अन्नदानाची अवीट चव

Submitted by भागवत on 24 February, 2015 - 04:31

काही दिवसाखाली तिरूपतीला जायचा योग आला. तिथे तिरुमला तिरूपती देवस्थान तर्फे मोफत भोजनाची व्यवस्था राबवली जाते. मी तिथे बऱ्याच वेळेस भोजन ग्रहण केले आहे. बालाजीचे दर्शन झाल्या नंतर आमची पावले आपोआप तिकडे गेली. दर्शनाला मोठी रांग होती तेवढीच रांग भोजनालयात होती. पध्दतशीर रांग... 4 मोठे हॉल... माडून ठेवलेल्या टेबल आणि खुर्च्या... रांगेत मांडून ठेवलेली केळीची पाने... हॉलच्या बाहेर भली मोठी पेंटीग... वाढण्यासाठी मोठ्या ट्राॅली... तेथील जबरदस्त व्यवस्थापन... आणी जोडीला अप्रतिम स्वयंपाक...

मी दररोज च्या जेवणात भात कमी खातो. पण स्वयंपाकाला अवीट चव असल्या मुळे मी दोनदा डोंगरा एवढा भात कधी फस्त केला हे मला कळलेच नाही. पहिल्यांदा वरण, दुसर्‍यांदा सांबर, शेवटी ताक. आणि या तिन्हीचे रसमिसळ होऊन आलेली अप्रतिम चव. याला तोडच नव्हती. सगळीजण भोजनाचा आस्वाद घेत होती. मा‍झ्या आईची बालाजी वर अटूट श्रद्धा असल्या मुळे आई भोजन हा बालाजीचा प्रसाद म्हणुन ग्रहण करत होती. तर आम्ही फक्त भोजन करत होतो. असे म्हणतात समाधानी होऊन भोजन केले तर ते व्यवस्थित पचते. मी खुप आनंदाने खात होतो. आम्ही तेथुन समाधानी होऊन बाहेर पडलो. मी तिथे 2 दिवस होतो. परत दुसर्‍या दिवशी मी भोजनालयात मधे भोजन करून तृप्ती ची ढेकर दिली.

मी असाच अनुभव गोंदवलेकर महाराज मंदिरात घेतला आहे. तेथील व्यवस्था सुध्दा सुरेख आहे. भोजनाला अप्रतिम आणि अवीट गोडवा आहे. आमच्या कॉलोनी मधे गणपती बसवल्या नंतर बरेच कार्यक्रम होतात. त्या मधे एक दिवस जेवणं सगळ्यांना भोजन असते. तेव्हा सुध्दा स्वयंपाकाची चव जबरदस्त असते. भोजनात फक्त साधे वरण भात आणी एखादे स्वीट असते. परंतु ते सुध्दा एकदम चविष्ट लागते.

आचाऱ्याने मन लावून मेहनत घेतली होती का देवाचा प्रसाद असल्या मुळे जेवणाला अप्रतिम चव आली होती हे कळतच नाही.

आमच्या गावी गोपाळकाला होतो. त्या मधे सगळ्यांनी सोबत आणलेले पोहे, चुरमुरे, हिरवा ठेसा मिसळतात आणी प्रसाद म्हणुन वाटतात. गोपाळकाला सुध्दा खुपच छान लागतो. असेच एकदा मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. तिथे हनुमान जयंती निमित्त भात, वरण आणी शिरा होता भोजन प्रसाद होता. आम्ही सगळे चटई वर पंगत करून बसलो. साधाच भात वरण पण प्रसाद असल्या मुळे त्यामधे जबरदस्त चव होती.

असे भोजन कितीही पैसे मोजून हॉटेल किंवा कुठेही मिळणार नाही. मला सार्वजनिक ठिकाणी भोजन येव्हडे चांगले का होते हा प्रश्न पडला आहे? बहुतेक निरपेक्ष वृतीने, आणी अत्मियतेने सगळ्यांनी केलेले काम आणी मनापासून केल्यामुळे त्याला आलेली स्वर्गीय चव याची मिसळ होऊन ते अन्न अन्न न राहता देवाचा प्रसाद बनते. असा गोड चवीचा प्रसाद ग्रहण केल्यावर मनाला समाधान मिळते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी खरंय! मनालीच्या एका देवळात प्रसादाच जेलो ... १५ वर्षापुर्वीच्या प्रसादाची चव आजही जीभेवर रेंगाळतेय...

सहमत,
नास्तिक आहे पक्का, पण महाप्रसाद वा भंडार्‍याचे जेवण चुकवत नाही.
सत्यनारायणाच्या पूजेवर जराही विश्वास नाही, पण प्रसाद नेहमीच अप्रतिम लागतो.
ताडदेवला दत्ताच्या देवळात दत्तजयंतीला खास जेवण्यासाठी म्हणून न चुकता जातो, पोट भरल्यावर वेळ मिळाला तर देवालाही दर्शन देतो.
आमच्याकडेही गणेशजन्माला पूर्वी महाप्रसाद असायचा, खायचाच आनंद नाही उचलायचो तर वाढायचेही पुण्य पदरी जमा करायचो.

भागवत, लेख मनापासून लिहिलाय. अन्न हे पूर्णब्रह्म असतं. त्या अन्नाला देवाचा आशीर्वाद लाभला की अमृतासारखी चव येते. तर त्यात काय नवल! Happy
आ.न.,
-गा.पै.

कुठे ते नक्कि आठवत नाही , पण शाळेत असताना आम्ही घरचे सिमला कुलु मनली वगैरे तो सगळा प्रदेश फिरायला गेलो होतो .
तिथे मनाली ला की कुठे जाताना वाटेत एका धर्मशाळेसारख्या जागी अप्रतिम जेवण मिळाल्याच आठवतय .
लंगर सारखाच प्रकार होता .

रोज रोज वरण भात जेवायचा कंटाळा येतो
पण गणपती घराअत असताना ५ दिवस सकाळ संध्याकाळ नुसता वरण भात आणि कोशिंबिर अवीट लागते .

अगदी अगदी ! असाच अनुभव आहे.

हनुमान जयंती च्या वेळी पण फ़क्त भात आणि गव्हाची खिर असते. पण तृप्ति पुर्ण दिवस राहते. प्रसदा नंतर भुक अशी लागतच नही.

सज्जनगडावरील महाप्रसाद

भन्नाट पाउस पडत असतो, अक्खा गड धुक्यात लपेटलेला असतो,कुडकुडणे सुरु असते
संध्याकाळची आरती झाली, कि राम मंदिरातून ओलेत्या पायांनी बाहेर यायचं,
जय जय रघुवीर समर्थ घोषणा होते

सगळे एका रांगेत बसतात, वाढणारे मोठ्याने श्लोक म्हणतात

श्रीराम जयराम जय जय राम चा जयघोष होतो
प्रसाद कोणी टाकू नका असे आवर्जून सांगितले जाते

गरमा गरम वाफाळता भात, आणि त्यावर उत्कृष्ट चविष्ट आमटी, खमंग गव्हाची उत्तम खीर

अहाहा

अगदी खरे आहे.... भक्तीभावाने लेख लिहिल्याचे पदोपदी जाणवते ...सज्जनगड, गोंदवले, शेगाव या सारख्या ठिकाणी प्रसादाची मजा काही न्यारीच असते.... कसे इतके चविष्ट होत असते ते त्यालाच माहित...

Nira,

>> पण तृप्ति पुर्ण दिवस राहते.

कमी खाऊनही भूक भागणे हे सात्त्विक अन्नाचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

गामा,
यात केवळ जेवण शिजवणार्‍यांचे आणि वाढणार्‍यांचे श्रेय आहे. त्या स्थानाबद्दल मनात फारसा भक्तीभाव नसणाराही, जेवल्यावर तृप्त होतो, हा माझा स्वतःचा अनुभव आहे.

सज्जनगडावरील महाप्रसाद >> अगदी अगदी.....साधासा आमटी भात तो!! पण त्याची चव न्यारी!! आणि ती गव्हाची खीर!! सोबत श्रीराम जयराम....अगदी नास्तिक माणसाला आस्तिक बनवेल असे ते अन्न आणि ते वातावरण!!

गापै, दिनेश, शरी १००% सहमत. असंच आईच्या जेवणाचीही अशीच अवीट गोडी असते... खाणारा, खाऊघालणारा दोघही त्रुप्त ...

थोडस विषयांतर होतय... पण अजुन १ अनुभव असा कि...
अश्या प्रसादाच्या वेळी काहि भजन अथवा नमाचा गजर करतात.. तेंव्हा का कोण जाणे पण मलातरी अगदि मन भरुन येते, डोळे वहायला लागतात. आणि हे लपवताना फ़ारच तारांबळ होते. Happy

सज्जनगडावरील महाप्रसाद >> +१
पण तृप्ति पुर्ण दिवस राहते >> +१
मंजू १००% सहमत- आईच्या जेवणाचीही अशीच अवीट गोडी असते
धन्यवाद स्वस्ति, Nira, Naxkumar, प्रसन्न अ, गंध, शरी!!!

अश्या प्रसादाच्या वेळी काहि भजन अथवा नमाचा गजर करतात.. तेंव्हा का कोण जाणे पण मलातरी अगदि मन भरुन येते, डोळे वहायला लागतात. आणि हे लपवताना फ़ारच तारांबळ होते.>>>> अष्टभाव जागृत होण्याची जी लक्षणं आहेत त्यातील हे एक आहे.

वास्तवीक मी फारसा भात खात नाही, नसला तरी चालतो. पण गोन्दवल्याला दोनदा भात खाल्ला. साध्या आमटीभाता ला अमृतासारखी चव होती. बरोबर गव्हाची मस्त खीर. ही खीर माझी जाम आवडती. काय तृप्ती मिळते या जेवणाने. शेगावला बर्‍याच वेळा जाणे झाले व एकदा अक्कलकोटला . जेव्हा हे जेवण मिळते, तेव्हा मनात हेच येते की देव भावाचा भुकेला तर आपण या तृप्तीचे भुकेले आहोत.

आपलीच काहीतरी पुण्याई असावी जे असे अन्न मिळते. युरोप दौर्‍या त एकदा एका सरदारजीने आग्रह करुन लन्गरचा छान शिरा व द्रोणा मध्ये चक्क बटाटा रस्सा भाजी व पुर्‍या दिल्या. पोटभरुन खाल्ले.

एकदा शनी जयन्तीनिमीत्त खिचडी ( डाळ-तान्दळाची) व मोकळी बुन्दी खाल्ली होती. अशी खिचडी आपल्याला जमतच नाही.

रामक्रूष्ण मठातील खिचडी ... तीची चव काही न्यारीच. ३ वर्षापूरवी छत्तीसगढमध्ये होतो तिथे अमावस्येला कालीमातेची पूजा होती... प्रसाद येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी ... खाली बसून ... पत्रावळीवर खिचडी, मिक्स भाजी, टमाट्याची गोड चटणी व तांदळाची खीर ... ती त्रुप्ती आजही कायम आहे.. हाच मेन्यु विश्वकर्मा जयंतीचा ... तीच अवीट चव..

<<डोळे वहायला लागतात. आणि हे लपवताना फ़ारच तारांबळ होते.>>>> अष्टभाव जागृत होण्याची जी लक्षणं आहेत >> अश्विनी जरा डिटेल मध्ये लिहिणार का ? Happy

छान लेख. नवरात्रीत बंगाली पूजेतला प्रसाद व तशी खिचडी ही फार सुरेख लागते. आंध्रात प्रसाद म्हनून कधीकधी एक कडक वडा किंवा बगार भात देतात. अप्रतिम चव.
के अश्वीनी, प्लीज खरेच अजून लिही ह्यावर. मला असे अनुभव आलेले आहेत.

धन्यवाद सगुना,अश्विनी क, रश्मी.., सुजा, अमा
के अश्वीनी तुम्हाला विनंती अष्टभावा बद्दल जरूर डिटेल मध्ये लिहा.
मला डोळे वहायला लागतात असा अनुभव अमरनाथ दर्शनाने आला होता.

लेख आवडला भावला आणि पटला ही. प्रसादाच्या जेवणाची चव नेहमीच अप्रतिम असते आणि तृप्ती देणारी असते. +१११११

आमच्या इथे गजानन महारांजांच्या प्रगटदिनी पत्रावळीत भाकरीचा तुकडा, बेसन, खिचडीभात आणि शिरा असा प्रसाद वाटतात. रांग लावुन प्रसाद घेऊन तो बाहेर किंवा घरी जाऊन खायचा अशी पद्धत. रांगेतुन बाहेर येईपर्यंत सर्व जिन्नस एकत्र झालेले असतात तरीही त्याची चव अप्रतिम असते. एरवी मला जेवणात अजिबात गोड चालत नाही पण हा प्रसाद मात्र मिटक्या मारत खाते. तसेच जवळजवळ वीस बावीस वर्ष झाले असतील मी इथला प्रसाद दरवर्षी खातेय पण चव मात्र नेहमी सारखीच.

के अश्वीनी तुम्हाला विनंती अष्टभावा बद्दल जरूर डिटेल मध्ये लिहा. +१
मलाही खुपवेळा असे अनुभव आले आहेत.

गोंदावल्याचा आमटी-भात भयंकर प्रिय...
मला प्रेग्नंट असताना खुप दिवस गोंदवल्याला जायची ओढ लागली होती....
महाराजांचं दर्शन घ्यावं हे कारण होतच आणि आमटी भात खावासा वाटत होता खुप...
पोचायला उशीर झाला बराच..प्रसाद मिळेल की नाही अशी परीस्थीती निर्माण झाली...
पण आम्हाला आत घेतलं आणि प्रसाद मंडपाचं दार बंद झालं..
त्या दिवशी आमटी भात खातना हुन्दके येत होते...महाराजांना काळजी सगळ्यांची...

तिथलं ताकही अप्रतिम असतं..

असच एकदा पावस ला मिळालेली खिचडी आणि आवळ्याचं लोणचं अजुन आठवत

>>अष्टभाव जागृत होण्याची जी लक्षणं आहेत त्यातील हे एक आहे.>>
मला तर बरेच्दा आरती म्हणुन झाली आणि मंत्रपुष्प चालु असेल तेव्हा डोळे वाहु लागतात...
का ते कळत नाही..
किंवा एखादं गाणं ऐकताना...उदा. माउली माउली...देवा तुझ्या दारी आलो गाण्यात शेवटी "मोरया मोरया मी बाळ तान्हे" म्हणतात ना तेव्हा...हमखास पाण्याच्या धारा लागतात....घसा दुखायला लागतो....
खरच लिहा याबद्दल...जाणुन घ्यायला आवडेल

<<<<<अश्या प्रसादाच्या वेळी काहि भजन अथवा नमाचा गजर करतात.. तेंव्हा का कोण जाणे पण मलातरी अगदि मन भरुन येते, डोळे वहायला लागतात. >>>> + ११११११
@ Nira, मला पण नेहमी असाच अनुभव येतो... पण ताराबळ होउ न देता मी मन्सोक्त वाहू देते.... मन हलके होते.

Pages