माझे डॉक्टरांचे अनुभव - भाग १ - हनुवटीवरचा ब्यूटीस्पॉट !

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 February, 2015 - 14:51

..

या भागातील अनुभवाला सुरुवात करण्याअगोदर ...

सर्वप्रथम नमूद करू इच्छितो की डॉक्टर या पेश्यात वा वैद्यकीय सेवेत असलेल्यांबद्दल मला शिक्षक किंवा सीमेवर लढणारे जवान यांच्याइतकाच किंवा त्यापेक्षाही कांकणभर जास्तच आदर आहे. लोक डॉक्टरांना पृथ्वीतलावरचे देव असे म्हणतात, मी लहानपणापासून त्यांना खरोखर देव मानत आलो आहे. अगदी सिझरींग होत माझा जन्म होण्यापासून आजवर झालेल्या कित्येक आजारांत या भगवंतांनीच मला तारले आहे. कोणत्याही आजारपणात दोनच जागा मला नेहमी सर्वात सुसह्य आणि सुरक्षित वाटल्या आहेत, त्यापैकी पहिली माझ्या आईची कुशी आणि दुसरी डॉक्टरांच्या क्लिनिकमधील गादी अन उशी!. तिथे झोपल्यावर आणि ते समोर उभे असताना, त्यांच्या चेहर्‍यावरचे आश्वासक भाव पाहताना, आपसूकच आजाराविरुद्ध लढण्याची एक उमेद मिळते, जगण्याची शाश्वती मिळते. अंगात १०२ ताप असतो, क्लिनिकमधील एसी थंडगार हवा फेकत असतो, तरीही तिथे डोळे मिटून शांत झोपून जावेसे वाटते., आणि याला कारणीभूत असतो त्यांच्यावर असलेला आपला विश्वास! पण कधीकधी "गंधा है पर धंदा है" या उक्तीला अनुसरणार्‍या काही अपवृत्तीच्या डॉक्टरांचेही अनुभव येतात. या लेखमालेत (जर लेखमाला झालीच तर) चांगले वाईट दोन्ही अनुभव येतील., कारण ते तसे दोन्ही प्रकारचे अनुभव कमी जास्त प्रमाणात आले आहेत. पण यातूनही वर ज्या चार ओळी खरडल्या आहेत त्यात व्यक्त केलेल्या विश्वासाला आजवर धक्का पोहोचलेला नाहीये, कारण वाईट कमी आणि चांगलेच अनुभव जास्त आले आहेत.

प्रस्तावना आटोपून आता सुरुवात एका गंमतीशीर अन तितक्याच चमत्कारीक अनुभवापासून करतो.

------------------------------------------------

तर ......
साधारण वर्ष-सव्वा वर्षांपूर्वीची गोष्ट!

अचानक एके दिवशी दाढी करताना काहीतरी कापले गेले आणि जाणवले डाव्या गालफडाच्या तळाशी पुळीसारखे काहीसे आलेय. दाढी करून झाल्यावर तुरटी फिरवताना फारसे काही झोंबले नाही, तरीही त्यानंतर आईचे फेव्हरेट औषध ‘कैलास जीवन’ लावून त्याला विसरून गेलो.

दोनेक आठवड्यानंतर पुन्हा दाढी करायला घेतली तेव्हा आढळून आले की मॅडम अजूनही तिथेच ठाण मांडून बसल्या होत्या. फरक इतकाच की कापले गेल्यानंतरही आकाराने कमी न होत्या वाढल्याच होत्या. जपूनच तिच्या आजूबाजूने दाढी उरकून घेतली आणि पुढे दिवसभराच्या घाईगडबडीत पुन्हा विसरून गेलो. नाही म्हणायला पुढचे दोन तीन दिवस गालावरून हात फिरवताना हाताला स्पर्श करून जात होती, पण तिचे काय करायचे हे ठाऊक नसल्याने मनात आलेला विचार तिथेच विरून जायचा. एक साधारण पंधरवड्याने पुढच्या दाढीची वेळ झाली. यावेळी तिच्यावर स्वताच्या हाताने ब्लेड फिरवायला मन धजावले नाही, म्हणून मग थेट सलूनचा रस्ता धरला.

सलूनवालाच तो!. ऐकले ऐकले आणि विसरला. काळजी घ्यायला सांगितले असूनही घाईगडबडीत झप्पकन चालला त्याचा वस्तरा आणि निस्तरा यला मात्र मला लागले. रक्ताची अशी काही धार लागली की थांबता थांबेना. एवढ्याश्या पुळीतून दोनचार चमचे रक्त इतक्या सहजपणे वाहून गेले जणू काही शरीरातल्या ब्लडबॅंकचा बॅलन्स फुगलाय जे थोडीफार उधळपट्टी चालून जावी. दाढी करणार्‍या न्हाव्याची माझे रक्त थांबवताना अशी काही तारांबळ उडाली होती की जसे त्या रक्ताची किंमत त्याच्या पगारातून कापली जाणार होती. असो, पण टिव्हीवर दाखवल्या जाणार्‍या जाहीरातीतील एखादी क्रीम लावावी आणि सात दिवसांत पुळी गायब, असे हे प्रकरण दिसतेय तेवढे सोपे नाही, हे मी समजून चुकलो. माझी अवस्था पाहता सलूनच्या मालकाने माझ्याकडे दिलगिरी व्यक्त केली. सोबत त्या नोकराला दोनचार शिव्या हासडत ती दिलगिरी मनापासून आहे हे देखील दाखवून दिले. त्यानंतर माझ्याकडे वळून म्हणाला, "भाईसाहब ये मस्सा है.!"

मी चेहरा कस्सा नुस्सा करत त्याला विचारले, मतलब?.. नक्की ये क्या मसला है?
त्यावर त्याने जो काही उपाय सांगितला त्यानुसार हा ‘गंभीर मसला’ आहे एवढे नक्की समजले.
त्याने ती चेहर्‍यावरची पुळी चक्क जाळायला सांगितली. "ब्लेड से उडाओगे तो फिर वापस आयेगी" असेही पुढे जोडले.
मी बरे म्हणत झोंबरा गाल घेऊन तिथून निघालो.

फिर वापस आयेगी असे तो म्हणालेला खरे, पण ती कापली गेल्याने त्यातून झालेल्या रक्तोत्सर्जनाने संसर्ग होत आणखी चार पुळ्या चेहर्‍यावर उगवल्या. सर्वच पुळ्या गाल आणि हनुवटीवरील दर्शनी भागात सेंटर ऑफ अ‍ॅट्रेक्शन बनत पसरल्या होत्या. त्या पैकी दोन पुळ्या येत्या काही दिवसांतच इतक्या वेगाने वाढू लागल्या की माझ्या दाढीच्या केसांची वाढही इतकी वेगवान नव्हती. परिणामी दाढीचे केस त्यांना लपवायला कमी पडू लागले. तरीही त्यांना न दुखावता दाढी करणेही शक्य नसल्याने ती देखील आपल्या जागी वाढत होती.

एमएनसी कंपनीत कामाला असल्याने काही कायदे कानून पाळणे गरजेचे होते. एका मर्यादेपुढे दाढी वाढवणे शक्य नव्हते. ती मर्यादा आली आणि मग पुन्हा सलूनची परीक्षा नको म्हणत मी घरीच दाढी केली. गालावरचे जंगल साफ होताच समजले की हि विषवल्ली किती मोठ्या प्रमाणात माझ्या चेहर्‍यावर पसरली होती. हा थेट माझ्या सौंदर्यावरच घाला होता. पण तरीही तेच तोंड वर करून ऑफिसला जाणे भाग होते.

त्या दिवशी दिवसभर माझ्या ध्यानावरून टवाळक्या सहन कराव्या लागल्या, पण तरीही ऑफिसला जाण्याचा एक फायदा तर झाला. आमच्या वॉचमननेही सलूनवाल्याच्या म्हणण्याला पुष्टी देत मला त्या पुळ्या जाळून टाकायचा सल्ला दिला. सोबत त्या त्याच्या स्वत:च्या हस्ते अगरबत्तीने जाळायची मोफत तयारीही दर्शवली. अर्थात, "तकलीफ होगी" हे पुढे नमूद करायला विसरला नाही.

या प्रकाराला तयार होणे म्हणजे माझ्यासाठी अचाट शक्तीचे पुचाट प्रयोग कॅटेगरीतले होते. त्यापेक्षा मी पांढरपेश्या माणसासारखे डॉक्टरचा रस्ता धरणे योग्य समजले. या मधल्या काळात माझ्या त्या पुळ्यांच्या वाढीवर नजर ठेवून असलेली माझी ग’फ्रेंड माझ्यासाठी एक चांगला नावाजलेला डॉक्टर पक्षी "स्किन स्पेशालिस्ट" सुचवून तयार होतीच.

एवढ्याश्या पुळीसाठी आपल्याला लवकरच "त्वचा रोग तज्ञ" असला काही भारी प्रकार गाठावा लागेल याची मी कल्पनाही केली नव्हती. पण हे घडत होते. डॉक्टरांनी माझ्या चेहर्‍याची टेहाळणी करत छोटीशी सर्जरी करत हे उडवावे लागेल असे निदान केले. ‘सर्जरी’ हा शब्द ऐकून मन पुन्हा एकदा चरकले. अगदी लहानपणी झालेले अपेंडिक्सचे ऑपरेशन वगैरे डोळ्यासमोर आले. आता यासाठी कधी यावे लागेल अशी चौकशी करता, अगदी आत्ताच, बस्स पाच मिनिटात होईल असे म्हणत डॉक्टरांनी त्यासाठी ‘दोन हजार रुपये’ ईतका खर्चाचा आकडा सांगितला. चार पुटकुळ्यांसाठी एवढ्या कवड्या खर्च करणे नाही म्हटले तरी जिवावर आले होते. पण तरी याने माझ्या बाह्यसौंदर्याचे जे अध:पतन झाले होते ते पाहता मी लागलीच तयार झालो.

मला बेडवर आडवे केले गेले. एक छोटेसे ईंजेक्शन त्यापैकी मोठ्या वाढलेल्या पुळ्यांमध्ये खुपसण्यात आले. बहुधा ते लोकल अ‍ॅनेस्थेशिया असावे. (मला डॉक्टरांकडे फारशी चौकशी करायची सवय नाही, पण हा अंदाज सोपा असावा) त्यानंतर पुढच्या पाचेक मिनिटांतच हातात एक एलेक्ट्रीक रॉड सारखे उपकरण घेत एकेक करत त्यांनी सर्व पुळ्या जाळून काढल्या. जिथे अ‍ॅनेस्थिशिआ दिला नव्हता त्या छोट्या पुळ्यांना थोडा त्रास झाला, मात्र एकंदरीत प्रकरण बरेपैकी सुसह्य होते, आणि लवकर आटोपले.

दोन हजार गेले पण दुसर्‍या दिवशी ताठ मानेने ऑफिसला जायची सोय झाली. ग’फ्रेंडच्या नजरेला नजर मिळवायची हिंमत आली.

पण हा निव्वळ दिलासा होता, पुढची दाढी करेपर्यंतचा!..

...

सातच दिवसांत दाढीच्या नव्या केसांच्या जोडीने नवीन पुळ्या नवीन जागी जम बसवू लागल्या होत्या. दाढी करताना चुकून सर्रकन एखादी कापली गेली तर रक्ताची न थांबणारी धार लागायची. आणि त्यांना चुकवून दाढी केली तरी येत्या काही दिवसांत त्यांची टपोरी बोरं झालेली असायची. मग साधारण महिन्या दिड महिन्याने पुन्हा त्याच स्किन स्पेशालिस्टचा रस्ता धरणे आलेच. पुळ्या छोट्या असल्या तर ते हजार रुपये घ्यायचे आणि मोठ्या झाल्या तर दिड हजार!. सुरुवातीला दोनतीन वेळा त्यांनी स्वत:च कारागिरी केली, मात्र नंतर माझी केस त्यांच्या हाताखालील ज्युनिअर्सना सोपवण्यात येऊ लागली. (त्या शिकाऊ मदतनीसांचे पण एकेक गंमतीशीर किस्से आहेत, पण ते पुढच्या एखाद्या सदरात.)

त्याचवेळी इथे माझी ग’फ्रेंड हैरान परेशान झाली होती. एकदा तीच माझ्या जोडीने डॉक्टरांकडे आली आणि त्यांना हे असे आणखी किती दिवस चालणार म्हणून विचारले. तर डॉक्टर म्हणाले की दाढीच्या ब्लेडने कापले जाऊन पुन्हा पुन्हा इन्फेक्शन होत आहे. यावर एकच उपाय!, दर १२ दिवसांनी दाढी करायची आणि १४ व्या दिवशी ज्या थोड्याबहुत पुळ्या उगवल्या असतील त्या मुळापासून साफ करायच्या. हे असे वारंवार करत राहायचे जोपर्यंत त्या कायमच्या नष्ट नाही होत. मात्र मधल्या कुठल्याही दिवशी दाढी करायची नाही, अन्यथा संसर्गाला आळा बसणार नाही. मी अर्थातच याला तयार झालो.

सुरुवातीला सुसह्य आणि थोडक्यात आटोपली जातेय असे वाटणारी हि सर्जरी आता वारंवार घडू लागल्याने त्रासदायक वाटू लागली होती. तसेच शिकाऊ डॉक्टरांचा हात तुलनेत कच्चा होता. डॉक्टरसाहेबांची सफाई त्यात नव्हती. दर दोन आठवड्याने तो त्रास सहन करायला जाणे आता कंटाळवाणे वाटू लागले होते. पैश्यापरीस पैसा जात होताच, पण त्याहीपेक्षा पुळ्यांमध्ये फरक काहीच दिसत नसल्याने दिलासा असा कुठल्याही आघाडीवर नव्हता. अखेर मी वैतागून आता बस्स!, निदान डॉक्टर तरी बदलून बघूया म्हणत थांबलो. पण पंचक्रोशीत तेच सर्वोत्तम स्किन स्पेशालिस्ट गणले जात असल्याने पुढचा पर्याय न सुचल्याने ब्लॉक झालो होतो. डॉक्टरांकडे जायचे बंद केल्याने पुळ्या आता झपाट्याने वाढू लागल्या होत्या आणि सोबत दाढी सुद्धा फोफावत होती. ऑफिसमध्ये ‘जंगली महाराज’ हि पदवी पडली होती. कॉलनीत ज्या घरासमोरून जायचो तेथील आया धावत येऊन घाबरत आपल्या मुलांना आत घेऊन जायच्या.. आय यम जस्ट जोकींग!, पण हि माझ्या आयुष्यातली सर्वात दिर्घकाळ उगवलेली दाढी होती.. आणि अश्यातच मग एके दिवशी,. त्याच दाढीच्या केसांमध्ये पाणी राहिल्याने सर्दी पकडली म्हणून विभागातल्या जनरल फिजिशिअनकडे जाण्याचा योग आला...

आमचे नेहमीचे फॅमिली डॉक्टर गैरहजर असल्याने आडवाटेवरच्या दुसर्‍या एका डॉक्टरांकडे जाणे झाले. छातीवर स्टेथोस्कोप टेकवून माझ्या सर्दीच्या नाकाची तपासणी करताना दाढीआड लपलेले माझ्या चेहर्‍यावरचे वैभव त्यांना जवळून दिसले... आणि,

"यावर काय करतोस?" तपासत असताना सहजच त्यांनी चौकशी केली.

"सध्या काही नाही. आधी एक डॉक्टर करून झाले. ते जाळून काढायचे. पण पुन्हा पुन्हा उगवतातच. शेवटी नाद सोडला."

"एक गोळी सांगतो, महिन्याभरात गळून जाईल"

त्याही परिस्थितीत मला हसायला आले. चक्क हसलोही. पण दाढीच्या आड त्यांना दिसले नसावे. वा कदाचित दिसलेही असावे. काय फरक पडतो. गेले वर्ष सव्वा वर्ष जो आजार मला छळत होता त्याचा बंदोबस्त एक छोटेसे क्लिनिक थाटून बसलेला डॉक्टर करणार होता. ते देखील एक प्रकारची गोळी देऊन. हि गोळी काही मला पचली नव्हती. पण त्यांनी लिहून दिलेली चिठ्ठी घेऊन मी तिथून निघालो. अर्थात त्याचा त्यांनी एकही अतिरीक्त पैसा घेतला नव्हता. माझे सर्दीच्या तपासणीचे आणि गोळ्या ईंजेक्शनचे झाले होते तेवढेच दिडशे रुपये काय ते घेतले होते.

फुकटच्या सल्याला काही किंमत नसते, मग भले तो त्या विषयातील एखाद्या तज्ञाकडून का आलेला असेना!.. एकीकडे माझा चेहरा सुदानचे जंगल होत होते आणि दुसरीकडे ती चिठ्ठी माझ्या घरी एका ड्रॉव्हरमध्ये दोन आठवडे पडून होती. कारण ते औषध होमीओपथीचे होते आणि जिथे मिळायचे ते मेडीकलचे दुकान आमच्या घरापासून पंधरा-वीस मिनिटांवर होते. पुरेसा विश्वास नसल्याने मी ते आणायचा कंटाळा करत होतो. पण या काळात दुसरा डॉक्टर वा उपाय न सुचल्याने अखेर ग’फ्रेंडच्या हट्टाखातर मी ते औषध आणून वापरायला तयार झालो. ते आणायला जाताना घरात कुठेतरी टाकलेली चिठ्ठीही शोधावी लागली होती. पण नशीबात ते औषध घेणे असल्याने मिळालीच. आधीच मी त्या होमिओपथीच्या बारीक साबूदाण्यासारख्या पांढर्‍या गोळ्या घेण्यास फारसा उत्सुक नव्हतो., त्यात त्यांची किंमत बघून तर आधीच नसलेला विश्वास आणखी डुचमळला. एक बाटली फक्त वीस रुपयाला होती. गेले वर्ष-दिड वर्षात हजारो रुपयांचा चुराडा झाल्यावर कोणत्या वीस रुपयांच्या गोळ्या परिणामकारक ठरणार होत्या, यावर विश्वास ठेवणे हे माझ्यासाठी कोणत्या अंधश्रद्धेपेक्षा कमी नव्हते.

अर्थात, वरील वर्णनावरून वाचनात तरबेज असलेल्यांना अंदाजा आला असेलच की आता पुढे कहाणीत नक्की काय ट्विस्ट असेल ते!..

येस्स!..

त्या डॉक्टरांनी महिन्याभरात त्या पुळ्या गळून जातील असे भाकित केले होते. आज जवळपास महिना झाला मी त्या गोळ्या घेतोय. एका वेळेला त्या ५-६ बारीकश्या गोळ्या, असे दिवसाला ३ डोस!. सुरुवातीला पुरेसा विश्वास नसल्याने अधूनमधून एखाद दुसरा डोस विसरत असल्याने इफेक्टीवली २४-२५ दिवस झाले म्हणून शकतो. आतापर्यंत दोन बाटल्या औषध, म्हणजे चाळीस रुपये फक्त!, खर्चून झाल्यावर आज त्या पुळ्या आकाराने घटत निम्म्यावर आल्या आहेत. कदाचित आणखी महिन्याभरात त्यांचे नामोनिशाण मिटले असेल. दोन बाटल्या आणखी रिकाम्या झाल्या असतील. हा रोग पुन्हा परतून येऊ नये म्हणून एखादी बाटली आणखी घेत मी पुर्ण शंभराची नोट त्यावर खर्च करायचा विचार करत आहे. मनात नक्की काय भावना आहेत ते आता इथे शब्दात व्यक्त करू शकत नाही, ना हा या लेखाचा हेतू आहे. पण हल्ली रोज आरश्यात त्यांना कलेकलेने कमी होताना बघतो तेव्हा एकाच वेळी आनंद आणि पश्चाताप, या दोन्ही भावना मनात दाटून येतात एवढे नक्की! Happy

अरे हो,
त्या गोळ्यांचे नाव राहिलेच,..

सांगितले तर जाहिरात करतोय असे नाही ना वाटणार !! Wink

- ऋन्मेऽऽष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिझेरीयन - सिझरिंग नाही. मूळ शब्द सिझर (Caesar) वरुन. ज्युलियस सिझरचा जन्म अशा पध्द्तीने झाला अशी आख्यायिका आहे.

तुम्ही तत्काळ नवीन रेझर घ्यायला हवं होतं व अ‍ॅनटाय्बायोटीक्स सुरु करायला हवी होती रोजच्या डॉक जावून.

ते जाळणे वगैरे मुर्खपणा आहे.

माझ्या मैत्रिणीने , चेहरा व मान येथील चामखीळावर एका चर्मकाराकडून औषध घेतले होते.म्हणजे तो, ते औषध काडीने लावीत असे.पण ते सारे चामखीळ नाहीसे झाले होते.
ऋन्मेऽऽष, तुम्ही 'थुजा' हे औषध घेतले होते का?

सिझेरीयन - सिझरिंग नाही. >>>>> येस्स कर्रेक्ट, माहीत आहे हा शब्द. पण आपल्या मराठी मिडीयमच्या पोरांचा हाच प्रॉब्लेम. तोंडात एकदा चुकीचा शब्द बसला की मग जाता जात नाही. असो, सुधारणा आणि नवीन धागा सुचवल्याबद्दल धन्यवाद Happy

तुम्ही तत्काळ नवीन रेझर घ्यायला हवं होतं व अ‍ॅनटाय्बायोटीक्स सुरु करायला हवी होती रोजच्या डॉक जावून. ते जाळणे वगैरे मुर्खपणा आहे.
>>>
अ‍ॅग्रीड, पण तुम्ही म्हणता ते शाळेत न शिकल्याने किंवा ईंजिनीअरींच्या सिलॅबसमध्ये नसल्याने कल्पना नव्हती. प्राप्त परिस्थितीत डॉक्टरकडे जाणे हेच योग्य वाटले.

देवकी
__/\__ अगदी अचूक, "थुजा" फक्त गोळ्यांच्या स्वरुपात.
यार मी मायबोलीवर वर्ष-भरापूर्वी येऊन यावर सल्ला मागितला असता तर हे तेव्हाच समजले असते.

ऋन्मेऽऽष ,

हुश्य ! ऋन्मेऽऽष हे कॉपी पेस्ट करणेच सोप्पे. असो.

थुजा, मलम आणि गोळ्या दोन्ही वापरुन पहावे. आपण पेन किलर्स किंवा अ‍ॅक्शन५०० सारख्या गोळ्या अतिरिक्त प्रमाणात घेतल्या आहेत काय ? मस येणे बहुदा त्याचा हा साईड इफेक्ट असतो असे वाचण्यात आहे.

१) घोड्याचा केस मस च्या मुळाशी बांधला की मस गळुन पडतो.
२) नागवेलीच्या पानाच्या देठाने चुना लावला की तो जळतो ( अजीबात करु नये . माझ्या कपाळावर एक खड्डा आहे )

इत्यादी उपाय सुचवले जातात.

>>>> सिझेरीयन - सिझरिंग नाही. >>>>> येस्स कर्रेक्ट, माहीत आहे हा शब्द. पण आपल्या मराठी मिडीयमच्या पोरांचा हाच प्रॉब्लेम. तोंडात एकदा चुकीचा शब्द बसला की मग जाता जात नाही. असो, सुधारणा आणि नवीन धागा सुचवल्याबद्दल धन्यवाद <<<<<

कृपया "मराठी" पोरान्ना अन "मराठीबाण्याला" "मराठी उच्चारपद्धतीला" नावे ठेवू नका, त्याचा न्युनगंडही बाळगू नका. त्या ऐवजी इंग्रजी शब्दाचे कुठल्याच नियमात न बसणार्‍या उच्चारांन्ना दोष द्या, त्यासाठी http://www.maayboli.com/node/52577 येथील लेख वाचा.

बाकी हा लेख छान लिहीलाय हं! अगदि नजरेसमोर त्या त्या प्रसंगांचे चित्र उभे राहिले.

ओके प्रशू, असे बरेच शब्द आहेत ज्यांच्या कानामात्रार्हस्वदिर्घवेलांटीत मी गोंधळून त्या त्या वेळेला जे सुचते ते लिहितो. आपण लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. यापुढे हि कधीही नाही दिसणार ..

नितीनचंद्रची, थुजा पिल्स (गोळ्या) काम करत आहेत. हा लेख खरे तर मी वर्षसव्वावर्षे वाया घालवले त्या फ्रस्ट्रेशनला हलके करायला लिहिले आहे.
@ साईड इफेक्ट, येस्स. शेकडो आजार आणि हजारो गोळ्या माझ्या पाचवीला पुजल्या आहेत.

लिंबूजी,
नाही हो, मराठी पोरे, बाणा, उच्चारपद्धतीला नावे नाही ठेवत. दोष माझाच आहे त्यात, गंमतीन म्हटले. तिथला लेख वाचला आहेच.

आणखी एक धागा Wink त्यात एमेनसी, आणि गफ्रे आहे, पण शाखा आणि सइ नसल्यामुळे चुट्पुट लागुन र्‍हाइली हे...(रच्याकने धागा गफ्रेच्या पॅरा पर्यंतच वाच्ण्यात आलेला आहे, असो)

पण शाखा आणि सइ नसल्यामुळे चुट्पुट लागुन र्‍हाइली हे...(रच्याकने धागा गफ्रेच्या पॅरा पर्यंतच वाच्ण्यात आलेला आहे, असो)
>>>>>>

जर धागा गफ्रेंच्या पॅरापर्यंत वाचण्यात आला आहे तर शाखा आणि सई नाहीयेतच हे कसे समजले अन कशी चुटपुट लागली.

असो Wink

<<<<दाढीच्या केसांमध्ये पाणी राहिल्याने सर्दी पकडली म्हणून विभागातल्या जनरल फिजिशिअनकडे जाण्याचा योग आला>>>> ऐतेन

डी, विनिता
भाग २ कोणता लिहायचा हे अजून डोक्यात नाही, पण येईल हे नक्की.
विषयाला स्कोप आहे असे वरकरणी वाटत असले तरी इथे तसेच काही हटके असल्याशिवाय लिहिणार नाही, आणि जे लिहेन त्याला रंगतदार बनवायला पदरचा काल्पनिक मसाला इथे घालणार नाही.
पण येस्स, माझे मित्र मला दवाई की दुकान बोलतात तर घरच्यांच्या मते मी टोटल डिफेक्टीव पीस असून आतापर्यंत माझे सर्व प्रकारचे स्पेशालिस्ट करून झालेत. तर लिहायला मटेरीअल बरेच आहे, म्हणून भाग-१ असे लिहून तरी ठेवलेय.

svalekar,
ते तसे नसेलही, पण दाढी आणि डोक्यावरचे केस दोन्ही वाढल्याने ऑफिसमध्ये चेहरा धुतल्यावर (जो मी तिथे दिवसातून ६ वेळा धुतो) दाढी अन डोक्यावरच्या केसांत पाणी पकडते. अन ते एसीच्या थंडगार हवेत सुकते. ज्यामुळे सर्दी होऊ शकते असा कयास. माझाच नाही तर इतरांचाही. किंवा कदाचित मी वेळच्या वेळी दाढी-केस कापावेत म्हणूनही मुद्दाम ते तसे बोलत असावेत.

ओके प्रशू, असे बरेच शब्द आहेत ज्यांच्या कानामात्रार्हस्वदिर्घवेलांटीत मी गोंधळून त्या त्या वेळेला जे सुचते ते लिहितो >>>>>>
मराठीमध्ये शक्यतो 'आणि' आणि 'नि' हेच शब्द र्‍हस्व लिहिले जातात, बाकी सारे दीर्घ लिहितात.

बाकी लेख नेहमीप्रमाणेच Proud

गुड वर्क देवकी, ऋन्मेऽऽष तर त्याच्या सो-कॉल्ड कारणामुळे गोळ्यांचे नाव सांगणार न्हवताच, आपल्यामुळे इतरांनाही त्याचा फायदा झाला ^_^

ऋन्मेऽऽष ,
कोणताही विषय अगदी सहज लिहिण्याची तुमची हातोटी मला आवडते....
मज्जा वाटली मला हे वाचताना कारण नवर्याच्या ह्याच प्रोबलेम मधे मी कायम त्याच्याबरोबरीने सगळे अनुभवले आहे... Happy

यार मी मायबोलीवर वर्ष-भरापूर्वी येऊन यावर सल्ला मागितला असता तर हे तेव्हाच समजले असते.
>>
मायबोलीवर चेहर्याचा दाढी सकट आणि शिवाय फोटो टाकशील तर
अजुन चा.न्गले सल्ले मिळतील आणि बरेच काही समजेल.
विचार कर मग चुट्पुट नको वाटायला!

<<<<दाढीच्या केसांमध्ये पाणी राहिल्याने सर्दी पकडली म्हणून विभागातल्या जनरल फिजिशिअनकडे जाण्याचा योग आला>>>> ऐतेन>>>
ये मेरे नैन कुंवारे तेरी दाढी देख के हारे Light 1 सौजन्यः माझी फिल्लमबाजी-शिरिष कणेकर

ऋन्मेऽऽषजी,

आपला अनुभव वाचला. होमिओपथिमध्ये जी कांही अनुभवसिद्ध आणि रामबाण औषधे आहेत, पैकी एक म्हणजे थुजा होय !
मी स्वतः या पथीचा अभ्यास जरी केलेला नसला तरी या औषधाविषयी मला चांगला अनुभव आहे. पुण्यातील सर्व त्वचारोग तज्ञांकडून तुमच्यासारख्या रुग्णांचे अनुभव एकत्रित केले असता नक्कीच काही तरी चांगले संशोधन निर्माण होईल. याला एपिडेमियोलॉजीकल रिसर्च म्हणतात. अनेक उपयोगी औषधांचा शोध अशा निरीक्षणातूनच लागला आहे. उदाहरणार्थ सर्पगंधा वनस्पती आणि रेसेर्पीन हे उच्च रक्तदाबावरील औषध ! रक्तदाब मापक यंत्रांचा वापर होण्यापूर्वीपासून पण भारतामध्ये अनेक वर्षांपासून वापरत असलेले हे औषध जगाला समजण्यासाठी डॉ. रुस्तुम जाल वकील यांच्या अचूक निरीक्षणापर्यंत वाट पहावी लागली. १९४९ साली इंग्लंडमधून शिकून आल्यानंतर एका वैद्याच्या औषधाने एका रुग्णाचा अती उच्चरक्तदाब कमी झाल्याचे पाहून त्यांनी चक्क त्या वैद्याराजाचे पाय धरले आणि ह्या वनस्पतीची माहिती मिळवली. हिमालया कंपनीने हेच औषध बाजारात आणले होते. डॉ. वकील साहेबांनी ह्या गोळ्यांची स्यम्पल्स देशातील पन्नास फिजिशियन्सना पोस्टाने पाठवली व त्यांना त्यांचे अनुभव पोस्टाने कळवण्यास सांगितले. १९४९ साली हे काम खूपच कठीण होते. हा सर्व डेटा एकत्रित करून त्यांनी एक शोध निबंध लिहिला जो ल्यान्सेट या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आणि मग पाश्च्यात्य देश खडबडून जागे झाले. सिबा कंपनीने त्यातील मुख्य औषध वेगळे करून एडेलफेन नावाची गोळी बाजारात आणली जी पुढे अनेक वर्षे उच्चारक्तदाबासाठी प्रथमपसंती म्हणून वापरली जात होती. असो.

थुजाबाबत हा विचार माझ्या मनात चाळीस वर्षांपूर्वी आलेला पण वेळेअभावी जमले नाही.
थुजा म्हणजे Thuja occidentalis, अर्थात मयूरपंखी. होमिओपथिमध्ये या झाडाला 'ट्री ऑफ लाईफ' अशी संज्ञा आहे. का? ??या वनस्पतीवर संशोधन होणे आवश्यक आहे. आपणाला झालेले मस्सा याला wart असे म्हणतात. हे Human Papiloma virus नावाच्या विषाणूमुळे होतात व फक्त कांही व्यक्तींच्या शरीरावरच ते वाढतात. माझ्या अनुभवामध्ये तर गुप्त भागावरील warts देखील थुजामुळे पूर्ण बरे झाले आहेत. माझ्या अंदाजाप्रमाणे हे औषध आपल्या शरिरातील cell mediated immunity वाढवते. मी अनेक लोकांशी याविषयी बोललो पण अशा संशोधनामध्ये कंपन्यांना फारसा रस नाही असे लक्ष्यात आले.
वेळ कमी असल्यामुळे आटोपते घेतो. लिहिण्यासारखे खूप आहे.
वाट पाहू या , थुजाला डॉ वकील भेटण्याची !!

डॉक्टर सर,
माहितीपुर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद. शिर्षकात डॉक्टरांचे अनुभव बघून आपण वाचाल अशी अपेक्षा होतीच पण एवढा सविस्तर प्रतिसाद द्याल अशी तितकीशी नव्हती. म्हणून विशेष धन्यवाद.
माझा अनुभव मी भले माझ्याच नेहमीच्या शैलीत लिहिला असला तरी या लिखाणामागचा मूळ हेतू हाच होता की या औषधाबद्दल कोणा गरजवंताला समजेल आणि आणखी कोणाचा ऋन्मेष होणार नाही. आपल्या प्रतिसादाने त्या औषधाच्या विश्वासार्हतेवरही शिक्कामोर्तब झाले.

प्रशू,
थुजा औषधाचे नाव लपवायचे नव्हते, बस सुरुवातीलाच वा लेखात सांगायचे नव्हते ईतकेच.
याला लोकांचे कुतुहल वाढवायची क्लृप्ती म्हणू शकता. Happy

याला लोकांचे कुतुहल वाढवायची क्लृप्ती म्हणू शकता >>>>>>>>>>

क्लृप्ती?

सगळेच तुमच्या सारख्या problems ना थोडीच फेस करतात.

thank god देवकी यांनी इतक्या लवकर comment केली. नाहीतर... Uhoh

खुप त्रास झाला. आता काळजी घ्या. होमिओपथिक गोळ्यांचे नाव लिहिले असते तरी चालले असते.

सिझेरियन सेक्शन, असा शब्द आहे ना ?

गुड वर्क देवकी, ऋन्मेऽऽष तर त्याच्या सो-कॉल्ड कारणामुळे गोळ्यांचे नाव सांगणार न्हवताच, आपल्यामुळे आपल्यामुळे इतरांनाही त्याचा फायदा झाला ^_^>>>>>>>> माफ करा मला ऋन्मेऽऽषबद्दल तसं नाही वाटत.आणि डॉक्टरनाच त्यांचे काम करू द्या.कारण औषधाची पोटेन्सी किंवा बाकी इतर ( एकाचे औषध,दुसर्‍याचे विष) ,आपल्याला माहित नसते.आपण आपले औषध नाही घेऊ,मग ते कोणत्याही पॅथीचे असू दे.

आपण आपले औषध नाही घेऊ,मग ते कोणत्याही पॅथीचे असू दे.
>>>>>>.
नक्कीच, हे तर प्रत्येकाकडून अपेक्षित आहेच. किंबहुना मी स्वता देखील कधीच डॉक्टरच्या सल्ल्याबाहेर काही केले नाही. हे औषध मला एका डॉक्टरनेच सुचवलेले तरीही एक सेकंड थॉट मनात होताच की हा डॉक्टर तरी यातला एक्स्पर्ट आहे की नाही वा एखादा होमिओपॅथी डॉक्टर कन्सल्ट करून मग त्याच्या सल्ल्याने त्या गोळ्या घ्याव्यात का..
बरेचदा डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून कामाला असतात, ईंजेक्शन द्यायचे काम करतात, ते देखील डॉक्टर असल्याचा आव आणत छोट्यामोठ्या सर्दीखोकल्यावर गोळ्या सुचवत फिरत असतात.

>>ते गोळ्याचे नाव आलेय प्रतिसादांत .. थुजा ! THUJA <<
अरेच्चा, हे कसं शक्य आहे? बहुतेक प्लसिबो इफेक्ट असावा. होमियोपथी म्हणजे निव्वळ प्लसिबो इफेक्ट हे त्रिकालाबाधित सत्य आहे. Happy

Placebo effect: Also called the placebo response. A remarkable phenomenon in which a placebo -- a fake treatment, an inactive substance like sugar, distilled water, or saline solution -- can sometimes improve a patient's condition simply because the person has the expectation that it will be helpful.
>>>>>>>>

ओह्ह, हा शब्द/टर्म नव्हती माहीत मला, तुम्हाला विचारायच्या आधी गूगाळून बघितले तर उत्तर मिळाले.
पण अर्थात, या केसमध्ये तर माझा जराही विश्वास नव्हता, मी घेतल्या तर घेतल्या नाही घेतल्या तर काय एवढा फरक पडतोय असे करायचो. त्यामुळे इथे असे नक्कीच झाले नाहीये.
बाकी आपण उपरोधाने लिहिलेय हे समजलेय Happy

डॉ. शिंदे यांचा प्रतिसाद म्हणजे आपल्यासाठी मेजवानीच असते. डॉ. वेळात वेळ काढून इथे लिहित जा. भाषांतर, टाइपिंग साठी लागणारी मदत लागलीच आम्ही सर्वच आनंदाने करू.

>>>> डॉ. शिंदे यांचा प्रतिसाद म्हणजे आपल्यासाठी मेजवानीच असते. डॉ. वेळात वेळ काढून इथे लिहित जा <<< अनुमोदन. बरेच दिवसांनी त्यांचे प्रतिसादानिमित्तानचे लिखाण वाचनात आले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या अनुभवांच्या लेखांची वाट बघतोय - एक दिवस ज्याचे छानसे उपयुक्त पुस्तक प्रसिद्ध होऊ शकेल - अगदी वैद्यकीच्या अभ्यासक्रमात लावता येण्यासारखे....

Pages