गोव्याचे काही पदार्थः सार आमटी वगैरे.

Submitted by मानुषी on 13 December, 2014 - 02:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१)तूर डाळीचे सार
साहित्य:
अर्धी वाटी तूर डाळ, दीड वाटी ओले खोबरे, २ सुक्या ब्याडगी मिरच्या, १० दाणे मिरे, मीठ, चिंच, गूळ, तेल, मोहोरी, हिंग, हळद, वरून पेरण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

प्रस्तावना:
सध्या गेली ३/४ वर्षं घरातल्या दोन्ही नारळाच्या झाडांना खूप नारळ येताहेत. त्यामुळे एकदम खूप आले की ते उतरवण्यासाठी एका टीमला बोलावणे जाते. ते दोघे तिघे येतात. एक छोटी पिकप व्हॅन आणि दोर घेउन. मग त्यांच्या पद्धतीप्रमाणे अगदी पद्धतशीर ते नारळाचे घोस उतरवतात.
पण कधी तरी बर्‍याच वेळा एक एक नारळ पडत रहातो. आणि तो आतून चांगला पक्व झालेला असतो. हे हिरवे असोले नारळ सोलण्याचे त्रिशूला सारखे यंत्र आहे. त्यावर हे सोलायचे. एकदा ट्रिक कळली की हे असोले नारळ सोलणेही सोपे आहे. मग एकदम २/३ नारळ फोडून खवून एकदा डिपात ठेवले की मग ऐशच!
घरचे नारळ असल्याने हा सगळा उपद्व्याप करणे आले!
कृती :
तूर डाळ कुकरमध्ये छान शिजवून घ्या. अर्धा चमचा तेलात २ ब्याडगी मिरच्या चांगल्या भाजून घ्या. त्याच तेलात मिरी दाणेही तळून घ्या.
मिक्सरमध्ये आधी तळलेल्या मिरच्या व मिरे चांगलं बारीक करून घ्या. त्यातच ओलं खोबरंही वाटून घ्या. यातच वाटताना अर्धी वाटी पाणी घाला
आता हे मिश्रण तारेच्या गाळणीने गाळून घ्या. या गाळणीत हे मिश्रण ओतले की मुठीत थोडे थोडे मिश्रण दाबून त्याचा रस गाळणीतून काढा.
परत सगळं मिश्रण थोडं पाणी घालून मिक्सरमधून फिरवून पुन्हा एकदा संपूर्ण दूध गाळणीतून काढून घ्या.
हे दूध ब्याडगी मिरच्यांमुळे साधारणपणे केशरी रंगाचे असेल.
आता कुकरमधली डाळ चांगली हाटून घ्या. या हाटलेल्या डाळीत केशरी रंगाचे खोबरयाचे दूध ओता. यात थोडा चिंचेचा कोळ व थोडा गूळ घाला. याची चव खूप आंबट गोड नसते. म्हणून चिंचगूळ प्रमाणातच वापरा.
याची कन्सिस्टन्सी पातळ आमटीप्रमाणे असावी. जरी हे सार असले तरीही अगदी साराप्रमाणे पाणचटही नसते.
आता याला तेलाची मोहोरी हिंग हळद घालून फोडणी द्या. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवा.
हे सार तोंडीलावणे म्हणून जेवणाबरोबर मस्त लागते. पण भाताबरोबर अप्रतीमच लागते.
आता थंडीत हे सार करूनच बघा. मात्र हे अगदी उकळते असावे. गरमागरम ओरपण्यातच या साराची मजा आहे.

वाढणी/प्रमाण: 
भरपूर ओरपण्यासाठी हे प्रमाण दोन माणसांचे आहे.
अधिक टिपा: 

या साठी नारळाचे दूध काढणे हा एक खटपटीचा भाग आहे. पण एकदाच नारळ खवून त्याचं दूध काढून ते डीप फ्रीजमध्ये साठवून ठेवायचे.
व वेळोवेळी वापरायचे.
दुसरा एका चांगला ऑप्शन म्हणजे सरळ मिरच्या मिरे हे सगळं खोबर्या बरोबर वाटून हे तयार दूधही तुम्ही डीप फ्रीजमध्ये साठवू शकता.
ऐन वेळी फक्त डाळ शिजवली की झाल.
आता या खोबर्‍याच्या चोथ्याचं काय करायचं? ज्याला हा चोथा वापरायचा नाही त्यांचा प्रश्न नाही. पण मला स्वता:ला शक्यतो काही फेकायला आवडत नाही. हा चोथाही फ्रीजमध्ये घट्ट झाकणाच्या डब्यात छान रहातो. कारण आपण त्यातलं सगळं सत्व काढून घेतलं आहे. आता आहे ते फक्त फायबर आहे. त्यामुळे ते फार लवकर खराब होत नाही.....जसं ओलं खोबरं फ्रिजमधेही लवकर खराब होण्याची शक्यता असते.
पण हा चोथा वेगवेगळ्या भाज्या, रस्से, आमट्यांमधे फोडणीत परतला तर छान चव येते व दाटपणाही येतो.
हा चोथा थालिपीठात आणि विशेषतः तांदळाच्या भाकरीतही चांगला लागतो.

माहितीचा स्रोत: 
माझी वहिनी ...जिचं माहेर गोव्याचं आहे.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान प्रकार. गोव्यात फक्त हे वाटण वापरून अनेक प्रकार करतात. ( हा शिवराक प्रकार म्हणायचा. )
आज जेवायला काय करायचे, याचा विचार करण्यापुर्वीच नारळ फोडायला घेतात तिथे. पण एक मात्र खरे फ्रोझन नारळच काय फ्रोझन मासेही त्यांना चालत नाहीत.

मानुषी, मस्त प्रकार गं! भारीच लागत असणार! नारळाचं दूध आहे म्हटल्यावर काय!...:स्मित:
आज जेवायला काय करायचे, याचा विचार करण्यापुर्वीच नारळ फोडायला घेतात तिथे>>> Lol

एकदम तोंपासु रेसिपी. वेगवेगळ्या आमट्या, सार आवडतात त्यामुळे नक्की करेन एकदा (तरी) Happy

मला ते नारळ सोलायची चांगली सवय आहे बर्का Happy फक्त त्याचे खूप भयंकर आणि कधी न जाणारे डाग पडतात. कपड्यांना Sad

मला ते नारळ सोलायची चांगली सवय आहे बर्का स्मित>>>> काय सांगते तृप्ती? मस्तच!

अजून टाक टिपिकल ( आणी सोप्या डोळा मारा ) गोवन रेसिपीज>>>>
वर्षू Proud
सर्वांना धन्यवाद!
पुढील पदार्थ येत आहे (हो SSSSSSSSSSSSSSS)

जागू धन्यवाद.
पिन्की ...अन्जलीची नारळ खवणी छान असते बघ. तळाशी रबरी वॅक्क्यूम असतो. ओट्यावर्/डायनिंग टेबलावर फिट करून सहज नारळ खवू शकतो.
नाहीतर हल्ली इलेक्ट्रिकवर चालणारी खवणी सुद्धा मिळते. ती तर फारच छान.
त्या खवणीवर नारळ धरला, बटण दाबलं की पाहिजे तेवढं खोबरं.

फोटू पाहिजे मानुषी..

आम्ही याला तेलाची फोडणी न देता अगदी आयत्यावेळी तूप-जिरं-हिंगाची फोडणी देतो.. तों. पा. सु.!

मंजू डी ...हे फोटो(खास तुझ्यासाठी :स्मितः)
हे सुकी मिरची आणि मिरी दाण्यांबरोबर वाटून घेतलेल्या खोबर्‍याचं दूध. कोथिंबिरीसह

हे तयार सार...फोटो नाही एवढा चांगला आणि स्पष्ट. सध्या सेल फोनात फोटो काढतेय.

छान प्रकार. गोव्यात फक्त हे वाटण वापरून अनेक प्रकार करतात. ( हा शिवराक प्रकार म्हणायचा. )
आज जेवायला काय करायचे, याचा विचार करण्यापुर्वीच नारळ फोडायला घेतात तिथे. पण एक मात्र खरे फ्रोझन नारळच काय फ्रोझन मासेही त्यांना चालत नाहीत.>>>>>>>>>>>>> हो दिनेशदा नारळाशिवाय जेवणाचा आम्ही विचारच करू नाही . प्रत्येक पदार्थात खोबर वापरणे गोव्यात मस्ट आहे.

@मानुषी ताई,
अंजली ची नारळ खवणी आहे घरी पण नाहीच जमत त्याने.
इलेक्ट्रिकवर चालणारी खवणी पुण्यात कुठे मिळेल आणि खुप मोठी आहे का ती?

पिन्की
अन्जलीची खवणी खूप सोयीस्कर आहे गं. का नाही जमत त्याने? त्याचा व्हॅक्यूम गेला आहे का?
इलेक्ट्रिक खवणीबद्दल माझ्या वहिनीला विचारून सांगते.
सर्वांना धन्यवाद.
दुसरा पदार्थ लिहीन म्हटलं पण जरा सवडीने लिहीन.

@ मानुषी,
व्हॅक्यूम चांगला आहे अजुन. पण मी फारच मठ्ठ आहे काही बाबतीत.
मी एकदा तुलसीमध्ये विचारुन बघते.

मी परवा हे सार करून बघितलं. कन्सिस्टन्सीमुळे हे सार भाताबरोबरही न घेता नुसतं ओरपायलाच चांगलं असं वाटलं. ब्याडगी मिरच्या नसल्याने घरात होत्या त्या लाल मिरच्या घेतल्या, त्यामुळे रंगाच्या बाबतीत केशरी रंगात पांढरा कलर जास्त झाला. पुढच्या वेळेस अजून थोड्या मिरच्या आणि मिरी दाणे वाढवेन म्हणजे थोडं तिखटही होईल.