अन्नदानाची अवीट चव

Submitted by भागवत on 24 February, 2015 - 04:31

काही दिवसाखाली तिरूपतीला जायचा योग आला. तिथे तिरुमला तिरूपती देवस्थान तर्फे मोफत भोजनाची व्यवस्था राबवली जाते. मी तिथे बऱ्याच वेळेस भोजन ग्रहण केले आहे. बालाजीचे दर्शन झाल्या नंतर आमची पावले आपोआप तिकडे गेली. दर्शनाला मोठी रांग होती तेवढीच रांग भोजनालयात होती. पध्दतशीर रांग... 4 मोठे हॉल... माडून ठेवलेल्या टेबल आणि खुर्च्या... रांगेत मांडून ठेवलेली केळीची पाने... हॉलच्या बाहेर भली मोठी पेंटीग... वाढण्यासाठी मोठ्या ट्राॅली... तेथील जबरदस्त व्यवस्थापन... आणी जोडीला अप्रतिम स्वयंपाक...

मी दररोज च्या जेवणात भात कमी खातो. पण स्वयंपाकाला अवीट चव असल्या मुळे मी दोनदा डोंगरा एवढा भात कधी फस्त केला हे मला कळलेच नाही. पहिल्यांदा वरण, दुसर्‍यांदा सांबर, शेवटी ताक. आणि या तिन्हीचे रसमिसळ होऊन आलेली अप्रतिम चव. याला तोडच नव्हती. सगळीजण भोजनाचा आस्वाद घेत होती. मा‍झ्या आईची बालाजी वर अटूट श्रद्धा असल्या मुळे आई भोजन हा बालाजीचा प्रसाद म्हणुन ग्रहण करत होती. तर आम्ही फक्त भोजन करत होतो. असे म्हणतात समाधानी होऊन भोजन केले तर ते व्यवस्थित पचते. मी खुप आनंदाने खात होतो. आम्ही तेथुन समाधानी होऊन बाहेर पडलो. मी तिथे 2 दिवस होतो. परत दुसर्‍या दिवशी मी भोजनालयात मधे भोजन करून तृप्ती ची ढेकर दिली.

मी असाच अनुभव गोंदवलेकर महाराज मंदिरात घेतला आहे. तेथील व्यवस्था सुध्दा सुरेख आहे. भोजनाला अप्रतिम आणि अवीट गोडवा आहे. आमच्या कॉलोनी मधे गणपती बसवल्या नंतर बरेच कार्यक्रम होतात. त्या मधे एक दिवस जेवणं सगळ्यांना भोजन असते. तेव्हा सुध्दा स्वयंपाकाची चव जबरदस्त असते. भोजनात फक्त साधे वरण भात आणी एखादे स्वीट असते. परंतु ते सुध्दा एकदम चविष्ट लागते.

आचाऱ्याने मन लावून मेहनत घेतली होती का देवाचा प्रसाद असल्या मुळे जेवणाला अप्रतिम चव आली होती हे कळतच नाही.

आमच्या गावी गोपाळकाला होतो. त्या मधे सगळ्यांनी सोबत आणलेले पोहे, चुरमुरे, हिरवा ठेसा मिसळतात आणी प्रसाद म्हणुन वाटतात. गोपाळकाला सुध्दा खुपच छान लागतो. असेच एकदा मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. तिथे हनुमान जयंती निमित्त भात, वरण आणी शिरा होता भोजन प्रसाद होता. आम्ही सगळे चटई वर पंगत करून बसलो. साधाच भात वरण पण प्रसाद असल्या मुळे त्यामधे जबरदस्त चव होती.

असे भोजन कितीही पैसे मोजून हॉटेल किंवा कुठेही मिळणार नाही. मला सार्वजनिक ठिकाणी भोजन येव्हडे चांगले का होते हा प्रश्न पडला आहे? बहुतेक निरपेक्ष वृतीने, आणी अत्मियतेने सगळ्यांनी केलेले काम आणी मनापासून केल्यामुळे त्याला आलेली स्वर्गीय चव याची मिसळ होऊन ते अन्न अन्न न राहता देवाचा प्रसाद बनते. असा गोड चवीचा प्रसाद ग्रहण केल्यावर मनाला समाधान मिळते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आश्विनीके..त्रिवार धन्यवाद -/\-
आपण अत्यंत सुंदर लिहीले आहे.

मझ्या सर्वच शंका दुर झाल्या...
मी आधी सांगितल्या प्रमाणे...मला 'असा' अनुभव असंख्य वेळेला आला आहे. मी स्वतः ला दोष दायची...मी फ़ारच हळवी आहे, हे योग्य नाही इ.इ.
पण हे होणे हा अगदी विलक्षण अनुभव आहे.. हे पटले. आणि ते होवु द्यावे हे अगदि पटले.

भागवत- तुम्हालाहि धन्यवाद! आपल्या लेखा मुळे हे शक्य झाले.

भागवत, तुम्ही खूप छान लिहल आहे, टीटीडी मधील जेवण मलासुद्धा खूप आवडते. आणि आता पर्यंत जेवढ्या मंदिरांमध्ये जेवली तेव्हा मन अन पोट तृप्त झाल होतं. लहानपणी शिर्डीतील प्रसादालय मधील जेवण आवडले होते.

आता शिर्डी एवढं फेमस देवस्थान . आम्ही गेलो होतो एकदा . पण अन्नाला अजिबातच चव नवती .<<<< सारीका३३३, हा अनुभव मागच्या आठवड्यात घेतला खूप वाईट वाटले. बालाजी नंतर साईबाबा श्रीमंत देव म्हणतात मग येथील व्यवस्था इतकी बेकार का??

अश्विनी,फार सुंदर लिहिले आहेस.

आरती.,

>> ...साईबाबा श्रीमंत देव म्हणतात मग येथील व्यवस्था इतकी बेकार का??

साईबाबा देवस्थान अतिश्रीमंत असलं तरी धर्मद्रोही सरकारच्या ताब्यात आहे. संस्थानावर एकसे एक भ्रष्ट माणसे बसली आहेत. मंदिर परत भक्तांनी ताब्यात घेतले पाहिजे.

आ.न.,
-गापै.

संस्थानावर एकसे एक भ्रष्ट माणसे बसली आहेत. मंदिर परत भक्तांनी ताब्यात घेतले पाहिजे.<<<< गापै, उद्या वेगळा धागा काढते. अजून बरीच माहिती मिळेल.

@भागवत - उत्तम धागा.
@केश्विनी - खूप छान पोस्ट आहे तुमची.
गोंदवल्याला मी गेले आहे एकदा पण प्रसादग्रहणाचा योग नव्हता.
नामस्मरण-अन्नदान-सगुण भक्ती या त्रयीला महत्व आहे.

अश्विनी के, अष्टभावा वर सविस्तर आणि अप्रतिम माहिती दिल्याबद्दल आपल्यास धन्यवाद. _/\_ Happy

धागालेखकाशी सहमत.

नोटबंदी जाहीर केली त्याच्या दुसर्‍या दिवशी आम्ही कोल्हापुरात होतो. जवळचे पैसे संपले होते, एटिएम्स बंद होते.
मंदिराच्या आवारात एक माणुस शेजारीच असलेल्या अन्नछ्त्राची कुपन्स वाटत होता.
जरा घाबरतच आणि नाईलाजानेच आत गेलो. स्वच्छता असेल का, जेवणाची क्वालिटी काय असेल वगैरे प्रश्न पडलेले.
त्या दिवशी नोटबंदीमुळे का काय माहित नाही पण भरपूर गर्दी होती.

पण इतकी सुंदर व्यवस्था होती. जेवणाची चव अप्रतिम होती. भात, सांबार आणि साजुक तुपातला मुगाचा शिरा.
अहाहा.. अजुनही ती आठवण जीभेवरून जात नाही. आपोआप मनातल्या मनात त्या अन्नदात्याला हात जोडले गेले.

तसाच अनुभव फार लहानपणी अलिबागच्या कुणकेश्वर का काय आहे (१००० पायर्‍या चढून जावे लागते) तिथल्या अन्नछ्त्रात जेवणाचा आल्याचे स्मरते.

रत्नागिरीच्या पावसला मिळणारी डाळ-खिचडी आणि आवळ्याचं लोणचं....लोणचं म्हणजे नुसतं लोणच्याचं खार... पण दोन्हींची चव अशी की अहाहा!!!
मन आणि पोट कधी तृप्त होऊन जातं कळतच नाही.

आमच्या गावी गजानन महाराजांच्या प्रगटदिनाच्या महाप्रसादाची चव अशीच असते... अवर्णनीय.

तिरूपती मधील जेवण आणि व्यवस्था अप्रतिम आहे. महाराष्ट्रतही हल्ली बर्याच धार्मिक स्थळांवर जेवणा ची सोय केलेली दिसुन येते. रांजणगाव, ओझर, शनी शिंगणापुर, कोल्हापुर इ.

पहिल्यांदा वरण, दुसर्‍यांदा सांबर, शेवटी ताक.... वरण नाही वाढत तर..... पहिल्यांदा सांबर, दुसर्‍यांदा रस्सम, शेवटी ताक...

Pages