"डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक" परिक्षेचा अभ्यास कसा करवून घ्यावा ?

Submitted by विनार्च on 9 November, 2013 - 04:44

माझी लेक चौथीला असताना, स्कॉलशीपच्या अभ्यासासाठी जो धागा मी काढला होता त्यावरचे प्रतिसाद मला अभ्यास करवून घेताना फारच उपयोगी पडले होते म्हणून हा धागा काढते आहे.
सहावीत दिल्या जाणार्‍या "डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक" परिक्षेचा अभ्यास कसा करवून घ्यावा ?
मी बाजारात मिळाली ती दोन पुस्तकं आणली आहेत पण त्यात फक्त प्रश्नपत्रीकाच आहेत. पहिली ते सहावीची विज्ञानाची पुस्तके वाचावीत असा सल्ला त्यात दिला आहे. तितकच पुरेसं आहे का?
पहिली परिक्षा पार केल्या नंतर पुढील पायर्‍यांसाठी काय तयारी करावी लागेल ?
ज्यांना ह्या परिक्षेबद्द्ल माहीत आहे किंवा ज्यांच्या मुलांनी ही परीक्षा दिली आहे त्यांनी प्लीज मदत करा.
माझी लेक आता पाचवीला आहे आणि विज्ञान विषयाची तिला खूप आवड आहे. सध्या ती डॉ. बाळ फोंडके यांची "कोण?" "का?" "कसं?" ही पुस्तक वाचतेय......असं तिच बरच आवांतर वाचन सुरुच असत...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद साती Happy
हो ...१५ फेब. नंतर संपूर्ण प्रवास व त्यासाठी आम्ही केलेली तयारी ह्या बद्दल लिहायच ठरवल आहेच..

बापरे, मी त्या एम एस टी ए च्या साईटवर जाऊन पाहिलं.
खूपच कठीण पण मस्तं प्रश्नं आहेत.
काही डायरेक्ट तर काही अगदी विज्ञान अधिक सामान्यज्ञान यांची कसोटी घेणारे.
परीक्षा भारी आहे.

अभिनंदन ! मी पाचवीत असताना ही परीक्षा पास झाले होते . तेव्हा कुतुहूल (भाग १,२,३) हे वाचले होते पण त्या बरोबर ६वी ७ वी आणि ४ थी सायन्स ची पुस्तक वाचली होती . जर मागचा- पुढच्या वर्षीचा अभ्यास करावा लागतो . प्रक्टिकल साठी शाळेतून मदत झाली होती .

काल हया परिक्षेचा अंतिम टप्पा पार पडला.... अनन्याला सिलव्हर मेडल मिळाले. माबोकरांनी केलेल्या मदती बद्दल तसेच वेळोवेळी केलेल्या कौतुकाबद्दल खूप खूप आभार ...../\..... Happy

अनन्याचे हार्दिक अभिनंदन!! अतिशय टफ परिक्षा असते ही आणि सिल्व्हर मेडल म्हणजे फारच भारी!! >>> + १०००
अभिनंदन अनन्या Happy

मी ही चर्चा चार दिवसांपूर्वी वाचली. त्यानंतर मायबोलीत प्रवेश मिळवायला वेळ लागल्याने लगेच प्रतिक्रीया नोंदवू शकलो नाही. आज मला इथे प्रवेश मिळाला. हे माझे मायबोलीवरचे पहिलेच ग म भ न.
प्रथम अनन्या आणि विनार्च यांचे खूप खूप अभिनंदन. खरंच पूनम यांनी म्हटल्याप्रमाणे ही स्पर्धा खरोखरीच खूप कठीण असते.

माझी लेक यंदा नववीत आहे. तिने या स्पर्धेचे मुंबई मराठी विभागातून सुवर्णपदक मिळवले. सहावीत देखील तिला सुवर्णपदक मिळाले होते. ती शिकत असलेल्या शाळेचे ते पहिलेच सुवर्णपदक होते. सहावीचे देखील आणि नववीचे देखील.
विनार्च, यंदा सुरुवातीला ज्या विद्यार्थिनीचे 'मनोगत' म्हणून छोटेखानी भाषण झाले, ती माझी मुलगी स्वरांगी.

आपण म्हटल्याप्रमाणे खरोखरीच पदक मिळवेपर्यंतचा प्रवास लिहून ठेवण्याजोगा असतो.

इथे येणाऱ्या आणि भेट देणाऱ्या भावी बालवैज्ञानिकान्साठी,त्यांच्या पालकांसाठी निश्चितच काही महत्वाच्या टिप्स दिल्याच पाहिजेत.
माझ्याकडून महत्वाच्या टिप्स अश्या:
१) या स्पर्धेसाठी कोणताही ठराविक साच्यातला अभ्यासक्रम नाही.
२) या स्पर्धेची तयारी खूप आधीपासून करावी. किमान दीड वर्षे आधीपासून तरी. म्हणजे पाचवीत सहावीच्या स्पर्धेच्या तयारीला लागले पाहिजे.
३) तयारी म्हणजे खराखुरा अभ्यास. म्हणजे विज्ञान जगताचा खराखुरा अभ्यास. शालेय परीक्षेच्या दृष्टीने करावयाचा अभ्यास आणि हा अभ्यास यात खूप मोठे अंतर आहे.
४) मुलांना प्रत्येक विषयात विज्ञान शोधण्याची गोडी लागली पाहिजे. म्हणजे इतिहास, सामाजिक शास्त्रे, भाषा, संतसाहित्य- या सगळ्यात विज्ञान ठासून भरले आहे याची मुलांशी सतत आणि मनोरंजक चर्चा चालू ठेवणे हा या अभ्यासाचा मूळ गाभा आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक इतिहासाचे पान हे विज्ञानाच्या इतिहासाचे पान असते.
५) बाजारात तुम्हाला पुस्तके मिळतील. त्यात मागील काही वर्षांच्या लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मिळतील. त्यातले प्रश्न सोडवण्याचा सराव जरूर करा; पण खालील पद्धतीने:
प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय असतील. त्यातला एक पर्याय असेल. तो तुम्हाला बरोबर येतही असेल; पण तोच पर्याय का बरोबर आहे याची चर्चा करा. आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे इतर पर्याय का बरोबर नाहीत याची अधिक सखोल चर्चा करा.
६) हे झाले लेखी परीक्षेचे. प्रात्यक्षिकाच्या बाबत इतकेच सांगेन की मुलांना मातीत खेळण्यास प्रोत्साहन द्या. स्वयंपाक घरात हाताखाली घ्या. लिटमस पेपर्स आणून द्या आणि रोजच्या वापरातल्या वेगवेगळ्या द्रावणात घालून त्यांचे रंग बदलण्याचा खेळ तुम्हीही रोज मुलांबरोबर खेळा. कुंडीतल्या शेतीचे भरपूर प्रयोग करा. दुर्बिणीतून चांदण्या दाखवा. भिंगातून सूक्ष्म गोष्टी पहायची गोडी लावा. सहज म्हणून तुमचे पिण्याचे पाणी आणि बागेतली मृदा एखाद्या तपासणी ल्याब मधून तपासून घ्या. मांसाहारी नसाल, तरीही आपल्या परिसरातील लोक कोणता मांसाहार करतात आणि त्यांची( त्या प्राण्यांच्या अवयवांची किंवा माश्यांच्या जातीची) नावे काय हे माहिती करून घ्या. हे खाद्यपदार्थ आवर्जून हाताळा. त्याबद्दल असलेली घृणा नाहीशी करून घ्या. रोज विकीपेडियाला भेट द्या. असंख्या शंका निर्माण होऊ द्या. प्रत्येक अडणारा शब्द डिक्शनरीत शोधा. नेट वर सर्च करा.
७) हे सर्व खूप लिहिले असले, तरी अमलात आणणे फार सोपे आहे. कारण यात पाठ-मान एक करून अभ्यास करण्याचं टाळायचं आहे आणि त्यामुळे बच्चेकंपनी एकदम खुश असते हा अभ्यास करायला.
८) महत्वाचे म्हणजे कोचिंग क्लास टाळा. फारच विद्वान शिक्षक असेल आणि घरगुती पद्धतीने शिकवत असेल तर ठीक. अन्यथा शिकवणीचे दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे.

बाकी प्रकल्प आणि मुलाखत याबद्दल नंतर बोलू कधीतरी.

विनार्च, अनन्याला खूप आवडला असेल ना हा प्रवास? तिच्या नववीच्या यशासाठी देखील खूप शुभेच्छा.

आम्ही कोणताही क्लास लावत नाही फक्त परीक्षेला लागणारी पुस्तक साधारण वर्ष दीड वर्ष आधीच घरात आणून ठेवतो.... लगेच अभ्यासाला लागाव अशी अपेक्षा नसते.... पण नजरेसमोर असल्याने कुतूहल म्हणून ती पुस्तक चाळली जातात.. सो जेंव्हा वेळ येते तेंव्हा आपण काही नवीन करतोय ...हे कठीण आहे ..हा फिल लेकीला येत नाही.
(मोबाइल वरून कठीण पडतय ...लॅपी वरून पोस्ट पूर्ण करते थोड्यावेळात..)

संतोष सराफ.
खूप चांगला प्रतिसाद.
तुमच्या मुलीचे अभिनंदन!

ही परीक्षा केवळ महाराष्ट्रापुरती आहे का?

Pages