मानसोपचार आणि समुपदेशन

Submitted by साती on 6 March, 2015 - 07:08

(हा धागा प्रोग्रेसिव्ह असणार आहे. म्हणजे चर्चे दरम्यान जे काही प्रश्नं निर्माण होतील त्या अनुषंगाने मी या धाग्यात काही मुद्द्यांची वाढ करत जाईन. सध्या मोबाईलवरून लिहित असल्याने एकदम बरेचसे लिहिणे किंवा एडिट करणे किंवा संदर्भ देणे सोपे नाही. म्हणून जशी जमेल तशी भर या धाग्यात घालत जाईन)

माझ्या प्रॅक्टीसमध्ये मानसोपचाराची गरज असणारे खूप रुग्णं पहायला मिळतात. नोकरी, व्यवसाय,शिक्षणातले यश-अपयश, नातेसंबंधांतील गुंतागुंत अश्या मानसिक ताण वाढविणार्‍या कित्येक गोष्टी मधुमेह, उच्चरक्तदाब, अंगदुखी असे विविध आजार घडवून आणतात आणि असलेले आजार वाढवितात.

माझ्या कित्येक रूग्णांना तुम्हाला मानसोपचाराची गरज आहे असे सांगितले तरी ते घेत नाहीत. तुम्हीच द्या एक गोळी असे म्हणतात. खरं तर एक फिजीशीयन म्हणून मी मानसोपचाराची औषधेही लिहू शकते पण फार्मसी बाबतच्या कडक नियमांमुळे बरीचशी 'शेड्यूल एच' ड्रग्जआमच्या दवाखान्यात जास्तीत जास्त किती ठेवता येतील यांचा नियम आहे. त्यामुळे असलेला ठराविक कोटाच पुरवून पुरवून वापरावा लागतो. त्याहूनही महत्वाचे म्हणजे मानसिक रूग्णांना औषधोपचारांइतकीच समुपदेशनाचीही गरज असते जी माझ्या क्लिनिकमध्ये मला देता येत नाही. आमच्या एवढ्या मोठ्या जिल्ह्यात कायमस्वरुपी केवळ एकच सायकॅट्रीस्ट आहेत. ज्यांना त्यांच्याकडिल पेशंटच्या अतोनात संख्येमुळे एखाद्या पेशंटला द्यायला पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ नाही. त्यामुळे आमच्या जिल्ह्यात समुपदेशन नावाचा प्रकार नाही. मूळात सायकॅट्रिस्टसुद्धा नाही अश्या गावात काउंसेलर असणे तर शक्यच नाही.

मग कधीतरी मला वाटतं, शहरातल्या लोकांची मज्जा आहे बुवा. छोट्या छोट्या स्ट्रेससाठी गल्लोगल्ली काऊंसेलर उपलब्ध असतात. पण खरंच असं आहे का? जातात का शहरातले लोक काऊंसेलरकडे? काऊंसेलरकडे जाणं अजूनही तितकंच नामुष्कीचं राहिलंय का? एखाद्याला मानसिक उपचारांची किंवा समुपदेशनाची फार गरज आहे असे आपल्याला दिसतेय आणि आपण त्याला ते सुचवितोय यात ती व्यक्ती ऑफेंड तर नाही ना होत?

माझ्या प्रॅक्टीसमध्ये माझ्याकडे आलेल्या रूग्णांना मी गरज असल्यास 'मानसिक उपचार घ्या' असे सहज सांगू शकते.
गंमत म्हणजे अगदी आत्महत्येचे रूग्णंजरी असतील तरी माझ्याकडून बरा झाला आता मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेऊ आणि मग डिस्चार्ज देवू असं म्हणताच त्याच दुपारी बिल क्लिअर करून बहुतेक जण पळून जातात. ते डॉक्टर संध्याकाळी विजिटींगला येतात म्हणून. मग नंतर हे लोक कुढत जगतात, बरे होतात की परत एखादा आत्महत्येचा प्रयत्न करतात काही पत्ता लागत नाही.

तरिही रूग्णांना मानसोपचार देणे /द्यायची शिफारस करणे मला सहज शक्य आहे.
पण एखादा माझा रूग्णं नसेल तेव्हा? किंवा एखादा केवळ आंतरजालावरिल ओळखीचा असेल तेव्हा?
एकजण खूप चटका लावून गेला जीवाला. त्याला मानसोपचाराची गरज आहे हे त्या संस्थळावरिल प्रत्येकाला समजत होतं. काही ते उघडपणे लिहित तर काही उगाच वादासाठी वाद म्हणून त्या आयडीला / त्याच्या थोड्याफार विक्षिप्त लिखाणाला सपोर्ट करित. मग एकदा त्याने आत्महत्याच केल्याची बातमी आली. (कृपया त्याचे नाव माहित असलेल्यांनी इथे लिहू नका. मी केवळ एक उदाहरण घेतले आहे.) आपण अगोदरच त्याला समुपदेशनासाठी, मानसोपचारांसाठी का नाही जास्तं हॅमर केलं असं वाटत राहिलं.

आत्ताही कुणाला खरेच समुपदेशनाची गरज आहे असे केवळ आंतरजालावरच्या ओळखीतून लिहावे का, असा प्रश्नं मला पडलाय.

असो. तर मानसोपचारतज्ज्ञांचे एक जादाचे काम मला वारंवार पडत असल्याने माझ्यापुरते थोडेफार सतत वाचत असते.
पुस्तकांचा संदर्भ इथे दिला तर सगळ्यांनाच ते वाचायला जमेल असे नाही.
ढोबळमानाने जे आजारांचे वर्गीकरण आहे त्यापैकी कुठला आपल्याला आहे का हे समजण्यासाठी कित्येक टेस्ट जालावर उपलब्ध आहेत. यातल्या काही वर्तमानपत्रातल्या सो कॉल्ड आरोग्यविषयक स्तंभातही येत असतात. काही ठिकठाक असतात तर काही अगदीच यथातथा.
काहींची मांडणी इतकी सोप्पी असते की 'प्रत्येक प्रश्नात ए निवडला तर आपण रोगी , सी निवडला तर आपण अगदी फिट आणि बी निवडला तर सीमारेषेवर' असं कोरिलेशन चाचणी देणार्‍याला देतादेताच समजतं. त्यातही एखादा मुद्दाच उदाहरणार्थ नैराश्य, व्यसनाधिनता असे घेऊन त्यांच्या निदानासाठी बनविलेल्या चाचण्या बर्‍याच सापडतील. पण एकंदर स्वतःला मानसिक मदतीची गरज आहे का हे ठरविण्यात मदत करणार्या चाचण्या कमीच.
(याच लेखात मी अगोदर 'आपल्याला संभाव्य मानसिक आजारांकरिता समुपदेशन किंवा उपचारांची गरज आहे का?' याचा अंदाज करण्यास मदत करणारी एक चाचणी दिली होती. चर्चा पुढे जाण्यास किंवा अधिक मुद्दे पुढे येण्यास मदत व्हावी म्हणून. आणि एकदा ती चाचणी देऊन पहा असे सुचविले होते. पण त्यामुळे चर्चा पुढे सरकण्यास मदत होतेय असे न दिसल्याने ती मूळ लेखातून काढून खाली प्रतिसादात देत आहे.)
एकंदर मराठीत आरोग्यविषयक माहिती माहितीजालावर फार अपुरी आहे. इंग्रजीत प्रत्येक आजाराविषयी सामान्य माणसाला कळेल अश्या भाषेत ते अगदी व्यावसायिक आणि प्रशिक्षित डॉक्टरांसाठीच अश्या मोठ्या रेंजमध्ये माहिती उपलब्ध आहे.
आपल्याला सामान्यतः लहानमोठ्या शारिरीक आजारांच्या लक्षणांची माहिती असते. मात्र मानसिक आजारांच्या लक्षणांची माहिती नसते. आणि सर्वांना समजेल अश्या सोप्या भाषेत ती सहज नेटवर मराठीत उपलब्धही नाही.
चर्चेच्या अनुशंगाने या लेखात किंवा पुढिल भागात अशी माहिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
त्यामुळे सगळ्या प्रश्नांचं या धाग्यावर स्वागत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साती Happy

साती एक विनंती आहे. ती चाचणी ठळक फॉन्ट मधे कराल का? जोडीला 'एक चाचणी सापडली' त्या जागी ' स्वतः करुन बघता येइल अशी मानसिक आरोग्य चाचणी' असे काही लिहिलेत तर लगेच लक्षात येइल. कोपर्‍यात लिहिलेले पटकन लक्षात येत नाहीये.

Barech NGOs online, via phone २४*७ uplabdha astat madati sathi. Anonymously pan apan tyanna samparka karun apli adchan sangu shakto, adchanach asa nahi pan agdi bolavasa vatla tarihi.

Nehmipramanech chaan mahiti! Happy

अतुल ठाकूर तुमची पोस्ट अतिशय छान आहे. मला हेच मांडावसं वाटत होतं ते सगळं तुमच्या पोस्ट मध्ये आलंय.

साती खूप चांगला धागा काढल्याबद्दल अभिनंदन.

साती, आजकालच्या जीवनात जे प्रॉब्लेम्स येणे सहाजिकच आहेत, फक्त तेवढ्यावरच क्लीक केले तरी, आता अगदी समुपदेशन घ्याच असा रिझल्ट येतोय. नंतरच्या स्टेपला लगेच डॉक्टर सुचवला जातोय.

नेटवर सहसा काही फ्री नसते !

लक्षणे लिहिली आहेत सविस्तर, हे मात्र खरे !

सहसा (म्हणजे खरे तर कधीच) आंतरजालावरील वैद्यकीय माहितीवर / निकषांवर विसंबू नये असे वाटते. Happy

जो धागा एका डॉक्टरांनी काढला आहे त्यावर असे का होते आहे?

Uhoh

सगळ्यांना धन्यवाद.
अगदी हल्लीहल्लीपर्यंत काऊंसेलींगबद्दल आणि काऊन्सेलर्सबद्दल माझे काही फारसे चांगले मत नव्हते.
जो (मानसोपचारतज्ज्ञ नसणार्‍या) काउन्सेलरकडे जातो तो स्वतःला सांभाळण्यास लायक नाही असेही मत होते.
( मानसोपचारतज्ज्ञांकडे जाणारांबद्दल नव्हते)ग
असे एकदोन संदर्भ मायबोलीवरही असतील माझ्या लिखाणात. Happy
पण सध्या मत बदलतेय.
असो. तो एक वेगळा विषय आहे.

इतरांना काऊन्सिलींगचा सल्ला देणे यात मला काहीच चूक वाटत नाही. सल्लाच दिला आहे, कुणी जबरदस्ती थोडीच केली आहे?

इथं केवळ मायबोली परीघाबद्दल बोलायचं झालंतर मला दोन आयडीज पक्के माहित होते (त्यांच्या एकंदर लिखाणावरून) ते डिप्रेशनमधून जात आहेत. पण आपण कशाला काय बोलावं म्हणून मी गप्प! त्या दोन्ही आयडींना मी प्रत्यक्ष भेटलेली नाही, पण नंतर कधीतरी त्यांनी मला बोलताना "त्यादरम्यान अमुक झालं होतं माझ्यासोबत आणी त्यामुळे मी फार टेन्शनमध्ये होते/होतो" असं सांगितलंय. सुदैवानं ही लक्षणं फार सौम्य असतील, आजूबाजूला इतर काही सपोर्ट सिस्टीम असेल आणि या दोन्हीव्यक्ती त्या डिप्रेशन फेजमधून सहीसलामत बाहेर आल्यात (असं वाटतंय, कारण प्रत्यक्ष भेट नाही!) असो..

समुपदेशनाचा सल्ला म्हणजे "वेड लागलं आहे" असं म्हणणं याबद्दल खरंच अवेअरनेस वाढवायला हवाय.

काऊन्सेलरकडे जाणे आणि सायकिअ‍ॅट्रिस्टकडे जाणे यातला फरक कसा करावा?
किंवा आपल्याला/ जवळच्या व्यक्तीला जे काय वाटतंय/ होतंय त्यासाठी काऊन्सेलर उपयोगाचा की सायकिअ‍ॅट्रिस्ट याचे निर्णयन कसे करायचे/ कसे केले जाते?

मुख्य विषय जितका महत्त्वाचा म्हणून साती यानी मांडली आहे तितकाच तो सुंदररितीने ओळखीचाही करून दिला आहे. धागा प्रकाशित होत॑क्षणीच मी तो वाचला होता....आणि नंतर काही वेळाने उत्सुकतेने भेट दिली तर इतके अभ्यासू प्रतिसाद आल्याचे दिसले आणि जाणवले की समुपदेशन आणि पर्यायाने समुपदेशक यांचे महत्त्व सर्वांवर छान बिंबलेले आहे. अतुल ठाकुर तर या क्षेत्रातील कित्येक लोकांना भेटलेले आहेत, कौन्सिलिंग कार्यक्रमाचे ते अभ्यासपूर्ण आढावा घेतात. त्यांची प्रतिक्रिया मला अपेक्षित होती आणि त्यानी ती मांडलीही आहे समर्थपणे.

माझा कोल्हापूरातील अनुभव असे सांगतो की बहुतांशी लोक कौन्सिलिंग आणि सायकिअ‍ॅट्रिस्ट यांच्या केस हाताळणीसंदर्भात चूक करतात. कौन्सिलिंग ही संज्ञा तर खोलवर माहितीची नाहीच त्यामुळे एखाद्या मुलीला (किंवा मुलाला) तिचे वडील कौन्सिलिंगसाठी नेत असताना पाहिले की शेजारच्या काकू दुसर्‍या मावशीला लागलीच गुपित सांगितल्यासारखे कुजबुजतात, "लिलीला डोक्याच्या डॉक्टरकडे घेऊन गेले विनायकराव....". आता हा डोक्याचा डॉक्टर असे नामाधिमान प्राप्त झालेली व्यक्ती खरे तर निरुपद्रवी सल्लागार असते. पण त्याच्याबद्दल असे काही समाजात (मुंबईपुणेव्यतिरिक्त अन्य लहान शहरातील) गैरसमज निर्माण झाले आहेत वा केले गेले आहेत की त्यांच्याकडे गेले म्हणजे पोराची/पोरीची केस हाताबाहेरची झाली आहे.

समुपदेशनाच्या प्रसारामध्ये मोठी धोंड आहे ती शहाण्या माणसांचीच.

>>काऊन्सेलरकडे जाणे आणि सायकिअ‍ॅट्रिस्टकडे जाणे यातला फरक कसा करावा?
किंवा आपल्याला/ जवळच्या व्यक्तीला जे काय वाटतंय/ होतंय त्यासाठी काऊन्सेलर उपयोगाचा की सायकिअ‍ॅट्रिस्ट याचे निर्णयन कसे करायचे/ कसे केले जाते?>>
बरेचदा आयुष्यात घडलेल्या घटना जसे की जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, गंभीर आजार, शिक्षण-नोकरीतला ताण/अपयश नात्यातला ताण्/अपयश, इतर दु:खद्/भितीदायक घटना वगैरे असेल तर काउंसेलर. केमिकल लोचा असेल तर सायकिअ‍ॅट्रिस्ट + काउंसेलिंग असा आत्तापर्यंतचा अनुभव. चांगला डॉक्टर याबाबत छान मार्गदर्शन करतो.

काउंसलरला कोणतेही औशध प्रिस्क्राइब करायची परवानगी नसते. ते काम साय्काय्ट्रिस्टचे असते. मनोविकाराचे निदान झाल्याशिवाय काउन्सलर कि साय्काय्ट्रिस्ट हे ठरवता येत नाही. निदान करण्यासाठीच्या टेस्ट्स काउंसलर सुचवू शकतो त्याचे रिझल्ट्स आल्यावर तुम्ही साय्काय्ट्रिस्ट कडे जायचे का नाही ठरवू शकता...

सहसा पहिले काउंसलरलाच धरावे ... सायकाय्ट्रिस्ट लगेच औशधाचा सहारा घेतात असे ऐकीव माहिती आहे....

स्वतः अशी गरज आहे असे मानणे फार अवघड आहे, त्यावेळी घरातील इतर व्यक्तींनी त्या व्यक्तीचे मन वळवणे, हे फार महत्वाचे आहे. तसेच अशी ट्रींटमेंट चालू असताना, त्या व्यक्तीशी कसे वागावे, याचा सल्ला ते देतात, तो ऐकण्यासाठी तरी सोबत कुणीतरी जावेच.

वेळीच झालेल्या उपचारांचा नक्कीच फायदा होतो हे अनुभवलेय. कधी कधी तर जवळच्या व्यक्तीला असेही वाटू शकते, अरे हि व्यक्ती एवढ्या ताणातून जात होती / किंवा एवढे काय मनाला लावून घ्यायचे ते... पण त्याबाबतीतही स्वतःकडे दोष घेण्यापेक्षा, व्यावसायिक सल्लागाराच्या कौशल्यास मान देणे जास्त गरजेचे असते.

त्या साईटवरच्या प्रश्नांचे मराठीत भाषांतर करून इथेच देता येईल का ? ( तसे करणे बेकायदेशीर तर नसेल ना ? ) तसेच ती लक्षणे प्रौढांच्या केससाठीच आहेत. त्या पेक्षा लहान वयाच्या व्यक्तीत काही वेगळी लक्षणे असतात का ?

चांगला धागा, साती.

सायकिअ‍ॅट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट, काउन्सिलर, सोशल वर्कर इत्यादींच्या कार्यक्षेत्रातल्या फरकांबद्दल इथे वाचता येईल.

सुखी माणसाचा सदरा कोणालाच सापडलेला नाही. प्रत्येकाच्याच घरीदारी आपापले प्रश्न असतातच. त्याबद्दल दु:ख, नैराश्य, शक्य तिथे बदल / सुधारणेचा प्रयत्न, उपचार यातून सगळेच जातात. काहींना काळाचं औषध लागू पडतं आणि ते अशा प्रसंगांतून कोणतेही व्रण (स्कार्स) न घेता जीवनाभिमुख दृष्टीकोन जिवंत ठेवून बाहेर पडू शकतात. काहींना एखाद्या ट्रॉमामधून बाहेर पडणं अवघड होतं. कोणी जवळचं बोलायला, समजावायला असेल तर बरेचदा ते मनावरचा भार हलका करण्यास पुरेसं ठरतं. पण असं कोणी नसेल, तर किंवा असूनही त्यांच्याशी आपले प्रॉब्लेम्स डिस्कस करणं अवघड वाटत असेल तर काउन्सिलिंगची मदत होऊ शकते. याचं कारण अशावेळी झालेली नाजुक मनःस्थिती 'जज' न करता हॅन्डल करण्याचं त्यांना ट्रेनिंग असतं. जवळच्या नात्यात याचे अनुभव आहेत.

एखाद्याच्या आंतरजालावरील वावरातून त्याचे असे स्कार्स, एकटेपणा, नाजुक मन:स्थिती, तात्कालिक नैराश्य, त्यातून होणारी चिडचीड, पॅरानॉइया (लोक आपल्याविरुद्ध कट करून मुद्दाम वाईट वागत आहेत अशी मनोधारणा) हे प्रतिबिंबित होत असतील तर त्याने ते प्रॉब्लेम्स चव्हाट्यावर मांडण्यापेक्षा अशी व्यावसायिकाची मदत घेणं त्याला उपयुक्त ठरेल असं सुचवण्यात मला काही गैर वाटत नाही. अशी व्यक्ती सहसा ऐकण्याच्या आणि त्याच त्या निगेटिव्ह विचारांच्या परिघातून बाहेर पडायच्या मनःस्थितीत नसते, त्यामुळे असे सल्ले फोल जाऊ शकतातच, पण निदान आपण प्रयत्न केला याचं समाधान.

काउन्सिलिंग केवळ मानसिक आजारांसाठीच नसतं. कोणत्याही कठीण प्रसंगात संबंधितांनी आवश्यक वाटलं तर जरूर घ्यावं. उदाहरणार्थ कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचं निदान झाल्यावर इथे रुग्णाला आणि त्याच्या नातेवाइकांनाही ते घ्यावं असं डॉक्टर सुचवतात. शाळांमध्ये बिहेविअरल (तात्कालिक किंवा कायमस्वरूपी) इश्यूज असलेल्या मुलांना काउन्सिलर्स गाइड करतात. असा गाइडन्स हे वरदानच असतं. 'काउन्सिलर' हा शब्द इतका ऑफेन्सिव असू शकतो याचं मला सखेदाश्चर्य वाटत आहे. मला ही कल्पना नव्हती.

इथे अनेकदा लहान मुलांच्या आजारांवर इ. त्या (आरोग्यम् धनसंपदा) ग्रूपमध्ये सल्ले विचारले जातात. त्यावेळी कायम 'तुमच्या पीडिआट्रिशियनला विचारा' असं मी आणि माझ्या पाहण्यात काही अन्य आयडीज आवर्जून सांगतो. ते आम्ही पीडिआट्रिक्समधले तज्ज्ञ म्हणून नव्हे, तर आम्ही कोणीच तज्ज्ञ नाही म्हणूनच सांगतो. तसंच हेही.

सरतेशेवटी, माझ्याबद्दल गैरसमज झाले तरी चालतील, पण एखाद्याला समुपदेशनामुळे अतिशय मोलाची आणि लाइफसेव्हर मदत मिळू शकते तेव्हा त्याबाबत गैरसमज / पूर्वग्रह निर्माण करू नका वा पसरवू नका अशी सर्वांनाच विनंती करेन.

अवांतर :

नितीनचंद्र,

>> १) समाधी घेतलेल्या योग्याचे शरीर सडत नाही / अनेक तास ताजेतवाने दुर्गधी मुक्त असते.
>> ( संदर्भ : योगी कथामृत )

यावरून आठवण झाली. इथे एक ताजी बातमी आहे (इंगजी देवा) : http://www.bbc.co.uk/news/world-asia-31125338

आ.न.,
-गा.पै.

स्वाती, पोस्ट आवडली आणि पटली.
सातीच्या उदाहरणात >>
एकजण खूप चटका लावून गेला जीवाला. त्याला मानसोपचाराची गरज आहे हे त्या संस्थळावरिल प्रत्येकाला समजत होतं. काही ते उघडपणे लिहित तर काही उगाच वादासाठी वाद म्हणून त्या आयडीला / त्याच्या थोड्याफार विक्षिप्त लिखाणाला सपोर्ट करित. मग एकदा त्याने आत्महत्याच केल्याची बातमी आली. >> ह्या उगाच वादासाठी वाद घालणार्‍या, खोटा सपोर्ट दाखवणार्‍या लोकांना काही गिल्ट वगैरे वाटलं असावं का? असा प्रश्न पडला.

चांगला धागा! प्रत्यक्ष भेटीतून अधिक चांगला अंदाज येतो हे खरंय पण आजकाल आपला इंटरनेटवर वावर इतका वाढला आहे की आपल्याही नकळत आपण मूड प्रमाणे /विचारांप्रमाणे प्रतिसाद देतो आणि आपल्याला virtually ओळखणाऱ्या व्यक्तींना त्यातला फरक जाणवू शकतो. मी अनेकदा status message वाचून काय गं/काय रे असं विचारलं आहे आणि तसंच माझ्या ओळखीच्यांनी देखील मला विचारलं आहे!

मागे एकदा एका दुसऱ्या संकेतस्थळावर मला आत्महत्या करावीशी वाटते आहे असे एकाने लिहिल्यावर सदस्यांनी प्रतिक्रियांचा पाउस पडला आणि त्या व्यक्तीचे मन वळवले! त्या प्रतिक्रिया वाचताना मला फार छान वाटले होते!

पूर्वी आपल्याकडे फारशी ओळखदेख नसताना एकमेकांना हटकलं तर गैर मानत नसत. फु.स. देणे हा तर जन्मसिद्ध हक्क असे (अर्थात त्याचे तोटे होते) पण आता कोणाला असा सल्ला देणे म्हणजे त्यांच्या personal space वर encroachment वाटू शकते. मात्र जेव्हा खरंच गरज असते तेव्हा असा आगाऊपणा खूप मोठे काम करू शकतो!

People are always watching you! Much more than you think! So a lot of times all you need to do is ask! Ask for help and you'll get it! And work other way around too..keep an eye on people around you. Don't hesitate to offer help if you think they need it.

आपण सगळेच सदैव आनंदी, सुखी वै. राहात नाही, राहू शकत नाही त्यामुळे वेळोवेळी निर्माण होणाऱ्या ताणाचा, दुःखाचा, संतापाचा (थोडक्यात सगळ्या नकारात्मक भावनांचा) निचरा करत राहावा! रडावेसे वाटले तर (माझी strategy: एखादा हमखास रडवणारा सिनेमा पाहून/पुस्तक वाचून) रडून घ्यावे! हक्काच्या माणसांवर चिडून घ्यावे (नंतर सॉरी म्हणून टाकायचं!) नाहीतर सगळे साचत राहते आणि मग एक दिवस त्याचा मोठ्ठा प्रॉब्लेम होतो.

सगळेच इतकं छान लिहित आहेत.
की मूळ धाग्यापेक्षा प्रतिसाद अधिक सुंदर असल्याचे सुखद दृष्य आहे.
स्वाती आंबोळे , चांगली पोस्ट.

मला भारतातल्या सायकॅट्रिक काऊंसेलर्सचा प्रत्यक्ष अनुभव नाही. पूर्वी एच आय वी आणि टीबी मध्ये काम केले असल्याने त्या काऊंसेलर्सचा अनुभव आहे.
मायबोलीवर एक प्रॅक्टीसिंग काऊंसेलर आहेत त्यांना या धाग्यावर थोडी माहिती लिहायला सांगणार आहे.

निदान भारताततरी आणि सध्यातरी आपल्याला मनाचे काही दुखणे आहे हे लक्षात येताच किंवा आपल्या ओळखीच्या कुणाला मनाचे दुखणे आहे असे लक्षात येताच योग्य पदवी असलेल्या सायकॅट्रिस्टकडे घेऊन जाणे उत्तम. ते समुपदेशन तसेच औषधोपचारही करू शकतात. तसेच इतर काही शारिरीक आजार जे मानसिक बदल घडवून आणतायत ते ओळखून त्याप्रमाणे टेस्टस करून योग्य त्या डॉक्टरशी क्न्सल्टेशन सुचवू शकतात.
तसेच लाँग टर्म काऊंसेलिंग लागणार असेल तर विश्वासातले काऊंसेलर्स सुचवू शकतात.

बर्‍याच देशांत तुम्हाला डायरेक्ट सायकॅट्रिस्ट,, सायकॅट्रिक नर्स, काउंसेलर्स यांची अपॉईंटमेंट मिळत नाही.
पहिल्यांदा जी पी कडे जावून योग्य ते रेफरल लिहून घ्यावे लागते.

छान धागा आणि छान चर्चा.

आत्ताही कुणाला खरेच समुपदेशनाची गरज आहे असे केवळ आंतरजालावरच्या ओळखीतून लिहावे का, असा प्रश्नं मला पडलाय.

>>>> जर एखाद्या व्यक्तीच्या जालीय वावरातून सातत्याने काही पर्सनॅलिटी रीलेटेड इश्शूज अधोरेखित होत असतील तर त्या व्यक्तीला समुपदेशनाचा सल्ला देण्याची हरकत काहीच नसावी. हे वादाच्या भरात केलेले कृत्य नसेल तर त्यामागे त्या व्यक्तीला त्रास देण्याचा हेतू नसतो. उलट कळकळच असते. हा सल्ला देण्यासाठी क्वालिफिकेशनची गरज का भासावी हे कळले नाही. आयुष्यातील चढउतार, जवळच्या व्यक्तींच्या / मित्रमैत्रिणींच्या/स्वतःच्या आयुष्यातील असे अनेक अनुभव, या विषयातील थोडीफार सजगता, माणसं वाचता येण्याची साक्षरता आणि दुसर्‍या व्यक्तीबद्दल सहृदयता असेल तर काही व्यक्तींना काही घटक चटकन लक्षात येतात जे कदाचित इतरांच्या ध्यानात येणार नाहीत. मी असं म्हणत नाही की या व्यक्तींचा त्या आयडीबद्दलचा ठोकताळा १००% बरोबरच असेल. पण त्यांचा सल्ला जेन्युईन असतो उगाच कोणाची कुरापत काढण्यासाठी नसतो.

आंतरजालावर जेव्हा कोणी स्वतःचा एखादा प्रॉब्लेम लिहिते/तो, तेव्हा त्या प्रॉब्लेमचे मुल्यावलोकनही त्या व्यक्तीच्या आतापर्यंतच्या आंतरजालीय वावराच्या आधारानेच होणार हे उघड आहे. त्यामध्ये मग त्या व्यक्तीला व्यक्तिगत ओळखत नाही, पर्सनल इंटरअ‍ॅक्शन नाही वगैरे इश्शु आणण्यात अर्थ नाही. उगी उगी करण्यार्‍या आणि त्यामुळे लाडक्या ठरणार्‍या आयडींशीही त्या व्यक्तीची पर्सनल इंटरअ‍ॅक्शन बहुधा नसतेच. मग केवळ सल्ल्याची कटू गोळी गिळता येत नाही म्हणून दिलेला कळकळीच्या सल्ल्यावर आगपाखड करून नक्की काय साधते ते तेच जाणोत.

माझ्या मते. पहिल्या प्रतिसादात सायोनं म्हटल्याप्रमाणे झोडपून घेण्याची तयारी ठेवावी पण असे सुचित करायला काही हरकत नाही.

***********************************************************************************************************

एक गोष्ट आठवते. एक लहान मुलगा लहानसहान चोर्‍या करायला लागतो. पण त्याची आई त्याला पाठीशी घालत राहते. मग हळूहळू तो मोठ्या चोर्‍या करू लागतो आणि सरतेशेवटी एक खून करतो. त्या खूनाच्या खटल्यात त्याला फाशीची शिक्षा होते. शेवटची इच्छा काय असे त्याला विचारतात तेव्हा तो सांगतो की त्याला त्याच्या आईच्या कानात काहीतरी सांगायचे आहे. आई त्याच्या जवळ जाते तेव्हा तो तिच्या कानाचा कडकडून चावा घेतो आणि आईला म्हणतो की जर तू माझ्या पहिल्या चोरीनंतरच मला अडवलं असतंस तर माझ्यावर ही वेळ आली नसती.

सरतेशेवटी, माझ्याबद्दल गैरसमज झाले तरी चालतील, पण एखाद्याला समुपदेशनामुळे अतिशय मोलाची आणि लाइफसेव्हर मदत मिळू शकते तेव्हा त्याबाबत गैरसमज / पूर्वग्रह निर्माण करू नका वा पसरवू नका अशी सर्वांनाच विनंती करेन. >>> +१

स्वाती आंबोळे मस्त पोस्ट.

लहान मुलास त्याच्या सख्ख्या आईने चोरी करण्यापासून अडविणे आणि पन्नास वर्षांच्या नोकरदार व्यावसायिक व्यक्तिस आंतरजालावरील परक्या बाईने समुपदेशकाकडे जा असा सल्ला देणे ह्या दोन्हींची तूलना आश्चर्यकारक आहे.

Pages