मानसोपचार आणि समुपदेशन

Submitted by साती on 6 March, 2015 - 07:08

(हा धागा प्रोग्रेसिव्ह असणार आहे. म्हणजे चर्चे दरम्यान जे काही प्रश्नं निर्माण होतील त्या अनुषंगाने मी या धाग्यात काही मुद्द्यांची वाढ करत जाईन. सध्या मोबाईलवरून लिहित असल्याने एकदम बरेचसे लिहिणे किंवा एडिट करणे किंवा संदर्भ देणे सोपे नाही. म्हणून जशी जमेल तशी भर या धाग्यात घालत जाईन)

माझ्या प्रॅक्टीसमध्ये मानसोपचाराची गरज असणारे खूप रुग्णं पहायला मिळतात. नोकरी, व्यवसाय,शिक्षणातले यश-अपयश, नातेसंबंधांतील गुंतागुंत अश्या मानसिक ताण वाढविणार्‍या कित्येक गोष्टी मधुमेह, उच्चरक्तदाब, अंगदुखी असे विविध आजार घडवून आणतात आणि असलेले आजार वाढवितात.

माझ्या कित्येक रूग्णांना तुम्हाला मानसोपचाराची गरज आहे असे सांगितले तरी ते घेत नाहीत. तुम्हीच द्या एक गोळी असे म्हणतात. खरं तर एक फिजीशीयन म्हणून मी मानसोपचाराची औषधेही लिहू शकते पण फार्मसी बाबतच्या कडक नियमांमुळे बरीचशी 'शेड्यूल एच' ड्रग्जआमच्या दवाखान्यात जास्तीत जास्त किती ठेवता येतील यांचा नियम आहे. त्यामुळे असलेला ठराविक कोटाच पुरवून पुरवून वापरावा लागतो. त्याहूनही महत्वाचे म्हणजे मानसिक रूग्णांना औषधोपचारांइतकीच समुपदेशनाचीही गरज असते जी माझ्या क्लिनिकमध्ये मला देता येत नाही. आमच्या एवढ्या मोठ्या जिल्ह्यात कायमस्वरुपी केवळ एकच सायकॅट्रीस्ट आहेत. ज्यांना त्यांच्याकडिल पेशंटच्या अतोनात संख्येमुळे एखाद्या पेशंटला द्यायला पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ नाही. त्यामुळे आमच्या जिल्ह्यात समुपदेशन नावाचा प्रकार नाही. मूळात सायकॅट्रिस्टसुद्धा नाही अश्या गावात काउंसेलर असणे तर शक्यच नाही.

मग कधीतरी मला वाटतं, शहरातल्या लोकांची मज्जा आहे बुवा. छोट्या छोट्या स्ट्रेससाठी गल्लोगल्ली काऊंसेलर उपलब्ध असतात. पण खरंच असं आहे का? जातात का शहरातले लोक काऊंसेलरकडे? काऊंसेलरकडे जाणं अजूनही तितकंच नामुष्कीचं राहिलंय का? एखाद्याला मानसिक उपचारांची किंवा समुपदेशनाची फार गरज आहे असे आपल्याला दिसतेय आणि आपण त्याला ते सुचवितोय यात ती व्यक्ती ऑफेंड तर नाही ना होत?

माझ्या प्रॅक्टीसमध्ये माझ्याकडे आलेल्या रूग्णांना मी गरज असल्यास 'मानसिक उपचार घ्या' असे सहज सांगू शकते.
गंमत म्हणजे अगदी आत्महत्येचे रूग्णंजरी असतील तरी माझ्याकडून बरा झाला आता मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेऊ आणि मग डिस्चार्ज देवू असं म्हणताच त्याच दुपारी बिल क्लिअर करून बहुतेक जण पळून जातात. ते डॉक्टर संध्याकाळी विजिटींगला येतात म्हणून. मग नंतर हे लोक कुढत जगतात, बरे होतात की परत एखादा आत्महत्येचा प्रयत्न करतात काही पत्ता लागत नाही.

तरिही रूग्णांना मानसोपचार देणे /द्यायची शिफारस करणे मला सहज शक्य आहे.
पण एखादा माझा रूग्णं नसेल तेव्हा? किंवा एखादा केवळ आंतरजालावरिल ओळखीचा असेल तेव्हा?
एकजण खूप चटका लावून गेला जीवाला. त्याला मानसोपचाराची गरज आहे हे त्या संस्थळावरिल प्रत्येकाला समजत होतं. काही ते उघडपणे लिहित तर काही उगाच वादासाठी वाद म्हणून त्या आयडीला / त्याच्या थोड्याफार विक्षिप्त लिखाणाला सपोर्ट करित. मग एकदा त्याने आत्महत्याच केल्याची बातमी आली. (कृपया त्याचे नाव माहित असलेल्यांनी इथे लिहू नका. मी केवळ एक उदाहरण घेतले आहे.) आपण अगोदरच त्याला समुपदेशनासाठी, मानसोपचारांसाठी का नाही जास्तं हॅमर केलं असं वाटत राहिलं.

आत्ताही कुणाला खरेच समुपदेशनाची गरज आहे असे केवळ आंतरजालावरच्या ओळखीतून लिहावे का, असा प्रश्नं मला पडलाय.

असो. तर मानसोपचारतज्ज्ञांचे एक जादाचे काम मला वारंवार पडत असल्याने माझ्यापुरते थोडेफार सतत वाचत असते.
पुस्तकांचा संदर्भ इथे दिला तर सगळ्यांनाच ते वाचायला जमेल असे नाही.
ढोबळमानाने जे आजारांचे वर्गीकरण आहे त्यापैकी कुठला आपल्याला आहे का हे समजण्यासाठी कित्येक टेस्ट जालावर उपलब्ध आहेत. यातल्या काही वर्तमानपत्रातल्या सो कॉल्ड आरोग्यविषयक स्तंभातही येत असतात. काही ठिकठाक असतात तर काही अगदीच यथातथा.
काहींची मांडणी इतकी सोप्पी असते की 'प्रत्येक प्रश्नात ए निवडला तर आपण रोगी , सी निवडला तर आपण अगदी फिट आणि बी निवडला तर सीमारेषेवर' असं कोरिलेशन चाचणी देणार्‍याला देतादेताच समजतं. त्यातही एखादा मुद्दाच उदाहरणार्थ नैराश्य, व्यसनाधिनता असे घेऊन त्यांच्या निदानासाठी बनविलेल्या चाचण्या बर्‍याच सापडतील. पण एकंदर स्वतःला मानसिक मदतीची गरज आहे का हे ठरविण्यात मदत करणार्या चाचण्या कमीच.
(याच लेखात मी अगोदर 'आपल्याला संभाव्य मानसिक आजारांकरिता समुपदेशन किंवा उपचारांची गरज आहे का?' याचा अंदाज करण्यास मदत करणारी एक चाचणी दिली होती. चर्चा पुढे जाण्यास किंवा अधिक मुद्दे पुढे येण्यास मदत व्हावी म्हणून. आणि एकदा ती चाचणी देऊन पहा असे सुचविले होते. पण त्यामुळे चर्चा पुढे सरकण्यास मदत होतेय असे न दिसल्याने ती मूळ लेखातून काढून खाली प्रतिसादात देत आहे.)
एकंदर मराठीत आरोग्यविषयक माहिती माहितीजालावर फार अपुरी आहे. इंग्रजीत प्रत्येक आजाराविषयी सामान्य माणसाला कळेल अश्या भाषेत ते अगदी व्यावसायिक आणि प्रशिक्षित डॉक्टरांसाठीच अश्या मोठ्या रेंजमध्ये माहिती उपलब्ध आहे.
आपल्याला सामान्यतः लहानमोठ्या शारिरीक आजारांच्या लक्षणांची माहिती असते. मात्र मानसिक आजारांच्या लक्षणांची माहिती नसते. आणि सर्वांना समजेल अश्या सोप्या भाषेत ती सहज नेटवर मराठीत उपलब्धही नाही.
चर्चेच्या अनुशंगाने या लेखात किंवा पुढिल भागात अशी माहिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
त्यामुळे सगळ्या प्रश्नांचं या धाग्यावर स्वागत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती_आंबोळे - पोस्ट आवडली...

सरतेशेवटी, माझ्याबद्दल गैरसमज झाले तरी चालतील, पण एखाद्याला समुपदेशनामुळे अतिशय मोलाची आणि लाइफसेव्हर मदत मिळू शकते तेव्हा त्याबाबत गैरसमज / पूर्वग्रह निर्माण करू नका वा पसरवू नका अशी सर्वांनाच विनंती करेन.
---- भविष्यात मी थोडी जास्त काळजी घेणार... मला माझा सन्देश पिडीत व्यक्ती पर्यन्त पोहोचवायचा आहे, आणि तोच माझा मुख्य उद्देश आहे. गैरसमज निर्माण होण्याचा धोका पत्करणे टाळायला हवे, गैरसमज निर्माण झाल्यास योग्य सन्देश पिडीत व्यक्ती पर्यन्त पोहोचणारच नाही, आणि जरी पोहोचला तरी त्याचा हवा तसा परिणाम होणार नाही.

आलेल्या अनुभवामधुन मी थोडा शिकेन... सल्ला तोच देणार, पण सल्ला देण्याच्या पद्धतीत बदल करणार.

समु पदेशनाचा उपयोग नक्की होतो ह्यावर माझा विश्वास आहे. कारण थेरपिस्ट तुम्हाला एक युनिक बाहेरचे पर्स्पेक्तिव्ह देतात. व त्यांना तसे खास ट्रेनिन्ग असते.

स्वाती पोस्ट चांगली आहे.

साती चांगला विषय. आमच्या कंपनीमध्ये वर्षाला तीन काउंसिलिंग अपॉइंटमेट्सची सोय आहे. एच.आर.ने तुमच्या मॅनेजरने गरज असेल तर तुम्हाला सुचवू शकतो किंवा तुमच्या घरचा काही प्रॉब्लेम असेल तरी तो काउंसिलर वापरू शकता असं ओरिएंटेशन मध्ये सांगितलं होतं. ही माहिती गुप्त असते आणि फार अपवादात्मक केसमध्ये काउंसीलर ती शेयर करेल असंही म्हणाली होती. आजकाल अशी कुठली नोकरी नसेल जिथे जॉब स्ट्रेस किंवा जॉबच्या कमिटमेंटमुळे घरी स्ट्रेस नसेल. किती कंपन्या त्यांच्या इंशुरन्समध्ये अशी सुविधा अफोर्ड करू शकतात माहित नाही पण स्वतः डॉ.कडे जा, रिफरल मिळवा किंवा कौंसिलर शोधा या सगळ्या पहिल्या पायर्ञा टाळून निदान एक दोन सेशन्स कुणाला करता येणे ही पण एक चांगली सुविधा आहेत. जसं आपलं शरीर दुखावलं की आपण त्याचे उपचार करतो तितकंच महत्वाचं आपलं मदुखावलं/थार्यावर नसेल तर त्यावरही उपचार केला तर त्यात काही वावगं किंवा लपवण्यासारखं करतोय असं वाटून घ्यायला नको. नेहमीच कुणी ऐकणारंही असेल असं नाही.

मागे एक उलट एक सुलट या सदरात याविषयी अमृता सुभाषने खूप छान लेख लिहिला होता. मला कितीतरी दिवस काही भरकटलेल्या पोस्टस पाहिल्या की या लेखाची आठवण येई. आज फायनली ते शेअर करायला हा धागा मिळाला.

आवडल्यास वरती लिंक दे साती.

http://www.loksatta.com/chaturang-news/actress-amruta-subhash-childhood-...

साती, छान धागा. मी वाचनमोडात.
हेडरमधली लिंक उघडत नाहीये. बघून सांगणार का?

वेका तो लेख अतिशय सुंदर आहे. त्यातले मुद्दे सगळ्यांनी लक्षात घेतले तर मग सल्ले दिलेत म्हणून राग येणार नाही.

उदय +१.
वेका, मस्तं लेख.

एखादी व्यक्ती आधीच दुखावलेली असताना तिची हेटाळणी करुन, त्या व्यक्तिबद्द्ल आपापसात तिला/त्याला कळेल असं गॉसिप करुन, या संवादामध्ये उत्साहाने उतरुन जुन्या गोष्टी उकरून त्या व्यक्तिसमोरच चर्चा केली तर त्या व्यक्तिला आपला सल्ला कसा घ्यावासा वाटेल, किंवा हेतू चांगला आहे/ सल्ला योग्य आहे हे कसं पटेल?
मग आपला समुपदेशनाचा सल्ला फक्त पोलिटिकली करेक्ट राहतो आणि समुपदेशन हे अबनॉरमल लोकांसाठी आहे असं अजूनच अधोरेखित होतं. आणि मग टर न उडवता एखाद्याने दिलेला हाच सल्ला अपमानास्पद वाटू शकतो.
खरचं कळकळ असेल, तर ती व्यक्ती टोमणे ऐकण्याच्या परिस्थितीत नाही, एवढी जाणीव ठेवली तरी पुष्कळ होईल. मदत करता येत नसेल, तर बाजूला होउन इतरांचा मदतीचा रस्ता आडवला जाणार नाही याची नक्की काळजी घ्यावी.

चर्चा चांगली आहे पणआन्तार्जालावारिल तूट पुन्ज्या ओळखिवर सल्ला द्यावा का यावर फारसे काहीच हाती लागत नाही
चर्चा होते ती समुपदेशनाचि गरज आहे का यावर.

ज्यावरुन वरील चर्चेला सुरवात झाली त्या बाफावर असा सल्ल्या देणार्या मामी या आयडिबद्दल ज्याला सल्ला दिला गेला त्या आयडी ने जे उदगार काढले त्यावरून तरी असा सल्ला द्यायच्या भानागडित अजिबात पडू नए असे जे माझे मत होते ते अजुन दृढ़ झाले.

मामीला त्याबद्दल काय वाटले माहीत नाही पण मला मात्र ते वाचुन वाईट वाटले. माम़ी ने थट्टा केलिय खुप वेळा खुप जनांची पण एक मर्यादा साम्भालुन. तिच्या लिखानातुन द्वेष, शिव्याशाप कधी दिसले नाहित. पण तरीही ज्याला सल्ले दिलेत त्याला ते दिसताहेत आणि तेहि आज सल्ले दिल्यावर दिसताहेत. याआधी कधी दिसल्याचे लिहिले नाही.

अशा परिस्थितीत सल्ले न दिलेले बरे. न दिल्याने होणारे नुकसान दिसत नाहीय पण दिल्यामुले नुकसान होते हे दिसतेय.

>>>एखादी व्यक्ती आधीच दुखावलेली असताना तिची हेटाळणी करुन, त्या व्यक्तिबद्द्ल आपापसात तिला/त्याला कळेल असं गॉसिप करुन, या संवादामध्ये उत्साहाने उतरुन जुन्या गोष्टी उकरून त्या व्यक्तिसमोरच चर्चा केली तर त्या व्यक्तिला आपला सल्ला कसा घ्यावासा वाटेल, किंवा हेतू चांगला आहे/ सल्ला योग्य आहे हे कसं पटेल?
मग आपला समुपदेशनाचा सल्ला फक्त पोलिटिकली करेक्ट राहतो आणि समुपदेशन हे अबनॉरमल लोकांसाठी आहे असं अजूनच अधोरेखित होतं. आणि मग टर न उडवता एखाद्याने दिलेला हाच सल्ला अपमानास्पद वाटू शकतो.
खरचं कळकळ असेल, तर ती व्यक्ती टोमणे ऐकण्याच्या परिस्थितीत नाही, एवढी जाणीव ठेवली तरी पुष्कळ होईल. मदत करता येत नसेल, तर बाजूला होउन इतरांचा मदतीचा रस्ता आडवला जाणार नाही याची नक्की काळजी घ्यावी.<<<

+१

उत्तम धागा काढलायस साती...

ठाकुर, स्वाती२,दिनेशदा आणि काहीजणांनी दिलेले मुद्दे अगदी योग्य आहेत. काउन्सेलिंग ही केवळ बोलणे आणि ऐकणे एवढ्यापुरती मर्यादित क्रीया नाही. सल्लार्थीची बॉडी लँग्वेज, अगदी तो वेळेवर येतो की उशीरा, एकटा येतो की सोबत घेऊन, आवाज, नजर, शब्दांची निवड, हावभाव,विशिष्ट लकबी अशा अनेक गोष्टींवरून व्यक्तिमत्व आणि त्यावेळची त्याची मनस्थिती कळायला मदत होते. त्यामुळे समुपदेशक आणि सल्लार्थी समोरासमोर असल्याने समुपदेशन चांगले होण्याच्या शक्यता वाढतात.

आता दुसरा प्रश्न, आंतरजालावर सल्ला द्यावा का ? याचे उत्तर खरोखर अवघड आहे. कारण एखादे व्यक्ती कोणत्या उद्देशाने इथे वावरतेय हे कळत नाही. जी ओळख दाखवली जातेय ती १००% खरी असण्याची शक्यताही कमीच. मानसिक समस्या असणार्‍या व्यक्ती तर डिफेन्स मेकॅनिजम म्हणूनही जालावर उत्तम मुखवटा घालून वावरताना मी अनुभवल्या आहेत. त्यामुळे तुमची प्रत्यक्ष ओळख असेल तरच खाजगीत सल्ला द्यावा. सार्वजनिक ठिकाणी कधीच नाही. आम्ही समूपदेशक तर नियमित येणार्‍या सल्लर्थींना सारवजनिक ठिकाणी ओळखही दाखवू शकत नाहीत एवढे वाईट पूर्वग्रह दुर्दैवाने समाजात आहेत.

आपल्याला मदतीची गरज आहे हे कळण्यासाठी कोणत्याही वेगळ्या चाचणीपेक्षा स्वसंवादावर आणि निकटच्या व्यक्तींच्या निरीक्षणांवर अवलंबुन रहावे.
एखाद्या गोष्टीमुळे (विचार्,भावना,सवयी इ) जर माझ्या दैनंदिन जगण्यावर, जवळच्या नातेसंबंधांवर, कार्यक्षमतेवर व स्वतःवर प्रेम करण्याच्या नैसर्गिक भावनेवर जर बंधने येत असतिल किंवा यात अडचणी येत असतिल तर समुपदेशकाकडे नक्की जावे.
चांगला समुपदेशक तुम्हाला रेडिमेड उपाय न सांगता वास्तवाचे भान, उपलब्ध पर्यायांचे भान देईल आणि समस्येतून बाहेर पडायला मदत करेल.
यातही समुपदेशक स्वतःच्या मर्यादा जाणून उगाच प्रयोग कधीच करणार नाही. गरज असेल तर तातडीने वैद्यकीय मानसोपचार घ्यायला सांगेल.

मला अजून एक वाटतं. समुपदेशन करणारी व्यक्ती अगदी आपल्या जवळची पण असू शकते. अशी व्यक्ती जी तटस्थपणे, पूर्वग्रह न बाळगता सल्ला देईल ती तुमची समुपदेशक असू शकते. जवळच्या नात्यात या दोन्ही गोष्टी अवघड असल्या तरी अशक्य नक्कीच नाहीत.

शेवटी 'त्या'च्या बद्दल. माझी चांगली ओळख होती त्याच्याशी. एकाच गावचे असल्याने संवादही होता. आत्ता सध्या त्याच्या कुटुंबाची परिस्थिती इथे न बोलणंच योग्य.
त्याची आत्महत्त्या निश्चितपणे थांबवता आली असती. त्याच्या मानसिक आजाराविषयी बोलण्याचे हे स्थान नव्हे.
बाकी त्याची ज्ञानेश्वरांशी तुलना, आणि समाधी, संथारा, संन्यास वगेरे गोष्टी चालू द्या ! ही मते तुमच्यापुरतीच ठेवा ही विनंती. एवढ्या उच्च विषयावर समजून उमजून बोलण्याची आणि मग निर्णय घेण्याची ज्यांची कुवत नाही अशी अनेक डोकी हे वाचत आहेत याचे भान ठेवा हे मात्र आग्रहाने सांगतेय.

मामीला त्याबद्दल काय वाटले माहीत नाही पण मला मात्र ते वाचुन वाईट वाटले. माम़ी ने थट्टा केलिय खुप वेळा खुप जनांची पण एक मर्यादा साम्भालुन. तिच्या लिखानातुन द्वेष, शिव्याशाप कधी दिसले नाहित. पण तरीही ज्याला सल्ले दिलेत त्याला ते दिसताहेत आणि तेहि आज सल्ले दिल्यावर दिसताहेत. याआधी कधी दिसल्याचे लिहिले नाही.

>>> साधना, खरंच सांगते मला काहीही वाटलेले नाही. कोणी असे लिहिल्यामुळे मी थोडीच वाईट ठरणार आहे? मी काय लिहिते ते मला पक्कं माहित असतं. ते जे जहाल शब्द माझ्याबाबतील लिहिले गेले त्यामुळे त्या आयडीची मनोवृत्तीच पुन्हा एकदा दिसून येते.

अशा परिस्थितीत सल्ले न दिलेले बरे. न दिल्याने होणारे नुकसान दिसत नाहीय पण दिल्यामुले नुकसान होते हे दिसतेय.

>>> हे खरंय. दान जसं सत्पात्री करावं तसेच सल्लेही सत्-आयड्यांना द्यावेत. Happy

स्वाती आंबोळे, जिज्ञासा,दिनेश,अतुल ठाकूर,अशोक इत्यादि सगळ्यांनी सातीच्या या धाग्यावर उत्तम प्रतिसाद दिले आहेत. प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी मानसोपचाराची गरज असतेच. फक्त ती गरज तो मानसोपचार तज्ञाकडे जाउन भागवतो कि हितचिंतक,धार्मिक अध्यात्मिक कर्मकांड वगैरे वगैरे या पातळीवर भागवतो हे मला महत्वाचे वाटते.औषधं उतारे आणी आशीर्वाद या सुधीर कक्करांच्या पुस्तकात त्याचा भाग आला आहे. पुर्वी इथे एक चर्चा या विषयावर झाली होती. तो धागाच नंतर गायब झाला आहे. तिथे मी जरा सविस्तर लिहिले होते असे आठवते.
साती,
>>माझ्या प्रॅक्टीसमध्ये मानसोपचाराची गरज असणारे खूप रुग्णं पहायला मिळतात. नोकरी, व्यवसाय,शिक्षणातले यश-अपयश, नातेसंबंधांतील गुंतागुंत अश्या मानसिक ताण वाढविणार्‍या कित्येक गोष्टी मधुमेह, उच्चरक्तदाब, अंगदुखी असे विविध आजार घडवून आणतात आणि असलेले आजार वाढवितात.<<
यावरुन मनोकायिक आजार ही गोष्ट किती कळीचा मुद्दा आहे हे अधोरेखित होते. पुण्याचे धन्वंतरी डॉ ह.वि. सरदेसाई हे ८० ते ८५ टक्के आजार हे मनोकायिक स्वरुपाचे म्हणता येईल असे असतात हे विधान करताना त्यांच्या लेखनात दिसतात. त्यांच्या अनेक भाषणात देखील ते हेच सांगतात.या विषयी आपले मत काय आहे?

वेका,

तुम्ही दिलेला अमृता सुभाष यांचा लेख खरोखरच वाचनीय आहे. त्याबद्दल धन्यवाद! Happy हे विधान विशेषकरून महत्त्वाचं वाटलं :

>> मानसोपचार आपल्या दु:खाकडे आपल्याला तटस्थपणे पाहायला शिकवतो

स्वत:च्या व्यवसायाकडे तटस्थपणे पाहता यावं म्हणून धंदेवाईक मालक लोकं बक्कळ पैसे देऊन व्यावसायिक सल्लागार (=बिझनेस कन्सल्टंट) नेमतात. समुपदेशक एक प्रकारचा वैयक्तिक सल्लागार म्हणून धरलेला चालावा.

आ.न.,
-गा.पै.

ती टेस्ट आहे त्या साईटवरुन.. मी फक्त कधीकधी झोप होत नाही, तरी उत्साह कायम असतो ( असे मला विमानप्रवासाच्या आदल्या रात्री होते ) आणि कधी कधी भूक नसताना खाल्ले जाते ( आता मीच केलेला पदार्थ जरा जास्तच चटकदार झाला तर असे होणारच ना ? ) या दोनच लक्षणांवर क्लीक केले होते.

साती, इब्लिस,

मला एक शंका आहे. हे तज्ञ डॉक्टर गरज नसताना औषधे लिहून देणार नाहीत, हा आपला भाबडा आशावाद तर नाही ? समजा अशी औषधे गरज नसताना घेतली गेली, तर त्यावर अवलंबून राहण्याची शक्यता कितपत आहे ?

थोडा मनोनिग्रह, घरातल्यांचे सहकार्य या उपायांचा फायदा अजिबातच नसतो का ?

काय वाट्याच था?
Happy

तुमचा ईमेल आयडी कशाला दिला?
मी इतक्यांदा रेफर करते ती साईट मला नाही आले कधी त्यांचे ईमेल्स!

दिनेशदा, खरा तज्ज्ञ डॉक्टर अनावश्यक औषधे मुळीच लिहून देणार नाही.
सायकॅट्रिक मेडिसीन्सचे साईड इफेक्ट इतके असतात की सर्वसाधारणपणे आम्ही ती लवकरात लवकर टेपर ऑफ करायचा प्रयत्न करतो.
घरच्यांचा सपोर्ट ही गोष्टच एखाद्याला मिळत नसेल तर?
मन आजारी पडतं तेव्हा मनोनिग्रह करणं कठिण असतं. जर मनोनिग्रह करता येत असेल तर काऊंसेलरची गरज नाही.
पण खरंच काही मोठा आजार असेल तर मनोनिग्रहासह औषधोपचारांचीही गरज असते.
अगदी थोडक्यात सांगायचं तर कुठलीही भाव भावना आणि विकार कमी/तीव्र /योग्य प्रमाणात असतात तेव्हा योग्य मात्रं तुमच्या दैनंदिन जीवनात आणि इंटरपर्सनल रिलेशनशीपमध्ये प्रश्नं निर्माण करतात तेव्हा अयोग्य.

सुरेख चर्चा सुरु आहे Happy

माझे मत अजुनही असेच आहे कि समुपदेशनाचा सल्ला जालावरुन देऊ नये. आता जरा सविस्तर म्हणणे मांडतो. मात्र त्या आधी एक सांगावेसे वाटते कि समुपदेशनाचा सल्ला देणे आणि प्रेमळ संभाषण करुन धीर देणे या दोन्ही गोष्टींची गल्लत करण्यात अर्थ नाही. जालावर देखिल धीर द्यायला, प्रेमाने बोलायला कुणाचीही हरकत नसावी. अर्थात त्यात दंभ नसेल तर. मात्र समुपदेशनाचा सल्ला देणे मला धोक्याचे वाटते कारण...

पहिला मुद्दा: एकतर जालावरील ज्या व्यक्तीला सल्ल्याची गरज आहे असे आपल्याला वाटते ती बहुधा आपल्या ओळखिची नसते. कळीचा मुद्दा हा आहे कि त्या व्यक्तीला कशामुळे निराशा आली आहे, आत्महत्या का करावीशी वाटते आहे याची आपल्याला कल्पना असणे शक्य नसते. त्यामुळे समस्येचे स्वरुप गुप्तच राहते. मुळात समस्या काय आहे हे न कळताच समुपदेशनाचा सल्ला देणे कितपत योग्य?

दुसरा मुद्दा : बरेचदा आत्महत्येचा विचार बोलुन दाखवणार्‍या व्यक्ती या हा विचार बोलुन सुचवत असतात कि त्यांना मदतीची आवश्यकता आहे. जर ती वेळेवर मिळाली नाही तर विचार कृतीत यायला वेळ लागत नाही. अशावेळी घरच्या, आजुबाजुच्या आणि इतर मित्रमंडळींनी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. यात जालावरुन समुपदेशनाचा सल्ला त्या व्यक्तीला देऊन नक्की काय साध्य होणार?

तिसरा मुद्दा : निराशेच्या आत्यंतिक टोकाला गेलेल्या व्यक्ती कसलाही सल्ला ऐकण्याच्या मनस्थितीत असतात किंवा नाही याची कसलिही खात्री देता येत नाही. त्यांचा मनोविकार कुठल्या थराला गेला असेल याची आपल्याला कल्पना येऊ शकत नाही. कदाचित त्या जालावर येऊ शकत असतील, कदाचित दिवसभर जालावरच बसत असतील, कुठल्यातरी भ्रामक जगात वावात असतील, काहीही शक्य आहे. अशावेळी स्वतःहुन सल्ला ऐकुन समुपदेशनाला जाणे ही गोष्ट कठिण वाटते.

चौथा मुद्दा : मनोविकाराने ग्रस्त असलेली व्यक्ती समुपदेशनाचा सल्ला कसा काय घेईल याची तरी खात्री कोण देणार? डिप्रेशनसारखा आजार असेल तर साध्या साध्या गोष्टी फार मनाला लागुन माणुस घळघळा रडायला लागतं. डिप्रेशनसारख्या आजारात बर्‍याच जणांना बाहेर पडण्याचीसुद्धा भीती वाटते. अशांना असा उपाय सांगुन आपण त्यांची समस्या अधीक कठिण तर करत नाही ना हे देखिल पाहणे आवश्यक असते.

पाचवा मुद्दा : नक्की समस्या काय आहे हे आपल्याला माहीत नसते. कदाचित बायपोलर पर्सनॅलिटी असेल. काही वेळा आनंद तर काही वेळा निराशा. कदाचित चिंताग्रस्तता असेल, कदाचित प्रचंड नैराश्य आलं असेल आणि ते दूरच होत नसेल. स्किझोफ्रेनियासारख्या विकाराची सुरुवात असेल. ऑबसेसिव प्रॉब्लेम असेल. या बरेचदा टोक गाठलेलं असतं, गुंतागुंत वाढलेली असते. आणि या व्यक्तींना फक्त घरचीच माणसे किंवा मित्र मंडळी मदत करु शकतात. जालावरच्या सल्ल्याचा कितपत उपयोग होईल याबद्दल शंका वाटते कारण बहुधा या व्यक्ती सल्ला ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात.

सहावा मुद्दा : ज्याच्या मनाचाच गोंधळ उडाला आहे अशा व्यक्तीने योग्य मानसोपचार तज्ञ निवडणे, समुपदेशक निवडणे, त्याची अपॉईंटमेंट घेणे , तेथे वेळेवर जाणे, त्याच्याशी धडपणे बोलणे, त्याने सांगितलेले ऐकण्याच्या मनस्थितीत असणे, या गोष्टी सोप्या नाहीत. अशा वेळी घरच्या व्यक्तीला ही लक्षणे सायकियाट्रीस्टला सविस्तर सांगावी लागतात. त्यामुळे हा सल्ला रुग्णाच्या घरच्या व्यक्तीला द्यावा लागतो. रुग्ण बहुधा ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात.

मला या सार्‍या थेरेपित ह्युमन टच हा भाग सर्वात महत्वाचा वाटतो आणि त्याला पर्याय नाही अशी माझी नम्र समजुत आहे. जालावर व्यक्तीला धीर दिला जाऊ शकतो, प्रेमळ शब्दांनी सांत्वन केले जाऊ शकते पण या गोष्टी स्पर्शाची जागा घेऊ शकत नाहीत. समोर बसुन केलेले समुपदेशन आणि त्यानंतर घरच्यांनी दिलेली मायेची उब या गोष्टी जादुच्या कांडीचे काम करु शकतात, जालावरच्या कधीही न पाहिलेल्या अपरचित व्यक्ती याची जागा घेऊ शकतील ही गोष्ट मला कठिण वाटते.

वेका, छान लिंक. स्वाती आंबोळे पोस्ट आवडली.
मितान, बरे झालेस तू इथे लिहिलेस. वाट बघत होते तुझ्या पोस्ट्सची.

दिनेशदा,
उडदामाजी काळे-गोरे हे होतेच. पण तरीही आत्तापर्यंतचा अनुभव बघता फक्त एक सायकिअ‍ॅट्रिस्ट वाईट निघाला. वाईट म्हणजे त्याने सायकॉसिस झालेल्या व्यक्तीला इनपेशंट ट्रिटमेंटची गरज होती तेव्हा योग्य फॅसिलिटीत न हलवता स्वतःच्या सबस्टन्स अ‍ॅब्युझ साठी रीहॅब होते तिथे हलवले. पण मग शोध घेतल्यावर दुसरे खूप चांगले डॉक्टर मिळाले आणि ती व्यक्ती आता नॉर्मल आयुष्य जगत आहे. बहुतेक मानोपसचार तज्ञ हे आपल्या पेशाची बांधिलकी पाळणारे आणि अतिशय सहृदयी आढळले. बघण्यात आलेले क्लिनिकल सायकॉलॉजिस्टही याच क्षेत्रात काम करायचे आहे हे ठरवून एक ध्येय ठेवून या पेशात आलेले असे होते. मात्र बरेचदा लोकांची अपेक्षा झटपट गुण यावा अशी असते. झटपट गुण येणार नाहीये. कदाचित कंडीशन आयुष्यभर मॅनेज करावी लागणार आहे. काही वेळा रिलाप्स होवू शकतो हे घरच्यानी मान्य केले, सहकार्य केले तर चांगला अनुभव येतो.

Pages