सिंगापुरातली फूडकोर्टं आणि तिथली खाद्यसंस्कृती

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

२००९ ते २०१३ अशी चार वर्षं सिंगापुरात राहताना मी आणि नवर्‍याने मिळून सिंगापुरातली खाण्याची बरीच इंटरेस्टिंग ठिकाणं शोधून काढली होती. आम्हां दोघांमध्ये तो चिकन, पोर्क, बीफपासून बेडूक, सॅगो वर्म्सपर्यंत सर्व काही खाणारा आणि मी अंडंही न खाणारी शाकाहारी! त्यामुळे आम्हां दोघांना सिंगापुरातले 'रॉकी-मयूर' (संदर्भ : हायवे ऑन माय प्लेट) म्हणायला हरकत नाही. Proud सिंगापुरात ठिकठिकाणी दिसणार्‍या फूडकोर्टांबद्दलची रंजक माहितीही नॅशनल लायब्ररीत पुस्तकं चाळताना हाती लागली होती. त्या सगळ्या गोष्टींवर आधारित दोन लेख ऑगस्ट २०११ आणि ऑगस्ट २०१२मध्ये 'माहेर' मासिकात लिहिले होते. आज फूडकोर्टांवरची चर्चा वाचताना राहावलं नाही, म्हणून ते इथे पुनर्प्रकाशित करत आहे. सिंगापूर बर्‍याच वेगानं बदलत असतं त्यामुळे माझ्या लेखनात उल्लेखलेल्या काही जागा आता बंद वा स्थलांतरित झाल्या असण्याची शक्यता आहे. पण ज्यांना खरोखर सिंगापुरातली अशी ठिकाणं हुडकून अनुभवण्यात रस आहे, त्यांना मी 'माकानसूत्रा' आणि 'व्हेजिटेरियन फूड गाईड' या दोन पुस्तकांच्या लेटेस्ट प्रती घ्याव्यात, असं आवर्जून सुचवीन.

खालचा पहिला लेख फूडकोर्टांच्या इतिहासाबद्दल व काही खास सिंगापुरी पदार्थांबद्दल आहे.

******

हा लेख 'माहेर'च्या ऑगस्ट २०११च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. तो येथे पुनर्प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल माहेर मासिक व सुजाता देशमुख यांची मी आभारी आहे.

******

1.jpg
(कॅवेना रोड फूडकोर्टाचे हे रेखाचित्र संकल्प द्रविड याच्या सौजन्याने. :-))

जुन्या सिंगापुराच्या मध्यभागी असलेली 'फोर्ट कॅनिंग' टेकडी! टेकडीवरून लांबवर पसरलेलं सिंगापूर मनसोक्त बघावं आणि 'सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी'कडे उतरणारी वाट पकडावी. तिथून थोडं पुढे ब्रास बासा रस्त्यावर आलं की, रस्त्याच्या वळणावर असलेलं 'कोपितियाम' दिसतं. अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेलं हे कोपितियाम तिथे असलेल्या मेक्सिकन स्टॉलामुळे माझं आवडतं फूडकोर्ट. एखादा आवडता पदार्थ किंवा पेय घेऊन या फूडकोर्टाच्या काचेच्या भिंतीकडलं एखादं टेबल पकडून निवांत बसावं. नुकताच पाऊस पडून गेलेला असावा आणि उतरणीला लागलेलं ऊन आजूबाजूच्या परिसरावर रेंगाळत असावं. आठवडाअखेरीचा निवांतपणा अनुभवायचा हा एक मस्त मार्ग आहे.

फूडकोर्टांचा पहिला परिचय झाला तो बंगळुरातल्या फोरम मॉलात. 'ट्रान्झिट' नावाच्या त्या फूडकोर्टात 'सबवे'पासून मिनी इडल्यांचा भन्नाट काँबो मिळणार्‍या स्थानिक उडुपी हॉटेलसाखळीच्या स्टॉलापर्यंत वेगवेगळे रंजक स्टॉल होते. ग्रुपातल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या चवी चाखायच्या असल्या तर फूडकोर्टात जेवणं सोयीस्कर वाटायला लागलं. नंतर बहुशः प्रत्येकच मॉलात छोटीमोठी फूडकोर्टं सुरू झाली. त्यात भारतीय चवीच्या चिनी पदार्थांपासून तिबेटी मोमोंपर्यंत बर्‍याच गोष्टींनी हजेरी लावली. पण तरीही भारतात 'फूडकोर्टात जेवणं' हे 'कधीमधी हॉटेलात जेवणं' या गोष्टीच्याच पातळीवर राहिलं.

२००८साली पहिल्यांदा सिंगापुरात आल्यावर फूडकोर्टांचं लोकांच्या दैनंदिन आयुष्यातलं स्थान हळूहळू लक्षात यायला लागलं. रोजच्या रोज घरी स्वयंपाक न करता कुटुंबकबिल्यासकट कायम फूडकोर्टांत जेवणारे लोक ही भारतीयांच्या दृष्टीने नवलाईचीच गोष्ट! मग लायब्ररीतल्या पुस्तकांतून सिंगापुराचा इतिहास जाणून घेताना या फूडकोर्टांबद्दलही रंजक माहिती हाती लागली.

'खाणं' ही सिंगापूरकरांची सगळ्यांत आवडती गोष्ट आहे. लोक भुकेले असताना खातात, मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा हाणत असताना खातात आणि एकटे असले तर वेळ जावा म्हणूनही खातात. 'चिकन राईस इथला चांगला की तिथला?', 'सर्वोत्कृष्ट चिली क्रॅब अमक्याकडला' वगैरे बाबींवर चर्चा करायला लोक हिरिरीने पुढे सरसावतात. परदेशस्थ सिंगापूरकरांना व्याकुळ करणार्‍या सिंगापुरातील गोष्टींच्या यादीत इथे मिळणार्‍या खाण्याचा नंबर बराच वरचा आहे. आपल्या आवडत्या फूडस्टॉलावरच्या जेवणाचा आस्वाद घ्यायला लोक लांबलांबून येतात. थॉमसन रस्ता किंवा बुगिसातला ल्यांग स्या रस्ता, चायनाटाउनातला स्मिथ स्ट्रीट वगैरे लोकप्रिय ठिकाणी सप्ताहांताला लोकांची गर्दी उसळते. सुप्रसिद्ध स्टॉलांबाहेर लोकांच्या लांब रांगा लागतात. शुक्रवारी रात्री बीअर ग्लासांच्या साथीने फूडकोर्टांत निवांत गप्पा रंगू लागतात. गेलांगात लोक खास चिली फ्रॉग लेग्ज् खायला जातात. सप्ताहांताला ऑफिसांतल्या जेवणाच्या सुट्टीत 'माकान गो व्हेअर?' (माकान = जेवण. जेवायला कुठं जायचं?) हा प्रश्न हमखास ऐकू येतो. चिनी, मलय, भारतीय, युरोपियन, मध्यपूर्वेतलं अशा अनेक प्रकारांतल्या जेवणाचे पर्याय फूडकोर्टांत किफायतशीर दरात उपलब्ध असतात आणि सिंगापूरकर उत्साहाने नवीन नवीन पदार्थ चाखून बघायला सदैव तयार असतात.

सिंगापुरासारखीच इथली खाद्यपरंपराही बहुसांस्कृतिक आहे. हे शहर वसलं तेव्हा त्याची लोकसंख्या होती अवघी दीडशे. त्यातले पस्तीस लोक चिनी होते आणि उरलेले मलय. १८९७ साली, जे. डी. वॉन याने सिंगापुरात वेगवेगळ्या अठ्ठावीस किंवा त्याहून अधिक राष्ट्रीयत्वांचे लोक राहत असल्याचं नमूद केलं आहे. इ.स. १९११ साली केलेल्या जनगणनेत सिंगापुरात वेगवेगळ्या चोपन्न भाषा बोलल्या जात असल्याची नोंद झाली आणि वेगवेगळे अठ्ठेचाळीस वंश नोंदवले गेले. ही सगळी माहिती पाहता, सिंगापूर अगदी स्थापनेपासूनच बहुसांस्कृतिक शहर होतं, असं म्हणता येईल. सिंगापूर ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आल्यानंतर व्यापारउदिमाच्या निमित्ताने इथे लोकांचा ओघ सुरू झाला. वसाहतीचा विकास करण्याच्या दृष्टीने सुरुवातीला इथे येण्यासाठी ब्रिटिशांनी लोकांना प्रोत्साहन दिलं. लोकांना सहजपणे जमीन घेता येई, व्यापार सुरू करता येई. वसाहत स्थापन झाल्यापासून अवघ्या चार महिन्यांत लोकसंख्येने पाच हजाराचा आकडा गाठला. मलाक्क्यातले पेरानाकन लोक, मलय जनता, मद्रास प्रांतातले चुलिया, चीनातल्या वेगवेगळ्या प्रांतांतली होक्क्येन, हायनानी, त्योच्यू, वगैरे मंडळी सिंगापुरात आली. आणि त्यांच्याबरोबर सिंगापुरात प्रवेशली त्यांची खाद्यसंस्कृती!

सुरुवातीला आलेले बरेच स्थलांतरित हे आपापली कुटुंबं मायदेशी ठेवून एकेकटे सिंगापुरात आले होते. सुरुवातीच्या जनगणनेतही पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं प्रमाण खूपच कमी असल्याची नोंद आढळते. बरेच लोक वसतिगृहात राहावं तसे मिळेल त्या जागेत दाटीवाटीने राहात असत. कुटुंबकबिला असलेली जनता त्या मानाने कमीच! तसेच दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात संसाराची गरज भागवायला घरातल्या स्त्रियाही नोकरीनिमित्त बाहेर पडू लागल्या आणि घरी स्वयंपाक न करता तयार जेवण विकत घेण्याची पद्धत रूढ होत गेली.

नोकरीच्या ठिकाणी राबणार्‍या मजुरांची आणि हुजुरांचीही तयार जेवणाची गरज भागवणारे फेरीवाले सिंगापुरात फार पूर्वीपासून होते. १८६५ साली, जॉन कॅमेरॉनाने सिंगापुराचं वर्णन करताना त्या काळातल्या फेरीवाल्यांबद्दलही लिहिलं आहे. 'इतक्या तर्‍हेतर्‍हेच्या वस्तू, भाज्या, फळं, केक विकणारे फेरीवाले जगात दुसरीकडे आढळणार नाहीत. इथले मलय फेरीवाले बहुतांशी फळं विकतात, क्लिंग लोक केक आणि सुकामेवा, तर चिन्यांकडे सगळेच प्रकार असतात. मलय आणि चिनी फेरीवाले कावडीत माल वाहून नेतात तर क्लिंग डोक्यावरच्या पाटीत सामान ठेवून हिंडतात. चिन्यांच्या फिरत्या खानावळी हा सर्वांत अजब प्रकार म्हटला पाहिजे. त्यांच्या कावडीत एकीकडे चूल पेटवण्याची सामग्री आणि सुपासाठी एक पातेलं असतं, तर दुसरीकडे भात, शेवया, केक, जेली वगैरे पदार्थ असतात. तीन सेंटांमध्ये तीनचार पदार्थांचं भरपेट जेवण हे लोक देऊ करतात.'

दररोज जेवणाच्या वेळी फेरीवाले आपला माल घेऊन ठरावीक ठिकाणी जाऊन थांबत असत. नूडल विकणारे चिनी फेरीवाले कावडीवर बांबूच्या काड्यांनी 'टिक् टॉक्' आवाज काढून गिर्‍हाइकांचं लक्ष वेधून घेत. काही फेरीवाल्यांकडे गिर्‍हाइकांसाठी थोड्या खुर्च्या असत. खुर्च्या नसल्या तर गिर्‍हाईक जमिनीवर उकिडवं बसून जेवणाचा वाडगा हातात धरून जेवी. नंतर हॉकर सेंटरं उभारली गेली तेव्हा गिर्‍हाइकांना बसायला कायमस्वरुपी टेबलखुर्च्या आल्या. फिरत्या विक्रेत्यांबरोबरीने एकाच ठिकाणी कायमचं दुकान टाकलेले विक्रेतेही बरेच होते. कोलंबो स्ट्रीट, बुगिस स्ट्रीट, होक्क्येन स्ट्रीट, बडोक समुद्रकिनार्‍याचा परिसर वगैरे ठिकाणी असे विक्रेते आढळत.

या फेरीवाल्यांच्या व्यवसायाचा अर्थशास्त्रीय भागही मोठा रंजक आहे. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या मंदीच्या काळात या व्यवसायाने बर्‍याच बेकार लोकांना हात दिला, लोकांमधली उद्योजकता वाढीला लावली. कमी गुंतवणूक आणि चांगला परतावा असणारा हा व्यवसाय लोकांना आकर्षून न घेता तरच नवल! ज्या लोकांकडे चांगलं शिक्षण किंवा काही खास व्यवसायकौशल्यं नव्हती, ते लोक सहजपणे हा व्यवसाय सुरू करू शकत. सिंगापूर स्वतंत्र झाल्यावर जोमाने सुरू झालेल्या औद्योगिकरणाच्या प्रक्रियेत शेकडो कामगार विविध उद्योगांमध्ये काम करू लागले. कामाच्या ठिकाणी किफायतशीर व चटकन मिळणारं जेवण हवं, या गरजेतून फेरीवाल्यांकडून जेवण विकत घेण्याकडे कल वाढला आणि फेरीवाल्यांच्या व्यवसायाला बरकत आली.

फेरीवाल्यांचा धंदा जोमाने चालू लागला असला तरी त्यांच्याशी निगडित प्रश्नही बरेच होते. या फेरीवाल्यांकडे साधनसामग्री मोजकी असे. वापरलेली भांडी धुवायला पाणीपुरवठा नसायचा. रोजच्या रोज निर्माण होणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावणारी कुठलीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने ते कचरा तसाच रस्त्याकडेला टाकून देत असत. सिंगापुरात त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बिकट झाला होता आणि रोगांच्या साथीचा धोका शहराला सदोदित भेडसावत होता. बदलत्या जगात सिंगापुराला कात टाकून नवं, आधुनिक रुपडं धारण करायचं होतं. त्यामुळे हे फेरीवाले त्यावेळच्या नगरपालिकेच्या अधिकार्‍यांच्या डोळ्यांत न सलते तरच नवल! १९५० साली गव्हर्नर एफ. जिमसन यांनी नेमलेल्या फेरीवाले चौकशी समितीनं आपल्या अहवालात फेरीवाले हे सार्वजनिक उपद्रव असून त्यांना रस्त्यांतून ताबडतोब हलवण्यात यावं, असंच सर्व संबंधित अधिकार्‍यांचं मत असल्याचं नमूद केलं. फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होई, सफाई कामगारांना रस्ते स्वच्छ करणे जिकिरीचे होई. सिंगापूर ब्रिटिश वसाहत असताना तर हे सफाई कामगार आणि फेरीवाले यांमधून विस्तव जात नसे. खेरीज फेरीवाले आणि पोलिसांचाही छत्तिसाचा आकडा होता. काही थोडके फेरीवाले परवानाधारक होते, बाकीचे सगळे अनधिकृतरीत्या आपला धंदा करत. पोलिसांची धाड आली तर तेवढ्यापुरते पळून जात किंवा पोलिसांना लाच देऊ करत. त्या धाडींमुळे कधीकधी त्यांच्या मालाचे, भांड्याकुंड्यांचे नुकसानही बरेच होत असे. एवढी अनागोंदी असली तरी सामान्य जनता मात्र फेरीवाल्यांच्या बाजूने होती. जेवण विकायचा धंदा करून प्रामाणिकपणे आपलं आणि कुटुंबाचं पोट भरणार्‍या या गरीब जनतेविषयी लोकांना कळवळा होता. लोकांच्या विरोधामुळेच फेरीवाल्यांविरुद्ध पोलिसांना कडक कारवाई करणे अशक्य होई आणि हताश होऊन हे सगळे पाहत बसण्यापलीकडे त्यांना काही करता येत नसे.

जिमसनांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून हे सगळे मुद्दे पुनःपुन्हा अधोरेखित झाले तरी त्यातून निघालेला उपाय मात्र आश्चर्यकारकरीत्या सुखद होता. या समितीच्या विचारविनिमयातून हॉकर सेंटरं उभारायची कल्पना पुढे आली. रस्तोरस्ती पसरलेल्या फेरीवाल्यांना चांगल्या सोयी असलेली जागा देऊ करण्यात आली. आरोग्यपूर्ण पद्धतीने त्यांनी व्यवसाय चालवावा, म्हणून सरकारने त्यांना बरीच मदत देऊ केली. एकदा हॉकर सेंटरं बांधायची कल्पना जाहीर झाल्यावर काही भागांतल्या फेरीवाल्यांनी मिळून, सहकारी तत्त्वावर जागा घेऊन स्वतः अशी सेंटरं उभारली. सिंगापुरात फेरीवाल्यांनी रुजवलेल्या खाद्यसंस्कृतीची वाटचाल जोमाने पुढे सुरू झाली.

सिंगापुरात माकानसूत्राबद्दल माहिती नसलेला सिंगापूरकर तसा दुर्मिळ. के.एफ.सीतो नावाचा एक भन्नाट माणूस ही कंपनी चालवतो. आशियाई जेवणातलं अफाट वैविध्य आणि खाण्यातला आनंद लोकांपर्यंत पोचवणं हा सीतोचा माकानसूत्रामागचा मुख्य उद्देश. त्याचे टीव्ही वाहिन्यांवर कार्यक्रम असतात, माकानसूत्राची अद्ययावत माहितीने परिपूर्ण आणि सीतोच्या खुसखुशीत लेखनशैलीतली पुस्तकं दरवर्षी बाजारात येतात, माकानसूत्राचं संकेतस्थळ, फेसबुक पान, आयफोन अ‍ॅप सिंगापुरातल्या खवय्यांच्या मदतीला चोवीस तास तत्पर असतं. नजीकच्या काळात सिंगापुरात आलेल्या जनतेपर्यंत वर्षानुवर्षं टिकून राहिलेल्या फेरीवाल्यांच्या खाद्यपदार्थांची महती पोचवण्याचं काम माकानसूत्राने लीलया केलं आहे. केवळ उत्कृष्ट पदार्थ आणि ते मिळण्याच्या जागा एवढीच माहिती न देता माकानसूत्रा त्या पदार्थांमागचा रंजक इतिहासही आपल्यासमोर मांडतं. अनेक खाद्यसंस्कृतींच्या सरमिसळीमुळे तयार झालेल्या खास सिंगापुरी पदार्थांची जन्मकथा आपल्यापुढे हळूहळू उलगडायला लागते. सीतोने त्याच्या परीक्षणात 'डाय, डाय! मस्ट ट्राय!' हे सर्वोत्कृष्ट मानांकन दिलेल्या ठिकाणाला ताबडतोब भेट द्यायची इच्छा मनात बळावते.

माकानसूत्रा चाळताना 'रिक्शा नूडल्स्', 'रोटी जॉन' अशी पदार्थांची नावं आपलं लक्ष वेधून घेतात. मॅक्सवेल रस्त्यावरचे रिक्शावाले स्वस्त दरात मिळणार्‍या होक्क्येन पद्धतीच्या चविष्ट नूडल दुपारच्या जेवणासाठी विकत घेत. सुकट आणि लसूण घालून बनवलेल्या सुपात नूडलांबरोबर खिमा आणि सुकी कोलंबी घालत असत. हा पदार्थ हॉकर सेंटरात विकायला ठेवताना मग त्याला 'रिक्शा नूडल्स्' असंच म्हटलं जाऊ लागलं. 'रोटी जॉन' या लोकप्रिय सिंगापुरी पदार्थाचा जनक सत्तरीच्या दशकातला शुकोर नावाचा एक फेरीवाला आहे. त्याच्याकडे येणारी परदेशी गिर्‍हाइकं नेहमी कांदे घातलेलं ऑम्लेट विकत घेत आणि पावाबरोबर खात. त्याने डोकं लढवून ऑम्लेट आणि पाव एकत्र केले, त्यात मलय पद्धतीचे मसाले मिसळले, शिवाय चिकन वगैरेंचे तुकडे घातले आणि एक नवीन पदार्थ बनवला. नाव दिलं 'रोटी जॉन' कारण मलय भाषकांलेखी सगळेच गोरे लोक 'जॉन' असत. सिंगापूरकरांनी एकमुखाने 'राष्ट्रीय पदार्थ' म्हणून मान्यता दिलेल्या चिकन राइसाचे निर्माते हे मूळचे हायनानी लोक. सिंगापुरात आलेल्या हायनानी स्थलांतरितांनी हा पदार्थ शोधून काढला आणि सिंगापूरकरांनी तो भलताच उचलून धरला. लसूण, तीळ आणि चिकन तेलात तांदूळ परतून मग तो चिकन स्टॉकात शिजवला जातो. चिकन उकळून घेतात. गिर्‍हाइकाला देतेवेळी भाताच्या वाट्यावर चिकन तुकडे, टोमॅटो-काकडीचे काप आणि ओल्या लाल मिरच्या-लसूण-आलं वाटून केलेली चटणी, दाट सोयासॉस अशा जामानिम्यासकट चिकन राईस सादर केला जातो.

हायनानी लोकांनी सिंगापुराला बहाल केलेली दुसरी गोष्ट म्हणजे कोपितियाम. सिंगापूर ब्रिटिश अमलाखाली असताना हायनानी लोकांनी ब्रिटिशांबरोबर काम करताकरता कॉफी बनवण्याचं तंत्रही शिकून घेतलं. पाश्चिमात्य धाटणीच्या कॅफेंच्या धर्तीवर मग त्यांनी कोपितियामं सुरू केली. कोपितियामात मिळणारी कॉफी मात्र पाश्चिमात्य पद्धतीची नसे. युरोप-अमेरिकेत कॉफीच्या बिया भाजून घेतल्या जात, तर कोपितियामातल्या कॉफीसाठी बिया लोण्यात तळत असत. कॉफीबरोबरही थोडे लोणी दिले जाई. कॉफी हे उष्ण पेय आहे, म्हणून उष्णतेचा त्रास कमी करायला लोक त्याबरोबर लोणी खात असत. कॉफी बनवण्याची भांडीही विशिष्ट प्रकारची असत. एका उभट, तोटी असलेल्या भांड्यात मोज्यासारख्या गाळणीत कॉफीपूड घालून त्यावर उकळते पाणी ओतले जाई. गिर्‍हाइकाला कॉफी देतेवेळी कपात कॅनातले घट्ट दूध, साखर घालून त्यावर कॉफी ओतून दिली जाई. आजही अस्सल सिंगापुरी कॉफीगृहांमध्ये याच पद्धतीने कॉफी बनवली जाते. चहाकॉफीव्यतिरिक्त कोपितियामात केक, टोस्ट, बिस्किटे आणि अंडी मिळत. अर्धवट उकडलेली अंडी सोयासॉस आणि मिरपूड घालून दिली जात. टोस्टाला लावायला लोणी किंवा काया(नारळाचे दूध आणि अंडी वापरून बनवलेले स्प्रेड) असे. अंड्यात मिरपूड आणि सोयासॉस घालून, त्या मिश्रणात ब्रेड बुडवून कोळशावर भाजून तयार केलेली फ्रेंच टोस्टाची सिंगापुरी आवृत्तीही हायनान्यांनी लोकप्रिय केली. भाजून झाल्यावर त्यावर लोणी किंवा काया लावला जाई. किलिनी रस्त्यावरचं छ्याँगहशिंग नावाचं कोपितियाम या टोस्टासाठी प्रसिद्ध होतं. आज लोकप्रिय असलेल्या टोस्ट बॉक्सासारख्या अनेक चहाकॉफीगृहांनी जुन्या कोपितियामांची ही परंपरा समर्थपणे पुढे चालू ठेवली आहे.

सिंगापुराची अशी खाद्यसंस्कृती जोपासणार्‍या या फेरीवाल्यांनी लोकांना आकर्षून घ्यायला वेगवेगळे प्रयोग केले. दुरियान (उग्र वासाचं फणसाच्या जातीतलं फळ), लोंगान (लिचीसारखं एक फळ) इत्यादी स्थानिक फळं वापरून केक, पफ यांसारखे पाश्चात्य धाटणीचे पदार्थ बनवले. हिरवा चहा, राजमा पेस्ट वगैरे चिनी गोड पदार्थांत वापरले जाणारे घटक वापरून आईस्क्रीम तयार केलं. चिनी पद्धतीचे घटक पदार्थ आणि मलय पद्धतीचे मसाले वापरून बनवले जाणारे पेरानाकन पदार्थ प्रचंड लोकप्रिय झाले. 'डू-इट-युवरसेल्फ' पद्धतीने गिर्‍हाइकांना स्वतः पदार्थ बनवण्याची मजा अनुभवू देणारेही काही स्टॉल उदयाला आले. सिंगापुरात मोठमोठे मॉल उभे राहू लागले तशी त्यांमध्ये सुसज्ज, वातानुकूलित फूडकोर्टं आली. पारंपरिक हॉकर सेंटरांतून या आधुनिक, चकचकीत फूडकोर्टांत बस्तान हलवताना फेरीवाल्यांनी पदार्थांच्या चवी कटाक्षाने सांभाळल्या आणि आपल्या पदार्थांचा वारसा काटेकोरपणे पुढील पिढीच्या हाती सोपवला.

...दुपारचे बारा वाजतात. रॅफल्स प्लेस या शहरातल्या मध्यवर्ती भागातल्या, आधी तुरळक गर्दी असलेल्या फूडकोर्टांत एकदम चैतन्य संचारतं. स्टॉलधारकांचे हात भराभर चालू लागतात. पेयं जागेवर आणून देणारे कर्मचारी टेबलांच्या रांगांमधून हिंडू लागतात. अनोळखी लोकही एकाच टेबलावर बसून जेवणाचा आस्वाद घेतात. उपनगरांतल्या घरगुती, साध्या फूडकोर्टांतही आसपासच्या भागात राहणारी जनता अगदी घरगुती कपड्यांत हजेरी लावते. भरपेट जेवणानंतर चहा, कॉफी वगैरे पेयांच्या साथीने मग फूडकोर्टांत गप्पा रंगतात. ते संपेतोवर दुपारच्या चहाची वेळ झाल्याने लोक चहा, कॉफी, टोस्ट, केक खायला कोपितियामांची वाट धरतात. फूडकोर्टं आणि कोपितियामांतली ही वर्दळ अनुभवताना पुन्हा एकदा मनात ठळक होतं, 'खाणं ही सिंगापूरकरांची सगळ्यांत आवडती गोष्ट आहे'!

जेवणाच्या सुटीत जेवायला बसलेल्या मजुरांचे शिल्प
2.jpg

चिकन राईस
3.jpg

चिकन साते
4.jpg

संकल्पाने काढलेलं अजून एक चित्र. कोपितियामात कॉफी बनवणारा माणूस.
kopitiam.jpg

प्रकार: 

इथे लिहिते. सेफ.

अजून वाचायचा आहे पण संकल्प द्रविडचं ते चित्रं पाहिलं आणि आधी दाद द्याविशी वाटली. अमेझिंग काढलंय स्केच. अतिशय आवडलं.

बाकी, सिंगापूरच्या फूडकोर्टावर मी फिदा झाले होते. फूडकोर्ट्स मधलं फूड आणि मरिना बे जवळचं ते स्ट्रीट फूड .... यम्मी!

अरे हो, चायनाटाऊन सुद्धा! Happy

लेख अतिशय आवडला! खूप सुंदर ओळख करून दिली सिंगापूरच्या खाद्द्यसंस्कृतिची, तिथल्या फूडकोर्ट्ची आणि ड्युरियनची.

रॉकी आणि मयुरची उपमा एकदम चपखल आणि मस्त Lol

हा लेख वाचून खरच सिंगापूर ला जाऊन खाणे ट्राय करायची इच्छा होते Happy

छान लेख.
मशीनवर सोललेली शहाळी, सुकवलेली फळे ( यात ताडगोळ्यापासून लिंबापर्यंत सर्व प्रकार मी खाल्ले आहेत. ) दोशाई (!), जगमधे ठेवलेला उसाचा रस... अशा काही आठवणी आहेत माझ्या. सिंगापूर मधे हल्ली बर्‍याच वर्षात गेलो नाही, ट्रांझिटमधेच असतो हल्ली.

आह्हा!!!! जब्बर्रदस्त लेख श्रद्धा!! जियो!!! किती सुंदर लिहिलंयस.. व्वा!!!

९० च्या दशकात ऑलमोस्ट प्रत्येक महिन्यात एकदा तरी फेरी व्हायची सिंगापूर ला.. जकार्ता हून फक्त एका तासाच्या फ्लाईट डिस्टंस वर असल्याने सिंगापूर ला वारंवार केलेल्या शॉपिंग ट्रिप्स मधे तू वर्णन केलेली हॉकर्स स्ट्रीट हे एकमात्र हमखास जेवण मिळण्याचं ठिकाण होतं, कभी भी , कहीं भी Happy

मिस्सिंग नासी हायनान विथ् सांबल ... Happy

सॉलिड्ड!! आता एकदा ४-५ दिवसाकरिता जायला हवे. जोहोर बोहरु पर्यंत जाउनही सिंगापुरमध्ये गेलो नव्हतो. Sad

ह्याला म्हणतात खाद्यसंस्कृती!!! Proud

मस्त लिहिले आहेस!!
चिकन साते भारी आहे. तो पीनट सॅस आहे की दुसरे काही? थाई पीनट सॉस मला अती आवडतो!

फचे चित्र फार सही आहे!!

mast. maaher madhye aadhi vaachalelaa. aataa parat vaachataanaa titakaach aavaDala.

श्र, खूप छान लिहिला आहे लेख. फ चे चित्र सुद्धा फार नेटके नेहमीप्रमाणे रेखीव आखीव झाले आहे. माहिती रजंक आहे शिवाय मोजक्या शब्दात इतिहास आणि आधुनिक काळातील बदल सांगतो आहे. छान वाटत वाचून. अजून लिहि....दोघे मिळून लिहा.

Pages