इतर भाषीय चित्रपट पाहणे - एक अनुभव

Submitted by पायस on 16 December, 2014 - 16:07

चित्रपट पाहण्याची आवड तशी जुनीच. लहानपणी दूरदर्शनवर (शक्तिमान, कॅप्टन व्योम वगळता) तसेही इतर काही पाहावेसेही वाटत नसे. अर्थात तेव्हा चित्रपट समजायचे वय नव्हते. त्यामुळे आमचा हीरो तिरंगाचा देशभक्त वागळे. दर १५ ऑगस्ट/२६ जानेवारीला झेंडावंदन करुन आल्यावर न चुकता तिरंगा बघायची सवय असल्यावर दर्जेदार चित्रपट बघण्याबाबत आनंदच होता. पण तरीही त्याचा एक फायदा झाला; अफाट सहनशक्ती निर्माण झाली. अगदी खंडहर सारख्या आर्ट फिल्म्स कळत नसतानाही अतिशय एकाग्रतेने पाहण्याची कला अवगत झाली. मग एवढी कला असताना कळणार्या भाषेतलेच (येथे इंग्रजी/हिंदी/मराठी असे वाचावे)सिनेमे कोण बघेल?

त्यातून सबटाईटल्सचा शोध लागल्यामुळे काम बरेच सोपे झाले. आणि त्या सुमारास एक अत्यंत सुंदर चित्रपट पाहण्यात आला - अमेली. मूळ फ्रेंच असलेला हा सिनेमा कसा पाहण्यात आला हे आता नीटसे आठवत नाही पण इंग्रजी/हिंदी/मराठी वगळता इतर कोणत्या भाषेतला सिनेमा पाहण्याचा हाच पहिला अनुभव! सुदैवाने हि निवड खूप चांगली होती. संवादांपेक्षा दृक अनुभवावर दिग्दर्शकाचा भर असल्याने भाषा फारशी कळत नसतानाही याने खूप मनोरंजन केले. विशेषतः ऑड्री टॉटो (अभिनेत्री) च्या तर प्रेमातच पडलो (तेव्हा प्रेमात पडण्यासारखे इतर कोणि नव्हते हा भाग अलाहिदा). यातून नवा शोध असा लागला कि अमेरिका आणि मुंबई च्या बाहेरही चित्रपट बनवले जातात आणि बर्याचदा ते उत्तम मनोरंजनही करतात!

इंजिनिअरिंग करत असताना मोकळा वेळ भरपूर मिळायचा आणि कॉलेज कडून फुकटचे इंटरनेट! मग विविध आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्सचे अर्काईव्स शोधणे सुरु झाले. सनडान्स, बर्लिन इंटरनॅशनल, कान, वेनिस, टोरांटो, बुसान अशा कित्येक फेस्टिव्हल्सच्या विजेत्यांची नावे शोधायची आणि ते पाहायचे. मग त्यांच्याशी रिलेटेड सिनेमे पाहायचे. बरेचसे मिचेल जॉन्सनच्या बाऊन्सरप्रमाणे वाटले. काही तर निव्वळ आचरट वाटले. तर अनेकदा हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीतून सुटलाच कसा हा प्रश्न मनात डोकावला. पण कुठलाही अर्धवट सोडला नाही. याचा अर्थ असा नाही कि इंग्रजी/हिंदी पाहिलेच नाहीत. उलट ते चित्रपट पाहताना या चित्रपटांशी तुलना करत पाहण्याची सवय लागली.

बरं हे सर्व ज्यांना आपण 'आर्ट फिल्म्स' म्हणतो तसे असतात असे नाही. बर्फीच्या पहिल्या हाफवर अमेलीचा प्रभाव स्पष्ट जाणवतो पण त्यात कमर्शिअल तत्त्वे नाहीत असं कोणी म्हणणार नाही. किंबहुना ती बेमालूम पणे मिसळून, शुगर कोटिंग करून आपल्यासमोर सादर केली आहेत. अजून एक उदाहरण देतो. २०१० साली कानचा सर्वोत्कृष्ट चित्रपट होता लुंग बूनमी रालु छात (Uncle Boonmee Who Can Recall His Past Lives). थाई नाव कानाला विचित्र वाटले तर वाटू द्यात पण चित्रपट जबरदस्त आहे. हा चित्रपट पुनर्जीवनाच्या संकल्पनेवर बेतलेला होता. तुम्हाला खोटे वाटेल पण पहिले काही शॉट्स पाहिल्यावर रामसेपटांची आठवण होते. खासकरुन रामश्यांची खासियत असलेले अस्वलसदृश भूत पाहून तर मी सीनचे गांभीर्य विसरून १ मिनिट हसत बसलो होतो. मग फरक कुठे होता? कथेत आचरटपणा नावाला सुद्धा नव्हता. पुराना मंदिर मधल्या जगदीप ला गब्बर बनवून लांबी वाढविण्यासाठी जोडलेल्या सीन्ससारखी ठिगळेही नव्हती. बाकी तत्त्वज्ञान गेले उडत; निव्वळ भूतपट म्हणून देखील हा चित्रपट दर्शनीय वाटतो.

यातून काही वाईट सवयी देखील लागतात. जसे गेल्या आठवड्यात मित्राने बिपाशाच्या आगामी चित्रपट अलोन चा ट्रेलर दाखविल्यावर "च्यामारी! सिनेमा तर थाईलंडच्या अलोन वरुन उचलेला स्पष्टच आहे. पण या वेळेला भट काकांनी ट्रेलरची देखील शॉट टू शॉट कॉपी केली आहे." अशा कमेंट्स देणे हि त्यातील एक! मग तुम्हाला अनेकदा सिनेमाला यायची बंदी घातली जाते (खासकरुन सलमानच्या चित्रपटांना! "हा आधीच सीनमध्ये काय होणार सांगतो मग याला शिव्या घालण्याच्या नादात सल्लुभाईचे अ‍ॅक्शन सीक्वेन्स जातात." ज्यांना दाक्षिणात्य चित्रपट पाहायची सवय आहे त्यांना हे चटकन कळेल. किक तर म्हणजे अगदी वेषभूषेसकट रवितेजाची नक्कल आहे)

आता थोडेसे कल्चर शॉकबद्दल! जागतिकीकरणानंतर आपल्या कक्षा खूप विस्तारल्या. खासकरुन आंतरजाल आल्यावर तर जग खूप जवळ आले आणि आपण कधी नव्हतो इतके आंग्रजाळलो. आता हे चांगले का वाईट हा येथील विषय नाही पण इंग्रजी चित्रपट विशेषतः अ‍ॅक्शनपट आपल्याला जवळचे वाटू लागले. अगदी तिथले सामाजिक चित्रपटही कदाचित बरेच जण पचवतील. (उदा. ब्रोकबॅक माऊंटन, डल्लास बायर्स क्लब) पण आपण कोरियन, जापानी चित्रपट पचवू का याबद्दल मला शंका आहे. अनेकदा तिथे सेन्सॉर बोर्ड नावाची काही चीज अस्तित्त्वातच नाही असे वाटते. ज्यांना अधिक उत्सुकता आहे त्यांनी 'ऑडिशन' नावाचा चित्रपट आवर्जून बघावा. अवाक शब्द थिटा वाटू लागतो. थोडी शोधाशोध केल्यावर असे लक्षात आले कि ज्या देशांचा HRI(Human Resource Index) जास्ती आहे तिथे सेन्सॉरचे नियम सामान्यतः शिथिल आहेत. मग त्यांची रुपकात्मक कथा स्वीकारण्याची क्षमता अधिक आहे कि इतर काही कारण आहे? अर्थातच याला अपवाद आहेत.

याचा अर्थ असा अजिबात नाही कि इतर भाषांमध्येच फक्त दर्जेदार चित्रपट बनतात. जिथे सोने आहे तिथे कचरा पण भरपूर आहे. जसे आपल्याकडे रामसे भूतपट बनवायचे तसा शॉ बंधूनी हाँगकाँगमध्ये आचरट कूंगफूपटांचा धूमाकूळ घातला होता. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल तर बोलायलाच नको. पण याच कचर्यामधून अनेकदा कमालीच्या कल्पनापण स्फुरतात. लेख संपवण्यापूर्वी हा एक शेवटचा किस्सा.

क्वेंटिन टारांटिनो हा एक प्रसिद्ध दिग्दर्शक! किल बिल, Django Unchained, पल्प फिक्शन इ. त्याचे गाजलेले चित्रपट. एकदा कान महोत्सवात अनुराग कश्यपशी बोलता बोलता त्याने एक मजेशीर गोष्ट सांगितली. किल बिल मध्ये अ‍ॅक्शन सीन्स अ‍ॅनिमेटेड सीक्वेन्सच्या स्वरूपात अत्यंत भन्नाट रीतीने दाखविलेत. ही कल्पना त्याला एक चित्रपट पाहिल्यावर सुचली होती. अनुरागचा विश्वास बसेना कारण हा चित्रपट त्याने पाहिला होता व तो सुपरफ्लॉप होता. हे ऐकल्यावर क्वेंटिनचा विश्वास बसेना कि हा चित्रपट पडूच कसा शकतो. तो चित्रपट होता कमल हसन लिखित-अभिनित आलावंदन (हिंदी नाव अभय)! आता बोला!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख इंटरेस्टींग आहे ..

हिंदी, मराठी, इंग्रजी व्यतिरीक्त बाकीचे सिनेमे जवळ जवळ पाहिलेलेच नसल्यामुळे खर्‍या अर्थाने बहुतेक अ‍ॅप्रिशिएट करता येणार नाही .. परंतु शेवटचा किस्सा वाचून अभय, आलावंदन आणि पल्प फिक्शन बघावेत असं वाटतंय ..

मस्त लिहिले आहेस. सिनेमांचा शौक मोठा दिसतोय.

नुकताच टेन कनूज (http://www.imdb.com/title/tt0466399/) हा सिनेमा पाहिला. अगदीच मस्त कथा सांगितली आहे यात.

वा!! खुप कोरियन आणि जपानी चित्रपट पाहिले असल्याने जवळचा वाटला लेख. आणि रवि तेजा तर आपला आवडता कलाकार आहे. त्याचे सबटयटल असलेले चित्रपट आले की लगेच पहायचो आम्ही.

कील बिल पण आवडता चित्रपट आहे - पण अ‍ॅनिमेशन पेक्षा मला त्यातिल तलवार्बाजी जास्ती भावली. आता रक्ताच्या इतक्या चिळकांड्या आपल्याकडे चालतील का हा प्रश्न आहे.

छान लेख!
मी लहानपणी दूरदर्शनवर रविवारी दुपारी प्रादेशिक चित्रपट लावायचे ते कळत नसले तरी आवडीने बघायचे. पण हे सोडल्यास मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेतलेच चित्रपट पाहीले जायचे.
मी पहिला आंतरदेशीय (इंग्रजी नसलेला) चित्रपट पाहीला तो सेम तुम्ही लिहीला तो... अमेली. Happy त्यानंतर बहुतेक चिल्ड्रेन ऑफ हेवन..
तुम्ही लिहीलेले बरेच चित्रपट पाहीले नाहीत. बघणार. Happy

छान लिहिलं आहे. मी स्वतः सर्वच भाषातले प्रचंड (म्हणजे व्यसनी म्हणण्याइतपत) चित्रपट पहात असल्याने हा विषय जवळचा वाटला.
माझ्या स्वतःच्या आयुष्यात ह्या अंतरदेशीय (आणि आंतरदेशीयही) चित्रपटांमुळे माझ्या विचारांच्या कक्षा खूप समृद्ध झाल्या असं मला वाटतं. इच्छा असूनही कदाचित आपण कधी जाऊ शकणार नाही, अश्या अनेक देशांतील राजकीय, सामाजिक, वैचारिक सर्वच प्रकारचं विश्व माझ्यासाठी ह्या चित्रपटांमुळे माझ्यासमोर खुलं झालंय. नेहेमीच्या विचारांच्या चौकटीबाहेर पाहण्याची आणि विचार करण्याची क्षमता मला चित्रपटांतून मिळालीये. इतक्या जवळच्या विषयावरच्या ह्या लेखानं मला ह्या पर्सनल गोष्टी लिहायला भाग पाडलं Happy
क्वेंटिन टारांटिनो हा प्रकारच मला जाम आवडतो… त्याच्या त्या अशक्य वियर्ड थिंकींगवर मी फिदा आहे.
जपानी, कोरियन, थायलंडचे सिनेमा +१. यातले नवीन जनरेशनचे सिनेमे तर पचायला खरंच अवघड वाटू शकतात.

एकूणच बाहेरच्या भाषेतले/प्रांतातले सिनेमे बघताना अनेकदा 'आऊट ऑफ कंफर्ट झोन' जायची वेळ येते… आणि तिथे खरी मजा सुरु होते.

रवि तेजा फॅन मायबोलीवर सापडतील असे वाटले नव्हते >> अजुनही असतील.

आता तर त्याचे चित्रपट डब करुन सगळीकडे दाखवतात. आमची सुरुवात काही तेलुगु मित्रांमुळे झाली आणि नंतर ते नसतानाही आम्ही शोधुन शोधुन त्याचे पिक्चर पहायला लगलो.

'आऊट ऑफ कंफर्ट झोन' >> मूळ कोरियन 'ओल्ड बॉय' पहाताना असे झाले होते !

यावर्षी इफ्फीला तीन दिवसात एकूण तीनच सिनेमे (+१ मास्टरक्लास) एवढीच हजेरी लावली. त्यातले २ सिनेमे आवडले. म्हणजे अगदी माइंड ब्लोइंग ग्रेट वगैरे नाही पण बघायला छान वाटले. साधेपणा, सहजपणा, कलाकारांचा अभिनय या बाबतीत खूप आवडले.
एक चायनीज सत्यकथेवर होता. चिनी नाव लक्षात नाही. इंग्रजी नाव 'जेन्युइन लव्ह'
दुसरा जपानी सिनेमा. त्याचेही जपानी नाव लक्षात नाही. इंग्रजी नाव 'स्टिल द वॉटर'

लेख आवडला.

पण शीर्षकातला 'आंतरदेशीय' हा शब्द जरा चुकीचा वाटतो. आंतरदेशीय = domestic, देशांतर्गत. लेखात उल्लेखलेले चित्रपट भारताबाहेरचे आहेत.

पण शीर्षकातला 'आंतरदेशीय' हा शब्द जरा चुकीचा वाटतो. आंतरदेशीय = domestic, देशांतर्गत. लेखात उल्लेखलेले चित्रपट भारताबाहेरचे आहेत. <<
+१.

पण शीर्षकातला 'आंतरदेशीय' हा शब्द जरा चुकीचा वाटतो. आंतरदेशीय = domestic, देशांतर्गत >>> चुकीबद्दल एक डाव माफी असावी. जरूर तो बदल केला आहे.

@टण्या
टेन कनूज आता माझ्या लिस्टवर. इंटरेस्टिंग दिसतोय. आणि रवितेजा म्हणशील तर मलाही अपेक्षा नव्हती त्याचे पंखे सापडण्याची. Happy

नीधप - मला स्टिल द वॉटर बद्दल उत्सुकता होती पण जाणे जमले नाही. आणि आपल्याला कुठे ओ ग्रेटनेस वगैरे पाहिजे. स्वत:ला आवडला बास Happy

सुंदर लिहिले आहे. एखादा चित्रपट घेऊन त्यावर अवश्य सविस्तर लिहा.
सध्या मी अजिबातच चित्रपट बघणे सोडल्यासारखे केलेय. पण दर्जेदार चित्रपटाची ओळख अशी कुणी करून दिली तर अवश्य बघायचेत.

हो स्वतःला आवडला हाच क्रायटेरिया. त्याच बाबतीत एकदम टॉपमोस्ट लेव्हल नाही. मिडीयम पातळीला आवडला.

९५ की ९६ मधे कानला विजयी ठरलेली एमिर कुस्टुरिकाची 'अंडरग्राऊंड' जरूर बघा. भन्नाट आहे. कुस्टुरिका एकुणातच भन्नाट आहे.

तर अनेकदा हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीतून सुटलाच कसा हा प्रश्न मनात डोकावला. पण कुठलाही अर्धवट सोडला नाही.
>>>
मी पण असला चित्रपट अर्धवट सोडला नसता Wink

मग विविध आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्सचे अर्काईव्स शोधणे सुरु झाले.
>>>>
हि आयडिया सही आहे..

क्वेंटिनचा विश्वास बसेना कि हा चित्रपट पडूच कसा शकतो. तो चित्रपट होता कमल हसन लिखित-अभिनित आलावंदन (हिंदी नाव अभय)! आता बोला!
>>>
याला कारण कमल हसनचे हिंदुस्तानी, दशावतार सारखे त्याच पठडीतले रंगरंगोटी वाले सिनेम, त्यामुळे प्रोमोज बघूनच पडला असावा हा चित्रपट.

बाकी तो सलमान तर दक्षिणात्यच झाला आहे.. पण बरे आहे, तिकडच्या रावडी हिरोंचे मसालापट बघण्यापेक्षा तसल्या चित्रपटांचा आनंद सलमानला बघत उचलणे केव्हाही चांगलेच.

ओवरऑल मस्त लेख, ईथे प्रतिसादही छान माहितीपूर्ण येऊ शकतात. Happy

अजून एक लिस्ट हवी असेल तर ४ वर्षांपूर्वीच्या मामि मधल्या फिल्म्सची एक लिस्ट तीन भागात केलेली आहे. रिक्षा आहे त्याबद्दल माफ करा.

इफ्फिला होतात का? कुठल्या पाह्यल्यात?
मी फिल्मबझार संपल्यावर फक्त तीनच दिवस होते आणि कंटाळले होते त्यात बरी तिकिटे सगळी संपलेली होती. त्यामुळे फारसे पाह्यले नाही. एकुणात लोकांकडून यावर्षीच्या सिलेक्शनबद्दल खूप निगेटिव्ह मत ऐकले. बुद्धदेव दासगुप्तांच्या लेक्चरमधेही त्यांनीही हीच नाराजी व्यक्त केली होती.

सेन्सॉरच्या कात्रीबद्दल
भारताच्या सेन्सॉर बोर्डाची परवानगी फिल्म फेस्टिव्हल्ससाठी गरजेची नसते.

भारताच्या भूमिवरच्या व्यावसायिक चित्रपटगृहात व्यावसायिकरित्या (जाहिरात करून, तिकिट लावून शो करणे) दाखवल्या जाणार्‍या चित्रपटांनाच/ त्या खेळांनाच फक्त सेन्सॉर बोर्डची परवानगी (सेन्सॉर सर्टिफिकेट) लागते.

इफ्फीला नव्हतो. आमची मजल घरच्या घरुन बघण्यापर्यंतच! पण जे एक-दोन दर्दी मित्र गेले होते त्यांच्या प्रतिक्रियाही तुम्ही म्हटल्याप्रमाणेच फार सकारात्मक नव्हत्या. सिलेक्शन वर खूप टीका झाली आहे म्हणे.

@ऋन्मेऽऽष
चित्रपट प्रत्येकाची स्वतःची अभिव्यक्ती असते असे माझे वैयक्तिक मत आहे. काही जणांची काळाला शोभेशी असते काहींची काळाच्या पुढे. कमल हसन हा माणूस काळाच्या पुढे विचार करणारा माणूस वाटतो मला. त्याच्या अनेक सिनेमांविषयी समीक्षकांची मते १० वर्षांनंतर सुधारली आहेत. आता त्याला रंगरंगोटी म्हणा किंवा अजून काही, सिनेमा चालणे ती अभिव्यक्ती प्रेक्षकांना कितपत पचते यावर अवलंबून आहे. विशेष नोंद: जर हिंदुस्तानी रंगरंगोटी असेल तर आलावंदन डबल रंगरंगोटी आहे. तरी तो क्वेंटिन, कश्यपसारख्या दिग्दर्शकांना आवडला यातच काय ते समजा. आता ही तुलना फारशी योग्य नसेलही पण अंदाज अपना अपना तरी तिकिटबारीवर कुठे चालला होता? याचा अर्थ तो दर्जेदार नव्हता का? मुळीच नाही पण तेव्हा प्रेक्षकांची तशी कॉमेडी स्वीकारण्याची तयारी नव्हती.
सलमानविषयी म्हणाल तर शेवटी नक्कल ती नक्कलच! इतर नकलाकार स्वतःचे काही किमान इनपुट्स तरी टाकतात. सल्लुचे चित्रपट म्हणजे सगळीकडे फोटोशॉप करुन त्याचा चेहरा चिकटवल्यासारखे वाटते.

छान लिहिले आहे!!

जसे आपल्याकडे रामसे भूतपट बनवायचे तसा शॉ बंधूनी हाँगकाँगमध्ये आचरट कूंगफूपटांचा धूमाकूळ घातला होता. >> असह्मत. शॉ बंधूंचे चित्रपट आवडण्यासाठी मार्शल आर्ट कळणे आणि मार्शल आर्टची आवड असणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे शॉ बंधूंचे अनेक चित्रपट सामजिक विषयावर आधरित अथवा प्रेमपट सुद्धा आहेत.

आपून तो दक्षीणभारतीय शिनूमे आनंदाने पाहतो.
बाकी काहि कळो ना कळो त्यांच्या होरोईन्या लै सुंदर (म्हणजे अट्रक्टीव) असतात.

ग्रेट, फारच छान. तुम्ही केवळ पाहिले नाही तर त्यावर विचारमंथन करून पायस (खरे तर नवनीत) माबोकरांसाठी आणलेत याचे कौतुक.

आजवर एक दोन जपानी चित्रपट पाहिले आहेत. त्यातला अतिशय आवडलेला म्हणजे आकिरा कुरोसावाचा "मादा दा यो". ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी विकीवरील माहिती पाहून जर कुठे जालावर मिळाला तर अवश्य पहा.

http://en.wikipedia.org/wiki/Madadayo

पायस,
ईथे मला त्या "अभय" चित्रपटावर एक कलाकृती म्हणून भाष्य करायचे नव्हते, किंबहुना मी तो चित्रपट पाहिला नसल्याने ते नाहीच करू शकत. मात्र तो तिकीटबारीवर का नाही चालला याचे एक कारण दिले.

याउपर काळाच्या पुढचा चित्रपट हे कारण जे देतात ते मला व्यक्तीशः कधीच नाही पटले, कारण जर एखादा विषय काळाच्या पुढे आहे हे दिग्दर्शक म्हणून तुम्हाला समजत असेल तर तो पुढच्या काळातच काढा ना.. वा किमान आजच्या काळाशी त्याची सांगड घालायचे कौशल्य दाखवा.
चित्रपट हा एक व्यवसाय आहे हे डोक्यातून काढले आणि त्यामागे सामाजिक उद्देशही जोडला तरी किमान तो लोकांपर्यंत पोहोचायला तरी हवा, तरच तो तुमचा जो काही उद्देश असेल तो साध्य होईल.

असो, मूळ धाग्याचा हा विषय नाही, अवांतर होत असल्यास क्षमस्व ! Happy

<<<जसे आपल्याकडे रामसे भूतपट बनवायचे तसा शॉ बंधूनी हाँगकाँगमध्ये आचरट कूंगफूपटांचा धूमाकूळ घातला होता. >> असह्मत. शॉ बंधूंचे चित्रपट आवडण्यासाठी मार्शल आर्ट कळणे आणि मार्शल आर्टची आवड असणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे शॉ बंधूंचे अनेक चित्रपट सामजिक विषयावर आधरित अथवा प्रेमपट सुद्धा आहेत.>>>>

याबद्दल दिवे घ्याल. मी समग्र शॉ केले नसले तरी एवढे माहिती आहे कि त्यांच्या सुवर्णकाळात शॉ बंधूंनी काही उत्कृष्ट चित्रपट दिले. पण खासकरुन ८० नंतर त्यांचा दर्जा खालावला असे मला वाटते. तसेच जेव्हा त्यांचा सुवर्णकाळ चालू होता तेव्हा त्यांची चित्रपट काढण्याची फ्रिक्वेन्सी देखील कमी होती जी दर्जा खालावल्यावर वाढली म्हणून मी धूमाकूळ हा शब्द वापरला. जर शाँचे काही चांगले चित्रपट माहिती असतील तर सुचवाल.

कोरियन सिनेमे खूप पहिले ... फक्त दोनच नावे देतो ... माझे डोके सुन्न झाले होते suspense मुले...

१. ओल्ड्बोय
२. Confession ऑफ murder - नक्की बघा..

ओल्ड बॉयबद्दल इथे काहि जणांनी लिहिलं आहे.
मला तरी ओल्ड बॉयचा सस्पेन्स/शेवट अतिशय चीप(cheap),सवंग वाटला. कसंही करून,कुठल्याही पातळीवर उतरून प्रेक्षकांना एक जोरदार धक्का द्यायचा, हा एकमेव उद्देश वाटला.
ज्यांच्याकडे खरोखर प्रतिभा आहे त्यांना सस्पेन्स/twist साठी एवढ्या खालच्या पातळीवर उतरण्याची गरज भासणार नाही.

आवडला लेख. एकदम साधेपणाने स्वतःच्या आवडीविषयी लिहिले आहे. >> +१

मला तरी ओल्ड बॉयचा सस्पेन्स/शेवट अतिशय चीप(cheap),सवंग वाटला. कसंही करून,कुठल्याही पातळीवर उतरून प्रेक्षकांना एक जोरदार धक्का द्यायचा, हा एकमेव उद्देश वाटला. >> तुम्ही स्पाईक ली च्या सिनेमाबद्दल बोलत असाल तर +१. मूल oldboy तसा नाही वाटत.

Pages