सुचविले होते. पण त्यामुळे चर्चा पुढे सरकण्यास मदत होतेय असे न दिसल्याने ती मूळ लेखातून काढून खाली प्रतिसादात देत आहे.)
एकंदर मराठीत आरोग्यविषयक माहिती माहितीजालावर फार अपुरी आहे. इंग्रजीत प्रत्येक आजाराविषयी सामान्य माणसाला कळेल अश्या भाषेत ते अगदी व्यावसायिक आणि प्रशिक्षित डॉक्टरांसाठीच अश्या मोठ्या रेंजमध्ये माहिती उपलब्ध आहे.
आपल्याला सामान्यतः लहानमोठ्या शारिरीक आजारांच्या लक्षणांची माहिती असते. मात्र मानसिक आजारांच्या लक्षणांची माहिती नसते. आणि सर्वांना समजेल अश्या सोप्या भाषेत ती सहज नेटवर मराठीत उपलब्धही नाही.
चर्चेच्या अनुशंगाने या लेखात किंवा पुढिल भागात अशी माहिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
त्यामुळे सगळ्या प्रश्नांचं या धाग्यावर स्वागत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ये सोच बदलनी है<<< अगदी! आणि त्यासाठी कष्टही खूप आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्वांदेखत एखाद्याला असे सल्ले देणे बंद व्हायला हवे. असे करणे बंद केले की आपोआप त्या सल्ल्याला जरा महत्व प्राप्त होईल आणि त्यामागे कळकळ, आपुलकी आणि गुप्तता पाळण्याच्या रुग्णाच्या अपेक्षेची पूर्तता करण्याची इच्छा हे घटक येतील. येताजाता असा सल्ला दिला की त्या सल्ल्याचे महत्व तर कमी होतेच पण असा सल्ला ज्याला दिला जात आहे त्याला वेडा म्हंटले जाईल असा समजही पसरतो. आया मस्तिष्कमे? Wink (हे तुम्हाला वैयक्तीकरीत्या उद्देशून नव्हे)

Happy

बुडती हे जन न देखवे डोळा। म्हणोनि कळवळा येतसे । अशी परिस्थिती न मागता सल्ला देणार्‍यांची होउ शकते. दिसतय कि तो गर्तेत चालला आहे मग आपण काय गप्प बसायच का? त्याला समजत नाहीये पण आपल्याला तर समजतय ना! ही भावना नक्कीच सहृदयी माणसाची होते.खर तर याला काही उत्तर नाही. बस्स आपली मनोदेवता काय सांगते त्यावर ठरवायचे.

मला वैयक्तिकदृष्ट्या घ्यायचे कारणच नाही, कारण कुठल्याही धाग्यावर मी कुणालाही असा सल्ला दिलेला नाही.
Happy

पण अशी वेळ यावी ज्यावेळी फिजीशीयनला जाऊन भेट किंवा सायकॅट्रिस्ट्ला जाऊन भेट हे दोन्ही सल्ले सारख्याच इंटेंशनने दिले- घेतले जावेत.

बी,

>> पण तरीही, इथल्या काही व्यक्तिंचा मला त्रास झालेला आहे आणि आपल्याला त्रास होउ नये म्हणून मी अशा
>> व्यक्तिंच्या अलिप्त .. दूर राहण्याचा प्रयत्न करुनही त्या व्यक्ति माझा माग धरतात!!

तुमचा माग धरला गेलाय असं तुम्हाला वाटतं. पण संबंधित व्यक्तीच्या तसं मनात असेलंच असं नाही.

एकवेळ धरून चालू की समोरच्या व्यक्तीला तुम्हाला त्रास द्यायचाच आहे. तुमच्या बाफवर जर तुम्ही म्हणता तशी परिस्थिती उद्भवली, तर तुम्हाला योग्य वाटलेले प्रतिसाददाते आहेत त्यांच्याशी तुम्ही खाजगी संभाषण करू शकता.

आ.न.,
-गा.पै.

अतुल ठाकुर यांच्या सर्व पोस्टि आवडल्या . त्यांना पूर्णपणे अनुमोदन !

इब्लिस यांच्या पोस्टितल्या <<<< जबाबदारी जर पार पाडता येत नसेल, येण्याची शक्यता नसेल, तर कृपया, कु णा ला ही, 'उपचार घे' असा सल्ला, नेटवर सोडाच, तोंडावरही देऊ नका >>> या वाक्यांना पूर्णपणे सहमती

मलाही नेटवर जाहीरपणे समुपदेशनाचा सल्ला देण पटलेल आवडल नाही.समुपदेशनाचा सल्ला देण्यापूर्वी मी त्या व्यक्तीला किती ओळखते हा प्रश्न येतो. गटग , ववि , विविध कार्यक्रमाचे संयोजन या माध्यमातुन नेट करांशी ओळख होते हे खरे आहे, पण अतुल यांनी म्हटल्याप्रमाणे त्या चारएक तासांच्या ओळखीवर समुपदेशनाचा सल्ला देणे म्हणजे योग्य वाटत नाही. नेटवर लिहिणारी व्यक्ती प्रत्यक्ष आयुष्यात वेगळी असू शकते ( बऱ्याचदा त्या असतात तश्या ) त्या व्यक्तीचे प्रोब्लेम्स आपल्याला वाटतात त्याहुनही वेगळे असू शकतात ज्याची आपणाला कल्पनाही नसू शकते. त्या व्यक्ति बद्दल काही वाटत असेलच तर त्या व्यक्तीला मोकळ होऊ द्याव. बरेचदा प्रश्न त्यानेही सूटतात . त्या व्यक्तीची खिल्ली उडवून काहीच साध्य होणार नसत. अश्या व्यक्ति अजून बिथरतात मग . त्या व्यक्तिसाठी काही करता आल नाही याची टोचणी जरूर लागते पण मग या जगात अशा किती तरी गोष्टी आहेत ज्या इच्छा असूनही सुधारता येत नाही.

समपुदेशन खरतर एक चांगला उपाय आहे. काही दिवसांपूर्वी स्नूकर विजेत्या पंकज अडवाणीची मुलाखत वाचली होती. त्यात त्याने मोठ्या स्पर्धा जिंकताना समुपदेशानाचा खूप फायदा झाला अस म्हटल्याच् आठवत. पण भारतीय समाजात समुदेशन हा एक taboo समजला जातो. त्यामुळेच सध्यातरी<<< त्याचाच एक भाग म्हणून सर्वांदेखत एखाद्याला असे सल्ले देणे बंद व्हायला हवे. असे करणे बंद केले की आपोआप त्या सल्ल्याला जरा महत्व प्राप्त होईल आणि त्यामागे कळकळ, आपुलकी आणि गुप्तता पाळण्याच्या रुग्णाच्या अपेक्षेची पूर्तता करण्याची इच्छा हे घटक येतील. येताजाता असा सल्ला दिला की त्या सल्ल्याचे महत्व तर कमी होतेच पण असा सल्ला ज्याला दिला जात आहे त्याला वेडा म्हंटले जाईल असा समजही पसरतो.>>>> याला पर्याय नाही. समुदेशन हे इतर उपचाराप्रमानेच स्वीकारल जाव ही इच्छा आहे. पण तआजच्या घड़ीला ते अवघड आहे याचीही कल्पना आहे

मुंग्यांनी तर मेरू पर्वत गिळला नाही ना? इथे वाघ आणि बकर्‍या एकाच झर्‍यावर पाणी पिताना दिसत आहेत त्यामुळे बरे वाटत नाहीये. Proud

अतुल ठाकुर....थॅन्क्स म्हटलेलं तुम्हाला आवडणार नाही हे माहीत आहेच मला....पण तुमच्या ह्या नव्या प्रतिसादात अगदी ठळकपणे मला दिसलेली/जाणवलेली भावना फार भावली....तो पोचली, हे तुम्हाला कळविणे मला अगत्याचे वाटते म्हणून आभार मानत आहे. बाकी समुपदेशन हा विषय इथे इतक्या अभ्यासू पातळीवर चर्चेला आल्याचे पाहून मला विशेष आनंद झाला आहे.....याबद्दल साती याना याचे श्रेय दिले पाहिजे. विषयाची महती, गरज आणि उपयोग या पैलूवर मते येत राहताना त्यात डावेउजवे असणे क्रमप्राप्त आहेच यात शंका नाही. वाचताना दोन्ही बाजूची मते तितक्याच मुद्देसूदपणे मांडल्याचे जाणवते याचाही आनंद आहेच.

हे इथे अस्थानी असल्यास उडवेन परंतु वर पंकज अडवाणीचा उल्लेख आलाच आहे तर , भीष्मराज बाम ह्यांनी क्रीडा मानसशास्त्राशी निगडीत पुस्तके लिहिली आहेत . खूप सुंदर आहेत . त्याचा मला रोजच्या आयुष्यात सुद्धा खूप उपयोग होतो
बाकी चर्चा खूपच उपयुक्त आहे.

अतुलजी, खूप सुंदर पोस्ट लिहिली.

मी आज गाण्याच्या वर्गात हाच विचार करतो होतो की "सिईंग इज बिलिव्हींग हेच खरं."

इथे मायबोलिवर कुणी आपल्याला समुपदेशनाचा सल्ला दिला तर त्याचे मला तरी वाईट वाटत नाही. उलट समुपदेशन करुन हे नक्की काय आहे हे तरी कळेल. पण इथे नेमकी गोम अशी आहे की जी लोक आपल्याशी फक्त भांडतात तिच लोक आपल्याला समुपदेशनाचा सल्ला देतात. आणि जी लोक आपले मानसिक संतुलन बिघडवू शकतात तिच समुपदेशन करा असे सुचवतात. म्हणजे आधी कुणाला तरी वेड करायच आणि मग त्याला जा आता वेड्याच्या दवाखन्यात असे सुचवायचे. अशा मनोवृत्तीची खूप चीड येते. ही लोक कधी नीट बोलत नाही. आणि इथे माबोवर बौद्धिक कुवत असलेली जनता खूप आहे पण एक चांगले हृदय असलेली लोकं मात्र खूपच कमी आहेत. अर्थात प्रत्यक्षात ही लोक खूप मनमिळावू असतीलही पण इथे तरी तो मनमिळावूपणा दिसून येत नाही.

धन्यवाद.

काँन्सिलिंग बद्दल एक बेसिक प्रश्न आहे - स्ट्राँग कसे राहवे? जेंव्हा वाईट / बिकट परिस्थिती असते, तेंव्हा आपली स्थिती अ‍ॅक्सेप्ट केल्याशिवाय मार्ग निघत नाही. काँसिलरकडे जायला हवे हे सुध्दा कळत नाही.

इतरांशी तुलना करुन कुढणे किंवा रागराग करणे.
प्रमोशन झाले नाही की इतर लोक चाटूगिरी करतात, मी त्यातला नाही, असे स्वतः ठरवून टाकणे. किंवा एखाद्याचे काही बोलणे आवडले नाही, तर तिथल्या तिथे उत्तर न देता मग नंतर कुढत बसणे. एखादी घटना आपल्या मनाविरुद्ध घडत असताना आवाज न उठवता येणे आणि त्यातून येणारे हताशपण.

या छोट्या छोट्या गोष्टी दुर्बल मनाचे लक्षण वाटतात. जेंव्हा रोजच्या आयुष्यातल्या याच घटना हाताळता येत नाही, तेंव्हा डिप्रेशन वाढते आणि मग हळूहळू सगळंच गणित चुकत जाते. त्यात काही आघात घडला की माझे नशीब वाईट, अनलकी असे सुरु होते.

पण मुळातूनच स्ट्राँग कसे राहावे? बरेच लोक प्रत्यक्ष जीवनात बरेच स्ट्राँग असावे असे जाणवते. हा स्ट्राँगनेस सक्सेस मधून येतो की मुळातच कॉन्फिडंट असल्यामुळे येतो? यशस्वी होणे - जी स्वप्ने बघितली ती प्रत्यक्षात उतरणे - ही गोष्ट बरेच प्रॉब्लेम्स सोडवते का?

माझ्या मते, जेवढा स्ट्राँगनेस जास्त तेवढी हँडलिंग कपॅसिटी जास्त. त्यामुळे घटना डील करता येत नाहीत आणि काँसिलरकडे जाण्याची गरज आहे हे पटणार.

साती छान लेख वाचताना सहज आठवले अँबनॉर्मल सायकॉलोजीच्या पहिल्याच लेक्चरला सर बर्याच मानसिक आजारांची लक्शणे सांगत होते ऐकताना बरेच जण अस्वस्थ जाणवले सरांना व त्यांना ते अपेक्शितच होते त्यानी हसुन सांगितले ह्यातील बरीच लक्शणे तुम्हाला स्वत:मध्ये जाणवतील तेव्हा लक्शात ठेवा " each individual is abnormal " Happy

आख्खा धागा वाचण्याइतके त्राण अन वेळ नाही. पहिले पान वाचले. गुगळे/नितिनचंद्र यांच्या पोस्ट्स आवडल्या.
लहानपणी शाळेत असतानपासून 'ठाण्याला/येरवड्याला इस्पितळात' जायचे आहे का/तिथुन आला आहेस का अशा प्रकारचे "वेड्यांबद्दलचे" संस्कार ज्या समाजात सर्रास होतात, तिथे लोक मानसोपचार तज्ञाकडे जाऊन "स्वतःला स्वतःच्याच कृतीने वेडा ठरवुन" न घेण्याइतपत "शहाणपण(?)" असल्याने लोक मानसोपचार तज्ञाकडे जाण्यास काकू करतात.
तसेच ही बातमी "फुटली" (अन ती फुटतेच) तर लग्न जमणे/नोकरी लागणे/असलेली नोकरी जाणे असे नाना धोके असतात. सासुरवाशिणी स्त्रीयांचे बाबतीत तर त्याहुन महाभयानक परिस्थितीला सामोरे जावे लागते, व सासरच्या सासू,जावा,नणंदा, तसेच बरेचदा माहेरची भावजय वगैरे टोचून टोचून हैराण करू शकतात. याबाबतीत आपला समाज कुठल्याच अंगाने मॅच्युअर्ड नाही, अन म्हणून तर या समाजाला सातत्याने गुरु/बुवा/संत/महंत इत्यादींची गरज लागते.

अशा परिस्थितीत, अर्धवट माहितीवर (म्हणजे व्यक्तिच्या केवळ जालिय लिखाणावरुन अंदाज बांधून) त्यास मानसोपचार घे असा जाहिर सल्ला देणे कोणत्या नितीमत्तेत बसेल ते मला तरी कळत नाही.
(कदाचित येथिल कित्येकांचा आजवर असाही ग्रह झाला असेल की या शिन्च्या लिम्ब्यालाच मानसोपचाराची गरज आहे Proud नव्हे नव्हे, तसे ते मला अनेकांनी सुचविलेही आहे! असो.)

निव्वळ जालिय लिखाणावरुन कोणालाही असा सल्ला देणे मला सुसंगत वाटत नाही.
असा (सुयोग्य) सल्ला दिला तरी समोरिल व्यक्ति ते मानेलच असेही नाही, उलटपक्षी अशा सल्ल्यामुळे त्याचे भलतेच परिणाम होऊन व्यक्ति (मूळात खंबीर नसेल तर) अधिक नैराश्यात जाणे शक्य असते.

असले सल्ले कुणा एखाद्या व्यक्तिला देण्यापेक्षाही, जालिय संवादात, कम्पु करून एखाद्याला कॉर्नर करीत, अनुल्लेख करीत, व त्यास/त्याचे लिखाणास "विकृत" "विकृत" ठरवित व तसा धोशा लावित त्याचा पावलोपावली अपमान करण्याची खुमखुमी असलेल्यांनाच खरे तर जास्त मानसोपचाराची गरज असते असे मला तरी वाटते. असो.

इथे बरेच विद्वान/जाणते लोक आहेत. मी आपला अशिक्षित/अडाणी, माझे शब्द चुकीचे असल्यास माफ करा बोवा.

>>>> बुडती हे जन न देखवे डोळा। म्हणोनि कळवळा येतसे । अशी परिस्थिती न मागता सल्ला देणार्‍यांची होउ शकते. दिसतय कि तो गर्तेत चालला आहे मग आपण काय गप्प बसायच का? त्याला समजत नाहीये पण आपल्याला तर समजतय ना! ही भावना नक्कीच सहृदयी माणसाची होते.खर तर याला काही उत्तर नाही. बस्स आपली मनोदेवता काय सांगते त्यावर ठरवायचे. <<<<<
घाटपांडेजी, माझी अशी परिस्थिति (बरेचदा) झालीये,
एक उदाहरण नजिकचे! फॅमिलीफ्रेन्डची तरुण अविवाहित बहिण, तिचा हात बघितल्यावर, कुंडलिचा अंदाज घेतल्यावर तिच्या थोरल्या बहिणीला (फॅमिलीफ्रेण्डला) स्पष्टपणे सांगितले होते की अमुक सालात अमुक महिन्यात हिला जास्तीत जास्त जपा, हिला एकटी सोडू नका.
पूर्वपिठिका अशी की येताजाता बोलताना ती व्यक्ति मला जगायचे नाही, कशात काही रस नाही वगैरे बोलायची. म्हणुन तर हात बघण्याची वेळ आली. काही जपजाप्याचे उपायही सांगितले होते. मानसोपचार तज्ञाकडे कौन्सेलिंगसाठी जायला सांगितले होते (बहुधा गेलीही होती).
जपायला सांगितलेली वेळ साताठ महिने दूर होती, व दरम्यान मी तो विषय विसरूनही गेलो. नेमक्या त्या महिन्यात बातमी आली की त्या व्यक्तिने गळफास लावुन आत्महत्या केली आहे. वर वर पहाता "व्यावहारिक कारण" काहीही नव्हते.
काय करणार पुढचे समजुन? कळवळा येणेही थांबावे, मन बधिर व्हावे अशी परिस्थिति होते मनाची. असो.
विषयांतराबद्दल क्षमस्व.

साती, तुझ्या सात मार्च (१४:१२ ईएस्टी)च्या पोस्टला पूर्ण अनुमोदन.

इथला विरोधाचा सूर

१. समुपदेशनाचा सल्ल देणं डोक्यात गेलं
२. सल्ला द्या, पण जाहीर नको - खाजगीत द्या
३. एरवी थट्टामस्करी करत असाल तर सल्ल्यामागची कळकळ जेन्युइन वाटत नाही
४. आभासी जगातील वावरावरून मनःस्थितीचा अंदाज येत नाही म्हणून सल्ला देऊ नये
५. आमच्या समाजात समुपदेशनाबद्दल टॅबू आहे. तेव्हा एखाद्याला होऊ शकली असती ती मदत नाही झाली तरी बेहत्तर, पण तो शब्द वापरू नका

अशा क्रमाने बदलत गेलेला दिसतो आहे.

ताज्या उदाहरणात एरवी अजिबात थट्टामस्करी न करणार्‍या आयडीजनाही जो अनुभव आला त्यावरून क्रमांक ३च्या मुद्द्यात तथ्य नाही हे स्पष्ट आहे.

क्रमांक ४ चा मुद्दाच दुसर्‍या बाजूने वापरायचा झाला तर आभासी जगात मनःस्थितीचा लवकर अंदाज येत नाही (देहबोली, फेशियल एक्सप्रेशन्स, आवाजातील चढउतार इ.ची मदत मिळत नाही) म्हणून नॉर्मल समजून थट्टामस्करी केली जाते. बाकीच्यांना हा अंदाज अगोदरच आला होता का आणि त्यांनी त्याबाबतीत (दुर्लक्षापलीकडे) काय केलं होतं हे आता मी विचारत नाही. मला जाणवल्याबरोबर मी ज्या गोष्टीची मदत होऊ शकेल असं वाटलं त्याचा सल्ला दिला.
शिवाय आभासी जगातल्या आयडीजच्या मनातल्या टॅबूचा बाऊ करून मी सल्ला देणं का टाळावं?

क्रमांक १ आणि २ मात्र सकृत्दर्शनी कैवार घेणारे वाटले तरी त्यांचं मूळ क्रमांक ५च्याच मुद्यात आहे आणि तीच या सगळ्यातली गोम आहे. असो. बदलाची सुरुवात प्रॉब्लेम पिनपॉइंट होण्यातच असते.

हा बदलता सूर समुपदेशनाबद्द्लच्या वाढत्या अवेअरनेसचा द्योतक आहे असं समजते, आणि ती मला समाधानाचीच बाब वाटते.

साती,

तुला आनखी एका विषयावर इथेच किंवा नवीन धागा काढून लिहिता येईल का? आपण कुणाला तरी मानसिक त्रास देतो आहे हे कसे ओळखायचे आणि ते ओळखण्यासाठी काही खास चाचणी असलेली लिंक आहे का? इथे काही महान लोकांना अशा माहितीची खूपच गरज आहे. अशी ही लोक महान लोक आपल्या आजूबाजूला कोण वेड आहे हे बरोबर ताडतात पण आपण कुणाला वेडं करतो आहे हे मात्र ओ़ळखू शकत नाही. त्यामुळे खरचं जमत असल्यास ह्यावर काहीतरी लिहिचं! पाचेक मुद्दे तरी मांड म्हणजे प्रॉब्लेम पिनपॉईन्ट होईल. आणि मुद्दे मांडताना आपली पाठ आपणच थोपटून घ्यायला आणि आपल्या कंपूतील लोकांना न विसरायचे लक्षात असू दे. धन्यवाद.

स्वाती, बदलता सूर मस्त टिपलाय! जालीय लेखनाच्या काही मर्यादा व काही बलस्थाने असल्याने नेमके काय करावे हा प्रश्न पडतो खरा!

स्वाती, धन्यवाद!
बी, आपण कुणाला मानसिक त्रास देतो आहोत का अशी चाचणी असल्यास शोधून लिंक टाकते.
तुम्ही ती मी पहिल्यांदी दिलेली, पण नंतर प्रतिसादात दिलेली चाचणी करून पाहिलीत का?

आणि तुमच्या मनातही समुपदेशक्/सायकॅट्रिस्ट म्हणजे वेड्यांचे डॉक्टर ही प्रतिमा का?

<<बिघडवू शकतात तिच समुपदेशन करा असे सुचवतात. म्हणजे आधी कुणाला तरी वेड करायच आणि मग त्याला जा आता वेड्याच्या दवाखन्यात असे सुचवायचे. अशा मनोवृत्तीची खूप चीड येते>>

असं का लिहिलयत?
'वेड्यांच्या दवाखान्यात जा' असं लिहिलेलं मी राजकीय हाणामारी सोडून एकाही धाग्यावर पाहिलं नाही.
Wink

साती, हो केंव्हाच ती चाचणी घेतली आहे. मला समुपदेशनाची गरज नाही असे उत्तर आले आहे. मी चुक तर नाही ना केली म्हणून मी परत तिच चाचणी घेतली परत तेच उत्तर. चाचणी चुकीची आहे. मायबोलिकर चुकीचे असूच शकत नाही. मेल्या चाचणीतच दोष आहे.

मला वाटत आता मी इलाजासाठी अमेरिकेत जाव. सुदैवाने अमेरिकेत माझी काळजी करणारे इतके माबोकर आहेत की रहाण्याची, खाण्याची, पैशापाण्याची सोय तर होईलच शिवाय ह्यातून बाहेर पडायला मोलाची मदत होईल. आय होप की राईट पीपल हे वाचत आहेत.

च्यायला
आजारी पडल की ड्`ओक्टरकडे जातो, तेव्हा सांगत नाही का आपन ?
मग मानसोपचार स्पेशालिस्टकड गेल तर काय लाजायच ?

मला बायकांशी नीट वागता येत नाहि. लौकर इअरीटेट होतो. या विषयावर जावस वाटल तर जाईन पन. त्यात काय लाजायच् ?

(माझ चुकत नसल तरी जाईन कारन सगळ्या बायकांनी जान्यापेक्षा एकट्याने जानं परवडेल. )

बी, अभिनंदन!
तुम्हाला समुपदेशनाची गरज नाही ही खूप चांगली गोष्टं आहे.
(मला सुद्धा गरज आहे असे आले होते त्या चाचणीत Happy )

कशी गंमत आहे बघ बी. समुपदेशनाचा सल्ला दिला म्हणून तुला राग आला कारण तुला पर्सनली कुणी ओळखत नाही. (तुझा ज्यांच्यावर राग आहे ते तर नाहीतच). त्यामुळे त्यांची कशी काय हिंमत झाली तुला असं सांगायची. हो ना?
पण ह्याच बायकांना (तू ही ओळखत नाहीस त्यांना पर्सनली) तोंड वर करून तुम्ही वाईट आहात,(का? तर तुला भेटायला आल्या नाहीत म्हणून), तुमचे नवरे असे नी तसे म्हणत यांव नी त्यांव करत नावं ठेवत फिरतोस, तेव्हा आपलं काही चुकतंय हे दिसतच नाही. वर कुठे आत्मपरिक्षणाची टेस्ट असेल तर ती आधी करून घे.

बाई,

समुपदेशन हे मानसिक ताणतणाव, नातेसंबंधांपासून अधिक गुंतागुंतींच्या मानसिक आजारांवर (उदा. कॅन्सर फोबिया) देखिल अत्यंत उपयोगी आहे, नुसत्या समुपदेशनाने प्रॉब्लेम न सुटल्यास मानसोपचाराचाही सहारा घ्यावा हे देखिल सत्य आहे.

'समुपदेशन कुणी घ्यावे?' 'घे असे कुणी कुणाला केव्हा सांगावे?' हा मुद्दा आहे.

जालावर सांगावे का? → "आत्ताही कुणाला खरेच समुपदेशनाची गरज आहे असे केवळ आंतरजालावरच्या ओळखीतून लिहावे का, असा प्रश्नं मला पडलाय."

या प्रश्नाच्या उत्तरादाखल तो सो कॉल्ड 'विरोध' आहे; 'जालावर सांगू नये' असे लोकांचे मत पडते आहे. त्यात अतुल ठाकूरांसारखे मुक्तांगणात काम करणारे व समुपदेशन कशाशी खातात हे ठाऊक असलेले लोक आहेत तसेच मितान यांचेसारखे व्यावसायिक तज्ञही आहेत Happy

"समुपदेशन" गरजेचे असते की नाही? हा प्रश्नच नाहिये मुळात.

इब्लिस, मी तज्ज्ञांची मतं क्वेश्चन करत नाहीये, समजून घ्यायचाच प्रयत्न करते आहे. ते इतकं ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट असतं तर या चर्चेची आवश्यकताच नव्हती, नाही का?

सरसगट सांगावे किंवा सांगू नये असं करता येणार नाही असं माझ्या अल्प बुद्धिला वाटतं आहे. उदा: ग्रीफ कौन्सेलिंग. मध्यंतरी एका आयडीनं तिच्या बाळाबद्दल लिहिलं होतं. तिथे कुणीतरी ग्रीफ कौन्सेलिंग बद्दल लिहिलं होतं बहुतेक. इथे तुम्ही आयडी ओळखीचा आहे/नाही, त्याची/तिची जबाबदारी आपल्यावर आहे/नाही इ. विचार करत बसणार का? कित्येक लोकांना कल्पनाच नसेल की ग्रीफ कौन्सेलिंग पण असतं- मला पण नव्हती, सॅंडी हूक दुर्घटनेनंतर आमच्या शाळेनं पालकांसाठी आणि मुलांसाठी ऑफर करेपर्यंत. मग तुमच्या 'जालावर कौन्सेलिंग सुचवू नये' या एथिक्सपायी त्या व्यक्तीचं नुकसानच होणार. हे एक उदाहरण झाले, अशी अजून निघतीलच.

इब्लिस, चांगली पोस्ट.

मी आधी कळकळीनी सल्ला दिला तर दिला पण फॉलो थ्रु चे काय ह्याबद्दल लिहिले होते आधीच्या धाग्यावर पण खरं तर द्यायला पाहिजे की नाही हाच नो डाऊट खुप महत्वाचा मुद्दा आहे.

प्रत्येकाला वाटत असत आपन सोडुन इतरांना काऊन्सेलिंगची गरज आहे.
त्यातल्या एखाद्याबद्दल इतर अनेकांचं एकमत असू शकतं. तोंड उघडल्याशिवाय मानुस कळत नाही सहसा. इथ टाइपल्यावर कळतो. पन तोच त्याचा खरा चेहरा हे सांगनं अवघड असतं. प्रत्यक्षात भित्रा असनारा इथं शुरवीराचा आव आनतो. तरी पन स्वभावाचे काही नमुने (निगेटीव्ह) जानवतात. इंटरनेटवरच्या दुनियेतल्या ओळखीवर एखाद्याच लिखान वाचुन तो व्यक्ती चांगल्या स्वभावाचा आहे असं ठरवणं अवघड असतं. खूप तापट असनारा मानुस पन जर ट्रेन्ड असल तर एक ते शंभर मोजुन नंतर पत्ता लागनार नाही अशी भारी कमेण्ट लिहु शकतो.

प्रत्यक्षात मानसाची बोडी लेन्ग्वेज, डोळ्याची भाषा, चेह-यावरचे हावभाव हे महत्वाचं असतं. काहींना तर शेकहँड मधुन मानसाचा स्टडी करता येतो.

Pages