लच्छा पराठा

Submitted by saakshi on 4 December, 2014 - 08:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१. गव्हाचे पीठ - २ वाट्या
२. मैदा - अर्धी वाटी
३.तूप/बटर - ४ मोठे चमचे
४.जिरा - १ चमचा पूड करून
५.धने - १ चमचा पूड करून
६.गरम मसाला - चिमूटभर
७.हळद - १ छोटा चमचा
८.अंडे - १
९.कणीक मळण्यासाठी पाणी
१०. साखर आणि मीठ - १ छोटा चमचा

क्रमवार पाककृती: 

१.मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र करून घ्यावे. त्यात अंडे फोडून टाकावे. त्यातच २ चमचे तूप/बटर टाकून मिसळून घ्यावे.
२.वरच्या मिश्रणात जिरेपूड, धनेपूड, हळद, मीठ, गरम मसाला आणि साखर टाकून नीट मिसळावे.
३.कोमट पाणी हळूहळू टाकत मळून घ्यावे. मळलेली कणीक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावी.
४.अर्ध्या तासानंतर कणीक बाहेर काढून तुपाचा हात लावून चांगली तिंबून घ्यावी.
५.कणकेचे चपातीला करतो त्यापेक्षा थोडे मोठे गोळे करावेत. वरच्या मिश्रणाचे ७ ते ८ गोळे होतील.
६.एक गोळा घेऊन घडी न घालता लाटून घ्यावा. त्यावर एक चमचा तेल पसरून लावावे. वरून मैदा भुरभुरावा. या मैद्यामुळे पराठ्याला छान पदर सुटायला मदत होते.

lp1.jpg

७.मग लहानपणी जसे कागदाचे पंखे करताना घड्या घालायचो तशा या लाटीच्या घड्या घालाव्यात.
घड्या घालताना असे दिसेल

lp2.jpg

सर्व घडया घातल्यावर असे दिसेल

lp3.jpg

८. आता ही घडया घातलेली पट्टी दोन्ही बाजून हलकेच ओढून लांबवावी. मग तिची गुंडाळी करावी.
गुंडाळी करताना

lp4.jpg

शेवटचे टोक खेचून गुंडाळीच्या मध्यावर दाबावे.

९.असे सर्व गोळे तयार करून घ्यावेत.
तयार गोळे

lp5.jpg

१०.हलक्या हाताने पराठे लाटावेत. तूप/ बटर टाकून खरपूस भाजावेत.

तयार पराठे

lp6.jpglp7.jpglp8.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना भरपूर.
अधिक टिपा: 

पराठे भाजताना तव्याचे तापमान मध्यम ठेवावे. कमी झाल्यास पराठ्याचे पदर सुटत नाहीत.
तूप वापरताना हात आखडता घेऊ नये, त्याची चव अप्रतिम लागते.
बटाट्याची तिखट गोड भाजी/ चटणी/दही/सॉस सोबत गट्टम करावेत. Happy

माहितीचा स्रोत: 
तूनळी आणि स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांना धन्यवाद Happy नक्की करून पहा आणि फोटोज टाका Happy

>>>>दही घातल तरी मस्त पदर सुटतात.>>>धन्यवाद प्राजक्ता Happy ज्यांना अंडं नको आहे त्यांनी दही घालून करून बघा Happy

>>>>>>एक शंका - केरळा पराठे असतात ते असेच लच्छा पराठेच असतात ना..>>>> हो ऋन्मेऽऽष, लच्छा पराठेच असतात ते.

एकदम मस्त! ब्रे फा च्या वेळेला हे बघितल्याने आत्ता तयार असलेल्या भिजवलेल्या कणकेचे अशा पद्धतीने लाटून परांठे करते लगेच. नंतर कधीतरी साग्र संगीत करीन!

(मनातला प्रतिसाद- एखादी रेसीपी आली की, थोड्या फार फरकाने बर्‍याच रेसीप्या येतात.(अगदी चढाओढच लागते, बघा मला सुद्धा येते एक वेगळी रेसीपी असे दाखवत असेच वाटते. थोडा फार फरक असला तरी. आता लच्छा पराठावर पाच सहा बीबी दिसणार... Proud ).

साक्षी, छान आहे रेसीपी (वरचे तुम्हाला उद्देशून नाही). Happy

छान दिसतोय पराठा.
अंडं न वापरता केला आहे आत्तापर्यंत.
एकदा अंडं वापरून करून पाहिलं पाहिजे.

छानच झाले आहेत. मस्त फोटो. उद्या करते. हळद घालायचे काय लॉजिक?
ह्या बरोबर किमान पक्षी पनीर बटर मसाला किंवा बटर चिकन हवे. पचरंगा अचार व कांदा लिंबू. आमच्याकडे वेंकीज चे बटर चिकन फ्रीज मध्ये नेहमीच असते. त्या बरोबर करता येइल.

सर्वांना धन्यवाद Happy
करून बघा आणि फोटोज डकवा लोक्स!
हळद घालायचे काय लॉजिक?>>> अमा, हळद रंगासाठी घातली आहे, हलकी पिवळसर झाक खरपूस भाजल्यावर छान खुलून येते म्हणून. मला आवडते. घातली नाही तरी चालेल.
ह्या बरोबर किमान पक्षी पनीर बटर मसाला किंवा बटर चिकन हवे>>>> सत्यवचन! Happy

खुप मस्त झाले saakshi, एकदम खुसखुशीत Happy
तुमच्या पराठ्यासारखे पदर नाही सुटले, पण आधी करत होते त्यापेक्षा फारच सुंदर झालेले.

आमचा झब्बू!
DSC00592.JPG

फक्त बटर ऐवजी २ चमचे तूप घेतले. मुळ पाककृतीच्या प्रचि १ च्या वेळेस दोन पराठ्यांना ब्लू चीज लावले, एकाला दालचिनी पावडर आणि दोन साधेच केले.
ब्लू चीज प्रकरण साधे चीज नसल्याने ट्रायल बेसिस वर केले होते. खाल्ल्याबरोबर 'ये मैने क्या किया' Uhoh असे विचार आले. दालचिनी पावडरवाल्याला वरुन मध लावून खाल्ले (सर्दी झाली आहे ना!). अतिशय सुंदर लागले! Happy

मी सुद्धा बिनअंड्याचे , फक्त कणीकेचेच दही अथवा साअर क्रीम घालून करते.
नुसतं देसी घी घालून सुद्धा मस्त तोंडात विरघळतात असे होतात. साअर क्रीम किंवा लोणी घालून करून पहा.
हे मी केलेले माझी वरची रेसीपी वापरून कणीक आणि दही, जीरा भरड वाटून.
मटणा बरोबर मस्त लागले.

गरमगरम पराठे आणि जॅम लावून सुद्धा मस्त लागले.
चहात बुडवून सुद्धा मस्त लागतात.

photo (5) (357x400).jpg

मस्त झाले होते. मी अंडे व दही दोन्ही घातले. घी घातले नाही. बटर चिकन बरोबर अफलातून लागले.
वर स्वीट म्हणून नवे होकी पोकी आइस्क्रीम मॅड किंग अल्फान्सो !!! आता झोप!!!

साक्षी फोटो आणि पदार्थ तोंपासु!
झरबेरा उरक्याची गं अगदी! लगेच करून पाहिले! मस्त हं !

मी फक्त साध्या कणकेचे करुन पाहिले. घरी तुप बटर सगळं काही होतं पण माझी काही धीर झाला नाही हे सर्व घ्यायला. मी प्रत्येक लप्याला अर्धा चमचे ऑलिव्हचे तेल वापरले. काही प्रचि जोडत आहे.

देवीका Happy धन्य! तू तर अगदी त्या जाहिरातीची आठवण करुन दिलीस.. व्हर्र्पुल व्हर्र्पुल Happy

झरबेरा परत करुन बघ... तुझा पंखा चुकला का Happy आधी कागदाचा पंखा करुन बघ Happy

मी जेमतेल तेल वापरले म्हणून खूप चक्राकार जरी नाही दिसत असला तरी ते गोल गोल बोटावरीन चक्रासारखे वलय मला दिसले Happy

साक्षी, धन्यवाद हा सोप्पा पराठा शिकवल्याबद्दल.

मस्त दिसतोय पराठा....बिनअंड्याचे करण्यासाठी कोणी प्रमाण सांगणार का?

Pages