सागरी सुका मेवा (लेखासहीत)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 18 February, 2015 - 02:18

डोक्यावर टोपली, हातात एक हिरवा पाला असलेली छोटीशी फांदी, पायात कधी चप्पल नाहीतर अनवाणी, कोळी पद्धतीचे काष्टी पातळ नेसलेली आणि कानात मोठ्या गाठ्या प्रमाणे म्हणा की मोठ्या कोलंबीप्रमाणे असलेले कानातले, त्याच्या वजनाने आपली करंगळी जाईल इतपत कानाच्या पाळीला पडलेले होलामुळे कानाच्या पाळीसकट लोंबणारे तिचे गाठी कानातले अशी रूप असलेली एक कोळीण आजी माझ्या आजीची मैत्रीण होती. महिना दोन महिन्याने तिची वारी आजीला भेटण्यासाठी आमच्या घरी असायचीच. उरणच्या करंजा गावातून ती आमच्या उरणच्या नागांव ह्या गावात जवळ जवळ दीड तास चालून यायची. आली की हॉलमध्ये टोपली उतरवायची मग आई चहा-पाणी वगैरे आणून द्यायची ते घेत आजी आणि ती गप्पा मारत बसायच्या. त्यांच्या गप्पा चालू असायच्या तेव्हा मात्र माझी नजर जायची ती त्या कोळीण आजीच्या टोपलीत. टोपलीत एक रास असायची व जवळ गेले की त्याला एक कुबटसा वास यायचा. त्या वासाच्या दिशेने टोपलीत डोकावले की दृष्टीस पडायचे ते सुके मासे, कधी जवळा, करंदी (अंबाड), वाकट्या कधी बोंबील, टेंगळी, बांगडे. ह्या टोपलीतील काही भाग ती आजीला चेहर्‍यावर प्रसन्न भाव आणून द्यायची. इथूनच मला सुक्या माश्यांची ओळख होऊ लागली.

ही आजीची मैत्रीण सुक्या माश्यांच्या बदल्यात काही मोबदला घ्यायची नाही. माझी आजी कधी कधी जबरदस्तीने तिला पैसे हातात द्यायची पण ती आजीच लक्ष नसताना हळूच पुन्हा आम्हाला दिलेल्या जवळ्याच्या राशीत ते पैसे लपवून ठेवायची. संध्याकाळी जेव्हा आई हा जवळा डब्यात भरायला जायची तेव्हा तिला ते पैसे जवळ्यात दिसायचे. मला मात्र हे पाहून खूप गंमत वाटायची. आपल्याला गोष्टीत ऐकल्या प्रमाणे धनलाभ झालाय किंवा खजिना सापडलाय असे वाटायचे. नंतर आजी तिला पैसे न देता मळ्यांतली वांगी, टोमॅटो वगैरे भाजी तिच्या टोपलीत देऊ लागली. पूर्वीचे मैत्रीचे व्यवहार बहुतेक अश्याच देवाण-घेवाणीवर चालायचे. अजूनही सुक्या माश्यांच्या भेटी आप्तांना देण्याची परंपरा काही प्रमाणात चालू आहे. माझ्या घरी पण सुके मासे भेट येतात. जास्त असले की आम्ही पण इतरांना भेट म्हणून देतो. स्नेहसंबंध वाढवण्यास ह्या सुक्या माश्यांचाही हातभार लागतो तर.

हे मासे कसे काय टिकून राहतात, कसे सुकवतात ह्या बद्दल नेहमीच कुतूहल वाटायचं. उरणमध्ये मोरा व करंजा येथे मोठ्या प्रमाणात मासेमारीचा धंदा होतो. करंजा गावात आजीचे नातलग राहत होते. आजीबरोबर त्यांना भेटायला जाताना करंजा जेट्टी वर व बर्‍याच कोळी बांधवांच्या दारासमोर सुके मासे वाळताना दिसायचे. तेव्हा ओल्या माश्यांना मीठ लावून ते खडखडीत वाळवले जातात हे समजू लागले. वाकट्या बोंबील तर पताका सजवल्याप्रमाणे दोरीवर एकाच आकारात व अंतरावर वाळवत असल्याने सुशोभित दिसायचे.

सुकत लावलेले बोंबील

सुकवलेले बोंबील

वाकट्या

सुक्या माशाचा कचरा म्हणजे टाकाऊ खराब झालेले मासे, त्यांचा कोंडा वगैरे झाडांसाठी खत म्हणून वापरता येतो. लहानपणी आमच्याकडे वडील खतासाठी म्हणून खास जुना झालेला जवळा किंवा टाकाऊ सुक्या माश्यांचे खत वाडीतील लागवडीसाठी मागवायचे.

सुक्या माशांमध्ये जास्त करून जवळा, करंदी (अंबाड), सोडे (सालं काढलेली कोलंबी), बोंबील, टेंगळी, बांगडे, घोळीच्या तुकड्या, वाकट्या, माकुल, पापलेट, कोलीमच्य पेंडी (वड्या) यांचा जास्त समावेश असतो. पूर्वी सोड्यांच्या पण साबुदाण्याच्या चिकवड्यांप्रमाणे वड्या मिळायच्या पण हल्ली त्या नामशेष झाल्यासारख्या वाटतात. सुटे सोडेच दिसून येतात.

बहुतेक सगळ्याच मांसाहारी लोकांच्या घरात किराणामालाच्या साठवणी प्रमाणेच सुक्या माश्यांची साठवण केलेली असते. त्यासाठी एक खास डबा केलेला असतो. ह्या डब्याला मुंग्या लागणार नाहीत अशी दक्षता घेऊन डबा ठेवावा लागतो. डब्यात भरण्यापूर्वी मासे उन्हात पुन्हा खडखडीत वाळवून ठेवले की अजून चांगले टिकतात. जवळ जवळ ४-५ महिने सुके मासे चांगल्या स्थितीत राहतात. बर्‍याचदा आणीबाणीच्या प्रसंगी म्हणजे जेव्हा भांग येते म्हणजे समुद्रात मासे कमी प्रमाणात मिळतात, मासे मारी पावसाच्या काही दिवसात बंद ठेवली जाते अशा वेळी सुके मासे उपयोगी ठरतात. तसेच बाजारात जाणे होत नाही, काहीतरी पटकन करण्यासाठी, सकाळच्या डब्यांसाठी सुक्या माश्यांचा जास्त वापर केला जातो.

बर्‍याच ठिकाणी म्हणजे जिथे समुद्र किनारे नाहीत, मासे मिळत नाहीत अशा ठिकाणच्या मांसाहारी व्यक्तींसाठीही सुके मासे हे एक चविष्ट वरदान आहे. कारण समुद्रकिनार्‍या लगतच्या भागातून मासे नेऊन ते त्यांच्याइथे साठवण करू शकतात व हवे तेव्हा त्याचे सुग्रास जेवण बनवू शकतात. भारता बाहेर जाणारे कित्येक मांसाहारी भारतवासी हे माहेरचा आहेर असल्याप्रमाणे सुके मासे पॅक करून नेतात. मांसाहारी कुटुंब लांबच्या प्रवासाला जातानाही सुक्या मच्छीची टिकाऊ चटणी वगैरे सोबत घेऊन जातात.

सुक्या माशाच्या काही जुन्या आठवणी आजही जिभेवर रुची आणतात. लहानपणी बहुतेक मला व भावाला रोजचा नाश्ता हा चुलीत भाजलेले मासे आणि भाकरी असायचा. आजी सकाळीच गरमागरम भाकर्‍या चुलीवर करायची आणि त्याच चुलीच्या निखार्‍यावर वाकटी, बोंबील, कोलीमच्या पेंडी भाजत ठेवायची. भाजताना त्यांचा खरपूस वास यायचा त्यामुळे कधी एकदा तोंडात टाकतेय असे व्हायचे. भाजून झाले की चुलीतून बाहेर काढून त्यातली राख काढण्यासाठी ते थोडे वरच्या वर ठोकायचे म्हणजे त्यातली राख निघून जायची. ह्या बोंबील किंवा वाकटीचा तुकडा कटकन तोडून गरमा गरम भाकरी बरोबर खाण्यातला आनंद काही औरच. त्यात सुका बांगडा हा प्रकार असा असायचा की तो कोणाच्या घरी भाजला आहे हे कळावे अशा प्रकारे वास यायचा. गावात जवळपास कुठे भाजला असेल तरी तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहायचे नाही व कधी एकदा आपल्या कडे तो बांगडा आई-आजी कडे भाजून मागतेय असे व्हायचे. बांगडा हा इतका खारवलेला असतो की त्याचा एक इंचाएवढा तुकडा पण आख्ख्या भाकरीला पुरतो. चिमूटभर भाजलेल्या बांगड्याचा तुकडा भाकरीला लावून खाताना सुखावून जायला होत.

त्या काळी सुके मासे इतके स्वच्छ असायचे की जवळा वगैरे न धुवता डायरेक्ट आई-आजी भाकरी केलेल्या तव्यात टाकून खरपूस भाजून द्यायचा. हा जवळा भाकरी बरोबर नुसता खाताना कुरकुरीत व चविष्ट लागायचा.

भातुकली खेळतानाही आम्ही सुक्या माश्यांचा वापर करायचो. त्यात जास्त जवळा किंवा करंदीचे कालवण असायचे. करण्याचा सराव नसल्याने बरेचदा हे कालवण जास्त पाण्यामुळे पचपचीत व्हायचे. पण चुलीवर स्वकष्टाने केलेल्या त्या कालवणाला गरमा गरम भाता बरोबर खाताना वेगळीच गोडी यायची.

सुकी करंदी/अंबाड

लग्नसमारंभात हळदीच्या दिवशी जवळा हा प्रकार पारंपारीक रित्या केला जातो. लग्नाच्या दिवसाच्या १५ दिवस आधी जवळा आणून साफ करून ठेवला जातो. हळदीच्या दिवशी जवळा करण्यासाठी मोठं पातेलं चुलीवर चढवलं जात. जवळ्या मध्ये वांग घातलं जात. ह्या जवळा वांग्याची चव मटणाच्या चवीलाही शह देणारी ठरते. काही ठिकाणी रुखवतीतही सुक्या माश्याच्या छोट्या टोपल्या पॅक करून दिलेल्याही मी पाहिल्या आहेत.

सुका जवळा

कोंकण किनार्‍या लगतच्या गावांमध्ये सुक्या माशांचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय केला जातो. ओले मासे सुकवून ते वजनावर दिले जाते. जसजसे मासे जास्त सुकत जातात तसे त्यांचे वजनही कमी होत जाते. त्याचा परिणाम निश्चितच व्यवसायातील नफा-तोट्यावर पडत असतो.आजकाल लागणार्‍या बर्‍याच प्रदर्शना मध्ये खास करून कोंकण मोहोत्सव, आगरी-कोळी मोहोत्सवात सुक्या माशांचे स्टॉल्स लावलेले असतात. लघुउद्योग म्हणून काही ठिकाणी सुक्या माशांच्या पदार्थांच्या टपर्‍याही पोळी-भाजी केंद्रा प्रमाणे चालू झाल्या आहेत.

तर असा आहे सुक्या माश्यांचा महिमा. दिसायला अगदी क्षुल्लक पण अडीअडचणीत साथ देणारा, स्नेह जुळवणारा, रोजगाराचे साधन असणारा, रुचीरसाचा आनंद देणारा.

आता आपण सुक्या माशांच्या काही रेसिपीज पाहू. सुक्या माश्यांचे प्रकार करण्याची पद्धत साधारण सारखीच असते. कालवणाची चव प्रत्येक माश्यानुसार वेगवेगळी असते. सुक्या माश्यांत मीठ घालताना नेहमीपेक्षा कमीच घालावे कारण खारवलेले असल्याने ते आधीच खारट असतात.

बोंबील, वाखटी, करंदी, अंबाड, सोडे, घोळीच्या तुकड्या, माकुल, पापलेट अश्या माशांसाठी रेसिपी खालील प्रमाणे.

साहित्य
१) सुके मासे
२) दोन मध्यम कांदे बारीक चिरून
३) ५-६ पाकळ्या लसूण ठेचून.
४) पाव चमचा हिंग
५) अर्धा चमचा हळद
६) दीड ते दोन चमचे रोजच्या वापरातला मसाला किंवा आवडीनुसार लाल तिखट
७) मोठ्या लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ
८) २ चमचे तांदळाचे पीठ
९) मीठ
१०) थोडी चिरलेली कोथिंबीर
११) १-२ हिरव्या मिरच्या.
१२) दोन छोट्या पळ्या तेल

पाककृती :
बोंबील, वाकट्या असतील तर त्यांचे डोके, शेपटी काढून बोटा एवढे किंवा आवडीनुसार तुकडे करून घ्या. करंदी (अंबाड असेल तर त्याचा डोक्या कडचा टोकेरी भाग व शेपूट काढा. घोळीच्या तुकड्यांना खवले असतील तर ती काढून टाका.
जो प्रकार करायचा आहे त्या साफ केलेले मासे मासे दोन-तीन पाण्यांतून धुऊन घ्या. जर माखल्या असतील तर त्या १५ मिनिटे गरम पाण्यात ठेवून त्याला लागलेले काळे वगैरे काढून टाका आणि साफ केलेले माखल्यांचे तुकडे धुऊन घ्या.

आता पातेल्यात तेलावर लसूण पाकळ्यांची फोडणी देऊन त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजवा. कांदा शिजला की त्यात हिंग, हळद, मसाला घाला. थोडे परतून गरजे एवढे पाणी घाला. आता जो हवा तो सुक्या माशाचा प्रकार घाला. एक उकळी आली की त्यात चिंचेचा कोळ घाला. तांदळाचे पीठ थोड्या पाण्यात मिक्स करून पातळ करून रश्शात सोडा. तांदळाचे पीठ दाटपणा येण्यासाठी घालतात. थोड्या प्रमाणात कालवण करायचे असेल तर नाही घातले तरी चालते. गरजे नुसार मीठ घाला. थोडावेळ रस्सा उकळू द्या. वरून कोथिंबीर आणि हिरवी मिरची मोडून घाला. एक उकळी आली की गॅस बंद करा.

सुक्या घोळीच्या तुकड्या

रस्सा

माकुल शिजायला मात्र वेळ लागतो. साधारण पाऊण ते १ तास. बाकी सुके मासे १०-१५ मिनिटांत शिजतात.
कोणत्याही सुक्या माश्याच्या कालवणात वांगं, बटाटा, शेवग्याची शेंग ह्या पैकी काही घातल्यास रश्शाला अजून चव येते व पुरवठ्यालाही होते. हे घालताना सुके मासे घालतो तेव्हाच घालायचे. कैर्‍यांच्या सीझन मध्ये कैरी घालता येते. मग चिंच नाही घातली तरी चालते किंवा कमी प्रमाणात घालायची.

गरमा गरम भात आणि सुक्या माशाचा रस्सा म्हणजे मस्त मेजवानी असते.

जवळा, करंदी (अंबाड), बोंबील, सोडे, टेंगळी सुकट अशा प्रकारच्या सुक्या माश्यांचे कांद्यावरचे सुके खालील प्रमाणे.

१) वरील पैकी हवे असलेल्या सुक्या माशाचा एखादा प्रकार
२) २ कांदे चिरून
३) २ ते ३ छोट्या पळ्या तेल
४) पाव चमचा हिंग
५) अर्धा चमचा हळद
६) १ ते २ चमचे मसाला
७) चवीपुरते मीठ (कमीच घालावे कारण सुका जवळा खारट असतो)
८) १ मिरची
९) थोडी कोथिंबीर चिरून
१०) कोकम ३-४ किंवा टोमॅटो १ किंवा थोडा चिंचेचा कोळ.

प्रथम सुक्या माशाचा प्रकार चांगला २ ते ३ पाण्यांतून धुऊन घ्यावा. भांड्यात तेल गरम करून त्यात कांदा बदामी रंगाचा होईपर्यंत तळावा. मग त्यात हिंग, हळद, मसाला घालून सुक्या माशाचा प्रकार घालावा. थोडे पाणी घालावे किंवा वाफेवर शिजवला तरी चालतो. मध्ये मध्ये ढवळावे. १० मिनिटांनी ढवळून त्यात मीठ, मिरची, कोकम किंवा किंवा चिंचेचा कोळ किंवा टोमॅटो घालावे. परत थोडावेळ वाफ आणावी. आता त्यात कोथिंबीर घालावी व २ मिनिटे वाफ आणून गॅस बंद करावा.

ह्या प्रकारातही वांगे खास करून जवळा वांगे, बोंबील बटाटा असे कॉम्बिनेशन चांगले लागते. तसेच शेवग्याच्या शेंगाही चविष्ट लागतात.

सुक्या माशांची चटणी एकदा खाल्ली की दुसर्‍या वेळेस नाव काढल्यानेही तोंडाला पाणी सुटते. खास करून जवळा, करंदी (अंबाड) आणि बोंबील यांची चटणी केली जाते.

साहित्य
१) वरील पैकी एक सुक्या माशाचा प्रकार १ वाटी (बोंबील असल्यास तुकडे करून)
२) गरजे नुसार मिरची किंवा मिरची पूड
३) ७-८ पाकळ्या लसूण
४) थोडेसे मीठ

सुके मासे मध्यम आचेवर तव्यावर खरपूस भाजून घ्या.थंड झाले की वरील बाकीचे जिन्नस एकत्र मिस्करमध्ये वाटून घ्या.

वरील चटणी पुन्हा कांद्या वर परतून त्याचा एक चविष्ट प्रकार करता येतो. त्यात थोडा चिंचेचा कोळ आणि चिरलेली कोथिंबीर घालायची.

निखारे करता येण्यासारखे असतील तर निखार्‍यावर बांगडा, बोंबील, वाकटी असे प्रकार भाजून वासाने घरभर भूक चाळवता येते.

मालवणी पद्धतीनेही सुक्या माश्यांचे बरेच चविष्ट प्रकार करता येतात.

वरील लेख ऑगस्ट २०१४ च्या माहेर -अन्नपूर्णा अंकात प्रकाशीत झालेला आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु तुझ्याकडे जे कोण आता गटगला येतीलना, त्याना मी निरोप देणार आहे तुला बदडण्याचा.:फिदी:

एकतर मी मासे खात नाय, पण पुढल्या जन्मी नक्की ट्राय मारणार. माझी मैत्रिण पाटा घेऊन कायम मसाला वाटत बसायची या सुक्या रेसेपीकरता. तिच्या घरभर त्याचाच वास, पण मला सवय झालीय. मग मैत्रिणीचा भाऊ येऊन म्हणायचा, बाय लवकर कर गो!

लेख आवडला, नीट सविस्तर माहिती दिली आहेस.:स्मित:

छानच लेख.

मालाडच्या मनोरीला पण हा उद्योग चालायचा. मालवणचे सुके बांगडे तर प्रसिद्धच होते ( तिथे बोंबिल मात्र मिळत नसत. ) गेल्या भेटीत मालवणला राजकोटात इतर सटर फटर मासे सुकवताना बघितले. ते खाण्यासाठी नाही तर खतासाठी वापरतात.

गुजराथमधे वेरावळला मोठा उद्योग आहे हा. टाटा ऑईल मिल तिथून चिकन फिड साठी ते खरेदी करत असे.

मनीमोहोर, रश्मी धन्यवाद.
रश्मी अग तुच ये मला बदडवायला. Lol

दिनेशदा मालवणात बोंबील नाही पाहीले मी पण. तिथे बांगडेच भरपूर.

ते करंदी म्हणजे झिंगे का ?
एकसे एक प्रकार आहेत .. आमच्याकडे गोड्या पाण्यातले मासे असतात .. सुके म्हणजे फक्त झिंगे मिळतात .. ते खुप टेस्टी करते पन मी Proud

जागू मस्त लेख .
कोणत्याही सुक्या माश्याच्या कालवणात वांगं, बटाटा, शेवग्याची शेंग ह्या पैकी काही घातल्यास रश्शाला अजून चव येते > हजार वेळा अनुमोदन ग.
दिनेशदा मालवणात बोंबील नाही पाहीले मी पण. तिथे बांगडेच भरपूर. > जागू बोंबील ला नावच आहे बॉम्बे डक . मुंबईतच बोंबील मिळतात माझ्या माहीती प्रमाणे. कोल्हापूर चे पाहुणे इथे आले की त्यांना बोंबीलच हवे असतात.

मस्त फोटो आणि लेख. रत्नागिरीला गेल्याशिवाय सुके मासे खायला मिळायचे नाहीत. र्तिथंपण वार बीर बघून एखाद्या मैत्रमैत्रीणीकडे जावं लागेल. Proud

जागू कसले कातिल फोतो टाकले आहेस !!!!!!!!!!!!!!!!! !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
आता मल परत भूक लागली ना __________________ नशिब आज बुधवार आहे
लहानपणी बहुतेक मला व भावाला रोजचा नाश्ता हा चुलीत भाजलेले मासे आणि भाकरी असायचा>>>>>>> त्या सुक्या भाजलेल्या वाकड्याना आम्हि कड्बरी म्हनायचो Happy Happy

अश्विनी, किरण, वर्षूताई, चैत्राली,सृष्टी धन्यवाद.

टिना झिंगेच पण बेबीझिंगे
साती तुला कुरीयर करू का म्हणजे पाप फेडल्यासारखे होईल Lol

हो सामी नावातच आहे बोंबीलांच्या त्यांच्या उपलब्धतेचे ठिकाण.

जागू चविष्ट आणि मसालेदार लेख आहे. खूपच आवडला.
खास करून चुलिवर भाजलेल्या सुक्या माश्याच्या पेंडीचं वर्णन आणि खारवलेला एकच तुकडा अख्ख्या भाकरीबरोबर खाणे ही कल्पना निव्वळ तोंपासु होती. हिच अस्सल मांसाहारी माणसाची लक्षणं असावीत Happy

दिल खुश हो गया जागु. आताही गावी गेलो की नाष्टा भाकरी, चुलीत भाजलेल्या सुक्या वाकट्या किंवा भाजलेला जवळा लाल मिर्च्यांची चट्णी आणि चुलीत टाकुन हुरप्लेली कैरी असा असतो. Happy

"सुकी मांदेळी"
आमच्या भागात (ठाणे,सातपाटी,पालघर ) बोंबील, करंदी, जवळा,वाकट्या हे सर्वच प्रकार आहेत मात्र "सुकी मांदेळी" हा हि छोटा मासा फार मोठ्या प्रमाणात सुकविला जातो.

कोलीमच्य पेंडी (वड्या) यांचा जास्त समावेश असतो. >>>> आम्ही याला रेफ्याच्या वड्या म्हणायचो, आता बघायला सुद्धा मिळत नाहीत Sad

डोळ्यांचे पारणे फिटले अगदी फोटो बघून.
सुरमईचं पण असतं ना सुकं, ? तेही मस्तच लागतं. सुक्या बोंबील ला आम्ही काड्या म्हणतो.
बाकी खारं वांगं, सोडे घालून केलेले पोहे, जवळा भजी हे अगदी ऑल टाईम फेव्हरेट प्रकार.
आणि हो, आमच्याकडेही स्नेहसंबंध वाढवण्यास सुका बाजार हातभार लावतो. मध्यंतरी महाडला जाणं झालं होतं, तिथे मार्केट मध्ये एक पूर्ण गल्ली "सुकट गल्ली" म्हणून ओळखली जाते. तिथुन मस्त सोडे घेतले.

नंदीनी, मानसी, सुनटुन्या, पलक, स्वाती धन्स.

नुतन मी कॅडबरी वाचल Happy

दक्षिणा सुंदर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सस्मित खरच भाग्यवान आहात.

जय हो सुकी मांदेलीही मिळतात.

केदार आमच्याकडेही कोलीम आणि रेफा दोन्ही म्हणतात.

सामी बल्यांचाच प्रकार. फक्त ह्या बल्यापेक्षा छोट्या आणि चपट्या असतात. माझ्या माशांच्या धाग्यामध्ये आहे.

आशिका काड्या वरुन आठवल , आमच्याकडे कोणी अगदीबारीक असेल तर सुका बोंईल म्हणतात. Lol
माझ्याही नणंदेला दर वर्षी सुके मासे पॅक करून देतो आम्ही लंडनला.

Pages