(मांजरांची)हिंजवडी चावडी

Submitted by mi_anu on 7 March, 2015 - 07:55

स्थळः हिंजवडीमधून दोन किलोमीटर अंतराच्या आत कोणत्याही दिशेला असलेले एक मोठे हॉटेल. "बुफे" ३५० पेक्षा कमीत मिळत असल्यास आणि जेवणाला चांगली चव असल्यास हॉटेल बाद समजले जावे आणि चावडीतील मांजरे ही उंदीर समजण्यात यावीत. हे सगळे एका वर्कशॉपसाठी जमले आहेत. यातून खूप काही नवीन मुद्दे निघाले आणि खूप अद्वितीय सुधारणा झाल्या असं यांना या दिवसाच्या अंती एका रंगीत एक्सेल मध्ये पुराव्याने शाबित करायचं आहे. (या एक्सेल मधले मुद्दे हे प्रत्येक वर्षी मागच्या वर्षीचं कॉपी पेस्ट असतात आणि ॠषीचं कूळ शोधू नये या अलिखीत नियमाप्रमाणे या एक्सेल मध्ये कॉपी पेस्ट न करता मूळ मुद्दे कोणी लिहीले याच शोध कोणीही घेऊ नये.ही मांजरे विविध भाषी,विविध लिंगी, विविध प्रांती आणि विविध वंशी आहेत पण तुम्हा आम्हाला मराठी चांगले येत असल्याने सर्व संभाषण मराठीतून आहे तस्मात कृपया "काँपॉनीत मॉरॉठी माणसांची मोनॉपली आणि पक्षपात" म्हणून इतर भाषांमध्ये शंख करु नये.)

"काय रे, व्हॉटस अप विथ प्रोजेक्ट?"
"नाव घेऊ नकोस प्रोजेक्टचं.कोणीही केबिनीत आलं टकटक करुन की धडधडायला चालू होतं. काहीहीहीही कारणं देऊन कामं सोडतात. कोणाला पुढे शिकायला परदेशी जायचं असतं तर कोणाला मुलांच्या टॉप क्लास शाळेत प्रवेश मिळावा म्हणून त्या शाळेच्या एक किलोमीटर मध्ये भाड्याने रहायला जाऊन तिथेच नोकरी शोधायची असते.परवा तो हा म्हणाला की गावी जाऊन वडिलांचं मॅचिंग ब्लाऊजपीस चं दुकान चालवणारे. आय आय टी आणि नंतर आय एस बी करुन आलेला हा दत्तू ब्लाउजपीस च्या गल्ल्यावर बसेल यावर विश्वास ठेवायला मी कडोसरे बुद्रुक वरुन आलोय काय? समंजस,कष्टाळू,मिळेल त्यात आनंद मानणार्‍या म्हणून बायका टिम मध्ये घ्याव्या तर एकजात सगळ्या परदेशी २ वर्षांसाठी जाणार्‍या नवर्‍यांशी लग्न केलेल्या असतात किंवा करणार असतात.बॅचलर पोरं उशिरापर्यंत बसून कामं करतील म्हणून टिममध्ये पोरं घ्यावी तर ती दर चार तासांनी चहा मारायला टपरीवर जाणार, जीम मध्ये एक तास घालवणार, आय पी एल च्या शेवटच्या दिवशी यांना अचानक ताप येणार आणी घरी रहावं लागणार, मुलींबरोबर ओळखी वाढवायला सगळीकडे भाग घेणार.सहा महिन्यांनी आऊटिंगसाठी रिकामी स्वयंसेवकगिरी, सारख्या टेनिस, कॅरम, क्रिकेटच्या मॅचेस,नाच, गाणी यातून जो उरलेला वेळ मिळेल त्यात निम्मा वेळ कामं करतात आणि उरलेला वेळ पगारवाढीसाठी भांडतात. अविवाहीत मुली टिममध्ये घ्याव्या तर त्यांचा दिवसातला बराच वेळ ऑनलाईन शॉपिंग मध्ये आज काय ऑफर आहेत आणि दिलेल्या ऑर्डरी कलेक्ट आणि बदलून घेण्यात जातो. त्यातल्या त्यात लग्न झालेली पण मुलंबाळं नसलेली पोरं बरी पडतात. वेळ पण असतो आणि डोक्यावर "घर घ्यायचंय, कमवायचंय, नीट काम करायचंय" वाला ताण पण.पण ही गणितं पण चुकतात."घर घेतलं,चांगल्या एरियात घेतलं, इ एम आय जास्त आहे म्हणून खूप पैसे पाहिजे" म्हणून एक दिवस अचानक उडून जातात आणि गहिवरल्या आवाजात "अशी पांखरें येतीं...आणिक स्मृती ठेवूनि जाती" आळवत नवी पाखरे शोधावी लागतात. तुझ्याकडे रंग कसे आहेत यावेळी? सगळं हिरवं,पिवळं की लाल?" (हे हिरवे पिवळे लाल हे एक्सेल मधले इंडिकेटर आहेत जे मांजरांना दूध पाव देण्यासाठी किंवा त्यांच्या पाठीत झाडूचा रट्टा मारण्यासाठी उन्हाळ्यात वापरले जातात.)

"लोक २० वर्षांपूर्वीचे चांगले शिकलेले लोक पोष्ट ऑफिसात चिकटावे तसे इथे चिकटून बसले आहेत. काम चांगलं, जो माल बनवतो त्याला बाजारात उठाव भरपूर. त्यामुळे लोक सोडतही नाहीत आणि टिम चेंज पण मागत नाहीत. आता सगळ्याच टिम मेंबर काय लाँग लीव्ह वर जाणार्‍या बायका घेता येत नाहीत ज्या स्वत; टिम सोडतील आणि परत आल्यावर त्यांना "सॉरी म्याडम, म्युझिक चेअर मे आपका चेअर गया, आप आऊट" असं सांगता येईल. कोणालाही कोणाच्याही हाताखाली घालता येत नाही. सगळेच ६-७ वर्षं वाले. तरी मी त्यांना गप्पांमध्ये "हडूप, स्प्रिंग, (इथे या टिममध्ये काम होत नाही असे कोणतेही नाव घाला)" ला बाजारात कश्शी मागणी आहे आणि ते न शिकणारे बाराच्या भावात गेले असं सुचवत असतो."

"वाह वाह!! यालाच "हम अपनी मौत का सामान ले चले" वगैरे म्हणतो ना तो गालिब की अमुक तमुक नसराबादी? इथे आम्ही जीवाच्या आकांताने अ‍ॅट्रिशनचा उतारावरुन कोसळणारा दगड सारखा वर ढकलून नेतोय आणि हा येडा "जा, जा, जा मुझे ना अब याद आ तू" गातोय. हा अजिंक्य बघ कसा निवांत आहे. लोक याच्या टिम सोडत नाहीत, याच्याबद्दल वाईट बोलत नाहीत, टिम चेंज मागितला तर याच्या टिम मध्ये जायचा हट्ट धरतात. अजिंक्य आपकी इस सफलता का राज क्या है? क्या आप कणीकचंद पान मसाला खाते है?"

"अरे हळू बोल रे भौ. माझी प्रतिमा...."
"अरे तुझी प्रिया ना, ही आता प्रतिमा कोण काढलीस नवी?"
"गप ना बे!! बोलू दे ना ज्याला प्रश्न विचारला त्याला, काय त्या अर्नब कमस्वामी आणि विखील नागळे सारखा करु र्‍हायला? अजिंक्या सांगून टाक तुझं सीक्रेट."

"सीक्रेट बिक्रेट काही नाही मित्रांनो, मी माणसांना माणसांसारखे वागवतो. ब्याचलरांच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो, बायकांच्या मुलांबद्दल विचारतो, त्यांच्या अमुक शाळा आणि तमुक क्लासच्या असंबद्ध गप्पा मध्ये न थांबवता ऐकतो. प्रत्येकाशी जागेवर जाऊन दोन वाक्यं रोज बोलतो.ज्यांना बढती देता येत नाही त्यांना पैसे देतो, ज्यांना पैसे देता येत नाहीत त्यांना बढती देतो, ज्यांना दोन्ही देता येत नाही त्या जर मुली बायका असल्या तर त्यांच्या ड्रेसला आणी आयशॅडोला वगैरे काँप्लीमेंट देतो, त्यांना दिवसातून एकदा एकेकट्या असताना "तुझ्याचमुळे या टिममध्ये जिवंतपणा आहे" हे सांगतो. माणसं मी गोड बोलून पंधरा मिनीटं समजवलं तर त्यांचा गळा कापायची सुरी स्वतः धार लावून माझ्या हातात आणून देतात. हा एक कठीण वसा आहे."

"अजिंक्या, गप्पा बिप्पा ठीक आहे पण मुली बायकांना विशेष अटेंशन देऊन तू इंग्रजी वर्णमालेतली शेवटची दोन अक्षरं पणा करतो आहेस. मला वाटतं तू एफ एल आय आर टी करतो आहेस. अशाने लेका एक दिवस अचानक तुरुंगात तरी असशील किंवा परत बोहल्यावर तरी."

"ए एफ एल आय आर टी म्हणून शिवी नको देऊ रे! मी कलात्मक रित्या माणसातल्या माणसाचा आदर करुन त्याचा इगो सुखावून त्यांना कामात आनंदी रहायला प्रवृत्त करतो. तुरुंग किंवा बोहलं दोन्ही कडे जाणार नाही इतक्या सावधपणे गोष्टी करतो, पण वेळ खूप द्यावा लागतो.वर बायको "लिव्हिंग हाऊस ड्युटीज असाइड अँड रोस्टिंग जवार फ्लॅट्ब्रेड्स फॉर आर्मी" वाले टोमणे जमेल तेव्हा मारते. पस्तीस किलोमीटर गाडी चालवून सकाळी आठला केबिनीत जातो तो थेट रात्री नऊला गाडीकडे आणि दहाला मुलं झोपल्यावर घरी. माझ्यावर "सूर्य न पाहिलेला माणूस" असं एक आत्मचरित्र लिहून घेणार आहे कोणाला तरी पैसे देऊन.भगतबुवा लिहीतात, मूर्तीकाका लिहीतात, मूर्तीकाकू लिहीतात, टाटा आणि बियाणीकाका लिहीतात आणि लोकं वाचतात, मी लिहीलं तर किमान टिम मधले ४० तरी नक्की वाचतील."

"वाचतील नक्कीच, पण विकत घेऊन नाही, अ‍ॅन्युअल गिफ्ट म्हणून दिलं तर वाचतील."

"तो एक साला डोक्याला नवा भुंगा आहे. दर वर्षी ओरडत असतात. मागच्या वर्षी बॅगा दिल्या तर "गॅजेट द्या" म्हणून ओरडत होते. त्याच्या मागच्या वर्षी टॅब दिले होते तर कुंपणापलिकडे आयपॅड देतात आणि तुम्ही xxxxxx बी एस एन एल पेंटा म्हणून धडाधड पेप्रं टाकून कुंपणापलिकडे गेले. त्याच्या आधी सोन्याचं पाणी दिलेले पेन दिले होते तर म्हणे अश्मयुगीन गिफ्टा देतात. यांना कप, बॅगा, बुटं, टॅब, मोबाईल, किचेन, कप, टिशर्ट, घड्याळं सगळं देऊन झालं अ‍ॅन्युअल गिफ्टा म्हणून, पण प्रत्येक वेळी तितक्याच त्वेषाने वस्तू फालतू असल्याचं सांगतात. आता फक्त केल्विन क्लेन ची आतील वस्त्रे किंवा पाकिटात घालून थेट नोटा देणं बाकी आहे."

"काय रे, तुझ्या टिममध्ये काही लक्षणीय नव्या व्यक्ती आल्या आहेत म्हणे? हल्ली आमची टिमची पोरं काहीतरी शंका विचारायला म्हणून सारखी तुमच्या इथे घोटाळत असतात. " वस्तू बनवणार्‍या आणि त्यांची गुणवत्ता तपासणार्‍या टिम मध्ये सिनर्जी, सामंजस्य,खेळीमेळी ठेवा" हे ओरडून तीन वर्षं माझा घसा बसला आणि यावर्षी एकदम इतकी धबाधबा सिनर्जी आहे की पोट्ट्यांना "काही गोष्टी मेल ने विचारा, सगळ्या ठिकाणी फेस टु फेस ची गरज नाही" म्हणून थोपवावं लागतंय."

"तोंड उघडत नाहीत तोपर्यंतच लक्षणीय.ऑनलाईन शॉपिंग सुंदरी परवा शेजारच्याला विचारत होती लिनक्स वर डी ड्राईव्ह कुठे आहे म्हणून. ही नवी पोरं टोरं सगळं ड्रॅग ड्रॉप करतात किंवा त्यांना टच स्क्रीन लागते.कमांड मधून गोष्टी करता येत नाहीत आणि त्या शिकायची गरज किंवा ईच्छा दोन्ही नाही. त्यांना डॉसमधून मशिन पिंग करुन बघा म्हटलं की समोरुन कोणीतरी स्वाहिली किंवा सुमेरियन भाषेत बोलल्यासारखी मख्ख तोंडं करुन बघत बसतात."

"त्यांना या सगळ्या गोष्टीत वेळ घालवायची किंवा शिकण्याची ईच्छा नाही, कोणीतरी ती त्यांना करुन देईलच आणि मग ईतर ग्लॅमरस गोष्टी शिकण्यासाठी जास्त वेळ देता येईल हे त्यांना माहिती आहे.ही पोरं चुकीची नाहीत रे, त्यांना फक्त इन्स्टंट आणि स्पष्ट दिसणारी फळं मिळतील अशाच गोष्टींमध्ये वेळ घालवायचाय.डोळ्यापुढे चित्र स्पष्ट आहे दहा वर्षानंतर काय करणार ते.कॉलेजच्या पहिल्या वर्षीच आईबाबांकडून लॅपटॉप मिळवले आहेत. कोणत्याही गोष्टीसाठी संघर्ष काय असतो आणि तो करुन फुकट शक्ती वाया का घालवायची, कोणीतरी करुन देईलच या दोन्ही भूमिका पक्क्या आहेत. आपल्यासारखे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी इकडे तिकडे हात जोडून डेस्कटॉप वर रोज पंधरा मिनीटं मिळवून त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट टाईप केला नाहीय.ज्या कमांडची कुठेही माहिती मिळत नाही आणि युजर इंटरफेस चालत नाही ती स्वत; प्रयोग करुन शिकल्यावरचा आनंद त्यांना झालेला नाहीय. सकाळी उठल्यावर यांच्यापुढची पहिली विवंचना म्हणजे कुठल्या वेगळ्या ठिकाणी जाऊन फेसबुकावर "फिलींग लव्हड्/वंडरफुल्/ग्रेटफुल्/ब्लेसड" स्टेटस टाकता येईल. यांच्यावरचा मानसिक ताण म्हणजे अमक्याच्या सेल्फीला माझ्या सेल्फीपेक्षा जास्त लाईकस का मिळतात. आपण या सर्व चित्त विचलीत करणार्‍या गोष्टी आणि खिशात पैसे नसताना शिकलो आणि आता चांगले दिवस पाहतोय, ही पोरं कमांडमधले किंवा कशातले बारकावे शिकली नाहीत तरी त्यांच्या आत्मविश्वासाने आणि नव्या दिशांनी विचार करण्याने पुढे जातीलच.आपण कष्टातून पुढे आलो म्हणून आपण ग्रेट आणि ती मुलं सोप्या परिस्थितीतून आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्ट न घाबरता करतात म्हणून ती वाईट हा आपला "गुड ओल्ड डेज" सिंड्रोम."

"ए भौ!! तू श्रीश्री, अमुक तमुक नंद, जगन्माता ठमा देवी वगैरे चा कोर्स करुन आला का? असं पाकात जिलबी सोडल्यासारखं काय बोलून र्‍हायला रे? यावेळी "अ‍ॅट्रिशन कमी करणे" आणि "क्वालिटी वाढवणे" याच्यावर दळण दळायचंय त्याच्या गिरणीला तेलपाणी करुन आला का ते सांग आधी."

"यावेळी लोकांना अजून तीन बक्षिसं देणार आहे. "पॅशनेट बॅडलकी परफॉर्मर", "जार्गन एक्सपर्ट", "बेस्ट यस मॅन" अशी. म्हणजे गोरा साहेब खडूस असला आणि चांगले मार्क देत नसला तरी पोरांना बक्षिसं देऊन मोटिव्हेटेड ठेवता येईल. आणि नव्या नव्या पोस्ट बनवणार आहे. "अलमोस्ट सिनीयर मॅनेजर", "टेक्निकल प्रॅक्टिशनर", "सिनीयरमोस्ट लीडर" अशा. लोकांना वर्षानुवर्षं एकच काम करतोय असं अजिबात वाटलं नाही पाहिजे. उन्हाळ्यात प्रत्येकाला दोन दोन आठवडे परदेशी पाठवणार. एकदा तिथल्या खर्च आणि तुटपुंज्या कमाईचा अंदाज आला की परत जायचा विषय काढत नाहीत तीन चार वर्षं. टिममधल्या त्यातल्या त्यात न पटणार्‍या दोन दोन च्या जोड्या काढून त्यांना एक्मेकांचा कोड रिव्ह्यू करायला सांगणार म्हणजे अत्यंत लहान सहान चुकाही लपणार नाहीत.चला प्रत्येकाने एक्सेलीत शेरेबाजी करा. निघायची वेळ झाली."

"तुला आपण खाल्लेल्या पनीर चिली, पनीर हैदराबादी आणि व्हेज अमृतसरी मध्ये काहीतरी फरक दिसला का? दिवसभर त्याच त्याच प्रॉब्लेम वर डोक्यावरचे केस कमी करायचे, त्याच त्याच चवीच्या वेगळ्या नावाच्या भाज्या खायच्या, पोट अजून वाढवायचं आणि फुक्क्ट मध्ये कंपनीचे चारशे प्रत्येकी घालवायचे. पुढच्या वेळी मामा मिसळ ला वर्क शॉप घेऊ आणि उरलेले पैसे वापरुन रेझॉर्ट ला सहकुटुंब जाऊ, निदान हाताखालची प्रजा नाही तर घरातली प्रजा तरी खूष."

(यात वर्णन केलेली सर्व मांजरे आणि सर्व घटना काल्पनीक आणि अतिरंजीत.याचा वास्तवाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केल्यास पुढच्या वेळी यांच्या मामा मिसळ येथे होणार असलेल्या वर्कशॉपचा म्होरक्या तुम्हाला बनवण्यात येईल याची गंभीरपणे नोंद घ्यावी.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

:ड