मानसोपचार आणि समुपदेशन

Submitted by साती on 6 March, 2015 - 07:08

(हा धागा प्रोग्रेसिव्ह असणार आहे. म्हणजे चर्चे दरम्यान जे काही प्रश्नं निर्माण होतील त्या अनुषंगाने मी या धाग्यात काही मुद्द्यांची वाढ करत जाईन. सध्या मोबाईलवरून लिहित असल्याने एकदम बरेचसे लिहिणे किंवा एडिट करणे किंवा संदर्भ देणे सोपे नाही. म्हणून जशी जमेल तशी भर या धाग्यात घालत जाईन)

माझ्या प्रॅक्टीसमध्ये मानसोपचाराची गरज असणारे खूप रुग्णं पहायला मिळतात. नोकरी, व्यवसाय,शिक्षणातले यश-अपयश, नातेसंबंधांतील गुंतागुंत अश्या मानसिक ताण वाढविणार्‍या कित्येक गोष्टी मधुमेह, उच्चरक्तदाब, अंगदुखी असे विविध आजार घडवून आणतात आणि असलेले आजार वाढवितात.

माझ्या कित्येक रूग्णांना तुम्हाला मानसोपचाराची गरज आहे असे सांगितले तरी ते घेत नाहीत. तुम्हीच द्या एक गोळी असे म्हणतात. खरं तर एक फिजीशीयन म्हणून मी मानसोपचाराची औषधेही लिहू शकते पण फार्मसी बाबतच्या कडक नियमांमुळे बरीचशी 'शेड्यूल एच' ड्रग्जआमच्या दवाखान्यात जास्तीत जास्त किती ठेवता येतील यांचा नियम आहे. त्यामुळे असलेला ठराविक कोटाच पुरवून पुरवून वापरावा लागतो. त्याहूनही महत्वाचे म्हणजे मानसिक रूग्णांना औषधोपचारांइतकीच समुपदेशनाचीही गरज असते जी माझ्या क्लिनिकमध्ये मला देता येत नाही. आमच्या एवढ्या मोठ्या जिल्ह्यात कायमस्वरुपी केवळ एकच सायकॅट्रीस्ट आहेत. ज्यांना त्यांच्याकडिल पेशंटच्या अतोनात संख्येमुळे एखाद्या पेशंटला द्यायला पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ नाही. त्यामुळे आमच्या जिल्ह्यात समुपदेशन नावाचा प्रकार नाही. मूळात सायकॅट्रिस्टसुद्धा नाही अश्या गावात काउंसेलर असणे तर शक्यच नाही.

मग कधीतरी मला वाटतं, शहरातल्या लोकांची मज्जा आहे बुवा. छोट्या छोट्या स्ट्रेससाठी गल्लोगल्ली काऊंसेलर उपलब्ध असतात. पण खरंच असं आहे का? जातात का शहरातले लोक काऊंसेलरकडे? काऊंसेलरकडे जाणं अजूनही तितकंच नामुष्कीचं राहिलंय का? एखाद्याला मानसिक उपचारांची किंवा समुपदेशनाची फार गरज आहे असे आपल्याला दिसतेय आणि आपण त्याला ते सुचवितोय यात ती व्यक्ती ऑफेंड तर नाही ना होत?

माझ्या प्रॅक्टीसमध्ये माझ्याकडे आलेल्या रूग्णांना मी गरज असल्यास 'मानसिक उपचार घ्या' असे सहज सांगू शकते.
गंमत म्हणजे अगदी आत्महत्येचे रूग्णंजरी असतील तरी माझ्याकडून बरा झाला आता मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेऊ आणि मग डिस्चार्ज देवू असं म्हणताच त्याच दुपारी बिल क्लिअर करून बहुतेक जण पळून जातात. ते डॉक्टर संध्याकाळी विजिटींगला येतात म्हणून. मग नंतर हे लोक कुढत जगतात, बरे होतात की परत एखादा आत्महत्येचा प्रयत्न करतात काही पत्ता लागत नाही.

तरिही रूग्णांना मानसोपचार देणे /द्यायची शिफारस करणे मला सहज शक्य आहे.
पण एखादा माझा रूग्णं नसेल तेव्हा? किंवा एखादा केवळ आंतरजालावरिल ओळखीचा असेल तेव्हा?
एकजण खूप चटका लावून गेला जीवाला. त्याला मानसोपचाराची गरज आहे हे त्या संस्थळावरिल प्रत्येकाला समजत होतं. काही ते उघडपणे लिहित तर काही उगाच वादासाठी वाद म्हणून त्या आयडीला / त्याच्या थोड्याफार विक्षिप्त लिखाणाला सपोर्ट करित. मग एकदा त्याने आत्महत्याच केल्याची बातमी आली. (कृपया त्याचे नाव माहित असलेल्यांनी इथे लिहू नका. मी केवळ एक उदाहरण घेतले आहे.) आपण अगोदरच त्याला समुपदेशनासाठी, मानसोपचारांसाठी का नाही जास्तं हॅमर केलं असं वाटत राहिलं.

आत्ताही कुणाला खरेच समुपदेशनाची गरज आहे असे केवळ आंतरजालावरच्या ओळखीतून लिहावे का, असा प्रश्नं मला पडलाय.

असो. तर मानसोपचारतज्ज्ञांचे एक जादाचे काम मला वारंवार पडत असल्याने माझ्यापुरते थोडेफार सतत वाचत असते.
पुस्तकांचा संदर्भ इथे दिला तर सगळ्यांनाच ते वाचायला जमेल असे नाही.
ढोबळमानाने जे आजारांचे वर्गीकरण आहे त्यापैकी कुठला आपल्याला आहे का हे समजण्यासाठी कित्येक टेस्ट जालावर उपलब्ध आहेत. यातल्या काही वर्तमानपत्रातल्या सो कॉल्ड आरोग्यविषयक स्तंभातही येत असतात. काही ठिकठाक असतात तर काही अगदीच यथातथा.
काहींची मांडणी इतकी सोप्पी असते की 'प्रत्येक प्रश्नात ए निवडला तर आपण रोगी , सी निवडला तर आपण अगदी फिट आणि बी निवडला तर सीमारेषेवर' असं कोरिलेशन चाचणी देणार्‍याला देतादेताच समजतं. त्यातही एखादा मुद्दाच उदाहरणार्थ नैराश्य, व्यसनाधिनता असे घेऊन त्यांच्या निदानासाठी बनविलेल्या चाचण्या बर्‍याच सापडतील. पण एकंदर स्वतःला मानसिक मदतीची गरज आहे का हे ठरविण्यात मदत करणार्या चाचण्या कमीच.
(याच लेखात मी अगोदर 'आपल्याला संभाव्य मानसिक आजारांकरिता समुपदेशन किंवा उपचारांची गरज आहे का?' याचा अंदाज करण्यास मदत करणारी एक चाचणी दिली होती. चर्चा पुढे जाण्यास किंवा अधिक मुद्दे पुढे येण्यास मदत व्हावी म्हणून. आणि एकदा ती चाचणी देऊन पहा असे सुचविले होते. पण त्यामुळे चर्चा पुढे सरकण्यास मदत होतेय असे न दिसल्याने ती मूळ लेखातून काढून खाली प्रतिसादात देत आहे.)
एकंदर मराठीत आरोग्यविषयक माहिती माहितीजालावर फार अपुरी आहे. इंग्रजीत प्रत्येक आजाराविषयी सामान्य माणसाला कळेल अश्या भाषेत ते अगदी व्यावसायिक आणि प्रशिक्षित डॉक्टरांसाठीच अश्या मोठ्या रेंजमध्ये माहिती उपलब्ध आहे.
आपल्याला सामान्यतः लहानमोठ्या शारिरीक आजारांच्या लक्षणांची माहिती असते. मात्र मानसिक आजारांच्या लक्षणांची माहिती नसते. आणि सर्वांना समजेल अश्या सोप्या भाषेत ती सहज नेटवर मराठीत उपलब्धही नाही.
चर्चेच्या अनुशंगाने या लेखात किंवा पुढिल भागात अशी माहिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
त्यामुळे सगळ्या प्रश्नांचं या धाग्यावर स्वागत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> काऊंसेलरकडे जाणं अजूनही तितकंच नामुष्कीचं राहिलंय का?>> आहे नक्कीच. दिसतंय की इथेच.
आंतरजालावरच्या कुणाला समुपदेशनाची गरज आहे असे वारंवार जाणवल्यास तसे नक्कीच सांगावे. अर्थात पहिल्या एक दोन लिखाणातून तसा अंदाज बांधणं शक्य नसतं म्हणूनच वारंवार म्हटलंय. झोडपून घ्यायची तयारी असल्यास स्पष्ट सांगायला काहीच हरकत नाही.

असा सल्ला देणं योग्य नाही असे मला वाटते. कारण आपण ज्या भावनेने तो सल्ला देतो ती भावना आपण त्या माणसापर्यंत पोहचवु शकत नाही. आंतरजालावर संवाद केवळ आपण टाकत असलेल्या पोस्टींमधुन होतो. आणि ज्या पोस्टींमधुन आपण जे लिहितो ते अजुन हजार जण वाचतात आणि त्यातुन त्यांना जो संदेश घेता येतो तो लिहितात. या उलटसुलट पोस्टींमुळे ज्याच्यासाठी या पोष्टी लिहिलेल्या असतात त्याचा गोंधळ होतो.
त्याला मिळत असलेला सल्ला मित्र भावनेने मिळतोय की मुद्दाम खिल्ली उडवली जातेय हे कळत नाही.

शिवाय समुपदेशकाकडे जाणे म्हणजे आपल्या डोक्यात लोच्या झालाय हे मान्य करणे हे बहुसंख्यांचे आजही मत आहे. असा लोच्या झालाय म्हणजे आपण वेडे असे लोकांना वाटते. आणि हे कोण मान्य करेल? आपण शिक्षित आहोत, चांगल्या नोकरीत आहोत, घर सुस्थितीत आहे म्हणजे आपल्या मनात सगळे आलबेल आहे. आपल्याला समुपदेशकाकडे जायचा सल्ला म्हणजे देणारेच गाढव.

त्यामुळे असा सल्ला द्यायचाच झाला तर त्या माणसाचा नंबर मिळवा, त्याच्याशी बोला आणि त्याला समजावता आले तर पहा. आंतरजालावरुन असा सल्ला देणे म्हणजे त्या माणसाला समुपदेशकापासुन दुर पळवणे होय.

माझ्या मते आंतरजालावरच्या कुणाला समुपदेशनाची गरज आहे असे वारंवार जाणवल्यास तसे त्यांना नक्कीच सांगावे.

साती, डॉक्टर म्हणून दिलेला सल्ला सुद्धा बहुतांश वेळा कोणी मनावर घेत नाही असे तूच लिहिले आहेस. तर नुसत्या जालीय ओळखीत दिल्या / घेतल्या सल्ल्याचे काय मोल होणार?
दुसरे म्हणजे समजा तू मला म्हटलीस की अगं कोण्या काउन्सेलरशी बोलून बघ, तरी मला असा काउन्सेलर प्राणी कुठे सापडतो, तिच्या/त्याच्याशी काय बोलायचे, काय म्हणून अपॉइंटमेंट घ्यायची हे माहित असण्याची शक्यता किती? शिवाय यात होणारा खर्च? आणि फायदा नक्की काय होणार हे कसे समजणार?

तरी, आपल्याला काळजी वाटल्यास/ योग्य वाटल्यास सल्ला द्यावाच असे मी म्हणेन. Happy

<< एकजण खूप चटका लावून गेला जीवाला. त्याला मानसोपचाराची गरज आहे हे त्या संस्थळावरिल प्रत्येकाला समजत होतं. काही ते उघडपणे लिहित तर काही उगाच वादासाठी वाद म्हणून त्या आयडीला / त्याच्या थोड्याफार विक्षिप्त लिखाणाला सपोर्ट करित. मग एकदा त्याने आत्महत्याच केल्याची बातमी आली. (कृपया त्याचे नाव माहित असलेल्यांनी इथे लिहू नका. मी केवळ एक उदाहरण घेतले आहे.) आपण अगोदरच त्याला समुपदेशनासाठी, मानसोपचारांसाठी का नाही जास्तं हॅमर केलं असं वाटत राहिलं. >>

सातीजी,
मी त्याला ओळखतो (म्हणजे जालीय ओळख / ईमेल व दुरध्वनीवरील संभाषण - प्रत्यक्ष भेट नाही). फक्त तुमच्या सूचने नुसार इथे नाव लिहीत नाहीये.
त्याने आत्महत्या केली असं नाही म्हणता येणार. कारण याच न्यायाने उद्या कोणी म्हणेल की ज्ञानेश्वरांनीही आत्महत्या केली किंवा इतर कुणी म्हणेल की त्या काळात ज्ञानेश्वर होऊन आजच्या काळात तसे काही नाही. असे असेल तर मग लोणावळा येथील मनःशक्ती आश्रमाच्या स्वामींनी केली ती आत्महत्या होती काय?

असो. तर तुम्ही जो म्हणताय तो जालीय सदस्य त्याने आपले जीवन संपविले इतकेच. त्याचं तुफान लेखन मी पाहिलंय. सारंच वाचता येणं शक्य नव्हतं - नाहीये. तो एक पत्रकार होता, त्याने जग पाहिलं होतं, जीवनाचा (नको इतका) अभ्यास केला होता. (त्याच्या मते) त्याचं जीवनकार्य संपलं होतं. थांबून काय करायचं म्हणून तो निघून गेला.

साती, मस्तच धागा!

माझे मतः

१. आंतरजालावर असा सल्ला कोणाला द्यायचा असल्यास तो शक्यतो विपू, खरडवही अश्यातून द्यावा. सर्वांदेखत देऊ नये.

२. ऋन्मेषने इतरत्र म्हंटल्याप्रमाणे त्या सल्ल्यात खरी कळकळ असायला व दिसायलाही हवी. विनंती वगैरे शब्दांचा मुलामा चढवून तुच्छतादर्शक भावना लपत नाहीत.

३. सल्ला देणारा असा सल्ला देण्यास क्वॉलिफाईड असावा व तो तसा आहे हे सल्ला घेणार्‍याला माहीत असावे किंवा माहीत करून द्यावे. वाटेल त्याने उठसूट कोणालाही असे सल्ले देणे हास्यास्पद आहे.

४. एवढे करूनही सर्वांदेखत सल्ला द्यायची वेळ आलीच तर त्याची कारणमीमांसा एखाद्या डॉक्टरने एखाद्या पेशंटला सांगितली असती तशी सांगावी असे सुचवावेसे वाटते.

आपण एक डॉक्टर आहात म्हणून ही खालील अपेक्षा:

समूपदेशनाची गरज कोणाला आहे ह्याबद्दल तुमच्या क्षेत्राचे (सामान्य माणसांना समजतील असे) निकष काय असतात?

या बाबतीत नंतर जो जीवाला चटका लागतो ते पहाता सांगावे. अगदी शाब्दिक झोडपणी झाली तरी सांगावे. पण बाफवर उघडपणे सांगितले तर बर्‍याच जणांना आपल्याला आतुन वाटणारी काळजी समजतच नाही. त्यांना अपमान झालाय असे वाटते आणि ती व्यक्ती दुखावून अधिकच कोशात जावू शकते. यासाठी शक्यतो संपर्कातून इमेल /व्यनि वगैरे करावे. एक -दोनदा सांगून फरक पडत नसेल तर त्या व्यक्तीला प्रत्यक्ष ओळखणार्‍या , गटग निमित्ताने भेटलेल्या व्यक्तींनी अगदी फोन/प्रत्यक्ष भेट घेवूनही सांगावे.
पण शेवटी निर्णय ज्याचा त्यालाच घ्यावा लागणार. आणि बरेचदा ती व्यक्ती कुणाचे ऐकून घ्यायच्या पलिकडे गेलेली असेल तर हताशपणे बघणे आणि नंतर बोच घेवून जगणे एवढेच हातात उरते.

चेतन, हाच तो फरक.
तुम्ही म्हणता 'त्याचं जगून संपलं' कशावरून , तर त्याच्या लिखाणावरून.
आणि त्याच्या लिखाणावरून त्याच्या अध्यात्मिक उन्नतीची खात्री झालेल्या कित्येकांना त्याच्या आत्महत्येचा धक्का बसला होता.
ज्ञानेश्वरांचे निकष त्याला लावू नका कृपया. तो काळ वेगळा होता, तेव्हाचे आचारविचार वेगळे होते.
त्याहूनही या मुलावर त्याच्या वृद्धं आईबाबांची जबाबदारी होती.

आश्रमातल्या बाबांविषयी मला खरंच माहिती नाही, मी वाचलेले नाही.

पण एखाद्याला अगदी तरूण वयात 'आपले जगून संपले' असे खरेच नॉर्मली वाटू शकते?
तुम्ही फार रुग्णं पाहिले नाहीत म्हणून तुम्हाला हे पटू शकते. पण आम्ही अगदी आठवड्याला चार पाच इतके आत्महत्येचा प्रयत्न केलेले रुग्णं पाहतो. त्या एपिसोडनंतर आपण पूर्वी केलेला विचार हा शुद्दं वेडेपणा होता असे सगळेच कबूल करतात.
अगदी पाच सहा दिवस पॉईजनच्या इफेक्टखाली बेशुद्धं असणारी बाई शुद्धीवर येताच 'मला लवकर सोडा, मुलांसाठी स्वयंपाक करायचाय' म्हणते.
'जगून संपलं ' असं म्हणण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला?

एच आय व्ही , टी बी अशा गंभीर आजारांसाठीही समुपदेशनाची गरज असते.

आमच्या एच आय व्ही सेंटरला सध्या दोन समुपदेशक आहेत. अजुन एकाची गरज अहे.

रोगाची पूर्ण माहिती , आहार , साइड इफेक्ट्स , न कंटाळता उपचार सुरु ठेवण्याचा सल्ला , घरचे इतर प्रश्न , इ इ इ बाबत काउन्सेलिंग केले जाते.

काउन्सेलिंगच्या दोन विजिट्स झाल्यावरच उपचार सुरु केले जातात.

अजून एक शंका:

आंतरजालीय वर्तनावर विसंबून एखाद्याला असा सल्ला द्यायचा मोह अनेकांना होतो हे दिसत आहे. (ज्यांना मोह होतो ते भले क्वॉलिफाईड नसोत, पण सल्ले देतात, हा भाग वेगळा). पण असे वाटत नाही का की ज्या व्यक्तीला हा सल्ला दिला जात आहे त्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष आयुष्यात अनेक जवळची मंडळी असतील. ती मंडळी हे काम नक्कीच करत असतील ना आवश्यक असले तर? त्यांचा त्या व्यक्तीबाबतचा अनुभव तुमच्या तुटपुंज्या अनुभवापेक्षा बराच जास्त आणि रिलायेबल असेल ना? मग मुळात हे असे सल्ले, जे अनेकदा वैयक्तीक ताशेर्‍यासारखे दिले जातात, ते टाळलेच तर काय बिघडेल?

(प्रतिसाद स्व-संपादन - वर धाग्यात दिलेली आत्महत्येची घटना खरी आहे हे पाहून धक्काही बसला आणि तीव्र दु:ख झाले. असे कधीच होऊ नये. त्या घटनेच्या अनुषंगाने ह्या धाग्यातील विषयाकडे पाहायचे म्हंटले तर तज्ञांचे विचार थेट संकेतस्थळाच्या धोरणात समाविष्ट करण्यायोग्य ठरतील हे नक्की वाटत आहे. ह्या क्षेत्रातील तज्ञांनी ह्या धाग्यावर नक्की वर्णी लावावी अशी इच्छा व्यक्त करावीशी वाटत आहे)

चेतन गुगळे,
ती आत्महत्याच होती. आजही त्या घटनेचा मनात विचार आला की जीव तीळ तीळ तुटतो.
जे झाले त्याची तुलना ज्ञानेश्वरांशी करणे योग्य नाही. उगाच ग्लोरीफिकेशन नको.

साती, बर झालं हां धागा काढलास...
तू दिलेले उदाहरण माझ्याही मनात काही दिवसांपूर्वी आले होते. ती केस ऐकल्यावर 'अरे त्याला मदतीची गरज होती' हे विचार सर्वप्रथम तोंडावर आल्याचेही आठवते.
समोरच्याने आणि इतर आय डी ना पटले नाही तरी चालेल पण आंतरजालिय ओळखीत असे आढळल्यास सल्ला द्यावाच हे माँ वै म!

साती,

छान विचार.

मला वाटतं असा सल्ला देण्याआधी आपणच मित्रत्वाचा हात का नाही पुढे करत ? खुपदा मन मोकळं करायला
कुणीतरी श्रोता हवा असतो. दोन डोकी एकत्र आली तर आणखी एखादा मार्ग सुचू शकतो.

आणि त्या माणसाचा पुरेसा विश्वास बसला, एखाद्या समस्येवर दोघांचाही खल करून झाला. त्यावर उपाय नाही सापडला, तर व्यावसायिक सल्लागाराकडे जाता येईल ना ! पण त्यासाठी प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणात सल्लागाराच्या भुमिकेत शिरायला हवे ना !

तसेच या क्षेत्रात नवीन कुठली औषधे / उपचार उपलब्ध आहेत ? कुठल्या प्रकारच्या समस्येवर उपाय शक्य आहेत, याची माहिती उपलब्ध व्हायला नको का ?

दात दुखले तर आपण डेंटीस्ट कडे जातो, कारण ते आपल्यालाच जाणवतं. मनाच दुखणं म्हणजे नेमके काय ? ते आपल्याला झालंय, हे कसे ओळखायचे ? ते आपल्यालाच कळले तर अर्धी लढाई जिंकलीच ना ? तर ते कसे कळायचे ?

श्री चेतनजी,

संथारा, प्रायोपवेशन आणि समाधी यात फरक आहे.

ज्ञानेश्वरांनीही आत्महत्या केली किंवा इतर कुणी म्हणेल की त्या काळात ज्ञानेश्वर होऊन आजच्या काळात तसे काही नाही.

१) संथारा हे व्रत आहे. यामागे धार्मिक कारणे आहेत यालाही कुणी आत्महत्या म्हणु शकत नाही.

२) प्रायोपवेशन हे कोणत्याही धार्मीक कारणाशिवाय केलेला अन्न पाण्याचा त्याग आहे. माझ्या माहितीत याची फक्त दोन उदाहरणे आहेत. ह्यात कोणताही मानसीक त्रास नसताना. इहित कार्य संपवणे ही भावना असणे.

१) श्री वि दा सावरकर
२) श्री पोक्षे गुरुजी ( चिंचवड )

यालाही कुणी आत्महत्या म्हणु शकत नाही. आत्महत्येत मानसीक संतुलन बिघडणे हा महत्वाचा भाग असतो.

३) समाधी

ही योगीयांची अंतिम अवस्था आहे. सामान्य माणुस शेवटचा श्वास सोडतो आणि श्वास घेण्याचे बंद करतो परंतु योगी शेवटचा श्वास घेऊन श्वास घेणे आणि सोडणे या प्रक्रियेवर ताबा आणत देहरुपाने जीवन कार्य संपवतात.

कोणी म्हणेल याला पुरावा काय ? यासाठी अंधश्रध्दा बाजुला सारुन धार्मिक ग्रंथात वर्णिलेला तो प्रसंग वाचला आणि मनन केला पाहिजे.

योगानंद परमहंस ( योगी कथामृताचे लेखक - ह्या पुस्तकाच्या अनेक भाषेत असंख्य प्रती प्रसिध्द झाल्या आहेत ) यावर विवेचन केले आहे.

महत्वाचे म्हणजे

१) समाधी घेतलेल्या योग्याचे शरीर सडत नाही / अनेक तास ताजेतवाने दुर्गधी मुक्त असते. ( संदर्भ : योगी कथामृत )
२) मेंदुचे तापमान दिर्घ काळ शरीराच्या तापमानाइतके असते ( संदर्भ - श्री गजानन विजय )
३) योगी ही क्रिया कधी करणार आहे त्याबाबत आधीच सांगतात.(सर्वच धार्मिक ग्रंथ ज्यात समाधीचे वर्णन आहे )
४) सर्व योगीयांनी आपला समाधी दिन दक्षीणायनात निवडलेला आहे ( माझा अभ्यास - चुकीचा असु शकतो )

दिनेशदा, खरे आहे.
तुम्ही तसे करता हे ही जुन्या मायबोलीपासून माहिती आहे.
तुमच्याविषयी सगळ्यांचं मतही चांगलं असल्याने तुम्ही मैत्रीचा हात पुढे केला तर प्रतिसादही मिळतो.
आमच्यासारख्या कित्येकांविषयी कित्येकांना पूर्वग्रह असल्याने तसा प्रतिसाद मिळेलच की नाही याची खात्री नाही.

तरीपण तुमच्या सल्ल्यानुसार प्रयत्न केला आहे.

धन्यवाद!

साती, तरीही आपली आपल्यालाच जाणवतील अशी काही लक्षणे सांगता येतील का ? समजा आपला कयास चुकला तर स्मुपदेशक तसे सांगतीलही. पण निदान आपले आपल्याला जाणता आले तर किती बरे होईल !

साती, उत्तम धागा !

फक्त धाग्याचे शीर्षक आणि प्रस्तावना ह्यात तफावत वाटतेय.
'समुपदेशनाचा सल्ला द्यावा की नाही ?' 'समुपदेशनाचा सल्ला देणे योग्य की अयोग्य ?' असे काहीतरी स्पष्ट शीर्षक द्यावे अशी विनंती.

बेफिकिर ला अनुमोदन त्यात अज्जुन मुद्दे add करावेसे वाटतात

१> तुमचा सल्ल वाचताना वाचकाची मानसिक स्थिती माहित नसते. वाचन होत असताना त्या परिसरात कोण आहे की नाही ते माहित नसते.
२> आंतरजालावर चा सल्ला हा सगळे वाचत असतात आणि त्यात बरेच जण त्या वक्तीला पण ओळखत असतात . त्यामुळे ज्याला सल्ला दिलाय त्याचा मनावर परिणाम होउ शकतो.
३> तुम्ही डोक्टर आहात ते त्या व्यक्तीला माहित नसते. लोकाना घरातिल वरिष्ट लोक, खास मित्र आणि मानसोपचार डॉक्टर व्यतिरिक्त सल्ले बर्याच वेळा उपयोगी येत नाहीत.

पण जर तुम्हाला समोरील व्यक्ती माहित असेल तर सल्ला द्यायला हरकत नाही.

साती, स्वाती२ आणि नितीनचंद्रजी,

मी त्याच्याशी (इथे 'त्या'चं नाव का लिहायचं नाही ते मला कळत नाहीये. वर्तमानपत्रात नावानिशी बातमी आली होतीच की. त्यात काही गुप्त नव्हते) स्वतः दूरध्वनीवरून संभाषण केलंय. त्याचा वेगळाच कल होता. तुम्ही म्हणताय तशी त्याच्यावर आईवडिलांची जबाबदारी होती तर त्यांनी त्याचे आधी वेगळ्या वाटेवर जाणे थांबवायला हवे होते. तुम्ही इतर घटनांशी तुलना करताय तसा त्याला आत्महत्येचा अचानक झटका आला नव्हता. असा झटका आलेल्या त्यावेळी आपण आत्महत्येपासून परावृत्त केले की ते नंतर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न करीत नाहीत उलट व्यवस्थित जीवन जगतात हे जे तुम्ही म्हणताय ते खरंय पण ते "त्या"ला लागु पडत नव्हतं. त्याला तेव्हा अडवलं असतं तरी त्याने नंतर पुन्हा आत्महत्या केलीच असती. त्याचं समूळ प्रोग्रॅमिंगच वेगळं (चूकीचं असं म्हणता येणार नाही) झालेलं होतं. माझ्या माहितीत अशी एक तरूणी होती जिला पाच वेळा आत्महत्येपासुन सर्वांनी परावृत्त केलं पण शेवटी सहाव्यांदा तिने आत्महत्या केलीच. माझी एक मावशी तिचे यजमान गेल्यावर स्वतःचं विश्व संपलं असं समजून खंगुन खंगुन गेली. अशा लोकांना समजावण्याचा काहीएक उपयोग होत नाही.

असो. तुमचा समुपदेशनाचा मुद्दा योग्य असला तरी तो "त्या'च्या सारख्या काहीजणांकरिता तरी (निदान त्या पातळीवर पोचल्यावर) परिणामकारक ठरू शकत नाही असं मला वाटतं. आमच्या जैन धर्मातही अनेक तरूण तरूणी विशीतच संन्यास घेतात. संन्यास घेणे म्हणजे सर्व पाश तोडणे, नाव बदलणे, पुर्वीचे आयुष्य विसरणे - एकप्रकारे जुन्या जीवनाचा अंतच. म्हणजे मरणासारखेच. काही वेळेस घरच्यांना धक्का बसतो, ते समजावतात, रडतात पण उपयोग होत नाही. हे तरूण तरूणी कायमचे संन्यस्त जीवन जगतात. कारण त्यांचा विचार पक्का असतो.

याउलट काही जण तात्कालिक दु:खामुळे संन्यास घ्यायची भाषा करतात. त्यांचं ते दु:ख, ती विशिष्ट समस्या (जसे की प्रेमभंग, व्यावसायिक वा शैक्षणिक अपयश, इत्यादी) दूर करण्यात यश आले तर ते संन्यास घ्यायचा विचार रद्द करतात आणि पुढे चारचौघांसारखे सांसारिक जीवन जगतात.

असाच प्रकार मृत्यूबाबत देखील आहे. झटका बसून मृत्यूला कवटाळणारे वेगळे आणि विचारपूर्वक मृत्यूला जवळ करणारे वेगळे. मला वाटते 'तो' जालीय सदस्य दुसर्‍या प्रकारातला होता. त्याला समुपदेशनाचा काही उपयोग शकला असता असे मला वाटत नाही. माझा प्रतिसाद हा प्रस्तुत लेखातील 'त्या'च्यापुरताच मर्यादित आहे. इतरांविषयी माझा हा प्रतिसाद लागू होत नाही.

सातीजी महत्वाचा धागा काढल्याबद्दल आभार.

मला असं वाटतं कि समुपदेशनाच्या बाबतीत प्रत्यक्ष भेटच आवश्यक आहे. आंतरजालावर माणसाच्या परिस्थितीची खरोखर कल्पना कितपत येईल सांगता येत नाही. आणि हे मी सल्ला देण्याच्या बाबतीत म्हणतोय. प्रत्यक्ष समुपदेशकाकडे जाणे ही फारच पुढची पायरी आहे. याचं कारण माणसं याबाबतीत फार हळवी असतात. होय अजुनही. समुपदेशकाकडे जाण्याचा सल्ला म्हणजे मला काय वेड लागलंय हा एक भाग किंवा माझ्या समस्या कळतात मला, त्यासाठी सल्ला कशाला हवा हा दुसरा भाग. त्यामुळे आधी समुपदेशकाकडे जाण्याचा सल्ला गळी उतरवणे ही अनेकांच्या बाबतीत कठिण गोष्ट असते.

मला स्वतःला अशा मानसोपचारतज्ञाकडे जाणं योग्य वाटतं जो समुपदेशनदेखिल करीत असेल. म्हणजे औषधे आणि समुपदेशन याचं संतुलन तो करु शकतो. अनेकदा परिस्थिती इतकी बिघडलेली असते, मुड स्विंग्ज इतके टोकाचे असतात कि कसलंही समुपदेशन आकलन करुन घेण्याच्या मनस्थितीतच रुग्ण नसतो. त्यावेळी औषधे आवश्यक असतात. मात्र औषधे हा कायमस्वरुपी उपाय नाही असे बर्‍याच तज्ञांचे मत असल्याने समुपदेशनाला पर्याय नाही असे माझे मत झाले आहे.

यात महत्वाची मेख अशी कि समुपदेशन ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. काहींना त्याचा फायदा होण्यास खुपच काळ जावा लागतो. तेवढा नेट रुग्णात असण्याची शक्यता फार कमी असते. पण घरच्यांमध्ये असणे आवश्यक असते. माझ्या माहितीच्या एका बाईंना मैत्रिण आहे असे सांगुन मानसोपचार तज्ञ असलेल्या महिला डॉक्टरला घरी बोलवावे लागले इतक्या त्या बाईंचे मानसोपचाराबद्दल गैरसमज आहेत. त्या मुळात यायलाच तयार होईनात.

त्यामुळे जालावर दिलेला सल्ला कितपत योग्य आणि त्याचे परिणाम काय होतील हे सांगता येत नाही.

बाकी थोडं आणखि सांगावसं वाटतं. सातीजी तुम्ही डॉक्टर आहात, तुमच्या धाग्यावर असं काही लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे उद्धटपणाच आहे आणि तुम्ही मला मोठ्या मनाने क्षमा कराल अशी आशा आहे.

पण समुपदेशनासंबंधीच आता समुपदेशनाची आवश्यकता आहे असं मला वाटु लागलं आहे. कारण त्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड गैरसमज आहेत. समुपदेशक खर्‍या अर्थाने तुम्हाला उपाय सांगत नसतोच. परिस्थितीच्या भोवर्‍यात सापडुन माणसाची परिस्थिती सैरभैर झालेली असते त्यामुळे सुसंगत विचार करण्याची शक्ती तो गमवुन बसतो. अशावेळी समुपदेशक त्याला परिस्थितीची जाण (जजमेंटल होऊ न देता) करुन देतो. प्राप्त परिस्थितीत कुठले पर्याय उपलब्ध आहेत हे दाखवुन देतो. कुठले पर्याय निवडल्यास काय फायदा आणि तोटा होईल याची जाणीव करुन देतो आणि त्याला निर्णय घेता येईल या टप्प्यापर्यंत आणुन सोडतो.

लहानपणापासुन एखादी समस्या असल्यास किंवा लहानपणच्या एखाद्या परिस्थितीचा परिणाम पुढे काही मानसिक समस्येमध्ये दिसुन आल्यास पालकांना किंवा त्या स्वतः व्यक्तीला याचे आकलन होणे फार कठीण असते. त्यामुळे समुपदेशनाचा उपयोग अनेक बाबतीत हटकुन झालेला दिसुन येतो. मात्र सुशिक्षित व्यक्तींनी स्वतःच याबाबत निर्णय घेणे हा मार्ग मला योग्य वाटतो. मनातली खळबळ शांत करुन मन स्वस्थ क्रण्याचे काम समुपदेशक करीत असतात. अर्थात हे नुसते बोलणे नसते तर आरएबीटी सारखी तंत्र त्यामागे असतात. एखाद्या समस्येने सतत कुढत राहणे , त्यामुळे प्रकृती आणखि बिघडवुन घेणे यापेक्षा समुपदेशकाकडे जाऊन उपचार घेणे केव्हाही श्रेयस्कर. याबाबत समाजात आणखि जागृती व्हायला हवी असे मला वाटते.

घ्या!

आता आमचे अनेक हितचिंतक इथे आम्हाला 'लवकर बरे व्हा' 'उपचार घ्या' असं आम्हाला कळकळीने सांगत असतात त्यांचं काय करावं ब्वा?

अतुल ठाकूर यांच्याशी बर्‍याच अंशी सहमत. अजून थोडी भर टाकतो.

आपल्या देशात अजुनही समुपदेशक / मानसोपचार तज्ज्ञ यांची भेट घेणे कमीपणाचे वाटते. इतकेच काय पाश्चात्त्य देशांतही फार वेगळी परिस्थिती नसते. सिडने शेल्डनचे नेकेड फेस हे पुस्तक वाचा. त्यातला नायकच मानसोपचार तज्ज्ञ आहे. त्याच्यासोबत अशा काही विचित्र घटना होऊ लागतात की त्याला वाटते नेमके कुणीतरी आपल्याविरोधात षडयंत्र रचत आहे की आपण पॅरॅनॉइअ‍ॅक झालो आहोत आणि आपणांस मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. जर आपणांस मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे असे असेल तर मग आपण संपलो आपली व्यावसायिक कारकीर्द संपुष्टा आली आणि या विचाराने तो हादरतो. मग ही शक्यता तो मनोमन झटकतो आणि पुन्हा फक्त पहिल्या शक्यतेवरच (म्हणजे कुणीतरी खरोखरच आपल्या विरोधात आहे ह्या) लक्ष केंद्रित करतो आणि अर्थातच तो नायक असल्याने ते तसेच असते आणि मग तो विरोधकांना शोधतो वगैरे वगैरे...

पण यात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे एक डॉक्टर आपल्याला आजार आहे म्हणून दुसर्‍या डॉक्टरची जितक्या सहजपणे मदत घेतो तितक्या सहजपणे एक मानसोपचार तज्ज्ञ दुसर्‍या मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेत नाही हे विशेष. एका मानसोपचार तज्ज्ञाचीच जर ही अवस्था असेल तर इतरांनी तरी ही परिस्थिती कशी स्वीकारावी? विशेषतः ज्याची मनस्थिती खरंच खराब आहे तो तर ही गोष्ट मान्य करणे अशक्यच.

तेव्हा अशा माणसाला न सांगता अचानक मानसोपचार तज्ज्ञाकडे / समुपदेशकाकडे (निदान १ल्या वेळी तरी) घेऊन जातात अशी माझी माहिती आहे. जसे दारुड्याला मुक्तांगण मध्ये आधी कल्पना न देताच नेतात तसे. हां एखादा स्वतःहून तसा विचार करत असेल तर ते वेगळे. पण मग त्याला आपण सांगायची गरज तरी काय?

तर अशा प्रकारे ज्याला खरंच गरज आहे पण तो येणे शक्य नाही त्याला अचानक न कळवताच न्यायचे असते (म्हणजे मी तुला माझ्या एका मित्राकडे / मैत्रिणीकडे घेऊन जातो / जाते असे सांगत). हे अर्थातच प्रत्यक्ष ओळख असल्याशिवाय नुसत्या जालीय ओळखीवर शक्य नाही हे माझे वैयक्तिक मत.

छान धागा.

इथे इतर वादावादी न होता चांगली माहिती मिळेल अशी आशा.

आपल्याला जाणवते एखादी व्यक्ती नीट नाही वागत, मग त्याला मानसोपचाराची गरज आहे असा निष्कर्ष काढुन आपण मोकळे होतो.
पण हे सर्व त्या व्यक्तीला पटवायचे कसे?

समजा आपल्याला स्वत:लाच अश्या उपचारांची गरज आहे हे स्वतःच ओळखायचे कसे? जसे डेंटिस्टकडे सहा महिन्यातुन एकदा चेकअप करवून घेतो, तसे काही रुटीन चेकअप असतात का?

<< इथे इतर वादावादी न होता चांगली माहिती मिळेल अशी आशा. >>

बरोबर आहे. इथे तसं होणारच नाही, कारण जो असा वाद घालेल त्याला लगेच इतरेजन समुपदेशकाची गरज आहे असं सांगतील ना....

>>
आपल्याला स्वत:लाच अश्या उपचारांची गरज आहे हे स्वतःच ओळखायचे कसे>
मी वर एक लिंक दिली आहे.
ही अजून एक टेस्ट
http://psychologytoday.tests.psychtests.com/take_test.php?idRegTest=3040

या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शरीर आजारी पडतं तसे मनही आजारी पडू शकते हे स्वतःलाच पटवणे. बरेचदा आपण घेत असलेल्या औषधांचे साईड इफेक्ट्स जसे शरीरावर उमटतात तसे मनावरही उमटतात. जीवनशैली, पर्यावरणातले इतर घटकही ट्रिगर बनू शकतात.

साती ,सुरेख धागा.
मला जे म्हणायचे होते,ते अधिक सुसंगतपणे अतुल ठाकूर यांनी सांगितले आहे.

Pages