अन्नदानाची अवीट चव

Submitted by भागवत on 24 February, 2015 - 04:31

काही दिवसाखाली तिरूपतीला जायचा योग आला. तिथे तिरुमला तिरूपती देवस्थान तर्फे मोफत भोजनाची व्यवस्था राबवली जाते. मी तिथे बऱ्याच वेळेस भोजन ग्रहण केले आहे. बालाजीचे दर्शन झाल्या नंतर आमची पावले आपोआप तिकडे गेली. दर्शनाला मोठी रांग होती तेवढीच रांग भोजनालयात होती. पध्दतशीर रांग... 4 मोठे हॉल... माडून ठेवलेल्या टेबल आणि खुर्च्या... रांगेत मांडून ठेवलेली केळीची पाने... हॉलच्या बाहेर भली मोठी पेंटीग... वाढण्यासाठी मोठ्या ट्राॅली... तेथील जबरदस्त व्यवस्थापन... आणी जोडीला अप्रतिम स्वयंपाक...

मी दररोज च्या जेवणात भात कमी खातो. पण स्वयंपाकाला अवीट चव असल्या मुळे मी दोनदा डोंगरा एवढा भात कधी फस्त केला हे मला कळलेच नाही. पहिल्यांदा वरण, दुसर्‍यांदा सांबर, शेवटी ताक. आणि या तिन्हीचे रसमिसळ होऊन आलेली अप्रतिम चव. याला तोडच नव्हती. सगळीजण भोजनाचा आस्वाद घेत होती. मा‍झ्या आईची बालाजी वर अटूट श्रद्धा असल्या मुळे आई भोजन हा बालाजीचा प्रसाद म्हणुन ग्रहण करत होती. तर आम्ही फक्त भोजन करत होतो. असे म्हणतात समाधानी होऊन भोजन केले तर ते व्यवस्थित पचते. मी खुप आनंदाने खात होतो. आम्ही तेथुन समाधानी होऊन बाहेर पडलो. मी तिथे 2 दिवस होतो. परत दुसर्‍या दिवशी मी भोजनालयात मधे भोजन करून तृप्ती ची ढेकर दिली.

मी असाच अनुभव गोंदवलेकर महाराज मंदिरात घेतला आहे. तेथील व्यवस्था सुध्दा सुरेख आहे. भोजनाला अप्रतिम आणि अवीट गोडवा आहे. आमच्या कॉलोनी मधे गणपती बसवल्या नंतर बरेच कार्यक्रम होतात. त्या मधे एक दिवस जेवणं सगळ्यांना भोजन असते. तेव्हा सुध्दा स्वयंपाकाची चव जबरदस्त असते. भोजनात फक्त साधे वरण भात आणी एखादे स्वीट असते. परंतु ते सुध्दा एकदम चविष्ट लागते.

आचाऱ्याने मन लावून मेहनत घेतली होती का देवाचा प्रसाद असल्या मुळे जेवणाला अप्रतिम चव आली होती हे कळतच नाही.

आमच्या गावी गोपाळकाला होतो. त्या मधे सगळ्यांनी सोबत आणलेले पोहे, चुरमुरे, हिरवा ठेसा मिसळतात आणी प्रसाद म्हणुन वाटतात. गोपाळकाला सुध्दा खुपच छान लागतो. असेच एकदा मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. तिथे हनुमान जयंती निमित्त भात, वरण आणी शिरा होता भोजन प्रसाद होता. आम्ही सगळे चटई वर पंगत करून बसलो. साधाच भात वरण पण प्रसाद असल्या मुळे त्यामधे जबरदस्त चव होती.

असे भोजन कितीही पैसे मोजून हॉटेल किंवा कुठेही मिळणार नाही. मला सार्वजनिक ठिकाणी भोजन येव्हडे चांगले का होते हा प्रश्न पडला आहे? बहुतेक निरपेक्ष वृतीने, आणी अत्मियतेने सगळ्यांनी केलेले काम आणी मनापासून केल्यामुळे त्याला आलेली स्वर्गीय चव याची मिसळ होऊन ते अन्न अन्न न राहता देवाचा प्रसाद बनते. असा गोड चवीचा प्रसाद ग्रहण केल्यावर मनाला समाधान मिळते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पावसची डाळ तांदळाची खिचडी. खास त्यासाठी आम्ही गाड्या काढून पावसला जायचो.

मंगळूरला बहुतेक देवळांमधून दुपारी जेवणाची सोय असते. भात सांबार रसम ताक आणि एखादी भाजी इतकाच स्वयंपाक. केळीच्या पानावर वाढतात. सोबत एखादा बुंदीचा लाडू वगैरे. माझ्या लेकीनं असंच एका देवळांत बसून स्वतःच्या हातानं पहिल्यांदा व्यवस्थित बसून भात खाल्ला होता. आजही तिला केळ्याच्या पानांत काहीही खायला आवडतं. (तिची आवडनिवड पाहता वी डीझर्व टू स्टे इन दिस सिटी!!) इकडं मद्रासकडं बहुतेक देवळांमधून प्रसाद म्हणून गोड किंवा खारा पोंगल देतात.गोड पोंगल यम्मीच असतो, पण खार्‍या पोंगलमधले मिरीचे दाणे वेचण्यात माझा फार वेळ जातो. Happy

उडुपी श्रीकृष्णाच्या देवळामध्ये तर जे जेवण असतं त्याची तोड कशालाच असू शकत नाही. शिवाय हे जेवण वाढताना जी काय शिस्त आणि स्वच्छता पाळली जाते ती पाहण्यालायक. वाढपी चुकूनदेखील तुसडेपणा करताना दिसत नाही.

अन्नाची फार नासाडी पाहिली ती जगन्नाथपुरीच्या देवळांत. शिवाय अन्न विकतानापण एक गुर्मी आणि तिरसटपणा होताच. पैश्याला पण फार पिडतात. पण त्या देवळामध्ये मिळनारे ते खाजे (असंच म्हणतात ना?) अप्रतिम लागतात /

सार्वजनिक ठिकाणी भोजन येव्हडे चांगले का होते हा प्रश्न पडला आहे? बहुतेक निरपेक्ष वृतीने, आणी अत्मियतेने सगळ्यांनी केलेले काम आणी मनापासून केल्यामुळे त्याला आलेली स्वर्गीय चव याची मिसळ होऊन ते अन्न अन्न न राहता देवाचा प्रसाद बनते. असा गोड चवीचा प्रसाद ग्रहण केल्यावर मनाला समाधान मिळते.>>>>>अगदी
आणी सार्वजनिक ठिकाणाच्या भोजनामु़ळे अन्नदात्याला गोरगरीबाणचे अनेक आशिर्वादही लागतात...:)

धन्यवाद निल्सन,smitaklshripad,गंध,नंदिनी,धनवन्ती आणि preetiiii.

अर्रे वा! माझ्या सारखे 'वेडे' बरेच आहेत की!
वेडे=अतिसंवेदनशील
गणपति मिरवणुक- ढोल ताशा चा नाद, शास्त्रीय संगीत (कळणारे), समस्त देवांच्या आरत्या, विठु चा गजर, असं कश्यानेही मन, डोळे भरुन येतात. मग मनतल्या मनात कविता सुरु होते.. 'माझ्या मना बन दगड...'

@अश्विनी के - कृपया 'अष्टभाव जागृत होणे' यावर सवीस्तर सांगावे अथवा मायाजालात असल्यास लिंक द्यावि.

अश्विनी के >> +१

भागवत, छान आहे लेख!

अशीच बेमिसाल शिस्त शेगांवला ही असते. सकाळचा महाप्रसादाकरता काही आकार नसतो. संध्याकाळच्या प्रसादाकरता मात्र रु. ३५/- आकार आहे. अप्रतिम स्वच्छता, कटकट न करणारे वाढपी मन अन पोट तृप्त होतं.

शेगावला वारकरी म्हणूनही सेवा देता येते. त्याकरता नंबर लावावा लागतो. नंबर आला की घरी पत्र पाठवून निमंत्रण मिळतं. तीन महिने सेवा देता येते. पडेल ते काम करणं अपेक्षित असतं. या तीन महिन्याच्या काळात, तुमच्या घरी दर महिन्याला डाळ, तांदूळ, गहू + थोडे पैसे असं सगळं संस्थानाकडून पाठवलं जातं, जेणेकरून घरादाराची आबाळ होत नाही. (क्षमस्वः जरा अवांतर झालंय, पण कुणाला करायचं असेल तर जास्तिची माहिती देता येईल.)

असाच प्रसाद कारंजा (लाड) इथे असतो. सोवळ्यानी केलेला स्व्यंपाक, पंगत सगळा नीट अन स्वच्छ मामला.

ताट वाढले जात असतांना नामगजर करायचं कारण असं की पूर्ण ताट वाढून झाल्याशिवाय शक्यतो सुरुवात करू नये जेवणास असं असल्यामुळे आहे. मी कारंज्याच्याच गुरुजींना विचारलं होतं. जरा नामस्मरणही होतं अन लोक थांबतातही. सगळी पंगत वाढून झाली की संकल्प असेल तर तो सोडला जातो अन मग पंगत सुरू करतात.

दिनेशदा,

>> त्या स्थानाबद्दल मनात फारसा भक्तीभाव नसणाराही, जेवल्यावर तृप्त होतो, हा माझा स्वतःचा अनुभव आहे.

प्रत्येक स्थळ सात्त्विक असतंच. त्या स्थळातल्या सात्त्विकतेचा शरीरावर प्रभाव पडतोच. जी भूक लागते ती केवळ पोटालाच लागलेली नसते तर संपूर्ण शरीरातल्या प्रत्येक पेशीला लागलेली असते. साहजिकच संपूर्ण शरीराची तृप्ती होते. यात विश्वास वा अविश्वासाचा प्रश्नच येत नाही! Happy

आ.न.,
-गा.पै.

>>अन्नाची फार नासाडी पाहिली ती जगन्नाथपुरीच्या देवळांत. शिवाय अन्न विकतानापण एक गुर्मी आणि तिरसटपणा होताच.
गलिच्छपणाही प्रचंड आहे. म्हणजे आम्ही गेलो होतो तेव्हातरी होता. प्रसाद घेणार्‍यांची आणि देवळासमोर पालं (?) टाकून प्रसाद देणार्‍ञांची बाचाबाची झाली. काहींनी थेट भांड्यांत हात घालून खिचडी आणि जो काय प्रसाद होता तो वाढून घेतला. त्यानंतर तिथला प्रसाद घेण्याची इच्छा झाली नाही.

गामा, इतरांचा नाही, माझा स्वतःचा अनुभव. एका ठिकाणी केवळ मित्राच्या आग्रहाखातर गेलो, त्या स्थानाबद्दल माझ्या मनात विशेष भाव नव्हता. तरीही भोजनानंतरची तृप्ती अनुभवलीच.

म्हणून मला त्या सेवेकर्‍यांबद्दल आदर वाटतो. ते वाढताना भेदभाव करत नाहीत.

गलिच्छपणाही प्रचंड आहे.>> हो. आहेच. आम्ही गेलो तेव्हाही कुठंतरी बाचाबाची चालूच होती. ते पंडे लोक अगदी जिथंतिथं हात पसरून पैसे मागतात ते डोक्यात जाणारं प्रकरण आहे. शिवाय दर्शनासाठी अजिबात नसलेली शिस्त हेपण एक. वर परत ते छडीनं मारतात.... Sad

भुवनेश्वरहून पुरीला जाताना टॅक्सीवाल्यानं एका जुन्या देवळांत गाडी थांबवली होती. अगदी समुद्राकाठीच मंदिर. बर्‍यापैकी जुनं आहे (आता नेमके नाव आठवेना) ही तिथल्या मच्छीमार समाजाची देवी असल्यानं तिला रोजच्यारोज माशांचाच नैवेद्य लागतो (कांदालसूण चालत नाही!!) आणि तिथे देवळांतच मच्छी शिजवणे चालू होते. आम्हाला ते बघून फार गंमत वाटली. तिथला पंंडा म्हणे "सौ रूपया देगा तो आपका दस् बजेतक प्रसाद देंगे" पण आम्हाला पुढे निघायचे असल्यानं आम्ही या प्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी थांबलो नाही. Happy

मृण्मयी, फारसं टूरीस्ट अ‍ॅटरॅक्शन नसावं. आम्ही गेलो तेव्हा स्थानिक भक्तच जास्त होते.. देवळात गेल्यागेल्या मासे शिजवल्याचा वास आला म्हनून आम्ही पुजार्‍याला विचारत गेलो आणि माहिती मिळवत गेलो. नंतर जिथं स्वयंपाक चालू होता तिथंही जाऊन आलो. (लिहिताना आठवलं-- पुजार्‍यानं स्वयंपाकाचे फोटो मात्र काढू दिले नाहीत. "प्रसाद भ्रष्ट हो जायेगा" असं कारण दिलं.)

>>"प्रसाद भ्रष्ट हो जायेगा" Lol

आम्ही गोपालपूर बीचवरच्या आर्मी एअर डीफेन्सस्कूलमध्ये थांबलो होतो. तिथल्या स्थानिकांना 'या जागेजवळ काय बघण्यासारखं आहे' हे विचारलंही होतं. बहुतेक फारसं जवळ नसावं म्हणून सांगितलं नाही. पण माश्यांचा नैवेद्यवालं देऊळ इंटरेस्टिंग वाटतंय.

काय लिहु ? नकळत डोळ्यात पाणी येतं सज्जनगडाची आठ्वण आली कि. आमटी भात अप्रतिम.
असेच एकदा हैदराबाद ला नरसिंहाचे देउळ आहे तिथे lemon भात खाल्ला होता. पुन्हा एकदा ते आठ्वते आहे.

रांगेत मांडून ठेवलेली केळीची पाने... हॉलच्या बाहेर भली मोठी पेंटीग... वाढण्यासाठी मोठ्या ट्राॅली... तेथील जबरदस्त व्यवस्थापन... आणी जोडीला अप्रतिम स्वयंपाक...>>>+१११
भात , सांबार , चटणी आणि कोबीची भाजी असा प्रसाद होता आम्ही गेलो तेव्हा . खरच काय अप्रतिम चव होती .
यात केवळ जेवण शिजवणार्‍यांचे आणि वाढणार्‍यांचे श्रेय आहे >>> +१११
आता शिर्डी एवढं फेमस देवस्थान . आम्ही गेलो होतो एकदा . पण अन्नाला अजिबातच चव नवती .
आमच्या इथे एक दत्तांच मंदिर आहे . छोटंसच . पण दत्तजयंतीला केलेल्या मसाला भाताची चव दुसरीकडे कुठेही मिळणार नाही .

अश्या प्रसादाच्या वेळी काहि भजन अथवा नमाचा गजर करतात.. तेंव्हा का कोण जाणे पण मलातरी अगदि मन भरुन येते, डोळे वहायला लागतात. आणि हे लपवताना फ़ारच तारांबळ होते.>>>

असं बरेच्दा होतं . गणपतीत आरती संपता संपता "घालीन लोटांगण" चालू झालं की , आणि हल्ली ते एबीसीडी मधलं गाण आहे ना " ग ग गणपति " ते बघताना तर हमखास गळा दाटून येतो आणि डोळे भरून वाहू लागतात .

वरिल बर्याच प्रतिसादांमध्ये शेगाव चा उल्लेख झाल आहे.....तिथे हा महाप्रसादामुळे मिळणार्या तृप्ती चा अनुभव कैक दा घेतला आहे. अगदी वय वर्ष १ असल्या पासुन आत्त पर्यंत. Happy

कमी खाऊनही भूक भागणे हे सात्त्विक अन्नाचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे.+१

जिथे अन्न हे ब्रह्म समजले जाते तिथे समाधान मिळते. पैसे द्या - प्रसाद घ्या असे व्यवहारीक स्वरुप येते तिथे समाधान मिळत नाही.

एकदा एका आश्रमात २४ तास रहाण्याचा योग आला. तिथले सेवेकरी आणि अन्न इतके वाईट होते की चार दिवस रहायचे असे ठरवुन दिड दिवसात पळ काढला.

ह्या बाफचा विषय नसल्यामुळे व हा बाफ धार्मिक विभागात नसल्यामुळे इथे लिहिणार नव्हते. ज्यांनी विपुत विचारले त्यांच्या विपुतच लिहिणार होते. पण अजून काहीजणांना अष्टभावाबद्दल हवं आहे हे कळल्यामुळे इथे लिहिते आहे. ह्यावर चर्चा अजिबातच अपेक्षित नाही आणि मी स्वतःही चर्चा करणार नाही कारण मी अधिकारी नाही. परत, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो

श्री साईसच्चरित परिक्षेसाठी अभ्यास करताना जे वाचनात आले, जे समजले ते देत आहे. इदम् न मम, इदम् गुरुदत्तस्य । माझे ह्यात काहीही नाही.

अष्टभाव
----------

आपले तीन प्रकारचे देह असतात. एक भौतिक देह, एक प्राणमय देह आणि एक मनोमय देह. आपल्या प्राणमय देहात मुख्य सात चक्रं (सहस्रार, आज्ञा, विशुद्ध, अनाहत, स्वाधिष्ठान, मणिपूर आणि मूलाधार) असली तरी १०८ केद्रं असतात. आपल्या आचार, विचार, आहार, विहार, पुर्वसंचित व आताच्या कर्मांनुसार त्यातली काही शुद्ध तर काही अशुद्ध असतात. जेव्हा आपल्या प्राणमय देहाची तयारी असते आणि जेव्हा अत्यंत पवित्र स्पंदनांच्या सानिद्ध्यात आपण येतो तेव्हा त्या पवित्र स्पंदनांमुळे आपल्यातील अशुद्ध केंद्रं शुद्ध होऊ लागतात. पवित्र स्पंदनं त्या क्षेत्रात गेलेल्या सगळ्यांनाच मिळत असतात पण जसं सुपिक जमिनीत बीज पडले की ते अंकुरते आणि नापिक जमिनीत बीज पडले तर ते फ़ुकट जाते तसं आपली जमिन पवित्रं स्पंदनं घेण्याजोगी सुपिक असेल तर ती स्पंदनं आपल्या त्रिदेहात चांगले बदल घडवतात. ही केंद्रं शुद्ध होऊ लागतात तेव्हा आपल्याला सुक्ष्मं कंप जाणवतो. आपली सात्विक एकाग्रता चांगली झाली तर भावोत्कटताही उत्तम होते.

अष्टभाव जागृत होण्याची तीन दृश्य लक्षणे आहेत. डोळ्यात पाणी येणे/आनंदाश्रुंची धार लागणे (कुठल्याही ज्ञात कारणाशिवाय), कंठ सद्गदित होणे, शरिराला कंप सुटणे.

ह्या ब्रह्मांडात परमेश्वरी संगीत ठायी ठायी आहे. जो ह्याचा शोध घेतो त्याला ते नाद सौंदर्य आपल्या पिंडातही अनुभवायला मिळते. ह्या संगीताचे व्यक्त होणे म्हणजे अष्टभाव.

नाट्यशास्त्राप्रमाणे अष्टभाव :- स्तंभन, स्वेद, रोमांच, स्वरभेद, वैपथू, वैवर्ण्य, अश्रू आणि प्रलय. काहीचे अर्थ आत्ता मला आठवत नाहियेत.

अष्टभावांसोबत दर्शनाबद्दलही जाणून घेणे योग्य ठरेल.

१) स्वप्नदर्शन -

जेव्हा स्वप्नात सगुणरुपात दर्शन व मार्गदर्शन मिळते तेव्हा त्याला 'मार्गदर्शक' स्वप्नदर्शन म्हणतात (उदा. रामरक्षा बुधकौशिक ऋषींना स्वप्नात दिला गेला होता).

जेव्हा आयुष्यातल्या एखाद्या पेचप्रसंगी काहीही न बोलता नुसते अभयहास्य केले जाते त्याला 'आश्वासक' स्वप्नदर्शन म्हणतात.

जेव्हा तुमचं देवाप्रतीचं प्रेम तुम्हाला भावरुपाने त्याच्याजवळ नेतं तेव्हा ते 'भाववर्धक' स्वप्नदर्शन.

२) भावदर्शन -

पोथीवाचन, ध्यान, जप करताना आजूबाजूला अदृश्य अस्तित्व/गतीची जाणीव होते ते 'अदृश्य' भावदर्शन. कधीकधी तर्ककुतर्कही निर्माण होतात...भूत की देव?

जप, पोथीवाचन, ध्यान करताना मनामध्ये आपोआप इष्टदेवतेची मूर्ती प्रगटते. ते 'मनोभावन' दर्शन.

पूजा करताना एकाएकी आनंद होतो. मन खूप शांत होतं. परमेश्वर आनंद निर्माण करणारा आहे हे जाणवते. हे साधकाला पुढच्या पायरीकडे नेते. हे 'भावनाभावन' दर्शन.

३) पंचमहाभूतात्मिक दर्शन (पंचमहाभूतांवर आधारित) -

आकाशतत्व - उदा. जप करत असताना श्रीकृष्णाची बासरी ऐकू आल्यासारखे वाटणे.
वायूतत्व - वायूचा स्पर्श आपल्या अंगात कंपनं निर्माण करतो.
तेजतत्व - प्रकाश, तेज दिसते.
पृथ्वीतत्व व जलतत्व - अष्टभाव जागृत होतात. जेव्हा ते खूप जागृत होतात तेव्हा त्या व्यक्तीचं भान हरपल्यासारखं होतं. अती उत्कटता असेल तर अश्यावेळेस अंगात आलं वगैरे समजून साधकाचे पाय धरु नयेत. त्यामुळे त्याची प्रगती खुंटते. मी अश्या एका १००+ वयाच्या अत्यंत तेजस्वी पण कृश व्यक्तीस गिरगावातल्या स्वामीसमर्थ मठात स्वामींसमोर भान हरपून नाचताना पाहिलं आहे. ते नाटक नव्हतं. आपण बस तो सोहळा पहावा.

प्रभाव निर्मिती होताना अष्टभाव प्रभाव, अष्टभाव स्वभाव आणि अष्टभाव निर्भाव ह्या पायर्‍या येऊ शकतात. ह्याबद्दलही डिटेलवार माहित नाही. पण पहिला प्रभाव दिसणे, नंतर त्या प्रभावाचे स्व-भावात्/स्वाभाविक अविष्कारात रुपांतर आणि शेवटी कडेलोट असा अर्थ असावा. शेवटच्या स्थितीत शुद्ध जाते, हे श्रेष्ठ लक्षण आहे. पण इथे अहंकार होण्याचा संभव व त्यामुळे पायरी घसरणं निश्चित. ही गोष्ट चुकवली तर पुढील प्रगती जोरात.

४) दृष्यभाव दर्शन

रुपांतरीत सगुण दर्शन - एखादा भिकारी सुद्धा येऊन मदत करुन जाईल.
समरुपांतरीत सगुण दर्शन - प्रेमळ, चांगली, शुद्ध अंत:करणाची व्यक्ती भेटून आनंद देऊन जाते.
विपरीत रुपांतरीत सगुण दर्शन - एकदम घाणेरडी, परमेश्वराच्या संकल्पनेच्या विरोधी दर्शन. हे दर्शन व्यक्तीला परमेश्वर सर्वगुणसंपन्न आहे ह्याची जाणीव करुन देण्यासाठी होते आणि ही जाणीव हे रुप समोरुन गेल्यागेल्या लगेचच होते.

प्रत्यक्ष दर्शन (जाणीवसहित) - हा परमेश्वर आहे ही जाणीव होते (अकारण वा कारणासहित)
पश्चात जाणीवदर्शन - तो गेल्यावर लगेच हा परमेश्वर होता ही जाणीव होते.

५) आत्मदर्शन ..... रामरुपी अंतरात्मा दर्शने दोष नासती.

६) सगुण साकारदर्शन - अवतारी दर्शन. परमात्मा सगुणात आला असताना त्याचे दर्शन होणे. उदा. राम, कृष्ण, साई, स्वामी हे देहात असताना त्यांना ज्या भाग्यवंतांनी पाहिले त्यांना असे दर्शन घडले.

असा अनुभव वाळकेश्वरच्या महालक्ष्मी मंदिरात आला होता.
तिरुपती मंदिरात,प्रसाद म्हणून कालवलेला दहीभात त्याने हाताने द्रोणात दिल्यावर मात्र तो द्रोण दुसर्‍याला दिला होता.

अश्विनी के, अष्टभावा वर सविस्तर आणि अप्रतिम माहिती दिल्याबद्दल आपल्यास धन्यवाद.
जेव्हा अत्यंत पवित्र स्पंदनांच्या सानिद्ध्यात आपण येतो तेव्हा त्या पवित्र स्पंदनांमुळे आपल्यातील अशुद्ध केंद्रं शुद्ध होऊ लागतात. पवित्र स्पंदनं त्या क्षेत्रात गेलेल्या सगळ्यांनाच मिळत असतात पण जसं सुपिक जमिनीत बीज पडले की ते अंकुरते >>>+१११

p_r_a_जो, सारिका३३३, रश्मी.. , स्वस्ति, Prasann Harankhedkar ,नितीनचंद्र , राजसी, टण्या ,कल्पु, देवकी, सगळ्यांना प्रतिसादा बद्दल धन्यवाद!!!

Pages